स्पंदन- भाग १

Submitted by अतरंगी on 1 August, 2024 - 01:06

गेली कित्येक वर्षे तो भयानक आजाराने त्रस्त होता, त्याला आजार होऊन अनेक वर्षे लोटली होती. त्यालाच एकदा अचानक त्या आजाराची जाणीव झाली, त्याला लागण झालेल्या विषाणूचे अस्तित्व त्याला जाणवले होते. त्याने सगळ्यांना विचारायला सुरुवात केली पण अनेकांना त्याच्या आजाराचे निदानच होत नव्हते. त्यांना तर वाटत होते सगळे नॉर्मलच आहे, सर्वसामान्यांसारखाच तर आहे हा.

त्याने अनेक उंबरठे झिजवले, अनेक उपाय केले, त्याच्या आजारावर खात्रीशीर इलाज असल्याचा दावा करणार्‍या लोकांना भेटला, त्यांनी सांगितलेले इलाज केले. पण त्याला काही उतार पडेना. त्याने हार मानली नाही, त्याला नक्की खात्री होती की हा आजार व विषाणू मानव निर्मितच आहे. अनेकांना त्याची बाधा झाली आहे पण ते त्यापासून अज्ञात आहेत. कुठे तरी कोणाला तरी या आजाराचा इलाज माहित असणारच.

एके दिवशी त्याचा शोध संपला, त्याला तो माणूस सापडलाच. त्याच्या आजाराचे अचूक निदान त्या डॉक्टर कडे होते. कित्येक वर्षे त्याने साधना करुन त्या आजारांची लक्षणे, उपाय लिहून ठेवले होते. मग त्याला लक्षात आले की अनेक डॉक्टरांनी या आजारांची लक्षणं आणि त्याचे उपाय आधीच लिहून ठेवली आहेत. पण लोकांना ना ती लक्षणे कळली ना ते उपाय कळले. तरी लोकांनी त्यांना देवमाणूस बनवून देव्हार्‍यात बसवून ठेवले. त्यांच्या प्रिस्क्रिपशन्स्ची पारायणे केली, त्याची मुर्ती बनवली, त्याची पुजा केली. पण त्याने सांगितलेले औषध कोणी घेतले नाही. स्वत:मधे असलेली त्या आजाराची लक्षणे कोणाला दिसलीच नाही. सगळे फक्त मनोभावे त्या डॉक्टरची पुजा करत बसले.

त्याने मात्र ती प्रिस्क्रिपशन्स योग्य प्रकारे वापरली, सगळी ट्रिटमेंट घेतली. लवकरच तो त्या आजारातून मुक्त झाला, सगळ्या वेदना, सगळे त्रास नष्ट झाले. तो मुक्त झाला, स्वतंत्र झाला. त्याला स्वतःला सुद्धा आठवत नव्हते की त्याला तो आजार कधी झाला होता. कितीतरी वर्षे त्याने ते सगळे सहन केले होते.

तो जन्मतः अगदी निरोगी होता. तो जन्मला तेव्हा होते तरी काय?

स्पंदन.  

फक्त एक स्पंदन!

हळूहळू त्याने शरीर धारण केले, जन्म घेतला. दुर्दैवाने त्याच्या आई वडीलांना त्या आजारची लागण झालेली होती, त्याच्या आई वडिलांनाच काय त्याच्या आजूबाजूच्या जवळ जवळ सगळ्यांना त्या आजाराची लागण झालेली होती.

त्याचा जन्म झाल्यावर त्याच्या शरीराला त्यांनी एक नाव दिले व स्वतःचे नाव पण त्याला जोडले. त्या त्याच्या शरीराला त्याच्या पालकांनी अनेक लसी टोचून घेतल्या जेणे करुन त्याच्या शरीरात कोणतेही विषाणू गेले तरी तो त्याचा प्रतिकार करु शकेल.

शरीराची काळजी तर त्यांनी घेतली पण मनाचे काय ? त्याला जी लस द्यायची ती त्यांना महितच नव्हती.

मग त्यांच्याही नकळत त्यांना व समाजाला असलेल्या अनेक आजारांचे ईन्फेक्शन त्याला झाले. त्यांच्यामते ते सगळे नॉर्मलच होते. त्या सर्वांसोबत राहून त्यालाही ते सर्व नॉर्मलच वाटू लागले.  

काम, क्रोध, अहंकार, लोभ, मोह, मत्सर, भिती, वासना, आसक्ती, स्पर्धा, आशा-अपेक्षा, ईर्ष्या, भेदभाव या सगळ्या आजारांचे इन्फेक्शन त्याला समाजाकडून झालेच. त्याच्या नकळत तो या सर्वांचा गुलाम झाला, एका तुरुंगात राहू लागला, स्वतःच्या नैसर्गिक अस्तित्वाला त्याने समाजाने व मनाने लादलेल्या बेड्यांनी, नियमांनी जखडून टाकले नी ते सुद्धा स्वखुषीने. त्यानंतरचे त्याचे आयुष्य म्हणजे फक्त एक सुख दु:खाच्या लाटांवर स्वार असलेले एक वेदनादायक अस्तित्व. पण त्याला या सर्वाची जाणीव तरी कुठे होती? तो यालाच जगण्याचा मार्ग मानत आला होता, कारण  त्या पलिकडे काही अस्तित्वात आहे हेच त्याला अज्ञात होते.

जेव्हा तो त्या भावनांच्या आहारी न जाता त्या पासून अलिप्त होऊन त्याकडे पाहू लागला तेव्हा त्याला कळले कि हे सुख दु:ख हे नित्यनेमेक्रमाणे येत आहेत व जात आहेत. शिवाय सुख दु:ख म्हणजे तरी काय? घडलेली घटना तीच असते, ती आपल्या अपेक्षेप्रमाणे घडली तर आपण त्याला सुख मानतो नाहीतर दु:ख. खरेतर सुख व दु:ख ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण आत्ता या क्षणी आपण सुखी असो व दु:खी, अंतिमतः आपण दु:खीच होणार कारण आपण आपल्या भावनांचे गुलाम आहोत. ह्या आजारांचे, ह्या आजारांच्या आसक्तीचे गुलाम आहोत.

त्याच आजारांसोबत अनेक वर्षे जगल्यावर त्या डॉक्टरने त्याला अखेरीस त्या आजारांमधून मुक्त केले. खरेतर ह्या सगळ्या आजारांचे उगमस्थान एकच, मन! त्या मनातून निर्माण होणारे असंख्य निरुद्देश विचार व भावना, त्या भावनांची आसक्ती... आपल्याच मनाने तयार केलेल्या आपल्या काल्पनिक स्वतःची व त्या स्वतःच्या व्यक्तित्वाची, त्या व्यक्तित्वाच्या ईमेजची काळजी......सगळे आपल्या मनाने तयार केलेले एक आभासी जग, असे जग जे फक्त आपल्या मनात व विचारात सोडून कुठेच अस्तित्वात नाही.    

इतके दिवस तो आयुष्याचा अर्थ शोधत होता, पण आज त्याला कळले की आयुष्याला अर्थ नाहीच.... हे फक्त एक बौद्धिक मनोरंजन आहे. एका झाडाचे जसे बी असते त्यातून एक उगवते, मोठे होते, एके दिवशी ते कोसळते. जसे त्याच्या आयुष्याला काही अर्थ नाही, लाखो जीव, पशु पक्षी, झाडे, जमीन, डोंगर, नद्या, समुद्र यांच्या आयुष्याला काही अर्थ नाही काही उद्देश नाही, तसाच त्याच्या आयुष्याला काही अर्थ नाही. अस्तित्वाला काही अर्थ नाही, उद्देश नाही. म्हणले तर सगळेच निरर्थक आहे. हे फक्त एक निसर्गचक्र आहे. आपण आज आहोत उद्या नाही. आपल्यासारखे अनेक जन्मले व मेले, ना त्यांच्या आयुष्याला काही महत्व होते ना आपल्या आयुष्याला आहे. काहीही निर्माण होत नाहीए व काहीही नष्ट होत नाहीए, फक्त रुप बदलत आहे, स्वरुप बदलत आहे.

आपण आज इथे आहोत तर फक्त हे सर्व समरसून अनुभवायचे आहे, आस्वाद घ्यायचा आहे, या निसर्गात निरुद्देश भटकायचे आहे.....

आपण म्हणजे काही नाही फक्त एक स्पंदन आहे, जे कदाचित उद्या किंवा पुढच्या क्षणी नसणार आहे.

माझ्या मनाने निर्माण केलेला मी आहे म्हणून माझी सगळी सुख दु:ख आहेत. ज्या क्षणी मी नाहीसा होईन त्याच क्षणी माझी सगळी सुख दु:ख पण नाहीशी होतील.

हे सगळे कळल्यावर त्याला दिव्यत्वाचा स्पर्ष झाला, त्याला या सर्व बंधनातून मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला. तत्वज्ञान, देव, धर्म, अध्यात्म यांच्याविषयीच्या अनेक शब्दिक पोकळ बुडबुड्यांच्या पलिकडचा अर्थ त्याला गवसला. कारण जे त्याला माहित होतं ते त्याला कधी आतमधून उमगलंच नव्हतं, त्याच्या आतपर्यंत ते कधी पोचलंच नव्हतं.

तो म्हणजे निसर्ग, निसर्ग म्हणजेच देव. कोणत्याही भावनेचा स्पर्ष न झालेले निरागस स्पंदन म्हणजेच निसर्ग, ते स्पंदन म्हणजेच देव !

सगळ्या रोगांमधून, बंधनांमधून मुक्त होणे म्हणजेच परमानंद, म्हणजेच मोक्षप्राप्ती !

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast. Mala hech mhanaiche hote. Thanks for putting my reality in words. Sorry for English.

माझ्या मनाने निर्माण केलेला मी आहे म्हणून माझी सगळी सुख दु:ख आहेत. ज्या क्षणी मी नाहीसा होईन त्याच क्षणी माझी सगळी सुख दु:ख पण नाहीशी होतील.>> Happy आवडले स्फुट

माझ्या मनाने निर्माण केलेला मी आहे म्हणून माझी सगळी सुख दु:ख आहेत. ज्या क्षणी मी नाहीसा होईन त्याच क्षणी माझी सगळी सुख दु:ख पण नाहीशी होतील >>
विचार करायला लावणारे वाक्य!
मी नाहीसा झालो तरी पण 'मन' राहील? 'माझं मन' शिल्लक राहील? जर मी नाही तर मन 'माझं' कसं?
यात सर्क्युलर रिझनिंग जाणवतं आहे, किंवा मुर्गी - अंडा प्रॉब्लेम. नुकतंच लेखकानं याला भाग १, म्हटलं आहे. पुढच्या भागात याचा उलगडा व्हावा.
काहीही असो, उत्तम लेख...

Abuva,

मन राहीलच. पण आपण आपल्या मनाने निर्माण केलेल्या व्यक्तीला स्वतःपासून तोडू शकलो तर? आपले स्वत्व, मीपणा यापासून स्वतःला तोडू शकलो तर आपण त्या मनाचे गुलामे राहणार नाही. आपली सुख दु:ख जी आहे ती खरे तर आपली नाहीत आपल्या मनाची आहेत. ते त्याला कवटाळून बसले आहे.

जेव्हा (माझ्या मनाने निर्माण केलेला) मी नाहीसा होईन तेव्हाही मन असेल. पण ते माझे नसेल.
पहिली पायरी आहे आपल्यामधली व आपल्या मनाने निर्माण केलेल्या आपल्या प्रतिमेतली साखळी तोडणे. मग मनाचे विकार गळून पडायला सुरुवात होईल. तो मीपणा नाहीसा झाला की त्यामुळे निर्माण होणार्‍या भावना व क्लेष पण निर्माण होणार नाहीत. मन असेल पण आपण त्याच्यापासून वेगळे होऊ.

त्याही पुढे एक पाऊल गेल्यास जेव्हा मन पूर्ण पणे नाहीसे होते तेव्हाच आपल्याला जागृत समाधी अवस्था प्राप्त होईल.

आपल्या आयुष्यातले सर्वोत्तम क्षण आठवल्यास लक्षात येईल की तेंव्हा आपण काय विचार करत होतो ते आपण सांगू शकत नाही. ते क्षण अगदी ठळक पणे आपल्या स्मृतीवर कोरले गेले आहेत.
कारण आपण ते मनाच्या/ विचारांच्या माध्यमातून न अनुभवता स्वतः अनुभवलेले आहेत. त्या क्षणी आपण पुर्णपणे त्या क्षणाशी एकरुप झालेलो होतो. पूर्ण पणे तो क्षण जगलो होतो. तीच ती अवस्था जेव्हा मन पुर्णपणे शांत होतं, निशःब्द होतं, अ‍ॅबसेंट होतं.

आपला प्रॉब्लेम हा आहे की ती समाधी अवस्था फक्त काही क्षणांसाठीच टिकते. नंतर परत आपल्या मनाची अव्याहत बडबड सुरु होते.

त्या संपुर्ण समाधी अवस्थेला पोचणे जेव्हा जमेल तेव्हा जमेल पण आपण मनाच्या बडबडी पासून, त्याने निर्माण केलेल्या आपल्याला स्वतःपासून वेगळे करायला सुरुवात केल्यास स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवणे शक्य होते.

भाग २ मधे काय असेल याची उत्सुकता आहे.>>>

मला जे काही पुस्तके वाचून, काही अनुभव घेऊन जे कळले आहे, किंवा कळले आहे असे न म्हणता जी माहिती मिळाली आहे ती मांडायची होती.

ती मांडताना दोन प्रकारे मांडायचा विचार आला. एक म्हणजे वर हा पहिला भाग लिहिलाय तसा नी दुसरा आपल्या दैनंदिन आयुष्यातले प्रसंग घेऊन.
पुढच्या भागांमधे फक्त हेच सर्व दैनंदिन आयुष्यातल्या प्रसंगांमधून वेगवेगळ्या प्रकारे लिहिणार आहे.

पुढचे भाग न वाचल्याने काही बिघडणार नाही.

छान चिंतन...
पण कधी कधी वाटतं आपणही निसर्ग चक्राचा भाग असू तर कशाला एवढा विचार करायचा. जे येतं ते सुखदुःख मनसोक्त भोगून मरावं. तसंच जगणं सुंदर आहे. मनाच्या पलीकडं जायचा खटाटोप सगळ्यांनाच जमेल असं नाही. आपणही गर्दीचा भाग व्हावं. जत्रा मनसोक्त पहावी. प्रवाहपतित असतोच आपण .

>>>>>>>>>>>>.पुढच्या भागांमधे फक्त हेच सर्व दैनंदिन आयुष्यातल्या प्रसंगांमधून वेगवेगळ्या प्रकारे लिहिणार आहे.
नक्की लिहा. माझ्यासारखे अनेक जण असतील ज्यांना उदाहरणातून , अमूर्त (अ‍ॅब्स्ट्रॅक्ट) संकल्पना जास्त नीट कळते.