#दाभोली _गावातील_साकव #भाग 3
एवढे सगळे होताना साकव होत आलेला असायचा ,मग सुरू होणार टेस्टिंग ,ती कशी ? कारण अजून ओढ्याला पाणी नाही, पुरस्थिती नाही, फक्त साकव वजन पेलू शकतो की नाही एवढेच बघायचे ,मुख्य म्हणजे पावसात जोरात वारा वाहतो त्यावर तो हलत तर नाहीये ना ? काही फळ्या, त्याचे खिळे कोणाला लागणार तर नाही ना? लावलेले बांबू म्हणजे माणगे, कणकी गुळगुळीत बाजू चिखलाने घसरडी तर होणार नाही ना? तसे होत असल्यास त्याला कोयत्याने खाप करणे म्हणजे गुळगुळीत पुष्ठभाग मुद्दाम खडबडीत करणे, दोऱ्या व्यवस्थित बांधल्या गेल्या आहेत का? हे सगळे इन्स्पेक्शन करायला जाणकार मंडळी साकवावरून जाणार , मग जाताना एकदम रमत गमत, कधी एकदम घाई गडबडीने चालून बघायचे, मधोमध जाऊन मुद्दाम थोडा झोल देवून बघायचा आणि त्यावरून वर उल्लेख केलेल्या सगळ्या मुद्द्यांचे टेस्टिंग करायचे.मग मोठी काळी छत्री एवढा जागा वरचा बाजूला आहे का हे बघणे, साकवावर चढायला उतरायला एखाद्याला त्रास तर होणार नाही ना ? दोन्ही बाजुलां धरायला व्यवस्थित माणगे आहेत ना? एखाद्या मुलाने खाली वाकून बघितलं तरीही तो पाण्यात तर पडणार नाही ना ? हे सगळं बघितलं जायचं आणि मग काही डागडुजी असलीच तर ती करून सगळेजण श्री गौतमेश्वर मंदिरात येणार, मग तिकडे मंदिरातीलच एखादा नारळ बाबा काढायचे आणि तो ठेवून सगळेजण देवाला नमस्कार करायचे आणि मग तो नारळ साकवाच्या बाजूला नेऊन वाढवायचा आणि जोडीला अजून सात आठ नारळ बाबा द्यायचे ,ते फोडून शिरणी करून चारी दिशेला शिर्णी दाखवायची, गौतमेश्वर ,नारायण आणि काशीब्राम्हण या तीन्ही मंदिरात शीर्णी ठेवायची, साकवाकडे शिरणी ठेवायची आणि मग सगळे मिळून तो प्रसाद खायचे.एकदाचा साकव झाला, आता येऊ दे पाऊस कधीपण, आता भीती नाही अश्या चर्चा रंगायच्या.
आता घरी जाताना साकवाच्या फळ्याना केलेल्या विशेष जागा मित्रांना आणि विशेष लोकांना दाखवल्या जायच्या, ह्या जागा म्हणजे फळ्या, माणगे यांना केलेल्या खोबण्या असायच्या,बाजूला दोरी बांधलेली असणार , हे सगळे कशासाठी असेल ? तर पाणी चढल्यावर नारळ वाहून येतात त्यावेळी या खोबणीत खोबले (मोठ्या बांबूला जोडलेली जाळी) किंवा पिंपळा (बांबूला जोडलेला टोकेरी कोयता) अडकवायचे आणि साकवाच्या आधाराने नारळ गोळा करता येणार, सोबत गरी सोडून मासेही पकडता येणार म्हणून केलेली ही खास प्रणाली.या पूर्ण लेखनात वाडीतील अनेकजण आठवले,त्यांची नावे लिहिली तर कदाचित काही नावे विसरलो सर त्यांच्यावर अन्याय होईल म्हणून मुद्दाम नावे लिहीत नाही परंतु वाचणाऱ्याना यात आपल्या गावातील, वाडीतील दहा बारा नावे तर हमखास आठवतील यात शंकाच नाही.मेहनत, प्लॅनिंग आणि मुख्य म्हणजे समाजासाठी काहीतरी करायची निर्हेतुक तळमळ हेच तर आमच्या कोकणातील गावांचे वैशिष्ठ्य आहे.
अशा प्रकारे साकव बांधणे म्हणजे एक सक्सेसफुल प्रोजेक्ट मॅनेजमेंट कोर्स आहे. या बांधणीमधील टीमवर्क, ऑप्टीमम स्किल युटीलायझेशन, प्रोजेक्ट प्लॅनिंग, कोन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, कन्वसिंग पॉवर, प्रोडक्शन, असेम्ब्ली, टेस्टिंग, प्रोएक्टीव ॲप्रोच, रिसोर्स मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, काइझेन ,पोकायोके आणि बरेच काही शिकता येते. एक परिपूर्ण प्रोजेक्ट यापेक्षा वेगळा तो काय असतो?
- निलेश जोशी
#दाभोली _गावातील_साकव #भाग 3
Submitted by joshnilu on 29 July, 2024 - 02:43
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खुप खुप सुंदर लिहिलेय.
खुप खुप सुंदर लिहिलेय.
कोकणात कायव सुरवात करुची झाली तरी आदी देवाक नारळ ठेवक व्हयोच, त्याशिवाय काय खरा नाय. आनी मगे कातळीचो प्रसाद..
आमच्या गावात पण असे साकव होते, आता सिमेंट पुल झाले.
सुंदर!
सुंदर!
एकदम छान वर्णन झाले आहे.
एकदम छान वर्णन झाले आहे. वाचायला मजा आली.
आता माणगे , बांबू ह्यांचे
आता माणगे , बांबू ह्यांचे साकव न बनवता लोखंडी पाईप वापरतात.
धन्यवाद , कोकणातील एक एक
धन्यवाद , कोकणातील एक एक प्रकार एवढे सुंदर आहेत ना , त्याने काय तोड नाय खयचीच ....
लोखंडी साकव किंवा सिमेंट पाईप वापरतात आजकाल , परंतु ह्या झुलत्या पुलाची मजा आता येत नाही
अजून असे लेख वाचायला आवडतील का हेही सांगा , म्हणजे लिहायला अजून मजा येईल
झुलत्या पुलाची मजा आता येत
झुलत्या पुलाची मजा आता येत नाही >>
पण पूल हा झुलण्यासाठी बांधतात की सुरक्षितपणे इकडून तिकडे जाण्यासाठी बांधतात?
मस्तच... मजा आली वाचताना.
मस्तच... मजा आली वाचताना.
छानच
छानच
अजून असे लेख वाचायला आवडतील
अजून असे लेख वाचायला आवडतील का हेही सांगा , म्हणजे लिहायला अजून मजा येईल >> हो, अजून असे लेख वाचायला आवडतील.
अजून असे लेख वाचायला आवडतील
अजून असे लेख वाचायला आवडतील का हेही सांगा >>> नक्कीच आवडतील!
मस्तच. अजून असे लेख वाचायला
मस्तच. अजून असे लेख वाचायला नक्कीच आवडतील.
छान लेख !
छान लेख !
( योगायोग - मी इथेच 2011 मध्ये " व्हाळ " हा लेख लिहिला होता व त्यातलं माझं साकवाचं डिजिटल चित्र ह्या साकवाच्या फोटोशी खूपच मिळतं जुळतं आहे ! - https://www.maayboli.com/node/25403 )
आज तिन्ही भाग वाचले. खूपच छान
आज तिन्ही भाग वाचले. खूपच छान वर्णन आहे. माझ्या लहानपणापासून आमच्या गावात पक्का पूल आहे, पण जुनी माणसं त्याचा उल्लेख 'साकव' किंवा 'साकू' करायची.
'पारय' हा शब्द माहिती होता, पण राजू , पिंपळा वगैरे अनेक शब्द माहिती नव्हते.
कुंब्याचं झाड म्हणजे कुंभ्याचं का? त्याच्या पानांचे द्रोण करून त्यात करवंदं ठेवायचो आम्ही.
साकवाच्या काही आठवणी
साकवाच्या काही आठवणी
केशवराज मंदिराकडे जाताना एक साकव आहे, जिथे गारंबिचा बापू सिनेमामधले विठोबा मरण पावतो ते चित्रीकरण झाले होते. अनेक वर्षांनी तिथे गेलो होतो तेव्हा चित्रपटातील प्रसंग डोळयांसमोर उभा राहिला
लहानपणी आजोळी आंबे पाडायला गेलो होतो. येताना आमचा कुळवाडी बाबा गायकवाड डोक्यावर आंबे भरलेली टोपली घेऊन साकव ओलांडत होता, त्याच्या मागेच मी चालत होतो. अचानक बाबा चा तोल गेल्यागत झाले आणि त्याच्या तोंडून भयकारक उदगार निघाला. सुदैवाने लगेच सावरला आणि काही अघटीत घडले नाही. तो साकव ओलांडताना कित्येक दिवस अंगावर शहारे येत.
एकदा साकव ओलांडताना समोर नानेटी दिसली. हातात 'गोखा' (आकडी असलेली काठी) होता तो सकवावर आपटला तेव्हा ती वळून दुसऱ्या दिशेला गेली.
केशवराज मंदिराकडे जाताना एक
केशवराज मंदिराकडे जाताना एक साकव आहे >>> हा साकव काही केल्या आठवत नाहीये. तो जरासा उंच - पुलासारखा आहे तो का? मंदिर व्यवस्थित आठवतंय. तो कच्चा रस्ता पण! अर्थात २१ वर्षं झाली असूद ला जाऊन. आठवणी जराश्या अस्पष्ट झाल्या आहेत.