शंभर वर्षं झाली असतील. म्हादू गुरवाच्या अडचणीत आज्यानं त्याची मदत केली. त्यानं माळावरली जागा लिहून दिली. गावामागचा डोंगर चढायचा, कातळ पार करायचा. जमीन खडकाळ. पुढे सगळी गुरवांचीच जागा. पण पडीक. पावसाळ्यात गवत वाढायचं, गुरं यायची. इतर वेळी पिवळा जर्द पडलेला आसमंत, कुठे थेंबभर पाणी नाही. माझ्या आठवणीत सळसळणाऱ्या वाऱ्याखेरीज इथे आवाज दुसरा नाही. हां, पल्याडच्या गावात कातळापासून फाडे पाडणारी फॅक्टरी बनली होती पंधरावीस वर्षांखाली. त्याचा सदाचा आवाज. आणि तिथले ट्रक.
मात्र म्हादूच्या जमिनीच्या एका कोपऱ्यात एक आंबा होता. दिपूचा आंबा म्हणतात त्याला! आख्या माळावर तेच एक झाड! सावली देणारं. कातळावरून जाणाऱ्या वराती इथे क्षणभर विसावायच्या. माझं नाव दीपक. हा आंबा माझ्या जन्माच्या वेळी बापानं लावलेला. त्यांना अण्णा म्हणायचे. अण्णा हौशी इसम. कलाकार. पंचक्रोशीत भजन सांगायला त्यांना बोलावणं असायचं. कोणाला किरडु-मिरडू चढलं की त्यांना बोलवायचे. मंत्रविद्या जाणायचे. पायाळू होते. त्यांनी सांगितलं होतं, इथं पाणी आहे. आता कातळावर कोण बारव खोदणार? मग त्यांनी मुलगा झाला, म्हणजे मी, म्हणून हा आंबा लावला. म्हणाले आणखी झाले तर बाग लावू! एकलाच असेल तर काय करायचेय? गाव हसलं. माळावर आंबा लावण्याचे प्रयत्न कमी झाले नव्हते. पण सगळे फसले होते.
अण्णा मला फार आठवत नाहीत. लवकर गेले ते. आईनंच मला वाढवलं. तेसुद्धा या गावात नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी. ती धीराची बाई. दीराच्या अंमलात तिची कुचंबणा झाली. काका वाईट नव्हते, हिशेबी. पण शेवटी नातंच तसं. चार यत्ता गावात शिकलो मी. मग पुढच्या शिक्षणाचं कारण काढून आईनं जिल्ह्याच्या गावी वस्ती केली. माझं गाव सुटलं. आई पक्की. उन्हाळ्याच्या सुटीत गावी यायचं. वाटणीची कलमं, रातांबे यांची रोख घ्यायची आणि पहिल्या पावसापूर्वी परतायचं. वर्षाची बेगमी करायची.
दिपूचा आंबा माझा हे कधी कळलं आठवत नाही. पण त्याच्याशी ऋणानुबंध जुळला. कलमी नव्हता, खोबरी होता. भलताच गोड. आयुष्य खोबरीच गेलं. कलमांची असूया वाटली. पण आपल्यांची माया लाभली हेही थोडके नाही. असो. ते पुढे. ते रस्त्यावरचं झाड, काय हाती लागणार? मग कधी दोनतीन सवंगडी घ्यायचे. काकू शिदोरी द्यायची. निघायचं दिपूच्या आंब्याला.
पहिल्यांदा शेजारच्या गावाच्या देवाला जायचं. जागृत देवस्थान होतं. ते पार माळ ओलांडून. तिथे वहाळ होता. सूर्य माथ्यावर येईतो आंब्याच्या सावलीला यायचं. शिदोरी खोलायची. मग दिवसभर तिथे. भयंकर गर्मी, पण एक वेगळाच थंडावा त्या सावलीत होता. खेळ खेळा. गप्पा गोष्टी. झोप. पतंगांच्या मागे धावा. चंगळ असायची. दिवेलागणीला परतायचं.
एक गंमत होती. हा आंबा, त्याच्या एका अंगाला कातळावर चित्रं कोरली होती. एखादा माणूस, बाई, चंद्र, सूर्य असंच काही. कुणी कोरलीवती? कोण जाणे. म्हणायचे, दहा हजार वर्षं झाली त्यांना. फार कुणी लक्ष द्यायचं नाही. पण होळीला गावकरी एक दिवा लावायचे तिथे. गावचे राखणदार म्हणायचे त्यांना.
कॉलेजात गेल्यावर गावी येणं कमी झालं. पण आता दिपूचा आंबा चांगला डवरला होता. झाडावर पक्ष्यांनी घरटी केली होती.
कॉलेजात एकदा नापास झालो होतो मी. त्यावर्षी दिपूच्या आंब्याला फळ धरलं नाही. का?
माझं लग्न, योगायोग बघा, शेजारच्या गावातल्या मुलीशी झालं. हिचं स्थळ काकांनीच सुचवलं होतं. माझी वरात घराहून निघाली आणि कातळमाळामार्गे शेजारच्या गावात गेली. दिपूच्या आंब्याखाली विसावली होती क्षणभर!
आई गेली त्या साली वळवात दिपूच्या आंब्यावर वीज कोसळली होती. ते ऐकून आई म्हणाली, माझी चिमूटभर रक्षा तिथे पुरा. यांचा फार जीव होता त्या आंब्यावर. तिथं त्यांचीही रक्षा सांडली आहे. तिला कदाचित तिचा मृत्यू दिसत असावा. घडलंच ते थोड्या काळात. माझ्या लक्षात होतं. तिची इच्छा म्हणून थोडी रक्षा एका खड्ड्यात पुरली आंब्याशेजारी. चिरफाळलेला, करपलेला दिपूचा आंबा बघवत नव्हता. त्या पावसाळ्यानंतर चुलत भावाचा निरोप होता. दिपूचा आंबा परत उभारी धरतोय!
तिकडे फाडांची फॅक्टरी सुरू झाली. त्याचे ट्रक कातळावर चढू लागले. नानू गुरव अण्णांच्या वयाचा. त्याची जमीन म्हादूच्या पट्ट्यापलीकडे, लागूनच. त्याला अण्णांची वाणी याद होती, इथे पाणी आहे. दिपूचा आंबा त्याची जिती-जागती निशाणी होती. त्यानं बोअरिंगचा ट्रक फाडांच्या फॅक्टरीशेजारून चढवला. बोअर घेतला. खोल पण धसधसून पाणी लागलं! देवाची करणी अन कातळाखाली पाणी. आता गुरवांच्या जमिनीत कलमं लागली आहेत. लाखांचे व्यवहार होतात. दिपूच्या आंब्याच्या जोडीला माळावर हिरवाई दिसू लागली आहे.
चुलत भाऊ म्हणाला आपणही दिपूच्या आंब्याच्या जमिनीत कलमं लावायची का? बोअरचं पाणी मिळेल, शेततळं करता येईल. उगाच म्हणाला तो. त्याचंही वय राहिलं नाही, माझं तर नाहीच. त्याची मुलं परदेशी. कोण करणार इतकी उस्तवार? आणि कोणासाठी? सांगितलं. गुरव करत असतील तर दे जमीन कोणाला.
सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. नाकाला ऑक्सिजन आहे आणि शरीरात बऱ्याच नळ्या. आता यांच्याबरोबरच यात्रा संपणार. काल चुलत भावाचा फोन आला होता. प्रकृतीची चवकशी करत होता. त्यानं सांगितलं. सरकारची नोटीस आली आहे. दिपूचा आंबा तोडायला सांगितलाय. त्याची मुळं कातळशिल्पांना इजा पोहोचवताहेत म्हणे.
माझी रक्षा पुरायला दिपूचा आंबा नसेल. माझा वंश तसाही खुंटलाच आहे. काय करायचाय आंबा फळून?
ओह!
ओह!
आवडली.
आवडली.
वावे ला अनुमोदन
वावे ला अनुमोदन
छान आहे लिखाण.. हे जे चित्र
छान आहे लिखाण.. हे जे चित्र आहे ते देवाचे गोठणे येथील petroglyphs आहे का?
कथा आवडली.
कथा आवडली.
आवडली.
आवडली.
अरे छान लिखाण
अरे
छान लिखाण
आवडली.
आवडली.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
चटका लावून गेली गोष्ट
चटका लावून गेली गोष्ट
छान लिहिलंय
छान लिहिलंय
हे जे चित्र आहे ते देवाचे
हे जे चित्र आहे ते देवाचे गोठणे येथील petroglyphs आहे का >> होय. विकीपिडियावरून घेतले आहे.
गोष्ट चांगली आहे. चटका
गोष्ट चांगली आहे. चटका लावणारी.
कथा आवडली. चटका लावणारी आहे.
कथा आवडली. चटका लावणारी आहे.
आवडलं.
आवडलं.
ओह ! पण छान सुचली कथा !
ओह ! पण छान सुचली कथा !
चटका लावून गेली गोष्ट >>>
चटका लावून गेली गोष्ट >>> +९९९९
फार छान लिहिलंय ऋणानुबंध एकदम
फार छान लिहिलंय
ऋणानुबंध एकदम
अप्रतिम !
अप्रतिम !
चटका लावून गेली गोष्ट >>> ++
चटका लावून गेली गोष्ट >>> +++१११११