विल्हेवाट

Submitted by संप्रति१ on 1 September, 2024 - 15:01

घाईघाईने जिने चढून तो प्लॅटफॉर्मवर आला. काही वेळ सैरभैर रेंगाळत राहिला. मग डावीकडून येऊन उजवीकडे जाणारी एक मेट्रो आली, त्यात तो चढला. डब्यात नेहमीच्या यांत्रिक सूचना. एसीमुळे थंडावलेले हॅंडरेल्स. तुरळक माणसं. सगळ्यांच्या चेहऱ्यांवर मोबाईल्स चिटकलेले. आणि समोरच्या खिडकीतून दिसणारं सावळं सावळं आभाळ, जे आज त्याला आवडत नव्हतं. कारण सध्या फ्लॅटवरच्या प्रेताची कशी विल्हेवाट लावायची, हाच एक प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा आहे.

ही ओळ मला लहर आली म्हणून टाकलेली नाही. लोकांना निष्कारण धक्के देणे, हा माझा छंद नाही. मी काही पंतप्रधान नाही. तुम्हाला असं डिवचून मला काय मिळणार ? तुम्हालाच नव्हे तर इन-जनरल कुणालाही डिवचून मला काय मिळणार ? उद्या परवाकडे ते प्रेत कुजायला लागेल. दुर्गंध आजूबाजूला पसरून शेजाऱ्यांचं कुतुहल चाळवलं जाईल. तो दुर्गंध कसा लपवायचा याबाबत तुमच्याकडून काही मदत मिळणारे का? सांगा बरं.! तुम्ही काय सांगणार! तुम्ही गुगल करून बघणार. ते त्यानं ऑलरेडी करून बघितलेलंय. आणि त्या टिप्स अजिबातच फिजीबल नाहीत, या निष्कर्षावर आलाय. कानून के लंबे हाथ आपल्यापर्यंत पोहचू नयेत, म्हणून सध्या तो सगळी सर्च हिस्ट्री क्लिअर करतोय. मी बघतोय. मी नोंद करतोय.
"ए गपे लवड्या" शेजारच्या बाकावरून आवाज येतो. मी वळून बघतो. दोनतीन कॉलेजवयीन मुलं जिथं बसलेली असतील तिथून अशा स्वरूपाची भाषा नेहमीच ऐकू येते. मी ऐकतो. नोंद करतो.
दुसरं काय करणार?

"माझी जाम फाटलीय. ह्या भानगडीतून सोडव मला. प्लीज."- त्याच्या नजरेत याचना दिसते.
"मी असं करू शकत नाही."- मी डोळ्यांनीच त्याला समजावतो.
"अरे तू नाही तर कोण करणार? तूच तर मला ह्यात अडकवलंस."- त्याचा चेहरा आता आरोप करू लागतो.
"मला तसं वाटत नाही"- मी त्याचा आरोप झुरळासारखा झटकून टाकतो.

असं आहे की मागे एकदा त्या मुरब्बी साहेबांची मुलाखत बघितलेली. पत्रकार अगदीच बच्चा होता. पण उगाच पोक्तपणाचा आव आणत होता. त्याच्या वयाला ते गांभीर्य शोभत नव्हतं. साहेब काय त्याच्या हाताला लागत नव्हते. त्याचं ते अस्थानी उत्तेजित होणं साहेब कौतुकानं बघत होते. त्याचे प्रश्न शांतपणे चिमटीत पकडून बाजूला ठेवत होते. एक दोन प्रश्न तर सरळ झुरळासारखे झटकूनच टाकले त्यांनी. तेव्हापासून मी झुरळासारखे झटकणे हा शब्दप्रयोग वापरण्याची संधी शोधत होतो. बरेच दिवस सापडत नव्हती. आज सापडली. वापरून टाकली. आता साधारण मी पोरकटपणाच्या किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचा तुम्हाला सुगावा लागला असेल.

नंतर तो काही बोलला नाही. खाली मान घालून बसून राहिला. शेवटच्या स्टेशनमध्ये मेट्रो थांबली. तो प्लॅटफॉर्मवर उतरला तेव्हा त्याचा चेहरा पांढराफटक पडलेला. कुठे जावं काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. बंद पडलेल्या डोक्यानं तो स्टेशन उतरून रस्त्यावर आला तेव्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेली.

पावसाचा पहिला थेंब पडल्या पडल्या सगळे सिग्नल्स बंद करून टाकायची त्या शहरातली जुनी प्रथा. आणि आपण हॉर्न वाजवला की लगेच सगळे लोटांगण घालून रस्ता मोकळा करतील, अशी तिथल्या लोकांची श्रद्धा. त्यामुळे रस्त्यावर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. लोक चवताळल्यासारखे हॉर्न वाजवत होते. त्या वाजवण्यामध्ये विनंत्या, आर्जवं, हताशा, धमक्या, चढाओढ, हमरीतुमरी, रेटारेटी असं सगळं होतं. गोंगाट कानावर आदळताच तो भानावर आला.

स्टेशनच्या खाली भिजलेलं एक कुत्रं आडोशाला उभं होतं. त्यानं कुत्र्याकडं पाहिलं. कुत्र्यानं त्याच्याकडे पाहिलं. आपोआप त्याची शेपूट हलू लागली. ते जवळ येऊन त्याची पॅंट हुंगू लागलं. हे एक असं होतंच म्हणजे. रस्त्यावरच्या कुत्र्यांना त्याची ओळख पटते. किमान या माणसापासून आपल्याला कसलाही धोका नाही, हे कळत असावं.

"या शहरात पाऊस नीट बघण्यासाठी एकही चांगली जागा नाही." - मी त्याच्या शेजारी उभं राहून बोलणं काढलं. काही प्रतिसाद आला नाही.

"हे शहर काय माणसांनी राहायच्या लायकीचं राह्यलेलं नाय भेंचो." मी बोललो. काही प्रतिसाद आला नाही.

"तुझी केस सीआयडीकडं दिलीय. एसीपी प्रद्युम्न निघालेत. पण त्यांची टाटा सुमो ट्रॅफिकमध्ये अडकलीय. पण ते उडतउडत कधीही इथं येऊन पोचतील. त्यांनी दयाला तुझ्या फ्लॅटचा दरवाजा तोडायला पाठवलंय. आणि अभिजीतला टेलिफोन डिरेक्टरीतनं सगळ्या शहराला फोन करायला सांगितलंय." मी सविस्तर बोललो. यावरही काही प्रतिसाद आला नाही.

"पण काळजी करू नकोस. मी तुला अटक होऊ देणार नाही." मी बोललो. काही प्रतिसाद आला नाही.

"तू बिनधास्त घरी जा. मी ते प्रेत अदृश्य करून टाकलंय." मी बोललो. काही प्रतिसाद आला नाही.

"तुझा विश्वास बसत नाईये का? मी स्वतःच लिहिलंय हे.!" मी चिरडीला येऊन बोललो.

"तू साला पुरा मेंटल झालायस. असा खुलेआम फिरत जाऊ नको रस्त्यावर. धरून नेतेल एखाद्या दिवशी." तो माझ्याकडे वळून म्हणाला आणि त्याच्या नेहमीच्या रस्त्याने पायीपायी निघून गेला. भुरूभुरू पावसात मी दूरपर्यंत पहात राहिलो. त्याच्या पाठीपाठी तुरूतुरू चाललेली एक हलती शेपटी दिसेनाशी होईपर्यंत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचली
पण समजली नाही किंवा काय म्हणता येईल, रोचक सुरुवात होती पण नंतर ढिली पडली.

किल्ली + १

आधी इंटरेस्टिंग वाटतं होती . नंतर काही समजले नाही

छान जमली आहे.
मला समजली. पण मी बोलणार नाही. नाही तर माझा पण...
फक्त
""तू साला पुरा मेंटल झालायस. असा खुलेआम फिरत जाऊ नको रस्त्यावर. धरून नेतेल एखाद्या दिवशी." तो माझ्याकडे वळून म्हणाला आणि त्याच्या नेहमीच्या रस्त्याने पायीपायी निघून गेला. भुरूभुरू पावसात मी दूरपर्यंत पहात राहिलो. त्याच्या पाठीपाठी तुरूतुरू चाललेली एक हलती शेपटी दिसेनाशी होईपर्यंत."
हे माझ्या समज मध्ये बसत नाहीये. विचार करतो आहे.

किल्ली+१
केकू+१

जास्त अपेक्षा होती !

स्किझोफ्रेनिया आहे का नायकाला ? म्हणजे तो नसलेल्या गोष्टी बघतोय, नसलेल्या व्यक्तीशी संवाद साधतोय. कायम अनाठायी भीती आणि भ्रम असल्यासारखे स्वसंवाद आहेत. भवतालीबद्दलचे सगळे पर्सेप्शन स्किझोफ्रेनियाच्या रूग्णाचे वाटले. अजून डार्क करता आला असती. तुम्ही लिहू शकता डार्क, तुमच्याकडे रेंज आहे. Happy