विहिरी जवळचा उंचवटा...

Submitted by रुद्रदमन on 31 August, 2024 - 08:50

मला कृषी संवादात भेटलेल्या एका शेतकऱ्याने सांगितलेला किस्सा, त्याच्याच शब्दांमध्ये माडण्याचा प्रयत्न..

"माझे शेत घरापासून 10 किलोमीटरवर आहे. आम्ही जास्त करून कांद्याची शेती करतो, आणि थंडीच्या दिवसांत कांद्याच पीक घेने चालू असते. विजेच्या तुटवड्यामुळे सध्या लोडशेडिंग खूप वाढलेले आहे. जास्त करून रात्रीच वीज असते, त्याच वेळी कांद्याला पाणी देने आवश्यक असते. मी माझ्या शेतावर एक माणूस कायमस्वरूपी कामाला ठेवलेला आहे, त्याला तिथेच घर बांधून दिले आहे.

एके दिवशी, मी कांद्याला पाणी भरण्यासाठी सायंकाळीच शेतावर गेलो. घरी मटणाचा बेत होता, म्हणून रात्री जेवनाचा डबा घेऊनच निघालो. साधारण 11 वाजता वीज आली. माझी विहीर मध्यभागी गृहीत धरली तर.. तिच्या पासून जिथे पाणी भरायचे होते ते शेत पूर्वेला अर्धा किलोमिटर वर आहे आणि माणसाचे घर पश्चिमेला तेवढ्याच अंतरावर. मी त्याच्या घराजवळ जाऊन त्याला विहिरीवर नेले, पाण्याचा पंप सुरू करून त्याला शेतात सोडले, आणि परत विहिरीजवळ आलो.

विहिरी जवळच एक उंचवटा आहे, तिथून पंप चालू आहे की नाही याचा आवाज व्यवस्थित येतो...म्हणून तिथेच बसलो. 12 वाजून गेले होते. मला डब्यातील मटणाची आठवण झाली, म्हणून डबा उघडला. मटणाचा सुगंध हृदयात भरून घेतला, आणि जेवायला सुरुवात केली. मध्यरात्रीचा वेळ, सगळीकडे भल्या मोठ्या चंद्राचा उजेड दूरवर पसरलेला दिसत होता, विहिरीवरून येणारा पंपाचा आवाज, आणि मी एकटाच तिथे बसलेलो होतो. तेवढ्यात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. कुठून तरी वाट चुकून आलेल्या ढगाने चंद्राला गिळून टाकले.. मला थोडे विचित्र वाटले, पण मी दुर्लक्ष केले आणि जेवणावर ताव मारला..

अचानक पश्चिमेकडून कोणीतरी माझ्या दिशेने येताना दिसले. मी बॅटरीचा प्रकाश त्याच्यावर टाकला, तर तो माझाच माणूस होता, ज्याला मी पूर्वेला सोडून आलो होतो. मला प्रश्न पडला की हा विरुद्ध दिशेने कसा येतो आहे. मी विचारले, 'काय रे, वीज पंप चालू आहे, मग इकडून कसा आलास?'

तो म्हणाला, 'मालक, पाणी बंद झालय. मला भूक लागलीय, मला पण जेवायला द्या.' मी पंपाच्या आवाजाचा कानोसा घेतला, तो येत नव्हता.. हवा चांगलीच सुटली होती.. काना मध्ये वारा घु घू आवाज करत होता... मी त्याला जेवायला बसायला सांगितले आणि वाढले.. त्याचे खाणे बघून मलाच किळस आली. 'अरे, हळू खा, कुठे पळून चाललय का?' मी म्हणालो.

तेवढ्यात त्याने ताट रिकाम करून अजून जेवायला मागितले, त्याची अधाशी नजर डब्या वरच रेंगाळलेली होती. मी डब्बा उचलून त्याला वाढायला लागलो, तर त्याने डब्बाच हिसकावून घेतला आणि तो तसाच गरम गरम मटणात हात घालून खायला लागला... मला काहीतरी शंकास्पद आहे असे वाटायला लागले होते... 'अरे, आज जास्त घेतली आहेस की काय?' मी विचारायच्या आतच त्याने डब्बा रिकामा करून मोठा ढेकर दिला.. आणि म्हणाला, 'जातो मालक, पाण्यावर,' आणि पश्चिमेकडे उतरून चालायला लागला.

'अरे, शेत या बाजूला आहे, तिकडे कुठे चाललास?' मी म्हणेपर्यंत त्याची आकृती अंधारात दिसेनाशी झाली. मी जेवणाकडे बघितले, तर त्याने सर्व फस्त केलेले होते. आता वारा पूर्ण थांबलेला होता..जसा काही अगोदर नव्हताच ... चंद्रा ला गिळण्यासाठी सरसावलेल्या ढगाला नेस्तनाबूत करून चंद्र परत सगळी कडे शीतल प्रकाश पसरवू लागला होता.. पंपा चा आवाज परत स्पष्ट पने ऐकू येत होता... माझी शंका दृढ झाली. मी सर्व तसेच उघडे सोडून बाईक घेऊन पाणी चालू असलेल्या शेताकडे गेलो. दुरूनच बॅटरीचा प्रकाश चमकताना दिसत होता, म्हणजे माणूस पाणी भरतोय याची खात्री पटली.

'काय रे, लाईट गेली होती का? अन,जेवला नव्हता का? तिकडे कशाला आला होता?' मी बांधावर जाऊन त्याला जोरात विचारले.

'नाही मालक मी इथून हाललो पण नाही,आणि लाईट पण नाही गेली. मी संध्याकाळीच जेवलो, काबर काय झाल?' त्याने विचारले..

" काही नाही.. काही नाही .. चालू दे.."म्हणत
मी विषय न वाढवता तिथून निघालो आणि त्याच्या घराकडे गेलो. त्याच्या बायकोला विचारले की तो इकडे आला होता का. तिने नाही म्हणून मान डोलवली. मी परत विहिरीजवळ आलो. तिथे येऊन बघतो तर, मी जो डब्बा उघडा ठेऊन गेलेलो होतो.. तो डब्बा बंद करून पिशवीत भरून ठेवलेला होता. मी प्रचंड धक्क्यात होतो. घाबरत डब्बा उघडून बघितले, तर तो आतून लख्ख चमकत होता.
माझी अवस्था त्या वेळी काय असेल याचा तुम्ही वाचताना नक्कीच विचार करू शकत असाल..
मी पिशवी उचलली आणि तडक पाणी चालू होते तिथे बांधावर जाऊन बसलो.

काय होते, कुठून आल होते याचा विचार करून दमलो पण काही समजेना..
रात्री पाणी भरायचे आवराल्या नंतर माणसाला त्याच्या घरी सोडून, तिथे तो विषय न काढताच तडक घरी आलो..
बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर करत होतो...कधीतरी झोप लागली... सकाळी जाग आल्या वर लगेच वडिलांना किस्सा सांगितला... तिथेच आजी पण बसलेली होती... ऐकून घाई घाईने देवघरात गेली.. अंगारा आणून लावला मला.. आणि दृष्ट काढून मिरच्या गॅस वर टाकल्या... ती घाबरलेली दिसत होती.. मी विचारले काय झाले ग आजी...
"अरे पोरा काल पौर्णिमा होती आणि तू मटण घेऊन गेलास.. तुला माहित नाही का आपल्या मळ्यात त्या डोंगरा जवळ खूप जुन्या काळा पासून काही तरी आहे ते..." आजीने सांगितले
"बरे झाले पौर्णिमा होती... अमावशा असती तर... " आजी स्वतःशीच बरळत होती..
आणि मी शहारलेल्या अंगाने तिच्या कडे बघत होतो...

लेखक: रूद्रदमन

( टीप: कथा आवडल्यास अभिप्राय द्या....)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ऋतुराज
धन्यवाद... भरपूर किस्से आहेत.. इथे आणि Facebook पेजवर प्रत्येक weekend ला post करणार आहे..

छान आहे कथा.
अश्या कथांचे एखादे छोटे अमेझॉन इ बुक करून माफक किमतीत विकता येईल.त्या दृष्टीने आतापासूनच प्लॅनिंग चालू करा.
https://www.udemy.com/course/learn-how-to-publish-ebooks-amazon-kindle/?...