सोबत

Submitted by SharmilaR on 8 August, 2024 - 07:14

सोबत

घड्याळाचा काटा पाच कडे सरकायला लागला, तसा शांताबाईंना हुरूप आला. आता एक, पाच दहा मिनिटात निघायचेच. चहा बिहा पिऊन आणी स्वत:चं आवरून तर त्या केव्हाच तयार झाल्या होत्या. रोजची सगळ्यांची भेटण्याची वेळ साडे पाचची होती. घरून तिथे पोचायला, अगदी सावकाश चाललं तरी पंधरा मिनिटेच लागत होती. तशा त्या पोहोचायच्या तिथे सगळ्यांच्या आधीच. मग पुढचा तास दीड तास कसा छान जायचा. ह्या संध्याकाळच्या वाटेकडे नजर लावून तर अख्खा दिवस सरत होता.

दीड वर्षांपूर्वी श्यामरावांच निधन झालं, अन् शांताबाई अगदी एकट्या झाल्या. तसा मुलगा सून होते गावातच.. पण मुलगा यायचा आठ पंधरा दिवसांनी भेटायला. सून तशी कमीच यायची. शांताबाईच जायच्या कधीतरी चार दिवस तिथे रहायला. पण त्यांना खूप उपऱ्यासारखं वाटायचं तिथे. मग कधी कधी तर त्या चार दिवस रहायला म्हणून गेलेल्या, दोन दिवसातच परत यायच्या.

काही जखमा असतात, कुणाला नं दिसणार्‍या पण आतल्या आत ठसठसण्याऱ्या .. श्यामरावांच्या एवढ्या चार पाच वर्षांच्या आजारपणात पण तशा त्या एकट्याच होत्या त्यांना सांभाळायला. वडीलांना दवाखान्यात नेणं आणणं वगैरे करायला मुलाची सोबत होती.. पैशांची पण त्याची मदत असायची. पण रोजच्या आयुष्यात मात्र ती दोघंच रहायची घरात. मग श्यामरावांच्या मृत्यू नंतर तर शांताबाईंनी ठरवलंच, होतंय, तोवर आपलं आपणच रहायचं. होता होईतो आपला भार नको कुणावर.. आणी लुडबूड पण वाटायला नको मुला-सुनेला त्यांच्या संसारात. पण आता आजारपणातून मिळालेल्या उसंती बरोबर, अख्खे रिकामे दिवस पण आलेत वाट्याला.

श्यामरावांच्या आजारपणामुळे शांताबाईंच पण बाहेर जाणं-येणं तसं अगदी कमीच झालं होतं. कामाला कुठे गेलं, तरी अर्ध्या-एक तासात परत यायला लगायचं त्यांना. आता मात्र तसं काही नव्हतं. कुठेही जाऊन कितीही वेळ घालवला, तरी घरात वाट पाहणारं.. आपली गरज असणारं कुणी नव्हतं. पण आता रोज रोज जायचं कुठे, ते मात्र कळत नव्हतं. शेजारी पाजारी होत्या तशा त्यांच्या वयाच्या बायका.. पण बऱ्याच जणी अजून मुला बाळांचे संसार सांभाळत होत्या, तर काहींच्या तब्बेतीच्या सततच्या तक्रारी. शांताबाई अजून ठकठकीत होत्या. आधी नवऱ्याचं करायचं म्हणून.. आणी आता एकटं रहायचं म्हणून.. त्यांना पर्याय नव्हता.

मग रोज संध्याकाळी त्या ह्या मंदिरात जायला लागल्या. मंदिराचं आवार मोठं होतं. तिथेच फिरायला चांगली जागा पण होती. आवारातच बसायला बाक होते. मग त्या टेकायच्या तिथेच. तिथे खेळणारी लहान मुलं बघत.. इतरांच्या गप्पा ऐकत.
अशातच मग त्यांची राधक्काशी ओळख झाली.. त्यांचे सुर जुळले आणी त्यात मग त्यांच्यात निमाताई पण आल्या. मग ठरवून तिघी रोज संध्याकाळी साडेपाच ला तिथे भेटायला लागल्या.

चहा संपवत राधाक्कांनी हातातलं पुस्तक खाली ठेवलं. संध्याकाळची बाहेर पडायची वेळ झाली होती. रिटायर्ड झाल्या असल्या, तरी त्यांनी स्वत:चा दिवस आखीव ठेवला होता अगदी.

आधी राधाक्कांना वाटलं होतं, निवृत्ती घेतली की, सकाळी उशिरा उठायचं, अलार्म नं लावता. आधी भरपूर आराम करायचा.. काही म्हणजे काहीच करायचं नाही. एवढे दिवस होतीच, सगळी नोकरीची दगदग. पण लवकरच त्या कंटाळल्या, आरामाला. मग त्यांनी स्वत:चा छान दिनक्रम ठरवून टाकला. सकाळी वेळेत उठून ऑनलाइन योगा सुरू केलं. मग चहा, नाष्टा, मग जरा बाल्कनीत लावलेल्या कुंड्यांची निगा... स्वत:च सावकाश आवरणं. मग जरा ड्रॉइंग आणी पेंटिंग... एवढ्या वर्षात ते करायला निवांत असा वेळ मिळालाच नव्हता. सगळा वेळ खडतर आयुष्याची लढाई लढण्यातच गेला होता.

राधाक्कांच लग्न झाल्यावर चार वर्षानी त्यांचा नवरा बदली निमित्त दुसऱ्या गावात गेला, स्वत:च्या आई वाडिलांजवळ राधाक्का ना ठेवून आणी मग त्याने सगळंच बदललं, संसार सुद्धा. ज्या सासू-सासऱ्यांना सांभाळायला त्यांना इथे ठेवलं, त्यांनीही संसार मोडल्याचा दोष राधाक्कांच्याच माथी मारला. पदरात तेव्हा होती दोन वर्षाची पूजा, आणी नाकारले पणाची भावना. मग घरच्या कुणाच्या मदतीशिवाय, स्वत:च्या बळावर त्यांनी पूजाला मोठं केलं अन मार्गी लावलं.

आता पूजा लग्न होऊन गेली अन् नोकरीतून पण निवृत्ती झाली. स्वत:ला हवं तसं जगायची मोकळीक मिळाली. आता त्यांना खूप काही करायचं होतं. एकटीला हवं तसं जगायच होतं. राहून गेलेलं शिकायचं होतं.

दिवसभर पेंटिंग, थोडं बागकाम, थोडं वाचन, थोडी झोप, थोडा टीव्ही असं झालं की संध्याकाळी त्या बाहेर पडायच्या. मंदिर, फिरणं.. परत येतांना भाजी-बिजी आणणं.. तिथेच त्यांची ओळख शांताबाईंशी झाली. दोघींनाही भरपूर मोकळा वेळ.. मग छान गप्पा रंगायला लागल्या त्यांच्या. काही दिवसांनी निमाताई पण आल्या त्यांच्यात.

कपबशा आवरत निमाताईंनी घड्याळाकडे नजर टाकली. नसती टाकली तरी चालणार होतं. त्यांच सगळं कामच रोज घड्याळाच्या काट्यावर अन् रावसाहेबांच्या इशाऱ्यावर चालायचं. पाच वीस झाले असणार आता. रावसाहेबांना त्यांची कुठलीच वेळ बदललेली आणी चुकवलेली चालत नसे. स्वत:च आवरून निमाताई तयार होत्या. आता शूज घातले की निघायचंच.

त्या मंदिरात पोचायच्या आधीच त्यांच्या नव्याने झालेल्या मैत्रिणी शांताबाई आणी राधाक्का तिथे आलेल्या असायच्या. त्यांच्या भेटीच्या ओढीनेच तर निमताईंना तिथे जायचं असायचं. नाहीतर फिरणं तर काय, पहाटे रावसाहेबांबरोबर व्हायचंच. पण मैत्रिणींच्या गप्पांची सर नवऱ्याबरोबर कशी येणार?

निमाताईंना पण संध्याकाळी मंदिरात वेळेवर पोहोचायचं असायचं. पण रावसाहेबांचा चहा झाल्याशिवाय निघता यायचं नाही, त्यांना घरातून. एवढी वर्षे मोठ्या पदावर काम केलेल्या रावसाहेबांना घरात सगळं हातात, आणी वेळच्या वेळी लागायचं. त्यामुळे घरचं आवरून निघायला त्यांना जरासा उशीरच व्हायचा.

निमाताईंना, शांताबाई अन् राधाक्का बद्दल किंचितशी असूयाही वाटायची. त्या दोघींना कसं स्वत:च्या मनाप्रमाणे वागता येतंय.. त्या दोघी आपल्या पेक्षा जास्त वेळ गप्पा मारत बसू शकतात. मग त्यांना जरा एकटं पडल्यासारखं वाटायचं. आपण त्यांच्या मैत्रीतून वगळल्या जातोय असं वाटायचं. हे असं सगळं वाटणं मग त्या, ‘ह्यांच, म्हणजे नं.. ह्यांना सगळं बाई हातात लागतं.. माझ्याशिवाय त्यांच पान हलत नाही..’ असं सांगत भरून काढायच्या.
आज पण त्या घाई घाईत दर्शन करून, त्यांच्या ठरलेल्या बाकाजवळ पोचल्या, तेव्हा शांताबाई अन राधाक्का च्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. बोलत बोलतच राधाक्का जरा सरकल्या, निमाताईंना जागा देण्याकरिता.

“वेळ छान घालवावा असं वाटतच हो.. पण नवीन काही शिकायची जरा भीतीच वाटते.. नाही जमलं तर.. हसतील सगळे..” शांताबाई म्हणाल्या.
“नं जमायला काय झालं..? अन् हसायला आहेच कोण आपल्या भोवती..? आपल्याला कुठे कधी स्टेज वर जायचं आहे..? आपलं सगळं आता स्वांत सुखाय..” राधाक्का सांगत होत्या.
“काय हो..? काय जमवायचं आहे..?” निमाताईंनी नेहमीच्या अधीरतेने विचारलं.
“गाणं हो.. गाण्याच्या क्लास बद्दल सांगत होते मी.. किती दिवसांपासून मनात होतं.. शांताबाईंना मी रोज म्हणत होते.. वेळ आहे आपल्याकडे तर जाऊया क्लास ला..” राधाक्का म्हणाल्या.

निमताईंना परत थोडं खुपलं. ‘राधाक्का रोज शांतबाईंना म्हणत होत्या..? मी नव्हते त्यात..?’

“अहो, किती वर्षात मी साधं गुणगुणले पण नाही.. आता या वयात .. आवाज कसा लागणार.. भीतीच वाटते हो..” शांताबाई म्हणाल्या.
“भीती कसली...? मी आज सकाळी जाऊन चौकशी करून आले. सगळ्या आपल्या वयाच्या बायका आहेत ताईंकडे एका बॅचला. मज्जा म्हणून येतात सगळ्या. आपण सुरवात तर करू या.. नाही जमलं तर नाही.. पण तेवढांच वेळ छान जाईल.. काही नवीन शिकण्याचं समाधान मिळेल.. ”
“खरंच हो.. मलाही शिकायचं आहे गाणं. आमची सूमा पण शिकतेय सध्या गाणं. ती सांगत असते.. सॅटर्डे संडे ला जाते म्हणे.. हे तर तिला नेहमी म्हणतात.... ” सुमा म्हणजे निमाताईंची सून. अमेरिकेत राहणारी.
“जाऊया नं मग..? सांगू मी ताईंना तसं..?” राधाक्कांनी विचारलं.
“चालेल.. कधीपासून जायचं आहे..?” शांताबाईंच्या आवाजात अजूनही खात्री नव्हती.
“मी पण येत जाईन तुमच्या बरोबर.. कुठे आहे क्लास?” निमाताई उत्साहाने म्हणाल्या.
“नेवेद्यम जवळ आहे. अगदी त्याला लागूनच बंगला आहे ताईंचा. ” राधाक्कांनी सांगितलं.
“बरं.. बघूया जाऊन.” शांताबाई तयार झाल्या.
“आठवड्यातून तीन दिवस असतो क्लास. सोमवार, बुधवार आणी शनिवार. वेळ चार ते पाच.” राधाक्कांनी पुढची माहिती दिली.
“अगबाई..? चार ते पाच..? मला वाटलं आपल्या संध्याकाळच्या ह्या वेळेत शोधलाय तुम्ही क्लास..” निमाताई भांबावल्या.
“आपल्या वेळेत कसा असेल निमाताई..? वेळ ताई ठरवणार. सीनियर बायकांकरिता त्यांची हीच वेळ आहे.” राधाक्का म्हणाल्या.
“पण साडेचार ला ह्यांची चहाची वेळ असते.. मला कसं जमणार?..” निमाताईंना काहीतरी निसटून चालल्या सारखं वाटत होतं.
“थरमास भरून ठेवला तर.. विचारून बघा तुम्ही त्यांना..” शांताबाईंनी सुचवलं.
“नाही हो.. ह्यांना नाही चालायचं तसं.. आपण दूसरा क्लास बघू या का..? आपल्या सोईच्या वेळेचा..? मी ह्यांना विचारू का..? त्यांच्या खूप ओळखी आहेत.. ते डिस्ट्रिक्ट.. ” निमाताई काहीतरी पक्क पकडू बघत होत्या.
“आम्हा दोघींना ही वेळ सोईची आहे. तुम्ही करा ना जरा अॅडजस्ट.. दुपारच्या वेळेत क्लास करून, उलट संध्याकाळ पण मिळतेय रोजच्या सारखी.” राधाक्कांना जरा रागच आला होता. एवढं काय सारखं नवरा नवरा करायचं?
“बघा, तुम्ही पण प्रयत्न करा.. ते नाही करून घेणार का, त्यांचा चहा..?” शांताबाई निमताईंना म्हणाल्या.

“मला नाही जमणार. चला, आता निघते मी.. स्वयंपाकाची वेळ झाली.. ” निमाताईं उठून साडी झटकत म्हणाल्या. त्यांना आतून तटकन तुटलच. खूप एकटं वाटलं त्यांना त्या क्षणी.

त्या दोघीं मध्ये आपलं त्यांच्या सोबत नसणं, त्यांना खूप खुपत राहिलं.
*******************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान कथा. तिघींच्या परिस्थितीचे आणि तिचा परिणाम झालेल्या स्वभावाचे चित्रण जमले आहे.

छान कथा. तिघींच्या परिस्थितीचे आणि तिचा परिणाम झालेल्या स्वभावाचे चित्रण जमले आहे.

>>> +१०००

छान आहे गोष्ट.

कुट्टी कुठे आहे ?? भेटली नाही खूप दिवसांपासून...

पुढचा भाग आहे का?>>
नाही. कथा इथेच संपली.
भाग २ येऊद्या. निमाता ईना जरा बन्ड करुदे!
आयुष्यभर नवऱ्याच्या तालावर नाचणाऱ्या बाईला या वयात बंड करणं अवघड आहे. त्यात त्यांच्या मैत्रिणींनी निमाताईंना येण्याचा आग्रहच धरला असता तर निदान त्यांनी काही प्रयत्न केले असते.
पण त्यांच्या मैत्रिणीं त्यांच्या अनुपस्थतीत काही ठरवतात.. त्यांना स्वत:हुन काही सांगत, विचारत नाही.. त्यामुळे वगळल्या जाण्याचं दु:ख्ख त्यांना आहे.

शर्मिला मानव स्वभावाची पारख आहे तुम्हाला. फार मस्त लिहीता हो.>>

@सामो,
कसचं कसचं..
आजूबाजूला दिसणारी माणसं आहेत ही.. कधीतरी मनात घोळत असतात मग.