चकवा~मध्यरात्रीचा थरारक अनुभव . भाग~३

Submitted by रुद्रदमन on 3 September, 2024 - 10:46

मध्यरात्री घडलेला रस्त्यावरील थरार. भाग~३

अजयच्या आईने दिलेला पत्ता मी व्यवस्थित बघितला.. सिद्धार्थ देशमुख, नारायण वाडी... गूगल मॅप वर गावाचे नाव शोधून पाहिले. कोकणात समुद्र किनारी डोंगरात वसलेले एक छोटे से गाव... जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास... नक्की भेट होईल की नाही, इतक्या दूर जाऊन हात हलवत परत नको यावे लागायला , म्हणून मी त्यावर असलेल्या नंबरवर कॉल केला.

सिद्धार्थ यांनीच कॉल उचलला. त्यांना थोडक्यात मी भेटण्याचे कारण सांगितले. त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता उद्या भेटण्यास सहमती दर्शवली. त्यांनी येताना अजयच्या हाताला दुसरा धागा बांधून, अगोदरचा धागा बरोबर आणण्यास सांगितले.

सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे धागा घेऊन आणि अजयला काळजी न करण्याचे बोलून, दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचे असल्यामुळे मी घरी आलो. सुजाता प्रकरण मिटायला किती दिवस लागतील याची कल्पना नसल्याने घडलेले सर्व काही घरच्यांना सांगितले. घरातील व्यक्तींनी चांगले काम करत असलेल्या कारणाने मला संमती दिली. परंतु, त्या बरोबरच काळजी घेण्याची सूचना केली.

सकाळी लवकर निघायचे होते म्हणून मी लवकर जेवण उरकले आणि रूममध्ये जाऊन चार दिवसाचे कपडे बॅगमध्ये भरून बेडवर अंग टाकले. मनात प्रश्न मालिका उभी होती की सुहास कुठे भेटेल,नक्की नारायण वाडीला जाऊन काही साध्य होईल का?
विचार, विचार आणि फक्त विचार... विचारांमुळे झोपच येत नव्हती. मनात विचारांचे चक्र सुसाट सुटले होते. त्याच्यावर काही केल्या आवरच घालता येत नव्हता. अग्नीतून ठिणग्या दशदिशांना फुटाव्यात तसे विचार भिरभिरत होते. रात्री कधीतरी झोप लागली.

पहाटेच डोळे उघडले. जणू मन सुद्धा एका नव्या जगाचा शोध घेण्यासाठी आतुरले होते... मी पटकन सर्व आवरून घरच्यांचा निरोप घेतला.. आणि कार घेऊन निघालो. सकाळची थंड हवा कारच्या उघड्या काचे मधून माझ्या चेहऱ्याला शांतपणे स्पर्श करत होती. रोजच्या प्रमाणे वेळ असती तर मी त्या वातावरणाची मन भरून मजा उपभोगली असती. पण आज वेळ वेगळी होती. मी रोहित, एक सर्वसाधारण व्यक्ती. आज एका अशा मोहिमेवर निघालो होतो, जो माझा प्रांतच नव्हता. अशा घटना मी आधी कधीही अनुभवल्या नव्हत्या. एकदाच काय ती अनुभवली आणि तिच्या मध्ये माझे वर्तमान गुंतले गेले. किंवा असे म्हटले तर योग्य राहील की मी स्वतःला गुंतवून घेतले. रस्ता चांगला असल्यामुळे कारने वेग पकडला होता.

माझ्या मनात तेच तेच प्रश्न घोळत होते. गूळेगाव मध्ये सुहास सापडेल का? आणि जर सापडला, तर सुजाताच्या आत्म्याशी त्याला कसे जोडायचे? त्याला काहीही होऊ न देता सुजाताला मुक्त कसे करायचे? डोके नुसते भानानले होते. स्टीयरिंग घट्ट पकडून मी खोल श्वास घेतला, 'हे सर्व काय आहे, रोहित?' मी स्वतःला विचारले. 'तू या गोंधळात का अडकला आहेस?'

माझ्या प्रश्नांचे उत्तर माझ्या मनानेच दिले... सुजाता वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. जिने आयुष्याचा शेवट इतका भयानक अनुभवला. तिला बिचारीला मृत्यू नंतर अजूनही मुक्ती नाही. तिला मुक्त करण्यासाठी...
विचार झटकत मी रस्त्यावर लक्ष केंद्रित केले.

सिद्धार्थ देशमुखांची भेट:

मी कोकणाच्या दिशेने निघालो होतो. कोकणातील रस्ते म्हणजे घनदाट जंगल, उंच उंच डोंगररांगा, खोल दऱ्या आणि रस्त्याच्या एका बाजूला अथांग समुद्र. ठिकठिकाणी दिसणाऱ्या नारळाच्या बागा... प्रवास अत्यंत मनमोहक आणि सुंदर होत होता. निसर्गाचे ते मनमोहक रूप पाहून मन प्रसन्न झाले. त्या अतिसुंदर प्रवासाचा अनुभव घेत मी दुपारी 12 वाजेपर्यंत बराच मोठा पल्ला गाठला होता. अखेर प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात खूप शोध घेतल्यावर, मला नारायण वाडी चा रस्ता सापडला. गावात पोहोचल्यानंतर... गाव कसले ते... समुद्र आणि डोंगरांच्या सीमेवर वसलेली, नावा प्रमाणे शे दीडशे उंबऱ्यांची एक वाडीच... दुपारची वेळ असल्यामुळे गावात बहुतेक घरांचे दरवाजे बंदच होते. आसपास चिटपाखरूही नजरेस पडत नव्हते. मी खाली उतरून एखाद्या उघड्या घरात चौकशी करण्याच्या हेतूने गाडी बंद केली. अचानक मला समोरील बाजूने मुलांचा गलका ऐकू आला. मी गाडी घेऊन त्या दिशेला निघालो. रस्त्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या एक प्रचंड मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत मुलांचा घोळका कसला तरी खेळ खेळत होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या सिद्धार्थ दादांचा पत्ता त्यांच्या मधील लहाणातील लहान मुलाला तोंडपाठ होता असे जाणवले. त्यामुळे सिद्धार्थ बद्दल एक सकारात्मक भावना मनात उभारली.

मुलांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या गाडीचा प्रवास जंगलाच्या दिशेने सुरू झाला. एका बाजूला घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र... रस्त्याच्या बाजूला खोल दऱ्यात समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा... काय ते निसर्गाचे अलौकिक सौंदर्य... मी मंत्रमुग्ध होतो. सिद्धार्थच्या घराचा शोध घेताना मला डोंगराच्या मध्यावर एक छोटासा सुंदर बंगला दिसला. तो चारही बाजूंनी वृक्षांनी वेढलेला होता. मी बंगल्याच्या पुढे गाडी उभी केली.

आदल्या दिवशी बोललेल्या नंबरवर कॉल केला. कॉल वर सिद्धार्थ होते, "हॅलो, रोहित, आपण निघालात का येण्यासाठी?" त्यांनी नंबर ओळखून विचारणा केली.

"नमस्कार, सिद्धार्थ जी, मी पोहोचलो आहे. तुमच्या गेटसमोर उभा आहे". मी त्यांना सांगितले.

त्यांनी तिथे थांबण्यासाठी सांगून, गेट उघडण्यासाठी आतून एका व्यक्तीला पाठवले. गेट उघडताच, मी गाडी आत घेतली, आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करत बंगल्याच्या दिशेने निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या शुभ्र फुलांचा सडा पडला होता आणि त्या फुलांचा सुगंध पूर्ण परिसरात दरवळत होता. वातावरण अत्यंत प्रसन्न होते. बंगल्याच्या मागे उंच नारळाची दोनशे तीनशे उंचच उंच झाडे दिमाखात उभी होती.

मोकळ्या जागेत गाडी लावून मी दरवाज्याकडे निघालो. तेव्हाच दरवाजातून कोणीतरी बाहेर आले. माझ्यासमोर तेजस्वी डोळ्यांचा तरुण उभा होता. साधारण सहा फूट उंच, गव्हाळ वर्ण, धारदार नाक, आणि विशाल कपाळ, ज्यावर चार बोटांनी ओढलेले भस्म होते.

"नमस्कार, मीच सिद्धार्थ. या, तुमचीच वाट बघत होतो... घरात या." व्यक्तिमत्त्वाला साजेसा धीरगंभीर आवाज.

मी मनातल्या मनात विचारांची जुळवणी करत त्यांच्या मागे निघालो. हा इतका तरुण भारदस्त मुलगा, या वयात साधना करतो... माझा प्रश्न माझ्या साठीच निरर्थक होता. कारण अजयच्या बाबतीत आलेला त्यांच्या शक्तीचा अनुभव ताजाच होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेलो. माझे मन त्यांच्या विषयी अजून जाणून घेण्यास उत्सुक झाले होते.

मी आत गेलो. घरातले वातावरणही कमालीचे पवित्र जाणवत होते. आम्ही दोघेही पुढच्या खोलीत सोफ्यावर बसलो. प्रवास संबंधी आणि इतर काही गप्पा झाल्यावर मला कळले की सिद्धार्थ उच्च विद्याविभूषित विद्वान आहेत. साधना, योग, आणि गुरुभक्ती मध्ये त्यांच्या स्वमनाचा कल बघून त्यांनी स्वतःच हा रस्ता निवडला होता.

सिद्धार्थने च विषयाला हात घातला.

"अजयची तब्येत कशी आहे?" त्यांनी अजयची विचारपूस केली.

"तुमच्या आशीर्वादाने तो बरा होतो आहे, त्या रात्रीच्या घटनेनंतर तो सतत भीतीने ग्रस्त होता." मी परिस्थितीचे गांभीर्य दाखविण्याच्या हेतूने सांगितले...

त्यांनी मला रात्री घडलेल्या घटनांपासून ते आतापर्यंत सगळे काही सांगण्यास बजावले. मी त्यांना संपूर्ण घटना सांगितली. सिद्धार्थ शांतपणे ऐकत होते. जेव्हा मी माझी गोष्ट संपवली, तेव्हा त्यांनी माझ्याकडे धाग्याची मागणी केली. मी व्यवस्थित घडी घातलेला कागद काढून त्यांना दिला. कागदा मधून धागा काढत त्यांनी मला मागे येण्यासाठी खूण केली.

थोड्याच वेळात आम्ही एका बंदिस्त खोलीत पोहोचलो. तीन भिंतींना आकर्षक पांढरा रंग दिलेला होता. एका बाजूला त्याच रंगाचा पडदा लटकत होता. तीनही भिंतींवर नवनाथांची तैलचित्रे लावलेली होती. मनात शिल्लक होती तेव्हढी नकारात्मक ऊर्जा त्या खोलीत आल्या आल्या पसार झाली.

सिद्धार्थ पडद्याच्या दिशेने हळुवार गेले. पडदा बाजूला होताच, खोली सूर्याच्या उजेडाने चमकायला लागली. समोरच सागाच्या लाकडात कोरलेले सुंदर देवघर होते. त्यात श्री गुरुदेव दत्तांची संगमरवरी मूर्ती होती. देवघरासमोर लाल कापडाने वेढलेली नवनाथांची पोथी लाकडी स्थंडीला वर विराजमान होती. सिद्धार्थ देवघरा समोरील पाटावर बसले, आणि मला बाजूला बसायला सांगितले. मीही शेजारी अंथरलेल्या आसनावर आसनस्थ झालो आणि मनोभावे हात जोडले.

सिद्धार्थ आता तो धागा हातात घेऊन होते. त्यांनी त्याच्यावर भस्म लावले आणि दोन्ही हातात पकडून डोळे मिटले. मी कधी त्यांच्या कडे तर कधी श्री गुरुदेव दत्तांच्या मूर्ती कडे बघत होतो. सिद्धार्थ चे ओठ हलू लागले, त्यांचे खूपच हळुवार आवाजात मंत्र पठण चालले होते.. आवाज खूपच मधुर येत होता. ... त्या आवाजाची सू मधुर गुणगुण अजूनच मंत्रमुग्ध करणारी होती...काही काळा नंतर ओठ हालणे बंद झाले पण ती गुणगुण ऐकू येतच होती... जणू खोलीतील पूर्ण वातावरण त्या आवाजात न्हाऊन निघालेले होते.... मी लक्षपूर्वक सिद्धार्थ कडे बघितले... त्यांच्या पापण्यांमधून बुबुळांची होणारी हालचाल दिसत होती.. त्याच बरोबर चेहऱ्यावर चे हावभाव देखील बदलत होते... एक वेळ अशी आली की की त्यांच्या इंद्रियांच्या हालचाली अतिशय वेगाने व्हायला लागल्या.. चेहरा कमालीचा भावनाविवश झाला... मी घाई घाई ने माझी नजर समोर मूर्ती कडे वळविली... काही कालावधी नंतर त्यांनी डोळे उघडले.. हातातील धागा पोथी शेजारी ठेवला. तिथे त्याच्या सारखेच भरपूर धागे ठेवलेले होते.. ते श्री गुरुदेव दत्तांना नमस्कार करून उठले... मी पण त्यांच्या मागे निघालो... आम्ही पुनश्च हॉल मधील सोफ्यावर येऊन बसलो.. मी ते काय सांगतात हे ऐकण्यासाठी आतुर होऊन त्यांच्या कडेच बघत होतो..
त्यांनी बोलायला सुरुवात केली...
"रोहित, आता सर्वात आगोदर मी तुला धागा का आणायला सांगितला हे सांगतो.. म्हणजे तुला सर्व गोष्टींचा उलगडा होईल..."
मी होकारार्थी मान डोलावली..
" अजय च्या आईंचा मला पाच दिवसांपूर्वी फोन आला होता.. त्यांना कुठून तरी माझा नंबर भेटला होता. त्यांनी मला फोन करून अजय ची दशा सांगितली.. त्यांना जेव्हढे माहीत होते ते सर्व कथन केले.. आणि मला मुलाला या सगळ्या मधून बाहेर काढण्याची विनंती केली... मी त्यांच्या कडून त्यांचा सविस्तर पत्ता लिहून घेतला.. फोन ठेवल्यानंतर मी ध्यान लावले, आणि श्री दत्तगुरूंना पाचारण केले... त्यानंतर बराच वेळ मंत्र सामर्थ्याचा वापर करून दोन धागे अभिमंत्रित केले... दोन धागे घेण्याचे कारणच हे होते की ही वेळ येणार याची, मला ध्यान लावलेले असतानाच पूर्व कल्पना आली होती.. त्यांनतर त्याच दिवशी ते दोन्ही धागे पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवून दिले..
आता तू आणलेल्या धाग्या मुळे नक्की काय झाले असा प्रश्न तुला पडला असेल." त्यांनी माझ्या कडे बघितले.
मी इतर काही ही न बोलता फक्त होकारार्थी मान हलविली..
" मघाशी आपण जे देवघरात ध्यान लावले.. त्या वेळी मी धागा हातात घेतला होता.. तो धागा अजय च्या शरीरावर बांधलेला असल्यामुळे त्याच्या अंतर्मनाशी जोडलेला आहे.. मी ध्यानात असताना.. अजय ने बघितलेले पूर्ण स्वप्न बघितले.."
मी अवाक होऊन त्यांच्या कडे बघत होतो..
माझ्या कडे एक दृष्टिक्षेप टाकून
त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली..
"स्वप्न बघताना सुजाता ने भोगलेली ती दयनीय परिस्थिती बघून मला स्वतः ला तुझ्या बरोबर यायची इच्छा झाली आहे. मृत्यू नंतर ही तीची आत्मा फार काळ यातना भोगते आहे,तिची मुक्ती करण्यासाठी मी तुझ्या बरोबर यायलाच हवे,किंवा असे समज की गुरूंनी मला तसा अदेशच दिला आहे.." बोलून ते शांत झाले..
मी मात्र मनातून आनंदी झालो होतो.. कारण गूळेगावात मी एकटा जाऊन नक्की काही करू शकणार आहे की नाही याची मलाच शाश्वती नव्हती... मी म्हटले होते ना की हा प्रांत माझ्या साठी पूर्ण पने वेगळा होता.. पण आता खुद्द सिद्धार्थ माझ्या बरोबर येण्यास सरसावले होते... मी आता माझ्या शंकांचे निरसन करून घेण्याचे ठरवले...
" सिद्धार्थ मला काही प्रश्न पडले आहेत, काही गोष्टींची भीती पण वाटते आहे. त्याबद्दल काही स्पष्टीकरण तुम्ही मला देऊ शकाल का?
" होय नक्कीच देतो.. आजचा दिवस आहे आपल्याकडे.. मी माझी इथली कामे आज मार्गी लावतो.. उद्या सकाळीच आपण निघुयात गुळेगाव च्या दिशेने... मी आता जरा बाहेर जाऊन येतो..कामे उरकून आणि मला पुढच्या तयारी साठी काही सामग्री लागेल ती घेऊन येतो... तू प्रवासात दमला असशील.. तो पर्यंत फ्रेश हो आणि काही तरी खाऊन घे, जेवण तयार आहे.. रात्री जेवणाच्या वेळी निवांत तुझ्या सगळ्या शंकांचे निरसन करूयात.." त्यांच्या बोलण्यात घनिष्ट मित्रत्वाची भावना स्पष्ट दिसत होती...
मी चालेल असे बोललो... त्यांनी मला बाथरूम व किचन दाखविले.. तसेच बाहेर फेरफटका मारण्यास गेला तर ,आजूबाजूला जंगलात बिबळ्यांचा वावर असल्याचे सांगून जास्त दूर न जाण्यास बजावले...
थोड्या वेळात ते कामानिमित्त बाहेर निघून गेले.. मी अगदी घरातल्या सारखे यथेच्छ स्नान केले.. किचन मध्ये जाऊन जेवण घेतले.. मस्त आमसूल आणि खोबरे टाकून केलेली तुरीची आमटी आणि भात होता... पोट भरून खाल्ला... आता करण्यासारखे काहीच नव्हते....तेव्हा मी पुन्हा एकदा त्या छोट्या बंगल्याच्या आतल्या वातावरणात डोकावलो. प्रत्येक कोपऱ्यातून साधेपणा आणि पवित्रता जाणवत होती. साधनेचा आणि शुद्धतेचा संगम जणू इथे झाला होता. घरातील प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक ठेवलेली होती, काहीही अनावश्यक नव्हते. हॉल मधील एका कोपऱ्यात एक छोटीशी वाद्य यंत्रांची पेटी ठेवलेली होती, भिंतीला एक गिटार लटकवलेली होती, ज्यावरून लक्षात येत होते की सिद्धार्थ संगीताचा अभ्यासही करतात.... थोडक्या वस्तूंवरून सिद्धार्थ च्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू डोळ्या समोर येत होते...
मी घराबाहेर पाऊल टाकले... कंपाऊंड च्या आतच निसर्गाचा आस्वाद घेत बराच वेळ फिरत होतो.. संध्याकाळ व्हायला आली होती.. दूर क्षितिजावर समुद्र सूर्याला आर्धे गिळंकृत करून हसत होता... आकाशात पक्षांना घरी पोहोचण्याची घाई झालेली दिसत होती..
मी परत एकदा सृष्टी सौंदर्य डोळ्यांनी मनात साठवून घेतले आणि घराकडे निघलो..
तोच दुरून हॉर्न ऐकू आला... म्हणजे सिद्धार्थ आले होते.. मघाशी ते निघताना ऐकलेला हॉर्न चा आवाज असाच होता..
मी दरवाजा बाहेरच त्यांची वाट बघत थांबलो.. गाडी जवळ आली.. गाडीतून उतरत च प्रसन्न मुद्रेने त्यांनी माझी विचारपूस केली..
मी all ok अशी खूण करत हॉल मध्ये येऊन सोफ्यावर बसलो.
माझे सर्व प्रश्न उद्याच्या प्रवासाच्या आधीच मिटतील याची खात्री पटली होती, त्यामुळे मी मनाशी ठरवले की शांतपणे त्यांच्या उत्तरांची वाट बघावी... सिद्धार्थ यांनी हातातील सामान टेबल वर ठेवत, मला चहा पिण्याची ऑफर दिली. मी होकार दिला... थोड्याच वेळात मस्त गवती चहाचा वास घर भर पसरला...
सिद्धार्थ चहाचे दोन कप घेऊन आले.. आणि माझ्या समोर बसत म्हणाले , "मग कसे वाटले आमचे कोकण?"
" अप्रतिम सौंदर्याची खाण आहे कोकण.. सिद्धार्थ इतकी प्रसन्नता आणि शांतता या पूर्वी मी कुठेच अनभवली नाही..". मी जे अनुभवले ते बोललो...
" बर विचार तुझ्या काय काय शंका आहेत, म्हणजे तुझ्या मनात उरलेली चलबिचल पण शांत होईल.." सिद्धार्थ माझ्या कडे बघत हसत हसत बोलले...
" सुहास ला आपण कसे शोधणार आहोत, सिद्धार्थ.. सुहास आपल्या भेटला जरी तरी आपण त्याला सुजाता शी कसे भेटवणार.. आणि मला सगळ्यात मोठी भीती ही आहे की.. ती अजय ला बोललेली आहे की ती सुहास ला बरोबर घेऊन जाणार आहे.. मग आपण त्याला वाचवायचे कसे.. त्या शिवाय तिला मुक्त करता येईल का?" मी घाई घाई ने मनातील सर्व शंका त्यांच्या समोर मांडल्या.. आणि उत्तराच्या अपेक्षेने शाळकरी मुला सारखा त्यांच्या कडे बघत बसलो...
" सर्वात अगोदर सुहास आपल्याला तिथे भेटेल की नाही हे आपल्याला तिथे गेल्या शिवाय नाही समजणार... त्याला आपण कसेही करून शोधणार आहोतच.. आणि तो भेटल्या नंतर आपल्याला त्याला त्या पुलावर घेऊन जावे लागेल.. सर्वात अगोदर तिथे पुला खाली बसून महाकालीची उपासना आणि शक्तीचे आवाहन करावे लागेल.. त्यांनतर नारळ आणि लिंबू अर्पण करावे लागेल. या साधनेला तामसी क्रिया म्हणतात. तामसी क्रिया करताना महादेवाची खास तंत्र साधना करावी लागते...
या साधने मध्ये अतृप्त आत्मा म्हणजे ज्यांना मुक्ती मिळाली नाही त्यांचे आवाहन केले जाते.
या साधने मुळे कितीही रागीट पिशाच असले तरी ते त्याच्या मूळ आत्म्याच्या रूपात येते.. त्याच्या मधील राग , लोभ सर्व गळून पडते.. त्यानंतर त्यांच्या अतृप्त इच्छा विचारून त्यांना तंत्र पूजेने मोक्ष प्राप्ती करून दिली जाते...
विधी मोठा आहे पण तंत्र हमखास कोणताही ही आत्मा असो मुक्त करतेच.. आणि काळजी करू नको सुहास जर इनोसंट असेल तर नक्कीच त्याला काही ही होणार नाही." एव्हढे बोलून सिद्धार्थ थांबले...
माझ्या जवळपास सर्व शंकांचे निरसन झाले होते....
सिद्धार्थ कडे गावातून एक आजी येऊन स्वयंपाक करून जायची.. साधे पण अतिशय चविष्ट जेवण.. त्या रात्री छान पैकी मुगाचे वरण भात पोळी आणि बटाट्याची भाजी असे हलकेच जेवण मी घेतले.. आजी आणि त्यांच्या कडे काम करणारी व्यक्ती संध्याकाळी आमचा निरोप घेऊन निघून गेले..
सिद्धार्थ ने त्या दिवशी फक्त दोन सफरचंद खाल्ली आणि थंडगार दूध घेतले... त्यांना मी त्या बद्दल विचारले तर , त्यांना रात्री कसली तरी साधना करायची आहे त्यामुळे त्यांचे आज व्रत आहे असे उत्तर मिळाले..
जेवण झाल्यावर मला झोपण्याची खोली दाखवत, सकाळी दिवसाच्या पहिल्या किरणा सोबत आपल्याला निघायचे आहे याची आठवण करून दिली.. आणि ते त्यांच्या त्या विलक्षण खोली कडे मार्गस्थ झाले.. मी त्यांच्या जाणाऱ्या भारदस्त व्यक्तिमत्वाकडे बघत जवळ जवळ संमोहित झाल्यासारखा बराच वेळ तिथेच उभा होतो.. माझे मन एका गोष्टीने आनंदी आणि चिंता मुक्त झाले होते..आता पुढचा प्रवास सिद्धार्थच्या मार्गदर्शनाखाली करायचा होता... पुढील सर्व सूत्रे ते सांभाळणार होते.. मी फक्त एक मदतनीसाच्या भूमिकेत त्यांना हवी ती मदत करणार होतो..
घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे असेल किंवा चिंता मुक्त मना मुळे असेल पण गादीवर अंग टाकल्या वर लगेच मी निद्रेच्या कुशी मध्ये शिरलो..

गुळेगावच्या दिशेने प्रस्थान:

सकाळी... सकाळ कसली ब्रह्म मुहूर्ताची वेळ.. सिद्धार्थ च्या आवाजाने मला जाग आली.. आम्ही सर्व आवरून सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे , दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणा बरोबर निघालो. निघण्या आधी आम्ही दोघे त्या विलक्षण खोली मध्ये गेलो होतो.. सिद्धार्थ ने मनोभावे हात जोडून गुरूंची आराधना केली. त्यानंतर अजय च्या हातावर बांधलेला तो धागा एका लाल कापडात गुंडाळून बरोबर घेतलेल्या बॅग मध्ये टाकला....
गूळेगावाच्या दिशेने कार चालवत असताना माझ्या मनात विचारांनी पुन्हा गोंधळ माजवला. तिथे पोहोचल्यावर काय होईल? सुजाताचा आत्मा कसा वागेल? सुहास कुठे असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मला सिद्धार्थवर पूर्ण विश्वास ठेवावा लागणार होता. मी सिद्धार्थ कडे नजर टाकली..
सिद्धार्थ शांतपणे माझ्या बाजूला बसले होते.आज शुभ्र सफेद सदरा आणि पायजमा त्यांना शोभून दिसत होता.. त्यांचे डोळे बंद होते.. त्यांच्या शांत आणि स्थिर मनोवृत्तीने माझ्या मनातील चलबिचल कमी झाली होती. ते मनोभावे प्रार्थना करत होते, आणि त्यांच्या त्या साधनेच्या शक्तीचा प्रभाव मला जाणवत होता. त्यांचा विश्वास आणि साधनेचे बल मला उर्जा देत होते....

आज पण हे लिहिताना मी पुन्हा एकदा अनुभवतो आहे ..
सिद्धार्थ आणि रोहित निघाले आहेत.. एका अबलेला मुक्ती मिळवून देण्यासाठी..
काय होईल पुढे?
सुहास सापडेल का?
सुहास ला सुजाताच्या रागाचा सामना करावा लागेल की त्याला वाचवू शकेल ही जोडी..

पुढच्या भागात...

वाचत रहा मध्यरात्रीचा थरार..

लेखक: रूद्रदमन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users