आर्थिक उदारीकरणानंतरचा महाराष्ट्रीय मध्यमवर्ग आणि विज्ञान - तंत्रज्ञान

Posted
6 months ago
शेवटचा प्रतिसाद
6 months ago

गेल्या आठवड्यात सादर झालेल्या नव्या अर्थसंकल्पात परदेशातून होणार्‍या रसायनांची बेसिक कस्टम्स ड्यूटी आधी १०% होती, ती आता १५०% झाली आहे. तीनचार दिवसांपासून याबद्दल संशोधकांच्या समूहात चर्चा सुरू झाली. काहींच्या मते ही छापण्यातली चूक आहे. पण तशी ती नसावी. गेल्या काही वर्षांत रसायनांची आयात वाढल्यामुळे ही वाढ केली, असं सरकारी अधिकार्‍यांनी म्हटल्याच्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. या वाढीमुळे संशोधनावर विपरित परिणाम होणार आहे.

यंदा शिक्षणक्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूदही घटली आहे. ती गेली दहा वर्षं घटतेच आहे. याबद्दल समाजमाध्यमांमध्ये फारशी चर्चा मात्र दिसून येत नाही. इतर करवाढीबद्दल रोज सातत्यानं लिहिलंबोललं जात आहे. पण रसायनांच्या आयातशुल्कातली वाढ, शिक्षणासाठीच्या तरतुदीमध्ये घट यांबद्दल मराठी मध्यमवर्ग अगदीच गप्प आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाबद्दलही मध्यमवर्गानं अनास्थाच दाखवली. या धोरणाचे फायदेतोटे जाणून घेण्यात त्याला रस नव्हता.

या पार्श्वभूमीवर मला मी गेल्या वर्षी 'मुक्त संवाद' या नियतकालिकासाठी लिहिलेला लेख आठवला. आर्थिक उदारीकरणानंतर मध्यमवर्ग विज्ञान - तंत्रज्ञान यांकडे कसा बघतो, याबद्दल माझी निरीक्षणं संपादकांनी लिहून मागितली होती.

तो लेख इथे प्रकाशित करत आहे.

****

क्रिस्तोफर नोलनचा ’ऑपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर फेसबूकवर, ट्विटरवर कित्येकांनी या चित्रपटाबद्दल लिहिलं. बहुसंख्य परीक्षणांमध्ये मला तक्रारीचा सूर जाणवला. ’आम्हांला वाटलं अणुबॉम्ब कसा तयार तयार झाला, ते दाखवतील, पण सिनेमात तर फक्त चर्चा होती’, अश्या अर्थाच्या प्रतिक्रिया अनेक होत्या. हे लिहिणार्‍यांमध्ये अनेक विज्ञानशाखेचे पदवीधर होते. चित्रपटाच्या निमित्तानं ऑपनहायमरच्या आयुष्यात असलेल्या भगवद्गीतेच्या स्थानाबद्दल चर्चा झाली. चित्रपटातल्या एका दृश्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. चित्रपटावर बंदीचीही मागणी झाली. या सगळ्या गदारोळात चित्रपटातल्या शास्त्रज्ञांसमोरचे नैतिक पेच, त्यांचं खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य, विज्ञानाची भाषा, शास्त्रद्न्यांची भाषा, आणि विज्ञानाचं राजकारण हे चित्रपटात बारकाईनं आणि शक्य तितक्या तपशिलात मांडलेले विषय सपशेल दुर्लक्षिले गेले.

त्याच सुमारास ’इस्रो’चे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ चांद्रयानाची प्रतिकृती घेऊन तिरुपतीस जाऊन आले. यापूर्वीही महत्त्वाच्या मोहिमांच्या आधी शास्त्रज्ञ तिरुपतीला दर्शनासाठी गेले आहेत. या घटनेवर आक्षेप घेणारे थोडे होते. ’ते शास्त्रज्ञ असले तरी त्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांना धर्मपालनाचा पूर्ण अधिकार आहे’, असं बहुमत होतं. शास्त्रज्ञांनी तिरुपतीला जाणं अयोग्य होतं, त्यातून चुकीचा संदेश लोकांपर्यंत जातो, मोहीम सरकारी होती, खाजगी नव्हे, असं म्हणणार्‍या संशोधकांना समाजमाध्यमांमध्ये ट्रोल केलं गेलं.

आर्थिक उदारीकरणानंतर महाराष्ट्रीय मध्यमवर्गाची विज्ञान - तंत्रज्ञानाबाबतची समज, तो त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतो यांबद्दल लिहीत असताना या दोन घटना प्रातिनिधिक वाटतात. एकोणिसाव्या शतकातला स्थितिशील महाराष्ट्रीय समाज एका परंपरागत चौकटीत अडकला होता. समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धर्माचं प्राबल्य होतं आणि धार्मिकव्यवस्था रूढीबद्ध होती. वर्णधर्म, जातिव्यवस्था, गावगाडा, कुटुंबव्यवस्था यांना दैवी अधिष्ठान असून या संस्था अपरिवर्तनीय आहेत, अशी समस्तांची धारणा होती. वर्ण-जातींची विषमताप्रधान उतरंड, ज्ञान आणि श्रम यांची फारकत, दैववादी विचारसरणी, बंदिस्त ग्रामजीवन, अस्पृश्यता, स्त्री-दास्य ही स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रीय समाजजीवनाची वैशिष्ट्यं होती. ’जुनं सोडू नये, नवं करू नये’ अशी समाजाची रीत होती. ब्रिटिशांनी त्यांच्या पद्धतीचं शिक्षण पेशवाईनंतर महाराष्ट्रात रुजवायला सुरुवात केल्यानंतरही बहुसंख्य समाज मनानं पेशवाईतच जगत राहिला. सामाजिक विषमता आणि शोषण या गोष्टींची झळ लागत असूनही समाज बंडखोर नव्हता. अगतिकता, दैववादी मनोवृत्ती यांमुळे सामाजिक बंडखोरीला पोषक वातावरण निर्माण झालं नाही. त्यामुळे महाराष्ट्रीय समाज सहिष्णू आहे, असं चित्र निर्माण झालं. ही ’सहिष्णूता’ औदासीन्यातून निर्माण झाली होती, हे मात्र कोणीच लक्षात घेतलं नाही.

एकोणिसाव्या शतकापासून सुरू झालेला शिक्षणाचा प्रसार आणि नोकर्‍यांमधलं उत्पन्न यांमुळे सुशिक्षितांची जीवनशैली बदलली आणि मध्यमवर्गाचा उदय झाला. या मध्यमवर्गाचा ओढा आधुनिक राहणीमानाकडे होता. ऐहिक सुखासाठी पैसा खर्च करण्याची त्याची तयारी होती. आगरकरांनी मराठी मध्यमवर्गाच्या उदयाच्या काळात बुद्धिप्रामाण्यवादाचा हिरीरीनं पुरस्कार केला. नंतर ती ध्वजा र. धों. कर्वे यांनी पुढे नेली. पण महाराष्ट्रीय मध्यमवर्गानं आर्थिक समृद्धी देणारी व्यवस्था लगेच स्वीकारताना या अर्थव्यवस्थेबरोबर येणारी मूल्यव्यवस्था आपलीशी केली नाही. युरोपीय राष्ट्रवाद त्यानं स्वीकारला आणि लोकशाही व समता या मूल्यांकडे तो कायम साशंकतेनं पाहत राहिला. बुद्धिप्रामाण्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची चेष्टाही करत राहिला. तंत्रज्ञानावर सातत्यानं पहिला हक्क प्रस्थापित करत राहिलेल्या या वर्गानं वैज्ञानिक प्रगतीची फळं चाखली आहेत. दामोदर कोशंबींनी लिहिल्याप्रमाणे बूर्झ्वा - भांडवलदार उत्पादनपद्धती बहरली ती या मध्यमवर्गाच्या पाठिंब्यामुळे. आणि तरी हा वर्ग विज्ञानाला अभिप्रेत आणि आवश्यक असलेल्या चिकित्साबुद्धीला कमी लेखत आला आहे.

१९५८ साली जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या ’विज्ञान नीति’चा मसुदा संसदेत मांडला. या मसुद्यामुळे स्वतंत्र भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा पुढच्या काही दशकांसाठी प्रवास कसा असेल, हे स्पष्ट झालं. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा विकास केवळ विज्ञानाच्या अभ्यासातून आणि त्याच्या वापरातून होऊ शकतो, हे या निमित्तानं जनतेला सांगितलं गेलं. १९७६ सालच्या घटनादुरुस्तीत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार आणि प्रसार करणं भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, हे समाविष्ट केलं गेलं. नंतर १९८७ साली लागू झालेल्या शैक्षणिक धोरणात ’वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती’ या गाभाघटकाचा समावेश झाला.

मात्र आधुनिक लोकशाहीच्या सुविहित चलनासाठी विज्ञान अत्यावश्यक आहे, याकडे महाराष्ट्रीय मध्यमवर्गानं कायम दुर्लक्ष केलं. प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचं, मत मांडण्याचं स्वातंत्र्य लोकशाही देते, तसंच विज्ञानही देतं. तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती व लोकशाही यांचा पाया सत्याचा शोध हाच आहे. प्रत्येकाला असलेलं प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य नव्या कल्पना जन्माला घालतं, जटिल समस्यांवर उपाय शोधायला मदत करतं. हुकुमशाहीबद्दल कायम सुप्त आकर्षण असलेल्या, फॅशिझमच्या वाढीसाठी सोयीच्या बुद्धिवादाचा पुरस्कार करणार्‍यांना थोर मानणार्‍या महाराष्ट्रीय मध्यमवर्गानं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगल्यानं येणारा तरतमभाव दुर्लक्षिला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूनं बोलणार्‍या संशोधकांची, विचारवंतांची खिल्ली उडवण्यात मध्यमवर्ग अग्रेसर राहिला आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये वैज्ञानिक प्रगतीमुळे मध्ययुगीन विचारसरणी मागे पडली, पण भारतात आपण हे घडवू शकलो नाही. भारतात विज्ञान व्यापक बौद्धिक आणि सामाजिक चळवळीचं रूप घेऊ शकलं नाही. मध्यमवर्गाला आर्थिक - राजकीय - सामाजिक भूतकाळाचा त्याग न करता येणं भारतीय विज्ञानासाठी घातक ठरलं.

विचारस्वातंत्र्य अव्हेरणारा समाज सहजच राष्ट्रवादाच्या आहारी जातो. सतत टोकदार अस्मितांचा आधार घेत राहतो. दुराग्रही होतो. राष्ट्रवादाच्या जोडीने येणारा पुनरुज्जीवनवाद छद्मविज्ञानाच्या वाढीस खतपाणी घालतो. ’आमच्या पूर्वजांना सगळं ठाऊक होतं’, ’पाश्चात्त्यांनी लावलेले सारे शोध आम्ही त्यांच्याआधीच लावले होते’ अश्या दाव्यांवर मध्यमवर्ग सहज विश्वास ठेवतो. या दाव्यांचा सर्वांत मोठा समर्थक व प्रसारकर्ता मध्यमवर्ग आहे कारण त्यातून त्याचा अहंगंड जपला जातो. ज्ञाननिर्मितीचे कष्ट वाचतात. ’श्यामची आई’नंतर भेट म्हणून ’वैदिक गणित’ या पुस्तकाचे संच देणारा मध्यमवर्ग २०१४ सालानंतर भारतात ’वैदिक विज्ञान’ अधिकच बहरलं यामुळे खूश आहे. अनेक सरकारी संस्थांमध्ये छद्मविज्ञानाचा पुरस्कार सुरू झाला आहे. सरकारला मिळालेल्या मध्यमवर्गाच्या पाठिंब्यामुळे ए१ - ए२ दूध, ज्योतिष, वास्तुशास्त्र यांच्याशी संबंधित प्रकल्पांसाठी भरपूर निधी उपलब्ध झाला आहे. काही विद्यापीठांमध्ये गोशाळा सुरू झाल्या आहेत.

गेल्या दहा वर्षांत विज्ञानाशी संबंध नसलेल्या गैरसरकारी संस्था सरकारी धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होताना, हस्तक्षेप करता दिसतात. या संस्था 'भारतीय' विज्ञानाच्या प्रसारासाठी काम करत असल्याचा दावा करताना छद्मविज्ञानाचा प्रचार करतात. त्यांनी प्रसृत केलेल्या लेखनात, भाषणांमध्ये विज्ञान आणि इतिहास यांचा अनेकदा राजकीय प्रचार दिसून येतो. यासाठी त्यांना सरकारी निधीही मिळतो. मराठी मध्यमवर्गाला यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आवश्यक असले तरी त्यासाठी विज्ञानाच्या विविध अंगांशी उत्तम परिचय असावा लागतो. केवळ राष्ट्रवादी भूमिकेतून असा प्रसार करता येत नाही.

मध्यमवर्ग अश्या संस्थांचं स्वागत करतो, कारण विज्ञान म्हणजे काय, हेच तो शिकलेला नसतो. विज्ञानाकडे आपण केवळ दावे किंवा दोनचार प्रयोगांचे निष्कर्ष या दृष्टीनं बघतो. विज्ञानाची एक स्वतंत्र तत्त्वपद्धती आहे, आणि एका दीर्घ प्रक्रियेनंतर काहीएक अनुमान काढता येतं, हे अनुमानही अंतिम नसतं, असा विचार मध्यमवर्गाकडून केला जात नाही. हा वर्ग एकीकडे ’पाश्चात्त्यांनी आपलं ज्ञान पळवून नेलं, नाहीसं केलं’ अशी हाकाटी पिटतो, आणि दुसरीकडे आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ नासा, सर्न, युनेस्को अश्या संस्थांच्या नावाचा वापर करतो. विज्ञानशाखेचे सर्वाधिक पदवीधर असलेल्या देशात हे छद्मदावे खोडून काढणारे किंवा त्या दिशेनं प्रयत्न करणारे अत्यल्प आहेत. रामदेवबाबा किंवा सद्गुरु यांच्या दाव्यांचा प्रतिवाद केल्यास तो भारतीय संस्कृतीचा अपमान समजला जातो. ’वैदिक विज्ञाना’च्या नावाखाली केल्या जाणार्‍या अशास्त्रीय दाव्यांना होणार्‍या विरोधास मध्यमवर्गाकडून ’भारतीय ज्ञानपद्धतीवर होणारा हल्ला’ हे लेबल चिकटवलं जातं. ’मूठभरांची मक्तेदारी’ असलेलं ’पाश्चात्त्य’ विज्ञान सामान्य लोकांच्या मदतीला धावून येणार्‍यांवर अन्याय करतं, असं चित्र उभं केलं जातं. वास्तविक हा लढा भारतीय विज्ञान विरुद्ध पाश्चात्त्य विज्ञान असा नसून विज्ञान विरुद्ध छद्मविज्ञान असा आहे.

महाराष्ट्रात विज्ञानप्रसाराचं काम करणारे काही ज्येष्ठ ’अतींद्रीय अनुभव येतात / येऊ शकतात, आत्मा आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे / पडताळा आला आहे’ अशी विधानं अनेक वर्षं करत आले आहेत. त्यांच्या या विधानांचं खंडन क्वचितच केलं गेलं. उलट विज्ञानप्रसाराचं काम करणार्‍या संस्थांनी त्यांना सतत व्यासपीठ मिळवून दिलं. त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. गेल्या वर्षी उत्क्रांतीचा सिद्धांत खोटा आहे, असं प्रतिपादन करणार्‍या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुस्तकावर टीका करणारा आवाज क्षीण होता. स्वत:ला बुद्धिवादी म्हणवून घेणारे याबद्दल काहीच बोलले नाहीत. सध्या समाजमाध्यमांमध्ये ’विज्ञानप्रसारा’चं काम करणारे अनेक आहेत. बहुतेकांकडे अभियांत्रिकीची पदवी आहे. मूलभूत विज्ञानात संशोधन केलेले / करणारे फार कमी आहेत. आपण विज्ञानाबद्दल बोलत आहोत, अशी त्यांची समजूत असते. त्यांच्या श्रोत्यांची-प्रेक्षकांचीही अशीच समजूत हे अभियंते करून देतात. पण वास्तविक ते तंत्रज्ञानाबद्दल बोलत असतात. त्यातही भूतकाळातल्या कपोलकल्पित कथा-घटनांना, छद्मविज्ञानाला प्राधान्य दिलं जातं. असे व्हिडिओ लोकप्रिय होतात आणि हेच विज्ञान आहे, असा समज ठळक होतो. छद्मविज्ञानाचा प्रसार होत असतानाच मुळात विज्ञानाचा स्वीकार करावा किंवा नाही, हा प्रश्न हल्ली वरचेवर विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्याच्या मनात ’नाही’ असंच असतं. कोव्हिडच्या लाटेनंतर विज्ञानविरोधी भावनेला धार चढली आहे. कोव्हिडकाळात अनेकदा सामान्यजनांकडून शास्त्रज्ञांच्या सूचनांचा, सल्ल्यांचा स्वीकार केला गेला नाही. विज्ञान गतिशील असतं, याचं भान मध्यमवर्गानं ठेवलं नाही. जगभरात अनेक शास्त्रज्ञ एकाच वेळी कोव्हिडवर मात करायचा प्रयत्न करत होते. रोज नवनवी माहिती उपलब्ध होत होती, निरीक्षणं नोंदवली जात होती. कोव्हिडसंबंधी वैज्ञानिक माहिती सतत बदलत होती. ही माहिती तर्काच्या आधारे निश्चित केलेल्या वैज्ञानिक कसोट्यांवर टिकते की नाही, हे पाहिलं जात होतं. विज्ञानाची कार्यपद्धती समजून न घेतलेल्या समाजाला दुर्दैवाने हे ’अवैज्ञानिक’ वाटलं. एकंदर समाजाला ऍण्टी-इन्टलेक्चुअल भूमिका घ्यायला आवडू लागली आहे.

समाजाला आणि समाजातल्या नेत्यांना ठाम आणि ठोस उत्तरं हवी असतात. विज्ञान अशी उत्तरं देत नाही. विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच विज्ञानातली अनिश्चितता आणि मतभेदांसाठी असलेला अवकाश यांचं भान समाज ठेवत नाही. आपले निष्कर्ष परिवर्तनीय आहेत, हे विज्ञानाला ठाऊक असतं. आपली तत्त्वं अपरिवर्तनीय आहेत, असं मानणार्‍या धर्माचं आणि विज्ञानाचं मुळातच जमू शकत नाही. विज्ञान सतत प्रश्न विचारायला भाग पाडतं. धर्माला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मध्यमवर्गावर असलेला धर्माचा वाढता पगडा त्याला विज्ञानापासून अधिकच दूर नेतो आहे.

’विज्ञान आणि अध्यात्म’ हा मराठी मध्यमवर्गाचा आवडता विषय आहे. अध्यात्माशिवाय विज्ञानास अर्थ नाही, अशी त्याची ठाम समजूत आहे. संशोधन हे कार्यक्षेत्र निवडणार्‍या बहुसंख्यांना विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ’देवावर तुमचा विश्वास आहे का?’ संशोधक हे समाजाचा हिस्सा असतात. त्यांच्या समजुतींवर, जडणघडणीवर समाजाचा प्रभाव असतो. समाजातलं एक बनून राहण्याचा त्यांच्यावर अनेकदा स्पष्ट - अस्पष्ट दबावही असतो. आपण विज्ञानक्षेत्रात काम करत असलो तरी आपण पुरेसे धार्मिक आहोत, हे अनेक संशोधकांना दाखवत राहावं लागतं. विशेषत: स्त्री-संशोधकांवर हा दबाव अधिक असतो. त्यामुळे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत प्रयोगशाळेत संशोधन करणारे बहुसंख्य घरी परतले की तात्पुरता परिधान केलेला विज्ञानाचा लॅबकोट सहज काढून खुंटीला लावतात. तो त्यांच्या अंगावर पुन्हा चढतो तो दुसर्‍या दिवशी प्रयोगशाळेत गेल्यावर. आणि म्हणून ’ट्रकवर लिंबूमिरची बांधतो, मग विमानावर बांधायला काय हरकत आहे’ हा प्रश्न मध्यमवर्ग सहज विचारू शकतो. खंडेनवमीला अनेक प्रयोगशाळांमध्ये यंत्रांची पूजा होते. त्या दिवशी अधिकृत सुटी नसूनही तिथलं काम बंद असतं. इथे ’खाजगी विरुद्ध सार्वजनिक’ हे द्वंद्व उभं राहतं. ’सार्वजनिक ठिकाणी’ किंवा शासकीय कार्यालयांमध्ये धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, अंधश्रद्धेचा प्रसार आणि प्रचार होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण भारतात खाजगी आणि सार्वजनिक यांच्यातल्या सीमा फार धूसर आहेत. एखादी गोष्ट, तीही धर्माची, घरी केलेली चालत असेल, तर ती सार्वजनिक ठिकाणी करायला हरकत नाही, अशी भूमिका घेतली जाते.

विज्ञान म्हणजे प्रयोगशाळेत बसून रंगीबेरंगी द्रावणं एकत्र करणं, किंवा रासायनिक समीकरणं लिहिणं नव्हे. त्या समीकरणातलं सौंदर्य जाणणं, ते समीकरण तसं का लिहिलं जातं, ते तसं लिहिण्यामागची प्रक्रिया काय, हे समजून घेणंही विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे शाळेत आणि कॉलेजात फॉर्म्युले, व्याख्या पाठ करण्याचा विषय अशी समजूत करून घेतल्यानं मानवी कुतुहलात, चिकित्सावृतीत असलेली भव्यता, सौंदर्य आपल्याला दिसत नाही. पण फक्त कुतुहल म्हणजेही विज्ञान नव्हे. अमाप कुतुहल असलेला विज्ञानाचा पदवीधर तर्कद्वेष्टा असू शकतो. विज्ञानाची स्वतंत्र कार्यपद्धती आहे. संशोधनासाठी विषय निवडणं, त्यासाठी निवडलेल्या मेथडॉलॉजीनुसार प्रयोगांची आखणी करणं, प्रयोगांची चौकट ठरवणं, हाती लागलेल्या डेटाचा अन्वयार्थ लावणं ही कामं शास्त्रज्ञ करतो. यासाठी त्याला अनेक बाजू असलेल्या शक्यतांचा विचार करावा लागतो. या किचकट विचारप्रक्रियेत अनेकदा त्याला इतर शास्त्रज्ञांना, विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावं लागतं. आपली जडणघडण, स्वभाव, गंड, पूर्वग्रह यांचा विचारप्रक्रियेत अडसर ठरू न देण्याची काळजी त्याला घ्यावी लागते. शास्त्रज्ञाच्या तात्त्विक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक बैठकीचा संशोधनावर मूलभूत परिणाम होऊ शकतो. म्हणून आपली ’वैज्ञानिक शैली’ नेमकी कोणती, ती योग्य आहे किंवा नाही, हे त्याला सतत तपासावं लागतं. समाजाला आणि काहीवेळा दुर्दैवानं शास्त्रज्ञांना या प्रक्रियेची कल्पना नसते. विज्ञानाच्या इतिहासात सामाजिक किंवा वैयक्तिक धारणांमुळे संशोधनाला वेगळं किंवा चुकीचं वळण लागल्याची अनेक उदाहरणं आहेत. विज्ञानाच्या मदतीनं वंशांची निकृष्टता जोखण्याचं काम ’यूजेनिक्स’मध्ये केलं गेलं. सोवियत युनियनमध्ये १९३०नंतर मेन्डेलियन जेनेटिक्स नाकारलं गेल्यानं सोवियन जीवशास्त्राचं अमाप नुकसान झालं. आणि तरीही ’विद्न्यानाचं एक स्वतंत्र तर्कशास्त्र आहे आणि त्याचा समाजाशी थेट संबंध नाही’, असा समज मध्यमवर्ग करून घेतो.

एखादी समस्या ’शास्त्रोक्त’ पद्धतीनं कशी सोडवावी, हे विज्ञान शिकवतं, असं आपण शिकतो. पण मुळात ’शास्त्रोक्त’ म्हणजे काय, ’शास्त्रोक्त’ पद्धतींतल्या पायर्‍या कोणत्या याचं शिक्षण पदवीच्या विद्यार्थ्यांना क्वचितच मिळतं. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या परिसंस्थेत शोधनिबंध प्रकाशित करणं, किंवा करत राहणं अनिवार्य आहे. पण अनेक भारतीय संशोधकांना इंग्रजीत संशोधन-प्रस्ताव, संशोधन-पद्धती, शोधनिबंध लिहिता येत नाहीत. इंग्रजीवर प्रभुत्व असलं तरी विज्ञानाची एक स्वतंत्र भाषा आहे. नेमकेपणा हा या भाषेचा महत्त्वाचा गुण आहे. या भाषेशी प्रयत्नपूर्वक मैत्री करावी लागते. विज्ञानाची भाषा म्हणजे काय, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. बहुतेक सर्व विद्यापीठांमध्ये पीएचडी करताना वैज्ञानिक लेखनपद्धती आणि संशोधन पद्धती हे दोन अभ्यासक्रम अनिवार्य असतात. मात्र त्यांच्याकडे गांभीर्यानं बघितलं जात नाही.

भारतात शोधनिबंधांच्या संख्येवरून प्रगती मापण्याचा प्रयत्न केला जातो. पण फक्त शोधनिबंधांची संख्या हा वैज्ञानिक प्रगती मापण्याचा निकष असू शकत नाही. ही संख्या वाढली, तरी आपल्याकडे नोबेल पारितोषिक मिळालेले शास्त्रज्ञ किती, हा प्रश्न उपस्थित करताच येतो. शिवाय हल्ली शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी मोजावे लागणारे पैसे, त्यातून तयार झालेले दलाल, खोटी जर्नलं, सायटेशन देण्यासाठी येणारे दबाव यांना तोंड देणं जिकिरीचं झालं आहे. पुरेसे शोधनिबंध प्रकाशित केल्याशिवाय पीएचडीची पदवी मिळत नाही. सरकारी प्रयोगशाळांमध्ये शोधनिबंधांच्या संख्येवर बढती अवलंबून असते. त्यामुळे शोधनिबंधांच्या दर्जाकडे लक्ष न देता केवळ आकडे वाढवण्यावर भर दिला जातो.

महाराष्ट्रीय मध्यमवर्गाला अर्थातच याच्याशी देणंघेणं नाही, कारण त्याच्यासाठी शास्त्रज्ञ हा केवळ काही बाबतींत अभिमानानं मिरवण्यापुरता समाजाचा भाग आहे. डॉ. माशेलकर, डॉ. गोवारीकर, डॉ. नारळीकर, आणि डॉ. काकोडकर या चार जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांबद्दल त्याला अपार आदर आणि कौतुक वाटतं. पण यांच्या कामाबद्दल त्याला माहिती नसते. ’सायटोक्रोम सी’बद्दल मूलभूत काम करणार्‍या डॉ. कमला सोहोनी त्याला माहीत आहेत त्या ’न्यूट्रिशनिस्ट’ या चुकीच्या ओळखीतून. डॉ. आशुतोष कोतवाल, डॉ. अतीश दाभोलकर ही नावं वर्तमानपत्रांमध्ये अगदी क्वचित झळकतात. ’आमची मुलं परदेशात आहेत’ अशी ऐट मिरवणार्‍यांना पुण्यामुंबईतल्या संशोधनसंस्थांमध्ये काय काम चालतं, हे माहीत नसतं. शास्त्रज्ञाच्या वैज्ञानिक यशापयशाचा समाजावर परिणाम होतो, हे मध्यमवर्गाला कळत नाही. म्हणून शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमातल्या बदलांबाबत तो उदासीन असतो. आपल्या अभ्यासक्रमात विज्ञान - तंत्रज्ञान आणि समाज यांच्या परस्परसंबंधांची चर्चा होत नाही. परीक्षांमध्ये, अगदी अत्यंत कठीण समजल्या जाणार्‍या आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेतही, एकच उत्तर असलेले प्रश्न विचारले जातात. एकापेक्षा अधिक शक्यतांचा विचार करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागत नाही. त्यामुळे विज्ञानाधारित प्रश्न सोडवण्याचं फक्त तंत्र शिकवणीवर्गांमध्ये शिकवलं जातं. या तंत्रावर हुकुमत मिळवणारे विद्यार्थी यशस्वी गणले जातात.

नव्या अभ्यासक्रमात आपली मुलं उत्क्रांती, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा आवर्तसारणी शिकणार नाहीत, याची मध्यमवर्गाला खंत नाही. बारावीपर्यंत बहुसंख्य विद्यार्थी प्रयोगशाळांमध्ये पाऊलही टाकत नाहीत. गेली काही वर्षं डमी कॉलेजं फोफावली आहेत. तिथे प्रात्यक्षिकांचे मार्क प्रयोगशाळेत न जाताच मिळतात. ’हिस्टरी ऑफ सायन्स’ हा महत्त्वाचा विषय अनेक दशकांपूर्वीच आपल्याकडे शिकवणं बंद झालं. आता नव्या धोरणात इतिहास आणि विज्ञान या दोहोंशी फारकत घेतलेला ’इंडियन नॉलेज सिस्टम’ हा विषय सर्व महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो आहे. हा विषय शिकवायला अजिबात अनुभव नसलेले इतिहासाचे, विज्ञानाचे विद्यार्थी नेमले गेले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणामुळे नवी वर्गव्यवस्था निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. हे धोरण ब्रिटिशांच्या तंत्रशिक्षणाच्या धोरणाशी मिळतंजुळतं आहे. त्याचा हेतू फक्त कामगार निर्माण करणं आहे. त्यातून ज्ञाननिर्मिती होणार नाही.

या बदलांविरुद्ध संशोधकही फारसे बोललेले नाहीत. संशोधन करताना अंगभूत व कमावलेल्या गुणवत्तेखेरिज काहीच महत्त्वाचं नसतं, असा अनेक संशोधकांचा समज असतो. पण हे खरं नाही. निम्नमध्यमवर्गातल्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्यात असलेल्या गुणवत्तेचा अंदाज नसतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, जात या बाबीही दुर्दैवानं महत्त्वाच्या ठरतात. ग्रामीण भागांतल्या शाळांची, प्रयोगशाळांची वाईट स्थिती आणि भाषा यांमुळे निर्माण झालेले अडसर विद्यार्थ्यांच्या प्रगतीत बाधा आणतात. विज्ञानक्षेत्रात नोकरीच्या संधी नेमक्या कोणत्या, याची त्यांना माहिती अनेकदा नसते. विज्ञानात पदवी मिळवली की शाळेत किंवा कॉलेजात शिकवता येतं, इतपत ज्ञान अनेकांना असतं. मात्र आता या नोकर्‍या मिळवण्यासाठी लाखो रुपयांच्या ’देणग्या’ द्याव्या लागतात. बहुतेकांच्या आवाक्याबाहेरचा हा खर्च असतो. शहरातही खाजगी शिकवणीवर्गांच्या फिया लाखांच्या घरात असल्यानं विज्ञानशिक्षण घेणं खर्चिक झालं आहे. इंग्रजी भाषेची अडचणही विद्यार्थ्यांना संशोधनक्षेत्रात येण्यापासून रोखते. अनेकदा पीएचडीसाठीच्या निवडसमितीचे सदस्य आणि गाईड इंग्रजी न येणार्‍या विद्यार्थ्यांच्या बाजूनं नसतात. परराज्यात इंग्रजी आणि मातृभाषा अश्या दोन्हींच्या अभावी संशोधकांची कुचंबणा होते. निम्नमध्यमवर्गातले व ग्रामीण भागातले विद्यार्थी संशोधनाकडे सहसा वळत नाहीत. वैज्ञानिक भांडवलाचा अभाव हे या मागचं कारण आहे. वैज्ञानिक भांडवल म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना किंवा नातलगांना किंवा परिचितांना विज्ञानात रस असेल, संशोधनक्षेत्रात काम करणारी एखादी व्यक्ती परिचित असेल किंवा कुटुंबातल्या एखाद्या सदस्याशी विद्यार्थी दैनंदिन आयुष्यात विज्ञानाबद्दल चर्चा करू शकत असेल, तर त्या कुटुंबाकडे वैज्ञानिक भांडवल आहे, असं म्हणता येईल. अश्यावेळी विद्यार्थी संशोधनक्षेत्रात रमण्याची शक्यता वाढते. वैज्ञानिक भांडवल मध्यमवर्गाकडे आणि उच्चवर्गाकडे सहसा असतं. मात्र आयटी, मॅन्यूफॅक्चरिंग, कन्सल्टिंग अश्या क्षेत्रांमध्ये तुलनेनं अधिक पैसा असल्याने मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विज्ञानक्षेत्राकडे ओढा नसतो. अभियांत्रिकीची पदवी घेऊन शिकायला किंवा इथल्या नोकरीच्या मदतीनं परदेशात जाणं, हे त्यांचं एकमेव ध्येय असतं. परदेशात आयटी उद्योगात कार्यरत असलेले भारतीय हे विज्ञानक्षेत्रात काम करतात, असाही मजेदार गैरसमज रूढ आहे.

प्रयोगशाळा, महाविद्यालयं उभारले की काम झालं, हा पूर्वापार असलेला समज कूचकामी आहे. भारतात पदवीस्तरावर विज्ञानाचं शिक्षण घेणार्‍या लोकांची जात - लिंग - धर्म - भाषा यांच्या आधारे खानेसुमारी केली जात नाही. तशी झाली असती तर विज्ञानक्षेत्र पुरुषी आणि तथाकथित ’उच्चवर्गीय’ आणि ’उच्चवर्णीय’ आहे, हे सहजच दिसलं असतं. दहावीनंतर विज्ञानशाखेचं शिक्षण आजही चांगली आर्थिक स्थिती व तथाकथित ’उच्च’ जातीत जन्म या घटकांची मक्तेदारी आहे. सरकारी पातळीवर विज्ञानशिक्षण घेण्यासाठी, संशोधनक्षेत्रात येण्यासाठी जातीचा अडसर नाही. पण आरक्षणाची मदत घेणार्‍या विद्यार्थ्यांना, संशोधकांना अपमान सोसावा लागतो. मुलींसमोर अडसर अधिक असतात. शहरी भागातल्या वाचकांना कदाचित हे अवास्तव वाटेल, पण विज्ञानाची पदवी घेतली तर लग्नास अडचण येईल, अशी आजही समजूत आहे. अनेक पीएचडी गाईड मुलींना पीएचडीसाठी प्रवेश देण्यास तयार नसतात. सरकारी संस्थांमध्ये शास्त्रज्ञांना बरा पगार मिळत नाही, अशी (काही अंशी खरी असलेली) समजूत आहे. पण ही स्थिती बदलावी, म्हणून मध्यमवर्ग सरकारला जाब विचारत नाही. गेली अनेक वर्षं नित्यनेमानं संशोधक मानधन वाढावं, म्हणून मागण्या करतात, संप करतात. गेल्या काही वर्षांत सरकारनं संशोधकांना, शास्त्रज्ञांना मिळणारे पुरस्कार, शिष्यवृत्त्या कमी किंवा बंद केले आहेत. पण याचं कोणालाही दु:ख झालेलं नाही.

भारतात पुरेश्या संशोधनसंस्था नव्हत्या आणि म्हणून आपण संशोधनात मागे पडलो, असं एक नरेटिव्ह गेल्या काही वर्षांत तयार झालं आहे. पण हे तितकंसं खरं नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात विज्ञानशाखांचं पदव्युत्तर शिक्षण देणारी आठ विद्यापीठं होती. अडतीस अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिकत होते. संशोधनाच्या प्रसाराची जबाबदारी घेतलेल्या इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (स्थापना १९११), इंडियन काऊन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च (स्थापना १९२९), आणि काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक ऍण्ड इण्डस्ट्रियल रिसर्च (स्थापना १९४२) अश्या तीन संस्था कार्यरत होत्या. या तीन संस्ठांच्या देखरेखीखाली बावीस प्रयोगशाळा काम करत होत्या. या खेरिज इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (टाटा इन्स्टिट्यूट) अश्या संस्थाही होत्या. नेहरूंनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक संस्थांची उभारणी केली. उच्चशिक्षण घेऊन परदेशी गेलेला मराठी मध्यमवर्ग या व अश्याच संस्थांमध्ये शिकला. मात्र भारतात कायमच विज्ञानशिक्षणाऐवजी तंत्रशिक्षणास सरकारी पाठबळ व समाजाचा पाठिंबा मिळाला.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत आजच्या युगात अगदी थोडका भेद उरला आहे, असं आता अनेक आधुनिक अभ्यासक व शास्त्रज्ञ मानतात. या दोहोंमधील सीमा गेल्या काही दशकांत अधिक धूसर झाल्या आहेत, हे खरं आहे. मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान यांच्यातला फरकही आता फारसा राहिलेला नाही. यांत असलेलं साम्य आणि भेद सामान्यांना माहीत नसल्यानं तंत्रज्ञानाला विज्ञान समजण्याचा घोटाळा कायम होत राहिला आहे.

मानवी आयुष्य सुखकर करणं, हा विज्ञान आणि तंत्रदज्ञान यांचा मुख्य हेतू आहे. आजवर या दोहोंमुळे मानवी जीवनावर परिणाम होतही आला आहे. पण या प्रक्रियेत समाज काहीएक किंमतही देत असतो. तंत्रज्ञान आणि संस्कृती एकमेकांत गुंतलेले असतात. तंत्रज्ञानाची मूल्यव्यवस्था समाजाला आकार देते. विद्न्यान आणि मूल्यव्यवस्था एकमेकांपासून फटकून राहू शकत नाहीत. समाजही तंत्रज्ञानाचं स्वरूप ठरवत असतो. या दोन्ही घटना एकाच वेळी सुरू असल्या तरी त्यांचा वेग कमीजास्त होत राहतो. उदाहरणार्थ, कार किंवा स्कूटर ही तंत्रज्ञानं स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत. आपल्याला रस्ते, इंधन भरायला पंप, गॅरेज व मेकॅनिक, वाहतुकीचे नियम, पोलीस वगैरे अनेक बाबींची गरज भासते.

रमा बिजापूरकरांनी भारतीय बाजारपेठेच्या अनेकत्वाकडे लक्ष वेधताना ’स्किझोफ्रेनिक भारता’चा उल्लेख केला होता. भारतीय समाज एकसंध नाही. तो विविध भाषा, धर्म, जाती, वर्ण, वंश यांनी बनलेल्या असंख्य समूहांचा संच आहे. त्यामुळे ’भारतीय तंत्रज्ञान’ विकसित करताना केवळ परदेशी तंत्रज्ञानाची स्वस्त आवृत्ती निर्माण करून खरं म्हणजे चालणार नाही. पण आजवर आपण पाश्चात्त्य तंत्रज्ञान बहुतकरून आयात केलं आहे. तंत्रज्ञानाची कमतरता मध्यमवर्गाला कधी भासलेली नाही. मध्यमवर्ग तंत्रज्ञानाला पटकन आपलंसं करतो, मात्र त्या तंत्रज्ञानाचं राजकारण समजून घेतोच, असं नाही. तंत्रज्ञानाची मूल्यव्यवस्था ते तंत्रज्ञान तयार करणार्‍यांकडून येत असते. ही मूल्यव्यवस्था सहसा पुरुषी आणि उच्चवर्गीय असते. फेसबूक किंवा टेस्ला किंवा विंडोज ही परिचित उदाहरणं आहेत. तंत्रज्ञानाचा वापर व त्याची मूल्यव्यवस्था ठरवण्यात समाजातल्या सर्वांचा नसला तरी किमान बहुसंख्यांचा सहभाग असणं अपेक्षित असतं. मात्र समाजाचा एक अतिशय लहान, पुरुषी हिस्सा उर्वरित समाजाला त्याला हवं तसं वळण लावतो. ही लोकशाही नव्हे. तंत्रज्ञान समाजातल्या मोठ्या गटाला खुलं असतंच असं नाही. विमानाच्या तंत्रज्ञानानं मूलभूत बदल घडवून आणले तरी ते आजही मूठभर समाजाच्या आवाक्यातलं आहे. एखाद्याला तिकीट परवडत असलं, तरी आपल्याला विमानातून प्रवासाची परवानगी आहे का, हा प्रश्नही पडतो. समोर आलेलं तंत्रज्ञान स्वीकारायचं, त्याच्या मूल्यव्यवस्थेच्या भानगडीत पडायचं नाही, असंच मध्यमवर्गाचं धोरण राहिलं आहे. आपण वापरत असलेलं तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध नाही, याची जाणीव मध्यमवर्गाला नाही. तंत्रज्ञानाचा वापर सर्वांना करता येतो की नाही, हेही बघितलं जात नाही. क्वचित तंत्रज्ञान शक्यतो आपल्या वर्गापुरतं मर्यादित राहील, याची काळजीही मध्यमवर्ग घेतो. कोव्हिडकाळात आपल्या राज्यात परत जाऊ इच्छिणार्‍या कामगारांना अनेक फॉर्म भरून द्यावे लागत होते. त्यांपैकी काही फॉर्म इंग्रजीत होते. सर्वत्र लॉकडाऊन असल्यानं मोबाईलवर फॉर्म भरण्याची सोय होती. पण त्यासाठी ओटीपी आणि क्वचित कॅप्चा आवश्यक होते. स्मार्टफोन नसणार्‍यांना हे फॉम भरणं शक्य नव्हतं. ज्यांच्याकडे स्मार्टफोन होते, त्यांच्यापैकी कित्येकांना हे फॉर्म भरता आले नाहीत कारण त्यांना मुळात त्यांचे फोन नंबर सांगता येत नव्हते, तिथे कॅप्चा म्हणजे काय, हे कसं कळणार?

प्रत्येक मानवी कृतीला नैतिक स्वीकार्हतेची कसोटी लावायला हवी, हे मान्य असेल तर नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. नावीन्यामुळे त्या तंत्रज्ञानाच्या कोणत्या बाजूचा नैतिक स्वीकार करावा, हा गोंधळ तयार होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, वैद्यकीय ज्ञानाचा वापर मानवी आयुष्य वाचवण्यासाठी व्हायला हवा, हे निर्विवाद असलं, तरी स्टेम सेल रिसर्चची व्याप्ती व मर्यादा काय असाव्यात, याबद्दल शास्त्रज्ञांचं एकमत नाही आणि समाजाला या प्रश्नाचे पैलू ठाऊक नाहीत. काही बाबतीत नव्या तंत्रज्ञानाची नैतिक स्वीकारार्हता ठरवताना नेमके निकष कोणते असावेत, हे समाजाला ठरवता येत नाही. आयटी तंत्रज्ञानाचे अगणित फायदे मध्यमवर्गाला मिळाले. पण सरकार आणि इतर कंपन्या जी खाजगी माहिती गोळा करतात, त्याबद्दल भूमिका काय असावी, यावर हा वर्ग विचार करत नाही. नवं तंत्रज्ञान बाजारात यायची चाहूल लागली की या वर्गाचे विचारवंत तंत्रज्ञानाची केवळ माहिती वर्तमानपत्रांतून देतात. तंत्रज्ञानाच्या मूल्यव्यवस्थेच्या, राजकारणाच्या भानगडीत ते पडत नाहीत. एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाकडे ते धास्तावलेल्या नजरेनं बघतात. वर्तमानपत्रात छापून येणारे त्यांचे लेख तंत्रज्ञानाच्या मूलभूत व्यवस्थेबद्दल, परिणामांबद्दल कमी आणि (अनेकदा कल्पित) विपरित परिणामांबद्दल अधिक बोलतात. त्यामुळे ते भविष्याचा वेध घेत आहेत वगैरे वरकरणी वाटलं तरी मध्यमवर्गाच्या तंत्रज्ञानविषयक जाणिवांमध्ये थोडी भीती निर्माण होण्याखेरिज काहीच फरक पडत नाही. मध्यमवर्ग हा तंत्रज्ञान समजून न घेता वापर करणारा केवळ ग्राहक ठरतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा योग्य वापरही अनेकदा त्याला करता येत नाही.

तंत्रज्ञान, विज्ञान, आणि भांडवल यांचा परस्परसंबंध गुंतागुंतीचा आहे. भांडवलशाही हा सामाजिक प्रगतीचा केवळ एक भाग आहे, हे लक्षात घेतलं की हा संबंध अधिकच किचकट भासू लागतो. उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतरही भारतातली अर्थव्यवस्था बहुपेडी राहिली आहे. भांडवलशाहीस पूरक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू राहिले असले, तरी या प्रयत्नांना विरोधही सतत होत आला आहे. भारतात सामाजिक - आर्थिक बदल आणि वैज्ञानिक प्रगती भांडवलशाहीचा स्वीकार करणार्‍या पाश्चात्त्य राष्ट्रांसारखे तंतोतंत होऊ शकले नाहीत, कारण जी वैज्ञानिक प्रगती भांडवलशाहीला पोषक ठरू शकते, त्या वैज्ञानिक प्रगतीच्या आर्थिक व वैचारिक भरणपोषणाच्या वाटचालीत समाजवाद महत्त्वाचा होता. अमेरिकेसारखी व्यवस्था भारतात हवी, अशी मागणी करणार्‍या मध्यमवर्गाला या विरोधाभासाची जाणीव नाही. हा मध्यमवर्ग एकीकडे सरकारकडून मोठ्या उद्योगांच्या उभारणीची अपेक्षा करतो, पण भांडवलशाहीचे धोके पत्करण्याची त्याची तयारी नाही. खेरिज परदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर तो खूश आहे. या परिस्थितीत मध्यमवर्गाच्या आकांक्षा पुर्‍या होतील, असं वैज्ञानिक धोरण आखण्यात अडचणी येतात.

विज्ञान आणि समाज यांच्यातल्या ताणाचं एक महत्त्वाचं कारण प्रयोगशाळांना मिळणारा सरकारी पैसा हे आहे. भारतातलं बहुतेक सर्व संशोधन सरकारी पैश्यावर चालतं. संशोधनासाठी उद्योग फारसे पैसे खर्च करत नाहीत. खाजगी संशोधनसंस्था बोटावर मोजण्याइतक्या आहेत. भारतात सुरू असलेलं संशोधन ’उपयुक्त’ नाही, असा एक लोकप्रिय समज आहे. त्यामुळे २००४ साली डाव्या पक्षांनी भारतीय संशोधकांनी यापुढे मूलभूत संशोधन बंद करून फक्त स्वच्छ पाणी आणि स्वस्त घरं यांसाठी काम करावं, अशी मागणी केल्यावर मराठी वर्तमानपत्रांनी आणि वाचकांनी पाठिंबाच दिला होता. २०१४ साली ’देहरादून डिक्लरेशन’ आलं. सरकार यापुढे संशोधनासाठी पैसा देणं हळूहळू बंद करेल, प्रयोगशाळांनी दरवर्षी किमान सहा नवी तंत्रज्ञानं विकसित करावीत, संशोधकांनी ’नमामि गंगे’सारख्या उपक्रमांकडे लक्ष द्यावं, असं मसुद्यात सांगितलं होतं. या मसुद्यालाही मोठा पाठिंबा मिळाला. शास्त्रज्ञांवर अन्याय करणार्‍या या मागण्या आहेत, हे लोकांना पटलं नाही. मध्यमवर्ग एकीकडे ’भारतानं विज्ञानक्षेत्रात अफाट कामगिरी केली आहे’ यावर विश्वास ठेवतो, कारण त्याच्यासमोर जागतिक कीर्ती मिळवलेले मोजके मराठी शास्त्रज्ञ, काही साधे उद्योजक, परदेशात आयटी उद्योगात कार्यरत असलेले लाखो भारतीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतीय प्रमुख ही उदाहरणं असतात. दुसरीकडे हाच मध्यमवर्ग भारतीय संशोधकांनी राष्ट्रोपयोगी काम केलं नाही, या डाव्या आणि उजव्या पक्षांच्या आरोपांनाही उचलून धरतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांबाबतीत असलेल्या समाजाच्या या विचित्र भूमिकेत फरक असण्याचं कारण सोपं आहे. सामान्यजनांच्या मते वैज्ञानिक सिद्धांत हे अमूर्त आणि प्रयोगशाळेपुरते मर्यादित असतात, तंत्रज्ञान त्यांना थेट ’अनुभवता’ येतं. ’इस्रो’नं केलेली कामगिरी त्यांना ’दिसते’. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतल्या नॅनोविज्ञानाशी त्यांचा आजवर थेट संबंध आलेला नाही. ’इस्रो’चं काम मध्यमवर्गाच्या राष्ट्रवादास पुरक आहे. इतर संस्था त्यामुळे बिनमहत्त्वाच्या ठरतात.

सरकार संशोधनासाठी पुरेसे पैसे खर्च करत नाही, जीडीपीच्या किमान २% खर्च केला जावा, ही शास्त्रज्ञांची जुनी मागणी आहे. पैसे नाहीत म्हणून संशोधक परदेशी जातात, इथे राहणार्‍यांना पैशासाठी झगडावं लागतं. पण विज्ञान - तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा लाभार्थी असलेला मध्यमवर्ग हे लक्षात घेत नाही. रिसर्च, डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन (आरडीआय) देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम करतात, वैज्ञानिक प्रगती आणि आर्थिक प्रगती यांचा थेट संबंध आहे, अशी मांडणी अनेकांनी केली आहे. सर्वच देश शास्त्रीय संशोधनात गुंतवणूक करत असले, तरी त्यांनी साध्य केलेली वैज्ञानिक प्रगती व त्या योगे झालेली आर्थिक प्रगती सारखी नाही. मध्यम किंवा कमी जीडीपी असलेले देश वैज्ञानिक प्रगतीत मागे राहतात कारण ते संशोधनासाठी पुरेसे पैसे खर्च करू शकत नाहीत. मात्र आर्थिक सुबत्ता हाच वैज्ञानिक प्रगतीचा एकमेव निकष नाही. देशाची वैज्ञानिक नीती आणि धोरणं, प्राधान्यक्रम हेही महत्त्वाचे आहेत. संशोधनात नावीन्य आणि किमान काही प्रमाणात वैज्ञानिक / तांत्रिक अनिश्चिततेचं निराकरण अपेक्षित असतं. या व्याख्या पुरेश्या स्पष्ट असल्या तरी संशोधनाचं विज्ञानात आणि आर्थिक प्रगतीत असलेलं योगदान मोजण्याची मापनपद्धती स्पष्ट नाही, कारण संशोधनात नावीन्य असलं तरी ते प्रासंगिक आहे की नाही, याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे प्रत्येक समाज / देश संशोधनासाठी पैसा खर्च करताना आपापले प्राधान्यक्रम निवडतो. स्वच्छ पाणी, स्वस्त घरं यावर देशातल्या सर्वच संस्थांनी काम करण्याची गरज नाही. या प्रश्नांवर अगोदरच अनेकजण काम करत आहेत. मात्र प्रयोगशाळांना पैसे न देण्याच्या सरकारी निर्णयाला मध्यमवर्गाचा पाठिंबा मिळतो ते त्याला हवं असलेलं चैनीचं तंत्रज्ञान सहज उपलब्ध असतं आणि आपल्या आवडत्या पक्षानं तो निर्णय घेतलेला असतो, म्हणून. सर्वांना स्वच्छ पाणी आणि स्वस्त घरं मिळावी, ही काही त्याची मनापासून इच्छा नाही.

विज्ञान हे ’उपयुक्त’च असावं, त्याच्या उपयोजनाला व्यावसायिक यश मिळावं हे अलीकडच्या वर्षांत नव-उदारमतवादी विचारवंतांनी जगभरातल्या अनेक सरकारांना पटवून दिलं आहे. मात्र व्यावसायिक हितसंबंध आणि अनुदानित संशोधन कार्यक्रम यांच्यातला संबंध जसाजसा घट्ट होत जातो, तसा संशोधनावर विपरित परिणाम वाढतो. वैज्ञानिक संशोधनासाठी कॉर्पोरेट फंडिंग मिळावं, या सरकारी इच्छेला उच्चमध्यमवर्गाचा पाठिंबा आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली परिसंस्था आपल्या देशात तयार झालेली नाही. कॉर्पोरेट फंडिंग नवनिर्मितीला हानीही पोहोचवू शकतं. कॉर्पोरेट निधी मिळालेल्या संशोधकांना त्या कॉर्पोरेशनच्या हितसंबंधांनुसार संशोधन करणं आवश्यक ठरतं. शिवाय उद्योग दीर्घकालीन फायदे असलेल्या संशोधनापेक्षा तत्कालीन व्यावसायिक मूल्य असलेल्या संशोधनाला प्राधान्य देऊ शकतात. यामुळे विज्ञान - तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीचा अभाव निर्माण होऊ शकतो.

महाराष्ट्राच्या प्रबोधनकाळात नव्या विचारांच्या चार झुळुकांमुळे इथला मध्यमवर्ग विज्ञानवादी जीवनसरणी आचरेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं घडलं नाही. आपल्या वैचारिक संचिताचं आपण काय केलं, आपला समाज ज्ञानोपासक का झाला नाही, हे प्रश्न कोणालाच पडत नाही. सरकार विज्ञानवादी नसतं. समाजानं विज्ञानवादी असावं, अशी अपेक्षा असते. समाजाला असोशी असेल तरच वैज्ञानिक प्रगती घडू शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञान स्वतंत्रपणे सामाजिक बदल घडवून आणू शकत नाहीत. उलट प्रगती साधण्याची इच्छा नसणार्‍या समाजात विज्ञान - तंत्रज्ञान प्रगतीस बाधा आणणार्‍यांच्या मदतीला धावून जाऊ शकतात. जात - धर्म - वर्ग - वर्ण - लिंग यांच्या आधारे विभागल्या गेलेल्या समाजात विज्ञान - तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. वैज्ञानिक प्रगती जशी समाजाच्या आर्थिक - राजकीय - सांस्कृतिक आकांक्षांच्या आड येऊ शकते, तशी ती अन्याय, शोषण यांविरुद्ध लढण्याचं बळही देऊ शकते. विज्ञानाला आवश्यक असलेली चिकित्सकवृत्ती आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य लोकशाही व्यवस्थेतच अधिक बहरू शकतात. विज्ञान - तंत्रज्ञानातल्या नवकल्पना बहराव्या यासाठी शैक्षणिक, वैचारिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. कोणत्याही भीतीशिवाय, सरकारी हस्तक्षेपाशिवाय संशोधकांना काम करता यायला हवं. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल, तरच विज्ञान आणि समाज यांची प्रगती होईल. छद्मविज्ञान, मिसइन्फर्मेशन, आणि हुकुमशाही आवडून घेणार्‍या मराठी मध्यमवर्गानं हे कायम लक्षात ठेवायला हवं.

****

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल 'मुक्त संवाद'चे संपादक श्री. शेखर देशमुख यांचे मन:पूर्वक आभार.

****

पूर्वप्रसिद्धी - 'मुक्त संवाद' - ऑगस्ट व सप्टेंबर २०२३.

****
विषय: 
प्रकार: 

वानवा आहे कारण चिकित्सक वृत्ती नाही. आंधळेपणाने ज्योतिष्य, पत्रिका, टॅरो कार्ड, पत्रिका, कुंडली, नक्षत्रांचे खडे, वास्तुशास्त्र, होमिओपॅथी अश्या गोष्टींवर विश्वास ठेवणे अधिक सोपे आहे. लांब कशाला, इथे मायबोलीवरच दिसेल चवीचवीने चघळले जातात हे विषय.

जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रचार आणि प्रसार होत नाही तोपर्यंत लोकांच्या धारणांवर टीका करून उलट त्यांना व्हिक्टींम आहोत असे वाटायला लावण्यात आपण हातभार लावत असतो. वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रचार आणि प्रसार हा कुणी तरी केल्याशिवाय आपोआप होत नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ( दोन्हीही) काही काळ यावर काम करत होत्या. त्यानंतर त्यांचे कार्यक्षेत्र निव्वळ बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि जादूटोणा यांना विरोध इतकेच राहिले. चळवळ ऑव्जेक्टिव्ह होत गेली. त्यांच्या वेबसाईटवर वैज्ञानिक दृष्टीकोण यावर चार सुंदर लेख होते. एक य ना वालावलकर नावाचे लेखक त्याबाबतीत नेमके लिहायचे. अन्य लेखकांची नावे आठवत नाहीत. पण बहुधा प्रभाकर देशमुख असावेत.

ते जागृती करणारे उत्तम लेख का हटवले हे समजत नाही. आताचे जे लेख आहेत ते संक्षिप्त आहेत.

अन्य काही संघटना काम करतात पण त्यांची शक्ती क्षीण आहे. पैसा आणि प्रसिद्धीअभावी अशा संघटना नंतर बंद पडतात.
वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रसार झाला तर तो विचार करणार्‍या माणसाला पटत जातो.
ज्यांनी लहानपणापासून धार्मिक रीतिरिवाज पाहिलेले आहेत आणि शालेय शिक्षण सुद्धा महत्वाचे आहे हे शिकलेले आहे, त्यांना दोन्ही डगरीवर सर्कस करणे यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. त्यांच्या धारणा आपोआप बदलतील का ?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, राज्यघटनेत निधर्मीवाद आहे म्हणून ते निधर्मी होतात का ?
उद्धव ठाकरे झाले होते का ?
हीच गोष्ट अधिकारी, न्यायाधीशांना लागू होते.

सरकारी पातळीवर त्यांचे प्रशिक्षण या दृष्टीने किती असते ?

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांना भारतीय राज्य घटना मान्य करावी लागते. निदान पदावर असेस्तोवर तरी.
अर्थात आपल्या देशात सगळेच डबल standard आहे. म्हणायचे "सत्यमेव जयते" आणि ...

बदमाष लोक नेहमी आपला ज्या राज्यघटनेला विरोध आहे त्यातल्या स्वातंत्र्याचा दाखला देत राज्यघटनेच्याच सहाय्याने आपली प्रतिगामी मते रेटत असतात. त्याचा प्रतिवाद राज्यघटनेची तत्त्वे सांगून होऊ शकत नाही.
प्रतिगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार ज्या निष्ठेने सनातनी करतात त्या निष्ठेने पुरोगामी लोक वैज्ञानिक दृष्टीकोणाचा करत नाहीत.

चिनूक्स, पुन्हा एकदा क्षमा मागतो. याच पानावर चिकटवतोय. इथे अनाठायी वाटल्यास उडवा. मग वेगळ्या धाग्यावर देता येईल.
सध्या असा धागा दिसत नसल्याने आणि नुकतेच दोन तीन धागे काढलेले असल्याने इथे डकवत आहे.

जुने जीमेल अकाउंट रिक्व्हर केले आणि त्यात गुगल डॉक मधे सेव्ह केलेला हा लेख मायबोलीच्या वाचकांसाठी कॉपी केला आहे. हा लेख कुठे होता हे आठवत नाही. बहुधा अंनिसच्या जुन्या संस्थळावर असावा. जरूर वाचा. लेख मूळचा कुणाचा आहे याची माहिती नाही. तिथे कुणी तरी हा लेख एका प्रश्नाचे उत्तर म्हणून डकवलेला आहे.

मूल्य शिक्षणात वैज्ञानिक दृष्टीकोन कोणी पेरला व कशासाठी

आजच्या शिक्षणातून विद्यार्थ्याला ज्ञान का मिळत नाही याचे सुंदर विश्लेषण केले आहे.

भारताच्या संविधानाने वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य म्हणून सांगितले आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन हे मूल्य शिक्षणातील एक महत्वाचे मूल्य आहे. हाच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी आयुष्यभर संघटीत काम उभे करून झटणारा कार्यकर्ता म्हणजे डॉ नरेंद्र दाभोलकर.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा येथे झाला. ते शालेय वयापासूनच उत्तम कबड्डीपटटू होते. सातारा येथील ‘शिवाजी उदय मंडळाच्या’ संघाची ओळख दाभोलकरांच्या खेळीमुळे विशेषतः त्यांच्या ‘हनुमान उडी’मुळे राज्यभर पसरली होती. त्यांनी बांग्लादेश दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचे नेतृत्व केले होते. दाभोलकरांच्या व्यक्तिमत्वाची ही बाजू खूप कमी जणांना माहिती आहे. त्यांनी १९७० साली मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस. पदवी घेतल्यानंतर खूप कमी काळ वैद्यकीय व्यवसाय केला. बाबा आढाव यांच्यासोबत जातीमुक्त समाजाचे स्वप्न घेऊन केलेले ‘एक गाव एक पाणवठा’ हे त्यांच्या सामाजिक वाटचालीतील महत्वाचे आंदोलन होते. पुढे अर्थार्जन आणि कुटुंबाची जबाबदारी डॉक्टर असलेल्या पत्नी शैलाताईंवर सोपवून १९८२ साली ते पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यात उतरले. बी. प्रेमानंद यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन विषयक महाराष्ट्र दौऱ्याने प्रभावित होऊन. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय कामाचे क्षेत्र म्हणून निवडला. या क्षेत्रातील त्यांच्या योदानामुळे रूढ अर्थाने शरीराचे डॉक्टर असणारे दाभोलकर पुढे मनावरील अंधश्रद्धांची जळमटे दूर करणारे मनाचे डॉक्टर ठरले.

श्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञानाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो. परंतु सश्रद्धांच्या समोर हे सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखे होत असते. या सर्व पुराव्याबरोबरच प्रत्येकाने विज्ञानाचे शिक्षण घेतल्यास वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होऊन श्रद्धेचे जळमट दूर होईल असे त्यांना मनापासून वाटत असते. त्यांचे हे प्रयत्न अत्यंत श्लाघनीय, प्रामाणिक व wishful thinkingचे असले तरी दैवी चमत्कार आणि अतींद्रिय शक्तीवरील विश्वास व भ्रामक विज्ञानावर आधारलेली मानसिकता वाढतच आहे, याबद्दल दुमत नसावे.

सर्व सामान्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी चिकित्सक नेहमीच विज्ञान व विज्ञान शिक्षणावर भर देत असतात. विज्ञान व तंत्रज्ञानातील लहान - मोठ्या तत्वांचा, नियमांचा, सिद्धांतांचा जसजसा परिचय होत जातो तसतसा रूढी, परंपरा यांच्यातील विसंगती, चमत्कार, अतींद्रिय वा अलौकिक शक्ती, दृष्टिभ्रम, हातचलाखी इत्यादींची पकड ढिली होत जाईल यावर त्यांचा दृढ विश्वास असतो. परंतु अलिकडील काही संशोधकांच्या मते विज्ञान शिक्षण हे कुठल्याही प्रकारे चिकित्सक दृष्टी देत नाही; उलट काही वेळा चिकित्सकतेला ते मारक ठरू शकते. याविषयी संशोधकांनी खालील तीन कारणांचा उल्लेख केला आहे:

1. विज्ञान शिक्षणाचा भर प्रामुख्याने विज्ञान - तंत्रज्ञान विषय समजून घेण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक कुशलतेवर असते. त्यात चिकित्सक वृत्तीत वाढ करणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव नसतो. शिकविणाऱ्यांना सर्व उत्तरं माहित असतात व विद्यार्थी प्रयोगातून (वा घोकंपट्टी करून) तीच अपेक्षित उत्तरं शिक्षकांच्या समोर सादर करतात. सामान्यपणे बरोबर उत्तर येईपर्यंत विद्यार्थी प्रयोगातील निष्कर्षाशी झटापट करत असतात.

2. विज्ञान शिक्षण सामान्यपणे संशोधनातील निष्कर्षांचा आढावा घेण्याच्या पावित्र्यात असते. संशोधनाचे उद्दिष्ट काय होते, त्याची पार्श्वभूमी काय होती याविषयी विद्यार्थी शेवटपर्यंत अनभिज्ञ राहतात. त्यामुळे काही चुकीच्या गृहितकांवर, गैरसमजुतीवर वा विषयाचे गांभीर्य लक्षात न घेता त्याचे सामान्यीकरण करण्यावर भर देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो.

3. विज्ञानाच्या निष्कर्षांला नेहमीच 'अखेरचा शब्द' मानण्याची सवय जडलेली आहे. आज काढलेल्या निष्कर्षात पुढे केव्हा तरी बदल होऊ शकतात याची जाणीव ठेवली जात नाही. त्यामुळे संशोधकाने सादर केलेले data, ग्राफ्स, संदर्भ वा दुवे यांची फार चिकित्सा न करता स्वीकारल्या जातात. कारण त्यात वैज्ञानिक, प्रायोगिक, नैदानिक (clinical) अशा शब्दांची सर्रासपणे वापर केलेले असल्यामुळे समोरच्याला गप्प बसविणे सोपे जाते. पांढरा कोट घातलेल्यांच्या भोवती बुद्धीमत्तेचे वलय असते अशी एक (गैर) समजूत समाजात पेरली गेलेली आहे.

सामान्यपणे विज्ञानाचे विषय शिकविताना facts वर जास्त भर दिला जात असल्यामुळे शिकणाऱ्यांना जास्त चिकित्सकपणे विचार करण्यास वाव दिला जात नाही. एखाद्या पुराव्याची जास्त चिकित्सा न होता facts वा त्यावरून काढलेले निष्कर्ष स्वीकाराऱ्ह की अस्वीकृत एवढ्यापुरतेच विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता काम करते व शिक्षकांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याकडे कल वाढतो. त्यामुळे खरे विज्ञान व भ्रामक विज्ञान यांच्यातील ठळक फरक समजून न घेता विद्यार्थी पास होत होत शिक्षण संपवतो. कुठल्याही विज्ञानविषयक पाठ्यपुस्तकाची थोडीशी तपासणी केल्यास ही बाब चटकन लक्षात येईल. 500 - 600 पानांच्या पुस्तकात संशोधनासंबंधीच्या मुद्यावर 10-15 पानंसुद्धा त्यात नसतात. पुरावे कसे तपासावेत, गृहितकांची तपासणी कशी करावी, यापूर्वीच्या संशोधनातील उणीवा कोणत्या याविषयी कुणालाच देणे घेणे नसते. शिकविणाऱ्यांना अभ्यासक्रम संपविण्याची घाई व शिकणाऱ्यांना कसेबसे परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखविण्याची घाई. यामुळे वैज्ञानिक संकल्पनाबद्दल चिकित्सकपणे विचार करायला कुणालाही फुरसत नाही.

विज्ञान शिक्षण खरोखरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकते का याविषयी अमेरिकेतील विद्यापीठात एक प्राथमिक स्वरूपाची चाचणी घेण्यात आली. तीन विद्यापीठातील 16 ते 20 वयोगटातील 207 विद्यार्थ्यांनी या चाचणीत भाग घेतला. दोन सत्रात चाललेल्या या चाचणीतील पहिल्या सत्रात विज्ञानविषयातील काही जुजबी प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित होते. या सत्रातील प्रश्नांचे स्वरूप असे होते:

1. पृथ्वीवर असलेला अत्यंत महत्वाचा ऊर्जाश्रोत कोणता?
(a) वनस्पती (b) प्राणी (c) कोळसा (d) खनिज तेल (e) सूर्य
2. यापैकी कुठली गोष्ट बरोबर आहे?
(a) ऊर्जेला एका श्रोतातून दुसऱ्या श्रोतात परिवर्तित करता येते (b)ऊर्जाश्रोतात परिवर्तन करता येत नाही (c) चलनवलनासाठी लागणाऱ्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा (potential energy) असे म्हटले जाते. (d) ज्या वस्तूत ऊर्जा असते त्या ऊर्जेला गतीज ऊर्जा (kinetic energy) असे म्हटले जाते.(e) भविष्यकाळातील ऊर्जाश्रोत म्हणून आण्विक ऊर्जेलाच वैज्ञानिक मान्यता देत आहेत.
3. गर्भकाळात स्त्रीला कुठल्या गोष्टीमुळे इजा संभविण्याची शक्यता आहे?
(a) वडील RH- positive आणि आई RH - negative (b)गर्भावस्थेतील तिमाहीत गर्भवतीला जर्मन गोवर येणे (c) आई RH- positive आणि वडील RH - negative (d) (a) व (b) असल्यास (e) (b) व (c) असल्यास
4. ट्रिचिनॉसिस (trichinosis) या संसर्गजन्य रोगस्थितीचे वर्णन अशा प्रकारे करता येईल
(a) परावलंबी विषाणू (b) परस्पर स्पर्श (c) बाजारीकरण (d) उपयुक्त जीवाणू (e) सौम्य लक्षण
5. कार्बनी (organic) व अकार्बनी (inorganic) संयुक्तामधील ठळक व्यत्यास
(a) कार्बनी संयुक्त हे जैविक व अकार्बनी संयुक्त अजैविक (b)जगात सापडणाऱ्या कार्बनी संयुक्तांची संख्या अकार्बनी संयुक्ताच्या संख्येपेक्षा कित्येक पटीत आहे. (c) अकार्बनी संयुक्त सजीवापासून तयार होतात. (d) अकार्बनी संयुक्त निर्जीव वस्तूपासून तयार करता येतात (e) कार्बनी संयुक्तामध्ये कार्बनचा अंश असतो.
6. आवर्त सारणीमधील (periodic table) Pb ही संज्ञा या धातूला सूचित करते:
(a) लोखंड (b) फास्फोरस (c) शिसे (d) प्लुटोनियम (e) पोटॅशियम
7. नवीन खडूचे मोजमाप करण्यासाठी सर्वात इष्ट मापन कोणते असेल?
(a) मीटर (b) लिटर (c) ग्राम (d) सेंटीमीटर (e) किलोमीटर
8. यापैकी कुठल्या रोगात जनुकीय दोष आढळतात?
(a) डाउन्स सिंड्रोम (b)लैंगिक गुप्तरोग (c)मलेरिया (d) रक्ताचा कॅन्सर (e) श्वसनरोग
9. लिटमसी कागद हायड्रोक्लोरिक आम्लमध्ये बुडविल्यास
(a) काही बदल होत नाही. (b)कागद वितळून जाते. (c)कागद निळा होतो. (d) कागद तांबडा होतो. (e) कार्बन प्रक्रियेमुळे ऑक्सिजन बाहेर पडते.
10. पृथ्वी व सूर्य यामधील अंतर केव्हा कमीत कमी असते?
(a) उन्हाळ्यात (b) हिवाळ्यात (c) पावसाळ्यात (d) वसंत ऋतूत (e) वसंत ऋतू व उन्हाळा यांच्यामधील काळात

चाचणीच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या अंधश्रद्धेविषयीच्या आकलनाविषयी श्रेणी देण्यास सांगितले गेले होते.
(श्रेणी :- 1 : यावर माझा पूर्ण अविश्वास आहे, 2 : याच्या खरेपणाविषयी शंका आहेत , 3 : काही सांगता येत नाही , 4 : हे खरे असावे असे वाटते, 5 : यावर माझा पूर्ण विश्वास आहे.)

1. एखाद्याच्या हस्ताक्षरावरून त्याचे व्यक्तिमत्व ओळखता येते.
2. मन:शक्ती वापरून भविष्यात वा दुसऱ्यांच्या मनात डोकावता येते.
3. एखाद्याच्या जन्मराशीवरून त्याचे व्यक्तिमत्व व त्याचे भविष्य कळू शकते.
4. अक्राळ विक्राळ अशा दोन पायाचा प्राणी हिमालयात फिरत असतो.
5. शारीरिक वेदना होत असलेल्या शरीराच्या भागावर लोहचुंबक ठेवल्यास वेदना थांबतात.
6. कानात पेटती मेणबत्ती ठेवल्यास शारीरिक व्याधी कमी होते.
7. निर्जन प्रदेशातील विहिरीत भूत प्रेतांचा वास असतो.
8. साखळी पत्रं पाठविल्यामुळे भाग्य उजळते.
9. परग्रहावर मानवी अस्तित्व आहे; परंतु शासन त्याविषयीच्या बातम्यांची जाहीर वाच्यता करत नाही.
10.शाप दिल्यास वाईट होण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे तर शापाने माणसं मरतात.
11. हातात धरलेला आरसा खाली पडून त्याचे तुकडे झाल्यास तुमच्यावर नक्कीच संकट कोसळणार.
12. भानामतीसारखे प्रकार घडत असतात व भूत पिशाच्चामुळे माणसं मरूही शकतात.
13. काहींच्यात दैविशक्ती असल्यामुळे जमिनीतील पाण्यांचा ते शोध घेऊ शकतात.
14. कुत्री, मांजरं यासारख्या संवेदनशील पाळीव प्राण्यांना भूत प्रेतांच्या सानिध्याची चाहूल लागते.

या विधानांच्याबद्दल दिलेल्या श्रेणीत विविधता असली तरी बहुतेक श्रेण्या 2 व 4च्या मध्ये कुठेतरी होत्या. अंधश्रद्धा विषयीच्या श्रेणींची व पहिल्या सत्रातील विज्ञानविषयक प्रश्नांच्या उत्तरांची तुलना केल्यावर यात कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, हेच प्रकर्षाने जाणवले. विज्ञानासंबंधी अचूक ज्ञान असूनसुद्धा त्यातील बहुतेक अंधश्रद्धेपासून दूर राहू शकले नाहीत. पहिल्या सत्रातील चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळविणारेसुद्धा दुसऱ्या सत्रात मांडलेल्या कित्येक चमत्कारांच्या दाव्यावर विश्वास ठेवत होते. यावरून विद्यार्थी वैज्ञानिक चिकित्सा पद्धतीचा वापर करत नव्हते हे स्पष्ट होते. विद्यार्थ्याना विज्ञानाचे शिक्षण देत असताना कशा प्रकारे विचार करावा यापेक्षा कुठला विचार करावा यावर भर दिल्यामुळे ही स्थिती ओढवली असावी, असे वाटते. ( Students are taught what to think but not how to think.). या चाचणीने काही प्रश्नही उपस्थित केले.

शिक्षणाची पातळी वाढत असताना भ्रामक विज्ञान, चमत्कार वा अतींद्रिय शक्तीवरील विश्वासात फरक पडत जातो का? विज्ञान शाखेतील अभ्यास , कला - वाणिज्य वा इतर मानव्य शाखेतील अभ्यासापेक्षा खरोखरच अंधश्रद्धेला तडा देवू शकते का? वैज्ञानिक खरोखरच चिकित्सक असल्यास विज्ञान शिक्षणाच्या वाटेवर असताना या प्रकारच्या अंधश्रद्धा गळून का पडत नाहीत? जास्त शिक्षित असल्यास अंधश्रद्धा कमी व कमी शिक्षित असल्यास अंधश्रद्धा जास्त असे विधान करता येईल का?

या सर्व गोष्टीं ची चिकित्सकपणे विचार करू लागल्यास आजच्या शिक्षण पद्धतीतच काही मूलभूत बदल अपेक्षित आहेत. केवळ विज्ञान शिक्षणावर भरवसा न ठेवता चिकित्सकपणा रुजविण्यासाठी वेगळ्याच प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता असून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

जरी ही चाचणी सर्वसमावेशक नसली तरी या चाचणीतील निष्कर्ष विज्ञान शिक्षणाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडते, हे मात्र नक्की.

उत्तर लिहिले ·
जितेंद्र राघोर्ते

विज्ञान शिकणे / शिकवणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोण रूजवणे या वेगळ्या गोष्टी आहेत हे वरच्या लेखावरून लक्षात येईल.
नेमकी हीच गल्लत होत असल्याने प्रत्येक वैज्ञानिकाकडे वैज्ञानिक दृष्टीकोण असलाच पाहीजे / असेलच अशी गृहीते जन्माला येत असतात.

वैज्ञानिक दृष्टीकोण रूजवणे हे आव्हान किती खडतर आहे हे आता समजेल.

<< नेमकी हीच गल्लत होत असल्याने प्रत्येक वैज्ञानिकाकडे वैज्ञानिक दृष्टीकोण असलाच पाहीजे / असेलच अशी गृहीते जन्माला येत असतात. >>

------- वैज्ञानिक दृष्टीकोन नसेल तर त्या व्यक्तीला वैज्ञानिक कसे म्हणता येईल ?

महत्वाच्या योजने आधी तिरुपतीला साकडे घालणारे केवळ एका वैज्ञानिक संस्थेचे (इस्रो चे) " admin " आहेत, त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन नाही आहे आणि म्हणून त्यांना वैज्ञानिक / शास्त्रज्ञ म्हणता येणार नाही. वैज्ञानिकांची बांधिलकी विज्ञानाशी असायला हवी. Happy

पण इथे टॉपक्लास सरकारी फेड गवर्न्मेन्ट कॉलेजातही असेम्ब्लीच्या आधी धर्मगुरु ( पाद्री) येउन ब्लेस वगैरे करतो बरं का. इथेही प्रोफेसर्स अ‍ॅश वेडनस्डेला वगैरे कपाळावरती क्रॉस काढुन येतात.

>> वैज्ञानिक दृष्टीकोन नसेल तर त्या व्यक्तीला वैज्ञानिक कसे म्हणता येईल ?<<
तुमची वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या सांगा. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तो असल्या शिवाय रॉकेट्स उडवले काय?

माझ्यामते एंड रिझल्ट महत्वाचा. नारळ किंवा वाइनची बाटली फोडुन एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात होत असेल तर त्याला कोणि आक्षेप घेउ नये. शिक्षणाने/कर्माने झालेला शास्त्रज्ञ हा देखील शेवटि माणुसच असतो. पुर्वापार झालेले संस्कार, मनावर बिंबलेले रितीरिवाज याच्या जोरावर आयुष्यातल्या अन्सर्टनिटिज वर मात करण्यासाठी मानसिक बळ काहिंना मिळत असेल, त्याचा उपद्रव मूळ कामाला होत नसेल तर त्याकडे कानाडोळा करावा, या मताचा मी आहे..

बाय्दवे, सुरुवातीला मला सुद्धा शास्त्रज्ञांनी देव मानावा हे पटायचं नाहि; आता खटकत देखील नाहि...

माझ्यामते एंड रिझल्ट महत्वाचा. नारळ किंवा वाइनची बाटली फोडुन एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात होत असेल तर त्याला कोणि आक्षेप घेउ नये. >>> स्वतःच्या खासगी संस्थेत करावं कि. जर तुमच्या एम्प्लॉयरचे धोरण (अजून तरी) याच्या विरोधात आहे तर तुम्ही नोकर असून शिरजोर का बनता ? चर्चा फाट्यावर मारून असे प्रतिसाद देता, मग तुम्ही एक बाजू धरणार आणि तुमचे नेहमीचे फिदरवेट प्रतिस्पर्धी दुसरी बाजू लावून धरणार आणि हा धागाही नेहमीच्या मार्गाने जाणार.

एरव्ही सगळीकडे कुस्त्यांचा फड असतोच, एखाद्या बाफवर इतरांना बागडू द्या कि.

लेख खुप मोठा आणि विचारपुर्वक लिहिलेला आहे. खुप मुद्दे एकत्र आल्यामुळे माझ्या सारख्याला पहिल्या वाचनात फारसे कळले नाही. परत परत वाचायला हवे.

मला असे वाटते की सामान्य लोक स्वतःची मते बनवु शकत नाहीत कारण ती बनवण्याइतपत अभ्यास करण्याची आवड, वेळ व कुवत नसते. म म व रोजच्या जीवनक्रमात इतका अडकलाय की रस्त्यावर त्याच्या डोळ्यांसमोर घडत असलेली दुर्घटनाही तो थांबुन बघत नाही, मध्ये पडत नाही. बॉम्बस्फोटांनी मुम्बै हादरली तरी दुसर्‍या दिवशी ट्रेन व रस्ते ओस पडले नव्हते.

स्वतःची कुवत नसल्यामुळे समाजातले प्रतिष्ठित विचारवंत जी मते मांडतात, सतत पुढे करतात, तीच मते म म व आपली म्हणुन स्विकारतो. सोशल मिडीयाचा विस्फोट व्हायच्या आधी असेच घडत असणार.

सो मिचा स्फोट झाल्यानंतर प्रत्येकजण विचारवंत बनलाय. म्हणजे म म व ला स्वमतांची शिंगे फुटली असे नाही तर वेगवेगळी उलट सुलट मते त्याच्यावर आदळु लागली. त्यात आता प्रत्येक गोष्टीला एक राजकिय रंग चढलेला आहे. त्यामुळे म्प्रत्येक माणसाचे, त्याच्या मताचे, पुर्वग्रहदुषित नजरेने मुल्यमापन होते. म म व सुद्धा अशाच नजरेने मुल्यमापन करतो व त्यामुळे त्याला धड कुठलीही एक बाजू उचलुन धरता येत नाही.

लेखात नविन शैक्षणिक धोरणाबद्दल लिहिलेय. माझ्या मते हे धोरण चांगले आहे कारण जुने धोरण हातात पदवी देत होते, कार्यानुभव देत नव्हते. हे नवे धोरण कागदावर तरी कार्यानुभव देतेय. म्हणुन ते मला पसंत आहे. माझे हे मत मी अतीशय तोकड्या माहितीवरुन बनवले आहे.

नव्या अभ्यासक्रमात आपली मुलं उत्क्रांती, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा आवर्तसारणी शिकणार नाहीत हे मला माहितही नाही, याचा फायदा काय याचीही मला कल्पना नाही तर मला हे नसल्याची खंत कशी वाटणार ?? मुलभुत संशोधनाकडे मुले वळायला हवीत असे मलाही वाटते पण त्यासाठी काय करायला हवे हे मला माहित नाही. ज्यांची मुले त्या वयोगटात आहेत ते पालक मुलांना स्पर्धा परिक्षांना बसवुन जास्त पगाराच्या नोकरीची अपेक्षा ठेवतात. मुलभुत संशोधन हे क्षेत्र पैशाच्या दृष्टीकोनातुन आकर्षक नसेल तर भौतिक सुख पाहणारे जग तिकडे का जाईल?

हा सगळा अभ्यास करायची माझी कुवत नसल्यामुळे ज्यांची कुवत आहे त्यांनी मुद्दे मांडले तर मी समर्थन नक्कीच देईन. पण माझ्यासमोर हे मुद्दे कोणी मांडतच नाही. माझ्यासमोर सतत अंबानीचे लग्न, बटबटीत दागिने, निरुपयोगी व खोटी रिल्स, नटनट्यांची लग्ने, लफडी व घटस्फोट, जुगार इत्यादी गोष्टीच आदळत राहतात.

जिथे समाजोपयोगी मते मांडली जातात अशा फोरम्सवर इतकी खडाजंगी सुरु असते की मला खरे खोटे नक्की काय कळत नाही. त्यामुळे मी असे सगळे फोरम्स म्युट करुन अंबानीचे लग्न बघत बसते.

जिथे माझ्या डोक्याचेच भजे झालेय तिथे मी म म व म्हणुन कोणाला कसा सपोर्ट करणार?

सामान्य माणसाला विज्ञान अजिबात कळत नाही, वैज्ञानिक दृष्टीकोण माहीत नाही. शाळेत विज्ञानाची शिक्षिका व मुख्याध्यापिका असलेली स्त्री नात जन्माला घालणार्‍या सुनेचा दुस्वास करते. तिला विज्ञान माहित नाही?

१९७६ सालच्या घटनादुरुस्तीत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार आणि प्रसार करणं भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, हे समाविष्ट केलं गेलं. नंतर १९८७ साली लागू झालेल्या शैक्षणिक धोरणात ’वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती’ या गाभाघटकाचा समावेश झाला>>>>>

घटनेत अजुन असली भरपुर कर्तव्ये लिहिलेली आहेत. ती परिक्षेच्या २५ मार्कात कुठेतरी बसवायची इतकेच शिक्षकांना माहित आहेत. पालकांना तर तेवढीही चिंता नाही. वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती कितपत होतेय हे तपासायची काही सोय त्या धोरणात असावी असे वाटत नाही. असे काही धोरण आहे/होते हेही कोणाला माहित नसेल.

इस्रो वेगवेगळी याने कशाला पाठवतेय हे लोकांना माहित नसते. यान उडाले की भारतमाता की जय कोकलायचे आणि त्याच वेळेस ‘फुक्कट यानाचा खर्च, ह्या पैश्यांत लाख लोक वर्षभर जेवली असती’ हे फोरवर्डही करायचे हे लोकांना चांगले जमते.

लोक काहीच अंगाला लाऊन घेत नाहीत. वैज्ञानिक दृष्टीकोण तर दुरच, ते दिवसभर जे संत महात्म्यांचे अभंग ऐकतात, प्रवचने ऐकतात, सत्संग करतात, भजने गातात, ते विचार कुठे अंगिकारताहेत? कुठला संत, महात्मा, बाबा, बापू लोकांना लोभ, मोह, मत्सर, द्वेष शिकवतो? सगळेजण प्रेमाचीच भाषा (निदान तोंडावर तरी) बोलतात. बाबालोकांचे अमाप पिक येऊनही लोक लोभ, मोह, मत्सर, द्वेषापासुन दुर गेलेले दिसत नाहीत, प्रेमाची भाषा शिकलेले नाहीत.

मग जो वैज्ञानिक दृष्टीकोण बालपणापासुन शिकवलेलाच नाही तो लोकांमध्ये दिसणार कसा?

लेख कोणत्या ग्रूपमधे आहे? "माझ्यासाठी नवीन" मधे आला नाही. >>>>>

चिनुक्सच्या रंगीबेरंगी पानावर आहे, कुठल्याही गृपवर नाही.

रंगीबेरंगी पान प्रकरण आता कोणाला आठवतही नसेल.

>>------ शास्त्रज्ञाने २४-७ ( कामाच्या वेळांत तसेच कामाच्या बाहेरच्या वेळांत ) वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे अपेक्षित आहे यावर मी ठाम आहे.
>> उत्तम. हिंदू धर्मात "प्रत्यक्ष एवं प्रमाण" म्हणणाऱ्या चार्वाक तत्त्वज्ञानाचा अंगीकार करून वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगता येईलही. मुसलमान धर्मात मात्र कुराणावर १००% विश्वास असणे mandatory आहे. त्यात देवदूताने महम्मदाला आयती सांगितल्या, त्याने चंद्राचे दोन तुकडे केले वगैरे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध न करता येण्याजोग्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर मुसलमान धर्माचा त्याग गेल्याशिवाय शास्त्रज्ञ म्हणून जॉब करता येणार नाही असा फतवा काढला जावा का?
टीप: माझे मत असा फतवा काढला जाऊ नये असे आहे.

शास्त्रज्ञाने २४-७ ( कामाच्या वेळांत तसेच कामाच्या बाहेरच्या वेळांत ) वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे अपेक्षित आहे यावर मी ठाम आहे. >>> आता पुन्हा हे वाक्य कोट केलं गेलं. हिंदू मुसलमान अँगल आला.

एखाद्याने जर पृथ्वीची स्वतः भोवती फिरण्याची गती मंदावली आहे, त्यामुळे भविष्यात पंचवीस तासांचा दिवस होऊ शकतो असे म्हटले, तर त्याला उत्तर देताना "पण मी पृथ्वी सूर्याभोवती फिरते यावर ठाम आहे" असे पालुपद लावून जणू काही मूळचे वाक्य हे पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही असे आहे असा समज करून देण्यासारखे आहे. लोक पण स्ट्रॉ मन करत बसतात.

हे असे घोडेछाप वादविवाद नकोत म्हणून हा धागा निवडला. पण अर्थातच मायबोलीवर आता दोन ग्रुप्सचा मालकीहक्क आहे आणि त्यांनी हजार नाही लाखो वेळेला दिलेले प्रतिसाद हे इथले आयएसओ ९००१ प्रमाणित असल्याने त्यात तुम्ही काहीही करू शकत नाही... हेच सत्य आहे.

या धाग्यावर हिंदू मुसलमान अँगल येणे दुर्दैवी आहे. आणि आपले स्वयंघोषित पुरोगामी नेहमी त्यांना हातात कोलीत कसे देतात याचेच प्रात्यक्षिक इथे झालेले आहे. यासाठीच नेमका प्रतिसाद दिला पाहीजे असे पहिल्या प्रतिसादात म्हटले होते. पण इथल्या लोकांना कुणाच्याही प्रतिपादनाचा आत्मा समजाऊन घेण्यात रस अजिबात नाही. त्यातल्या कोणत्याही दोन ओळी रँडमली कॉपी पेस्ट करायच्या आणि त्यावर विपर्यास करायचा ही आता इथली पद्धत बनली आहे.

आपली चर्चा यावर रहायला हवी होती कि वैज्ञानिक दृष्टीकोण काय हे समजत नसल्याने वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे विज्ञानाचे शिक्षण घेतलेले असले कि झाले असे लोकांना वाटते. यासाठी जितेंद्र राघोर्ते यांचा लेख दिलेला आहे. हा लेख फाट्यावर मारून मागच्याच पानावर अडकलेली सुई घेऊन ठाम आहे ठाम आहे असे केले गेलेले आहे. राघोर्ते यांचे म्हणणे असे आहे कि वैज्ञानिक दृष्टी किंवा दृष्टीकोण काय हेच समजलेले नस्सणे, तो कसा विकसित करायचा याचा अभ्यासक्रमात समाविष्ट नसणे हे आव्हान आहे. त्यासाठी त्यांनी एक प्रयोग सांगितला आहे. हा प्रयोग खरा कि खोटा याची कल्पना नाही. पण त्यावरून वैज्ञानिक दृष्टी निव्वळ विज्ञान शिकण्याने येत नाही हे समजते.

हेच पहिल्यापासून या धाग्यावर सांगितलेले आहे.
(निव्वळ) विज्ञान शिकल्याने वैज्ञानिक दृष्टी येत नाही. वैज्ञानिक दृष्टी ही रोजच्या व्यवहारात सुद्धा येते. तिचा भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र, जीवशास्त्र याच्याशी संबंध नाही. ही शास्त्रे विकसित नसतानाच्या काळात चार्वाक आणि बुद्धाने वैज्ञानिक दृष्टीकोण सांगितलेला आहे. म्हणजे विज्ञान शिकणे आणि वैज्ञानिक दृष्टी हे एकच नाही. म्हणून त्याला चिकित्सक वृत्ती म्हटले पाहीजे असे राघोरते म्हणतात. हल्ली रॅशनॅलिस्ट म्हणवून घेण्याची पद्धत आहे. विवेकवाद, नीरक्षीरविवेक , सदसदविवेकबुद्धी किंवा सम्यक दृष्टी असे शब्दप्रयोग वापरात येतात. या सर्वांचा आणि वैज्ञानिक दृष्टीचा एकच अर्थ आहे.

आता एखादा मनुष्य अडाणचोट आहे म्हणून मी पण शिकणार नाही असा पवित्रा घेणे हे काहींचे जीवितकार्य आहे. यांना फाट्यावर मारणे हे धोरण असायला हवे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा प्रतिवाद गरजेचा नाही. एके काळी हे सर्व नवीन होते. तेव्हां सामान्य जनता गांगरून जात असे. आता हे थोतांड आहे हे सर्वांच्या लक्षात आलेले आहे. त्याला उत्तर दिल्याने त्यांना महत्व मिळते. जे गेल्या वीस वर्षात सुधारले नाहीत ते आता सुधारतील म्हणून हिरीरीने तेच तेच प्रतिवाद करत राहणे हे सुद्धा आजाराचेच लक्षण आहे.

कुठेतरी फुल स्टॉप दिला पाहीजे. अर्थात असा सविस्तर प्रतिसाद द्यावा लागतोय कारण मग हा छुपा संघी आहे म्हणून हे मंडळ ढोल ताशे घेऊन मायबोलीवर फिरते आणि यांच्यात यांच्यासारखे अन्य सामील होतात. दुर्दैवी आहे हे.

खंग्री बालक, माझा प्रतिसाद उदय ह्यांना होता. तुम्ही स्ट्रोमॅन कुणाबद्दल बोलताय माहित नाही. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे. उदय ह्यांची भूमिका शास्त्रज्ञाने वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अवैज्ञानिक श्रद्धा बाळगू नये अशी आहे. असे असेल तर शास्त्रज्ञ म्हणून काम करायचे असेल तर अवैज्ञानिक श्रद्धा असलेला धर्म सोडावा लागेल. केवळ उदाहरण म्हणून मुसलमान धर्माचे घेतले कारण त्या धर्मात बरीच स्पष्टता आणि compulsion आहे. तर मुसलमान धर्म सोडल्याशिवाय शास्त्रज्ञ म्हणून काम करता येणार नाही असा नियम करावा का ह्याबद्दल उदय ह्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल. स्पेसिफिक प्रश्नाचे स्पेसिफिक उत्तर द्यायला हरकत नसावी.
माझं मत विचारलं तर, वैयक्तिक आयुष्यात एखादा मनुष्य चंद्राचे दोन तुकङे, किंवा पाण्याची वाईन होणे, किंवा ज्ञानेश्वरांनी भिंत चालवणे ह्यावर विश्वास ठेवत असेल तर खुशाल ठेवो. कामात मात्र भिंत हलवायची वेळ आली तर भिंतीचे वस्तुमान, हलवण्याचे अंतर वगैरेंचा scientific analysis करून किती शक्तीची मोटर, किती इंधन लागेल त्याची व्यवस्था केली म्हणजे झालं. तिथे वैज्ञानिक दृष्टीकोन हवा. तिथे ज्ञानेश्वर येऊन भिंत हलवतील वगैरे चालणार नाही. वैयक्तिक आयुष्यातली श्रद्धा आणि कामातला वैज्ञानिक दृष्टीकोन ह्यात अगदी Dr. Jekyll and Mr. Hyde सारखं असलं तरी हरकत नाही.
तुमचं खालील मत पटलेले आहे
>> कोणत्याही शास्त्रज्ञाने खासगी आयुष्यात काय करावे हा त्याचा वैयक्तिक मामला आहे. काही काही वेळा स्वयंघोषित पुरोगामी सुद्धा फॅसिस्टांप्रमाणे फतवे काढतात. एखादा शास्त्रज्ञ वैयक्तिक आयुष्यात सश्रद्ध किंवा अंधश्रद्ध असेल पण त्याच्या कार्यालयीन कामात चोख असेल, व्यवस्थापनाच्या अपेक्षेप्रमाणे १०० नाही २०० % देत असेल तर एम्प्लॉयरला तक्रार असण्याचे काहीच कारण नाही.

उदय ह्यांची भूमिका शास्त्रज्ञाने वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अवैज्ञानिक श्रद्धा बाळगू नये अशी आहे. >>> त्याबद्दलच मागच्या पानापासून रामायण चालू आहे. एकदा मागच्या चर्चेवर नजर टाका.

हो त्या चर्चेतच मी आपले दोन पैसे टाकले. त्यांचे मत अजूनही ठाम आहे Happy
>>शास्त्रज्ञ हा एका मर्यादित वेळेसाठीच शास्त्रज्ञ असतो या विचारातून बाहेर पडा. खासगी आयुष्य जरुर आहे.... पण वैज्ञानिक दृष्टीकोनाला तिलांजली देता येत नाही.
>>>>लोकांनी वैयक्तिक आयुष्यात काय आणि कसा विचार करायचा ह्याची इतकी सक्ती? fascism कितीसा वेगळा असतो?
इसापनीतीतली गोष्ट : सिंह कोल्ह्याला म्हणाला, "मी तुला खाणार" - Le scientist, 'सिंहाच्या अनाटॉमीअनुसार त्याचे स्वरयंत्र माणसांप्रमाणे आवाज काढण्यास अक्षम असते. तसेच सिंहाच्या मेंदूत वाक्ये रचण्याइतकी प्रगत भाषिक संरचना नसते. सबब गोष्ट खोटी आहे. कोर्टातच खेंचूया लेखकाला. '

पती, "लाडके, हे आकाशातले तारे तुझ्या केसांत किती सुंदर दिसतील!" - शास्त्रज्ञ बायको , 'अरे त्यातला एक तारा जर आपल्यापासून लाख किलोमीटरवर आला तरी संपूर्ण पृथ्वी जळून नष्ट होईल. केसात माळायच्या काय गोष्टी करतोस? मानवजात नष्ट करण्याच्या मार्गावर असलेल्या कुठल्या अतिरेकी संघटनेचा सदस्य तर नाहीस ना तू ?'

अजबराव
१. लोकशाही आणि स्वातंत्र्य
२. लोकशाहीतले राज्य (स्टेट) आणि त्याचे कायदे, नियम
३. राज्यघटनेतला वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रसार व्हावा हे उद्दीष्ट

याची नेमक्या जागी वर्णी लागली पाहीजे. सरकारी शास्त्रज्ञ सरकारी वेळेत, function at() { [native code] }हवा सरकारी कामात वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगत असायला हवा किंवा त्याचे वर्तन हे मालकाच्या धोरणाच्या विरोधात नसले पाहीजे. त्याच वेळी खासगी वेळेत त्याचे स्वातंत्र अबाधित राहण्याची हमी राज्यघटना देतच आहे. त्यामुळे पब्लिक फोरम मधे सक्ती वाटेल अशी विधाने करणे हे अंतिमतः राज्यघटना आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणते असे वाटायला लावणारे आहे.

वरच्या क्र ३ मधले उद्दीष्ट - या दृष्टीने तात्विक चर्चा व्हायला हव्यात, ऑब्जेक्ट बेस्ड व्हाव्यात. तिरूपतीला शास्त्रज्ञ जातो या अनुषंगाने झालेली चर्चा ही इश्यू बेस्ड असल्याने त्याला फाटे फुटतात. हा मुद्दा निकाली निघाला म्हणून आपण पुढे आलो आहोत आणि चिकित्सक दृष्टीपर्यंत पोहोचलो आहोत.

माफ करा हा लेख अन्य धाग्यावर चिकटवलेला होता. कदाचित वाचनात येईल असे वाटले होते. पण इथे द्यायला हवे होते.
या लेखानंतर चिकित्सक दृष्टी का म्हणायचे हे अजून स्पष्ट होईल ही आशा आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोण

भौतिक विज्ञानामुळे जो निर्माण होतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन असा समज सार्वत्रिक आहे. भौतिक विज्ञान ज्यांना उपलब्ध झालेले आहे त्यांच्यात तो दृष्टिकोन निर्माण होतोच असे म्हणता येत नाही, आणि त्याच्या उलट ज्यांना भौतिक विज्ञानाचे रीतसर शिक्षण मिळालेले नाही, त्यांच्यात तो असल्याचे अनेक वेळा ध्यानांत येते. असे जर आहे तर हा वैज्ञानिक शब्द सोडून देऊन त्याऐवजी चिकित्सक दृष्टिकोन, किंवा चिकित्सक बुद्धी, हा शब्द वापरणे जास्त अर्थवाही होणार नाही काय? ही चिकित्सक बुद्धी अगदी निरक्षर अशा खेडूत माणसांच्या अंगी असलेली मी पाहिली आहे, आणि त्याचबरोबर विद्वान आणि विज्ञानाची उच्च पदवी धारण केलेल्यांच्या अंगी ती नसल्याचेही अनुभवले आहे. ही जी चिकित्सक बुद्धी आहे, ती माणसाला जन्मतः प्राप्त होते ही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चिकित्सक बुद्धीच्या अनेक श्रेणी किंवा ग्रेड्स असतात, व ज्याला जी ग्रेड जन्मतःच मिळालेली असेल, तिच्या चौकटीतच त्याची विवेचक बुद्धी तिचे कार्य करू शकते. या चौकटीची व्याप्ति वाढू शकत नाही. आयुष्यभर ती आहे तेवढीच राहते. माझे हे म्हणणे पटवून देण्यासाठी मी काही अन्य उपजत गुणांची उदाहरणे देतोः- तालाचे म्हणजे लयीचे भान, सुरांचा संवाद ओळखण्याचे भान, रंग-संगतीची जाणीव, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असणे किंवा नसणे, हे व असे गुण माणसात उपजतच असतात. ते ज्याच्याजवळ नाहीत ते त्याच्या अंगी कोणीही नव्याने निर्माण करू शकत नाही. चिकित्सक बुद्धीचेही तसेच आहे. (शेषन हे ज्योतिषीही आहेत या गोष्टीचे नवल वाटायला नको!)

चिकित्सक बुद्धी ही फक्त विज्ञानाच्या क्षेत्रातच आवश्यक असते असे नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात ती आवश्यक असते. इतिहासाच्या अभ्यासांत, राजकारणात, अर्थकारणात, तत्वज्ञानांत, जिथे जाल तिथे या चिकित्सक बुद्धीची गरज असते. इथे चिकित्सक बुद्धीऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द किती अपुरा वाटतो हे ध्यानात येईल. विज्ञानाच्या प्रसारामुळे चिकित्सक बुद्धीला तिचे कार्य अधिक सुलभतेने करता येते हे जरी खरे असले तरी विज्ञान स्वतः चिकित्सक बुद्धी निर्माण करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे शिक्षणाच्या प्रसाराने अंधश्रद्धा कमी होतात ही समजूत खरी नसते. एखाद्या बाबाने चालवलेल्या बुवाबाजीचे बिंग फोडावे तोवर आणखी दहा बाबांनी आपला जम बसवलेला असतो. बुवा-लोक करीत असलेले चमत्कार एखाद्या कार्यकर्त्याने करून दाखवले, म्हणजे त्या विशिष्ट चमत्कारांबद्दलचे कुतूहल संपते, आणि ते चमत्कार करणारे लोक खरेखुरे सिद्धपुरुष नव्हेत एवढेच सिद्ध होते. परंतु कालांतराने त्यांची जागा दुसरे सिद्धपुरुष घेतात, आणि पुनः बुवाबाजी चालूच राहते. मी जे म्हणतो ते जर चुकीचे असेल तर मग चार्वाकापासून ते थेट शं. वा. किर्लोस्करांनी चालवलेल्या बुवाबाजी विरोधी मोहिमेनंतर आज ५०-६० वर्षे उलटली तरी बुवाबाजी जोरांत कां चालू आहे याचा खुलासा कसा करायचा? अगदी कडवट असलेले सत्य स्वीकारण्याची जर मनाची तयारी असेल तर ते हे आहे की, “हे असंच चालायचं!”
पण मग ज्यांची अवस्था ‘बुडती हे जन, न पाहवे डोळा’ अशी झालेली आहे त्यांनी काय करायचे? हात जोडून स्वस्थ बसायचे? मुळीच नाही. तशी अवस्था असलेल्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढे कार्य करीत रहावे. त्यांची मनःप्रवृत्ति त्यांना हे कार्य करायला भागच पाडील. आपला मुकाबला हा किती प्रतिकूल वस्तुस्थितीशी आहे, आपली ताकद आणि कुवत किती आहे, आपल्यापुढे मोठ्यात मोठे उद्दिष्ट केवढे ठेवता येईल, याचा विचार मनात जागा ठेवून आपली कार्यकक्षा ठरवावी. असे केल्याने निराशेने खचून जाण्याची वेळ यायची नाही. आपल्या संघटित अस्तित्वाचा जो एक प्रकारचा दबाव निर्माण होतो, त्यामुळे घातक रूढी-परंपरा जोपासणाऱ्यांचे मतपरिवर्तन जरी झाले नाही, तरी त्यांच्या उद्योगांना काही प्रमाणात पायबंद बसतो यात काही संशय नाही, आणि एवढ्याच फलिताची अपेक्षा ठेवावी.

परमेश्वर आहे की नाही, धर्म या शब्दात कोणच्या गोष्टींना स्थान असावे, कोणच्या गोष्टी त्याज्य मानाव्यात, नीतीमत्तेची कसोटी काय असावी, या व अशा विषयांच्या चर्चेत भौतिक विज्ञानाचा काहीच संबंध येत नाही, परंतु चिकित्सक बुद्धीचा संबंध जरूर येतो. अशा विषयावर खुल्या चर्चा-संवाद होत राहिले तर त्याचा एक फायदा असा होतो की आपले समविचारी लोक कोण ते समजल्यामुळे एक तऱ्हेचे ध्रुवीकरण होऊ शकते. या ध्रुवीकरणामुळे एक गट निर्माण होतो, आणि त्या गटाचे असे एक वैचारिक सामर्थ्य निर्माण होते, व त्याचा वचक अंधश्रद्धाळू लोकांना जाणवतो. शब्दप्रामाण्य मानणारे, विभूतिपूजेच्या आहारी गेलेले आणि पोथीनिष्ठा बाळगणारे अंधश्रद्धाळू लोक सर्वच क्षेत्रात आढळतात एवढी गोष्ट मात्र ध्यानांत ठेवायची.

‘विज्ञानाचा प्रसार करा’ हे म्हणणे योग्य आहे, परंतु ‘वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा’ हे म्हणणे मात्र अवैज्ञानिकपणाचे वाटते! वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दाऐवजी चिकित्सक दृष्टिकोन हा शब्द ठेवला तरीसुद्धा चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करा असे म्हणण्यात काही अर्थ नाही. एवढे मात्र खरे की ज्यांना हा चिकित्सक दृष्टिकोन उपजत लाभलेला आहे त्यांना त्याचा वापर मुक्तपणाने करता येणे न येणे हे आजूबाजूच्या परिस्थितीवर पुष्कळसे अवलंबून असते. आपली हजार-दीडहजार वर्षांची “गप्प बसा” संस्कृती चिकित्सक दृष्टिकोन गुदमरवून टाकत आली. ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः’ असा प्रश्न विचारणारा एखादाच चार्वाक किंवा ‘गाय ही देवता नव्हे, फक्त उपयुक्त पशु आहे’, असे सांगणारा एखादाच सावरकर या संस्कृतीत निर्माण होत असतो, आणि तोही कालांतराने विस्मृतीत गडप होतो.

उद्विग्न करणारी ही वस्तुस्थिती आहे इतके खरे; तिच्याशी मुकाबला करू इच्छिणाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करणे एवढेच त्यांच्या हाती आहे.

जानेवारी १, १९९५
चिकित्सा, तत्त्वज्ञान, विवेक विचार, श्रद्धा-अंधश्रद्धा
मा. श्री. रिसबूड

अनेक उदाहरणे देता येतील. दिल्ली मधे प्रदूषणामुळे अनेक दिवस शाळा बंद ठेवाव्या लागतात. दिवसंदिवस, श्वसनाशी संबंधीत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. समजा डॉ. दाभोलकर हे पल्मोनोलॉजिस्ट म्हणजे फुफ्फुस रोग तज्ञ. सकाळी आठ ते चार या कामाच्या वेळांत ते वैद्यकीय विज्ञानात मिळविलेले ज्ञान वापरुन श्वसनाशी, फुफ्फुसाशी संबंधीत रोगांचे निदान करतात. अनेकांना डॉ. दाभोलकरांच्या वैद्द्यकीय जानाचा लाभ मिळाला आहे. कामामधे ते १०० % योगदान देतात.

काम संपवून घरी परतल्यावर ते गाईच्या शुद्ध शेणापासून तयार झालेल्या गोवर्‍या जाळून हवन करतात. गोवर्‍यामधून निघणार्‍या धुरामुळे एक सुगंध सुटतो आणि घरातील वातावरण शुद्ध होते यावर त्यांची श्रद्ध आहे.

घटनेने त्यांना धार्मिक स्वातंत्र दिलेले आहे. कामामधे ते चोख काम करतात आता त्यांच्या खासगी वेळांत त्यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे.

हे उदाहरण हास्यास्पद वाटते का?

साधना यांचे दोन्ही प्रतिसाद आवडले. प्रामाणिक वाटले.

<< नव्या अभ्यासक्रमात आपली मुलं उत्क्रांती, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा आवर्तसारणी शिकणार नाहीत, याची मध्यमवर्गाला खंत नाही. >>

------ आवर्तसारणी periodic table म्हणजे रसायनशास्त्राचा प्राण आहे - याचे महत्व समजले नसेल तर कठिण आहे. Sad

राज यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन याबद्दल विचारले. माझ्याकडून सांगण्याचा प्रयत्न करतो. Happy

शाळा/ कॉलेज/ विद्द्यापीठांत असतांना तसेच इतरांशी संवाद साधतांना/ वाचन या व इतर अनेक माध्यमातून जे जे काही मी शिकलो आहे त्यावर प्रश्न विचारायला हवे, शंका घ्यायला हवी. हे असेच का? तसे का नाही? प्रश्न विचारायचे, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा... नवी माहिती मिळवत रहायची, या नव्या माहितीच्या कसोटीवर आधीचे उत्तर पुन्हा तपासायचे... अशी कधिच न थांबणारी प्रक्रिया आहे.
(अ) काहीच माहित नसतांनाच्या काळापासून आवर्तसारणी आपल्याला आज जशी दिसत आहे तिथपर्यंत कशी पोहोचली? chemical elements ची नावेही माहित नव्हती. यात होणारे विकासाचे टप्पे अचंबीत करणारे आहेत. काहीं elements चे शोधही लागलेले नव्हते तरी त्यांच्यासाठी ( मेंडेलिव्हने) रिकामी जागा ठेवली गेली होती.
(ब) अगदी असेच अणूच्या माहिती बद्दल म्हणता येईल... atom सर्वात लाहान आहे असे वाटले होते. आता आपल्याला इलेक्ट्रॉन (जे जे थॉम्सन ९८९७), प्रोटॉन ( रुदरफर्ड १९१७) न्यूट्रॉन ( १९३२) आणि त्यापेक्षाही आत त्यांचे उपकण माहिती आहे.

वरिल दोन्ही मधे झालेला विकास आणि त्या विषयातले आपले आजचे आकलन हे स्वातंत्र विज्ञान शाखेचे विषय आहेत. आपल्या सूर्यमालेसंबंधातले ज्ञान पण असेच. पृथ्वी भोवती जग फिरत आहे ( heliocentric) पासून पृथ्वी आणि इतर ग्रह हे सुर्याभोवती (geocentric) फिरतात. आपण कुठे होतो आणि कुठवर आलो आहोत हा थक्क करणारा प्रवास आहे. प्रश्न विचारण्याच्या चिकीत्सक वृत्तीमुळेच हे ज्ञान मिळविणे शक्य झाले आहे.

इतरांनी (यात पालक, वडिलधारे, शिक्षक) सांगितले आणि त्यांचे शब्द प्रमाण मानून मी ते मत आहे तसे स्विकारले तर नैसर्गिक चिकित्सा करण्याची मानवी वृत्ती नाहिशी होते. म्हणून प्रश्न विचारत रहायचे, शंका घेत रहायच्या आणि शंकांचे निरसन करत रहायचे. scientific temper दैनंदिन जिवनांत दाखवत राहिल्यास नवी माहिती समोर येईल, नवे शोध लागत रहातील.

आर्थिक उदारीकरणानंतर महाराष्ट्रीय मध्यमवर्गाची विज्ञान - तंत्रज्ञानाबाबतची समज, तो त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतो यांबद्दल लिहीत असताना या दोन घटना प्रातिनिधिक वाटतात. एकोणिसाव्या शतकातला स्थितिशील महाराष्ट्रीय समाज एका परंपरागत चौकटीत अडकला होता. समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धर्माचं प्राबल्य होतं आणि धार्मिकव्यवस्था रूढीबद्ध होती. वर्णधर्म, जातिव्यवस्था, गावगाडा, कुटुंबव्यवस्था यांना दैवी अधिष्ठान असून या संस्था अपरिवर्तनीय आहेत, अशी समस्तांची धारणा होती. >>> नवीन शैक्षणिक धोरणात या धारणा अभ्यासक्रम म्हणून लागू केल्या आहेत. बहुधा काही राज्यात त्या आधीच अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या आहेत.

उदय साहेब, तुम्ही विधान अगदी नेमके आणि ठाम केले आहे. तर नेमक्या प्रश्नाचे नेमके उत्तर देणे का जमत नसावे? मुसलमान धर्मात कुराणावर १००% विश्वास असणे mandatory आहे. त्यात देवदूताने महम्मदाला आयती सांगितल्या, त्याने चंद्राचे दोन तुकडे केले वगैरे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध न करता येण्याजोग्या गोष्टी आहेत. तर वैज्ञानिक कामात १००% चोख असणाऱ्या, पण "माझा मुसलमान धर्मावर विश्वास आहे" असे म्हणणाऱ्या, व्यक्तीस शास्त्रज्ञ म्हणून कामावर घेऊ नये का?
तुमच्या उदाहरणापेक्षा नेमक्या सरळ प्रश्नाचे उत्तर ना देता अशी उदाहरणे घेऊन beating around the bush करण्याची धडपड हास्यास्पद आहे.

>> ..माझ्याकडून सांगण्याचा प्रयत्न करतो.<<
धन्यवाद, उदयशेठ. इथे प्रश्नाचं थेट उत्तर मिळणं इज ए रेर कमाडिटि. बाकि सगळा ट्रोल्सचा सुळसुळाट. असो..

तुमची व्याख्या ग्राह्य धरली तर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी रुढि-परंपरेबाबत प्रश्न विचारले नसतील याची खात्री काय? कदाचित त्यांना पटतील अशी उत्तरं मिळाली असतील. तुम्हि वरच्या प्रतिसादात दिलेलं (दाभोळकर) हापोथेटिकल उदाहरण टोकाचं आहे.

बाय्दवे, गणितज्ञ रामानुजम ओपनली सांगायचे कि त्यांचं संशोधन देवीने त्यांच्या मार्फत केलेलं आहे. यावर तुमचं मत काय?..

आमचे आजोबा कायम म्हणायचे, "कर्ता करविता 'तो ' आहे. " तो म्हणतांना आकाशाकडे बोट. Happy एखादी व्यक्ती, एखाद्या क्षेत्रांत, कमालीची हुशार असेल आणि देवावर / दैववादावर गाढ विश्वास असेल तरी त्याने देवाचे अस्तित्व सिद्ध होत नाही. "आपण करत आहोत हे सर्व तोच आपल्या हातून करवितो.... , आपण केवळ निमीत्त आहोत." असे मानणारा मोठा वर्ग आहे.

श्रीनिवास रामानुजन थोर गणितज्ञ होते. Genius ! गणितांत हुशार होते, कोटीमधे एक होते असे म्हणेल. देवीने त्यांच्या काम करत असेल असे त्यांचे मत असेल, त्यावर त्यांचा विश्वास असेल तर तो असो. विज्ञानांत निष्कर्ष , अनुमान यांना सिद्ध करावे लागते. पुढे Repeatability, reproducibility, validity यापैकी एक जरी नसेल तर दावे फोल ठरतात, अवैज्ञानिक आहेत.

हुशार असणे, आश्चर्यकारक स्मरण शक्ती ( photographic memory) , क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत क्लिष्ट गणितीय आकडेमोड किंवा संगणकातली तेढ तत्काळ सोडविणे, विज्ञान क्षेत्रात अनेक दशके संशोधन कार्य करणे, नेचर-सायन्स-लॅन्सेट-New England Journal of Medicine मधे शोध निबंध प्रकाशित करणे आणि वैज्ञानिक/ शास्त्रज्ञ असणे या भिन्न गोष्टी आहेत. वैज्ञानिकाला हे असेच का आहे आणि तसे का नाही हा प्रश्न पडायलाच हवा आणि प्रश्नाचे उत्तर शोधायची जिज्ञासा असायला हवी.

Pages