काल दैववशात एका इस्पितळात तपासण्यांसाठी जावं लागलं. ज्या विशेषज्ञाकडे आमची भेट होती त्याच्या दारासमोर ही भली मोठी लाईन होती. मग तिथेच उभं राहून मोबाईलचा खुराक चालला होता. कंटाळा आला तरी आमचा नंबर काही येईना. मग मोबाईल मधली मान वर करून आसपासचा अंदाज घेतला. बरीच मानवसदृश मंडळी होती की! समोरच दोन लिफ्टा होत्या...
ती हॉस्पिटलवाली लय भारी डोक्याची लोकं हां! तुम्हाला खालती जायचंय? तर अधोदिशादर्शक बटण दाबा, शष्प काही होणार नाही. दिवे लागत नाहीत, तो बाण पेटत नाही, काही नाही. दहा वेळा दाबा, नच्छो. मग तुमचं लक्ष जातं तिथल्या पाटीकडे. खाली जाण्यासाठी जिना वापरा! म्हणजे लिफ्ट खाली जाताना थांबत नाही का? थांबते. पण तुम्हाला हवी म्हणून नाही तर इतर वर येणाऱ्या किंवा खाली जाणाऱ्या लोकांना तुमच्या मजल्यावर उतरायचे आहे म्हणून! बऱ्याच वेळा लोकं वाट पहातात, पहातात, आणि मग जिना पकडतात! आहे की नै शक्कल!
आता याचाच दुसरा प्रकार. ही लिफ्ट ग्राऊंड फ्लोअरवरून निघताना परत एकदा थांबते आणि दरवाजा उघडतो. म्हणजे बघा हां, मी लिफ्टमधे शिरलो आणि समजा पाचव्या मजल्याचं बटण दाबले. दरवाजा पूर्ण बंद होतो. आणि मग पुन्हा उघडतो, आपोआप. जर त्या दहा सेकंदात आणखी कुणी वरच्या मजल्यावर जाणारा इसम असेल तर आता तो लिफ्टमधे चढतो ना! म्हणजे एक खेप कदाचित वाचली, आणि लिफ्टच्या क्षमतेचा अधिक वा पुरेपूर वापर! पण जर पहिल्यांदा दरवाजा बंद होता होता कुणी हात घालून वा बटण दाबून ती लिफ्ट थांबवली, तर मात्र हा डबल डान्स होतं नाही! लय डोकॅलिटी!
तिथे लोकांचं लिफ्टबरोबर जो झगडा चालायचा तो पाहून एक फारच धमाल प्रश्न पडला आहे बरं का. म्हणजे धमाल वागतात लोकं. ये रहा आपके स्क्रीनवर सवाल...
तुम्ही एका उंच इमारतीच्या तळमजल्यावर पोहोचता. इमारतीला लिफ्ट आहे. एक का, दोन-चार आहेत. पण जागेवर एकही नाही. सगळे इंडिकेटर दाखवताहेत की लिफ्ट वरच्या कुठल्याशा मजल्यावर आहेत. काही वरती जाताहेत, तर काही खालती येताहेत. तुम्हाला वरच्या कुठल्याशा मजल्यावर जायचे आहे. आता तुम्ही एका लिफ्टच्या दारासमोर उभे रहाता. दोन बटणं आहेत. एकावर ऊर्ध्वदिशादर्शक बाण अशी खूण आहे, आणि दुसऱ्यावर अधोदिशादर्शक बाण. तुम्ही कुठलं बटण वापराल?!
१. ऊर्ध्वदिशादर्शक
२. अधोदिशादर्शक
३. दोन्ही
४. एकही नाही.
५. वरील पैकी कोणतेच नाही (जिन्यानं जाईन!)
तुमचं सोडा, तुम्ही लय मोठी लोकं. इंग्लंडामेरिकेत, झालंच तर मुंबैपुण्याला, लय मोठ्या पदावर, (लय मोठ्या पगारावर!) लय मोठ्या बिड्लिंगात कामं करता. हे असले सवाल तुम्हाला पडतच नैत. पण आमच्यासारखे पौडात्सून आलेले पावने लिफ्ट समोर दिसले की तुमची यक भिवै वर चढते. मंग तुम्ही पघता की आम्ही लोकं लफडा नको म्हनून दोनी बटनं दाबतो, वर अन् खाली! काय की, लिफ्ट थांबली की इच्यारायचं की वरती जातीये का खाल्ती. मंग तं तुमचा पेशन्स संपतो. चिडक्या आवाजात तुमी इच्यारता, "कुठे जायचंय तुम्हाला?"
"ते पोटाचे डाकटर हायेत त्यांच्याकडं"
"अहो पण, कितव्या मजल्यावर"
कारभारीन मंथे "काय ते, साव्या मजल्यावर" अन् मला वाटतं "पाचव्या". मनातल्या मनात मनात तुमी कपाळावर हात मारून घेता.
"अहो, मग ते खाली जायचं बटण कशाला दाबलं? तुम्हाला पार्किंग मध्ये नाही ना जायचे?" तुमच्या शब्दांत तुच्छता ओसंडून व्हात असते.
आता आम्ही पाचव्या का साव्व्या माळ्यावर असतो अन् खाली जायचं असतं. मी बघताव लिफ्ट कुठंशी आहे? ती दिसते तिसऱ्या मजल्यावर. मंग मी वाईच तिला वरती बोलावतो. मंजे वर जायाचं बटन दाबतो. लिफ्ट येते अन थांबते. दरवाजा उघडतो तर तुमी आत! कुटं चाललीया लिफ्ट असं मी पघा इच्यारनार, तवाच तुमच्या तोंडूनशी बाय्हेर पडतं, अहो खालती जाण्याचं बटण दाबा. वरती जायचंय का तुम्हाला... तुमची सरबत्ती संपेस्तवर लिफ्टचं दार बंदबी होतंय बघा...
लिफ्ट उतराया लागते, अन् अचानक दोन नंबरच्या माळ्यावर थांबती. कोन बी उतरत नाय. कोनबी चडत नाय. समदे समजून जातात: हे पौडास्नं आलेलं पावनं, ह्यानच विनाकारन हे बटन दाबलं आसल.
बराबर बोलतू का नै मी?!
ज्यांना लिफ्ट वापरायची सवय नाही (म्हणजे गेलाबाजार ९०% पुणेकर) ते लिफ्ट 'बोलावतात'.
बघा. आपण रिक्षा 'बोलावतो' आणि मग सांगतो, "बंडगार्डन". स्वच्छ नकार देतो तो रिक्षावाला. (पुणेरी अनुभव सांगतोय हां! गैरसमज नको) "मुजोर... आरटीओ... तक्रार..." असे तुटक विचार तुमच्या मनात येतात, अन् विरतात. ही नकारघंटा ऐकून तुमचा मुखभंग झालेला असतो. दोनचार रिक्षावाले तुम्हाला हात दाखवताना बघून न बघितल्या सारखं करत निघून जातात. पुढचा एक रिक्षावाला तुमचा हात बघून थांबल्यासारखं करतो. तुम्ही काचकुचतच विचारता, "बंडगार्डनला येणार का?" तो न थांबल्या सारखा करत निघून जातो. नंतरचा रिक्षावाला (नशिबानं) बिहारी असतो, किंवा तत्सम. तो म्हणतो "बैठो, कैसे जाना बताव..." आणि तुम्हाला रिक्षा मिळते!
पण तुमची नांगी अशी काही मोडलेली असते, की त्या बंडगार्डनच्या इमारतीत लिफ्ट वापरायची असेल तरी तुम्ही - बोलावू लिफ्ट का नको? जिने चढतच वरती जायचं का? इतका तुमचा आत्मविश्वास डळमळीत झालेला असतो!
ह्या असल्या विदारक अनुभवांतून आपण एवढे नामोहरम झालेले असतो की, "ये गं ये गं लिफ्ट बाई... मला वरती घेऊनी जाई" अशी प्रार्थना करतो, विनंती करतो! आणि म्हणून तिला बोलवायला - ती वरती आहे ना - अधोदिशादर्शक बाण असलेलं बटण दाबतो! पण त्याचा अर्थ एकदम उलटा होतो. ही बटणं जगभर सारखीच वागतात. जगभर लोकं लिफ्टला आज्ञा देतात, 'हेय यू, मला वरती जायचे आहे, वरती!' त्यामुळे ते झाडून सगळे ऊर्ध्वदिशादर्शक बटण दाबतील! लिफ्ट कुठे का असेना, मेरेकू उपर जाने का हय, ज्यल्दी. म्हणजे तुम्हाला कुठे जायचंय ते सांगा. मग लिफ्ट कुठून कशी आणायची ते लिफ्ट बघेल ना!
आता समजा या लिफ्टमध्ये युनिफॉर्म घातलेला लिफ्टमन आहे. कमी ठिकाणी असतात पण असतात. मग मात्र माझ्यात मर्दमराठा संचारतो, आणि मी त्याला फर्मान सोडतो, "फिफ्थ फ्लोअर", आणि पुस्ती जोडतो "पांचवा माला". हा इसम आपल्यापेक्षा 'खालच्या दर्जाचा' आहे हे मला वेगळं सांगावं लागतं नाही, कारण तो तुमच्या सेवेसाठी आहे ना, त्याच्या मर्जीचा मालक नाही, रिक्षेवाल्यासारखा!
आणि माझ्यासारख्या सराईतालाही लिफ्ट हा जरा तिढाच मामला वाटतो! नाही तिथे वारंवार काशी घालत असते...
मगाशी सांगितलं ना तशा त्या फॉयरमध्ये (च्यामारी, आमाला काय विंग्रजी येत नाय काय?) लिफ्टबॅंक असेल ना, तर भल्ला बवाल होऊन रायतो. आपण एका लिफ्टसमोरचं बटण दाबतो. लाईट लागतो. थोड्या वेळानं टिंग करून आवाज येतो, आणि बटण विझतं! मायला, लिफ्ट नै आली नं हे बटन काऊन बंद झालं बापा? मग तुम्ही "घालीन लोटांगण" सारखी एक स्वतःलाच प्रदक्षिणा घालता. तिकडच्या कोपऱ्यातली लिफ्ट आली असते. "हात्तेच्या.." म्हणत तुम्ही पाटलोण सावरत तिकडं धावता, तोवर ती बंद व्हायच्या घाईला आली असते! तुम्ही सायना नेहवालच्या चपळाईने बंद होऊ पहाणाऱ्या दरवाज्यात हात घालता. बंद व्हायला सहा इंच राहिलेला दरवाजा आता हळूहळू तीन फूट उघडतो. आतल्या अक्कडबाज मिशावाल्या कर्नलसाहेब (रि) यांच्या मिशीचे केस त्यांच्या अजस्र नक्रांतून बाहेर पडणाऱ्या उष्ण फूत्कारांनी फुरफुरतात. त्यांच्या नासिकाग्रावर लालिमा फुलतो. "ऐसे हाथ डालोगे तो एक दिन हाथ कट जायेगा." अशी शापवाणी उच्चारून ते आपला निषेध व्यक्त करतात.
हे बरं, असं वाटतं जेव्हा लिफ्टबॅंक नसते तर प्रत्येक लिफ्ट आपापली चालत असते. मग मेरी गो राऊंडचा खेळ चालतो. ती आली, ती आली, म्हणत सगळा जनसमुदाय तिकडे धावतो, तर तुम्ही सोडून सगळ्यांना जागा मिळते. तुम्ही दोन पावलं मागे येऊन बघता तर आणखी एक लिफ्ट येऊन, भरून चालली असते. आता सगळ्या लिफ्टा वरती वा खालती धावत असतात, तुम्हाला सोडून! आख्ख्या मजल्यावर फक्त तुम्हीच शिल्लक राहिले असता. चिडून तुम्ही सगळ्या लिफ्टांचे खालती आणि वरती जाण्याची बटणं दाबता, कुटील हास्य करत मागे वळता, तर एक टिपटॉप ललना, तुमच्या ह्या गर्हणीय कृत्याची साक्षीदार असते. तिच्या एका बर्फाळ नेत्रकटाक्षात तुमचं पाणीपाणी होऊन खजिल होणे या भावनेचा कटू अनुभव येतो. भलत्या दिशेला जाणारी प्रत्येक लिफ्ट त्या मजल्यावर थांबल्यावर तुम्हाला मरणप्राय वेदना होतात! न बघताही तुमच्या पाठीत त्या ललनेची नजर गिरमिटासारखी घरं पाडत असते! हे उद्वाहना, मला ऊर्ध्वगमनाचा मार्ग दाखव!
लिफ्टमध्ये गेल्यावर शेजारी उभी नवथर तरुणी आरश्यात बघून आपल्या अवताराला आवरत असते. आता तिच्याकडे बघायचे का? का नाही? नाही? का नाही? या गहन प्रश्नानं तुम्ही ग्रस्त होता. तसं बघणं अशिष्ट वाटतं. समोर बघण्याची हिंमत नसते कारण समोर ती, ती टिपटॉप ललना, ती असते! लिफ्टमध्ये कुणा स्विग्गी वाल्याच्या पार्सलमधला कांदा-लसणाचा वास घमघमत असतो. छताला नजर लावावी तो आपला मजला येऊन गेल्याचा पत्ता लागत नाही! बाकीचे याला काय झाले अशा नजरेने बघतात. काही विचारूच नका!
लिफ्टमध्ये गेल्यावर तुम्हाला देहभान येतं. म्हणजे बघा, धावत आला असाल तर आता घाम सुटेल. किंवा पाऊस असेल तर तुमची ओली छत्री शेजारी उभ्या असलेल्या इसमाच्या पायावर धार धरते. किंवा अचानक आप्पा भिंगार्ड्यासारखी त्रैलोक्य हादरवणारी 'हिक ठ्यॉंऽऽश' अशी गगनभेदी शिंक फुटते. किंवा इतर शारिरीक आपदा येतात... जाऊ दे, कशाला आणखी डिटेल्स द्यायचे?!
जुनाट लिफ्ट असेल तर वेगळाच वांदा असतो. तुम्ही बाहेरचं ग्रिल बंद करता. मग आतलं ग्रिल बंद करता. आता लिफ्ट चालू होणं अपेक्षित असतं. एक सेकंद जातो. दोन सेकंद जातात...
घडत काहीच नाही. आयला, लागलं की नाही? या विचारानं अस्वस्थ होऊन तुम्ही घाबरत घाबरत आतल्या जाळीतून हात घालून बाहेरच्या जाळीला लोटू पहाता तोच... खडाड् असा आवाज करत ती यंत्रणा घरघरू लागते. बुलेट स्पीडात हात ओढून घेतला जातो की नाही? खरी हाथ कटण्याची भिती या वेळी वाटते.
आमच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आडव्या जातात तर मग ही उभी जाणारी लिफ्ट का नाही आडवी जाणार? एक कथा सांगतो...
असाच मी एका पंचतारांकित हॉटेलात गेलो होतो. कुणा श्रेष्ठींच्या स्वुईटमध्ये.. आता सूट म्हटलं तर तुम्ही मला त्यांच्या कोटात घालणार, आणि रूम म्हटलं तर श्रेष्ठींच्या शानेत बाधा येणार, म्हणून असा हा अमेरिकन ॲक्सेंटचा शब्द वापरला हो! तर त्यांच्या स्वुईटमध्ये गेष्ट म्हणून जाणार होतो. अशा ठिकाणी जायचं म्हणजे माझं हाय लो होतं आणि लो हाय होतं, ब्लडप्रेशर. आपण टॅक्सीतून उतरतो. सुट्ट्यावरून हुज्जत नको म्हणून भरपूर सुट्टे घेऊनच निघालो असतो. ते पैसे चुकते करून, आणि बाहेरच्या पार्किंगवाल्यांच्या नजरा चुकवून सिक्युरिटीच्या कमानीतून पार होतो. तोच समोर एक्स किंग ऑफ रुरिटानिया असा साडेसहा फुटी रुबाबदार दारवान तुमच्यासाठी दरवाजा उघडतो. त्यानं आपल्यासाठी दरवाजा उघडला या भावनेनं मी अर्धा लाजेनं मरतो. कारण नसताना पावलं अडखळतात. तोच मागून येणारे दोन सूट, एक झुळझुळीत साडी आणि एक पॅंटसूट तुम्हाला डावी टाकून भारी सुगंधाच्या भपकार्यात, खळाळत्या हास्याचे फवारे उडवत, टेसात त्या उघड्या दरवाज्यातून आत शिरतात. मी माझ्याच मनाचं समाधान करून घेतो, आपल्यासाठी नव्हताच उघडला तो दरवाजा. आपली तगमग पाहून, खरं तर दुर्लक्ष करून, तो भूतपूर्व राजा मात्र माझ्या तोंडावर दरवाजा बंद करतो! मी, शिरस्त्यानुसार, अगदीच बावचळून जातो. तेवढ्यात एक पोर्टर सामानाची गाडी ढकलत शेजारच्या छोट्या दरवाजातून आत जात असतो. मी हायसं वाटून त्याच्या मागे घुसतो. तर तो वाईट्ट चेहेरा करून सांगतो, सर उधरसे जाव! पडलेला चेहेरा उचलायला मला जरा वेळ लागतो. कसाबसा मी भू.पू. राजेसाहेबांच्या दिशेने रांगत रांगत जातो. तिथे राजेसाहेब माझ्याकडे न बघता दरवाजा उघडतात. एखाद्या उंदरासारखा मी त्या बिळातून सटकतो. त्याच्या अफजलखानी उंची आणि रुंदीसमोर समोर माझी पाच फुटी कुडी म्हणजे मी खरोखरच चुव्हाच होतो. पण या वारानं खच्चीकरण झाल्यानंतर मी जवळपास सरपटत जाऊनच रिसेप्शनवर वर्दी देतो. यथावकाश आमंत्रण आल्यावर रिसेप्शनवरची बाई लिफ्टकडे निर्देश करते. तिकडे जाऊन जमेल ती बटनं दाबली तरी लिफ्टबाई काही हलायला तयार नसते. उरलीसुरली इज्जत शेवटी लिफ्टच्या पायी जाते! मग लोळागोळा झालेल्या इभ्रतीनं मी पुन्हा एकदा रिसेप्शनिस्ट बाईंची मनधरणी करतो. तेंव्हा ती प्रसन्न होऊन एका कॉन्सिअर्जला इशारा करते. त्याच्याकडच्या जादुई कार्डनं मात्र लिफ्टबाईच्या शिडात वारा भरतो अन ती सरासरा मजले कापू लागते!
नवीनात नवीन गगनचुंबी इमारतींमध्ये लिफ्ट नसतात, एलेव्हेटर्स असतात. त्यांना बटणं नसतात, आयपॅडसारखा युझर कन्सोल असतो. हे प्रकर्ण असलेल्या इमारतीत मी एकटा जातच नाही!
हे कमी की काय म्हणून आता आमच्या नव्यानं बांधलेल्या (रिडेव्हलपमेंट हो) अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये तीन लेव्हलचं पार्किंग आलंय. इथे आली का पुन्हा लिफ्ट! याला पुन्हा तो उपरनिर्दिष्ट, नतद्रष्ट कन्सोल आहे! मी चारचाकी गाडीच विकून टाकण्याच्या विचारात आहे!
तो सामींचा अदनान मौलाला लिफ्ट करा दे म्हणाला काय, की त्याच्या तकदीरचा ताला खुल गया. त्याला वा ऐस्यावैस्याला जे द्यायचंय ते त्या मौलानं द्यावं. पण हे लिफ्टचं गणित जर मला हरवक्त सोडवून दिलं ना तर त्या मौलाची मोलाची मदत होईल हो!
प्रत्येक सीन अनुभवत गेले
प्रत्येक सीन अनुभवत गेले
नवीनात नवीन गगनचुंबी
नवीनात नवीन गगनचुंबी इमारतींमध्ये लिफ्ट नसतात, एलेव्हेटर्स असतात. त्यांना बटणं नसतात, आयपॅडसारखा युझर कन्सोल असतो.....
हा प्रकार अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला सर्कलजवळ (स्वामी समर्थांच्या मठाजवळ) असलेल्या Aston बिल्डिंगमध्ये (ज्यात Suburban Diagnostics चे head office आहे) आहे. प्रत्येक मजल्यावर एक tablet सारखा टच स्क्रीन असतो, त्यावर आपल्याला कोणत्या मजल्यावर जायचे तो मजला निवडायचा. मग त्या दिशेने जाणारी सर्वात जवळची लिफ्ट कोणती हे पाहून system आपल्याला A, B, C, D पैकी एक लिफ्ट 'assign' करते, त्या लिफ्टमध्ये जायचे. लिफ्टच्या आत मजल्यांची बटणे नसतात, फक्त दरवाजा उघडण्यासाठी / (लगेच) बंद करण्यासाठी आणि Emergency अशी मोजकीच बटणे असतात!
हो आमच्या ex हापिसात होती अशी
हो आमच्या ex हापिसात होती अशी lift
जबराट लिहिलंय! मजा आली.
जबराट लिहिलंय! मजा आली.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लेख .पण मधली गावरा न
छान लेख .पण मधली गावरा न भाषा बळंच वापरली आहे.
जमून आलाय लेख. सगळे सामी
जमून आलाय लेख. सगळे सामी कव्हर झाले
वर आणि खाली जाण्यासाठीची सर्व बटणे दाबणाऱ्या लोकांचा राग मी सुद्धा करतो, घाईच्या वेळी प्रत्येक मजल्यावर उगाच थांबत थबकत जावे लागते
बाकी लिफ्ट, कमोड, सार्वजनिक नळ, कचराकुंड्या ह्या वस्तू आपल्या जीवनात येऊन अनेक दशकं झालीत तरी त्यांना योग्यप्रकारे वापरणे हजारो-लाखो लोकांना जमत नाही. त्यासाठी सक्तीचे ट्रेनिंग असावे असे फार वाटते
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.