एका गझल कार्यशाळेतील सदस्यांना सरावासाठी दिलेल्या माझ्या तरही मिसऱ्यावर मीच रचलेली एक गझल
=====
तुझ्यापासून तर निर्माण झाल्या... पण मना माझ्या
तुला सांगायच्या राहून गेल्या भावना माझ्या
जगाला स्वर्ग करण्याची तयारी ठेवली होती
कुणी ऐकून घेणारेच नव्हते कल्पना माझ्या
असे बोलून ती ऐकायलाही थांबली नाही
"चुका काढायच्या असतील तितक्या काढ ना माझ्या"
'भले होवो' म्हणालो तर नको त्यांचे भले झाले
कुठे पोचायच्या त्या कोण जाणे प्रार्थना माझ्या
तुला ओझे, मला ओझे, कशाला पाहिजे मैत्री
जुन्या मित्रास आवडल्या नव्या संकल्पना माझ्या
रडवता रोज... हसलो तर नि हसता रोज रडलो की
निराळी औषधे तुमची, निराळ्या वेदना माझ्या
मने जिंकून घेण्याचे जसे मी यत्न थांबवले
मने मी जिंकलो, झाल्या खऱ्या त्या वल्गना माझ्या
घरी नाही, घराबाहेरही नाही तुला आदर
कुठे मी सांग नेऊ 'बेफिकिर' या जीवना माझ्या
=====
-'बेफिकीर' (२१.०८.२०२४)
वा, छान.
वा, छान.
वाह!
वाह!
वा वा ! अप्रतिम अशी दाद
वा वा ! अप्रतिम अशी दाद द्यावी, अशी काही ओळ भासली नाही.
फार दमदार, लै भारी वगैरे, अशी काही ही रचना वाटली नाही.
पुढील लेखनास शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
(स्पष्ट )
>>>>>.जगाला स्वर्ग करण्याची
>>>>>.जगाला स्वर्ग करण्याची तयारी ठेवली होती
कुणी ऐकून घेणारेच नव्हते कल्पना माझ्या
क्या बात है!
मस्त, अस्से होऊन गेले नि
मस्त, अस्से होऊन गेले नि तस्से होऊन गेले