द बर्निंग ट्रेन हा चित्रपट पाहताना जेव्हां बचावकार्य सुरू झाले तेव्हां न राहवून चिकवा - १० वर प्रतिसाद दिला गेला. त्यानंतर धागा पळू लागल्याने वेगळ्या धाग्यावर प्रतिसाद हलवण्याची सूचना आली. ती पटली आणि शिरसांवंद्य समजून वेगळा धागा सादर करत आहे. नवे प्रतिसाद या धाग्यावर देऊ शकता.
सुरूवात अर्थातच मुली पटवण्याच्या तेव्हांच्या स्मार्ट आयडियाज. धर्मेंद्र, विनोद खन्ना हे वयाने आताच्या किंवा दहा वर्षांपूर्वीच्या आमीर, सलमान, शाहरूख पेक्षा नक्कीच लहान असावेत. पण कॉलेजचे विद्यार्थी शोभत नाहीत. हेमा मालिनी सुद्धा यात शिक्षिका वाटते. परवीन बाबी पाच वेळा फेल झालेली विद्यार्थिनी म्हणून चालली असती.
यांचे स्वप्न ट्रेन बनवण्याचे असते, पण मुलींच्या मागे फिरणे, गाणी म्हणणे यातून वेळ मिळत नसतो.
इतक्यात एक फोन येतो आणि धर्मेंद्राच्या पिताश्रींची सगळी संपत्ती डामाडौल होऊन जाते. त्याचं वैभव सगळं कर्ज काढून कमावलेलं असतं. या बँका आपल्याकडून व्याज घेतात मग ते अशा गरजवंतांना देतात. बँक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि प्रत्येक राष्ट्रभक्ताकडे ती असायला हवी.
त्या फोनमुळे त्याचे वडील खचतात.
ठो असा आवाज करत कुठून तरी एक गोळी सुटते आणि धरमजी के पिताश्री देवाघरी जातात. धर्मेंद्र एकदम कफल्लक !
इतक्यात हेमाचं पत्र मिळतं कि तू आता गरीब झाला आहेस, मी आधीपासून गरीबच होते, तुझ्याकडे पैसा होता, दोन चार दिवस आरामात जातील म्हणून तुझ्यावर प्रेम केलं, पण आता तू काय कामाचा ?
हे पत्र पाहून मग तो सिरीयस होतो आणि इस जालीम दुनिया से दूर निघून जातो.
तो गेल्यामुळे विनोद खन्नाची गाडी रूळावर येते आणि तो सुपर एक्सप्रेस बनवायला लागतो. यांच्यात डिझाईन म्हणजे एक मोठं गोल टेबल ठेवायचं, त्यावर लहान मुलांचे ट्रेनचे खेळणे असते ते ठेवायचे आणि डबे इकडून तिकडे हाताने पळवायचे. हे डिझाईन खूपच क्लिष्ट आहे हे ठसवण्यासाठी विनोद चेहर्यावर त्रासिक भाव आणून जोरजोरात ते डबे दाबून ढकलत असतो. तसेच अधून मधून ड्रॉईंग बोर्डावर जाऊन ब्ल्यू प्रिंटवर उभ्या आडव्या रेषा मारत असतो. दिग्दर्शकाने ब्ल्यू प्रिंट म्हणजे डिझाईन ही माहिती जमवल्याचा हा परिणाम. अर्थात ब्ल्यू प्रिंट हे फायनल डिझाईन असते आणि त्याच्या वर रेषा मारणे हा फाऊल असतो हे त्याला कसे ठाऊक असणार ?
त्याची सुपर एक्सप्रेस तयार होते आणि तिची पहिली धाव दिल्ली ते मुंबई ठरते.
त्याच्या ट्रेनला धर्मेंद्र हिरवा सिग्नल देणार असतो. दोन मुख्य हिरो ठरवतात, तर मग रेल्वेच्या जीएम वगैरेंना मम म्हणण्याशिवाय गत्यंतचर नसतं. जीएमच्या मनात रेल्वे मंत्र्याला बोलवावं दोन वर्षे वाढवून घ्यावी किंवा कलकत्याच्या बोगी बनवणार्या कंपनीचं टेण्डर पास करून घ्यावं असं असलं तरी सिनेमाचे हिरो म्हटल्यावर त्याला चॅलेंज कसं करणार ?
इथ पर्यंत शोले, शान प्रमाणे टाईमपास होतो.
नंतर हॉलिवूड प्रमाणे आपत्तीपट बनवायचा जितका गांभीर्याने प्रयत्न केला आहे, तितकीच त्यातून विनोद (खन्ना, मेहरा नव्हे) निर्मिती होत जाते.
ही आशियातली सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन असते म्हणे. जपान त्या वेळी आशियाचा भाग नसावा.
गुलशन रायचा सिनेमा असल्याने ट्रेन मधे तेव्हांचे सर्व सुपरस्टार्स चढतात.
इथून पुढच्या कमेण्ट्स चिकवावरून कमेण्ट बॉक्स मधे डकवत आहे.
बचावकार्यात एक लाल साडी आली त्यामुळे चिकवा धागा पेटला. त्यातून एक कष्टकरी जोडपे असल्याने ट्रेन का पेटली असावी याचा अंदाज या प्रतिसादातून येईलच. पानी मे भी आग लगाये ऐसा हुस्न तेरा अशा प्रकारची गाणी ही अजिबात अतिशयोक्ती नाहीत. पाणी पेटू शकते तर ट्रेन तर काय, जळीव पदार्थाने बनलेले एक वाहन..
https://youtube.com/shorts
https://youtube.com/shorts/zyeJVaDSc3M?si=335_6Fq4cRKzoM-X
वरची क्लिप इंटरेस्टिंग आहे.
वरची क्लिप इंटरेस्टिंग आहे. माहिती नव्हतं याबद्दल.
Pages