तांत्रिक कारणाने फोटो अपलोड करू शकत नाहीये. लेख खालील फेसबूक ग्रूप वर तुमचा अभिषेक या नावाने पूर्वप्रकाशित आहे. जो माझाच एक आयडी आहे. फोटो तिथे बघू शकता.
https://www.facebook.com/share/p/VN1VoZd8N4XYUU1D/?mibextid=oFDknk
लेख मात्र इथेच वाचा
--------------------------------
सारभात आणि मासे!
श्रावणात सारभात आणि तळलेल्या माश्याच्या तुकडीचा फोटो शेअर करतोय त्याबद्दल क्षमस्व. पण आमच्यात चालते. आम्ही श्रावणात चिकन मटण खात नाही पण मासे खातो. अर्थात हे घरच्यांचे झाले. मी स्वतः मात्र नास्तिक असल्याने मांसाहार आणि देवधर्माचा आपापसात संबंध न जोडता कुठलाही सणवार न जुमानता वर्षभर खातो. आणि देव मानत नसलो तरी एका गोष्टीसाठी देवाचे आभार जरूर मानतो की त्याने मला योग्य घरात जन्माला घातले. कारण मला दारू सिगारेट, गुटखा तंबाखू, पानसुपारी, बिडीकाडी कसलेच व्यसनं नाही. पण सारभाताचे आहे.
हो व्यसन हाच योग्य शब्द आहे, कारण व्यसनात जसे थांबायचे कुठे हे कळत नाही तसे मला सारभात खाताना थांबायचे कुठे हे कळत नाही.
एखादा आवडीचा पदार्थ खाऊन तृप्त झाल्यावर आपण म्हणतो की पोट भरले बाबा पण मन नाही भरले.. पण सारभात खाताना माझे पोट सुद्धा भरत नाही. कळतच नाही अन्न नेमके कुठे जाते. आता हे शेवटचे चार घास म्हणून थोडा थोडा भात घेतो आणि घेतच राहतो, खातच राहतो. गळ्यापर्यंत कधी येतच नाही. मी सारभात खायला बसलो की बायको मुद्दाम शेजारी बसते आणि भाताच्या दर दोन राऊंड नंतर मला थांबायची आठवण करून देते. असे करायला तिला मीच सांगितले आहे. कारण कधीतरी आतड्यावर ताण येऊन ते पटकन फाटेल अशी भीती कायम वाटते. पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येक वेळी इतके तुडुंब जेवून सुद्धा कधी जळजळ मळमळ एसिडीटी अपचन, कुठलाही त्रास आजवर झाला नाही.
पोटभर जेवून बसलो आहे आणि त्यानंतर सारभाताचे ताट समोर आले तर मी पुन्हा जेवतो. ते ही पूर्ण ताट भरून जेवतो. यात एका शिताचीही आतिशयोक्ती नाहीये. रात्री उशीरा कधीतरी वडील घरी येतात, मला झोपेतून उठवतात, आणि मी त्यांच्यासोबत ताट घेऊन पुन्हा बसतो. माझे जेवण झाल्यावर मुलांना मासे सोलून देताना पुन्हा भूक चाळवते. मी पुन्हा एखादी माश्याची तुकडी घेऊन पुन्हा चार घास पोटात ढकललो. खरेच कळत नाही की कसे आणि कुठे जाते.. आणि एक सारभात मासे सोडले तर माझा स्वभाव सुद्धा हावरा नाहीये.
आंब्याला फळांचा राजा म्हणतात, अवीट फळ म्हणतात. पण प्रत्यक्षात जगात कुठलाही पदार्थ अवीट नसावा. कितीही आवडीचा पदार्थ असला तरी रोज रोज तेच कोण खाणार.. पण मी सारभात खातो. सकाळ संध्याकाळ खातो. सलग तीन चार दिवस खाणे हे तर नॉर्मल आहे माझ्यासाठी पण सलग सात आठ दिवस दोन्ही वेळा म्हणजे सलग १४ ते १५ वेळा जेवणात सारभात मासे खाण्याचा रेकॉर्ड आहे माझा. आमच्याकडे श्रावणात मासे चालतात यामागे कदाचित मीच कारणीभूत असेन. आपल्या घराण्यात माझ्यासारखा सारभात मासेखाऊ जन्माला येणार आहे हे पूर्वजांना आधीच समजले असावे.
जीन्स आणि तंबाखू मळल्याशिवाय मजा येत नाही तसे माश्याची तुकडी तळल्याशिवाय मजा येत नाही. त्यामुळे सार आवडीने खात असलो तरी मी सारातले मासे खात नाही. म्हणून आमच्याकडे माश्यांची डोकी सार करायला वापरतात. तर कधी कोलंबीचे सार करतात. पण सारभातासोबत तोंडी लावायला मासेचं हवेत असा हट्ट नसतो. तसेच सार माश्याचेच हवेत असाही हट्ट नसतो. तांबाटयाच्या सारासोबत सुद्धा फिश फ्राय तितकेच आवडते. तसेच जेव्हा मासे संपतात आणि तरी अर्धा टोप सार शिल्लक राहते तेव्हा पुढच्या दिवशी अंड्याचे आम्लेट, बटाट्याची पिवळी भाजी, कांदा-बटाटा भजी, भाजलेला सुका बोंबील या पैकी कुठलाही एखादा पदार्थ तोंडी लावायला घेऊन तो अर्धा टोप संपवायची हिम्मत मी राखतो.
प्रेमविवाहाचे दुष्परीणाम! दैव देते आणि कर्म नेते!
वर मी देवाचे आभार यासाठी मानले होते की मला योग्य घरी जन्माला घातले. पण जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी काय केले? तर एका शाकाहारी मुलीशी लग्न केले.
लग्नानंतर ती मासे खायला शिकली. पण लुटेरी फक्त वाटेकरी झाली. मांसाहारी स्वयंपाक मला स्वतःलाच येत नाहीत तर तिला कुठल्या तोंडाने शिक म्हणून सांगणार होतो. त्यामुळे सारी मदार फिरून पुन्हा आईवरच उरली. आणि ती माझ्या ईतक्या प्रचंड आवडीला सुद्धा पुरून उरली. म्हणूनच आई स्पेशल असते.
मासे आहेत तर पैसे नाहीत, आणि पैसे आहेत तर मासे नाहीत. असे कधी आयुष्यात झाले नाही. म्हणजे लहानपणी पैसे फार नव्हते तरी मासे पोटात जायचे थांबले नाहीत. केक, चॉकलेट, आईसक्रीम असे लाड कधी झाले नाहीत. पण मासे खाताना आर्थिक परिस्थितीही कधी आड आली नाही.
पोटाचा (की आतड्याचा?) एक छोटासा आजार आहे. त्याने गेल्या काही काळात उचल खाल्ली आहे. भूक मंदावली, तर वजन कमी झाले आहे. मागच्याच महिन्यात एक छोटेसे ऑपरेशन सुद्धा झाले आहे. आजारामुळे म्हणा किंवा वाढलेल्या गोळ्यांनी म्हणा, संध्याकाळ झाली की पाण्याचा घोट जरी घेतला तरी थुंकून टाकावासा वाटावे ईतकी घाण चव तोंडाला यायची. दिवसा छान जेवण जायचे. आणि त्यावरच दिवस जायचा. कारण रात्रीचे जेवण बंद झाले होते. आयुष्य भरभरून जगायची आणि अन्नाचा प्रत्येक घास चवीचवीने खाण्याची आवड आहे मला, पण या आजाराने माझा ठाकूर केला होता. नेमके तेव्हाच सारभाताने मला हात दिला.
माहेरी जायचा विकेंड आला. तसे दर दुसर्या तिसर्या आठवड्याला जातो. पण यंदा आजारपणामुळे आणि मुलांच्या परीक्षांमुळे पाच सहा आठवडे लांबले होते. नेहमीच्या रुटीननुसार शुक्रवारी रात्री निघायचे ते थेट जेवायलाच पोहोचायचे. पण यावेळी आईला जेवण नको म्हणून सांगितले. आईने म्हटले, बरे.. पण आईच ती. पोहोचलो तेव्हा सारभात तयार होता. तांबाट्याचे सार आणि कांद्याची भजी. गेले काही दिवस, सॉरी गेले काही रात्री अन्नावरची वासना अशी उडायची की कित्येक आवडीचे पदार्थ नावडीचे झाले होते. पण सारभात बघून ईतक्या दिवसात पहिल्यांदा रात्रीचे काहीतरी खावेसे वाटले. ते देखील माश्याचे नाही तर साधे तांबाट्याचे सार.. पण सार कधी साधे नसतेच. दोन चार भज्या तोंडी लावायला घेऊन जवळपास टोपभर भात संपवला. म्हटले तर एक छोटासा चमत्कारच होता. ईतके दिवस आजाराने जे मन विटले होते ते अचानक प्रफुल्लित झाले. नैराश्यात आयुष्य संपतेय असे वाटताना जगण्याची नवीन आशा दिसावी असे झाले. जेवण होताच बायकोला फोन लावला आणि तृप्तीचा पहिला ढेकर तिला ऐकवला.
त्यानंतर जी ताणून दिली ते दुसर्या दिवशी दुपारीच उठलो. तेव्हा बिछान्याशेजारीच जे फोटोत दिसत आहे ते सारभात आणि माश्याच्या तुकडीचे ताट माझी वाट बघत होते. तिथून मग पुन्हा मागे वळून पाहिले नाही. चल रे बांगड्या टुणून टुणूक, आईकडे जाईन, सारभात खाईन, जाडजूड होईन ही बालपणीची कविता प्रत्यक्षात जगायला सुरुवात झाली. दोन दिवस तिथे खाल्ले आणि अजून चार दिवस पुरेल ईतके सार आईने सोबत दिले. रात्रीचे सुद्धा जेवण जाऊ शकते हा आत्मविश्वास त्या दोन दिवसात परत आला.
या लेखाचेही सार या प्रसंगातच सामावले आहे. तीच कृतज्ञता व्यक्त करायला हा लिखाण प्रपंच केला आहे. मनापासून आभार मानायचे आहेत. आईचे नाही. तिला गृहीत धरण्यातच या नात्याची मजा आहे. पण तिच्या हातचे आपल्याला सारेच आवडते म्हणून सारभाताला सुद्धा गृहीत धरले होते. पण आईच्या हातचाही एक पदार्थ असा असतो, ज्यापलीकडे जगात भारी काहीच नसते. माझ्यासाठी तो पदार्थ तिच्या हातचे सारभात आणि मासे आहेत हे पुन्हा एकदा नव्याने समजले.
तुझे लग्न एखाद्या कोळीणीशीच लाऊन द्यायला हवे ईथपासून, तुझे घर समुद्रातच बांधायला हवे, ते तुझ्या अंगात रक्त वाहते की सार ईथवर पीजे ऐकत मी लहानाचा मोठा झालोय. त्याला जबाबदार सुद्धा मीच आहे. कारण हलवा म्हटले की मला गाजरका नाही तर हलवा मासाच आठवतो, आणि सूरमयी शामला अगदी कालपरवा पर्यंत मी सुरमई समजत होतो. जेव्हा Crohn's Disease म्हणून माझ्या आजाराचे निदान डॉक्टरांच्या तोंडून ऐकले तेव्हा देखील अरे वाह Prawns, नाव तर मस्त आहे, असेच त्यांना म्हणालो होतो.
पण जोक्स द अपार्ट, आज एक गोष्ट मला समजली आणि ज्यांना पुर्ण लेख वाचूनही समजले नसेल त्यांच्यासाठी म्हणून ईंग्लिशमध्ये सांगतो,
सारभात अॅण्ड फिश, ईजे नॉटए जस्ट फूड... ईट्स ॲन इमोशन!
- तुमचा अभिषेक
फोटो कातिल आहे. असं सार रोज
फोटो कातिल आहे. असं सार रोज मिळणार असेल तर हे व्यसन लावून घ्यायची तयारी आहे माझी ( सोबत माश्यांच्या तुकड्या पण हव्यात )
लै भारी तुकड्या आहेत. आणि
लै भारी तुकड्या आहेत. आणि लेखही त्या सारासारखा झटका झालेला आहे.
अगदी तोंपासू
तांबाट्या मासा असतो का?
तांबाट्या मासा असतो का?
लेख आवडला.
छान फोटो आणि लेख!
छान फोटो आणि लेख!
तांबाट्या मासा असतो का?>> तांबाट्या म्हणजे टोमॅटो
हाहाहा हे माहीत नव्हते.
हाहाहा हे माहीत नव्हते. टोमॅटोला तांबाट्या मस्त नाव आहे.
मस्त लिहिलं आहेस ऋन्मेष!
मस्त लिहिलं आहेस ऋन्मेष!
तांबाट्या म्हणजे टोमॅटो << ओह
तांबाट्या म्हणजे टोमॅटो << ओह अच्छा
रेसिपी लिहीली असती तर बर झालं अस्तं
फोटो कातिल आहे पण बर झालं मराठीत लिहीलेत ते. फेस्बुक वरच लिखाण विनोदी लेखण म्हणुन टाकू शकता..
rmd+1111
छानच लेख. बिना माश्याचे
छानच लेख. बिना माश्याचे टोमॅटो सार व सुरमई फ्राय( तवा फ्राय) माझे पण एकदम फेवरिट. माझ्याकडे मासे रोज आणणे होत नसे कारण लेक चिकन प्रेमी. पण आता वेस्टर्न ला शिफ्ट होणार आहे . घराची लाइन लागली व जीवन जरा सुरळीत झाले की वरसोवा कोळी वस्ती व जवळचे फिश मार्केट व्हिजिट करायचे ठरवले आहे. दोन रेसिप्या करुन बघायच्या घट्ट आहेत. सुरमई फ्राय, पापलेट केळीच्या पाना तले. अनेक रेसीप्या आहेत व स्टफ्ड स्क्विड. हे गोव्यात फार मिळते. फ्लो रेन्स दियाज बाईच्या रेसीपी एकदम हिट् आहेत. ह्या स्क्विड मध्ये त्याचेच इतर भागांचे सारण करुन भरायचे किंवा बारके प्रॉन्स, रेशाड मसाल्यात.
टोमाटो सार व्हेज माझी रेसीपी:
टोमा टो उकडून गार करुन चाळणी वर टाकायचे व साले बिया गाळून खाली जो गर उरतो त्यात चवी पुरते मीठ, चिमुट साखर व लाल तिखट घालायचे. गरज प डल्यास मिक्सर मधून एकदा फिरवुन घेणे. घरात असल्यास चमचा भर ओले खोबरे पण त्या बरोबरच फिरवून घेणे.
टोपात साजूक तूप गरम करुन घेणे, जिरे घालुन छान तडतडायचे . फोडणी जळ ली नाही पाहि जे पण. चिमुट भर हिंग, एक बारका तुकडा दालचिनी व दोन लवंगा घालुन त्यात आपले टोमाटो मिक्क्ष् चर घालुन मंद गॅस वर पाच मिनिट उकळणे. गरम व्हाइट राइस किंवा नुसतेच बोल मध्ये घेउन ओर पणे.
रुणम्या च्या मम्मीची काय वेगळी रेसीपी येते ते बघुया.
वरील माझे सार पुणेरी पद्धतीचा लग्नी मसाले भात असतो, फ्लावरचे तुरे, तोंडली, कयाप्सिकम मटार काजू, गोडा मसाला, कोलम किंवा आंबेमोहोर राइस घालुन केलेला त्या बरोबर अप्रतिम लागते. भातावर तूप ओले खोबरे कोथिंबीर पाहिजे. व बरोबर मटकी उसळ , पिवळी बट्टु भाजी व कडक गरम जिलेबी हवी. मी कुकला एकशे एक रु. पा किटात घालुन खाडिलकर कुटूम्बा क डून सप्रेम भेट देइन.
गौरी देशपांडे ह्यांचे
गौरी देशपांडे ह्यांचे विंचुर्णीचे धडे पुस्तक आहे त्यात एक त्यांनी शेतात हौसेने लॉग हट बांधलेली ते अपघातात मोडुन पडते, मागे लावलेल्या भाज्यांच्या रोपांचे पण नुकसान होते. त्यात टोमॅ टो ला गलेल्या झाडांचे पण नुकसान येत. नेक्स्ट डे वर्कर कामाला येतात तेव्हा एक महिला
आरं ती तंबाटी चांगली आहेत जमिनीत पडलेली, चांगली बघुन घेउन जाउका असे मालक मालकिणी ला विचारते. ते दोघे विष ण्ण झालेले असतात लॉग हट चे नुकसान बघुन ते जा घेउन म्हण तात. तिथे ही तंबाटी शब्द वाप रलेला आहे.
सार बनवायला रसरशीत लाल बेंगलोर टोमा टो बरोबरच एक दोन देशी घ्या कमी लाल. कारण चव त्यांनाच असते.
पोटाचा (की आतड्याचा?) एक
पोटाचा (की आतड्याचा?) एक छोटासा आजार आहे. त्याने गेल्या काही काळात उचल खाल्ली आहे. भूक मंदावली, तर वजन कमी झाले आहे. मागच्याच महिन्यात एक छोटेसे ऑपरेशन सुद्धा झाले आहे. आजारामुळे म्हणा किंवा वाढलेल्या गोळ्यांनी म्हणा, संध्याकाळ झाली की पाण्याचा घोट जरी घेतला तरी थुंकून टाकावासा वाटावे ईतकी घाण चव तोंडाला यायची. दिवसा छान जेवण जायचे. आणि त्यावरच दिवस जायचा. कारण रात्रीचे जेवण बंद झाले होते. आयुष्य भरभरून जगायची आणि अन्नाचा प्रत्येक घास चवीचवीने खाण्याची आवड आहे मला, पण या आजाराने माझा ठाकूर केला होता. नेमके तेव्हाच सारभाताने मला हात दिला.>> माझी पण तीच परिस्थिती आहे. भाता बरोबर सोल कढी, फुटी कढी हा सध्याचा आधार आहे. आगळात जरा साखर घालावी लागते पण एकच मील जेवायची तर घालते मी. त्या शक्तीची गरज आहे. आता एक दिवस हे लाडाचे टॉ सा र करीन. सध्या किचन बंद होत चालले आहे. शिफ्त के कारण.
छान लिहिलं आहेस ऋन्मेष!
छान लिहिलं आहेस ऋन्मेष!
आमच्यकडे पण सगळे मासेप्रेमी.
वर्षानुवर्षे आमच्याकडे सुटीच्या दिवशी स्वयंपाक काय हा प्रश्नच कधी पडला नाही. एक तर मटण नाहीतर मासे.
लग्नाआधी मला मासे करता येत नव्हते कारण तेव्हा विदर्भात मासे नव्हते मिळत.
पण लग्नानंतर खायला आणि मग करायलाही शिकले.
मासे (कालवण आणि तुकड्या ) सारखा सोपा स्वयंपाक नाही. बायकोला नसेल येत तर तुम्ही शिकून घ्या.
धन्यवाद सर्व प्रतिसाद.
धन्यवाद सर्व प्रतिसाद.
मायबोलीवर सध्या सुरू असलेली तांत्रिक अडचण दूर झाली तर फोटो इथे सुद्धा अपलोड करेन.
अमा, भारी. धाग्याचा अगदी सारभात फिश फ्राय फॅन क्लब केलात
@ रेसिपी, बरेच जणांनी मागितल्याने आता पुढच्यावेळी जाईन तेव्हा आईकडून आणावी लागेल
@ तांबाट्याचे सार, हा माझ्या आजीपासून ऐकत आलेला शब्द आहे. बोलायला छान वाटतो त्यामुळे तो चूक की बरोबर आणि त्याचा उगम काय या भानगडीत न पडता वापरतो
@ शर्मिला, वर्षानुवर्षे
@ शर्मिला, वर्षानुवर्षे आमच्याकडे सुटीच्या दिवशी स्वयंपाक काय हा प्रश्नच कधी पडला नाही. एक तर मटण नाहीतर मासे.
>>>>>>>
अगदी सेम पींच.
दर बुधवारी अंडे किंवा मासे आणि रविवारी मासे किंवा चिकनमटण हे ठरलेले. याच कारणासाठी माझे मित्र मला फार श्रीमंत समजायचे
आमच्याकडे वर्षाकाठी - एकदा
आमच्याकडे वर्षाकाठी - एकदा मटन व एकदा मासे होत.
सासरी मात्र नॉनव्हेजचे प्रमाण जास्त आहे. साबा मासे मस्त करत. खेकडे किती मस्त बनवत त्या.
मस्तच लिहिलं आहेस, तब्बेतीची
मस्तच लिहिलं आहेस, तब्बेतीची काळजी घे आणि लवकर बरा हो . ह्या मासे प्रेमाची सध्या रोज प्रचिती येतेय. आमच्या मुलाच्या मुलाच्या अंगात ही gsb रक्त वहात आहे. तो आणि त्याची आई दो घे ही अफाट मासे प्रेमी आहेत. हल्ली मला दुधी किंवा तत्सम भाजी आणि त्यांना मासे असा अतरंगी मेन्यू असतो घरी रविवारी. अजून अगदीच टिल्ला आहे, बोलता ही नीट येत नाहीये पण तुला काय आवडतं खायला असं विचारलं तर कायम उत्तर "पापेट आणि चुमयी " हेच येत.
Btw आम्ही तांबाती न म्हणता टांबाटी म्हणतो , थोडाच फरक.
अश्विनीमामी,
अश्विनीमामी,
पुणेरी बेत वाचून तोंडाला पाणी सु टलं.
गौरी देशपांडेंच्या 'चंद्रिके गं, सारीके गं' पुस्तकातला उल्लेख आहे हा. विंचुर्णीचे धडे मधील नाही. कल्याणच्या भाजी बाजारात जवळपासच्या खेड्यातील आगरी बायका शेतातली भाजी आणायच्या. त्या टोमॅटोला तांबाटी म्हणायच्या.
Ho ho barobar
Ho ho barobar
अमांची सार रेसिपी मस्त!
अमांची सार रेसिपी मस्त!
ऋ : तुझ्या माहेरची साराची रेसिपी पण पोस्ट कर लवकर
मस्त मस्त ऋ. आणि अमाची
मस्त मस्त ऋ. आणि अमाची रेस्पीपण. आणि दोघेही तब्येतीची काळजी घ्या.
मस्त लेख, तोंडाला पाणी सुटले.
मस्त लेख, तोंडाला पाणी सुटले. माझी आई पण कमालीचं चवदार सार बनवते, शेव भाजी पण, चिकन चा रस्सा पण, अनेक पदार्थ.
अमांनी लिहिलेली पद्धत सेम करते मी, पण नो खडे मसाले. भरपूर कडीपत्ता, कोथिंबीर, कोकम कोळ, लाल सुक्या मिरच्या भिजवून. स्वर्ग!
टोमॅटो सारात पुन्हा कोकम?
टोमॅटो सारात पुन्हा कोकम?
हो थोडसं
हो थोडसं
Crohn's disease isn't fatal,
Crohn's disease isn't fatal, and people with Crohn's disease can live just as long as people without it. Still, managing your condition to prevent complications is important since Crohn's can increase your risk of certain conditions. For example, regular colonoscopies can catch colon cancer early when it's treatable.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
टोमॅटो साठी तंबाटे, तांबाटे, टमाटे, तांबाट, टांबाट असे अनेक पर्याय ऐकले आहेत.
टोमॅटोच्या सारामधे मासे ?
टोमॅटोच्या सारामधे मासे ? माशांच्या कालवणाबद्दल बोलतो आहेस का ? त्याला सार ही म्हणत असतील. आमच्याकडे सार म्हटले कि जनरली शाकाहारी असते म्हणून विचारले.
टोमॅटोचे जे सार बनते ते वेज
टोमॅटोचे जे सार बनते ते वेज असते. त्यात मासे नाही घालत. ते वेगळे तळून तोंडी लावायचे. या साराची चव सुद्धा मच्छीसाराच्या जवळ जाते. नवख्याला कळणार सुद्धा नाही. आणि कलर तर अगदी सेम टू सेम. मलाही नुसते रंग बघून कळत नाही.
आई बरेच सणवार वार पाळते. त्यामुळे मधल्या वाराला टोमॅटो सार केले की वेज नॉनव्हेज सगळ्यांची सोय होते.
कोकणात आमच्या सिंधुदुर्गात सार म्हणतात. कुठे कालवण, आमटी, सांबर अशी बरीच नावे आणि बरीच पद्धती असतील. माझे सामान्य ज्ञान याबाबतीत फार काही भारी नाही.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/p/gzkV7AnE8SRodFk6/?mibextid=oFDknk
या Being मालवणी नावाच्या फेसबूक ग्रूपने लेख उचलला माझा.
नाव दिले आहे माझे लेखाखाली त्यातच समाधान
पाककृती टाका ना.
पाककृती टाका ना.
>>माझे सामान्य ज्ञान याबाबतीत
>>माझे सामान्य ज्ञान याबाबतीत फार काही भारी नाही.<<
मालवणी कुटुंबात टमेटो (मालवणी उच्चार तांबेटो) चं सार हा प्रकार सोलफूड मधे मोडतो (कुळथाची पिटि+भाताच्या नंतर). भात आणि साराबरोबर कुठलिहि साइड भाजी आरामात जाते. पण यात सुक्या बांगड्याचा नंबर सगळ्यात वरचा. असो..
ऋन्म्या, तुझ्या इन्स्टाच्या फोटोत मेथीची भाजी दिसली नाहि, ती मस्ट आहे रे बाबा...
हो, फेसबुकवर अजून एका ठिकाणी
हो, फेसबुकवर अजून एका ठिकाणी आलाय, मी टॅग केलेय.
Pages