इंटरव्ह्यू गेला पाण्यात!

Submitted by निमिष_सोनार on 4 August, 2024 - 09:22

माझे नाव केशव. जन्म, बालपण आणि शिक्षण सगळे डोंबिवली ईस्टमध्ये झाले. फडके रोडवर आमचे घर! आज पाऊस जरा जास्तच वाटत होता, पण ऑफिसला जाणे पावसामुळे टाळू शकत नव्हतो. नेहमीप्रमाणे पाच नंबर प्लॅटफॉर्मवरुन मी सीएसटी जाणारी फास्ट लोकल पकडली. जरी फर्स्ट क्लास पास असल्याने मी फर्स्ट क्लासमध्ये चढलो असलो तरीही त्यातही गर्दी खूप होती. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे शाळेने ऑनलाइन क्लास ठेवले होते, त्यामुळे माझी दोन्ही जुळी मुलं घरून क्लास अटेंड करत होती. 2020 च्या भयंकर कोविड आपत्तीने ऑनलाइन हा शिक्का मानवजातीच्या माथी मारला. पण आमच्यासारख्या सॉफ्टवेअरशी काहीही संबंध नसलेल्या माणसांना कसले आले ऑनलाइन बिनलाईन? नेहमीप्रमाणे दादर वेस्टला उतरायचे आणि मग बेस्ट बस पकडून कंपनीत जायचे.

आमची प्रॉडक्शन कंपनी "व्ही-स्टार इन्स्ट्रूमेंट्स" जी विविध कंट्रोल इन्स्ट्रूमेंट्स बनवते, त्यात मी मॅनेजर आहे.

लोकलमध्ये बसायला जागा मिळाली नाही, कारण लोकल अंबरनाथवरुन आलेली होती. दिवसेंदिवस मुंबई आणि लोकल ट्रेन, दोघांमधली लोकसंख्या खूप वाढते आहे. उभ्या उभ्या एका हातात आडवा मोबाइल धरून पावसाच्या बातम्या बघू लागलो, आणि दुसरा हात लोकलच्या कडीला धरलेला होता. एक बातमीदार घसा दुखेल इतके ओरडून अंधेरी सबवे पाण्याखाली गेला हे सांगत असतांनाच 2005 साली मुंबईत आलेल्या पुराच्या घटना आठवून सांगत होती आणि मलाही नकळत तो दिवस आठवला.

19 वर्षांपूर्वी मी याच जुलै महिन्यात माझ्या इंटरव्ह्यूसाठी पाच नंबर प्लॅटफॉर्मवरून मी आठ वाजता लोकल पकडली आणि निघालो. दहा दिवसांपूर्वी "व्ही-स्टार इन्स्ट्रूमेंट्स" या कंपनीत "इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनियर" या रोलसाठी अर्ज केला होता आणि सोमवारी मला घरच्या लँडलाइन फोनवर कॉल आला आणि ईमेल चेक करायला सांगितले गेले. सायबर कॅफेत जाऊन बघितले. याहूवर ईमेल आला होता की, मंगळवार म्हणजे आज 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता माझा इंटरव्ह्यू आहे आणि पत्ता व इतर माहिती दिली होती. आधी तीन वेगवेगळ्या कंपनीत इंटरव्ह्यू दिले होते पण तिथे काम झाले नव्हते. मला नोकरी मिळवणे अत्यावश्यक झाले होते.

टीव्ही चॅनेलवर कितीही अतिवृष्टीचा इशारा दिला गेला असला तरीही आजचा इंटरव्ह्यू माझ्यासाठी अतिशय आवश्यक होता. त्याला कारणही तसेच होते. वडील डोंबिवलीत "मगनलाल केमिकल" या कंपनीत काम करत होते. एकदा एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे कंपनीत स्फोट झाला, विषारी वायूची गळती झाली. छत व भिंती कोसळायला लागल्या. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी झालेल्या अभूतपूर्व चेंगराचेंगरीत आणि पळापळीत माझ्या वडिलांना दोन्ही हात गमवावे लागले आणि या घटनेच्या धक्क्याने आणि भीतीने त्यांची वाचा गेली. आठ महीने ते बेडवर होते. नंतर त्या कंपनीवर खटला चालला. मालक परदेशात पळून गेला. कालांतराने कंपनी बंद पडली. वडिलांनी प्रयत्न केला पण दुसरीकडे कुठे काम मिळालेच नाही. ते घरीच राहिले. माझे शिक्षण संपायला तेव्हा एकाच वर्ष राहिले होते. आईने प्रायव्हेट टयूशन घेऊन आणि वडिलांनी आतापर्यंत केलेल्या जमापुंजीवर माझे शिक्षण झाले. शिक्षणानंतर तडक मी नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडलो होतो.

बॅगमध्ये प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून मी आवश्यक कागदपत्रे ठेवली होती. आज आईने जेवणाचा टिफिन दिला, हातावर दहयाचा खडा ठेवला, मी देवाला नमस्कार केला, पलंगावर उशीला टेकलेल्या वडिलांनी नजरेने आशीर्वाद दिले आणि मी निघालो. पावसामुळे लोकल थोडी उशिरा दादरला 10 वाजता पोहोचलो. मी आपोआप गर्दीमुळे ढकलला जाऊन स्टेशनवर उतरलो. खिशात नोकीयाचा छोटासा मोबाइल होता, तो चाचपडून पहिला, तो खिशातच होता. मोबाइल रीचार्ज खूप महाग होते. 500 च्या कार्डवर 434 रुपयांचा टॉकटाइम होता, त्यामुळे कॉल जपून करावा लागे. फुटओव्हर ब्रिजवरुन जाऊन वेस्टला उतरून जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये 10 रुपयांत वडा सांबार पावचा ब्रेकफास्ट केला. 15 मिनिटांत ब्रेकफास्ट झाला.

आता पाऊस चांगलाच वाढला होता. दादर वेस्ट स्टेशनबाहेर रस्त्यावर पूर्ण पाणी साचले होते. इतका पाऊस मी पहिल्यांदाच बघत होतो. पाठीवरच्या बॅगमधून छत्री काढली, उघडली आणि रेस्टॉरंटमधून बेस्ट बस स्टॉपकडे चालू लागलो. बसचा दहा मिनिटांचा प्रवास संपला की कंपनी येणार होती. 11 नंबरच्या डबल डेकर बसची वाट बघत, बस स्टॉपवर उभा राहिलो. बससाठी मोठी रांग होती. 10:30 वाजले. अजून बस आलीच नाही?

बापरे! रस्त्यांवर आता गुडघ्याएवढे पाणी साचले होते आणि पहिली दुसरीतला एक शाळकरी मुलगा पारदर्शक रेनकोट घालून आपल्या आईकडे धावत येत होता आणि तो पाण्यात पडला आणि रडायला लागला, मागून एक पाण्याचा लोंढा आला. त्याची आई छत्री घेऊन त्याच्याकडे धावत येऊ लागली. मी त्या मुलाकडे धावलो, त्याला हात धरून उठवले आणि त्याच्या आईकडे त्याला हात धरून घेऊन जायला लागलो. तेवढ्यात दुरून मला 11 नंबरची बस येतांना दिसली. ती थांबली आणि एकेक जण त्यात चढू लागला. मी त्या बसपासून बऱ्याच अंतर दूर होतो. तो मुलगा रडत होता, त्यांच्या डोक्यावर मी छत्री धरली होती. वारा इतका जोरात होता की त्याच्या आईच्या हातातली छत्री उडून खूप दूर गेली. शेवटी त्या मुलाला आईकडे सोपवून मी माझी छत्री तिला देऊ केली आणि पाण्यातून वाट काढत पळतच 11 नंबरच्या बसकडे जाऊ लागलो, तोपर्यंत ती बस आपल्या मार्गी निघाली होती.

सोमवारी मला आलेल्या कंपनीच्या लँडलाइन नंबरवर मी कॉल केला, उद्देश्य असा की मला यायला उशीर होऊ शकतो हे सांगता येईल, पण नंबर बिझी येत होता. शेवटी मी बॅगमधून रेनकोट काढला, अंगावर चढवला आणि फुटपाथवरून चालू लागलो. दूर एक टॅक्सी उभी होती. मी तिच्याकडे पळालो. चौकात खूप पाणी साचले होते, वाहने अडकून पडली होती. फुटपाथवरचे फेरीवाले, छोटे दुकान मांडून बसणारे लोक आपापल्या घरी निघून गेले होते. दोन चार बेस्ट बसेस आणि काही कार पाण्यातून मार्ग काढण्याचा आटापिटा करत होत्या.

मी टॅक्सीवाल्याला म्हटले, "दिनदयाळ गार्डन जवळ, वालचंद हाइट्स बिल्डिंग जायचे आहे, चलणार का?"

टॅक्सीवाला म्हणाला, "नाही ! खूप पाऊस आहे तिकडे!"

"अहो, मला खूप अर्जंट आहे. इंटरव्ह्यू आहे!"

"तुला इंटरव्ह्यूची चिंता आहे? इथे लोक जीवन मरणाच्या पुरात अडकले! इंटरव्ह्यू देवून कुठे स्वर्गात नोकरी करणार का? की नरकात?"

"काय सांगता? इतकी वाईट परिस्थिति आहे?"

"अरे! कोणत्या दुनियेत आहेस? आताच चार शाळकरी मुलं विजेच्या धक्क्याने ठार झाली! पाण्यात करंट उतरला होता"

ऐकून मला कसेतरीच झाले.

तो पुढे म्हणाला, "जवळच एका रिक्षेवर झाड पडले, दूसरा रिक्षेवर होर्डींग पडले! एक जुनी इमारत कोसळली, त्यात दहा जण दबले गेले. त्यापेक्षा मी आता घरी जातो!"

"अंकल ऐका ना! मी जास्त पैसे देतो. प्लीज मला तिथे घेऊन चला!"

थोडा वेळ त्याने मनात विचार केला आणि मग म्हणाला, "चारशे रुपये घेईन. येतोस?"

"बापरे! चारशे? अहो दोनशे देतो! मग तर झालं?" मी असे म्हणताच तो एकटाच दार लावून आत बसला आणि त्याने टॅक्सी चालू केली.

मी काचेवर हाताने ठोकले आणि म्हटले, "ठीक आहे, चला चारशे देतो!"

मी बसलो आणि त्याने टॅक्सी शक्य तिथे फुटपाथवरून तिरपी चालवायला सुरुवात केली. त्याने माझ्याकडून पूर्ण पैसे आधीच घेऊन टाकले. मला खिडकीतून विदारक दृश्य दिसत होते. आजूबाजूच्या काही झोपड्यांमध्ये पाणी घुसले होते. कार पाण्यात अडकून पडल्या होत्या. एफएम रेडियोवर ते सांगत होते की, काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल ट्रेन आहे तिथेच अडकून पडल्या आहेत, लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. पावसाचा जोर आणखी वाढणार, असे सांगण्यात येत होते. अरबी समुद्राला भारती आली आहे. तेवढ्यात मोबाइल रिंग वाजली. काळजीपोटी आईने फोन केला होता. काळजी करू नको, असे तिला सांगून मी फोन बंद केला.

ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत होता आणि कधीही न थांबणारी मुंबई स्तब्ध झाली होती. रेडियोवर नंतर सांगत होते की, सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील शेकडो रहिवाशांना सुरक्षित क्षेत्रामध्ये स्थलांतरित होण्यास भाग पाडले आहे, कारण या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन तासांतच 300 mm पाऊस पडला होता. शहराच्या पायाभूत सुविधा पुराच्या प्रचंड दबावाखाली बुडाल्या. महामार्ग आणि निवासी भागात मोठ्या प्रमाणात पूर आला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि अनेक रहिवासी त्यांच्या घरापासून लांब अडकले.

आमची हळूहळू चालणारी टॅक्सी अचानक थांबली कारण रस्त्यावरचे पाणी खूप वाढले होते.

"उगाच मी तुझे ऐकून चारशे रुपयांसाठी एवढ्या पाण्यात आलो. आता अडकलो ना! उतर खाली! ती समोर बिल्डिंग दिसते आहे, तीच आहे वालचंद हाइट्स! उतरून पायी जा!"

"अहो पण?"

"उतर खाली!" त्याने मला उतरायला भाग पाडले आणि त्याची टॅक्सी वेगाने पाणी उडवत जवळच्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घुसवली. तिथे त्याला कुणीतरी ओळखीचे भेटले. म्हणजे, त्याला इथपर्यंत यायचेच होते तर! त्यातही त्याने 400 रुपये कमावले.

आता बारा वाजून गेले होते. डोक्यावर रेनकोटची प्लॅस्टिक टोपी घालून मी वेळ न दडवता वालचंद हाइट्सच्या दिशेने चालू लागलो. अचानक पाण्यामुळे न दिसलेल्या रस्त्यावरच्या खड्ड्यात माझा एक पाय पडला आणि मुरगळला. पण तशाही स्थितीत मी लंगडत चालू लागलो. दूर रस्त्यावर तिरपी होऊन पाण्यात फसलेल्या एका कारच्या खिडकीतून एक हात वर निघाला होता आणि मदतीसाठी याचना करत होता. आसपास पायी जाणारे येणारे फारसे नव्हते. सध्या मला जे आसपास जे कुणी दिसले होते ते आधीच मृत झालेले होते त्यामुळे त्यांची पाण्यापासून वाचण्याची धडपड थांबली होती. पाणी त्यांना आपोआप आपल्या सोबत घेऊन दूर जात होतं.

मी विचार केला: "मदतीसाठी बोलावणारा तो हात महत्त्वाचा आहे. आज इंटरव्यू द्यायचा आहे, म्हणून त्या माणसाला मी मदत न करता तिथेच सोडून दिले तर ते योग्य होणार नाही. माणुसकी आधी, बाकी सगळे नंतर!" आणि सामान्य मुंबईकरांचे हेच स्पिरिट तर सर्व जगाने अनुभवले होते आणि जगभर गौरवले होते.

मी गुडघ्यावर पाण्यातून वाट काढत त्या तिरप्या झालेल्या कारकडे जाऊ लागलो. सर्वप्रथम त्या कारजवळ पोहोचल्यानंतर मी कारमधल्या माणसाच्या हाताला धरले. त्या हाताला खूप दिलासा वाटला. गाडीच्या अर्ध्या उघडलेल्या केलेल्या खिडकीच्या काचेतून तो हात बाहेर आलेला होता. त्या भागातून मी आतमध्ये पाहिले असता, मला दिसले की त्या कारचालकाचा पाय कुठेतरी अडकला होता, त्यामुळे तो बाहेर निघू शकत नव्हता. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर तो बसलेला होता आणि त्याच्या पायातून रक्त येत होते. एका खड्ड्यामुळे गाडी तिरपी झालेली होती आणि खड्ड्यात फसलेल्या एका लोखंडी अणकुचीदार वाकलेल्या सळईमध्ये त्याचा पाय घुसून अडकून पडला होता.

तो माणूस म्हणाला, " थँक यु मित्रा! तू आलास. थोड्या वेळापूर्वी मी मदतीला आधी हाक मारली होती पण कोणीही मदतीला आले नव्हते. मागच्या बाजूने दरवाजा उघड आणि आतमध्ये येऊन तुझ्या दोन्ही हाताने माझा पाय त्या सळईमधून बाहेर ओढून काढ!"

"ठीक आहे!", असे म्हणून मागच्या बाजूचा दरवाजा उघडून मी त्या गाडीमध्ये शिरलो आणि पुढच्या सीटवरून हात घालून त्या कारमधल्या माणसाचे अडकलेले पाय दोन्ही हातांनी ओढून काढण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या माणसाला वेदना होत होत्या, तो वेदनेने ओरडत होता परंतु इलाज नव्हता. शेवटी मोठ्या प्रयत्नाने अडकलेला पाय बाहेर निघाला आणि त्या झटक्याने तिरपी गाडी रस्त्यावर सरळ झाली. तो माणूस वेदनेने कळवळला, पण त्याला आता धीर झाला आणि तो मला म्हणाला, "तिथेच मागच्या सीटवर खालच्या बाजूला फर्स्ट एड बॉक्स असेल. प्रथमोपचार किट! आणि माझा मोबाईलसुद्धा तिथेच कुठेतरी पडला असावा. मला जरा शोधून दे!"

गाडीत अर्ध्या शिरलेल्या पाण्यामध्ये मी मोबाईल शोधला. तो सोनी एरिक्सनचा मोबाईल होता. हे मॉडेल मी कुणाकडेच पाहिले नव्हते. तो मोबाईल वॉटरप्रूफ असल्यामुळे की काय, सुरूच होता. त्या माणसाने तो मोबाईल आपल्या हातात घेतला. पुसला!

मी खाली हात घालून प्रथमोपचार पेटी शोधली आणि त्यातून जखमेतील रक्तस्त्राव बंद होण्यासाठीचा स्प्रे बाहेर काढला आणि त्या माणसाच्या पायावरच्या जखमेवर मारला. मग त्या माणसाने त्याचे सॉक्स पुन्हा वर केले, बूट घातला.

"सर, आता तुम्ही गाडी चालवू शकाल का?"

"होय, मला जवळच जायचे आहे. तुला कुठे जायचे आहे?"

"सर, बारा वाजता माझा एके ठिकाणी इंटरव्यू होता, पण आता उशीर झाला आहे. मी इंटरव्यूसाठी डोंबिवलीवरून आलो आहे!"

"इंटरव्यू? कुठे?"

"व्ही-स्टार इन्स्ट्रूमेंट्स कंपनीत, त्या समोरच्या वालचंद हाइट्स बिल्डिंगमध्ये"

"ओके. मग गाडीतून उतरू नकोस!"

"म्हणजे? मी समजलो नाही!"

"थांब, सांगतो!" असे म्हणून त्यांनी मोबाईलवरून आपल्या रिसेप्शनिस्टला एक कॉल केला.

"मीनाक्षी!?"

"यस सर! मीनाक्षी बोलतेय. सर तुम्ही कुठे होतात? मी तुम्हाला चार वेळा कॉल केला, पण तुम्ही उचलत नव्हता?"

"अगं, गाडी एका खड्ड्यात अडकली आणि माझा पाय लोखंडी सळईखाली धडकला आणि मी कुणाला कॉल करणार तेवढ्यात मोबाईल माझ्या हातून सटकून मागच्या सीटवर पडला. मी मिस कॉल ऐकले, पण माझा हात पोचत नव्हता."

"पण तुम्ही आता ठीक आहात ना सर? तुमचा इंटरव्यू एका कॅंडिडेट सोबत बारा वाजता शेड्युल केलेला होता परंतु तो कॅंडिडेटसुद्धा आला नाही."

"काय नाव आहे मीनाक्षी त्याचे, जरा सांगशील?"

"केशव, सर!"

"एक मिनिट मीनाक्षी", असे म्हणून त्यांनी फोन म्युट केला आणि मला विचारले, "तुझे नाव काय?"

"केशव!"

पुन्हा फोनवर ते म्हणाले, "अगं, मीनाक्षी. त्याच केशवने मला आता गाडीत अडकलो असताना मदत केली. त्याला मी सोबतच घेऊन येतो आणि त्याचा इंटरव्यू येता येता गाडीतच घेतो."

या बोलण्यावरून मला ते दुसरे कुणी नसून आपला इंटरव्यू घेणारे व्यक्ती आहेत आहेत याची कल्पना आली.

मीनाक्षी फोनवर पुढे सांगत होती, "सर, आता आपल्या बिल्डिंगपर्यंत रस्ता खूप पाण्याने वेढला आहे. तुम्ही कार चालवू नका. आपल्या कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने मुंबई महापालिकेशी संपर्क साधला असून आपल्या कंपनीसाठी काही बोटी उपलब्ध झाल्या आहेत. तुमच्या दोघांसाठी मी एक बोट पाठवण्याची व्यवस्था करते, तुम्ही फक्त नेमके कुठे आहात ते सांगा!"

"जास्त दूर नाही. रानडे चौकात आहोत आम्ही!"

"ठीक आहे सर! मी व्यवस्था करते!"

त्यांनी फोन ठेवला आणि मला म्हणाले, "केशव, तुला अंदाज आलाच असेल मी त्या कंपनीचा मालक आहे जिथे तू इंटरव्यूला जाणार होतास. आता तू इंटरव्यू इथे गाडीत बसले बसले देणार, की मग आपल्याला थोड्याच वेळात घ्यायला येणाऱ्या बोटीमध्ये बसून देणार?"

मी हसून म्हणालो, "सर, तुम्ही म्हणाल तिथे आणि तसा मी इंटरव्यू देईन मी तयारच आहे!"

त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाले, "तुझी इतरांना मदत करण्याची माणुसकी मला आवडली. इंटरव्यूची पर्वा न करता आधी संकटात सापडलेल्या मला तू मदत केलीस ही खूप मोठी गोष्ट आहे!"

"धन्यवाद सर!"

"काय मग? रेडी फॉर द इंटरव्ह्यू?"

"येस सर!"

"सांग बरं मग, रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर काय असते आणि कंट्रोल व्हॉल्वचे कार्य कसे चालते?"

घाटकोपरला उतरणाऱ्या एका माणसाचा मला धक्का लागला आणि मोबाईल हातातून पडता पडता वाचला.

त्याचा काही दोष नव्हता कारण एक तर मी दरवाज्याजवळ पॅसेजमध्ये उभा होतो, तेही मोबाईल एका हातात धरून मोबाईलवर बातम्या बघत होतो. आणि मोबाईलवरच्या बातम्या बघता बघता ही घटना मला आठवल्याने हरवून गेलो होतो, आणि माझ्या चेहऱ्यावर एक समाधानाचे स्मितहास्य तरळले होते. उलट त्या धक्का देणाऱ्या माणसाला मीच सॉरी म्हटले. त्याने पण उतरतांना माझ्याकडे बघून स्माईल दिली.

न्युज चॅनेलवर आता ब्रेक सुरू झाला होता आणि जाहिरात लागली होती. थोड्याच वेळात दादर स्टेशन येईल आणि मी उतरेनच, पण एक सांगायचे राहिले, मला मंदार सरांनी जॉब तर दिलाच कारण मी इंटरव्यू पास झालो होतो, पण त्यांनी मला आपत्ती व्यवस्थापन टीममध्ये मार्गदर्शक म्हणून पण नेमले! असो! एक मिनिट! अहो, खिडकीजवळ एक जागा रिकामी झाली आहे, पटकन बसतो मी आता तिथे! बाय!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची ही कथा आवडली.
त्या पुराच्या नकोशा आठवणी जाग्या झाल्या. चित्रण उत्तम आहे.
शेवट थोडा प्रेडिक्टेबल होता.
पण असेच लिहीते रहा.
दमदार कथानकाच्या प्रतिक्षेत.