परबची अजब कहाणी---१

Submitted by केशवकूल on 11 August, 2024 - 23:59

परबची अजब कहाणी

मी अनंत रामचंद्र कर्वे.
माझ्या इंग्लिशच्या सरांनी मला आठवीत शिकवले. कि माझे नाव अमुक अमुक असे नाही म्हणायचे. मी अमुक अमुक आहे असे म्हणायचे. तू आणि तुझे नाव निराळे निराळे थोडेच आहात? म्हणजे माझे घर, माझी गाडी, माझा मुलगा इत्यादी ठीक आहे. कारण त्यांची आणि तुझी ताटातूट होऊ शकते. पण तुमचे नाव तुम्हाला मृत्यू पर्यंत आणि मृत्यूच्या पश्चातही साथ संगत करते.
“अनंत रामचंद्र कर्वे ह्यांच्या निधनाने जी पोकळी...”
असो.
मी एका अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीत वरच्या पोस्ट वर आहे. सगळे काही ठीक ठाक आहे. गाडी आहे, तीन बेडरूमचा फ्लॅट आहे. चौकोनी कुटुंब आहे. आपल्या सारख्या माणसाला अजून काय पाहिजे. लहान पणी वाड्यात रहाताना ह्या सगळ्याची कल्पना पण केली नव्हती. ते सगळे हळुवार पावलांनी आयुष्यात आले, केव्हा आले? कळले नाही. स्ट्रगल करावा लागला? नाही. अजिबात नाही.
मात्र एक सल आहे परबच्या मृत्यूची. त्याने असे करायला नको होतं. तत्त्वज्ञान ऐकायला ठीक असते हो, अध्यात्म, आत्मा, ब्रह्म, मोक्ष, मनाच्या आंतरिक कचऱ्याचा निचरा होतो. आतून शुद्ध वाटते. मठातून बाहेर येऊन गाडीत पेट्रोल भरायला पंपावर गेल कि आधी पाकीट चेक करावे लागते. ह्याला शास्त्रज्ञ “वेव फंक्शन कोलॅप्स” असे म्हणतात. म्हणजे सत्याची जीवघेणी जाणीव. साला रोकडा पाहिजे. हे मी नाही बोलत आहे, हे परबने मला शिकवले.
परब म्हणजे माझा जीवश्च कंठश्च मित्र. अगदी प्राथमिक शाळेपासूनचा. अगदी अवलिया माणूस. माझा सखा, जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. एक जिस्म दो जान. त्या परबची ही कथा. ती त्याच्याच शब्दात ऐका. त्याने सांगितली काय किंवा मी सांगितली काय एकूण एकच!

बाबासाहेब सरपोतदार.
बाबासाहेब सरपोतदार हे शहरातील नामी क्रिमिनल लॉयर. मोठमोठ्या खुन्यांना त्यांनी फाशी पासून वाचवले होते. तुम्हाला त्या नौदलाच्या अधिकाऱ्याची कथा माहित असेलच. ह्याने आपले सर्विस रिवाल्वर वापरून आपल्या बायकोच्या प्रियकराचा मुडदा पाडला होता. आणि कळस म्हणजे त्याने कोर्टात ह्या खुनाची कबुली अभिमानाने दिली. खरे तर त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती. पण बाबासाहेबांनी ह्या खुनाला खुबीने असे वळण दिले कि त्या खुन्याला त्यांनी हीरो बनवून टाकले. मग काय त्यावर नाटके लिहिली गेली. हिट सिनेमे झाले. असो.
तर हा परब. अगदी किडा मुंगीलाही धक्का न लावणारा साधा सरळ माणूस. तो का बरे खून करेल. ह्या परबवर एका अनामिक तरुणाचा खून केल्याचा आरोप आहे. ही केस बाबासाहेबांकडे आली आहे. आली म्हणजे मीच बाबासाहेबाना रिक्वेस्ट केली होती. काहीही करा पण माझ्या मित्राला वाचावा. परब विरुद्ध सज्जड पुरावा आहे. बाबासाहेबांनी आव्हान म्हणून ही केस स्वीकारली.. बाबासाहेबांनी परबची पोलीस लॉकपमधे भेट घेतली. त्याचा हा वृत्तांत.

मी परब. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे बाबा मला मांडीवर बसवून त्यांच्या कॉप्युटरवर काम करत असत. कधी कधी तासन तास त्यांचा हात चालत असे तर कधी कधी तासन तास शून्यात नजर लावून नुसतेच बघत बसत. क्वचित कधी टेबलावर मूठ आपटून शिव्या देत.
“काय झालं बाबा?”
“हा कॉप्युटर! हे पहा मिस्टर कॉप्युटर लास्ट ट्राय. आता जर हे कोड कंपाईल नाही झालं तर ना तुला भंगार मध्ये टाकून देईन.”
तशी वेळ नाही आली. बाबांचा तो कॉप्युटर अजून माझ्याकडे पडून आहे. जपून ठेवला आहे. बाबांची आठवण म्हणून. बाबा गेल्यावर मी त्याला कधीच चालू केला नाही. माझी खात्री आहे कि तो आता “डेड” झाला आहे.
बाबांचा कॉप्युटर बाबांशी बोलत असावा. तो माझ्याशी कधी बोलला नाही. मीही त्याच्याशी कधी बोललो नाही.
बाबा गेले तेव्हा त्यांचा मोठा भाऊ आला होता. काकाच्या डोळ्यात आसवाचा एक थेंब पण नाही आला. हे कसे होते? तेव्हा मला समजलं नाही. आता समजतंय. पिकलेली माणसे रडत नाहीत. हसत नाहीत.
They just push through.
काका आपल्या हाताच्या तळव्यांकडे बघत मला म्हणाला. “भाऊ थोडा क्रॅक होता. थोडा म्हणजे बराच. आमच्या म्हणजे आपल्या घरात तो सगळ्यात हुशार. त्याचे टीचर म्हणायचे हा अलौकिक पुरुष आहे... असेल. पण काय उपयोग त्याचा? घरात माणसाशी सोडून सगळ्यांशी तो बोलायचा. सगळ्यांशी म्हणजे टेबल, खुर्ची, पंखा, फोटो, सगळ्यांशी म्हणजे कुणाशीही.”
काका थोडा थांबला. तो पहिल्यांदाच माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलत होता.
“आम्ही भाउला सगळीकडे दाखवला. डॉक्टर वैद्य मांत्रिक पण सगळ्यांनी हात टेकले. मुंबईला मोठ्या डॉक्टरकडे दाखवला. ते म्हणाले कि बरा होईल असे खात्रीपुरक सांगता नाही येत. खूप दिवस लागतील.”
“तिथेच त्याची आणि कॉप्युटरची गाठ भेट झाली.”
मला म्हणाला, “दादा, मला एक कॉप्युटर घेऊन दे.”
बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने जांभई दाबून धरली. परबच्या नजरेतून ती निसटणे शक्यच नव्हते.
“सर, तुम्ही कंटाळला आहात. हो ना.”
मुलाखतीच्या सुरवातीला परब गोंधळल्या सारखा दिसत होता. पण आता तो आत्मविश्वासाने बोलत होता.
“हे पहा परब, आपण हा फापटपसारा सोडून मूळ मुद्द्याकडे जाऊ या का? म्हणजे तू त्या इसमाचा खून का केलास? त्याला काही खास कारण होते? तो तुला ब्लॅकमेल करत होता का?.काहीही करून तुला फाशीच्या फंद्यातून सोडवणे हे माझे उद्दिष्ट आहे. पण त्यासाठी मला आधी सर्वकाही समजलं पाहिजे.”
“सर, फाशीला मी भीत नाही. भीत असतो तर ह्या आधी मी दोन लोकांना “मुक्ति” दिली ती दिली नसती. भले तुम्ही त्याला खून म्हणत असणार.”
“ओह माय गॉड! दोन खून? आणि कुणालाही संशय आला नाही?”
“तीच तर खरी गंमत आहे.”
गंमत? गंमत! ह्याला खून म्हणजे गंमत वाटतेय.
बाबासाहेबांना क्षणभर वाटले कि केस अगदी साधी आहे. कोर्टात सिद्ध करायचे कि परब ठार वेडा आहे, त्याची अस्तित्वावरची पकड सुटली आहे. तो काय करतो आहे याची त्याला जाणीव नाहीये. ह्याला शिक्षेची नाही, मानसोपचारांची गरज आहे.
“परब, अशी जबानी तू कोर्टात देशील?”
“का नाही? पण त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण त्या दोनी बळींचे रेकॉर्डही तुम्हाला मिळणार नाही. माझा पहिला बळी होता गजानन सदावर्ते. तो “फनजॉब” बँकेच्या “खारमहाल” शाखेत मॅनेजर होता. हे जर मी कोर्टात सांगितलं तर? कोर्ट सहज सिद्ध करू शकेल कि फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत गजानन सदावर्ते नावाचा...”
“ओके समजलं. परब माझं डोकं काम करत नाहीये. मला विचार करायला वेळ पाहिजे. आपण उद्या पुन्हा भेटू आणि बोलूया का?”
“काही हरकत नाही. एक गोष्ट मात्र निश्चित समजून घ्या कि मी वेडा नाहीये. तुम्हाला मी केलेल्या दुसऱ्या खुनाबद्दल ऐकायचे नाही?”
“उद्या.”
पहिली मुलाखात इथेच संपली. कोडं सुटायच्या ऐवजी अजून गहन होत होतं. बाबासाहेब विचार करत होते. परबने त्या अनामिक तरुणाचा खून केला होता. पुरावा भक्कम होता. अंडरपासच्या अंधाऱ्या जागेत परबने त्या तरुणावर हल्ला केला होता. आणि धारदार रामपुरी चालवून त्याचा मुडदा पाडला होता. परबला खून करताना प्रत्यक्ष बघितलेले दोन साक्षीदार होते. परबच्या म्हणण्या प्रमाणे त्याने आधीच दोन खून केले होते. पण ह्या दोन खुनांचा माग लागू शकणार नव्हता.
काय करावे? बाबासाहेबांच्या पुढे एक पर्याय होता. “परब मनोरुग्ण आहे. त्याला शिक्षेची नाही तर उपचारांची गरज आहे.” अशी डिफेन्सची लाईन पकडायची.
मला ब्रीफ करत बाबासाहेबांनी ही कल्पना सांगितली.
“पण बाबासाहेब, परब अजिबात वेडा नाहीये. तो अत्यंत प्रतिभाशाली आहे. त्याला वेडा कस काय ठरवणार आपण? कोण विश्वास ठेवेल?”
“होय अनंत राव, तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजतंय. पण तेव्हढाच एक मार्ग उरलाय तुमच्या मित्राला वाचवण्याचा. इलाज नाहीये. मी ही लाईन पकडली तर सरकारी वकील कोर्टात ठणकाऊन काय सांगेल ते ही मला माहित आहे. सांगेल कि ही बाबासाहेबांची आरोपीला वाचवण्याची फुसकी चाल आहे. कोर्ट मग सरकारी डॉक्टरांकडून परबच्या मानसिक स्थिती बद्दल अहवाल मागवेल. त्यात परब फसला तर माझ्या करिअरवर ही केस...”
इथे फ्रेनीची एन्ट्री होतेय.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
फ्रेनी एक मानसोपचार तज्ञ आहे. बाबासाहेबांच्या काही केसेस मध्ये फ्रेनीने त्यांना मोलाची मदत केली होती.
फ्रेनीला परबच्या केसची थोडी कल्पना द्यायचा बाबासाहेबांचा इरादा होता.
“फ्रेनी माझ्या हातात सध्या परब नावाच्या एका तरुणाची...
“कोण? परब? हो हो मी पेपरमध्ये वाचलं आहे.” फ्रेनी त्यांना मधेच आडवत बोलली,
“फ्रेनी, मादाम, जरा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे.”
“ओके! बोल दिक्रा.”
बाबासाहेबांनी फ्रेनीला परबची केस समजाऊन सांगितली. त्यांनी शेवट असा केला.
“परब मला जे सांगतोय कि त्याने फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत काम करणाऱ्या गजानन सदावर्तेचा खून केला आहे. ह्या प्रकरणाची मी माझ्या पद्धतीने डिस्क्रीट चौकशी केली. फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेतच असं नाही तर कुठल्याही शाखेत गजानन सदावर्ते नावाचा कोणीही इसम कधीही नोकरीला नव्हता. तर मग परबने मला थाप मारली? तो खरच खरं सांगतोय कि खरच खोटं बोलतोय? फ्रेनी, अंडरपासच्या खून प्रकरणात त्याच्या विरुद्ध भक्कम पुरावा आहे. कोणीही वकील त्याला फाशीच्या फंद्यातून वाचवू शकणार नाही. म्हणून “परब हा मनोरुग्ण आहे” असा स्टँड मी घेणार आहे. का कुणास ठाऊक पण ह्यावर माझा स्वतःचाच विश्वास नाहीये. तो खरच मनोरुग्ण आहे कि त्याने सोंग काढले आहे? तेव्हा फ्रेनी, तू प्लीज त्याच्याशी बोल आणि माझी संभ्रमावस्था दूर कर.”
“लुक्स इंटरेस्टिंग. ओके. डन. मी बोलेन त्याच्याशी. तू आमची मिटिंग अरेंज कर.”

(फ्रेनी जोशी आणि परब ह्यांच्या भेटीचा वृत्तांत. फ्रेनीने काढलेल्या नोट्स वरून.)

“हलो फ्रेनी, कशा आहात? मी? मी मजेत.” फ्रेनीला थोडं आश्चर्य वाटले.
“परब, तू असं बोलतोय कि जणू आपली ओळख आहे.”
“नाही तसं नाही. पण तुमचा लौकिक मी जाणून आहे,”
“छान. परब, बाबासाहेबांनी मला...”
“ते मला समजलच. त्यांना वाटतंय कि मी वेडा आहे पण त्यांची खात्री नाहीये.”
“एक मिनिट, बेटा. आमच्या डिक्शनरीत “वेडा”असा शब्द नाही. मनोरुग्ण. माझ्या मते आपण सगळे कमी जास्त प्रमाणात मनोरुग्ण आहोत. पण ते जाऊ दे. तू तुझी स्टोरी सांग. तुझ्या म्हणण्या प्रमाणे तू आधीच दोन खून केले आहेस, आणि अंडरपासमधला खून म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिसरा. बरोबर?”
परबच्या चेहेऱ्यावर विषण्ण हसू होते.
“फ्रेनी, मी किती खून केले असतील? तीन? चार? कदाचित जास्तच पण कमी नाहीत. खून करणे हा माझा छंद झाला होता. मी खून का करत होतो? मी कशाचा तरी शोध घेत होतो. माझ्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा. मी केलेले खून हे त्या तत्त्वज्ञानाची कन्फर्मेटरी टेस्ट होती. मात्र अंडरपासमधल्या केसमधे ती फेल झाली.”
“मला नीट सविस्तर सांग. पहिल्यापासून.”
“ओके, अॅज यू विश. सुरवातीपासून सविस्तर सांगतो.”

परब सांगत होता.
ती संध्याकाळ मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आजू बाजूच्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत घेत, गाणी ऐकत मी आणि माझा मित्र अंत्या मजेत चाललो होतो. मी गाडी चालवत होतो. आमच्या समोर मुला मुलींचा एक ग्रूप सायक्लिंग करत हसत खिदळत चालला होता. मधेच आमच्या समोर येऊन रस्ता आडवत होते. जणू मुद्दाम पंगा घेत होते. आमच्या कडे बघून फिदी फिदी हसत होते. तो ग्रूप बहुतेक सहलीला निघाला असावा. मी जोरात हॉर्न देत गाडी पुढे काढण्याच्या प्रयत्नात होतो. शेवटी जेव्हा त्यांनी पास दिला त्यावेळी मी वेग वाढवून पुढे जाणार तेव्हढ्यात एक पोरगी माझ्या समोर आली. आता ही बया मधेच कुठून आली असा विचार करायच्या आधीच माझ्या गाडीने तिच्या सायकलला धडक मारली. हे सगळे क्षणार्धात घडले. एक अस्फुट किंकाळी.
किंकाळी कुणी फोडली? मी, अंत्याने का त्या मुलीने?
कलिंगडावरून गाडी जावी तसा काहीतरी फील मला आला. बापरे, हे काय झाले? मी एका मुलीला चिरडले होते. तत्क्षणी भीतीने माझा ताबा घेतला. पोटात खड्डा पडला. गाडीचा ताबा सुटला आणि गाडी रस्ता सोडून बाजूचा नालीत हेलपांडत गेली. मी कसाबसा गाडीच्या बाहेर पडलो आणि धावत सुटलो, पाठीमागे वळून पहायचे धैर्य नव्हते. ऊर फुटेस्तोवर धावत होतो. शेवटी एकदाचा जवळच्या पोलीस ठाण्यात पोचलो. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. कुणी तरी शिपायाने पाण्याचा ग्लास पुढे केला. माझे सगळे बंध सुटले. मला अजून आठवतंय, मी ओक्साबोक्शी रडत होतो.
“गेली. बिचारी पार ठार झाली असणार.”
“शांत व्हा. घाबरू नका. तुम्ही पोलीस ठाण्यात आहात. इथे तुमच्या केसालाही कुणी हात लावू शकणार नाही. काय झालय ते सविस्तर सांगा.” बोलणारा बहुतेक इन्स्पेक्टर होता. थोडा धीर धरून मी सांगितले, “इन्स्पेक्टर, म... म... माझ्या हातून भीषण अपघात झाला आहे. मी एका तेरा चौदा वर्षांच्या मुलीला धडक देऊन उडवले आहे.”
पोलिसांनी ताबडतोप जीप काढली, मला घेऊन ते अपघाताच्या जागी गेले. बाजूच्या नालीत माझी गाडी पडली होती. तेव्हढी एक गोष्ट सोडून अपघाताची एकही खूण तिथे नव्हती. माझी अपेक्षा होती कि तिथे त्या मुलीची चेंदामेंदा झालेली बॉडी असणार आणि बाजूला तिची सायकल. त्या दृश्यासाठी मी माझे मन घट्ट केले होते. पण इथे तसे काहीही नव्हते. हा माझ्या साठी प्रचंड धक्का होता. नेमके काय झाले होते? कुठे गेली होती ती मुलगी? आणि त्या मुलांची गँग?
तो अपघात? ते स्वप्न होते कि आता मी स्वप्न पहात आहे? मी भ्रमिष्ट झालो आहे काय?
इन्स्पेक्टरने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एका हवालदाराची अपघाताच्या जागी ड्युटी लावून त्याने मला जीपमध्ये बसवले.
आम्ही पोलीस चौकीत परत आलो. तेथून पुढे माझी वरात तालुक्याच्या गावी निघाली. सरकारी इस्पितळात माझी सर्वांगीण तपासणी झाली. त्यात “ड्रंक ड्रायविंग” चीही परीक्षा झाली. मी ठणठणीत होतो आणि माझ्या रक्तात अल्कोहोलचा टिपूसही मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी वेड्यांच्या इस्पितळातून डॉक्टर आला. त्याने मला खोदून खोदून प्रश्न विचारले. माझ्या आई बाबांविषयी माहिती विचारली. मी ती सांगितली. त्यावर तो म्हणाला, “हम्म, एकूण आनुवंशिक प्रकरण दिसतेय.” नंतर एक विचित्र चित्रं असलेली एक वही त्याने मला दिली. (नंतर मला माहित पडले कि ह्यालाच इंकब्लॉट टेस्ट म्हणतात.)
ssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss

“हे पहा – काय तुमचे नाव बरं- परब नाही का, हा तर परब, मी औषधं लिहून देतो. ती वेळच्या वेळी घ्यायची. चुकवायची नाहीत. काळजी घ्या.”
औषधाचे नाव होते अरीस्ताडा(Aristada).
“घ्या हे महिनाभर. जर रिलीफ मिळाला नाही तर मग पुढे बदलून पाहू. महिन्यानंतर भेटा.”
त्यानंतर इन्स्पेक्टरची आणि डॉक्टरांची माझ्या अपरोक्ष चर्चा झाली असावी. इन्स्पेक्टरने माझी बंदिवासातून सुटका केली आणि घरी जायची परवानगी दिली. जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, “मित्र ह्या नात्याने सल्ला देतो, माझे ऐकाल तर तुम्ही
ड्रायविंग न कराल तर बरं. एक ड्रायव्हर ठेवा. आणि जर पुन्हा असा प्रकार घडला तर तुमचा ड्रायविंगचा परवाना रद्द होईल. हे बरिक लक्षात असूद्या.”
“हो लक्षात ठेवेन. आभारी आहे.”
मी घरी परत आलो. पहिल्या प्रथम नेट उघडून अरीस्ताडा(Aristada). गुगल केले. हे स्क्रिझोफ्रेनिया वरचे औषध निघाले.
ओह. म्हणजे हे लोक मला वेडा समजत होते. माझी खात्री होती कि मी वेडा नाहीये. जो अपघात झाला होता तो खरंच झाला होता.
एक्स्क्यूज मी, मला (मी म्हणजे म्हणजे अनंत) इथे काही भर घालायची आहे. ह्या प्रसंगा नंतर परब माझ्या ऑफिसात आला होता.
“अंत्या, काल काय झालं...”
त्याला मध्येच थांबवत मी म्हणालो, “काल नाही. त्या गोष्टीला आज तब्बल चार दिवस झाले आहेत. मी साक्षीला होतो. माझ्या समोरच सगळं घडलं.”
“छान. तू सगळं बघितलं आहेसच. तुला काय वाटतय जे घडले ती रीअॅलिटी होती का माझा भ्रम होता?”
“जे घडले ते सत्य होते. पण मला वाटतय कि भुताटकी भुताटकी म्हणतात ती हीच असावी.”
माझ्यासाठी हे एव्हढे पुरेसे होते पण परब बीइंग परब, त्याच्यासाठी हे आव्हान होते.
पुढे वाचा परबच्याच शब्दात.
मी माझ्या पद्धतीने ह्या अपघाताचा छडा लावायचे ठरवलं. अपघाताच्या दिवशीची वर्तमानपत्रे चाळली. कुठल्याही पेपरमधे अपघाताची बातमी नव्हती. अपघात जिथे झाला ती जागा हवेली तालुक्यातली होती. अगदी “हवेली समाचार”, “हवेली वार्ताहर” ही चाळले. अपघाताची बातमी कुणीही दिली नव्हती.
आता मात्र मी हबकलो. माझा माझ्याच अस्तित्वावरचा विश्वास उडाला. मी खरच आहे कि कुणाच्या स्वप्नातील एक व्यक्तिमत्व आहे. आजूबाजूचे जग भासमान वाटू लागलं. मी गोंधळलो होतो. ह्यातून सुटका मिळावी म्हणून मी तत्वज्ञनाची पुस्तके वाचायला सुरवात केली.
फ्रेनी मादाम, तुम्ही मनोवैज्ञानिक आहात. मी काय बोलतो आहे हे तुम्हाला समजत असेल. निश्चितपणे तुम्ही थोडेफार वाचन केले असणार. ब्रह्म, माया, सॉलिप्सिझ्म, ऑंटालॉजी.हे शब्द कानावरून गेले असणारच. ओके. किमान देकार्त तरी माहित असेल. हो हो तोच तो, आय थिंक, देअरफर आय अॅम! का आय अॅम देअरफर आय थिंक! व्हाटएवर. ह्या वचनात मला जीवनाचे सार गवसले. हे पहा माझे तत्वज्ञान.
आय थिंक देअरफर यू आर. ही, शी, इट, इज. दे आर.
ह्या विश्वाचा निर्माता मी आहे. मीच हे डोंगर, नद्या, सागर, चंद्र-सूर्य-तारे निर्माण केले. त्यांना भूतकाळ दिला. त्यांचा भविष्यकाळही मीच ठरवणार.
असे असेल तर मग प्रत्येक व्यक्तीला ठराविक साच्याचे विश्वरूपदर्शन का होते? सिम्पल. आपल्याला स्वतंत्रपाने विचार करायची शक्ती येईस्तोवर डाय इज कास्ट. सर्वसाधारण माणसाचे कंडीशनिंग त्याच्या जन्मापासून होते. त्याचे आईबाबा, नातेवाईक, शाळा, समाज हे सगळे नकळत हे “कार्य” करत असतात.
मला एक सांगा, “लाल” रंग म्हटल्यावर तुमच्या मनात काय भाव येतात? हे शब्दात पकडता येणारं नाहीये. तुमच्या मित्राच्या डोळ्यांना तो लाल रंग कसा दिसत असेल?
तुम्ही “द डोअर्स ऑफ परसेपशन” हे ऑल्डस हक्सलेचं पुस्तक वाचलं आहे? “मेस्कालीन” नावाचं ड्रग आहे. ते घेतल्यावर विश्वात कधीही दिसणार नाहीत असे रंग तुम्हाला दिसतात. कोण निर्माण करते हे रंग? आपणच, आपले मन, आपला मेंदू!
ओ येस. आपला मेंदू. हे एक नवीन तत्त्वज्ञान.
फ्रेनी, तुम्ही कंटाळला असणार. नाही? गुड.
पण मी मुळात विज्ञानाचा अभ्यासक आहे. म्हणून अशा भ्रामक कल्पनांवर माझा सहजासहजी विस्ग्वास बसणे शक्य नव्हते. मला माझ्या तत्वज्ञानाची पडताळणी करायची होती. मी सुरवात माझ्या फौंटनपेन पासून करायचे ठरवले. हे फौंटनपेन माझ्या मनाने तयार केले आहे. असे असेल तर त्याच मनोबलाने मी त्याला नाहीसेही करू शकतो. ही माझी धारणा होती. त्या दृष्टीने मी माझे प्रयोग चालू केले.
फौंटनपेन नाहीसे करणे हा माझा पहिला टास्क होता. शरीरातील सर्व उर्ज्वा मी फौंटनपेनवर एकवटली. आणि महादाश्चार्यम्! फौंटनपेन माझ्या विश्वातून नाहीसे झाले. मात्र ह्या प्रयोगाने माझा शक्तिपात झाला. मी पलंगावर कोसळलो.
(सॉरी, डिस्टर्ब करतोय. पण परबने ऑफिसात येऊन मला ह्याचा डेमो दिला. माझ्या टेबलावरचा काचेचा पेपरवेट बघता बघता नाहीसा झाला. मी घाबरलो, आणि टेबला वरचे सगळे कागद आवरून कपाटात टाकून कुलूप बंद केले.
“परब, पेपरवेट कुठे नाहीसा केलास?”
“अंत्या, घाबरू नकोस, त्याला मी पाचव्या आयामात पाठवले आहे.”
“परब, प्लीज असा सायंटीफिक जार्गनमध्ये नको ना बोलूस. जीव घाबरा होतो.”)
बॅक टू परब.
अशाप्रकारे माझा पहिला प्रयोग यशस्वी झाला होता. या यशामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. म्हणजे मी योग्य मार्गावर वाटचाल करत होतो. किल्ल्यांचा जुडगा, फुलदाणी, फुलांचा गुच्छा अशा लहान सहान गोष्टी मी सहज गायब करू लागलो. आता असं वाटत कि मी इथेच थांबायला पाहिजे होतं. पण ते होणं नव्हतं.
माणूस कितीही ज्ञानी झाला तरी त्याच्या मनात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू सूक्ष्म प्रमाणात का होईना वास्तव्य करून असतातच. खोटं कशाला बोलू? ते माझ्यातही होते.
zzzzzzzzzzzzz

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती इंटरेस्ट ing आहे हे..
पु भा प्र
.
आता मलासुद्धा computer सोबत बोलायची सवय आहे तिचं काय करु सांगा बरं?

किल्ली
Consider yourself Lucky.
तुम्हाला असा मित्र मिळाला आहे, जो
-अत्यंत विश्वासू आहे.
-तुम्हाला बोअर करत नाही
-खोटी तोंडदेखली स्तुति करत नाही
-तुमच्या चुका लगेच दाखवून देतो
-तुमच्या आज्ञांचे पालन करतो.
असे बरेच आहे. सगळे आठवत नाहीये आत्ता. तेव्हा ही मैत्री दृढ ठेवा.
साधना, ललिता-प्रीति
आभार!

हो हो. मला त्याला रागवता येतं आणि कितीही रागावले तरी तो उलट उत्तर देत नाही, तेवढ्याच तन्मयतेने कामं करतो.
धन्यवाद

John Greesham मराठीत लिहू लागला की काय?>>> जरा उलगडून सांगाल काय? मी तुम्हाला विपु सुद्धा केली आहे. पण उत्तर इथेच द्याल तर बरे होईल.
आता कथेचा तिसरा भागही -शेवटचा - टाकत आहे. प्लीज तोही वाचा.
ही कथा मी मिसळपाव वर पण प्रसिद्ध केली होती. ती तशीच काहीही बदल न करता इथेही आहे.
कृपया तीनही भाग वाचून आपले मत नोंदवा.

Srd
अत्यंत आभारी आहे.
इथे आधीच माझ्याविरुद्ध काही आयडी कार्यरत आहेत.
ह्या आपल्या अश्या क्रिप्टिक प्रतिसादामुळे त्याना आयतेच हॅन्डल उर्फ कोलीत मिळेल.
Extremely sorry for my outburst. Hope you won't mind.

मी पूर्वग्रह ठेवत नाही.
कथेची गुंतागुंत, प्रवाहीपणा, पुढे काय होणार ही उत्सुकता, एकदा का पात्रं आणि प्रसंगांच्या कोंडीत वाचकांना पकडले की मग कथेच्या शेवटी कथेचा वेग वाढवणे या गोष्टींना महत्त्व असते. ते तुम्हाला जमलं आहे. त्यामुळे Greesham ची आठवण झाली.

Srd
थंँक्स.
पण Greeshamला काय वाटेल त्याचा तरी विचार करायचा ना.

मस्त. वेगळा विषय. पुढील भागही वाचायला हवेत. पण किल्ली म्हणत होती तशी मलाही काही वेळा काही वस्तूंशी बोलण्याची हुक्की येते. उदाहरणार्थ स्कूटर वर बसण्यापूर्वी वगैरे तिला "चला..", इ. म्हणणे.
ही गोष्ट वाचून आता या बोलण्याच्या हुक्कीचा अर्थ काय, असं वाटतं आहे. Uhoh