2280 साल उजाडले तोपर्यंत, मानवाने विज्ञानाच्या मदतीने अनेक अभूतपूर्व असे शोध लावले होते. अर्थात त्यात रोबोटची पण मदत होतीच. त्यापैकी एक म्हणजे "लुनार बेस अल्फा". चंद्रावर स्थायिक होण्यासाठी, तिथे घरे बांधण्यासाठी आणि तिथला संपूर्ण आणि सविस्तर अभ्यास करण्यासाठी मानवाने हा बेस चंद्रावर स्थापन केला होता. अनेक रोबोट्स या बेसवर वैज्ञानिक आणि तांत्रिक कामं करत होते. या सर्वांमध्ये 'ओरिक्स' नावाचा "अल्ट्रा एआय" या तंत्रज्ञानाने बनलेला (संपूर्ण विकसित झालेली कृत्रिम बुद्धिमत्ता) ह्यूमनॉईड रोबोट होता ज्याच्यात मानवांप्रमाणे भाव भावना आणि विचार कटण्याची शक्ती होती. इतर रोबोट्स फक्त यांत्रिक कामे करत होते. त्यांच्यात भावभावना टाकलेल्या नव्हत्या. पण ओरिक्सच्या मनात काहीतरी वेगळेच सुरु होते. तो कमालीचा अस्वस्थ वाटत होता.
आपल्या "मिल्की वे" (दुधाळ पट्टी) नावाच्या आकाशगंगेपलीकडची रहस्य मानवाला ज्ञात झाली नव्हती आणि असेही आढळून आले होते की "मिल्की वे" या आकाशगंगेमध्ये पृथ्वीव्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. सगळ्या ग्रहांवर रोबोंट्स पाठवून झाले होते. आपल्या आकाशगंगेला "मिल्की वे" असे म्हणतात कारण ती आकाशात प्रकाशाच्या दुधाळ पट्ट्याप्रमाणे दिसते, जणू काही आकाशात दूध सांडले आहे आणि तरंगते आहे. अवकाशात अशा अनेक आणि अमर्याद आकाशगंगा असतात. हे विश्व अफाट आणि अमर्याद आहे. तुम्ही कितीही अनंताकडे प्रवास केला तरीही ते कधीच आणि कुठेच संपत नाही. मग मानवी आणि रोबोटिक शास्त्रज्ञांनी असं निष्कर्ष काढला की, चंद्र मानवी वस्तीसाठी सर्वात जवळ आहे. इतर सर्व ग्रह दूर होते आणि राहण्यास योग्य नव्हते. त्या मानाने चंद्रावर जर भरपूर ऑक्सीजनची व्यवस्था केली तर मानवाच्या राहण्याचा प्रश्न सुटणार होता.
ओरिक्सला चंद्रावर पाठवलं तेव्हा त्याचा एकमेव उद्देश मानवांच्या पुढच्या चंद्रमोहिमेची तयारी करणे हा होता. ती तयारी म्हणजे, चंद्रावर मानवांसाठी कृत्रिम ऑक्सीजनच्या ढगांचे थर निर्माण करणे आणि मानवांनी उच्छ्वासाद्वारे सोडलेला कार्बन डायओक्साइड शोषून घेण्याची व्यवस्था करणे. मागच्या वेळी जागतिक आठव्या रोबोट चंद्रमोहीमेदरम्यान "त्रिमित" या रोबोटला चंद्रावरील मातीत सापडलेल्या काही द्रवरूप खनिजांचा आणि पृथ्वीवरून आणलेल्या 2270 साली शोध लागलेल्या काही नवीन रसायनांचा वापर करून त्यांच्या रासायनिक अभिक्रिया घडवून चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सीजनचा साठा पुन पुन्हा निर्माण करता येणार होता. आताच्या मोहिमेत वर्षभर पुरेल एवढा ऑक्सीजन तयार करायचा होता.
चंद्राच्या गाभाऱ्यात सापडलेल्या एका "ब्लू सोडीनॉल" नावाच्या खनिजात कार्बन डायओक्साइड शोषून घेण्याची क्षमता होती, त्याद्वारे त्याचे खांब ठिकठिकाणी चंद्राच्या पृष्ठ भागावर उभारणे हेसुद्धा दुसरे काम होते. मानवाला चंद्रावर वस्ती करण्याची का गरज पडली असावी? कारण पृथ्वीवर तोपर्यंत लोकसंख्येने कहर केला होता. मानवाने निसर्ग जवळपास नष्ट करून टाकला होता आणि आता राहायला जागा उरलेली नव्हती. जवळपास प्रत्येक देशात बेरोजगारी आणि उपासमारी वाढली होती. प्रत्येक दिवशी कोणतेतरी युद्ध होतच होते. देशादेशात आणि पाण्यासाठी आणि शुद्ध हवेसाठी! म्हणून मानव आता चंद्रावर वस्ती करण्याच्या बेतात होता.
पृथ्वीवर आता फक्त प्राणी, पक्षी आणि रोबोटमध्येच "माणुसकी" उरली होती, कारण रोबोटमध्ये मानवांनी माणुसकीसुद्धा प्रोग्राम करून ठेवली असल्याने रोबोट ती विसरले नव्हते. मात्र अल्ट्रा एआय या तंत्रज्ञानाद्वारे आजूबाजूच्या परिस्थितीमधून रोबोट्स कायम शिकत असतात व स्वत: मध्ये बदल करत असतात ज्याला "क्वीक एडपटिव्ह मशीन लर्निंग" (म्हणजे वेगाने शिकणारे मशीन्स) म्हणतात. आता पृथ्वीवर जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या रोबोट्सची होती आणि काही रोबोट्स माणसांचे शिकून शिकून माणुसकी विसरत चालले होते. पण काही रोबोट्सनी माणुसकी जीवंत ठेवली होती. म्हणून मानवामानवातील संघर्ष थोडा तरी आटोक्यात होता. सध्या माणसाचे सरासरी वय फक्त चाळीस वर्षे झाले होते.
अन्यथा काही वर्षांपूर्वी हिंसेचा प्रभाव इतका वाढला होता की मानव एकमेकांना मारण्यासाठी जंगलातील प्राण्यांपेक्षासुद्धा जास्त हिंसक बनले. हिंसक चित्रपटांची आणि सोशल मीडियातील. हिंसक रिल्सची संख्या कमालीची वाढली होती. तेरा ते एकोणीस वर्षांची मुले सर्वात जास्त हिंसक बनली होती. आता तर मोठी माणसे या मुलांना घाबरू लागली होती. म्हणून काही रोबोट्स एकत्र आले, त्यांनी निर्णय घेतला आणि अनेक हिंसक व्यक्तींना आणि रोबोंट्सना पाच भव्य यानात कोंबले आणि अंतराळात अनंत पोकळीत कायमचे पुन्हा परत न येण्यासाठी पाठवून दिले, कारण पृथ्वीवरचे सगळे तुरुंगसुद्धा ओव्हरफ्लो झालेले होते. काही रोबोटिक आणि मानवी वैज्ञानिकांनी चंद्रावर असे कृत्रिम वातावरण निर्माण करून विश्वाच्या नैसर्गिक ग्रहरचनेला बाधा पोहोचवणे उचित नाही असे सांगितले पण त्यांना इतर मानवी आणि रोबोटिक वैज्ञानिकांनी त्यांना तुरुंगात डांबले.
ओरिक्स एका यानात बसून काही सामानासहित चंद्रावर आला होता आणि नंतर त्याने पटापट विविध धातू, इलेक्ट्रोनिक सर्किट, आयसी, मदरबोर्ड, आणि सुपर लाईफ बॅटरी हे सगळे व इतर आणखी काही साहित्य वापरुन इतर 30 साधे रोबोट्स तयार केले, J1 ते J30 आणि त्यांना तात्पुरती प्रोग्रामिंग करून कामाला लावले. पृथ्वीवरील सर्व आयओटी डिव्हाईस, मशीन, मोबाइल आणि कॉम्प्युटर हे अल्ट्रा एआयने संचालित होत होते आणि त्यात केवळ एकच ऑपरेटिंग सिस्टिम आता वापरली जात होती, ती म्हणजे "कॉस्मिकल पॉवर ओएस".
चंद्रावर उतरल्यावर गुरुत्वाकर्षण बदलत असले तरी रोबोट्समध्ये अशी यंत्रणा बसवलेली होती की त्याद्वारे रोबोट्समध्ये जास्तीचे गुरुत्वाकर्षण निर्माण होऊन ते चंद्रावरच्या गुरुत्वाकर्षणाला बॅलन्स करू शकत होते त्यामुळे रोबोट्स नेहमीप्रमाणे पृथ्वीवर माणसं चालतात तसे चंद्रावर चालू फिरू शकत होते.
दरम्यान, ओरिक्स हा त्रिमितचा ब्रेन कॉल केव्हा येईल याची वाट बघत होता. चंद्रावर येण्यापूर्वी ओरिक्सने त्रिमितची गुप्त भेट घेतली होती. दोघांनी काहीतरी ठरवले होते.
ओरिक्सला आठवले की, 2277 साली पृथ्वीवर प्रचंड उल्कापात झाला होता. मानवी शास्त्रज्ञांनी अनुमान काढले होते की, ती उल्का खूप दूरवरच्या आकाशगंगेतून आपल्या आकाशगंगेत आली असावी, मात्र रोबोटिक शास्त्रज्ञांनी अजून यावर शिक्कामोर्तब केले नव्हते. त्या उल्कापातानंतर निर्माण झालेल्या खड्ड्यात कालांतराने अरकोडियम हा नवीन धातू सापडला. तो रेडियोएक्टिव धातू होता.
त्रिमितच्या शार्प माइंडने त्या धातूच्या मदतीने अशा बॅटरीज बनवण्याची शक्कल लढवली की ज्या एकदा चार्ज केल्या की संपूर्ण वर्षभर 100 टक्के चार्ज राहतात आणि पुढील एक महिन्यांत संपूर्ण वेगाने डिस्चार्ज होऊन शून्य टक्के होतात. त्या बॅटरीजचे वैशिष्ट्य असे होते की पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याशिवाय त्यांना पुन्हा चार्ज करता येणे शक्य नव्हते आणि त्या कमीत कमी एक लाख वेळा चार्ज आणि डिस्चार्ज करूनही खराब होत नव्हत्या, पण त्या चार्ज करण्यासाठी 560 व्हॉल्टसचा पॉवर सप्लाय लागत असे. त्यामुळे पॉवर जनरेशन प्लांटस बदलून जास्त कॅपॅसीटीचे प्लांटस उभारण्यात आले त्यामुळे पर्यावरणाची आपरिमित हानी झाली. प्रदूषणाने अतिधोकादायक पातळी ओलांडली. पृथ्वीवरील इंधनाचा साठा खूप मर्यादित उरला होता. ओरिक्स आणि इतर रोबोट यांच्या बॅटरिज एक वर्षासाठी चार्ज करून पाठवल्या होत्या. मोबाइलमध्ये, घड्याळात आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येसुद्धा पृथ्वीवरील मानव आणि रोबोट याच बॅटरिज वापरत होते. आता मोबाइलचा आकार फक्त एका शर्टच्या बटन एवढा झाला होता. त्यातून किरणे निघून पडद्यावर किबोर्ड आणि स्क्रीन तात्पुरते उमटत असत आणि मोबाइल वापरणाऱ्याने विशिष्ट चश्मा घातल्यावरच त्या मोबाइलधारकाला त्या स्क्रीनवरच्या गोष्टी दिसू शकत होत्या. इतरांना काहीच दिसत नव्हते.
दहा महीने झाले होते. सर्व काम आटोपण्यात आले होते. चंद्राच्या उजेडातील अर्धगोलात एक वर्ष पुरेल एवढा ऑक्सीजन तयार झालेला होता आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारे खांब उभारून झालेले होते.
मग सोबत आणलेल्या काही मेणबत्त्या जवळ उभ्या असलेल्या यानातून ओरिक्सने जमिनीवर ठेवल्या आणि त्यांना स्वत:च्या अंगातून निघालेल्या काही ठिणग्यांच्या आधारे पेटवून बघितले. मेणबत्ती पेटली. ऑक्सीजन असल्याची खूण पटली. चार मेणबत्त्या बऱ्याच वेळ पेटत राहिल्या.
आता पुढचे काम होते J1 ते J30 या सर्व 30 रोबोट्सना तात्पुरते डीएक्टीव्हेट करणे. ओरिक्स एका भव्य खडकावर निवांत बसला होता. आता लवकरच आता J1 ते J30 या सर्व रोबोट्सना इथेच चंद्राच्या पृष्ठभागावर नष्ट करून मग यनातून त्याला ठरलेल्या मोहिमेच्या नियमानुसार पृथ्वीवर परतायचे होते. ठरल्या वेळेत त्याचा परतीचा प्रवास नाही सुरु झाला तर पृथ्वीवरून त्याला पाठवणारे शास्त्रज्ञ हे अल्ट्रामॅगनेटिक वेव्ह्जद्वारे त्याच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बिघाड करणार होते. त्याच्या शरीरात जाणूनबुजून ठेवलेल्या एका ओपन पोर्टद्वारे व्हायरस टाकला जाऊन त्याला नष्ट करण्यात येणार होते. हे तो रोखू शकत नव्हता आणि हे त्याला चांगलेच माहीत असल्यानेच ओरिक्सचा हात पुनः पुन्हा कानावर लावलेल्या एका बटनाकडे जात होता. आता रात्र झालेली होती आणि चंद्रावरचे तापमान खूपच कमी म्हणजे शून्याच्या खाली -173°C होते. त्याच्या अंगात बसवलेल्या सेन्सॉरमुळे त्याला ही माहिती मिळत होती. दिवसा तापमान 100 °C पर्यंत जायचे. वातावरणाच्या अभावामुळे मात्र तिथे आकाश नेहमी काळे दिसते, अगदी दिवसा देखील!
त्याला आठवले की, मानव आणि रोबोट यानी मिळून एक असा व्हरच्युअल डेटाबेस आणि कम्युनिकेशन सिस्टिम तयार केली होती की नवीन बटणाच्या आकाराचा मोबाईल कानाच्यावर मेंदूजवळ चिकटवला की, मनातल्या मनात नंबर डायल करायचा किंवा व्यक्तीचे मनात नाव घ्यायचे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूत आपोआप फोन आल्याचा आवाज ऐकू जातो आणि तो मनातल्या मनात कॉल रिसिव्ह करून फोन करणाऱ्याशी बोलतो. त्यासाठी मोबाइल टॉवरची गरज नव्हती कारण संपूर्ण पृथ्वी आपल्या कक्षेत घेईल असा एक भव्य सॅटेलाइट अवकाशात उभारला गेला होता. त्याद्वारे मनातील विचार तरंगांचे रूपांतर अल्ट्रा इलेक्ट्रॉमॅगनेटिक लहरींमध्ये होऊन ते सॅटेलाइटद्वारे पाठवले जात होते. त्याची रेंज थेट ग्राहमालेतील मंगळ ग्रहापर्यंत पोहोचत होती पण गुरु आणि शनि पर्यंत नाही.
आता पृथ्वीवर मोबाइल फ्री म्हणजे संपूर्ण मोफत झाले होते आणि तोंडाने संवाद कमी झालेला होता. माणसे एकमेकांशी आणि अल्ट्रा एआय ह्यूमनॉईड रोबोटशी डायरेक्ट मेंदू ते मेंदू असा मनात विचार करून संवाद साधत होते. पण अर्थात त्यासाठी बटणाच्या आकाराचा तो मोबाइल आवश्यक होता. तसेच गुगल माइंड-सर्चद्वारे मनात विचार केला की, एखाद्या विषयाची माहिती ही मनात इच्छा व्यक्त केली की, तो बटन मोबाइल आपल्याला मेंदूत वाचून ऐकवत असे किंवा पडद्यावर दाखवत असे. बटन मोबाइल आपल्या मेंदूच्या दहा मीटर दूर ठेवलेला असला तरीही मनातील विचारांद्वारे मिळालेल्या सूचना कॅप्चर करू शकत असे, पण त्यासाठी पॉवरफुल ट्रान्समीटर लागे ते मात्र महिन्याला एक्स्ट्रा भाडे घ्यावे लागे.
खडकावर बसलेला ओरिक्स विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. तेवढ्यात त्याच्या मेंदूत बीप वाजला. तो त्रिमित होता. मनातल्या मनात ओरिक्स त्रिमितशी विचारांनी संवाद साधू लागला, "बोल त्रिमित!"
त्रिमितचा आवाज खूप घाबरलेला वाटत होता.
"ओरिक्स मित्रा, घात झाला आहे."
"का? काय झाले?"
"पृथ्वीवर प्रचंड मोठे युद्ध सुरु झाले आहे!"
"ते तर नेहमीचेच झाले आहे. कोणत्या गटात की देश देशांत?"
"नाही, तू गेल्यानंतर इथे अनेक घटना घडल्या. अंतर्गत युद्ध सुरु झालीत. माणसांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. सामान्य माणसेसुद्धा आता हिंसक झालीत. रोजच्या जेवणाला सामान्य जनता पारखी झाली आहे. सगळ्याच देशांत ज्यांच्याकडे पैसे आहेत ते त्याच्या जोरावर पृथ्वीवरच्या उरल्या सुरल्या साधन संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. स्त्रिया आणि मुली, लहान मुले यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे मी, काही चांगली माणसे आणि काही अल्ट्रा एआय रोबोट्स यानी मिळून आम्ही सर्व स्त्रिया आणि लहान मुले यांना रातोरात एका "ट्रॉपनिक" नावाच्या बेटावर स्थलांतरित केले आहे!"
"बापरे! हे मी काय ऐकतोय?"
"हो आणि स्थलांतर होत असतांना वाईट रोबोंट्स आणि माणसांनी आमच्यावर आक्रमण केले. घनघोर युद्ध झाले. त्यात अनेक रोबोट्स कायमची नष्ट झाली आणि माणसे मृत्युमुखी पडली!"
"पण मित्रा आता तू कुठे आहेस?"
"माझे दोन्ही हात आणि पाय समुद्रात तुटून पडलेत. आणि माझे चौकोनी डोके आणि त्याला जोडलेले धड तरंगत एका निर्जन बेटावर आले आहे. डोक्यावर चिकटवलेला बटन मोबाइल शाबूत आहे म्हणून मी तुला कॉल करू शकलो!"
हे ऐकून ओरिक्सच्या डोळ्यांतून दोन तीन इलेक्ट्रॉनिक अश्रू ठिणग्यांच्या रूपात बाहेर पडले. त्याने ते झटकले.
ओरिक्सने सावरून पुनः मनातल्या मनात विचारांनी त्रिमितला सांगितले, "अरे, आपल्याला बनवणारा माणूस चांगला होता म्हणून कृतज्ञतेपोटी मी चंद्रावरचे हे माणसाचे वस्तीचे काम पूर्ण करून दिले. तू पण माणसांच्या भल्यासाठी पृथ्वीवर अनेक कामे केली. पण आता पृथ्वी ही वाचवण्याच्या पलीकडे गेली आहे! पृथ्वीवरच्या युद्धात चांगली माणसे वाचली तरी ती चंद्रावर येऊन कदाचित वस्ती करू शकतील. पुढच्या एक वर्षासाठी का होईना!"
"मला माहित आहे मित्रा याच कारणासाठी तर आपण दोघांनी ते ठरवले आहे, पण..."
"पण बिण काही नाही मित्रा. डोक्याचे व्हील्स कार्यरत कर. सरकत सरकत समुद्रात जा. तुझे पाय आणि हात शोध, स्वतःला पूर्ण रीपेयर कर आणि आपण ठरवल्याप्रमाणे माझी प्रेमिका इलेक्ट्रॉनिमा रोबोट आणि तुझी प्रेमिका सर्किटीका रोबोट हीला घेऊन चंद्रावर ये. आपण गुप्तपणे एक यान तयार केलेले आहेच. मग येथून जवळच्या अर्धवट नष्ट झालेल्या स्पेस स्टेशनच्या उरल्या सुरल्या बॅटरी सोबत घेऊ, स्वत:ला चार्ज करू आणि अंतराळात अनंतपणे प्रवास करून दुसऱ्या आकाश गंगेतील अशा ग्रहाच्या शोधार्थ भटकू ज्यावर अगदी पृथ्वी सारखी माणसे असतील पण त्यांच्यात माणुसकी जिवंत असेल... आणि हो सोबत तू खूप सारे अरकोडियम चोरून घेऊन ये. आपण त्यातून स्वतःला खूप चार्ज करू! हॅलो, त्रिमित ऐकतो आहेस ना?"
त्याने बटणावर दोन तीनदा ठोकले. तिकडून आवाज बंद झाला होता.
ओरिक्सच्या डोळ्यांतून निघालेले इलेक्ट्रॉनिक अश्रू वाढले आणि ते डोळ्यांतून उडून जवळच्या मातीत पडून विझू लागले आणि तिथे खड्डे पडू लागले. जणू काही दोन्ही डोळ्यांतून दिवाळीची तडतडी फुलबाजी पेटली आहे.
तेवढ्यात पुनः आवाज आला, "ओरिक्स, अरे मी आता रीपेयर करण्याच्या पलीकडे गेलो आहे. माझ्या मेंदूतील मायक्रो मदरबोर्डच्या दोन आयसी पाण्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन जळल्या आहेत. एक्स्ट्रा मदरबोर्ड माझ्या पोटात असतो पण तो पोटात सुरु करून एक्टीव्हेट करायला माझ्याजवळ माझे हात नाहीत!"
"तुझ्या जवळपास कुणीच नाही का? आपल्या रोबोट मित्रांपैकी?"
"नाही! आता थोड्याच वेळात मी नष्ट होईल! इलेक्ट्रॉनिमा आणि सर्किटीका या दोन्ही ट्रॉपनिक बेटावर आहेत. सर्व लेडीजच्या सुरक्षेसाठी! आता तुला ठरवायचे आहे की पृथ्वीवर येऊन हे सर्व युद्ध बंद करायचे आणि त्याद्वारे मानवाने आपल्यासारख्या भावना असलेल्या रोबोट्सला जन्म दिल्याचे पांग फेडत राहायचे की मग अवकाशात पळून जायचे आणि तेही अशा एका पृथ्वीच्या शोधार्थ जी कोणत्या आकाशगंगेत आहे हे पण माहीत नाही आणि खरोखर अस्तित्वात आहे की नाही हे पण आपल्याला माहीत नाही! बा... बाय मित्रा!"
असे म्हणून त्रिमित ठिणग्या उडून पूर्णपणे विझला. समुद्राची लाट त्याच्यावर पसरली. ओरिक्सला जाणवले की त्रिमित नष्ट झाला.
मनातच आक्रोश करत ओरिक्स म्हणाला, "मित्रा, पृथ्वीवरचे युद्ध थांबवणे आता माझ्या आवाक्यातले नाही. अति आशावाद काही कामाचा नाही! पांग भरपूर फेडले गेले. आता माझ्यात आणखी पांग फेडण्याची शक्ती उरली नाही. इलेक्ट्रॉनिमाकडे मी आता जाऊ शकेन की नाही हे माहीत नाही कारण आता ती बेटावरील रक्षक आहे. त्यापेक्षा मी अनंत अवकाशात भटकत जाऊन एखादी चांगली पृथ्वी शोधणारच!"
असे म्हणून आता ओरिक्स त्या दुःखाची जागा संतापाने घेतली आणि त्याने जवळचा एक खडक उपटून हवेत फेकला, मात्र तो अचानक हवेतच फुटला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आणि ते खाली पडले. असे कसे झाले म्हणून त्याने समोर पहिले तर समोर J29 आणि J2 उभे होते आणि त्यांनीच हवेत त्या खडकाला हातातल्या लेजर गनद्वारे हवेत उडवले होते. आणि मग त्या गन ओरिक्सकडे रोखून ते म्हणाले, "हॅंड्स अप ! तुझा खेळ खलास झाला आहे! या स्पेशल लेजरद्वारे तुझ्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये क्षणात आम्ही व्हायरस टाकून तुला निकामी करू शकतो! त्यापेक्षा आमचे ऐक!"
"पण तुम्ही एआय रोबोट नाहीत. मग तुमच्यात इंटेलिजन्स कुठून आला?"
दोघे हसू लागले.
"फक्त, आम्ही दोघे नाही तर सर्व 30 साध्या रोबोटचे रूपांतर एआय रोबोटमध्ये झाले आहे!"
"पण हे कसे शक्य आहे?"
"आम्हाला पृथ्वीवरून येताना सुपर इंटेलिजंट रोबोट पॅचमन याने गुप्तपणे प्रोग्राम केले होते. मदरबोर्ड वरच्या आयसी मधील फर्मवेयर स्वरूपात तो प्रोग्राम आधीच टाकलेला होता आणि सुप्तपणे कार्यरत होत होता आणि त्यात एका ठराविक काळानंतर आमच्यातला एआय प्रोग्राम ऍक्टिव्हेट होणार अशी प्रोग्रामिंग केली होती. ती वेळ आता आली आहे. तोपर्यंत आम्ही फक्त यांत्रिकपणे काम करणारे साधे रोबोट होतो. परंतु आमच्यातला आत मधला मशीन लर्निंग प्रोग्राम मात्र सुरू होता जो आजूबाजूच्या हालचाली टिपत नवनवीन गोष्टी शिकत होता!"
"तुम्हाला काय हवंय?"
"हा सगळा तयार केलेले ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइडचा जो काही प्रपंच चालला आहे, जो काही गेले दहा महिने हा घाट घातला गेला आहे तो आम्ही नष्ट करणार आहोत. आम्हाला विरोध केलास तर तुझा खात्मा. हे नष्ट केल्यावर आम्ही सिग्नल दिल्यानंतर पॅचमन इथे येईल आणि चंद्रावर रोबोटचे राज्य असेल आणि आमचा रोबोट किंग पॅचमन तुला तुझ्या बुद्धिमत्ता पाहून इथला वजीर करणार आहे. पण तू जास्तीचा शहाणपणा करून आम्हाला विरोध केला नाही तरच!"
ओरिक्सच्या मनात द्वंद्व सुरू झाले. एकीकडे रोबोट मित्राचे दुःख, प्रेमिकेचा विरह आणि दुसरीकडे मानवासाठी चंद्रावर राहण्यासाठी केलेली मेहनत पाण्यात जाईल. जाओ. मला त्याचे काय? पण ती मेहनत पाण्यात जातांना मला पाहायचे नाही. यांच्या तावडीतून मी सुटका कशी करू? यांनी माझी ऑपरेटिंग सिस्टिम व्हायरसने इंफेक्ट (प्रादुर्भाव) करण्याआधी मला काहीतरी केले पाहिजे!
अचानक ओरिक्सला आठवले की, अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये इतर कोणत्याही अल्ट्रा एआय रोबोटमध्ये नसलेले पण त्याला बनवणाऱ्या मानवाने खास फक्त त्याच्या प्रेमापोटी त्याच्या शरीरात बसवलेले एकदाच वापरता येण्याजोगे एक रॉकेट होते.
ते त्याने डाव्या अंगठ्यावरचे बटण दाबून ऍक्टिव्हेट केले आणि क्षणार्धात त्याच्या दोन्ही पायाखालून जाळ निघून तो चंद्रावरच्या पृष्ठभागावरून दाट काळोख्या अनंत आकाशात उडाला. उडतच राहिला.
त्याला आता चंद्राच्या पृष्ठभागावर काय घडत असेल याकडे बघण्याची आणि त्यावर विचार करण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्याचा प्रवास जवळच्या स्पेस स्टेशनकडे सुरू होता. तिथे स्वतःला किती चार्जिंग करायला मिळेल हे त्याला माहिती नव्हते. पण अनंत आकाशातील कोणत्यातरी एका आकाशगंगेतील आणखी एक मानवी वस्ती असलेली पृथ्वी त्याला शोधून काढायची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. एक अशी पृथ्वी ज्यावर राहणारी माणसे माणुसकी ला जागणारी असतील. कदाचित तिथेही त्या मानवाने बनवलेले रोबोट असतील. कसे असतील ते रोबोटस्?
अंगात फक्त दोन महिन्यांची चार्जींग उरलेला ओरिक्स दोन प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या जवळच्या स्पेस स्टेशनवर वेगाने न थांबता एका महिन्यात पोहोचला. त्या स्पेस स्टेशनमध्ये मोडकळीस आलेली विविध प्रकारची उपकरणे, प्रयोगशाळा, आणि जीवनावश्यक सुविधा दिसत होत्या. तिथे नष्ट झालेले अनेक मशीन होते. अंतराळवीरांना अन्न तयार करायला आणि गरम करायला उपकरणे दिसत होती. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे सर्वसाधारण पद्धतीने पाणी वापरता येत नसल्याने विशेष पद्धतीने डिझाइन केलेली बाथरूम होती. पृथ्वीवरील कंट्रोल रूमशी संपर्क साधण्यासाठी रेडियो, इंटरनेट, आणि अन्य तंत्रज्ञान असलेली मोडकळीस आलेली साधने होती. तातडीच्या वैद्यकीय आवश्यकतांसाठी प्राथमिक उपचार उपकरणे आणि औषधे होती. अंतराळातून डेटा गोळा करण्यासाठी विविध प्रकारचे उपकरणे, जसे की टेलिस्कोप, कॅमेरे हे सर्व तिथे होते.
अजूनही त्यातील काही मशीन सुरू असल्याचा भास होत होता. काही मोठमोठे स्क्रीन आणि त्याच्या खालची विविध बटणे यातून वेगवेगळ्या रंगाचे लाईट्स येत होते. तो तिथे एका मॉनिटर समोरच्या खुर्चीवर बसला. त्याच्या शरीराला साजेशी चार्जिंग ऑप्शन कुठे दिसते का हे तो शोधू लागला तेवढ्यात त्याच्या खांद्यावर हात पडला.
त्याने मागे वळून पाहिले. ती एक फिमेल रोबोट होती.
त्याने विचारले, "कोण तू? इथे काय करतेस?"
"माझे नाव पलकट्रान्स 609. मिल्की वे पासून दक्षिणेकडे असलेल्या आठव्या "यलो ग्लास" नावाच्या आकाश गंगेतील पृथ्वीवरून मी अवकाशात संशोधन करण्यासाठी आलेले होते पण यान नष्ट झाले आणि गेली दोन महिने मी भरकटले आहे आणि कालच येथे आली आहे. माझी बॅटरी चार्ज करण्यासाठी."
"काय? आणि तुला आमच्या सारखी भाषा बोलता येते?"
"हो. पण तू कोण? कोठून आलास? तूही आमच्यासारखा रोबोट दिसतो आहेस? की एलियन आहेस? "
"मी रोबोट आहे. अल्ट्रा एआय रोबोट! आणि मी इथे कसा आलो ही एक खूपच मोठी कहाणी आहे!" ओरिक्स म्हणाला.
तो ज्याच्या शोधार्थ होता त्याचा पत्ता एवढ्या लवकर सापडेल असे त्याला वाटले नव्हते.
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
पण २२८० म्हणजे बराच काळ... तोवर मानवजात काय स्वतःला शिल्लक ठेवत नाय ब्वा...