एवढसं आभाळ - कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 22 July, 2024 - 02:03

एवढसं आभाळ
ट्रिंग....... ट्रिंग... ट्रिंग ....
दारावरची बेल कुणीतरी सारखी वाजवत होते. पण तरीही रेवतीला उठून दरवाजा उघडावा असं काही वाटतं नव्हतं . घरी आल्यावर नेहमी देवाजवळ दिवा लावायचा हे तीच गेल्या कित्येक वर्षाच वळण पण आज तीला दिवा लावायचं सुद्धा भान नव्हतं . झाल्या प्रसंगामुळे ती अस्वस्थ झाली होती. मनातले विचार घालवण्यासाठी ती डोळे मिटून बराच वेळ तशीच पडून राहिली.. इतका अपमान? आणि तो हि स्नेहलच्या घरात? का आपण आज तिच्याकडे गेलो हीच चूक झाली आपली ? स्नेहलशी आपण मैत्री केली ही चूक तर नाही ना झाली? अवघ्या सात आठ महिन्यापूर्वीच एजन्टच्या मदतीने रेवतीने flat भाड्याने घेतला होता आणि खालच्याच मजल्यावर राहणाऱ्या स्नेहलशी तिची छान मैत्री झाली होती. रेवती काही माणूसघाणी नव्हती, पण परिस्थितीमुळे ती समाजापासून अलिप्त राहत होती. पण स्नेहलच्या मैत्रीचा सहवास तिला मिळाला आणि तिचे एकाकीपण काहीसे कमी झाले.
रात्रीचे दहा वाजले होते. अपार्टमेटमधे मघापर्यंत असणारी वर्दळ आता शांत झाली होती. कुठेतरी हलकेशी कुजबुज, एखाद्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज आणि कुठेतरी लागलेला टी व्ही इतकीच काय ती जाग होती.. पण इतक्यात बाहेरच्या जोरात किंकाळीने शांतता नाहीशी झाली. रेवती दचकली आणि तीने समोरच्या खिडकीकडे धाव घेतली. नेमका कसला गोंधळ झाला आहे हे रेवतीला कळत नव्हते. एक कार ट्रक वर आदळली होती आणि लोकांचा एकच आरडाओरडा चालू होता. कुणीतरी जोरात रडत होते... रेवतीला तो आवाज नकोसा झाला.... तिने खिडकीचा दरवाजा लाऊन घेतला आणि पुन्हा तशीच डोळे घट्ट मिटून पडून राहिली . अगदी वर्षापूर्वी असाच अपघात आपल्या गाडीला झाला होता .....त्या रात्री सौरभ आणि ती गाडीतून दूर फिरायला चालली होती.... आणि गाडी एका झाडावर आदळली आणि सौरभ... आपण शुद्धीवर होतो. येणाऱ्या जाणाऱ्या गाडीकडे मदत मागत होतो. पण कुणीही मदत केली नाही. शेवटी कशीबशी एक Taxi मिळाली आणि त्याने हॉस्पिटलपाशी नेऊन सोडले पण तो पर्यंत सौरभ गेला होता. डॉक्टर सौरभ ज्याने करोनाच्या काळात अनेक लोकांचे प्राण वाचवले तो डॉक्टर सौरभ अपघातात वारला. अवघ्या पंचेचाळीसाव्या वर्षी ती विधवा झाली. रेवतीला हे सारं आठवलं आणि ती अजुनी अस्वस्थ झाली. मनातील विचारामुळे तिला आपले बीपी वाढते कि काय असे वाटू लागले. समोर असणार्या टेबलवरील बीपीची गोळी तिनं घेतली. झोपेच्या गोळ्याची बाटली तिथेच होती. कधी झोप नाही लागली तर एखादी गोळी डॉक्टरनि घेण्याची परवानगी तिला दिली होती. क्षणभर तिच्या मनात विचार आला, हि सगळी बाटली एका दमात संपवून टाकावी का ? सगळे संपून जाईल. नाहीतरी आपल्याला आता कोणतेच पाश नाहीत. आपण तर वांझ आहोत आणि नवरा तर गेलाच. आता जगायचे कुणासाठी ? झोपेच्या बाटलीकडे तिचा हात गेला पण ती तशीच बसून राहिली. समोरच्या खिडकीमधून बाहेरच्या अंधारात खोलवर बघत राहिली.

“ मी बराच वेळ बेल वाजवली पण ती दार उघडत नाही. असं का वेड्यासारखं करते आहे कुणास ठाऊक?” स्बेह्लने आत येत त्राग्याने सक्षम्यला सांगितले.
“ वेडी ती नाही स्नेहल. तू आहेस. हे तुझं समाजकार्य आणि जनजागृतीचे प्रयोग करत असतेस ना कुणावरही त्यामुळे हे असं होतं . लोकांच्या भावनांचा थोडा विचार करत जा. घरी आलेल्या व्यक्तीचा असा अपमान झाल्यावर कुणीही अपसेट होणारच.”
“ हे बघ उगीच माझ्यावर ओरडू नकोस. इतका काय अपमान मी केला ते सांगशील?
“ नाही केलास? का वेड पांघरून पेडगावला जाती आहेस? तू रेवतीला आज हळदी कुंकू दिलसं. एका विधवेला. चार निरुद्योगी बायका दात काडून फिदीफिदी हसल्या. हे करायचं काय नडल होतं?”
“ चार बायका तिला हसल्या हा कुणाचा दोष? त्या बायकांचा का माझा?”
“ त्या बायका हसल्या यात तुझा दोष नाही. पण तू रेवतीला बोलावलसं हा तुझा दोष आहे. आपली परंपरा, संस्कृती रूढी सांगते हळदी कुंकू सारख्या प्रसंगाला सौभाग्यवतिनाच बोलवायचं. हे तुला माहित नाही? तरी तू रेवतीला बोलावलसं हि गोष्ट काहीतरी चुकली आहे असं वाटत नाही तुला?
“ अजिब्बात वाटत नाही मला कि मी चुकले आहे ? किती दिवस तू अशा रूढी परंपरा उराशी कवटाळून बसणार आहेस? मी एका विधवेला बोलावलं पण ती विधवा तिच्या नवर्याशी एकनिष्ठ होती. केवळ तिचा नवरा हयात नाही म्हणून तिला विधवा म्हणायचे काहीच कारण नाही.”
“ तू तुझं मत सांगते आहेस. आणि आपण तिच्या एकनिष्ठते बदल बोलत नाही आहोत. आपण रूढी परंपरा याबदल बोलतो आहोत. आणि ती सुद्धा कशी आली कुणास ठाऊक हळदी कुंकवाला ?
“ का ? तिने का यायचे नाही.? आणि तरीही तुला सांगते, नेमके काय झाले ते. तिला हळदी कुंकू आहे म्हणून मी बोलावलेच नव्हते. रेवती सहज माझ्याकडे आली होती. पण तिला बघितल्यावर माझ्या मनात विचार आला काय हरकत आहे तिला हळदीकुंकू साठी ठेऊन घ्यायला. एक नवीन प्रथा आपण पाडू. पुढच्या वेळेला याचं स्वरूप व्यापक करू. खरं तर हळदी कुंकू हि प्रथा सुद्धा मला मान्य नाहीच. आणि हे तुलाही माहित आहे. तरी सुद्धा दरवर्षी मी हळदीकुंकू करते ते केवळ गेट टू गेदर म्हणून. यावेळी सुद्धा मी तसेच केले आणि एक नवीन प्रयोग केला. रेवतीला हळदी कुंकू दिल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले होते. नवऱ्याची आठवण आली असले तिला. पण इतर बायका .. सोडून दे तो विषय, बुद्धीची मजलच तेवढी. त्याला कोण काय करणार ? शेजारच्या बायका तर बोलावून सुद्धा आल्या नाहीत. तुझ्या दृष्टीने सधवा बायका... आणि ज्या आल्या त्या फिदीफिदी कुजबुजून हसत होत्या”
“ म्हणूनच म्हणतो यात पडायचेच नाही. फुकटची कटकट सांगितलीय कुणी.?

स्नेहल आणि सक्षम्यचे वाद नेहमी असेच होतं असतं. सक्षम्य चांगला शिकलेला होता, आधुनिक जगात राहत होता. तरीही जगणे मात्र चाकोरीबद्ध होते. आणि स्नेहल सुद्धा बाळबोध वळणात वाढली होती, पण तरीही विचार मात्र प्रगल्भ होते. संस्कृतीला महत्व नाही असे तिला कधीच वाटले नाही, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला पाहिजे असे तिला वाटत असायचं . आणि तो दृष्टीकोन बदलण्याचा प्रयन्त स्वत:पासून करावा असं तिचं मत होतं . म्हणून रेवती सहज आली आणि तिला हळदीकुंकू देण्याची कल्पना सुचली. रेवतीला सुद्धा आनंदच झाला. पण ती दु:खी झाली ती बायकांच्या लागट बोलण्याने. आपला नवरा सुद्धा याला साथ देणार नाही याची तिला खात्री होती. पण कोणत्याही विरोधाला जुमानायचे नाही हा तिचा स्वभाव बनला होता. सक्षम्य कटकट म्हणाला आणि ती अधिकच चिडली.
“त्यात कटकट कसली ? एखादी गोष्ट बदलताना त्रास होतोच. आणि मला सांग. ती विधवा झाली म्हणजे आयुष्यातून उठली ? तिला जगण्याचा अधिकार नाही?”
“ कोण म्हणतं तिला जगण्याचा अधिकार नाही? विधवा बायका नोकरी करतातच ना ? किंबहुना त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या ठिकाणी नोकरी देतात. पण तिला अशा समारंभाला येण्याचा अधिकार नाही. आपल्या रूढी, परंपरा आपणच पाळायच्या.”
“ किती बुरसटलेले विचार आहेत सक्षम्य तुझे. किती दिवस तू त्या रूढी परंपरा यांचा विचार करीत बसणार ? शेवटी हळदी कुंकू म्हणजे काय असतं रे. ? चार बायकांनी एकत्र येण आणि सुख दु:खाच्या गोष्टी करण. त्यात एक विधवा बाई आली म्हणजे तो लगेच अपशकून झाला. ती आली नसती तर सगळ्यांचे नवरे काय अजरामर होणार आहेत. एक बाई आली तिच्या कपाळाला मी कुंकू लावलं म्हणून त्याचा इतका बाऊ लोकांनी तरी का करावा?
“चल, क्षण भर मान्य करू कि तू तिला कुंकू लावलसं . मी पुढ जाऊन म्हणेन तू तिच्या एकनिष्ठतेचा मान ठेवलास. पण तुझ्या विचारांना तिथे असणार्या कोणत्या बाईने साथ दिली?
“ नाही. उलट त्या सगळ्यांना राग आला. हि इथ आलीच कशी म्हणून कुत्सित हसल्या आणि आपापसात काहीबाही बोलून निघून गेल्या”
“ मी तेच म्हणतोय स्नेहल समाज तुझ्या एकटीच्या विचारानं चालत नाही.
“ म्हणजे तुझे विचार तू समाजा प्रमाणे बदलत ठेवणार किंवा स्थिर ठेवणार. स्वत:चे विचार. स्वत:ची मत याला काही महत्व आहे कि नाही.तू केवळ परंपरा या दृशीने बघू नकोस. कपाळावर हळदी कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र हे सुरक्षिततेच्या दृशीने सुद्धा आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही पुरुष जिभल्या कशा चाटता ते माहित आहे सगळ्यांना. “
“तू अतिरेक करते आहेस स्नेहल. मी हा विषय भावनिक पातळीवर डिस्कस करतोय. बायकांचे लागट बोलणे ऐकून रेवतीला काय वाटले असेल. एखाद्या स्त्रीच्या भावना दुखावतील असं कृत्य का कराव?
“ एक तर अशा भावना दुखावणारी मी नाही हे तुला हि माहित आहे. रेवतीच्या बाबतीत तर नाहीच नाही. पण तू थोडा व्यापक दृशिकोनातून का विचार करत नाहीस. सौभाग्यवती आणि विधवा असं वर्गीकरण तूला आवश्यक वाटतं का?
“ मला काय वाटतं हा मुद्दा नाहीच. सौभाग्यवती म्हणजे तिला नवरा आहे आणि ती त्या नवऱ्याशी एकनिष्ठ आहे”
“गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे ती बाई नवर्याशी एकनिष्ठ आहे याची खात्री आहे तुला?”
“ का असणार नाही?
“ तूच मला सांगितलस तुझ्या ऑफिस मधल्या एका सातपुते नावाच्या विवाहित बाईचं तिच्या सहकाऱ्याशी अफेअर चालू आहे. हे चालतं तुला. हि एकच सातपुते बाई जगात असेल?
“ त्या बाईचे घरगुती विषय असू शकतात.”
“ नाही. हा विषय मग भरकटेल. कारण काहीही असो ती एकनिष्ठ आहे का? अजुनी मी दुसरं विचारते, जिचं कुठही अफेअर नाही ती बाई तरी मनान एकनिष्ठ असेल याची खात्री असेल का? मनात कोणता तरी दुसराच पुरुष आहे असं होऊ शकत नाही? अफेअर करायची तिच्यात हिम्मत नाही म्हणून तिला एकनिष्ठ म्हणायचं. लग्न म्हणजे दोन मने जुळतात असे म्हणतो ना आपण ?”
“तुला म्हणायचं काय?”
“विधवा किंवा सधवा असं काहीचं नसतं . एखाद्या बाईन तिचा नवरा गमावला म्हणून ती लगेच विधवा झाली किंवा गळ्यात मंगळ सूत्र घातलं म्हणून ती फार पतिव्रता झाली हे सगळे झूटं आहे. या आपण निर्माण केलेल्या कल्पना आहेत. रेवतीचा नवरा कोण होता हे माहित आहे तुला?
“ हो डॉक्टर. अपघातात गेला ना?
“ हो . पण करोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करून बऱ्याच लोकांचे जीव वाचवले. म्हणजे, अनेक स्त्रियांना विधवा होण्यापासून वाचवले. त्या बाईची विधवा म्हणून हेटाळणी करायची?
“ नाही. पण तू फार टोकाची भूमिका घेती आहेस असं वाटतं. तू जनजागृती साठी काही तरी करत असतेस हे माहित आहे मला. पण म्हणून ते एका रात्रीत हे चित्र बदलू शकशील?”
“ नक्कीच नाही. या अफाट विश्वात माझ्या सारख्या नगण्य बाईनं काही करून दाखवावं इतकी माझी कुवत नाही. आपल्या आयुष्याचं आभाळ एवढसं असतं सक्षम्य. पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे?”
“काहीच हरकत नाही. पण होणारा मनस्ताप सहन करण्याची आपली कुवत नाही. त्यापेक्षा जे करतायत त्यांना पाठींबा द्यावा. असे प्रयन्त कुणीतरी करत असतेच कि. परवा ती पेपर मध्ये बातमी वाचली ना विधवा प्रथा बंद झाली पाहिजे वगैरे.
“नक्कीच ते कौतुकास्पद आहे. पण स्वातंत्र्या नंतर हि विधवा प्रथा होतीच आपल्या समाजात यालाच माझी हरकत आहे. आज स्त्री स्वतंत्र आहे, बाई स्वतंत्र आहे तरी नवरा मेल्यावर तुम्ही तिच्या बांगड्या फोडायच्या गळ्यातील मंगळसूत्र काढायचं , पायातली जोडवी काढायची. हे काय आहे? आणि बायको गेली तर काय तिच्या दु:खाच्या निमित्त्ताने तुम्ही पुरुष मात्र दारू ढोसणार?”
“ पण स्नेहल, मला वाटतं हे सामाजिक सुधारणेपेक्षा व्यक्तीनं स्वत: सुधारण्याचा विषय आहे. तुम्ही प्रथा बंद म्हणून काय होईल? व्यक्तीच्या मनात येणारे विचार नाहीसे व्हायला पाहिजेत. आणि ते स्वत: ती व्यक्तीच करू शकेल.
“हो. बरोबर आहे तुझं . पण इतकं म्हणून आपली जबाबदारी संपणार नाही. दुसऱ्याने काहीतरी करावे आणि आपण त्याचे कौतुक करावे हे मला मान्य नाही. आपण सुद्धा आपल्या एवढयाशा आभाळात प्रयन्त करत राहायचे आणि होईल तितकी जनजागृती करायची. मग कधी तरी केव्हातरी बंदिस्त विचारांच दार उघडेल आणि प्रकाश दिसू लागेल.”
सक्षम्यने कौतुकाने आपल्या पत्नीकडे बघितले. आणि बायकोने नेहमीप्रमणे हरवले याची नजरेनेच कबुली त्याने दिली.
“पण तू आता पुढची सुधारणा कुठली करणार आहेस ?” सक्षम्यने मुद्दामच तिला डिवचण्यासाठी विचारले.
“ तुझ्या सारख्या बुरसटलेल्या विचारांच्या पुरुषांना मी वठणीवर आणणार आहे” दोघेही हसले
“स्नेहल, उद्या रेवतीची समजूत काढ. तिच्या भावना दुखावू नकोस.”
“ हो उद्या सकाळीच जाईन मी तिच्याकडे”
सक्षम्य ने दीर्घ जांभई दिली. स्नेहल काय समजायचे ते समजली. मघापासून त्या FLAT मध्ये तेवत असणारे दिवे आता शांत झाले होते.

रात्रीचे अकरा वाजले होते. रेवतीला झोप लागत नव्हती. ती अद्यापहि अस्वस्थच होती. सौरभच्या आठवणी, तो नसताना तिने काढलेले एकाकीपण, आर्थिक ओढाताण आणि आजचा हा प्रसंग. स्नेहलचा स्वभाव तिला माहिती होता. आपला अपमान व्हावा म्हणून ती काही करेल असं वाटतं नाही. आपणच तिला समजून घ्यायला कमी पडलो. आपलीच चूक झाली. तिने आपल्या कपाळावर कुंकू लावले आणि बाकी बायका हसल्या म्हणून आपल्याला इतका का राग आला ? एक छोटी घटना म्हणून सोडून देता आले असते.
आणि सौरभ गेल्यावर आपण तरी इतके दुबळे का झालो ? नवरा काय कुणाचा गेला नाही ? म्हणून जगाचे व्यवहार काय बंद पडतात का ? सौरभ किती पोझीटीव्ह होता आपण तसेच राहायला पाहिजे. हे दुबळेपण मी सोडून द्यायला हवे. पण हे एकाकीपण ! आपण एकटे नाहीच आहोत. सौरभचे विचार आपल्याबरोबर आहेत. तीच आपली ताकद आहे. रात्री उशिरा तिला केव्हातरी झोप लागली.
टिंग टिंग ट्रिंग
सकाळ झाली होती. स्नेहल आणि सक्षम्य रेवतीच्या FLATची बेल पुन्हा पुन्हा दाबत होते. “ किती वेळ झोपली आहे रेवती अजुनी ?” स्नेहल स्वत:शी पुटपुटत होती. हिने काही ! बापरे! पण नको तसं काही. सक्षम सुद्धा सारखी रेवती रेवती करून हाक मारत होता.
बऱ्याच वेळानंतर रेवतीने दारं उघडलं. स्नेहल आणि सक्षम्य तिच्याकडे पाहत राहिले. आज ती नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. तिच्या कपाळावर कुंकू होतं, गळ्यात मंगळसुत्र आणि चेहऱ्यावर स्मित होत. स्नेहल तिच्याकडे बघून हसली. दोघींनी एकमेकांना समाधानाने आलिंगन दिलं आणि सक्षम्य कौतुकाने त्यांच्याकडे बघत राहीला.

सतीश कुलकर्णी
९९६०७९६०१९

Group content visibility: 
Use group defaults