वन डिश मिल - कडधान्यांचे सलाड {अल्पना}

Submitted by अल्पना on 9 September, 2024 - 03:36

यावर्षी गणेशोत्सवात पाककृती स्पर्धेत भाग घ्यायचा हे मी आधीच ठरवलं होते. वन डिश मिल ची स्पर्धा जाहिर झाल्यावर तर ५-७ वेगवेगळे पदार्थ आठवले. त्यातले बरेचसे पदार्थ पूर्वी केले होते. गणेशोत्सव सुरू असताना त्यातला कोणताही ताजा पदार्थ करायला नाही जमला तरी किमान जुने फोटो शोधून प्रवेशिका द्यायचीच हे ठरलं होते. आज त्याप्रमाणे पूर्वी केलेल्याच एखाद्या पदार्थाची प्रवेशिका देणार होते.
रोजच्या नाश्त्याला आमच्या घरी बहूतांशी वेळा मोड आलेले परतलेले कडध्याने असते. आज मात्र सकाळी अचानक त्यात थोडा बदल करून हे सलाड केलं. करताना सकाळच्या गडबडीत १-२ फोटो ही काढले. हे स्पर्धेच्या नियमात बसत असल्याने आधी याचीच प्रवेशिका देतेय.
साहित्यः
३ वाट्या मोड आलेले मुग आणि मटकी, एक टॉमॅटो, एक काकडी, अर्धा उकडलेला बटाटा, एखादे फळ (मी एक नाशपती घेतलंय कारण घरी तेच होते फक्त. यात सफरचंद आणि थोडे डाळिंबचे दाणे पण चांगले लागतील), मुठभर भिजवलेले शेंगदाणे, थोड्या लॅक्टो फरमंटेड भाज्या ( या ऐच्छिक आहेत. माझ्याकडे थोडी काकडी आणि गाजर होते म्हणून मी घेतलं), अर्धे लिंबू, चिमुटभर जिरेपुड, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ.
कृती:
शेंगदाणे किमान १-२ तास आधी भिजत घालावेत. एका मोठ्या भांड्यात थोडे मीठ घालून पाणी उकळत ठेवावे. उकळत्या पाण्यात पाचे मिनिटे शेंगडाणे शिजवावे. मी हे सलाड करायचे अचानक ठरवले. माझ्याकडे भिजवलेले शेंगदाणे नव्हते म्हणून म्हणून मी ५ मिनिटांऐवजी १०-१२ मिनिटे शेंगदाणे उकळत्या पाण्यात शिजू दिले. यानंतर यात मोड आलेली कडधान्ये घालून अर्धा- एक मिनिट शिजू द्यावे. त्यानंतर गॅस बंद करून भांडे १० मिनिटे झाकून ठेवावे. कडधान्ये शिजली जातात पण गिचका होत नाही.
असे करायच्या ऐवजी दुसर्‍या कोणत्याही प्रकारे (कुकरमध्ये / स्टिमरमध्ये) शेंगदाणे आणि मुग - मटकी वाफवून घेतले तरी चालेल. फक्त अगदी गाळ शिजू नयेत. शिजलेल्या कडधान्यांना गाळून घ्यावे आणि थंड व्हायला ठेवावे. पाणी फेकू नका. सुप/ आमटी मध्ये घालता येईल.
सगळ्या भाज्या आणि फळं चिरून घ्यावीत.
saahity.jpeg
एकत्र केल्यावर त्यात चवीप्रमाणे थोडे मीठ, जीरेपुड आणि अर्धे लिंबू पिळावे. वरून कोथिंबीर घालावी.
salaad.jpeg
कदधान्यांमधून प्रथिनं आणि कर्बोदके, बटाट्यामधून कर्बोदके, भाज्या आणि फळांमधून जीवन्सत्वे आणि शेंगदाण्यातून स्निग्ध पदार्थ+ प्रथिने मिळतात. यात लॅक्टोफरमेंटेड (किण्वन केलेल्या) भाज्या वापरल्याने मायक्रोन्युट्रिएंट्स आणि पोटासाठी चांगले लॅक्टोबॅसिल बॅक्टेरिया पण मिळतात.
लॅक्टो फरमंटेड भाज्या बनवणं खूप सोप्पं आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्यांचे तुकडे करून घ्यावेत आणि ते एका बरणीमध्ये ठेवावेत. त्यात या भाज्या पुडतील इतके पाणी घ्यावे. आता हे पाणे दुसर्‍या भांड्यात घेवून पाण्याचे वजन करून घ्यावे. पाण्याच्या वजनाच्या २-३% मीठ मोजून घेवून पाण्यात विरघळवून घ्यावे. आता हे मीठाचे पाणी / ब्राईन भाज्या ठेवलेल्या बाटलीत घालावे. चवीसाठी यात थोडे मीरे / लसणाच्या पाकळ्या किंवा अद्रकचा तुकडा, दालचिनी चा तुकडा, तेजपत्त्याचा तुकडा यातले काहीही घालता येते. फक्त भाज्यांमध्ये पाणी घालायच्या आधीच हे पदार्थ पण घालावेत म्हणजे पुढे पाणी कमी किंवा मीठ कमी अथवा जास्त होणार नाही. मीठ कमी पडल्यास भाज्या खराब होवू शकतात. मीठ जास्त तब्येतीसाठी चांगलं नसतं म्हणून आवश्यकेपेक्षा जास्त न घातलेलं बरं.
मुळा, गाजर अशा प्रकारच्या भाज्यांसाठी २% मीठ पुरतं तए काकडी, पत्ता कोबी, बेल पेपर्स सारख्या भाज्यांना ३% मीठ लागते. यापेक्षा जास्त पाणी असलेल्या भाज्या असतील तर ३ ते ४.५% मीठ लागेल. मी काकडी - गाजर या दोनच भाज्या ब्राईन मध्ये ठेवल्या होत्या म्हणून २.३% मीठ घेतलं होते. चवीसाठी यात एक तेजपत्त्याचे पान, ४-५ मीरेदाणे, २-३ लसणाच्या पाकळ्या घातल्या होत्या. यातच द्राक्षाच्या वेलीचे एखादे पान घातल्यास काकड्या करकरीत रहातात असे ऐकलं आहे.

भाज्यांमध्ये मीठाचे पाणी घातल्यावर झाकण घट्ट बंद करून ५ ते ७ दिवस बाजूला ठेवावे. रोज दिवसातून १-२ वेळा झाकण थोडे उघडून त्यातली हवा बाहेर जावू द्यावी. असे केले नाही तर ४-५ दिवसात बाटली फुटू शकते. ५-७ दिवसांनी झाकण बंद करून बाटली फ्रीजमध्ये ठेवावी. हे लॅक्टो फरमंटेड भाज्यांचे पिकल फ्रीजमध्ये २-४ महिने तरी आरामात चांगले रहाते. माझ्याकडे ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ कधी ठेवावे लागलं नाहीये. भाज्या जास्त आंबुस हव्या असतील तर अजून २-३ दिवस बाहेर ठेवता येईल.
vegetables.jpg
मीठाच्या पाण्यात ठेवलेल्या भाज्या, पहिल्या दिवशी. पाचव्या दिवशीपर्यंत पाणी थोडे गढूळ दिसायला लागतं आणि काकडीचा रंग बदलेला दिसतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे, हेल्दी आणि रंगीबेरंगी.

लॅक्टो फरमंटेड काकडी- गाजरं खायला आवडणारे आहेत आमच्याकडे.

मस्त आहे रेसिपी (किण्वन प्रयोग करायचे कधीपासून ठरवत होते. आता तुझ्या पद्धतीप्रमाणे सुरवात करुन बघेन. (पांता भात हा एकच प्रोबायोटीक मिळण्याचा प्रकार आजवर करुन बघितला आहे. पण असे बाटलीत भरुन ठेवले तर बुरशी येईल का वगैरे भिती वाटायची म्हणून प्रयोग करत नव्हते. पण करुन बघेन. काही अडले तर तुला विपु करेन)

आजच सकाळी मुग पाण्यातून उपसून मोड येण्यासाठी ठेवलेत. घरात डाळींब आणि सफरचंद आहे. काकडी टोमॅटो गाजर पण आहे घरी. त्यामुळे उद्याच सकाळी ब्रेकफास्टला हे करुन बघेन. यात टोफू/पनीर पण चांगले लागेल का?

(किण्वन प्रयोग करायचे कधीपासून ठरवत होते. आता तुझ्या पद्धतीप्रमाणे सुरवात करुन बघेन. (पांता भात हा एकच प्रोबायोटीक मिळण्याचा प्रकार आजवर करुन बघितला आहे. पण असे बाटलीत भरुन ठेवले तर बुरशी येईल का वगैरे भिती वाटायची म्हणून प्रयोग करत नव्हते. पण करुन बघेन. काही अडले तर तुला विपु करेन) >>> कधीही विचार. मी पत्ताकोबीचे सावरक्रॉट (जर्मन शब्द आहे, नक्की उच्चार बघावा लागेल) आणि या भाज्या करून बघितल्या आहेत. शिवाय कंबुचा झालाय करून. अजून ३-४ प्रकार आहेत करायचे. मध्यंतरी एका मैत्रिणीने ऑनलाईन वर्कशॉप घेतले होते. त्यात बरीच माहिती मिळाली.
पाण्यात भाज्या पूर्ण बुडलेल्या असतील तर येत नाही बुरशी.

यात टोफू/पनीर पण चांगले लागेल का?>> हो. मी टोफू खात नाही फारसे. कच्च्याच पनीरचे तुकडे चांगले लागतात.

मस्त!
लॅक्टो फरमेंटेड भाज्या ही संकल्पना नवीनच कळली. या भाज्या अशा salad मध्येच वापरतात की अजूनही कुठल्या प्रकारे खातात? थोड्या आंबटसर लागतात का चवीला?

या भाज्या अशा salad मध्येच वापरतात की अजूनही कुठल्या प्रकारे खातात? थोड्या आंबटसर लागतात का चवीला?>> आंबूस + थोडी मीठाची खारट चव असते. साधारण बाजारात मिळणार्‍या पिकल्ड व्हेजीज सारखीच चव असते. पण पिकल्ड व्हेजीज मध्ये आंबुसपणा व्हिनेगर ने आणतात.
मी बहूतेक वेळा सलाड मध्येच घालते. पण नुसते थोडे लावणं म्हणून पण घेता येईल ताटात. बर्गर / रोल / शवर्मा करताना त्यात घालता येईल.

हो. मी टोफू खात नाही फारसे. कच्च्याच पनीरचे तुकडे चांगले लागतात.>> थॅन्क्स. मी ही नाही फारसे खात टोफू. पण नेमके काल आणले गेलेय घरी.

पौष्टिक आहे
लॅक्टो फरमेंटेड नवीनच कळाले

इकडे पिकल्ड काकड्या मिळतात त्या अशाच बनवतात बहुतेक>> बाजारात मिळणार्‍या पिकल्ड काकड्या आणि फरमंटेड काकड्यांमध्ये फरक आहे. पिकल्ड काकड्या बनवताना आंबटपणासाठी व्हिनेगर वापरलं जाते आणि नंतर त्यांना ब्राइन मध्ये ठेवतात. पिकल्ड काकड्या फ्रीजबाहेर ठेवल्या तरी चालते त्यातल्या व्हिनेगर मूळे. त्यात प्रोबायोटिक / लॅक्टोबेसिल बक्टेरिया /चांगले जिवाणू नसतात. फक्त व्हिनेगर आणि मिठामुळे जीवनसत्वे तशीच टिकून रहातात.
फरमंटेड भाज्यांमध्ये मात्र हे जिवाणु असतात. आंबण्याची / किण्वन प्रक्रिया होवून आंबटपणा येतो. त्यामूळे ५-७ दिवसांनंतर मात्र या भाज्या किण्वन प्रक्रिया लांबवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात. बाहेर ठेवल्यास भाज्या अजून आंबट होत रहातील. These are considered as very good for gut health.

लॅक्टो फरमेंटेड भाज्या ही संकल्पना नवीनच कळली>>>> सध्याच्या केपॉप / केड्रामा / कोरियन वेव्ह मुळे " किमची" माहित असेल ना सगळ्यांना. तर किमची हा सुद्धा लॅक्टोफरमेंटेड पदार्थ आहे. फक्त किमचीला ब्राइन मध्ये ठेवावं लागत नाही.

काल सकाळी ब्रेफाला करुन खाल्लं हे सॅलड. दुपारी मुगाची उसळ केली होती. उरलेल्या उसळीत (रस उरला नव्हता) परत सगळे वरचे जिन्नस (घरात हाताशी लागले ते) आणि अगदी थोडे टोफू कुस्करुन घातले. टोफू पहिल्यांदाच असे वापरले त्यामुळे फिन्गर्स क्रॉस करुनच पहिला घास घेतला Proud पण असे कमी प्रमाणात घातलेले चांगले लागत होते. (अर्थात सकाळी खाल्ले ते सॅलड होते, संध्याकाळी केले ते मिसळ सॅलड झाले Lol पण चांगले लागले ते ही आणि पोटही भरले.)