किल्ला - एक सिनेमॅटिका

Submitted by रघू आचार्य on 9 August, 2024 - 12:46

काम करता करता एखादं गाणं आपण ऐकायचा प्रयत्न करतो. क्षणभरातच आपल्या लक्षात येतं कि एक तर काम करूयात किंवा हे गाणं ऐकूयात.

काय नसतं त्यात ?
आलापीने सुरूवात होतं. गायिकेने सा लावलेला.
सा SSSS

पुढे गूढ शब्द कानी येऊ लागतात. ते एका विलक्षण सुरावटीत बांधलेले..
सुरावट ओळखायचा आपला यत्न सुरू होतो. आपल्याला त्यातलं काही समजत नसतं.
पण मागे केलेल्या प्रयत्नातून सरावाचे झालेले.

नी रे ग रे, ग म , ध नी सा
सा नी ध प , म ध प म ग रे
ग म प म ग रे, नी रे सा

अरेच्चा ! यमन...
हा थोडा थोडा ओळखता येतो.
मग आपण त्या गाण्यात आणि खेळात ओढले जाऊ लागतो. म्हणून आपण गाणे थांबवतो.
कामं फटाफट उरकून घेतो.

रात्री निवांत मग सर्च देऊन ते गाणं ऐकत राहतो.
शब्दांचं सौंदर्य, सुमधूर चाल , त्याचे गूढार्थ.. गाणं ऐकता ऐकता खेळ सुरू होतो आणि आपण त्यात हरवून जातो.

किल्ला हा असाच एक अनुभव आहे.

सुरूवातीचीच फ्रेम. कोकणातली एका आळीतली वीटकरी पायवाट.
पावसाळी वातावरण. हॅण्ड हेल्ड कॅमेरा वर्क मुळे चालल्याचा भास.

पुढची फ्रेम
समुद्रकिनारा. किनारा थोडा उंच असल्याने समुद्राची गाज ऐकू येते. कॅमेर्‍याचा कोन किनार्याला किंचित कोन करून असल्याने समुद्राचे दर्शन.

killa3_0.png

पुढच्या फ्रेम मधे अगदी समुद्राला पुढ्यात घेणारा कोन.
वाईड व्ह्यू लाँग शॉट.
मागच्या दोन्ही फ्रेममधे भरून राहिलेली निळाई आणि आता समुद्राच्या आणि कॅमेर्याच्या मधे एक लहान मुलगा स्तब्ध उभा. पाठमोरा.
एखादे स्थिर चित्र असावं आणि त्यात फक्त लाटा हलत्या रहाव्यात असं सुंदर व्हिज्युअल.

killa2.png

त्या मुलाच्या मनात कसली खळबळ चालली असेल ? या फ्रेम मधे ते एस्टॅब्लिश होतं आणि त्याच वेळी जाणिव होते कि आता आपल्याला व्हिज्युअल्स आणि प्रतिमांचा खेळ पहायला मिळणार आहे. आता नेहमीप्रमाणे मल्टीटास्किंग करत पाहता येणार नाही सिनेमा.
मग सरसावून बसत पहावा लागतो.

पुढची फ्रेम एक कोकणी घर आहे. पावसाळी कुंद वातावरण आहे. नैराश्याची प्रतिमा.
पावसाची सर कोसळतेय. कॅमेरा स्थिर आहे. तोच मुलगा फाटक उघडतो आत जातो.
पावसाचा आवाज भरून राहिला आहे.

आता तो आत येऊन कंदील पेटवतो. त्याला आपली कामे करायची सवय आहे.
त्याबरोबर आतली शांतता ऐकू येऊ लागते. पावसाचा आवाज बाहेरच राहतो.
कॅमेरा आता घराच्या दारातून फाटकाकडे.

त्यातून एक स्त्री फाटक उघडून छत्री सावरत येते.
" अरे इतका ओला कसा ? भिजलास का ?"
त्याचं एक नाही आणि दोन नाही.

तो पावसात भिजूनही कोरडाच आहे. तोच कोरडेपणा त्याच्या बोलण्यात आहे. तुटक उत्तरात आहे.
संवादातून समजतं कि त्याची आई आहे.
त्याची नाराजी या वातावरणातून आपल्या मनावर दाटत जायला सुरूवात होते.

दोघं माय लेकरं पुण्याहून कोकणात आले आहेत. तिची बदली झाली आहे.
त्याचे वडील वर्षभरापूर्वी वारलेत. आई सरकारी नोकरीत आहे. तिच्या मागे दहा हजार कामे असल्याने रात्री लवकर झोपणे , लवकर उठणे यामुळे त्याचा ताबा बाबांकडे असायचा. ते गोष्टी सांगायचे. त्याचं विश्व व्यापून राहिले होते.
दुसरा मामाचा मुलगा सागर.

आता वडील नाहीत. त्यांची कमी जाणवतेय. इथे कुणी ओळखीचं नाही.
तो अंतर्मुख आहे. पुण्यातल्या शहरी वातावरणात वाढलेला. शहरी संस्कारात मोठा झालेला.
इथे सरकारी शाळेत त्याला वेगवेगळ्या थरातले सवंगडी भेटतात.
मुलांची मैत्री पटकन होते. त्याला थोडा वेळ लागतोय.

पण ही मुलं वांड असली तरी मैत्रीला जागणारी आहेत.

त्यांच्यासोबत तो एक वेगळं जीवन जगू लागतो. पुलावर बसून दोरीला गांडूळ बांधून ते पाण्यात सोडायचं आणि काही लागलं कि ती काठी ओढायची. शहरी लोकांचं गळ टाकून बसणं हा एक उच्चभ्रूंचा खेळ समजला जातो.

त्याला इथे ओंड्या, बंडू आणि अन्य मित्र भेटतात. एका मुलाचे वडील दुबईवरून वस्तू आणून विकत असतात. त्यामुळे त्याच्याकडे गॉगल, कंपास, सायकल सगळं आधुनिक. त्याला वर्गात मोठा मान आहे.
शाळेतल्या बाई या पुण्याहून आलेल्या मुलाची ओळख करून देतात " हा चिन्मय काळे, चौथीला शिष्यवृत्ती मिळवलीय आणि आता सातवीला पण मिळवायची. आणि तुम्ही शिका जरा याच्याकडून"

त्यानंतर त्याचं नावच शिष्यवृत्ती पडतं.
शाळेतली दृश्य अस्सल आहेत. कोकणी भाषेचा लहजा नाही हे कोकणी माणसाला नक्की खटकेल.
पण माझ्यासारख्यांची सोय झाली.

ही मुलं एका कुत्र्याला धरून ठेवताना हा बघतो. एकाने रॉकेल आणलेलं असतं.
तो त्याचे लाड करून रॉकेलचा बोळा काढतो तितक्यात कुत्रं पळत सुटतं.

काही प्रसंगांनंतर ते कुत्रं त्याच्या घरात बेडखाली लपवलेलं दिसतं. त्याचे मित्र गावभर कुत्रं शोधत असतात पण त्यांना काही ते सापडत नाही.
हा सुद्धा सांगत नाही.

एक दिवस मित्रांसोबत समुद्रावर जाऊन खेकडे पकडतो. त्या दिवशी बाजारात खेकडे विकून येताना नवे अनुभव घेतो.
आता तो आईशी चांगला बोलतोय. तुटक बोलण्याऐवजी सलग वाक्यं बोलतोय.

एक नवीन विश्व त्याला मिळालं आहे.
इण्ट्रोवर्ड कडून एक्स्ट्रोवर्ड कडे त्याचा प्रवास चालू आहे. ही त्याची फेज आहे.
मुलं जुळवून घेतात, पण त्याची सुई बाबांच्या जाण्याने किंवा बदलीने अडकलेली होती.
थोडा थोडा मोकळा होतोय.

या त्याच्या कहाणीत आई अधून मधून डोकावतेय. पण जेव्हढ्यास तेव्हढी.
तिला पण ऑफीस मधे एक बड्या धेंडाच्या जमिनीच्या व्यवहारावर सही करण्यासाठी दबाव आहे. त्याच्या जमिनीवर कर्ज आहे. म्हणून ती बॅंकेची एन ओ सी आणा असं सांगतेय, जो कायदा आहे. तो धटींगण समजत नसल्यासारखा तुम्ही सही करा लगेच आणतो हे एकच पालुपद लावतो. अनेक सरकारी कार्यालयात हे चित्रं दिसतं. सरकारी कर्मचारी सामान्यांना वेठीस धरतात हे खरे आहे. पण एखादा नियमाप्रमाणे काम करतो, त्याला निगेटिव्ह समजले जाते. जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना सरकारी कर्मचारी म्हणजे आपले खासगी सेवक वाटतात. नियम वगैरे वाकवता येतात हा त्यांचा समज असतो. आपल्यासाठी नियम वाकवणे हे आपली पत वाढल्याचे लक्षण आहे असा समज अनेकांचा आहे.

ऑफीसमधला जुना कर्मचारी त्या धटींगणाची माफी मागतो. "नवीन आहेत त्यांना माहिती नाही तुम्ही कोण ते... सांगतो समजावून". वगैरे
इथला त्यांचा साहेब सुद्धा "साळवी साहेब आहेत म्हणून विकास आहे. इथे उद्योग तेच आणणार आहेत, आता त्यांचीच फाईल अडवली तर कसं चालणार ? आम्ही पण अशी कामं करतोच. शेवटी साळवी साहेबच सर्वेसर्वा आहेत. काही होत नाही, तरी तुमचा निर्णय" असे सांगतात.

दबावाखाली तिने सही करायचा निर्णय घेतल्यावर नेमके ते प्रकरण विरोधकांकडून उचलले गेल्याने तिची रत्नागिरीला चौकशी चालू आहे.
ती पण तणावाखाली. सातवीतला मुलगा. अडंनिडं वय. तिचे ताणतणाव. त्याला याची काहीच कल्पना नाही.

दुबईवाल्या मुलाची सायकल आल्यावर शाळेतली मुलं त्याला राईड मागतात. तेव्हां तो रूबाब दाखवतो. त्यातून सायकलची रेस लावण्यापर्यंत बातचीत होते. रेसचा अंपायर कोण ?
तर बंड्या ओरडतो "शिष्यवृत्ती "

रात्री तो आईला बोलतो, आमच्या वर्गातल्या मुलाला बाबांनी सायकल घेऊन दिली आहे. गिअरची आहे.
ती त्याला जेव मुकाट्याने म्हणते.

पण दोन दिवसांनी दारात नवीन सायकल असते.
रेसच्या आधीच सायकल आलेली असल्याने आता अंपायर बंड्या.

रेस गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाणार असते. बंड्या बोटीत बसून खाडी ओलांडून पलिकडे किल्ल्यात पोहोचतो.
यांची रेस सुरू होते.
या संपूर्ण चित्रपटात सायकलची रेस, किल्ल्याचा प्रसंग आणि नावेतला प्रसंग व त्यानंतर त्या कोळ्याबरोबरचा संवाद हे महत्वाचे प्रसंग आहेत.

रेस सुरू होताना पहिल्यांदा पार्श्वसंगीत म्हणून व्हायोलिन्स वाजतात.
हा एक प्रसंग सोडला तर संपूर्ण चित्रपटात पार्श्वसंगीतच नाही. त्याची गरजच पडलेली नाही.

पार्श्वसंगीत म्हणून सगळे नैसर्गिक आवाज आहेत. वार्‍याचा आवाज, समुद्राची गाज, पक्षांचा किलबिलाट, कावळ्याची काव काव हे आवाज अगदी सुस्पष्ट आहेत. तसेच ते दूरवरून आल्यासारखे घेतले आहेत.

फोटोग्राफी डिपार्टमेण्ट आणि साऊंड या दोन्हींनीही कमाल केली आहे. विशेषत: साऊंड वाल्यांनी पावसाचे आवाज कसे घेतले असतील ?
फोटोग्राफी तर तुंबाडपेक्षा एक पाऊल पुढे आहे. एक एक फ्रेम्स वॉलपेपर म्हणून वापरता येण्यासारख्य़ा.

पाठमोर्‍या सीन्सचा प्रभावी वापर आहे. कुंद वातावरण नैराश्य दाखवण्यासाठी. यावरून आधी स्क्रीप्ट वाचून त्याबरहुकूम छायालेखन पूर्णपणे लिहीलेले असावे असे वाटते.

किल्ल्यात पोहोचल्यानंतर मुलं थोडी सैलावतात. त्यात ओंद्याला बंड्या त्याला आवडणार्या मुलीवरून चिडवतो. सातवीच्या वर्गात गावाकडच्या शाळेत जसं क्रशचं प्रकरण असायला हवं तसंच आहे हे. तो बंड्याला मारायला धावतो.

इथे चिन्मय एकटा पडतो. आणि तो फिरत फिरत किल्ल्ल्याच्या एका टोकाला येतो.
इतक्यात पाऊस सुरू झाल्याने तो लपायला एका अंधार्या गुहेत येतो. ते एक भुयार असतं.

तो उत्सुकतेने भुयारात उतरतो. पाणी टपकत असतं. त्या थेंब थेंब टपकण्याचा आवाज. अंधारात वाघळांचे आवाज येत असतात.
दोन्हीकडच्या टोकांना प्रकाश तीव्र वाटत असतो. प्रकाशाच्या मधे हे अंधाराचे बेट आहे. इतक्यात एका बाजूचा प्रकाश बंद होतो आणि काहीतरी सरपटल्यासारखा भास होतो. तो घाबरून दुसर्या टोकाने बाहेर येतो.

बाहेर लख्ख उजेड असतो. समोर पुन्हा समुद्र.

त्याने इथे ( या गावाला) यायच्या आधी त्याच्या भोवती किल्ल्यासारख्या अदृश्य तटबंद्या उभ्या केल्या होत्या. काही त्याच्या वातावरणातून आलेल्या. काही संस्कारातून. तर काही बाबा गेल्याने किंवा अन्य बाह्य कारणाने अंतर्मुख झाल्याने उभ्या झालेल्या. त्याचे अंतरंग एखाद्या किल्ल्यासारखे बंदीस्त झालेले आहे. तिथे काहीही शिरायला जागा नाही. म्हणजे नव्हती. किल्ल्याच्या तटबंदीमुळे बाह्य गोष्टींना आत प्रवेश मिळत नाही. आता मात्र एक एक तटबंदी गळून पडत असताना भुयारात काही तरी शिल्लक होतं.

मन हे असंच कोडं आहे.
एखाद्या बंदीस्त वाड्यासारखं.
एखाद्या माळरानावर उभ्या असलेल्या एकाकी वाड्याच्या तटबंदीतून आत पाऊल टाकावं.
समोर भलं मोठं दार बंद असलेलं दिसावं. ते उघडण्याची सुतराम शक्यता नाही. आत काय काय रहस्यं आहेत ठाऊक नाही.
प्रांगणात एक डोह असावा. त्यात डोकावून पाहिलं तर त्याचा थांगच लागू नये.
अथांग. खोल खोल खोल.

खूप वेळ पाहिल्यावर त्यातून भली थोरली नागीण बाहेर फणा काढून यावी.
तशी मनाच्या अंतरंगातल्या खोल कप्प्यातली ती अंधारी जागा. किल्ल्याच्या आतमधल्या भुयारात आहे.
ती शिल्लक आहे.
ती कधीही पुन्हा वाड्याचा ताबा घेऊ शकते. संपूर्ण काळोख करू शकते.
एखाद्या कॅन्सरसारखी ती गोष्ट फैलावू शकते.

चिन्मय बाहेर आल्यावर मित्रांना हाका मारतो.
पण त्या किल्ल्यावर तो एकटा असतो. अगदी एकटा.
त्याची सायकल एकटी असते.

इतक्या दिवसात तो चांगला रमला होता. खुलला होता.
या एका प्रसंगाने पुन्हा त्याच्या मनात ती अंधारी जागा खुणावू लागली आहे.
तो सर्वांवर नाराज आहे. आतल्या आत कुढतो. आईवर चीडचीड करतो.

पुन्हा खूप दिवसांनी मला नाही रहायचं या गावात. चल पुण्याला म्हणून मागे लागला आहे.
इतक्यात आईला रत्नागिरीला साहेबांपुढे जाब द्यायला जायचं आहे.
याला एक दिवस एकटं रहायचं आहे.

तो पुन्हा समुद्रावर पाठमोरा बसलेला आहे. आता समुद्राच्या लाटांचा जोर तितका नाही. पाय धुवायला यावात इतपत येतात.
त्याला नावाडी दिसतो.

तो काहीतरी फिनेलच्या रंगाचं पीत असतो. ही कसलीशी दारू असेल.
नारळाची असेल कदाचित.
याला पाहून तो बाटली देतो, पैसे देतो आणि भरून आण म्हणतो.

तो तिथून पळत सुटतो.
पण पुन्हा दुसर्या दिवशी त्याच्याकडे जातो तेव्हां तो विचारतो "येणार का आत?"
मग त्याच्या सोबत तो समुद्रावर जातो. त्याचे मासे पकडून होईपर्यंत दोघे बोटीव एकत्र असतात.

आल्यावर झाडाखाली तो शेकोटी पेटवतो. त्यावर मासे भाजायला सुरूवात करतो.
"खाणार ?"
"मी खात नाही"
"खाऊन तर बघ"
तो छोटासा तुकडा घेतो.
तो डोळ्यांच्या खूणेने कशी होती चव असे विचारतो.
चिनू हसतो.

आणखी एक निर्बंध गळून पडला. अजून एक तटबंदी गळून पडाली.
घरी कोण कोण आहे असे विचारल्यावर बाबा नाहीत हे सांगतो.
आई बरोबर आलोय हे ही सांगतो.

मग त्याच्या मनातला प्रश्न विचारतो.
"जर आपली बोट समुद्रात उलटली असती आणि आपण मेलो असतो तर ?"
ही असुरक्षितता. ती पुन्हा उफाळून आली आहे.

तो त्याच्याकडे बघतो " आई आहे ना घरी ?"
"हो"
"मग तसं कधीच होणार नाही "
तो विचारतो "तुझ्या घरी कोण कोण अस्तं "
त्याच्या उडवण्यावरूनच समजतं हा एकटा आहे.

त्या क्षणी त्याला समजतं...
आपला संरक्षक, आपल्या भीतीपासूनची सुरक्षित तटबंदी..
आपल्या जगण्याचा आधार, आपला किल्ला
म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून आपली आई आहे !

हे सत्य त्याला समजल्यावर तो घरी येतो.
आईला मिठी मारतो. ती पण याच्या वागण्यातला बदल पाहून चक्रावते.

तो दाराआड लपलेला असताना बंड्या त्याच्य़ा आईला सांगतो कि मी गावभर याला शोधून आलो.

त्या क्षणी त्याला समजतं आपण विचार करत होतो तसं काही नाही. कुणाला आपली पडलेली नाही असं काहीच नाही,
हा आपण आत मधे बनवलेला किल्ला आहे.

हा किल्ला ढासळतो आणि त्याचा सत्यातला किल्ला आईला तो शरण जातो.

रत्नागिरीच्या साहेबांनी तिला चूक मान्य करायचा सल्ला दिलेला असतो.
तिची पुन्हा बदली होते.

या वेळी तो किरकिर न करता तयारी करतो.

जायच्या आधी पुन्हा मित्रांसोबत किल्ल्यावर जायचा प्लान ठरतो.
गाव सोडून जात असताना त्याला किल्ला दिसतो तेव्हां किल्ल्यातले क्षण त्याला आठवतात....

आता त्याची अंधाराची भीती गेलेली असते. त्या बोगद्यात जाऊन आत्मविश्वासाने तो बाहेर आलेला असतो.
उजेडाकडे. समोर त्याचे मित्र असतात.

तो जाणार म्हणून खिन्न झालेले.
त्याने लपवलेले कुत्रे प्रेमाने सांभाळणारे.....!

************************************************************
यातल्या प्रतिमांनी किल्ला जसा दिसला तसे व्यक्तीकरण झाले आहे. अन्य कुणाला वेगळे काही दिसेल.

यातली दीपस्तंभाची प्रतिमा का घेतली असावी हे काही समजले नाही.
कुणी तरी सांगा प्लीज.
दिग्दर्शक म्हणून अविनाश अरूण आहे हे आता पाहिले. श्रेयनामावली पाहिलीच नव्हती. बायोग्राफी खूपच प्रभावी आहे. बरेच पुरस्कार मिळाले आहेत. पाताललोकचं दिग्दर्शन केलं आहे. एफ टी आय आय मधे १६ व्या वर्षीपासून कॅमेरामन म्हणून सहाय्य केले आहे. पुढे सिनेमॅटोग्राफीचा डिप्लोमा केला. स्टुडंट्स ऑस्कर मिळवलं. अशी प्रतिभा असल्यानेच अशी कलाकृती बनली आहे.
ध्वनीमुद्रणाच्या बाबतीत लहानपणी शंका असायची कि आपण बोलताना तर पाठीमागे संगीत वाजत नाही. मग चित्रपटातच का असतं ? Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही सब्जेक्ट, कंटेंट आणि स्टाईल- तिघांत छान आहात. हे तिन्ही आहेत, आणि लिहावंसं वाटतं तोवर लिहित राहा. कारण यातलं काहीतरी एकही नसलं तरी सारं कुठे संपतं- हे कळत नाही..

तुम्ही पटकथेसारखे किल्लाचे रसग्रहण लिहिले आहेत. किल्ला आणि अस्मिताने लिहिलेले दिठीचे रसग्रहण वाचून भीतीच वाटतेय कि आता हे चित्रपट बघितले आणि मनातल्या प्रतिमेशी खरे ठरले नाही तर?
लिहीत रहा...

आवडले!
मला आवडला होता किल्ला. भाषेबद्दल खटकले होते पण तरी सिनेमा आवडला होता.

सुरेख लिहिलेय. लहान मुलाचे भावविश्व उलगडून दाखवले आहे. पार्श्वसंगीत व प्रकाशचित्रण याविषयी लिहिलेलेही विशेष आवडले.

अदिती, Happy हा घे.
https://www.maayboli.com/node/85463

मस्त लिहिलंय.या पिक्चर बद्दल ऐकलं होतं पण बघणं झालं नाही.
तुमचं सर्व सिनेमॅटोग्राफी चं वर्णन छान आहे.(सहज फार वेळ न घालता जमलं तर) काही आवडलेल्या दृश्यांचे, छायाचित्रणाचे फोटोही टाका.

चित्रपट खूपच आवडल्याने लिहीलं आहे. कदाचित मला समजला तसाच असेल असं नाही. सांभाळून घेतल्याबद्दल सर्वांचेच आभार.

साजिरा प्रतिसादाबद्दल आभार. सिनेमा या विषयावर तुमच्या सर्वच पोस्ट्स सुंदर असतात.
कदाचित जवळून संबंध येत असल्याने असेल, नेमकी माहिती पण आढळते.

फारेण्ड - केली दुरूस्त चूक. महेश काळेंनी आपले अवघे अवकाश व्यापून टाकल्याने झाले असावे. Happy

@ माझे मन, पटकथेबाबत गंमतीने लिहीले होते चिकवावर. रूढ अर्थाने रसग्रहण तर नाही म्हणता येणार. कोडं सोडवायचा प्रयत्न म्हणता येईल.

सर्वांचे मनापासून आभार.

हा सिनेमा फारच खतरनाक आहे. आजवर तीन चार वेळा तरी बघितला असेल. दरवेळी बुडून जायला, रडायला होतं.

आणि रघू आचार्य, तुम्ही लिहिलंयही मस्त. काही काही जागा चांगल्या उलगडून दाखवल्यात. म्हणजे मला समजल्या नव्हत्या बघताना, आत्ता आठवतंय की हां, हे असं असं तुम्ही म्हणताय ते बरोबराय.

मुलांनी सगळ्या कमाल काम केलेलंय. बंड्या, अंड्या, युवराज,
ती स्वराली शिरधनकर..!
'गुणी बाळ' 'लाजाळू' 'इंट्रोव्हर्ट' चिन्मय काळे..!

काही प्रसंग, संवाद तर अगदीच मनात रूतून बसलेलेयत.
आई दिसल्यावर घाईघाईनं दचकून पत्र लपवणारा चिन्मय.
वर्गात सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्यामुळे बुजलेला चिन्मय.
कॉटखाली लपून बसलेल्या मोगली कडं बघून अस्फुट हसणारा चिन्मय.
त्या दीपस्तंभावर आईचा मूड चांगला करायला धडपडणारा चिन्मय.

शिवाय त्या दामले आज्जी अमृता सुभाषला म्हणतात, 'एकटेपण वाईट असतं गं.' हा प्रसंग.

किंवा अमृता सुभाष म्हणते, "तुला कळत नाही का रे चिन्मय? असं वागतात दुसऱ्यांकडे गेल्यावर?"
हा एक प्रसंग.

"घरी कोनकोनाय तुझ्या?"-- मच्छीमार
'आई' -- चिन्मय
"मग काय नसतं झालं तुला."-- मच्छीमार
हा प्रसंग तर फारच उच्च आहे म्हणजे.
"मग काय नसतं झालं तुला..!" या पाच शब्दात आख्ख्या सिनेमाचा अर्क उतरतो.

चिन्मय सगळ्यांवर रूसून मासेमाराबरोबर समुद्रात गेलेला असतो. दरवाजात काळजीत करत बसलेली त्याची आई. तो गेटवर दिसतो. आईची देहबोली क्षणात बदलून जाते.
स्वतःच्या सगळ्या भावभावना काबूत ठेवत विचारते. "चिनु, कुठे होतास दिवसभर. सांगून नाही का जायचं? अंधार किती पडलाय बघ." तो तिला सॉरी म्हणतो आणि घट्ट धरून ठेवतो. त्याला इथं कायतरी लख्ख समजलेलंय..!

अनुतै,
झी ५ वरून स्क्रीनशॉट घेता येत नाही. युट्यूबवर ट्रेलर आहे. तिथून दोन घेतले आहेत.

maitreyee , rmd , अदिति, स्वाती२ , माझेमन, mi_anu , फारएण्ड , अस्मिता धन्यवाद.

संप्रति,
खूप सुंदर प्रतिसाद तुमचा. आवडला.

अतिशय सुरेख लिहिलंय. किल्ला नवीन आला तेव्हा थिएटरमध्ये जाऊन बघितलेला, अप्रतिम अनुभव. आज तुम्ही वाचताना तो अनुभव परत दिलात.

सुरेख लिहिले आहे! हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघितला होता. तो अनुभव वेगळाच होता. त्यावर्षी ह्या चित्रपटाला उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी चा पुरस्कार मिळाला होता.

अन्जू आणि अनघा_पुणे आभार.
सांप्रति, पात्रांची नावे माझ्या लक्षात राहिली नाहीत.
तुमच्या लक्षात राहतात. स्मरणशक्ती उत्तम आहे.
तुम्ही मेन्शन केलेले संवाद, प्रसंग खूपच छान आहेत.

किल्ला पुन्हा एकदा वर काढण्यात येत आहे.
चित्रपट बनवण्याचं सखोल ज्ञान असतं तर असा सिनेमा बनवायला आवडलं असतं. आपलं सगळं एक रसिक म्हणूनच अडतं.

किल्ला पुन्हा एकदा वर काढण्यात येत आहे.
चित्रपट बनवण्याचं सखोल ज्ञान असतं तर असा सिनेमा बनवायला आवडलं असतं. आपलं सगळं एक रसिक म्हणूनच अडतं.>>>>तुम्ही जवळपास सर्व महत्वाचे सीन्स लिहिलात पण चिन्मयचा विहिरीत उडी मारण्याचा सिन आणि ती कविता राहीली.....

सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले,
वादळाने होडीस एका दशदिशांनी घेरले,
शीड तुटले, खीळ तुटले, कथा काय या वल्ह्याची,
नाविकास ही फिकीर नव्हती, पुढे राहिल्या पल्ल्याची...❤️

छान परीक्षण.. आवडलं..!
समुद्र प्रत्यक्षातही आवडतो.. चित्रपटातले त्याचे चित्रीकरण पाहायलाही आवडेल..
किल्ला चित्रपटाचं कौतुक केलेले लेख वाचले होते पेपरात..
काही चित्रपट पाहायचे आहेत त्यात किल्लाची भर पडली..
बघेन नक्की..!