जुनी कढई, नवीन उपमा

Submitted by संयोजक on 5 September, 2024 - 17:42

कविता म्हणजे काय? कुणी म्हणेल 'जे गद्य नाही ते पद्य'. कुणी म्हणेल 'ट' ला 'ट' आणि 'प्राची' ला 'गच्ची' लावून जी होते ती कविता. कुणी म्हणेल पाऊस पडला, प्रेम जडलं आणि मग मोडलं ही की जे 'होतं' ती कविता, तर कोणी म्हणेल वक्रोक्ती हा तर कवितेचा गाभा.

कविता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अलंकार, प्रतिके, प्रतिमा, मिथके अशा गोष्टींचा वापर करुन छंदबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तशैलीत लिहिलेली रचना येते. बर्‍याचदा कविता वाचली की काहीतरी खोलवर जाणवते. अरे हे तर आपल्याच मनीचे गूज होते, त्याची कविता कशी बनली याची मौज ही वाटते आणि ती कविता त्या कवीची न राहता आपलीच बनते.

प्रेम हा कवी आणि कवयित्रींचा आवडता विषय. प्रेम म्हटलं की 'दीपकाचे वरी प्राण देणार्‍या पतंगाची खरी प्रीत' आलीच पाहिजे, चंद्र आला पाहिजे. पाठोपाठ चांदणे आले तर चकोर तर मागे उभाच आहे, मंगेशा सारखा! ओल्या पाकळ्या, ओले सुगंध, ओले ओठ आणि ओले डोळे. ह्या अशा ठोकळेबाज उपमांचा साठा केला की मग एआय सुद्धा त्यांना वेगवेगळ्या तर्‍हेने गुंफुन कविता करेलच की. पण मग अचानक 'प्रेम कर भिल्लासारखं' असं कुसुमाग्रज म्हणतात, 'नैवेद्य मागणारा काळ' असं आरती प्रभू लिहुन जातात आणि ती ओळ वाचल्यावर त्वरित पुढची ओळ वाचणे शक्यच नसते. ती ओळ मनात मुरवत त्याचे आयाम जोखत त्यावर काही काळ हिंदोळे घेण्यावाचुन दुसरा पर्याय तरी काय असतो!

अशाच धर्तीवर आम्ही एक गंमत खेळ घेऊन आलो आलो आहोत. आम्ही एक कवितेचा ढोबळ विषय देऊ. तुम्हाला त्या विषयावर कविता करायची आहे, वृत्तबद्ध करा किंवा मुक्तछंदात करा. पटकन चारोळी केलीत तरी हरकत नाही. अट फक्त एकच! त्या विषयात ज्या ठोकळेबाज उपमा नेहेमी वापरात येतात त्यांचा वापर करायचा नाही. कढई जुनीच, उपमा मात्र नव्या हव्यात.

१. पाऊस
२. प्रेम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये रे ये रे पावसा
रात्री नको, दिवसा
पाऊस मोठा येऊ दे
शाळा माझी बुडू दे
पावसा पावसा लवकर ये
गृहपाठ माझा करून दे
रिमझिम रिमझिम धारा
जोरात सुटलाय वारा
पाऊस आला धावून
छत्री गेली वाहून
पाऊस आला मोठा
नाही आनंदा तोटा

गळत राहतो दुकांनाच्या पागोळ्यातून रिपरिप पाऊस
जसा दाटत राहतो मनात निराशेचा अंधार थेंबथेंब
शेवाळलेल्या अस्तित्वावर उमटवत थिजलेल्या खूणा
पूर्वसुकृताचे किनारे वाहून जात असताना

एक पाय नाचीव रे गोविंदा-घागरीच्या छंदा,
तालावरती पाऊस नाचतो थिरकतो
कृष्णमेघांच्या आडून एक चुकार किरण,
ती गंमत पाहून डोळे मिचकावत हसतो,

हां हां म्हणता मी होते परकरी पोर,
पावसाच्या पाण्यात छपाक छपाक खेळणारी
पाऊसही मग जम्माडी गंमत करतो
तो ही मग बनतो आईची ठेवणीतली दुलई

आता तुझी पाळी मीच देतो टाळी म्हणत
पाऊस मिष्किल हसतो आणि चिडवतो
मग मी त्याचे चॅलेन्ज घेत, आणि बनते थुई थुई नाचणारा,
पिसारा फुलवलेला मोर

पावसाकडे आता पाऊस बनण्याखेरी पर्यायच नसतो
आणि तो मग गाल काय फुगवतो, रुसतो काय
हे सारे ड्रिल किरण बघतच असतो बरं का ढगा आडुन
तो मग धावत येउन, पावसाची समजूत घालतो

आणि मग मात्र दोघे मिळून
माझ्यातल्या परकर्‍या पोरीकरता, मोराकरता इंद्रधनुष्याची
कमान उभारतात
असा आहे आमचा नेहमीचा पाठशिवणीचा खेळ
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Lol Lol

>>>>>>शेवाळलेल्या अस्तित्वावर उमटवत थिजलेल्या खूणा
पूर्वसुकृताचे किनारे वाहून जात असताना
फार सुंदर. गूढ.

नवीन उपमा.. जुनी कढई..
हल्लीचा पाऊस म्हणजे कामवाली बाई..

पाहिजे तेव्हा आणि वेळेवर कधीच येणार नाही..
घराची आणि सृष्टीची रया कोळपून जाई..

आणि नको तेव्हा येऊन रपारप कामं करणार..
मग सिंक चोक होणार आणि मोरी पण तुंबणार..

ना कुठला दिलासा ना कसलाच आधार देई..
आजकालचा पाऊस म्हणजे कामवाली बाई..

ना कसलं गणित करायचं ना कुठलं नियोजन करायचं..
हिच्या न् त्याच्या बेभरवशी कारभाराने सगळंच मुसळ केरात जायचं..

कितीपण अंदाज अदमास घेतले तरी नुकसानच होई..
शेतकरी अन् गृहिणी एका सुरात म्हणती..
हल्लीचा पाऊस म्हणजे कामवाली बाई..

उन्हाळ्याची सुट्टी संपली
सुरु झाली शाळा
मेघ, जलद, नभ सारे
पुन्हा झाले गोळा

उन्हातान्हात भटकण्यातच
सुट्टी सारी संपली
चार रेघी वही त्यांची
मावशीकडेच राहिली

मास्तर म्हणे, "कारणे नकोत,
काढा स्लॅंटिंग लाईन"
एकदा, दोनदा नकोत
काढा हंड्रेड टाईम्स

गर्जना ही ऐकून सगळे
निमूट गिरवू लागले
स्लॅंटिंग लाईन्स काढून त्यांचे
हात भरुन आले

तिकडच्या या क्लासवर्कने
इकडे गम्मत झाली
पाऊस आला म्हणत सगळी
मुले नाचू लागली

निरू Lol
आधी स्लॅंटिंग लाइन्स शब्द (कवितेच्या) कवितेत आल्याने मौज वाटली. आणि शेवटी त्याचं प्रयोजन कळल्यावर नव्या कोऱ्या उपमेचा साक्षात्कार झाला. मस्त,!

कविन मस्त कविता. अशा काळाला सुसंगत आणि गेय कविता बालभारतीमध्ये जायला हव्या. लेकीला म्हणून दाखवली. तिलाही आवडली. तिला स्लॅटींग लाईन्स म्हणजे थंडर वाटलं.
इतरांच्याही मस्त.

मस्त उपक्रम, फार दिवसांनी मायबोलीवर डोकवल्यावर गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक सुंदर उपक्रम धागा सापडला आणि अतिशय आनंद झालेला आहे.
मायबोली rocks as always..
कवितांची concept मस्त आहे, आणि दिलेल्या विषयाला अनुसरून आलेल्या कविता पण छान आहेत..

पाऊस माझ्या मनासारखा
गच्च दाटून बसलेला |
कुणी वारा दिला तर
त्याच्यावरच कोसळणारा ||

हिवाळ्यात अमेरिकेत ( स्थानिक भागात) ल्या पावसाच्या वेळच ग्रे/ करड पॅलेट अनुभवल्यानंतर भारतात, पावसाळ्यातील हिरव्या छटा बघून सुचलेलं काही ( बाही)

पाऊस अल्याडचा
निष्पर्ण, गडद, बोचरा
आधीच्याच एकट्या मनाला
अजूनच एकाकी करणारा..

पाऊस पल्याडचा
आश्वासक, हसरा, नाचरा,
चारचरावर जादू करत
दगडातही अंकुरे रुजवणारा

image.jpg

कसला रापचिक पाऊस पडतोय..
ढोल बडवतायत ढग..
फेफरं भरल्यासारखा वारा पिसाटलाय..
Give me a Tight Hug..

क्लिकला गं ब्ल्यूटूथ माऊस
छताळातून निथळे पाऊस
टपटप वाजे चमचे, वाट्या
भांडी पितळी, मनी झिम्मपाऊस

संसार भिजला , भिजली गादी
तलाव झाली शाहबादी लादी
घमेल्यातुनी फेकली घालमेल
तरी मन झाले.. गं भीजपाऊस

पुढील कविता या धाग्याच्या नियमात बसत नाही, कारण त्यात उपमा नाहीत. पण आता सुचलेच आहे तर देतो इथे. हरकत असल्यास उडविण्यास सांगावे.
हृदयी वसंत फुलताना च्या चालीवर. मूळ गीतकार व गीतप्रेमी यांची माफी मागून.
(तो व ती यांचा संवाद)

धुंद पावसात भिजताना, न्हाउनी चिंब व्हावे
पाण्याच्या डबक्यात नाचताना, दुनियेस का डरावे?

पावसात मज, उगी ओढू नको
मजवर पाणी, तू उडवू नको

पावसात प्रेम करण्याची, लुटुया मजा हि न्यारी
धुंद पावसात भिजताना, न्हाउनी चिंब व्हावे

धुणी भांडी स्वयंपाक, कामे मजला भारी (हाय हाय)
कामे करूया नंतर, आधी जवळी ये अशी
रिमझिम पावसात या, कपडे कसे सुकवावे
कपड्यांची चिंता सोडूनी, मिठीत धुंद व्हावे
कपडे न वाळिती तर, अंगी काय नेसावे
धुंद पावसात भिजताना, न्हाउनी चिंब व्हावे

टोपी रेनकोट छत्री, आता घ्यायला हवी
चहा नी गरम भजी, आता व्हायला हवी
तुजसवे पावसात भिजाया, मला मुळी वेळच नाही
या रम्य पावसाळी, तुज बहाणा चालणार नाही
तुझ्या या बालिश वागण्याला, आता काय बरे म्हणावे
धुंद पावसात भिजताना, न्हाउनी चिंब व्हावे

कधी शिव्यांचा तर कधी ओव्यांचा
कधी शुभेच्छांचा अन पुष्पगुच्छांचा
अभिनंदनांचा, हात जोडून वंदनांचा
भावपूर्ण श्रद्धांजलीच्या संवेदनांचा
शब्द आटले की रेडीमेड इमोजींचा
अश्रू दाटले की दर्दभऱ्या शायरीचा
काहीच्या काहीच्या काही फॉर्वर्डसचा
फेक अकाउंटने भिडणाऱ्या कॉवर्डसचा
असा सगळा पाऊस रोज पडत राहतो
व्हर्च्युअली चिंब होत समाज घडत जातो

सर्व कविता धमाल लोक हो. यावेळेचा गणेशोत्सव खरच सुवर्णमहोत्सवी वाटतो आहे. अखिल संयोजक चमूचे अभिनंदन.

Pages