ले
#कोकणच्या_गावातील_साकव #भाग 2
कालच्या लेखातून आपण साकव बांधणी कशी केली जायची हे बघितले, हे काम एक दिवसात नाही झाले तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारनंतर सुरू व्हायचे. कधी कधी Y आकाराचे खोड नाही मिळाले किंवा ओढ्याशेजारी खड्डा खणून मेढ पुरली तरी पावसाच्या पाण्याने भुसभुशीत होऊन साकव ज्यावर उभा आहे तेच मुख्य खांब आहेत तेच पडण्याची शक्यता असायचीच, असे होऊ नये म्हणून मग दोन्ही बाजूला मजबूत बुंधा असलेली झाडे बघून त्यावर आडवे खोड बांधून त्यावर साकव बांधला जायचा, ह्यात एकच प्रोब्लेम की साकवावर जायला आणि यायला एक उतरती शिडीसारख्या पायऱ्या बांधल्या जायच्या, अर्थात ह्या बांबूच्या आणि पावसात चप्पलला चिखल लागला तर बांबुवरून पाय घसरायची भीती असायची.शिवाय एखादे जड सामान घेऊन ह्यावरून जाणे आणि साकव ओलांडणे जिकिरीचे होऊन जायचे, मग त्यावर तिसरा पर्याय म्हणजे चित्रात दाखवलेला साकव तसे चिऱ्याचे बांधकाम करून त्यावर साकव उभारणे पण अर्थात ह्या सगळ्याला अनेक पर्याय पैकी योग्य पर्याय निवडणे आणि तो अमलात आणणे तेही सहभागी लोकांना कंटाळा येऊ न देता आणि कमीत कमी संसाधनात ही खरी कसरत असायची.चिरे देणारा पण आढेवेढे घेणार मग पाऊस गेला की घरपोच चिरे पोचवले जातील या बोलीवर मान्यता देणार,अर्थात पाऊस गेल्यावर ते चिरे कधीच त्या व्यक्तीपर्यंत पोचलेच नाहीत ही गोष्ट वेगळी.
चिरे, वाशे, फोफळ, माणगे आणणे, त्यांना पद्धतशीर मापात बनवणे, त्याला एका सरळ रेषेत बांधत जाणे, सुरुवातीचे साकव बांधायला एका बाजूकडून दुसऱ्या बाजुपर्यंत दोरी बांधून नेणे आणि मग त्यावर टप्प्याटप्प्याने फो, माणगे रचत बांधत जाणे हे खरे कौशल्याचे काम, पण एकाच्या देखरेखीखाली आणि एकमेकांच्या मार्गदर्शनात ही कामे पटापट होऊन जायची.आणि टाईमपास म्हणून आम्ही लहान मुले आणलेल्या माणग्याचा वापर करून चिपनळी बनवायचो, तीरफळ आणून त्याच्या गोळ्या बनवून चीपनळीने उडवायचो. चीपनळी हाही खास कोकणातील बंदूक सदृश्य प्रकार, बांबू म्हणजे पोकळ माणगा आणि त्यात बरोबर जाणारी काठी बनवायची आणि तिरफळं किंवा हसोळ्या ह्या चीप नळीत टाकून उडवांयच्या, ठो आवाज यायचा आणि धूर यायचा आणि दुरवरील एखादे पान ,झाडाची फांदी टार्गेट करायची, अशी सगळी धमाल.
मुलांची दुसरे काम म्हणजे कुंबा या झाडाची साल आणणे आणि त्याचे दोर बनवणे, घराघरांतून फिरून साकवाला लावायला फळ्या, खिळे आणायचे , सुम्भ किंवा राजू आणायचे , यात एक गमंत म्हणजे कोण कोण सोडण भिजत घालून काथ्या बनवतो आणि त्याचे सुंभ बनवतो हे माहीत असायचे ,त्या घरात मुद्दाम जाऊन साकवाला दोरये कमी पडतात असे सांगायचे मग कोणतरी घरातून सांगायचे अरे नवीन सूंभ चालतील तर अमुक ठिकाणी ठेवल्यात अशी माहिती देणार आणि मग तिकडून जास्तीत जास्त दोऱ्या एकगठ्ठा मिळणार म्हणजे आपोआप आमचे घरात फिरायचे कष्ट वाचले आणि होलसेल मध्ये एकाच ठिकाणी दोऱ्या मिळणार.
तोपर्यंत कोणतरी पोहे - चहा करून आणलेले असायचे , कधी कधी उसळ यायची आणि पाव आणायला पैसे न देताच बाबा मला दाभोलीला हळणकर यांच्या बेकरीत (गिरोबा मंदिराच्या शेजारी) पाठवायचे, त्याला सांग भटजी उद्या दितले म्हणून मग तिकडे जायचे आणि गरम गरम पाव आणायचे आणि मग सगळे सोबत उसळ पाव खाणार, त्यात उसळ घ्यायला चानुर्ड्याची पाने म्हणजे खाऊन लगेच टाकायला मोकळे. सगळेच नॅचरल रिसोर्स ,नैसर्गिक प्लेट्स
एवढे सगळे होताना साकव होत आलेला असायचा ,मग सुरू होणार टेस्टिंग ,ती सगळी गोष्ट पुढील भागात (क्रमशः)
- निलेश जोशी
#दाभोली _गावातील_साकव #भाग 2
Submitted by joshnilu on 28 July, 2024 - 05:02
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान...
छान...
छान.
छान.
मस्त
मस्त
मस्तच.
मस्तच.
हा भागही छान!
हा भागही छान!
खूप मस्त.
खूप मस्त.
खूप दिवसानी साकवाची आणि
खूप दिवसानी साकवाची आणि चिपनळीची आठवण करून दिल्यात.. . धन्यवाद..
चिपनळी म्हणजे कोकणातली
चिपनळी म्हणजे कोकणातली दिवाळीची फटाक्यांची गन