गावाच्या बाहेर असलेल्या त्या भव्य झाडाबद्दल एक कहाणी गावकऱ्यांनी अनेकदा इतरांना सांगितली होती. काहींना ती पटत नव्हती. लहान मुलांना त्या झाडाखाली खेळणं नेहमीच आनंददायी वाटायचं. पण त्या झाडावर टमक्या नावाचा वेताळ वास करतो, हे सर्वांनाच ठाऊक होतं. टमक्याची कहाणी सांगताना लोकांच्या चेहऱ्यावर भीतीचा भाव पसरायचा. संध्याकाळी आठ वाजेनंतर सकाळचा सूर्योदय होईपर्यंत त्या झाडाभोवतीच्या वर्तुळाकार परिघामध्ये कोणीही जात नसे. ते झाडही तो टमक्या तोडू देत नव्हता. दिवसभरात केव्हाही ते झाड तोडण्याचा प्रयत्न करणारा माणूस रात्री आठ वाजेनंतर जिवंत रहात नसे. झाडाला कुंपण बांधणेसुद्धा त्याला मान्य नव्हते. एरवी मात्र तो कुणालाही त्रास देत नसे.
एके दिवशी संध्याकाळी, नदीजवळच्या मैदानात अमर, बिरजू, चंदू, आणि दीपक आपल्या नेहमीच्या खेळात गुंग होते. त्यांना माहित होतं की सूर्यास्तानंतर झाडाजवळ जाणं धोक्याचं आहे, पण खेळाच्या धुंदीत ते सर्वजण हे सगळं विसरून गेले आणि खेळता खेळता ते थकल्यावर थोडा आराम करण्यासाठी झाडाला टेकून बसले. रात्रीचे आठ केव्हा वाजले ते समजले नाही. अंधार पसरला आणि झाडाच्या पानांमध्ये एक विचित्र सळसळाट सुरू झाला.
"आपण घरी जायला हवं," दीपकने घाबरत म्हटलं.
"अरे, थोडा वेळ अजून खेळू आणि मग जाऊ," अमरने उत्साहाने सांगितलं. बाकीचेही तयार झाले आणि खेळ सुरू ठेवला. पण वारा जोरात वाहू लागला आणि झाडाच्या पानांमधून विचित्र आवाज येऊ लागला. त्यांच्या मनात भीती दाटून आली, पण त्यांना वाटलं की कदाचित ही केवळ हवा असावी.
तितक्यात, त्यांनी झाडाच्या फांदीवर एक हालचाल पाहिली. एक आकृती फांदीवर उभी होती, तिचे डोळे भयानकपणे चमकत होते. "कोण आहे तिकडे?" बिरजूने घाबरत विचारलं.
"मी आहे, टमक्या," तो आवाज आला. आवाजात एवढी भयानकता होती की चौघेही थरथर कापू लागले. पांढरी सुती कुर्ती आणि हाफ चड्डी घातलेला शाळकरी टमक्या झाडावरून खाली उतरला. त्याचा चेहरा विकृत होता आणि डोळ्यात बुब्बुळ नव्हते.
"तुम्ही इथे खेळायला आलात, आता माझ्यासोबत खेळा," टमक्या हसत म्हणाला. चंदूने पळायचा प्रयत्न केला आणि तो परिघाबाहेर जाऊ लागला पण टमक्याने त्याला हवेत उचललं आणि अलगद पुन्हा आपल्या समोर आणलं. "पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. तुम्ही आता माझे आहात," तो म्हणाला.
दीपक आणि अमरने एकमेकांचा हात धरून जोरात ओरडायला सुरुवात केली, पण त्यांचा आवाज टमक्याच्या भयानक हसण्यामुळे हरवून गेला. टमक्याने आपल्या जादूने झाडाभोवती एक भयानक अंधार तयार केला. त्या अंधारात चौघांना विचित्र भास व्हायला लागले. चौघांना एकमेकांचे चेहरे भयानक दिसायला लागले. त्यांच्या आवाजात सुद्धा भयाणता आली होती. अमरला बिरजू इतका भीतीदायक दिसला की तो तिरस्काराने त्याच्या अंगावर धावून आला. बिरजूला कळत नव्हते की अमर मला का मारतो आहे? बिरजूला अमरचा चेहरा नेहमीपेक्षा खूप भयानक दिसत होता. चंदूला टमक्याने धरून ठेवले होते. त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत चंदूने दीपकला सांगितले, "वाचव त्या बिरजूला. जा! तो अमर त्याला मारतो आहे!" दीपक चंदूवर चिडला आणि त्याने चंदूला मारायला सुरुवात केली.
"तुम्ही इथून कधीच सुटू शकणार नाही," हसत टमक्या म्हणाला.
एकूणच झाडाभोवती असलेल्या त्या परिघातून खूप विचित्र अमानवी आरडाओरड ऐकू यायला लागली. गावातील जवळच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना हा भयंकर आवाज ऐकू आला. त्यांनी धावत तिथे जाऊन पाहिलं, तर झाडाभोवती भयानक अंधार पसरलेला होता. एक ज्येष्ठ व्यक्ती, श्री. शास्त्री म्हणाले, "टमक्याने आपला डाव आज साधला. मला काहीतरी करायला हवं!"
मागेही एकदा चुकून बाहेरच्या गावातील काही वाटसरू झाडाच्या परिघाच्या कचाट्यात सापडले होते. तेव्हा त्या झाडाच्या पारिघाच्या आतमध्ये गावकऱ्यांना बाहेरून बघितल्यास वाटसरुंच्या जागी फक्त मानवी आकाराचा हिरवा अंधुक प्रकाश इकडे तिकडे हलताना दिसत होता आणि टमक्याच्या जागी मानवी आकाराचा लाल प्रकाश दिसत होता. आता चार हिरवे मानवी आकार आणि त्यांना त्रास देणारा लाल मानवी आकार दिसू लागले. चेहरे ओळखू येत नव्हते. परिघाच्या आत मध्ये प्रवेश करता येणार नव्हता. चौघा मुलांचे आई-वडील सुद्धा आता तिथे आले.
श्री. शास्त्री यांनी म्हटले, "आता नाईलाजाने अमक्याला बोलवायला लागेल!"
श्री. शास्त्री यांनी काही मंत्रोच्चार सुरू केले. त्यांचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या झाडांची पाने सळसळू लागली. विजांचा कडकडाट व्हायला लागला. वादळ आणि वारे वाहू लागले. गावाजवळच्या नदीच्या पाण्यामध्ये खूपच वेगळी हालचाल जाणवू लागली. नदीमध्ये समुद्रासारख्या लाटा उसळू लागल्या. हळूहळू त्या नदीतील लाटांमधून कवायतीसारखे जमिनीला समांतर हात केलेली एक शाळकरी मुलाची आकृती वर आली. प्रथम त्या आकृतीने डावीकडे उजवीकडे बघितले, मग वर आकाशाकडे पाहिले आणि ती आकृती हसू लागली. मग पाण्यातून हवेत उडी मारून ती आकृती श्री शास्त्री यांच्यासमोर गावकऱ्यांच्या घोळक्याजवळ अलगद जमिनीवर उतरली.
"मला का जागृत केले शास्त्रीबुवा?"
"टमक्याने चार मुलांवर आज डाव टाकला. तुला त्या चौघांना वाचवायचे आहे!"
"ठीक आहे शात्री बुवा. जशी आपली आज्ञा!"
असे म्हणून अमक्या वेगाने पळत जाऊन झाडाच्या वर्तुळाकार परिघाच्या आतमध्ये शिरला. आत शिरताना एक प्रचंड विजेचा पिवळा लोळ त्या परीघाभोवती वर्तुळाकार गतीने पसरला आणि मग त्याच गतीने नष्ट झाला.
आता त्या अंधारात अमक्याची मानवी आकृती निळ्या प्रकाशात दिसायला लागली. लाल रंगाची मानवी आकृती निळ्या रंगाच्या मानवी आकृतीवर त्वेषाने धावून गेली. गावकरी श्वास रोखून हे सगळं बघत होते. पाच मिनिटे उलटून गेली. चार हिरवे आकार इकडे तिकडे सैरा वैरा धावत होते. आतमध्ये ते तिन्ही रंगांचे प्रकाश एकमेकांमध्ये मिसळत होते, आणि विलग होत होते. मग अचानक तीनही प्रकाश एकत्र होऊन त्याचा सापासारखा आकार तयार झाला. मग तो प्रकाशमान तीन रंगांचा साप वेटोळे घालून फिरत झाडावर चढू लागला. आतमध्ये नेमके काय चालले आहे हे श्री. शास्त्री बुवा किंवा इतर कुणाही सामान्य माणसांच्या समजण्यापलीकडचे होते. चौघा मुलांच्या आयांना हे बघवले न गेल्यामुळे त्यांना काही स्त्रिया शेजारच्या एका घरी घेऊन गेले.
तो साप झाडाच्या पानांमध्ये कुठेतरी नाहीसा झाला असे वाटत असतानाच झाडाच्या भव्य बुंध्यातून एक विक्राळ प्रकाशमान चेहरा बाहेर आला आणि गावकऱ्यांना घाबरवू लागला. त्याचे डोळे हिरवे, चेहरा निळा आणि जीभ लाल होती. गावकऱ्यांपैकी दोन चार जणांनी दगड आणि फांद्या उचलून त्या झाडाकडे फेकल्या, परंतु त्या सगळ्या वस्तू वर्तुळाकार परिघाला आपटून पुन्हा दुप्पट वेगाने परत आल्या.
शास्त्रीबुवा सर्वांना थांबवत म्हणाले, "कृपया, ऐका. असे काही करू नका. अन्यथा आपल्या जिवावर बेतेल!"
आता त्या झाडाच्या आत मधल्या अंधारात सर्वांना दिसले की, लहान मुले खेळतात तसा एक हिरव्या लाल रंगाचा प्रकाशमान भोवरा तयार झाला आणि तो गरगर फिरू लागला. तेवढ्यात एक लाल रंगाची दोरी त्या वेगाने फिरणाऱ्या भोवऱ्याच्या भोवती गुंडाळली गेली, आणि करकचून बांधली गेली आणि त्या भवऱ्याचा वेग कमी करू लागली. शेवटी तो भोवरा फिरायचा थांबला, त्याचे पाच तुकडे झाले. चार हिरवे तुकडे परिघाच्या बाहेर फेकले गेले. ते तुकडे म्हणजे चौघे मित्र होते. ते खूप भेदरलेले होते. गावकऱ्यांनी त्यांना हाताला धरून उभे केले आणि त्यांच्या आयांजवळ पाठवले.
आता झाडाच्या परिघात निळ्या रंगाचा भव्य भोवरा तयार झाला आणि लाल रंगाच्या मानवी आकृतीला जमिनीत वेगाने फसवू लागला. आता त्या काळोख्या परिघात फक्त निळी आकृती होती. ती आकृती नंतर उडी मारून परिघाच्या बाहेर आली, तेव्हा सर्वांना नीट दिसले की तो अमक्या होता.
अमक्या म्हणाला, "सध्या टमक्याला मी झाडाखालच्या जमिनीत स्थापित केलेले आहे. पण तो काही दिवसांनी पुन्हा वर येईल. पुन्हा कुणीही रात्री आठ वाजेनंतर त्या वर्तुळात जाण्याची चूक करू नका!"
आणि अमक्या नदीकडे निघून गेला. सर्वानी त्याचे आभार मानले.
शास्त्री बुवांनी मग तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना एक कथा सांगितली, कारण काहींना अजूनही ती माहिती नव्हती.
पूर्वीच्या काळी या गावात अनिल आणि सुनील हे खूप जिगरी दोस्त होते. त्यांना गमतीने सर्वजण अमक्या टमक्याची जोडी म्हणायचे. दोघेही तसे खोडकर होते परंतु अनिल कुणाला इजा होईल अशा पद्धतीने खोडी काढत नव्हता. पण सुनील पुढे पुढे खूप जास्त खोडकर झाला. विनाकारण कुणाचेही नाव घेऊ लागला.
हे मात्र अमक्याला म्हणजे अनिलला आवडत नव्हते. तो टमक्याला म्हणजे सुनीलला जीवघेण्या खोड्या काढण्यापासून परावृत्त करत असे आणि अमक्याचे नाव खराब होऊ नये असे त्याला मनोमन वाटे, पण टमक्याला त्याची भीती आणि किंमत वाटेनाशी झाली.
टमक्या इतरांना त्रास देऊन त्यांच्या दुःखात आनंद मानू लागला. टमक्याच्या आई-वडिलांना पण आता अमक्यावरच भरवसा होता. अमक्याशिवाय टमक्यावर कुणीही नियंत्रण करणारे उरले नव्हते. तो गावातील कुणाचीच ऐकत नव्हता.
पुढे पुढे टमक्याचा खोडकरपणा एवढा वाढला की, एकदा अशा दोन मुलांना त्याने संध्याकाळी नदीवर खेळायला बोलावले ज्यांना पोहता येत नाही. बेसावध असताना दोघांना त्याने नदीत ढकलून दिले आणि ते बुडताना तो नदीतल्या एका मोठ्या खडकावर बसून त्यांची मजा बघू लागला. ते वाचवा वाचवा म्हणून ओरडत होते. पुढे पाण्याचा प्रवाह धोकेदायक होऊन खोल दरीत पडत होता म्हणजे धबधब्याकडे जात होता. अमक्याला ही खबर मिळाली, तेव्हा तो धावतच नदीकडे पळाला. आधी त्याने पाण्यात उडी मारून पोहत जाऊन त्या दोन मुलांना वाचवले, काठावर आणले आणि मग पाण्यात उतरून त्या टमक्याला खूप बदडले. पाण्याचा प्रवाह त्या दिवशी जोरात होता. आज टमक्या त्याच्या मित्राला सुद्धा जुमानत नव्हता.
"मी तुला लोकांना त्रास देऊ देणार नाही. तू जेव्हा जेव्हा लोकांना त्रास देशील, तेव्हा तेव्हा मी तिथे हजर होईल!"
"मी बघतोच की, तू कसा काय सर्वांना माझ्यापासून वाचवतोस ते!"
असे म्हणून सुनीलने अनिलला लाथेने धबधब्याच्या दिशेने ढकलून दिले आणि अनिल वेगाने असहाय्यपणे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने धबधबाकडे वाहत जाऊ लागला. तेवढ्यात त्याने नदीतील एका दगडाला घट्ट धरून ठेवले. पण पोहत सुनील तिथे आला आणि त्याने अनिलच्या हातावर जोराने लाथ मारली. जणू काही सुनीलच्या अंगात आज एखादा राक्षस संचारला होता. त्यादिवशी पाण्याचा प्रवाह सुद्धा खवळलेला होता. त्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात खडकावरचा हात सुटून अनिल खाली कोसळला आणि त्याच्याकडे बघत हसता हसता सुनीलचा पण तोल गेला, त्याचा पाय घसरला आणि तोही धबधब्यात पडला. तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. दोघेजण खोल दरीत पडले आणि कायमचे नाहीसे झाले.
त्या दिवसापासून टमक्याच्या आत्म्याने आपल्या स्वभावानुसार वेताळ बनून त्या झाडावर कब्जा मिळवला आणि तेव्हापासून तो कुणाचीही खोडी काढण्याची संधी आणि वाट बघतो. त्याने खोडी काढताच अमक्या त्याच्या शब्दाला जागून टमक्याच्या तावडीत सापडलेल्या कोणालाही सोडवतो मात्र त्यासाठी शास्त्री बुवांची मध्यस्थी आवश्यक ठरते. तुम्ही सुद्धा कधी त्या गावात गेलात तर दिवस असो की रात्र, शक्यतो त्या झाडाच्या दूरच रहा! कारण जमिनीत स्थापित झाल्यावर टमक्या आता पाताळलोकतून आणखी जास्त शक्ति मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यामुळे त्याला कोणती नवी शक्ति मिळेल हे आज तरी कोणीच सांगू शकत नाही!
छान. मुंजा पिक्चरची आठवण झाली
छान. मुंजा पिक्चरची आठवण झाली वाचताना.
मी मुंजा पिक्चर बघितला नाही
मी मुंजा पिक्चर बघितला नाही अजून.
ओ, मस्त लिहिलाय बघा!
ओ, मस्त लिहिलाय बघा!
छान
छान
छान बालकथा
छान बालकथा
छान
छान
पुलेशु.
पुलेशु.
मस्त
मस्त