या १६ ऑगस्टला एक सुवर्णजयंती वर्ष सुरू झाले आहे ते पुढच्या वर्षी याच तारखेला संपेल.
म्हणजे पुढच्या वर्षी त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
ती घटना पाहिलेले लोक आजही आहेत. मोठ्या संख्येने आहेत. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्या घटनेचं चर्वितचर्वण होत राहणार.
काय झालं होतं पन्नास वर्षांपूर्वी ?
एक सिनेमा रिलीज झाला होता.
गीता थिएटरच्या मालकाने दिग्दर्शकाला बोलावलं होतं आणि रिकाम्या खुर्च्या दाखवल्या होत्या. फिल्मचा सौदा महागात पडला असे त्याचे म्हणणे होते.
दिग्दर्शकाने धास्तावून निरनिराळ्या हॉल मधे जाऊन अदमास घ्यायला सुरूवात केली. प्रेक्षक तुरळकच होते. जे होते ते गप्पगार होते.
ना शिट्ट्या, ना टाळ्या.
दिग्दर्शक आता धास्तावला. गेली साडेतीन वर्षे आपण जी फिल्म निगुतीने बनवत होतो ती हीच का ?
त्याने ताबडतोब या फिल्मच्या सगळ्या युनिटला तातडीने बोलावून घेतले.
त्या काळी सिनेमाचं तिकीट पुण्यात अडीच रूपये म्हणजे महागडं असायचं. मुंबईत जास्तीत जास्त १२रूपये होतं. सरासरी चार रूपये असायचं.
तीस हजारात कोथरूडला, हो हो कोथरूडला टू बीएचके फ्लॅट मिळत होता.
मुंबईत वरळीला एका नातेवाईकाने एक लाखात छोटंसं घर घेतलं होतं, त्या एक लाखाचं कौतुक कित्येक वर्षे होत होतं. एक लाख म्हणजे एकावर पाच शून्य हे ऐकण्यात नव्हतं.
इन्कार सिनेमात खंडणीची रक्कम वीस हजार रूपये होती जी प्रचंड वाटत होती. एक हजार रूपये म्हणजे केव्हढा मोठा आकडा होता. चार आकडी पगार म्हणजे मनुष्य कारने फिरायचा.
गणिताने त्या वेळचे १०० रूपये म्हणजे आजचे २९०० रूपये होतात.
https://www.inflationtool.com/indian-rupee/1975-to-present-value?amount=...
अशा वेळी दिग्दर्शकाने या फिल्मवर तब्बल साडेतीन कोटी रूपये घालवले होते. फिल्मचे हक्क विकून निर्मात्याला चार कोटीच्या वर काही रक्कम मिळणार होती आणि हे वेगळंच काहीतरी घडत होतं.
बरोबर ओळखलंत..
१६ ऑगस्ट १९७५ या दिवशी रिलीज झालेला तो सिनेमा म्हणजे शोले !
दिग्दर्शक रमेश सिप्पींनी बैठक बोलावून कुठे चूक झाली ते सर्वांना विचारले.
काहींचं म्हणणं पडलं कि व्हिलन नवा आहे, काही चित्रपटाच्या लांबीला दोष देत होते तर काहींनी हिरो मरतो हे प्रेक्षकांना आवडलेलं नाही असं वाटलं. रमेश सिप्पींना हे पटलं आणि दोन तासात आपण बेंगलोर निघू. तिथे पुन्हा काही सीन्स शूट करूयात, ते एडीट करून नव्या प्रिंट्स थेटरमधे पोहोचवू असे म्हणणे मांडले.
सलीम जावेद यांना हे पसंत नव्हते. ते म्हणाले कि दोनच दिवस झाले आहेत. उद्या रविवार आहे. बघूयात काय होतंय ते. आमच्या मते एक दोन आठवडे जाऊ द्यावेत. त्यानंतर जर प्रेक्षक आले नाहीत तर आपण हे बदल करूयात. आताच करणे खूप घाईचे होईल.
सिप्पींनी ते ऐकले...
थिएटरमधे जे चार लोक गप्प होते, त्यांनी बाहेर जाऊन आणखी सोळा लोकांना सांगितले. त्या सोळा जणांनी प्रत्येकी सोळा जणांना सांगितले. असे करता करता चार आठवडे उलटले आणि मग जे झालं ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहे.
भारतीय चित्रपटसृष्टी कायमचीच बदलून गेली.
लोक असे काही येऊ लागले कि गावंच्या गावं बसेसनी शहराकडे यायची. त्या बसेस वर शोलेची चित्रं रंगवलेली असायची, बसस्टॉपचे नाव शोले बसस्टॉप पडलेले होते असे किस्से जवळपास सर्वच लहान मोठ्या शहरातून येत असत.
त्या काळी या सिनेमाने ३५ कोटीचा धंदा केला.
तेव्हांचे ३५ कोटी वर दिलेल्या लिंक वर जाऊन पाहिले तर १०१५ कोटी रूपये होतात.
पण या सिनेमाची ही अधिकृत कमाई आहे. अनधिकृत त्यापेक्षा दोनशे पटींनी जास्त असेल.
मिनर्वाचे तिकीट तेव्हां (शोलेसाठी) बाल्कनीचे १५ रूपये होते. ते बाहेर दोनशे रूपयांना मिळत होते आणि लोक घेत होते.
ब्लॅक वाल्यांनी वरळी सी फेसला घरं बांधली अशा बातम्या छापून आल्या होत्या. काहींच्या घरावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या होत्या.
बसेस वाल्यांनी कमाई केली. थिएटर्समधे जे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते त्यांची रेकॉर्डब्रेक कमाई झाली.
मिनर्वाला पाच वर्षे शोले हाऊसफुल्ल चालला आणि उतरला तो ही एकाच कारणाने.
त्याच निर्मात्याचा शान आला म्हणून. नाही तर ना निर्मात्याचं मन होतं ना थिएटरच्या मालकाचं. म्हणूनच मॅटिनीला शोले चालवला गेला. दोन वर्षे पुन्हा हाऊसफुल्ल चालला.
या शिवाय त्या काळी रिपीट व्हॅल्यू असल्याने शोल दर वर्षी येऊन कमाई करायचा.
त्या वेळी शोलेला एक वाक्य चिकटलं होतं.
"कुठेही लावा कधीही लावा, सुपरहीट "
तर हा शोले आता पन्नास वर्षांचा होतोय. १६ ऑगस्टला ४९ वर्षे पूर्ण झाली. पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले. पुढच्या वर्षी नक्कीच शोले पुन्हा रिलीज होईल. त्या आधीच शोलेचा रीमेक होत असल्याच्या बातम्या आहेत. कदाचित सलमान खान आणि शाहरूख खान जय वीरू असतील.
या सिनेमाच्या असंख्य आठवणी सर्वांकडे असतील. असंख्य किस्से असतील.
ऐकीव गोष्टी असतील, तेव्हांच्या अफवा असतील.
या सिनेमाशी निगडीत काही खास गोष्टी असतील.
त्या लिहा.
सगळं छानच लिहा असं काही नाही.
एक निगेटिव्ह गोष्ट इथे टाळली आहे. पण ती नंतर लिहीणार आहे.
हिंट - सध्या जुने वेस्टर्न सिनेमे पाहणे चालू केले आहे.
बाकी असरानी, सूरमा भोपाली,
बाकी असरानी, सूरमा भोपाली, हन्गल/सचिन वगैरे उपकथानकं आज इतक्या ‘तबीयत’ने कोणी लिहिली तर तो वेड्यात निघेल, पण यात ती कशी सुरेख विरघळून जातात!
अगदी अगदी ! 'पिस्तोल जेल मे आ चुका है! ' सारखे लहानसे प्रसंगही लक्षात रहातात. 'शोले' म्हणजे यासम हाच !
मला टाकी असणे हा इतका ब्लूपर
मला टाकी असणे हा इतका ब्लूपर वाटत नाही. नवीन बांधली असेल. वीज गावात येणार असेल. किंवा अगदी साधे उत्तर म्हणजे त्याहीपेक्षा उंचीवर आणखी कोठे रिझर्वॉयर असेल.
मला ब्लूपर एक जाणवला तो वेगळाच. हे दोघे जेल मधून सुटल्यावर बाहेर ठाकूरला भेटतात. तेव्हा ते जेल मधून बाहेर आलेले असतात. पण त्या सीन मधे ते लोक बोलत असताना आजूबाजूला कैदी चालताना दाखवलेत. असे कैद्यांना बाहेरच्या एरियात जाऊ देत नसतील.
पण मुख्य म्हणजे ब्लूपर हा तुम्हाला पहिल्याच फटक्यात बघताना जाणवला पाहिजे. फार फार तर पुन्हा एकदा बघताना. १०-१२ वेळा पिक्चर पाहिल्यावर, काही काही सीन्स अनेकदा पाहिल्यावर २०-३० वर्षांनी या गोष्टी बाहेर आल्या, तर ते सिनेमाचे यशच आहे. मध्य रेल्वेची गाडी पश्चिम रेल्वेच्या रूटवर, फोटोवर क्लिंटनचा फोटो चिकटवलेला सहज दिसणे, हॉलीवूड मधे "शहर के सबसे बडे पेपर मे" म्हंटल्यावर सीन मधे न्यू यॉर्क टाइम्स दिसणे, हातातील "फ्यूज कंडक्टर" स्क्रीनवर आपल्याला दिसेपर्यंत तेथेच समोर उभ्या असलेल्या लोकांनाही न दिसणे, अटलांटामधे रस्त्याच्या डाव्या बाजूने गाड्या जाताना दिसणे, कोणत्याही शहरात सकाळी एका "स्थानिक" सामन्यात त्यावेळेस "शेवटची ओव्हर" सुरू असणे, प्लॅटफॉर्मवरून गाडी डावीकडून पकडलेला हीरो पुढच्या सीन मधे गाडीच्या उजवीकडे दिसणे - हे खरे ब्लूपर्स
>>> काही काही सीन्स अनेकदा
>>> काही काही सीन्स अनेकदा पाहिल्यावर २०-३० वर्षांनी या गोष्टी बाहेर आल्या, तर ते सिनेमाचे यशच
हो हो, त्यात दुमत नाहीच.
शोले ‘हिरा’ आहे.
शोले ‘हिरा’ आहे.
पुर्वीचा अमिताभ पहाताना आता तो एक जादूचा (किंवा अख्ख्या बॉलीवुडला स्वप्नात भेटलेला) माणुस होता असेच वाटते. (माझ्यामते) तितकी जादू करणारं हिंदी सिनेमात आधी कोणी झालं नाही, नंतर कोणी झालं नाही, यापुढेही होणार नाही. (अर्र, शोले चर्चेला वेगळं वळण द्यायचा हेतु नव्हता)
माझ्या मते “शोले” हा वेगळा
माझ्या मते “शोले” हा वेगळा आहे. मला जुन्या सिनेमात मॅच्युर वाटलेले दोनच सिनेमे आहेत ते म्हणजे शोले नी दुसरा मदर इंडिया. मॅच्युर हया साठी की पांचट कॉमेडी, नी स्टोरी नाहींतर दर्जेदार कॉमेडी नी स्टोरी.
“तुम्हारा नाम क्या है बसंती” ते चहा पिताना मित्राच्या वाईट गोष्टीही चांगल्या टोन मध्ये सांगणारा अमिताभ हे असे एकापेक्षा एक सरस विनोद शोलेत आहेत, ते ही कुठलाही पार्श्वसंगीटाच वापर न करता, नैसर्गिक विनोद झाले आहेत ते.
मागे मी अवधूत की ऋषिकेश गुप्ते ह्यांची “१००० वेळा शोले पाहिलेला माणूस” नावाची कथा इंटरनेट वर शोधली. पण सापडली नाही. हया कथेवर सिनेमाही येत होता पण कोव्हिडमुळे रखडला. ही कथा बहुतेक २०१३ च्या कुठल्यातरी दिवाळीअंकात छापून आली होती. तो अंक मी ऑनलाइन १०० रुपये भरून मिळवला. कथा खूप छान होती.
Pages