मागे कुणीतरी शोलेमधल्या जया भादुरीच्या होळीच्या सीनमधल्या ओव्हरऍक्टिन्गचा उल्लेख केला होता त्यावेळी तिचा साधारण तसाच रोल असणारा हा पिक्चर आठवला. सहजच टीव्हीचे चॅनेल चेंज करताना लागलेला हा पिक्चर संपेपर्यंत चॅनेल बदलले गेले नव्हते. रवींद्रनाथ टागोरांच्या 'समाप्ती' कथेवर आधारित राजश्रीचा हा पिक्चर नॉस्टॅल्जीया म्हणून आवडतो.
कथा साधीशीच. कलकत्त्याला शिक्षण घेणारा अनुप सुट्टीत घरी आला आहे. नावेतून उतरल्यावर तो अडखळून पडतो आणि त्याला हसणाऱ्या मुलांमध्ये मीनूही सामील आहे.. साधारण टीनएजर असलेली ही मुलगी - तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलांबरोबर दिवसभर हुंदडत फिरणे एवढेच तिला ठाऊक. काही दोनचार यत्ता शिकली असेल तरी ‘काला अक्षर भैंस बराबर’, आकडेमोडीच्या बाबतीतही पाटी कोरीच. वडील पोटासाठी दूरच्या शहरात नोकरी करताहेत आणि भविष्यात हिचं काय होईल अश्या चिंतेने आई पछाडलेली. अधून मधून सुट्टीसाठी येणारे वडीलही मीनूला पाठीशी घालतात त्यामुळे तिला मोकळे रानच मिळाले आहे.
छोटाश्या गावात मस्ती करत फिरणारी ती आणि सुट्टीत गावात फिरणारा अनुप अधून मधून एकमेकांच्या समोर येत राहतात.
आईने पसंत केलेले स्थळ बघायला गेला असताना त्याचे बूट पळवणारी मिनू त्याच्यावर काय गारुड करते कोणास ठाऊक, पण अनुप आईला सांगतो की मला मीनूशी लग्न करायचे आहे. एकतर तिने पसंत केलेल्या मुलीशी निमूटपणे बोहल्यावर उभा न राहता ‘मला मुलगी बघायची आहे’ असली शहरी थेरं करणारा मुलगा आता असल्या हूड, घरात पाऊल न टिकणाऱ्या मुलीशी लग्न करायचे म्हणतो याने आई हबकतेच, रागावतेदेखील. पण शेवटी लाडका मुलगा आहे. नाराजीने का होईना आई लग्नाला तयार होतेच.
साध्याश्या गावात काचेच्या हंड्या झुंबरं, नोकरचाकर असेलेले भलं मोठठं घर, नावाजलेले कुटुंब, आंब्याची बाग आणि मुलगा कलकत्त्याला वकिलीचे शिक्षण घेतोय - सामान्य माणसाच्या कन्येला एवढे उत्तम स्थळ कुठून मिळणार? आणि मुलींनी थोडीफार शाळा झाल्यावर लग्नच करायचं असतं अशा कालखंडात ‘मला त्याच्याशी लग्न नाही करायचं’ म्हणणाऱ्या मीनूला विचारतो कोण? उत्तम स्थळ आलेय तर मिनुचे लाड करणारे वडीलही सांगून टाकतात 'मला सुट्टी नाही मिळत पण लग्न उरकून टाका.' लग्न तर झालं पण ‘घर की बहू’ मनोरंजनाच्या प्रोग्राममध्ये लहान मुलांसारखी टाळ्या वाजवत खिदळताना पाहून सासूच्या भुवया वर चढणे स्वाभाविकच. सुहाग रातच्या वेळी नवरा रूममध्ये यायच्या आधीच झोप न आवरल्याने अस्ताव्यस्त घोरत पडलेली सून पाहून नोकर-चाकरातही कुजबुज होणारच ना?
'हाँ, मैं तुमसे नाराज़ हूँ| तुमने मुझसे शादी क्यों की?' विचारणारी बायको संसार काय करणार? त्यात वडिलांची आठवण आली म्हणून तांबडे फुटायच्या आत वडिलांच्या नोकरीच्या गावाला जायला मिनू घरातून पळून जाते. पत्ता वगैरे माहीत नसतोच. ओळखीच्या नावाड्याला वडिलांच्या गावाचे नाव सांगून ती नौकेत झोपून जाते. भला नावाडी तिला झोपेतच सासरी आणून पोहोचवतो. आता मात्र सासुचाही पेशन्स संपतो. सासू तिला खोलीत कोंडून घालते. त्या रागात मीनूही रूममध्ये जमेल तेवढी नासधूस करते.
शेवटी तिची समजूत काढायला अनुप आईला न सांगता तिला वडिलांच्या गावाला घेऊन जातो. 2-3 दिवस तिथे राहून घरी परततो तर दुखावलेली आई मुलाशी बोलणे टाकते. याच घुसमटीत अनुपची कलकत्त्याला परत जायची वेळ येते. आई स्पष्ट सांगते की ‘तुझी बायको काही मला झेपणारे प्रकरण नाही. तू आपला तिला घेऊन जा कसा’. पण मीनूला तर तिच्या गावातल्या मित्रांना सोडून जायचे नाहीये. शेवटी अनुपच तोडगा काढतो. तो तिला माहेरी सोडायचे ठरवतो आणि तिला सांगतो की तू बोलवल्याशिवाय मी काही परत येणार नाही. पण माहेरच्या अंगणात पाय टाकलेल्या मीनूला कसले भानच नाही.
अनुप निमूटपणे माघारी जातो. आता मीनूला खटकतं. पण काय खटकतं तिचं तिलाच समजत नाही. एवढा चांगला जावई मुलीला माहेरी सोडून गेलाय म्हणून आईही हळहळतेय. मीनूला आता तिच्या बालमित्रांबरोबर मजा करायला आवडत नाही, काही गोड वाटत नाही. आणि एका क्षणी ती आईला सांगते 'मैं उनके घर जाउंगी'
नवीन लग्न झाले असताना नाकात दम आणणारी सून शालिनपणे माघारी येते तेव्हा काही क्षण सासूचाही विश्वास बसत नाही. पण तिला उमज आलीय हे ओळखून ती प्रेमाने सुनेचा स्वीकार करते. मीनूने आता मनापासून संसाराच्या जबाबदाऱ्या उचलल्या आहेत. काही काळ उलटलाय. भरल्या घरात अनुपचे अस्तित्व दाखवणाऱ्या खाणाखुणा आता तिला छळतात. पण स्वतःच ओढवून घेतलेली परिस्थिती कुणाला सांगणार? सासू मात्र तिचे मन ओळखून तिला कलकत्त्याला घेऊन जाते आणि शेवट गोड होतो.
काय आवडले?
- साधीशी कथा. यातली माणसे खरी आहेत. अल्लड मुलीकडून लग्न झाल्याझाल्या समजूतदार वागण्याची अपेक्षा करणारा समाज वडील लग्नाला उपस्थित राहू शकत नाही म्हणून मुलीचे लग्न करण्यात पुढाकार घेतो. आपल्या बालिश भावजयीला घरात सामावण्यासाठी नणंद आपल्या बाहुल्या देते. गावात टवाळक्या करत फिरते म्हणून ओरडणारी एखादी आजी मुलीचे लग्न ठरल्यावर वेणी-फणी करू लागते आणि सोबत चार कानपिचक्याही देते.
- जया भादुरीचा सुरुवातीचा अभिनय थोडा ओव्हर वाटलं तरी तिचे ट्रान्सफॉर्मेशन चांगले आहे. स्वरूप दत्त शामळू दिसतो पण अल्लड मुलीशी आकर्षणापायी लग्न केलं असलं तरी तिला समजून निभावून नेणाऱ्या नवऱ्याचा तगडा रोल त्याला मिळाला आहे. कामिनी कौशलने प्रेमळ आई, खाष्ट सासू चांगली साकारली आहे..
- सिनेमॅटोग्राफी - ओपनिंग सीनमध्ये गंगेचे निळेशार पात्र आणि काठावरच्या नारळाचे बन पाहून डोळे निवतात.
- गाणी कथेच्या ओघात येतात व सुश्राव्य आहेत.
- पटकथाकार व संवादलेखक यांचे विशेष कौतुक करायला हवे. कुठेही शब्दबंबाळ न होता भावना मौनातून, एखाद्याच वाक्यातून, हाकेतून पोहोचवण्याचे कसब आजकाल कमीच दिसते.
काय आवडले नाही?
- मुलीचे टिनेजमध्ये लग्न, एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली म्हणून लग्न, मुलींना काहीच से नसणे, अचानक मुलीचे उत्तम गृहिणीत रूपांतर व्हावे या अपेक्षा आजच्या दृष्टिकोनातून पटणार नाहीत. ५०-६० वर्षांपूर्वीची कथा म्हणूनच तिचा आस्वाद घेता येतो.
- स्वरूप दत्तच्या ऐवजी एखाद्या कसलेल्या अभिनेत्याने भूमिकेचे सोने केले असते.
छान लिहिलं आहेस माझेमान.
छान लिहिलं आहेस माझेमन. तेव्हा बघितला होता आणि आवडला ही होतं , आता आवडेल की नाही डाऊट आहे. तेव्हा जया भादुरी कशी आवडत होती ह्याच आता नवलच वाटत.
लिहीलं छान आहे. चित्रपट
लिहीलं छान आहे. चित्रपट बघितलेला नाही. पण 'रविंद्रनाथ की अमर कहानियाँ' अशा नावाने एपिक चॅनलवर मालिका होती. त्यात ही गोष्ट होती.
अनया तुम्ही सुचवल्याप्रमाणे
थँक यू अनया, ममो
अनया तुम्ही सुचवल्याप्रमाणे सुधारणा केली
ममो मी पण घाबरतच बघितला परत. आत्ताची जया भादुरीची इमेज आणि या पिक्चरमधली जया याबद्दल काहीतरी डिसोनन्स आहे मनात. त्यामुळे आवडला परत.
छान लिहीलं आहे. आणि चित्रपट
छान लिहीलं आहे. आणि चित्रपट ही छान आहे.
छान लिहिलं आहे. हा पिक्चर
छान लिहिलं आहे. हा पिक्चर बघितलेला नाही, पण बघायला पाहिजे असं वाटलं . जया भादुरी मला फारशी आवडत नाही, पण ठीक आहे.
लिहिण्याची शैलीही आवडली.
'घो मला असला हवा' ची आठवण झाली. उगाचच, खरं तर. कथा खूपच वेगळी आहे. पण तुम्ही शेवटी जो मुद्दा लिहिलाय ( मुलीला काहीही से नसणे) त्या मुद्द्यावरून आठवला. त्यातही राधिका आपटेला काही 'से' नसतो, पण लग्न होऊनसुद्धा ती आपल्या हुशारीने बरोबर त्या लग्नातून सुटका मिळवते.
छान लिहिलं आहे. आवडल.
छान लिहिलं आहे. आवडल.
छान लिहिलयं.
छान लिहिलयं.
मी खूप पूर्वी कथा (समाप्ती) वाचली होती. मग कधीतरी यूट्युबवर सिनेमा बघितला होता. मला खरे तर स्वरुप दत्तचा सहज अभिनय आवडला होता. उलट जया भादुरी ओव्हर वाटलेली.
मध्यंतरी सत्यजित रे यांनी टागोरांच्या तीन कथांवर जी तीन कन्या सिरीज केली होती ती बघण्यात आली. त्यातली समाप्ती वर आधारित असलेली https://www.youtube.com/watch?v=5MjMK1dgb6E
नेहमी सिनेमाची अक्षरश: चिरफाड
नेहमी सिनेमाची अक्षरश: चिरफाड वाचायची सवय लागल्याने, इथे उपहार बद्दल अगदी मधाळ भाषेत, चांगलं लिहिलेलं पाहून जरा विस्मय वाटला...
त्या त्या टाईम झोनमध्ये आवडला असेलही हा सिनेमा..पण आता नाही आवडणार..
जयाचे विचित्र हसू, ओव्हर ॲक्टिंग आणि तो कोण हिरो...त्याचा अती चांगुलपणा.... अजिबात सहन होणार नाही...
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
सिनेमातले 'सूनी रे नगरीया" हे गाणे सोडल्यास काहीच आवडले नव्हते. जया बच्चनचा अभिनय तर भयाण होता. 'लहान वयात लग्न' ही थीम न वाटता 'वेडसर झाक असलेल्या मुलीचे लग्न' अशी थीम वाटलेली मला.
भाबड्या युगाचा टाइम स्लाइस ….
भाबड्या युगाचा टाइम स्लाइस …. चपखल !
ह्या जॉनरचे सिनेमे (!) आता कमीच पटतील. ऋषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांचे. एक साधेपणा होता अश्या सिनेमांमधे. Simple lives, simple guessable twists and almost always happy endings
उपहारचे दिग्दर्शक हे मुळात उत्तम art director च असल्याने साधे सीन सुद्धा कलात्मक, कथेला पूरक, नैसर्गिक आहेत. आता चकचकीत गावं-घरं बघणाची सवय झालेल्या डोळ्यांसाठी too dull and mundane.
जया तेव्हा आणि आताही बघवत नाही.
गुरूदेव रविंद्रनाथांची गोष्ट
गुरूदेव रविंद्रनाथांची गोष्ट जवळपास शंभर वर्ष जुनी आहे. त्यामुळे आत्ताच्या काळात ती जरा रिग्रेसिव्ह वाटली, तर नवल नाही.
मला शेखर सुमनचा अनुभव चित्रपट
छान परीचय लिहीला आहे.
मला शेखर सुमनचा अनुभव चित्रपट आठवला.
म्हणजे आता तो चित्रपट सुद्धा आठवतं नाहीये म्हणा, पण साधारण कथा अशीच होती हे आठवतेय..
पिक्चर चांगला वाटतोय.लिहिलंय
पिक्चर चांगला वाटतोय.लिहिलंय पण एकदम रंगतदार.
एकंदर पूर्वीच्या पिक्चर्स मधले नायक लग्न करताना अजिबात विचार करायचे नाहीत.तो रिबेका मधला मॅक्झिम काय, देवदास मधला विजयेंद्र घाटगे काय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
आता पुन्हा उपहार बघावासा वाटायला लागला.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मी ही कथा नेटफ्लिक्सवरच्या अनुराग बासूच्या Stories by Ravindranath Tagore मधे बघितली आहे. मीनू फक्त अल्लड असते. लग्नासाठी तयार नसताना मोठ्या घरचे स्थळ आले म्हणून आईला उजवायचे पडलेले असते. अनुपलाही हा अल्लडपणा निरागस वाटलेला असतो व ते गावभर लहान मुलांसोबत हुंदडणे व कैऱ्या पाडणे बघून तिच्याबद्दल प्रेम वाटायला लागते व ही त्यातल्या त्यात वयाने मोठी असते आणि त्याला अगदीच बारा वर्षांची वधू पटत नसते हा अँगलही किंचित आठवतोय. तो लग्नासाठी तयार झाला आहे एवढे बघूनच त्याची आई तिला हे स्थळ पटलेले नसतानाही तयार होते. त्यामुळे सासूचे आणि तिचे जरा वाद होतात पण ते अजिबात टोकदार नसतात. कुणीही ह्या नव्या नात्यासाठी तयार नसते एवढेच आहे. बाबांकडे गेल्यावर तिला लक्षात येते की अनुप एवढाही वाईट नाहीये. कुठलीही धार नसलेली सहज आणि गोड गोष्ट आहे.
माधव
-------
चित्रपट जरी पन्नाससाठ वर्षे जुना असला तरी कथा शंभर वर्षे जुनी आहे, शोधाशोध केल्यावर १८९३सालाची नोंद सापडली. त्या काळाच्या मानाने मीनूची व्यक्तिरेखा रिफ्रेशिंग आणि मुग्धच वाटते.
माझी अगदी आवडती मालिका. ह्या
माझी अगदी आवडती मालिका. ह्या गोष्टीत अनुपची आई पालखीत बसून 'त्या आमचोर' मुलीला मागणी घालयला येते. तेव्हा तिची आई गळ्याभोवती पदर गुंडाळून तिच्या पाया पडते आणि सरबराई करते ते लक्षात आहे. लग्नातला शंखाचा मुकूट मीनू वैतागून तोडून फोडून टाकते. 'हे काय झालं आपल्या आयुष्याचं ' असं तिला वाटत असतं. अनुप समजुतीने वागतो. शेवट गोड.
अस्मिता>>+१
अस्मिता>>+१
प्रोब्लेम काय आहे कि आपण "वयाने मोठे" झालो कि आपले बालपण हरवून बसतो. कुणी "तसा" वागत असेल तर सगळे हसतात. आनंद मधला राजेश खन्ना पहा. गवळ्याला पकडून गावाची हालचाल विचारणारा!
छान लिहिलंयस, माझेमन!
छान लिहिलंयस, माझेमन!
पण पिक्चर पहाणार नाही. जया फारशी आवडत नाही. ती या पिक्चरमधे पण शोलेमधल्या त्या सीनसारखी वागली असेल असंच वाटतंय.
'लहान वयात लग्न' ही थीम न वाटता 'वेडसर झाक असलेल्या मुलीचे लग्न >>> माधव
जया भादुरी कधीच आवडली नाही.
जया भादुरी कधीच आवडली नाही..आधीही नाही आणि आत्ताही नाही... फार कृत्रिम वाटते ती..खोटी... मिली केवळ अमिताभ मुळे पाहिला...
मला ज्या भादुरी नेहमीच आवडते.
मला ज्या भादुरी नेहमीच आवडते. राज्य सभेच्या स्पीकरला ठणकावल्या पासून तर अजून आवडायला लागली आहे.
छान लिहीले आहे. आता हा सिनेमा
छान लिहीले आहे. आता हा सिनेमा परत बघेन.
छान लिहीले आहे. अशा नावाचा
छान लिहीले आहे. अशा नावाचा पिक्चर आहे हे इतकेच माहीत होते. बाकी शंभरच काय पण पन्नास वर्षांपूर्वीची कथा आता रिग्रेसिव्ह वाटेल यात आश्चर्य नाही.
मला जया भादुरीचे तेव्हाच्या पिक्चर्स मधले काम कधी ओव्हरअॅक्टिंग वाटले नाही (इव्हन शोले मधल्या होळीच्या सीनमधले सुद्धा). हा पिक्चर पाहिलेला नाही.
जया आवडते असे तेव्हा मी पीअर
जया आवडते असे तेव्हा मी पीअर (मैत्रिणींच्या) प्रेशर खाली म्हणायचे! कारण जया भादुरी आवडणे हे उच्च अभिरुची चे लक्षण समजले जाई
आता उघडपणे ती आवडत नाही असे म्हणता येते...
आपण "वयाने मोठे" झालो कि आपले
आपण "वयाने मोठे" झालो कि आपले बालपण हरवून बसतो. कुणी "तसा" वागत असेल तर सगळे हसतात.
>>>>>>
म्हातारपणात बरेच लोकांना आपली चूक उमगते. आणि ते तेव्हा लहान मुलांसारखे वागू लागतात. तेव्हा जग म्हणते बुढ्ढा सटिया गया है
बाकी मी जया भादुरी फॅन नसलो तरी ती मला नेहमीच छान वाटली. अगदी शोले, मिली पासून K3G, KHNH पर्यंत..
छान लिहिले आहे. मी सुद्धा
छान लिहिले आहे. मी सुद्धा रवींद्रनाथ टॉगोरांच्या कथा नेटफ्लिक्सवर बघितल्या होत्या त्यात ही कथा सुद्धा खुप छान रीतीने सादर केली आहे, त्यामुळे चित्रपट बघणार नाही.
रच्याकने, तेव्हाचा काळ वेगळा पण योगायोगाने आजच खालील बातमी वाचली या संदर्भात.
https://indianexpress.com/article/explained/explained-law/himachal-bill-...,
जया भादुरी नाही आवडत, राज्य
जया भादुरी नाही आवडत, राज्य सभेच्या स्पीकरला ठणकावल्या पासून तर अजून नावडती झाली आहे.
(No subject)
चांगलं लिहिले आहे
चांगलं लिहिले आहे
फोटोतला स्वरूप दत्त प्रथमदर्शनी मनोजकुमार वाटला
छान लिहिले आहे. अचाट रीव्ह्यु
छान लिहिले आहे. अचाट रीव्ह्यु ना चटावलेले मन उगाच आत्ता फडशा सुरू होतोय का तेंव्हा ह्या नादात सगळा लेख वाचला पण चिरफाड आली नाही.
माधव- वेडसर झाक असलेल्या मुलीचे लग्न'>> मला ही तिचं ते गाणं आठवतं..जाSSजानेजा, धुंडता फीर रहा. त्यात ती बाहुली घेऊन फिरत असते, आणि ती २०+ मुलगी दाखवली आहे.
आभार लोकहो…
आभार लोकहो…
या निमित्ताने याच कथेची किती वेगवेगळी चित्रे रेखाटली गेलीत हे समजले. आता हळूहळू सगळीच व्हर्जन्स पाहिन. मिळाली तर कथाही वाचेन.
वेडसर झाक असलेल्या मुलीचे लग्न'>>
हो तिचं हसणं वाटतं खरं. पूर्वार्धातील तिची भूमिका आमच्या कोकणात 'धेडगा' म्हणतात तशीच आहे - कोणतीही स्त्रीसुलभ नजाकत नसलेली.
इतरांना ते अज्जिबात पटलं नाही किंवा जया आवडली/आवडतच नाही तरी चालतंय की.
पिक्चर पहावासा वाटला/आवडला/नावडला/त्यावर लिहावसं वाटलं तर जरूर लिहा.