किरदुर्ग~ एक भयमालिका भाग २

Submitted by रुद्रदमन on 23 August, 2024 - 11:43

किरदुर्ग~ एक भयमालिका
भाग १
https://www.maayboli.com/node/83953
किरदुर्ग
भाग २
किर्र अंधाराला वेगाने कापत दोन प्रखर झोत पुढे जात असतात,त्यात यशवर्धन राजे बसलेला असतो , सफाईने रस्त्यावर तुरळक असलेले खड्डे चुकवत त्याचा प्रवास चालु होता.
जंगलातले वातावरण शांत होते, पण त्या शांततेत एक अनामिक भय दडलेले होते. यशवर्धन ची कार जंगलाच्या घनदाट पडद्या खाली पुढे पुढे जात होती. कारच्या हेडलाईट च्या पिवळट प्रकाशात दिसणाऱ्या रस्त्यावरून यशवर्धन चा प्रवास एका अज्ञात भयाच्या सावलीतून सरकत होता. झाडांच्या उंच शाखांमधून वाहणाऱ्या वाऱ्या ने निर्माण होणारा आवाज वातावरण अजून रहस्यमय करत होता.
यश चे लक्ष मॅपवर गेले, दाखविलेल्या वळणाच्या ठिकाणी त्याने गाडी थांबवली. बराच वेळ निरखून बघितल्यावर सुद्धा त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही. तो टॉर्च घेऊन बाहेर पडला. आजूबाजूला नीट पाहणी केल्यावर उजव्या बाजूला एक वेलीने झाकलेली मोडलेली पाटी त्याला आढळली. पसरलेला वेल बाजूला करताच त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. पाटीवर 'किरदूर्ग ७ किलोमीटर' लिहिलेले होते. दाखविलेल्या बाणाच्या दिशेने प्रकाश झोत मारून पाहिल्यावर त्याला वेलींच्या मागे फुटलेला डांबरी रस्ता दिसला. रस्त्यावर पसरलेली वेल बघताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की किरदुर्ग चा बऱ्याच दिवसांपासून बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला आहे. तो विचारच करत होता की त्याला आजूबाजूला झालेली भयाण शांतता जाणवली. जसे काही जंगल अचानक कसल्या तरी दहशती खाली चिडीचूप झाले होते. दूर कूठे तरी कोल्हेकुई सुरू होती. यशवर्धन घाई ने गाडी मध्ये बसला आणि त्याने गाडी गावाच्या दिशेने वळवली. रस्ता पूर्ण पने खराब होता.आजूबाजूची झाडी रस्त्यावर आक्रमण करत यशच्या गाडीला घासून थांबवण्याचा प्रयत्न करत होती. गाडीच्या पुढच्या दिव्यांची प्रकाशकिरने धुक्याच्या थरांतून फक्त काही फुटांपर्यंतच पोहोचत होती. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या झाडांच्या सावल्या, जणू काही काळोख्या सापांची फणी उभारून रस्ता कुरतडत होत्या. सुधाकरच्या पत्रातील प्रत्येक शब्द यशवर्धनच्या मनाला विळखा घालत होते. "गावात काहीतरी भयानक घडतय,लोक गायब होत आहेत. गावात दहशतीचं वातावरण आहे. तू लवकर ये." त्याच्या मनात हे शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते, जणू काही ते त्याच्या श्वासांमध्ये मिसळून यशवर्धनला घाई करायला सांगत होते.त्याला गावात काय वाढून ठेवले आहे याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली होती. त्याचे अनुभवी मन त्याला अगोदरच येणाऱ्या संकटाची सूचना देत होते.
थोड्याच वेळात यश जंगलामधून बाहेर पडला. आता मात्र गाडीच्या दिव्यांमध्ये पुन्हा प्राण आल्याप्रमाणे दूरवर प्रकाश झोत फेकू लागले. समोरच काही अंतरावर त्याला गावाची वेश दिसली. गावात प्रवेश करताच वेशीला लागूनच एक मोठा चौक होता.चौकात उभे असलेले एकमेव घर येणाऱ्या पाहुण्याची वाट पाहत होते.त्यातील मंद दिव्यांचा अंधुक प्रकाश चौकात पसरला होता.ते घर होते सुधाकरचे.
यशवर्धन ने गाडी घरा समोर उभी केली आणि खाली उतरला.वातावरणात हाडे गोठवणारा गारठा भरून आला होता. झाडांच्या फांद्यांच्या सावल्या आणि सर्वत्र निरव शांतता एक अबोल पोकळी निर्माण करत होती.जसे काही ती पोकळी यशवर्धन ला खोल गर्तेत घेऊन जाण्यासाठी आसुसलेली आहे.. यशवर्धन ने लॉकीट ला हात लावला, मन थोडे शांत केले आणि गुरूचे नामस्मरण करत गाडीतून बॅग घेऊन सुधाकरच्या घराचे दार ठोठावले, मधून काहीच प्रतिसाद आला नाही.त्याने हळूच दरवाजा ला धक्का दिला, दरवाजा उघडाच होता. यश ने थरथरत्या हाताने दरवाजा हलकेच उघडला. आत मध्ये पडलेल्या अंधुक प्रकाशात तो सावधगिरीने पुढे सरसावला. त्याच्याच पावलांचा आवाज आता त्याला असह्य वाटत होता. आत पाऊल टाकल्याबरोबर, त्याचे श्वास अचानक थांबले. समोरच्या भिंतीवर रक्ताचे आणि मांसाचे ठिपके पसरलेले होते, कोणीतरी भिंतीवर नखे ओरबाडल्या सारखे वाटत होते. ठीक ठिकाणी रक्त सांडलेले दिसत होते. त्याच्या हृदयातील धडधड क्षणा क्षणाला वाढत होती. काही क्षण त्याची नजर भिंतीवर खिळून राहिली. वातावरणात तीव्र शांतता होती, पण त्या शांततेच्या आत एक भयंकर सत्य दडलेले होते. घरातील सगळीकडे विखुरलेले सामान तिथे झालेल्या झटापटी ची ग्वाही देत होते. त्या खोलीत एक घनघोर स्तब्धता पसरलेली होती.जसे काही तिथे थोड्या वेळा पूर्वी एक मोठे वादळ येऊन गेले असावे. कोपऱ्यात असलेल्या सावली कडे यशवर्धन चे लक्ष गेले. ती एक पुतळ्याची सावली होती,पण जसजसे यशवर्धन जवळ जात होता त्याला तिथे हालचाल दिसू लागली. तो पुतळा नव्हता, सुधाकर होता! त्याच्या चेहऱ्यावर मृत्यूसारखी पांढरट छाया होती, डोळ्यात प्रचंड भीती होती. सुधाकर च्या डाव्या खांद्यावर एक खोल जखम झालेली होती.जखमेच्या ठिकाणी फाटलेल्या त्वचेतून मांस बाहेर पडलेले दिसत होते. त्यातून हाडाचा एक भाग चमकत होता. जखमेतून निघणारी रक्ताची धार गोठलेली होती. मित्राची ही अवस्था बघून यशवर्धन मनोमन कळवळला. सुधाकर च्या चेहऱ्याने यशवर्धन च्या मनाचा ठाव घेतला.एका क्षणासाठी त्याच्या मनात भीतीचे वादळ उठले.सुधाकर च्या डोक्यावर हात फिरवताना त्याच्या हातात थरथर जाणवत होती. सुधाकर ने यशवर्धन ला ओळखले. त्याचा आधार घेत खाली बसत थरथरत्या आवाजात सुधाकर बोलला "त्यांनी मला सांगितलं होतं...कोणाला बोलावू नको, पण मी त्यांचे ऐकले नाही..." तो बोलत असताना, त्याच्या आवाजातल्या भीतीचा प्रत्यय यशवर्धन ला येत होता. "हे त्यांना कळले आहे...आणि आता..." सुधाकर चा आवाज हळूहळू कमजोर होत होता ,जणू शब्द त्याच्या ओठा मधे गोठत होते. काही क्षण अंगातील शक्ती गोळा करून त्याने परत बोलण्यास सुरुवात केली, "त्यातलाच एक आला होता. मला ओढत नेण्याचा प्रयत्न करत होता.पण दुरून येणाऱ्या तुझ्या गाडीची त्याला अचानक चाहूल लागली असे मला वाटते. तो गाडीचा येणारा आवाज ऐकून क्षणार्धात गायब झाला. जाताना कानात एकच कुजबुज ऐकू आली. मी पुन्हा येईल, तुला न ऐकण्याची शिक्षा होणारच आणि तुझ्या त्या मित्राला पण.."
आताशा यशवर्धन च्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सुधाकर ने त्याचा हात धरून त्याला खाली बसवले. क्षणभर शांतता होती, जणू त्या शांततेत काहीतरी भयानक घडण्याची चाहूल होती. यशवर्धन ला सुधाकर च्या मनातील भीती जाणवत होती. मग अचानक, सुधाकर हळू आवाजात बोलू लागला, "रात्र संपली की ते गावभर पसरतात..." यशवर्धन सुधाकर च्या शब्दा मधील भीतीचा अंदाज घेत मन लाऊन ऐकत होता. "रोज सकाळी कोणी तरी व्यक्ती गायब झाल्याची बातमी कळते... नक्की काय आहे, कुठून आले आहे, कधी पर्यंत हे असेच चालू राहणार आहे... काहीच कळत नाही." सुधाकर च्या बोलण्यात प्रचंड भीती होती, असे वाटत होते त्याला अजून बरेच काही सांगायचे आहे पण बोलण्याचे त्राण त्याच्या मध्ये राहिले नव्हते.
यशवर्धन ने त्याला धीर दिला आणि सर्व काही ठीक होईल याची ग्वाही दिली. सुधाकर यशवर्धन च्या आधाराने कसा बसा उठला आणि दोघे जण सुधाकर च्या झोपण्याच्या खोली कडे निघाले. तितक्यात बाहेरून काहीतरी घर्षणाचा आणि ओझं ओढल्याचा आवाज येऊ लागला. रात्रीच्या कृत्रिम शांतते मध्ये आवाज खूपच भयावह वाटत होता. तो आवाज ऐकून यशवर्धन च्याही शरीराचा थरकाप उडाला. यशवर्धन ने हळूच खिडकीतून बाहेर डोकावले. चंद्राच्या धूसर प्रकाशात त्याच्या नजरेला काहीतरी विचित्र दिसले,गावाच्या वेशी जवळ एक अस्पष्ट आकृती काहीतरी ओढत हळूहळू जंगलाच्या दिशेने चालली होती. काही क्षण यशवर्धन तिथेच स्तब्ध होऊन पाहत राहिला, त्याचे हृदय वेगाने धडकत होते. मग अचानक तो भानावर आला आणि त्याने धावतच बाहेरची वाट धरली. रस्त्यावर येताच, त्याने वेशीच्या कमानी कडे प्रकाश झोत टाकला...पण तिथे...काहीही नव्हते. यशवर्धन ने गडबडीत पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिले, त्याच्या डोळ्यांनी त्याला फसवले होते की काय अशी शंका त्याला वाटली. आपण बघितलेले भ्रम आहे की सत्य ही शंका काढण्या साठी यशवर्धन ने पुढे जाऊन खात्री करण्याचा निर्णय घेतला. वेशीच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील काही तरी ओढत नेण्याच्या खुणा बघून त्याची खात्री पटली की जे काही पाहिले तो त्याचा भ्रम नव्हता. तो धावतच घरात परत आला. सुधाकर गलितगात्र अवस्थेत त्याचीच वाट बघत होता. तो पुढे काही बोलणार तोच यशवर्धन ने त्याला आता काही नको उद्या बोलू असे सुचविले. सुधाकर च्या डोळ्यांतून प्रचंड भय जाणवत होते. यशवर्धन ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याच्या आवाजात शक्य तितकी शांतता आणत तो म्हणाला, "सर्व काही ठीक होईल, मी तुझ्यासोबत आहे." काही क्षणासाठी, सुधाकर ने त्याच्यावर नजर रोखली. त्याच्या नजरेत एक विचित्र मिश्रण होते, विश्वास आणि असीम भीतीचे. यशवर्धन ने पुन्हा त्याला आधार दिला, "चल, चल, आता झोपण्यासाठी जाऊ." सुधाकर कसा बसा उठला, त्याचे पाय थरथरत होते, जणू काही एका क्षणातच तो कोसळेल. दोघे जण झोपण्याच्या खोलीकडे निघाले, पण प्रत्येक पावलात, यशवर्धन च्या मनात एक विचित्र अस्वस्थता वाढत होती, जसे काही त्या शांततेत दडलेले ते सावट त्याला आव्हान देत होते. खोलीत गेल्यावर सुधाकर च्या जखमांना औषध लावत त्याने त्याला झोपण्यास सांगितले.
तो पण सुधाकर ने दाखविलेल्या खाटे वर येऊन पडला. आता पर्यंत झालेल्या सर्व घटनांचा तो विचार करत होता. त्याच्या गुरू कडून त्याला मिळालेली विद्या त्याला आता कामास येणार होती. कितीही कठोर परिस्थिती मध्ये शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या मध्ये होती. रात्र पुढे सरकत होती, आणि त्या अंधाराच्या जाळ्यातून एक नवे जग यशवर्धन च्या समोर उघडत होते. एक अस्थिर, भयावह, अज्ञात जग. यशवर्धन ला आता समजलं की त्याला सुधाकर च्या मदतीने या दहशती विरुध्द एकट्याने लढा द्यायचा आहे. दिवसभर च्या प्रवासाने आणि गावात आल्या आल्या अचानक झालेल्या धावपळी ने त्याला काही वेळेतच झोप लागली.

किरदूर्ग गाव कित्येक दिवसांपासून या संकटाचा सामना करत होते. गावात अदृश्य शक्ती आणि भयंकर सावटाने अक्षरशः नंगा नाच चालवला होता. शांत, संपन्न गावाची कहाणी आता एका भयावह अध्यायात बदलत होती.
रात्र तशीच गडद, भयाण आणि गूढ होती. यशवर्धनला झोप लागली असली तरी त्याच्या मनात विचारांची गर्दी चालू होती.
या सर्व संकटापासून गावाची सुटका नक्की कशी करायची याची यशवर्धनला कल्पना नव्हती. पण एक गोष्ट त्याला आता स्पष्ट होती, त्याच्या पुढचा मार्ग तो टाळू शकत नव्हता, त्याला या अंधाराच्या गर्तेत उतरून जायचे होते, या भयानक संकटाचा सामना करायचा होता. त्याला विश्वास होता की पुढच्या अटीतटीच्या लढाई मध्ये त्याच्या गुरूंची ताकत सुद्धा त्याच्या मागे उभी राहील.
गावाच्या बाहेर जंगलाच्या त्या घनदाट सावलीत काहीतरी जागृत झाले होते, आणि ते त्याच्याच वाटेकडे लक्ष ठेऊन होते. किरदुर्ग ची खूप रहस्य अजून यशवर्धन समोर उकलायची होती...
क्रमशः

पुढे काय होईल?
यशवर्धन या अज्ञात शक्तीशी कसा लढेल?
ही अज्ञात शक्ती कोण आहे आणि कुठून आली आहे?
किरदुर्ग गावाची या संकटातून सुटका होईल का?

लेखक: रुद्रदमन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@manya दादा इथून पुढे regularly कथा येत जातील..
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.. अजून एक कथा पोस्ट केलेली आहे.. तिच्यावर ही एक नजर टाका...