चकवा~ मध्यरात्रीचा थरारक अनुभव. भाग~२

Submitted by रुद्रदमन on 27 August, 2024 - 10:25

मध्यरात्री घडलेला रस्त्यावरील थरार.
भाग~२

भाग~१ ची लिंक
https://www.maayboli.com/node/85524

( सध्या भारत भर घडत असलेल्या विदारक घटनांना विचारात घेऊन या कथेचा पुढील भाग लिहिला आहे. लेखनात काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व)
कथा कशी झाली आहे याचा अभिप्राय नक्की द्या.. ही विनंती..

दुसऱ्या दिवशी गावकरी आम्हाला घेऊन गुळेगावात गेले.. माझा मित्र अजय गाडी मध्येच झोपून होता. कदाचित रात्रीच्या प्रसंगाचा त्याने जरा जास्तच धसका घेतला होता.. गावात मी चहा पाणी घेतला, त्याला ही बळजबरीने पाजला... गावकरी बऱ्याच अतिरंजित गोष्टी आम्हाला सांगत होते. तिचा अनुभव बऱ्याच जणांना आला होता.. पण ती नक्की कोण आहे हे कोणीच सांगू शकले नाही.. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले.. सगळ्या गोष्टीत एकच महत्वाची गोष्ट समजली की आतापर्यंत त्या रोड वर तीन जन मृत अवस्थेत सापडले आहेत. ते पण अतिशय भयानक मृत्यू म्हणता येईल अश्या अवस्थेत... मी सुस्कारा सोडला... गावकऱ्यांचे बोलणे खरे असेल तर आम्ही त्या रात्री खूप मोठ्या संकटातून वाचलो होतो.. मी तिथल्याच एका मारुतीच्या मंदिरात दर्शन घेतले आणि देवाचे आभार मांडले... अजय गाडीतच झोपलेला होता... मला त्याची काळजी वाटायला लागली होती.. मी लगेचच गावकऱ्यांचा निरोप घेतला.. आणि अजय ला घेऊन घरी निघालो... रात्री अनुभवलेल्या भयानक घटने मुळे तो अजूनही झोपलेला होता.. झोपेतही त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते. अचानक जाग आली की तो मागे वळून बघत होता, जणू काही कोणी आमचा पाठलाग करत आहे. मी त्याला प्रत्येक वेळी समजावत होतो, "काही नाही रे, आपण घराच्या जवळ आलोय, सगळ ठीक होईल." पण त्याच्या चेहऱ्यावरचा घाबरलेला भाव काही कमी होत नव्हता.

घरी पोहोचल्यानंतर त्याची आई बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. "काय झालय रे, चेहरा असा का दिसतो आहे? रात्री कुठे होतात तुम्ही? " तीने त्याची अवस्था बघून घाबरून विचारले .. अजयने तिच्याकडे एकदा पाहिले आणि काहीच न बोलता आत गेला. त्याचा चेहरा पांढरफटक पडला होता, आणि त्याच्या चालण्यातही थकव्याचे आणि अस्वस्थतेचे चिन्ह होते. मी तो आत गेल्यावर त्याच्या आई समोर रात्रीचा इत्यंभूत प्रकार वर्णन केला..

त्याच्या काळजीने मी त्या दिवशी तिथेच थांबायचे ठरवले... दिवसभर त्याची अवस्था चिंताजनक होती. त्याने नीट जेवणही केले नाही आणि सतत स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. रात्री त्याच्या खोलीतच झोपलो.. तो झोपायचा प्रयत्न करत होता, पण झोप त्याच्या डोळ्यांमधून गायब होती. कधीतरी झोप लागलीच तरी काहितरी स्वप्न बघून दचकून उठत होता..

कदाचित स्वप्नात रात्रीच्या गडद सावल्यां मधून ती स्त्री पुन्हा त्याच्या समोर येत असावी ,कारण बऱ्याच वेळा तो दचकून उठला की घाबरून चोहोबाजूला बघायचा आणि बोलायचा. "ती आलीय… ती इथेच आहे…" तो सतत हेच बोलत होता. त्याची आई आणि मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्या डोळ्यांतली भीती अद्याप तशीच होती.

मी मात्र माझ्या मनाला काबूत ठेवत होतो. माझ्यावर त्या रात्रीचा काहीच परिणाम झाला नव्हता, पण अजयची अवस्था पाहून मीही विचारात पडलो होतो. "तुला जे वाटते आहे, ते फक्त तुझ्या मनाचा खेळ आहे," मी त्याला समजावत होतो, "आपण ते विसरून पुढे जायाला हवे." पण त्याचे हळवे मन त्या अनुभवाने पूर्णपणे हदरले होते. हे असे रोजच घडत होते. रोज रात्री तो स्वप्न बघून दचकून उठायचा. आता हे त्याच्या घरच्यांसाठी असह्य झाले होते. मी रोज एक वेळ त्याला भेटुन येत होतो.. त्यात मला कळत होते की त्याचे आई वडील रोज एका नवीन मांत्रिकाला आणत होते.. पण त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते.. एके दिवशी कोणीतरी त्यांना नवनाथांचे पारायण करायचे सुचविले... तो नववा दिवस होता.. मी गेलो तेव्हा त्याची आई पूजा मांडत होती... मी थोडावेळ थांबून निघून आलो...

दहाव्या दिवशी सकाळी, अचानक त्याचा फोन आला. त्याच्या आवाजात एक विचित्र शांतता होती. "तू घरी येऊ शकतोस का? मला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे," तो म्हणाला. त्याच्या आवाजातली शांतता भयंकर होती. मला जाणवले की काहीतरी गूढ नक्कीच उकलनार आहे. मी ताबडतोब त्याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.

त्याच्या घरी पोहोचलो. त्याचे वागणे एकदम नॉर्मल वाटत होते. हातात त्याच्या आईने बांधलेला धागा होता. "काय झालय? तू ठीक आहेस का?" मी विचारले.

"हो, आता बरे वाटते आहे ," तो हसत म्हणाला, "आईने काल घरात 'नवनाथांची पोथी' सुरू केलीय. त्याने थोडी शांतता मिळाली आहे."

"पण तुझे डोळे असे काहीतरी गूढ दडल्या सारखे का वाटत आहेत?," मी त्याच्या कडे बघत म्हणालो.

"माझ्या खोलीत चल, काहीतरी सांगायचे आहे," तो माझ्याकडे शांतपणे बघत बोलला. आम्ही खोली मध्ये आलो. त्याने दरवाजा बंद केला आणि बेड वर बसून तो शांतपणे बोलू लागला.

"माझ्या स्वप्नात ती स्त्री पुन्हा आली होती," त्याच्या आवाजात काळजी होती. तो पुढे बोलला "पण यावेळी वेगळीच होती."

"काय होते नक्की वेगळे? अजून काही घडले का तुझ्याबरोबर? काही बोलली का ती? मी न रहावुन प्रश्नाचा भडिमार सुरू केला.

कासावीस नजरेने तो माझ्या कडे बघत बोलायला लागला, "ती बोलली काहीच नाही, ना तिने परत मला काही त्रास दिला. पण मी काल रात्री स्वप्नात जे काही बघितले ते त्या रात्री हून ही भयानक होते, त्रास दायक होते."
तो बोलता बोलता अचानक थांबला. माझी उत्कंठा खूप वाढली होती. मी प्राण कानात आणून त्याच्या पुढच्या बोलण्याची वाट बघत होतो. तो पुढे झुकला आणि स्टूल वरचा तांब्या उचलून घटघट पाणी प्यायला..
तांब्या परत ठेवत मागे रेलून बसत त्याने बोलायला सुरुवात केली," तुझ्या कडे वेळ आहे ना? कारण मी जे स्वप्न सांगणार आहे ती घटना खूप मोठी आहे."
मी पण त्याच्या शेजारी जाऊन उशीला रेलून बसलो आणि म्हणालो" सांग मी सुद्धा त्या रात्रितल्या सापशिडी मधला एक भिडू आहे, नक्की आपल्या मागे कोण लागले होते, त्या मागची कहाणी काय आहे हे कळल्या शिवाय मला ही चैन मिळणार नाही. बोल कर सुरुवात."

"काल रात्री मला एक खूप विचित्र स्वप्न पडले," तो म्हणाला, आवाजात दडपण स्पष्ट होते. "स्वप्नात एक घर होते त्या घरात मी एक स्त्री आणि तिच्या लहान मुलीला बघितले. ती स्त्री आपल्याला त्या रात्री भेटलेलीच तीच होती, पण तिचे रूप बदललेले होते, अगदी शांत आणि प्रेमळ दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही क्रोध नव्हता, उलट तिच्या डोळ्यांमध्ये ममता झळकत होती, तिच्या मुलीवर असलेले प्रेम झळकत होते"

मी त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होतो. तो पुढे म्हणाला, "अगदी पहाटेपर्यंत त्या दोघींच्या प्रतिमा माझ्या मनात रुंजी घालत होत्या, मला पूर्ण स्वप्नात जे काही दिसले ते आता मी तुला जसे च्या तसे सांगतो."
त्याचा चेहरा विचारमग्न झाला होता. मनात काही तरी मांडणी करत असल्या सारखे भासत होते..
आणि तो पुढे बोलू लागला...

*ती कोण होती... ही आहे तिची कहाणी....*

पावसाळी वातावरणामुळे लाईट गेलेली होती. चोहीकडे पसरलेल्या नुकत्याच क्षितिजावर आलेल्या अर्ध चंद्राच्या अंधुक प्रकाशात संपूर्ण गुळेगाव जवळजवळ निद्रादेवीच्या आधीन झालेले होते. सर्वत्र पसरलेली नीरव शांतता मधूनच एखाद्या कुत्र्याच्या भेसूर ओरडण्याने भंग पावत होती. पण त्या शांततेत ही एक घर मात्र अस्वस्थपणे धगधगत होते. ते घर जणू गुळेगावामधील अशांतपणाचे एक केंद्रच बनले होते, आणि त्याचे कारण होता सुहास. गावात कोणाचेही लक्ष न वेधून घेणारा, प्रत्यक्षात व्यसनाच्या आहारी गेलेला, आणि अतिशय नीच वृत्तीचा बाहेरख्याली मनुष्य. ही कहाणी सुहासची नाही, तर त्याच्या सोबत तडफडत संसाराचा गाडा ओढणाऱ्या सुजाता ची होती.

हे एक असे घर होते, जिथे काळोख फक्त बाहेरच नव्हे, तर घरातही पसरलेला होता. सुजाता या काळोखा बरोबर सामना करत आपले जीवन व्यतीत करत होती.

सुजाता ने घड्याळात बघितले, रात्रीचे 11 वाजले होते. सुहास चा अजूनही ठावठिकाणा नव्हता. तिला आता त्याच्या या बेफिकीर वागण्याची सवय झाली होती. तिने नुकतेच अंगावर पिऊन निद्रेच्या आधीन झालेल्या मीरा कडे बघितले, तिच्या गोंडस मुलीच्या निरागस चेहऱ्याकडे बघत तिने झोपण्यासाठी साठी तिच्या शेजारी अंग टाकले. दिवसाच्या थकण्या मुळे किंवा मानसिक गळचेपी मुळे थोड्याच वेळात तिला डुलकी लागली. तिला एक स्वप्न पडले, त्यात सुहास तिच्याकडे हसत येत होता, तिला प्रेमाने जवळ घेत होता. पण जसे तो जवळ आला, त्याचे हात थरथरायला लागले, चेहरा काळवंडायला लागला, आणि त्याचे स्वरूप एक भयानक रूप धारण करु लागले. सुजाता घाबरून जागी झाली, तिचे हृदय धडधडत होते, आणि तिच्या बाजूला सुहासची रिकामी जागा पाहून ती अधिकच उदास झाली.
तेवढ्यात दरवाजावर जोरजोरात थापा पडल्याचा आवाज झाला. आवाजाने मीरा ची झोप मोडायला नको म्हणून झोपेत असतानाही सुजाता मधील आई ताडकन उठली आणि दरवाजाकडे पळाली. दरवाजात सुहास उभा होता, त्याच्या रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत. स्वतः चा तोल सावरत तो घरात आला. त्याच्या चेहऱ्यावर ताण आणि डोळ्यांमध्ये रोज सारखाच राग स्पष्ट दिसत होता.

"किती वेळा सांगितले आहे, मला वाट बघायला आवडत नाही, इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला," असे त्वेषाने म्हणत सुहासने एक जोरदार चपराक सुजाता च्या गालावर ठेवली. सुजाता बिचारी तरी पण तो पडू नये म्हणून त्याला आधार देत तिथेच उभी राहिली. ती काहीच प्रत्युत्तर देत नसल्याचे पाहून सुहास च्या मेंदू मधील नशा अजूनच खवळली. त्याने सरळ तिच्या केसात हात घातला आणि तिला जोरदार हिसका देत बोलला, "सांग, का वेळ लागला दरवाजा उघडायला? काय करत होतीस नक्की घरात तू?" सुजाता केस ओढल्या मुळे आणि त्याच्या शब्दांमुळे जोरजोरात कण्हत रडू लागली. हात जोडून त्याला तिची काहीच चूक नाही, हे बजावत होती. पण आज सुहास पुरता नशे मध्ये बुडालेला होता. तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नशे मुळे त्याचा त्याच्या मेंदू वरील ताबा पूर्णपणे ढासळला होता.

सुजाता च्या विनवणी कडे दुर्लक्ष करत सुहास रागाने म्हणाला, "सांगते की नाही, सांग कोणा बरोबर होतीस? नक्कीच कोणाला तरी तू घरात घेऊन होतीस. मी आल्यावर मागच्या दरवाज्याने पळवून लावले ना तुझ्या यारा ला." असे बोलत त्याने एक जोरदार लाथ तिच्या कंबरेवर मारली. लाथेचा तडाखा इतका जोरात होता की सुजाता वेदनेने जोरात किंचाळत मीरा च्या अंगावर जाऊन पडली. त्या धक्क्याने मिरा जागी झाली आणि जोरजोरात रडायला लागली. सुजाता ने कसे तरी कण्हत विव्हळत घाईघाईने तिला उचलले. वर्मी बसलेल्या लाथेने आणि सुहास च्या त्या घाणेरड्या शब्दांनी तिचे काळीज पिळवटून निघाले. त्यात मीरा चा केविलवाणा रडणारा आवाज तिच्या मनातील अग्नी प्रज्वलित करून गेला.

तिने त्याच क्षणी मनोमन निश्चित केले की आता इथे थांबायचे नाही. आत्ताच मीराला घेऊन हे घर सोडून दूर कुठेतरी निघून जायचे. तिने निर्धार करून मागे सुहास कडे वळून पाहिले. सुहास तुटलेल्या खुर्चीवर मान लवंडून अस्ताव्यस्त पडला होता. सुजाता ने घाईघाईने बॅग भरली आणि मीराला कडेवर घेऊन त्या भयाण मध्यरात्री तिच्यासाठी नरका प्रमाणे झालेले सुहास चे घर सोडले.

सुजाता एका हातात मुलीला घट्ट पकडून, डोक्यावरचा पदर ओढत,विदीर्ण मानसिक परिस्थिती मध्ये चालत चालत पुढे निघाली. पौर्णिमा होऊन थोडेच दिवस झाले होते; आकाशात अर्धचंद्र थोडासा वर आला होता. त्याच्या अंधुक प्रकाशात शरीरात आणि मनात वेदनेचे काहूर घेऊन सुजाता चालत होती. आज सुहास मधला पशू तिने पाहिला होता. कोणी इतका निष्ठुर कसा होऊ शकतो, हाच प्रश्न तिच्या मनात सलत होता.

ती चालत होती. कुठे जायचे, कसे जायचे हा प्रश्न तिच्या मनात नव्हताच. तिला फक्त सुहास च्या काळ्या सावली पासून स्वतःला आणि मीराला दूर न्यायचे होते. लक्ष हिन चालताना आपण कधी शहराच्या बाहेर आलो हेही तिला उमगले नाही. गेल्या एक तासा पासून ती अव्याहत चालत होती. मिरा तिच्या खांद्यावर मान टाकून शांत झोपली होती. त्या इवल्याशा जीवाला आईच्या आयुष्यातील उलथापालथ काय कळणार?

रस्त्याच्या आजूबाजूला झाडांची सुरुवात झाली होती. तेव्हड्यात कसल्यातरी विचित्र आवाजाने तिची तंद्रि भंग पावली. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या वरच्या बाजूला एक घुबड तिच्याकडे बघून आवाज करत होते. त्याच्याबरोबर सुर लावत रात्र किडे रात्र राग अलापत होते. तिने चमकून आजूबाजूला पाहिले. अंधाराने भरलेला निर्जन परिसर पाहून तिचे अंग कंप पावले. मघाशी मनात भरलेल्या अतीव दुःखाची, रागाची जागा आता भीतीने घेतली. एक नक्की होते की तिला ही भीती तिच्यासाठी नव्हती तर मीरासाठी वाटत होती.

"आपण ठीक केले का? असे अर्ध्या रात्री मीराला घेऊन बाहेर यायला हवे होते का?" असे विचार तिच्या मनात येऊ लागले.

सुजाता च्या मनात असंख्य विचारांची गर्दी झाली होती. पतीच्या वादामुळे तिचे मन चीडून गेले होते, तिला आता परत सुहास चे तोंड बघायची इच्छा नव्हती. त्याचबरोबर या अशा अंधारात काही संकट आले तर,आपल्या मीराला काही झाले तर हा ही प्रश्न तिला सतावत होता. एकदा तिला वाटले की परत जावे आणि सुहासशी बोलून सगळे ठीक करावे, पण सुहासने आज हे केले त्यावरून पुन्हा पहिल्यासारखे होण्याची तिला किंचितही आशा नव्हती.

मीरा चा विचार करून ती खूप घाबरली होती. "कुठे निघाले आहे मी? तिच्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधायला हवे," स्वतःशी च बोलत तिने मुलीला आपल्या छातीशी आणखी घट्ट धरले. आसरा शोधण्याच्या विचाराने तिने पाय मागे वळवले. ती परत गावाच्या दिशेने निघाली. थोडा वेळ गेला असेल. दूरवर घरांचे दिवे चमकताना दिसायला लागले. आजूबाजूची झाडी संपून रस्त्याच्या बाजूने शेतीचे मोकळे प्लॉट लागले. तिच्या जीवात जीव आला.

एकदा गावात पोहोचल्यावर सुजाता ने मिळेल त्या घराचा दरवाजा वाजवून आश्रयासाठी विनवणी करण्याचे मनोमन निश्चित केले होते. अचानक तिला समोरून दोन दिवे तिच्या दिशेने येताना दिसले. नजरेच्या टप्प्यात आल्यावर तिने ती एक कार असल्याचे ओळखले. इतक्या रात्री कोण असेल गाडीमध्ये अशी शंका येऊन तिने बाजूला लपण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु सगळीकडे उघडी बोडकी शेती असल्यामुळे गाडीचा प्रकाशझोत तिच्यावर पडलाच. ति तिथेच अंग चोरून उभी राहिली. तिच्या जवळ येत गाडीचा वेग कमी व्हायला लागला. तिचे मन तिला सावध करायला लागले. "हे काहीतरी चुकीचे आहे," तिने स्वतःला सांगितले, पण आता वेळ निघून गेलेली होती.

गाडी तिच्या शेजारी येऊन थांबली. त्या गाडीमधून एकामागोमाग चार पुरुष बाहेर आले. कोणाचाही चेहरा अंधारात पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हता, पण हवे बरोबर येणाऱ्या वासाच्या भपकाऱ्याणे ते सर्व दारू पीलेले आहेत हे तिने जाणले. तिचे काळीज फाटून बाहेर यायची परिस्थिती निर्माण झाली होती. कुत्र्यांच्या घोळक्यात सापडलेल्या हरिणी च्या पिल्ला सारखी तिची अवस्था झाली होती. त्यांच्या देह बोलीत काहीतरी घाणेरडे होते, हे तिच्यातील स्त्रीने हेरले. तिला स्वतःची नाही तरी मीरा ची काळजी सतावत होती. "कुठे चाललीस?" त्यांच्यातील एकाने विचारले.

"मा...मा... माझे काही नाही, मी फक्त बाहेर चालले आहे," अडखळत बोलत सुजाता घाबरून मागे वळली. एक शेवटचा प्रयत्न म्हणून तिने तिथून पळायला सुरुवात केली.

"ए बाई, पळू नको. इतक्या रात्री इथे बाहेर राहणे सुरक्षित नाही. आमच्या सोबत चल," एक जण पळणाऱ्या सुजाता कडे बघत जोरात कळकळी च्या आवाजात ओरडला. आवाजात विश्वास वाटून सुजाता चा वेग कमी झाला. आणि तेव्हढ्यात त्यांच्यातील दोघांनी रानात एकटे पडलेल्या सावजा वर झडप घालावी तसे तीला पकडले. कळकळीने बोलणारा धावत आला आणि त्याने तिला धक्का देत तिच्या मिठीतून मीराला खेचून घेतले. त्या भयाण क्षणात सुजाता किंचाळली. पण तिला कोणीच ऐकू शकणार नव्हते. तिच्या कानात परत एकदा मघाशीच्या घुबडा चा अपशकुनी आवाज घुमू लागला. चारही नराधमांनी अश्लील बोलत तिला गाडीत कोंबले. एव्हाना मीरा ला जाग आली होती. अनोळखी व्यक्तीच्या हातात स्वतःला पाहून तिने हंबरडा फोडला होता. तो राक्षस तिचा आवाज बंद करण्यासाठी तिचे तोंड दाबत होता. सुजाता चे मन पिळवटून निघत होते. मीराला स्वतःकडे घेण्यासाठी तिने पूर्ण ताकद पणाला लावली होती पण त्या शैतानाच्या शक्ती समोर ती एक अबला ठरत होती. मिरा च्या रडण्याचा आवाज सहन न होऊन तिने हात कानावर घट्ट दाबले. आणि डोळे बंद करून इतक्या रात्री घर सोडण्यासाठी स्वतःला शिव्या देऊ लागली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. काही तासांपूर्वी ती अंथरुणावर झोपलेल्या तिच्या निरागस मीराला किती प्रेमाने न्याहाळत होती. आणि आता? थोड्याच वेळात तिला तिच्या जीवनातले सर्वात भयानक वळण अनुभवायला लागले होते.

"ए इथून वळव, त्या सावित्री नदीच्या पुलावर घे, तिथे खाली भारी जागा आहे. आणि कोणी येत पण नाही तिकडे," सुजाताला पकडून ठेवणारा बोलला. सुजाता च्या काळजात धस झाले. तिला पुढे काय होणार याची कल्पना एव्हाना आली होती. ती विनवणी करू लागली, त्यांना शपथा द्यायला लागली. तिच्या विनवणी कडे लक्ष न देता त्यांची वासनांध नजर तिच्या शरीराचा वेध घेत होती.

थोड्याच वेळात पुल तिच्या नजरेस पडला. तिच्या पोटात कालवाकालव व्हायला लागली. गाडी थांबली आणि घाईघाईने तिघे जण खाली उतरले. एकाने हात आणि दोघांनी पाय पकडून तिला जवळजवळ ओढतच पुलाखाली नेले. तिला दूर जाताना बघून मीरा ने अजूनच टाहो फोडला होता. चौथा अजूनही मीराला पकडून होता. बाकीच्यांना नजरेआड झालेले बघून त्यानेही मीराला शीट वर फेकले आणि दरवाजा तसाच उघडा ठेऊन बाकिच्यांकडे पळाला. त्या चारही नराधमांनी आळीपाळीने त्या बिचारी वर किती तरी वेळा बलात्कार केला. सुजाता अर्धमेल्या अवस्थेत त्यांची वासनांध शरीरे सहन करत होती. एका बाजूला हे पशू आणि दुसऱ्या बाजूला तिच्या मीरा च्या किंकाळ्यांचा आवाज. सुजाता चे शरीर आणि मन दोन्हीही साथ सोडायला लागले होते. रडून रडून मीरा सुद्धा क्षीण झाली होती.. काही वेळाने मीरा चा आवाज येणे बंद झाले. शरीरातील प्राण कधीही जातील अशी परिस्थिती सुजाता ची झाली होती. पाशवी बलात्काराच्या आत्यंतिक वेदना तिला सहन होत नव्हत्या. या पेक्षा मरण बरे असे तिला वाटत होते. त्या पाशवी वृत्तीच्या वासनांध शैतानांची नशा उतरल्यानंतर त्यांनी पुरावा मिटविण्यासाठी तिला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याचे ठरवले. त्यातील एक गाडीकडे जाऊन कोयते आणि मीराला घेऊन आला. त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे हे गलितगात्र अवस्थेत खाली पडलेल्या सुजाता ने ओळखले. "ये घे त्या पोरीला इकडे आणि उडव तिचे मुंडके," तोच सुरवातीला कळकळीने बोलणारा बोलला. कोवळ्या मुलीला वाचवण्यासाठी सुजाता मधील आई सर्व वेदना विसरून सज्ज झाली. सर्व ताकतीने उठून तिने बेसावध असलेल्या एकाच्या हातातील कोयता हिसकावला. कोणाला काही कळण्याच्या आतच मीराच्या मानेवर कोयता लावणाऱ्याचे शिर धडावेगळे झाले. तिने आता रुद्रावतार धारण केला होता. पण काहीही झाले तरी ती एक स्त्री होती. तीन पाशवी वृत्तीच्या जनावरांसमोर तिची ताकद कमी पडली. तिच्या डोळ्यांसमोर त्यांनी मिरा ची जीवनयात्रा संपवली. त्यानंतर ते रागाने तिच्या कडे वळले. तिला ही आता जगायचे नव्हते. तिने स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले. कितीतरी वेळ असंख्य वार तिच्या शरीरावर होत होते. सुजाता चे निष्प्राण कलेवर होणाऱ्या प्रत्येक आघाताने हलत होते...
ती मेली हे समजल्यावर ते तीनही राक्षस तिथून निघून गेले...
अचानक आभाळात प्रचंड काळेभोर ढग जमा झालेत... विजा चमकून भयानक पावसाला सुरुवात झाली... अति प्रचंड पाऊस , विजांचा थयथयाट सुरू होता... नदीला पाणी वाढू लागले... पाऊस वाढतच होता... जसे काही तिच्या वर झालेल्या अत्याचाराला बघून आभाळ देखील धाय मोकलून रडत होते..वाहणाऱ्या पाण्याचे रूपांतर पुरा मध्ये झाले.. हळू हळू तिचे आणि मिराचे निष्प्राण कलेवर त्या पाण्यात वाहून जाऊ लागले.. बघता बघता पुराच्या भीषण लोंड्या मध्ये दिसेनासे झाले.... परमात्म्याला देखील तिच्या प्रेताचा अंतिम संस्कार मान्य नव्हता, परमात्म्याला देखील तिला मोक्ष मिळून द्यायचा नव्हता... तिच्या भविष्यात परमात्म्यानेच पिशाच्च योनी लिहिली होती... कदाचित त्याचीच इच्छा होती की तिने प्रतिशोध घ्यावा... आणि घडले ही तसेच..
आता तिला हवा होता प्रतिशोध. तिचा आत्मा तिच्या मुलीच्या आणि तिच्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी आसुसला होता.

अजय ने बोलणे थांबवले... मी सुन्न होऊन त्याच्या कडे बघत बसलो होतो... त्याची ही परिस्थिती खूपच भयानक होती... माझी जर ऐकताना ही अवस्था होती तर त्याने तर हे दोनदा अनुभवले होते.. काल रात्री स्वप्नात आणि आज मला सांगताना... मला त्याच्या अवस्थेची जाणीव होत होती.. मी वेगाने जाऊन तांब्या भरून आणला.. आणि त्याला पाणी पिण्यास दिले...

"मग पुढे काय झाले? पुढचे काही दिसले का?"
मी घाईघाईने त्याला विचारले...

मला शांत करत तो पुढे बोलू लागला..

पुढील सर्व भाग मला अतिशय वेगाने घडताना दिसला... सुजाता च्या आत्म्याने एक एक करत त्या उरलेल्या तिघांना पुलावरून जात असताना गाठले आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे अतिशय किळसवाणे आणि भयानक मरण दिले... जे काही दिसले ते विचाराच्या बाहेर भयानक होते.. माझ्या कडून त्या प्रसंगांची शब्दात मांडणी सुद्धा शक्य नाही... असे म्हणत तो शांत झाला..

"अगोदर जिवंत असताना एक आणि नंतर तिघे, म्हणजे त्या चौघांनाही तिने संपवले.". मी विचार करत बोललो.. " पण मग ती अजूनही तिथे का आहे? आणि आपल्या मागे का लागली होती? आपण तर रात्र भर पुलावर झोपलो होतो मग आपल्याला तिने का नाही मारले? तीने अजून काही सांगितले किंवा दाखवले का तुला?" डोके गच्च पकडत मी त्याला विचारले...

" होय... सुहास.... सुहास विषयी बोलली ती.. तो अजून एकदा ही त्या पुलावरून जाताना तिला दिसला नाही.. तिची आत्मा त्याच्या साठीच थांबली आहे... त्याला बरोबर घेऊन जायचे आहे तिला... त्याने सुस्कारा सोडत बोलणे थांबवले..

माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला..
"म्हणजे आता आपल्याला त्या सुहास ला शोधण्याचे काम तिने दिले आहे तर." मी म्हणालो..
" होय तसेच काहीसे असावे, पण त्यासाठी तर गुळे गावामध्ये जावे लागेल" अजय प्रचंड घाबरत बोलला...
मी त्याचा हात हातात घेतला आणि त्याला धीर देत बोललो" काळजी करू नको तुला यायची गरज नाही, तू तुझे काम केले आहे, आता पुढील गोष्टी मी करेन जाऊन.. तू आराम कर, सर्व ठीक होईल."
असे बोलत मी उठलो आणि त्याला आरामात झोपवून बाहेर आलो..
त्याच्या आईला नवनाथ पोथी वाचण्याचा सल्ला देणाऱ्या महानुभावांचा पत्ता विचारला..
पत्ता घेतल्यावर तडक त्यांच्या घरी गेलो..

क्रमशः....

कोण असतील ते महानुभाव?
काय होईल मी गुळेगावात गेल्यावर?
माझी आणि सुहासची भेट होईल का?
कसा मिळेल सुजाताच्या आत्म्याला मोक्ष?
या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागात मिळतील का?

लवकरच....
लेखक: रूद्रदमन

( टीप: सध्या ची न्याय प्रक्रिये मधील न्याय मिळताना होणारा विलंब बघता, अश्या घटनांमध्ये पिडीतेने स्वतः परत येऊन तिच्या वर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध घेण्याची तरतूद भगवंताने करायला हवी असे वाटते आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण वाचणे नाही जमले. वरवर वाचले तेवढ्याने पण
काटा आला अंगावर...

हा भाग वाचताना वाईट वाटलं.
पण अशा प्रकारच्या कथा, सिनेमा बघितले आहेत.

थाप आणि चकवा ह्या तुमच्या दोन्ही कथेत तुम्ही पुढच्या भागात काय लिहिणार ह्याची कल्पना येत होती, हे तुमच्या लेखनासाठी चागलं की वाईट हे मला सांगता येणार नाही. मला स्वतःला जर पुढे कथेत काय होणार ह्याचा अंदाज लावता आला नाही तर ती जास्त आवडते.