“साला मैं तो साहब बन गया”. . . सुवर्णमहोत्सवात !

Submitted by कुमार१ on 5 August, 2024 - 05:33

हिंदी चित्रपटांमधील काही गाणी अजरामर आहेत. ती कितीही जुनी झाली तरी ताजीतवानीच राहतात आणि रसिकांना कायमच भुरळ घालतात. किशोरकुमार हे चित्रसृष्टीमधील एक आघाडीचे गायक. अनेक प्रकारांमधली गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गायकांबाबत रसिकांच्या विशिष्ट आवडीनिवडी असतात. तरी पण किशोरकुमारने गायलेली कुठली ना कुठली गीते प्रत्येक गानरसिकाला आवडतातच. असेच एक गाजलेले गाणे म्हणजे सगिना चित्रपटातील,
साला मैं तो साहब बन गया. . .

यंदा त्या गाण्याने आपली पन्नाशी पूर्ण केलेली असल्यामुळे त्याची ही आठवण आणि त्यानिमित्ताने संबंधित मूळ चित्रपटाचा हा अल्प परिचय.

आधी गाण्याचे तपशील पाहू :

चित्रपट : सगीना
गीतकार : मजरूह सुलतानपुरी
संगीतकार : सचिनदेव बर्मन
गायक : किशोर कुमार, पंकज मित्र

गाण्यातील मुख्य स्वर किशोरकुमारचा असला तरी हे दोन पुरुषांचे द्वन्द्वगीत आहे. किशोरने आवाज दिलाय दिलीपकुमारला तर पंकजने दिलाय ओमप्रकाशला.

किशोरने हिंदीतील ४ आघाडीच्या समकालीन चित्रपट नायकांसाठी अनेक गाणी गायलेली आहेत. परंतु या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे किशोरने दिलीपसाठी गायलेले हे एकमेव हिंदी गाणे आहे.

माझ्या शालेय जीवनापासून ते ऐकतो आहे. तेव्हा विविध भारतीवर ते आठवड्यातून एकदोनदा हमखास लागायचे. 1970-80च्या दशकात तर कॉलेज तरुणांमध्ये ते कमालीचे लोकप्रिय होते. विशेषतः तरुणांच्या ओल्या पार्ट्यांमध्ये एकदा का मंडळी ‘हवेत’ गेली की मग त्यातला एखादा छोटामोठा गायक अगदी नाच व हातवारे करत हे गाणे हमखास म्हणायचा. किंबहुना दोन तीन पेग चढलेल्या अवस्थेतच हे गाणे खऱ्या अर्थाने एन्जॉय करता येते असे तरुणांना वाटे !

या गाण्याची पार्श्वभूमी समजण्यासाठी संबंधित चित्रपटाचा थोडक्यात परिचय करून देतो.
मुळात ‘सगिना महातो’ हा 1970चा बंगाली चित्रपट. तपन सिन्हा या तेव्हाच्या आघाडीच्या दिग्दर्शकांनी दिलीपकुमार आणि सायरा बानू यांना मुख्य भूमिकांमध्ये घेऊन केलेला.

१९४२ च्या वातावरणातील हा चित्रपट घडतो आसामात. अनाथ असलेला सगिना रेल्वेमजूर आहे. त्याला दारूचे व्यसन. अन्यायाविरुद्ध उसळणारा व गोऱ्या साहेबाला अजिबात न भिणारा हा इसम. या मजुरांची संघटना करायचे कम्युनिस्ट पक्ष ठरवतो. त्यासाठी सगिनाला हाताशी धरले जाते. नेते त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवतात. अखेर तो कामगार नेता होतो.

तशातच एका मजूर बाईवर तिथला मॅनेजर बलात्कार करतो. मजूर खवळतात व संपावर जातात. वाटाघाटींसाठी गोरा साहेब येतो. चर्चेदरम्यान एक मजूर कल्याण अधिकारी नेमण्याची अट मान्य होते. अर्थातच ही माळ सगिनाच्या गळ्यात पडते. तो ही जबाबदारी स्वीकारण्यास नाखूष असतो कारण मुळात तो अंगठाबहाद्दर. हे असलं काही लचांड नको असे तो सांगून पाहतो. पण कोणी त्याचे ऐकत नाही. शेवटी त्याला अधिकारी बनवले जाते. त्याचे काम सांभाळण्यासाठी पक्षाची एक निष्ठावंत सेक्रेटरी बाई दिमतीला असते. तो अधिकारी झाला तरी पूर्वीप्रमाणे मजुरांच्यातच वावरतो. त्यांना मेजवानी देतो. हे पाहून पुढारी त्याचा बुद्धिभेद करतात व त्याने मजुरांपासून अंतर ठेवून रुबाबात राहिले पाहिजे असे सांगतात.

काही दिवसात त्याला या कोंडलेल्या आयुष्याचा कंटाळा येतो. तो पुन्हा मजुरी करायची असे म्हणतो. पण पुढारी त्याला परावृत्त करतात आणि डोके लढवून पक्षकार्याच्या अभ्यासासाठी कलकत्त्याला पाठवतात. तिथे त्याला रुक्ष गोष्टींमध्ये अडकवून त्याच्यातला रांगडा आत्मविश्वास खच्ची करतात. नंतर तो इथेही घुसमटतो. तिरीमिरीत आसामला पुन्हा परततो. तिथल्या टेकड्यांमध्ये तो पोचतोय तोच तिथले मजूर त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात. त्याचा तिरस्कार करतात. सगिना चक्रावतो. हे असे कसे झाले हे त्याला जरा उशिराच समजते. मजुरांपासून त्याला तोडण्याची पुढाऱ्यांची ही कुटिल नीती असते. त्यातूनच ते सजिनाची राजकीय शिकार साधतात.

खरं तर या कथेची तर्कशुद्ध शोकांतिका झाली असती, परंतु प्रेक्षक शरणतेपायी या पुढे चित्रपटाला खास फिल्मी कलाटणी देऊन त्याची सुखांतिका केली आहे. हा चित्रपट निव्वळ कम्युनिस्टविरोधी नाही. तो तमाम स्वार्थी निष्ठुर राजकीय यंत्रणांच्याविरुद्ध आहे. त्यात लालबावटा संस्कृतीचे विदारक चित्रण केले आहे.

बंगालीत या चित्रपटाने जोरदार यश मिळवल्यानंतर 1974 मध्ये ‘सगीना’ या नावाने त्याची हिंदी आवृत्ती काढण्यात आली. यातही मूळ बंगालीतील नायक नायिकेची जोडी (दिलीप- सायरा) कायम ठेवण्यात आली. तो हिंदीत फारसा चालला नाही परंतु त्यातले ‘साला मै तो. . .हे गाणे मात्र जबरदस्त हिट झाले.
Sagina_poster.jpg

किशोरने दिलीपसाठी गायलेल्या या एकमेव हिंदी गाण्याच्या पन्नाशीनिमित्ताने त्याची ही सुरेल आठवण. आपल्यापैकी बहुतेकांनी ते ऐकले असेलच. ऐकले नसल्यास ते इथे (https://www.youtube.com/watch?v=oxUKIrF2PS0) ऐकून गाता गाता त्यावर थिरकता येईल ! Happy
*****************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख आहे.
हा सिनेमा संपूर्ण बघून होत नाही. आता पाहीन.

सिनेमा पाहिला नाही...पण गाणं चांगलं चाललं. मी ही गुणुणायचो हे गाणं. तुमच्या लेखाने या सिनेमाची गोष्ट कळली... धन्यवाद

चांगली ओळख करून दिलीत. बघायला हवा चित्रपट. एरवी बघितला नसता कदाचित. पण कथा कळल्यावर इंटरेस्टिंग वाटतोय.
किशोरकुमार-दिलीपकुमार हे अजब कॉम्बिनेशन आहे.

सर्वांना धन्यवाद !
चित्रपट अगदी पाहिलाच पाहिजे असे नाही. सध्याच्या काळात तो कितपत भावेल माहित नाही.
१९७०च्या दशकातही तो बंगालमध्ये चालला परंतु हिंदीतला मात्र पडला.
गाणे मात्र झकास आहे.

सुरेख लेख व सुंदर आठवणी! या गाण्याची पार्श्वभूमी आज कळली व गाणे अधिक अर्थपूर्ण भासले. तसे अनेकदा ऐकले होते.

>>> ऐकून गाता गाता त्यावर थिरकता येईल !

यासाठी वर लेखात एका ठिकाणी दिलेली अट पाळणे शक्य नाही.

मस्त लेख व माहिती. पुन्हा नीट वाचायचा आहे. पण सध्या हे एक

परंतु या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे किशोरने दिलीपसाठी गायलेले हे एकमेव हिंदी गाणे आहे. >>> हे "सोलो" एकमेव असेल. पण याच पिक्चरमधे लता बरोबर एक ड्युएटही आहे.
https://www.youtube.com/watch?v=xMEHAi5MtjU

आग लगी हमरे झोपडिय्या में हे सुद्धा हिट होतं आणि वर फारेण्डने दिलेलं सुद्धा.

आग लगी मधे दिलीपकुमार आणि किशोर कुमार यांचं द्वंद्वगीत आहे. पण ते एकाच अभिनेत्यावर चित्रित केलं आहे.
असाच प्रयोग काही वर्षांनी प्रकाश मेहरांनी जहा चार यार या गाण्यात केला आहे.
सगिना च्या वेळी रफी काही कारणांनी दिलीप कुमारवर नाराज होते. सचिन देव बर्मन यांना हे माहिती होतं.
दिलीप कुमार यांनी रफी का नाराज आहेत हे जाणून घ्यायचे सुद्धा कष्ट घेतले नव्हते. यामुळे या सिनेमात दिलीपकुमार यांना रफीचा आवाज नाही.
पुढे ती नाराजी निघाली तेव्हां बैरागमधे रफी यांनी दिलीपकुमार ला आवाज दिला.

आग लगी हमरे झोपडिय्या में हे सुद्धा हिट होतं >>> धन्यवाद खंबा. हे गाणे माहीत नव्हते.

मूळ लेख परत नीट वाचला. छान लिहीले आहे. या गाण्याचे बंगाली व्हर्जन तसेच आहे का व ते ही किशोरचेच आहे का?

७० च्या दशकात कम्युनिस्ट संघटना/नेते यांच्या विरोधात पिक्चर (तो ही बंगाली) हे नवीन असावे. त्या काळात सोशालिस्ट्/कम्युनिस्ट प्रभाव जवळजवळ सर्व सामाजिक चित्रपटांतच नव्हे, तर इव्हन जनरल करमणूकप्रधान चित्रपटांतही असे. पण हा पिक्चर ते ही पक्ष/संघटना हाताशी सत्ता आली की इतरांसारखेच वागतात हे दाखवत असेल तर बघायला हवा आवर्जून.

आपल्या सामाजिक चौकटीतून बाहेर पडलेला पण नंतर भ्रमनिरास होउन परत आलेला नायक ही थीमही पूर्वी अनेक पिक्चर्स मधे दिसते. राज कपूरचे रमैय्या वस्ता वैय्या किंवा देव आनंदचे असली नकली टायटल साँग साधारण असेच काहीतरी चित्र उभे करतात. नक्की संदर्भ माहीत नाही पण तसेच काहीतरी असावे. याचीच एक विनोदी व्हर्जन म्हणजे खैके पान बनारसवाला गाण्याच्या आधी ते गंगा किनारेवाले लोक भेटल्यावर अमिताभचे डॉन च्या बेअरिंग् मधून मूळच्या विजय मधे होणारे अफलातून ट्रान्स्फॉर्मेन्शन. मला ते नेहमी त्या गाण्यापेक्षा जास्त धमाल वाटते.

अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद !
* फा ए व खं बा,
चांगल्या पूरक माहितीबद्दल धन्यवाद ! पाहतो अन्य गाणी.
..
* बेफी,
'अटी'चे पालन न करता पण ठेका धरता येईल की Happy

बाबांनी हा चित्रपट थेटरला नेऊन दाखवला होता . दुसरा शिर्डी के साईबाबा. बाबा दिलीपकुमारचे फॅन होते का माहीत नाही.
तो पुन्हा टीव्हीवर पाहिला तेव्हा अपर्णा सेन लक्षात राहिली. सायरा बानो होती हे आठवतही नव्हतं.
हे गाणं बरेचदा ऐकलं आहे.
तुमचा लेख आवडला.

छान ओळख! बहुधा नुकतेच कधीतरी याच पिक्चरबद्दल कुठल्यातरी पेपरच्या पुरवणीत वाचले होते. पण त्यात इतके नीट उलगडून सांगितले नव्हते. धन्यवाद कुमार सर.

फारेंड. गाण्याच्या लिंकबद्दल आभार. बर्‍याचवर्षानी हे गोड गाणे ऐकले.

हा चित्रपट दु द वर पाहिलेला. कंटाळा आलेला. एकच चांगली गोष्ट साला मैतो मध्ये होती ती म्हणजे ओमप्रकाशच्या तोंडची ‘सुरत है बंदरकी लेकिन दिखती है अलबेली‘ ही ओळ. अगदी समर्पक वर्णन. माझ्या डोक्यात ती ओळ ‘सुरत है कौवेकी लेकिन दिखती है अलबेली‘ अशी फिट झाली होती. हेही वर्णन बरोबरच आहे.

त्या दरम्यान राम और श्याम, गोपी वगैरे चित्रपट पण दाखवलेले होते.. त्यामुळे बंदर की सुरतवाल्या दिलिपकुमारला बघुन बघुन वैताग आलेला.

त्यामुळे बंदर की सुरतवाल्या दिलिपकुमारला बघुन बघुन वैताग आलेला.>>> दस नंबरी, संन्यासी मधल्या मनोजकुमारचा पर्याय होता कि Wink (क्लर्क सुद्धा)

तो तसाही डु आय.

दु द वर पर्याय नसायचा. जे दाखवताहेत ते मनोभावे पाहावे लागायचे. वैताग आला तरी.

तो तसाही डु आय. >> Lol
ड्युआयने चेहरा दाखवायचा नाही ही प्रथा तेव्हांपासून सुरू झाली.

मला हे गाणं आमिर खानच्या राजा हिंदुस्तानी मध्ये तो थोडंसं म्हणतो त्यामुळे माहीत आहे खरं तर. मूळ गाणं आणि चित्रपट ही पाहिलेला नाही. लेख नेहमप्रमाणेच झकास!