आरोग्यवर्धक पेय- {डिटॉक्स टी/हर्बल टी/फुलचा}" - {कविन}

Submitted by कविन on 8 September, 2024 - 01:50

डिस्क्लेमर: पक्के चहाबाज असाल तर या शिर्षकातला 'टी' तुम्ही वाचू नका . फुल चहाचे अपभ्रंश करुन लिहीलेल्या शब्दातल्या 'चा' कडेही तुम्ही बघू नका. पण एक वेगळ्या स्वादाचे पेय म्हणून एकदा तरी नक्की करुन बघा. करायलाही फार कष्ट नाहीत.

चला मग करुन बघुया हे दोन चहा
१) गोकर्ण फुलाचा चहा आणि २) जास्वंद फुलाचा चहा

प्रचि:

गोकर्ण चहा
InCollage_20240907_153021605.jpgInCollage_20240907_152636384.jpg

फोटोत दिसणारे दोन रंग हे लिंबू न घालता आणि घालून झालेल्या बदलामुळे आहेत. लिंबू न घालता फिकट ते थोडा डार्क निळसर रंग येतो आणि लिंबू घातल्यावर पर्पल (लिंबू किती पिळलेय तसा रंग कमी अधीक डार्क येतो)

२) जास्वंद चहा

InCollage_20240908_100856301.jpg

साहित्य:
१) निळी गोकर्ण फुले/ लाल जास्वंद फुले
२) आलं (ठेचून किंवा किसून/मिक्सरवर वाटून ठेवत असाल एकदमच तर त्यातला एक चमचा)
३) गवती चहा
४) तुळशीची पाने
५) पुदिना पाने
६) पाणी (मी दोन ग्लास पाणी घेतले आहे)

दोन्हीची कृती सारखीच आहे.

१) पाण्यात आल्याचा कीस, गवती चहा, पुदिना, तुळस घाला. पाणी या सगळ्या सकट उकळू द्या
२) उकळी आली की गॅस बंद करा आणि फुले घालून झाकण ठेवा (फुले पाण्याखाली धुवून घेऊनच वापराल हे गृहीत धरतेय)
मी वेळ मोजून बघत नाही गाळायचा पण साधारण पणे पाण्यात रंग उतरतो आणि फुलाचा मूळ रंग फिकूटतो/ क्रिमिश रंग येतो फुलाला तेव्हा मी तो चहा गाळून घेते.गाळून झाल्यावर या चहात लिंबू देखील पिळले तर चालते (न पिळता तसाच प्यायल्यास गरुड पुराणात शिक्षा नाहीये पण मला तो थोडा टॅंगी स्वाद आवडतो. रंगही मस्त येतो लिंबाने म्हणून मी लिंबू पिळते)

चहा पिण्याच्या पद्धती:
१)चहा गाळल्यावर तसाच गरम गरम प्या. लिंबू पिळून किंवा न पिळता कसाही प्या
२)त्याला गार करुन थंड करुन प्या. त्यात बर्फ घालून प्या.
३) मी यात साखर /मध काही घातले नाहीये पण यात साखर किंवा मध देखील चांगला लागतो. तुमची जीभ चालवून घेत असेल गोडा शिवाय किंवा साखर/गोड वर्ज्य मोडात असाल तर साखर / मध न घालताच प्या.

फायदे: याची चव डेव्हलप व्हावी लागते त्यामुळे जर पहिल्या घोटात नाही आवडला तरी हार मानू नका. थोडे बदल जीभ करेल तिच्यात याची चव स्विकारुन, थोडे प्रयोग तुम्ही करा यात. खरेतर न आवडण्यासारखे यात काही नाहीये तसेच फार हिट्ट व्हावे असेही यात काही नाहीये. पण पेयातली व्हरायटी/ चहाबाजगिरी कमी करायला हेल्दी पर्याय/ ॲंटिऑक्सीडन्ट्स प्रॉपर्टीज/ अतिरिक्त उष्णता कमी करणे/ पित्त नाशक/ वजन कमी होण्यास मदत/ रक्तदाब + विलनवाले कोलेस्टेरॉल प्रमाणात ठेवण्यास मदत/ यकृताचे आरोग्य सुधारते/ चयापचय सुधारते/ केस गळणे कमी होते/ तणाव कमी करते आणखीही xyz फायदे आहेत याचे असे गुगल आणि AI म्हणते.
असे सगळे जादुई काही होत नसले इतक्या प्रमाणात तरी त्या निमित्ताने पाणी पोटात जाते, चहाला पर्याय मिळतो, चवीत बदल होतो, करायला सोपे असल्याने आळशीपणा मधे न येता हा चहा करुन होतो या जोडीला वर दिलेले फायदे जर अर्धा पाव टक्क्याने मिळाले तरी बेस्टच आहे की.

तुम्ही या व्यतिरिक्त आणखी कोणत्या फुलाचा चहा करता मला प्रतिसादात नक्की कळवा म्हणजे मलाही अजून प्रयोग करुन बघता येतील.

चहाबाज लोकांनी शेवटपर्यंत वाचायचे कष्ट घेतले असतील तर त्यांचे आभार (तुमच्या नकळत तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेले आहे स्विकाराच्या वाटेवर Wink )

बाकीही सगळ्यांचे आभार आणि संयोजकांनी यावेळी माझ्या सारख्या या म्हणजे पाकृ लिहायच्या वाटेकडे न फिरकणाऱ्या भिडूला खेळायला भाग पाडल्याबद्दल त्यांचेही आभार Proud सरतेशेवटी न कंटाळता आळस बाजूला सारुन फोटो वगैरे काढायचे कष्ट घेऊन इथवर आल्याबद्दल माझेही आभार Happy (ग्रॅटिट्युड जर्नल लिहायला लागल्यापासून स्वतःचे आभार देखील मानायचे असतात हे शिकायला मिळाले मलाच)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच

गोकर्ण चहाबद्दल वाचले होते बऱ्याच ठिकाणी .

जास्वंद चहाची आयडिया युनिक आहे . करुन बघेन

नक्की करून बघणार.
फोटोत दिसणारे दोन रंग हे लिंबू न घालता आणि घालून झालेल्या बदलामुळे आहेत. लिंबू न घालता फिकट ते थोडा डार्क निळसर रंग येतो आणि लिंबू घातल्यावर पर्पल (लिंबू किती पिळलेय तसा रंग कमी अधीक डार्क येतो)>> आजच गणपती निमित्ताने कॉलनीत मुलांच्या स्पर्धा/उपक्रम घेणार आहोत. त्यात घरातले विज्ञान अंतर्गत हा प्रयोग घेणार आहोत.

thanks जाई

एका प्रदर्शनात मी गोकर्ण चहा आणि जास्वंद चहाचे डिप डिप सॅशे असलेले बॉक्स विकायला बघितले होते. जास्वंद चहा पहिल्यांदाच कळला तिथे. मग एक दहा सॅशेचा बॉक्स घेऊन पाहिला. चव छान वाटली म्हणून मग घरी प्रयोग केले बऱ्याच रेसिपी यूट्यूबवर बघून. यंदा तुळस, पुदिना, जास्वंद, गवती चहा आणि गोकर्ण सगळे कुंडीत व्यवस्थित वाढत असल्याने इंग्रेडिएंट्स आणायला बाहेरही जायची आवश्यकता नव्हती म्हणून पण प्रयोग झाले

मस्तच...
मध्यंतरी घरात म्हंजे बाल्कनीत गोकर्ण वेल छान झाली होती, तेंव्हा हा चहा बरेच वेळा केला आहे. बेसिक चहा चव न्युट्रल असते , लिंबू वगैरे घातलं तर तीच चव येते. आणि मला असेल सगळे फॅन्सी चहा आवडतात त्यामुळे हा ही आवडला होताच आणि मुख्य म्हंजे रंग अमेझींग येतो.

20211210_102646~2.jpg

लिंबाची ताजी पानं ( त्यासाठी झाड हवं दारात लिंबाचं ) आणि आपली नॉर्मल चहा पावडर चिमुटभर घालून केलेला चहा ही मस्त लागतो. पानांचा वास भारी येतो. हवं असल्यास लिंबू पिळायच थोडं. ह्याचा रंग सोनेरी मस्तच येतो.

पळसाच्या फुलांचा चहा ही छान लागतो ऑरेंज रंगाचा.

लिंबाचे झाड आहे. मलाही आवडतो त्याचे पान घालून केलेला रेग्युलर चहा.

पळसाचे फुल कुठे मिळाले तर करुन बघेन त्याचा चहा

Thank u

चहाबाज लोकांनी शेवटपर्यंत वाचायचे कष्ट घेतले असतील तर त्यांचे आभार (तुमच्या नकळत तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेले आहे स्विकाराच्या वाटेवर Wink )
>>>>

चहाचा घोट घेता घेताच वाचले आहे Proud
रंग छान आहेत... इतकेच म्हणेन Proud

इंटरेस्टिंग पाकृ, लिहीलेही आहे मस्त आणि फोटो सर्वात सुंदर!

जास्वंदीची फुले काढताना इतर लोकांना वाटेल तुम्ही पुजेकरता नेत आहात आणि माबोकर इतर लोकांना एकदम धार्मिक प्रवृत्तीचे वाटू लागतील - हा ही एक "फायदा" लिही Happy

वर दिलेले फायदे जर अर्धा पाव टक्क्याने >>> हे मी आधी अर्धा पाव "टाकल्याने" असे वाचले Happy

चहाला पर्याय मिळतो >>> सर्व चहाबाजांच्या वतीने "खामोश"! Happy

पण सिरीयसली, मला हे वेगवेगळे "चहा" ट्राय करून बघायला आवडतात. फुलांचे फ्लेवर आत्तापर्यंत तरी फार आवडलेले नाहीत. पण कदाचित हे आवड्तील. ट्राय करायला हरकत नाही. लेखात लिहीले आहे तसे अगदी न आवडण्यासारखे काही नसावे.

रंग छान आहेत... इतकेच म्हणेन >>> Lol खरय. मी पण पहिल्यांदा रंगामुळेच वाटेला गेले होते. सुरवात अशीच होते Wink

वल्ले, माझ्याकडे ये आपण प्रत्येक चहा व्हरायटी शॉट्सचे गटग करु एक Lol

धन्यवाद सामो, अंजू, वर्षा, फारेन्ड

जास्वंदीची फुले काढताना इतर लोकांना वाटेल तुम्ही पुजेकरता नेत आहात आणि माबोकर इतर लोकांना एकदम धार्मिक प्रवृत्तीचे वाटू लागतील - हा ही एक "फायदा" लिही Happy>> Lol हा फायदा लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे Proud

चहाला पर्याय मिळतो >>> सर्व चहाबाजांच्या वतीने "खामोश"! Happy>>> Lol मी पण चहाबाजच. बाबांकडून वारशात चहा मिळालाय. पण बराच कमी करत आले चहा मी. अधूनमधून अशा पर्यायी चहांनी चहाचा उरलेला कोटा भरते आता पण तो रेडीमेड डिपवाला ग्रीन टी काही अजूनही झेपत नाही मला. माझ्या जिभेला आवडेल आणि करायला सोपाही असेल असा पर्याय शोधायचाय आता ग्रीन टी चा.

अल्पना तुला आवडेल साखर न घालता पण लिंबू मात्र पिळच फक्त सुरवातीला बेताने पिळ म्हणजे चव अ‍ॅडजस्ट करत पिळ.

खरेतर मी चहा पित नाही. मला अजिबात आवडत नाही चहाची चव. पण फुलांचा चहा हा प्रकार आवडला आहे. यात चहाची चव नसते, रंग सुरेख असतो आणि किंचित आंबुस चवीचे हे गरम पेय हिवाळ्यात प्यायला छान वाटतं. हिवाळ्यात एरवी कमी पाणी प्यायलं जात असल्याने असे प्रकार हवेच असतात.

वरचा गोकर्ण टी lockdown मध्ये केला होता. बरा वाटला आवडला असं नाही म्हणणार. तू म्हणतेस तसं taste develop व्हावी लागेल.
पण रंग काय खतरनाक येतो.
फारच सुंदर. ह्या रंगाचे द्रव्य छान काचेच्या पेल्यात ओतून तो पेला style मध्ये हातात धरून हिरव्यागार झाडाखाली असलेल्या नक्षीदार बाकावर छानसा floral dress घालून फोटो काढला तर काय मस्त बहार येईल नाही!

खरेतर मी चहा पित नाही. मला अजिबात आवडत नाही चहाची चव. >>> सेम पिंच. मला वासही आवडत नाही. फुलांचा गोकर्ण चहा एकदा नवऱ्याने केलेला, खूप आवडला नाही पण बरा वाटला. तो चहाबाज असल्याने त्याला सांगते मी असे फुलांचे चहा करून पी. मेन चहा दोनदाच घे.

गोकर्ण चहा बद्दल वाचलंय . जास्वंदीच्या फुलांचा चहा ही नवीनच माहिती मिळाली ...
फोटो एकदम भारी आहेत ..

गोकर्ण / जास्वंद फुलाचा चहा ....

एवढा टंकलेखनाचा घाट घातला वर वीसेक तरी प्रतिसाद घेतलेत.
पण ह्या भयानक दिसणाऱ्या (निळे द्रव प्यायचं या अर्थी भयानक) आणि पाणचट चवीच्या पेयाचा आरोग्याला होणारा फायदा पण सांगा ना राव !!

रंगीत गरम लिंबू सरबत म्हणता येईल. जर का आवडले तर फुलांवर लिंबू रस टाकून वाळवून ठेवून नंतर त्यांचं सरबत कधीही करता येईल का पाहीन. जास्वंद, तुळस, गोकर्ण, गुलाब(सुगंधी) आणि पारिजातकही बाल्कनीत आहेत.
डाळिंबाच्या वाळवलेल्या सालींचा चहा मात्र झकास लागतो.
फोटो सुंदर आहेत.

धन्यवाद

पण ह्या भयानक दिसणाऱ्या (निळे द्रव प्यायचं या अर्थी भयानक) आणि पाणचट चवीच्या पेयाचा आरोग्याला होणारा फायदा पण सांगा ना राव >>@राजा मनाचा वर लिहीले आहेत की फायदे गुगल+ AI+ हर्बल ब्रॅन्डच्या टिमकडून मला सांगण्यात आलेले.
अर्थात त्यांनी सांगितले म्हणजे सगळे जादू झाल्यासारखे होतच नसणार. पण संपुर्ण असत्य कथनही ते करत नसणार (ते म्हणजे किमान ते ब्रॅन्डवाले) असे मानून चालतेय मी.

बाकी माझ्या घरात जाणवलेला फायदा हा indirect effect प्रकारातला आहे. आमच्या आजीना पाणी प्यायचा येतो कंटाळा, दूध पचत नाही, ताक रात्री प्यायले तर कफ होतो आणि साखर घातलेली सरबते आवडतात पण ती डायबेटीसमुळे बाजूला केली जातात. त्यांना हा फुलचा याच्या रंगामुळे आवडला, चवही झेपली आणि मग पिऊन बघू गं जरा म्हणत त्यांनी या द्रव्याला आपलेसे म्हंटले. आता त्यांची पाणी कमी प्यायले जाते आणि चहाने अ‍ॅसिडीटी होते या तक्रारी कमी झाल्यात. त्यामुळे वर गुगल म्हणत असलेले / त्या हर्बल ब्रॅन्डने सांगितलेले फायदे झाले १% तरी तो माझ्यासाठी बोनस आहे

wow कसलं भारी दिसतंय ! परंतु कोल्ह्याला द्राक्ष आंबट! इथे यातील कोणतीच फुले / पाने नाहीत माझ्याकडे जासवंद आहे पण आपल्या भारतात असते तशी नाहीय त्यामुळे नको वाटतंय!
माझ्याकडे भरमसाठ गुलबक्षी आहे त्याचे करावे का !?!?!

अंजली, गुलबक्षीचा चहा करुन पितात का सर्च केले पण गुगलला काही माहिती नाहीये. मी इतरही काही जणांना विचारले पण त्यांनीही आज पर्यंत असे केले नाहीये की ऐकले नाहीये. तुला समजले तर मलाही सांग. माझ्याकडेही गुलाबी आणि पिवळी गुलबक्षी आहे. मायबोलीकरणीनेच मला त्याच्या बिया पाठवल्या होत्या पोस्टाने.

गुलबक्षी असेल घरी तर चहा होतो की नाही माहित नाही पण पानांची भजी करुन बघ एकदा, अप्रतिम होतात. आम्ही कोकणात नेहमी करतो.

गुलबक्षीच्या पानांची भाजी पण करतात असे ऐकले आहे मी घाबरून अजून केलेली नाही .. त्यामुळे चहा चालायला हरकत नाही.. पण झाडाचे एक गोष्ट चांगली व दुसरी वाईट असे असू शकते.. मी आपले असेच म्हटले गं ..

गुलबक्षी असेल घरी तर चहा होतो की नाही माहित नाही पण पानांची भजी करुन बघ एकदा, अप्रतिम होतात. आम्ही कोकणात नेहमी करतो.>> कशी करायची?

पण झाडाचे एक गोष्ट चांगली व दुसरी वाईट असे असू शकते.. मी आपले असेच म्हटले गं ..>> खरय

मायाळू ओवा वगैरे पानांची करतों तशीच. भज्यांच्या भिजवलेल्या पिठात पानं बूडवून पीठाने कोट करायची आणि नेहमी प्रमाणे भजी तळायची. खूपच कुरकुरीत होतात.

Pages