नोट

Submitted by बिपिनसांगळे on 17 July, 2024 - 10:44

नोट

रात्र झालेली . बाहेर पावसाला उजाडलेलं .
अंधाराच्या आडोशाने रात्र मनसोक्त नहात होती. तिच्या आठवणीत तोही मनसोक्त नहात होता . माहौलच तसा होता . जीवघेणा !
हवेत पावसाचा गारवा भरून राहिलेला . घरातही . गोधडीच्या आतही . तो त्याच्या बेडवर होता . अंधारात . टक्क जागा . गोधडीत गुरफटून . कुशीमध्ये उशी घेऊन . बाहेरच्या सरी कधी हळुवार तर कधी जोरदार . मनातही तसंच .
किती आठवणी ...
त्याला कॉलेजमध्ये असताना थिएटरचं वेड लागलेलं .खरं तर तो त्याचा प्रांत नव्हता ; पण त्या वेड्या वयातलं असतं काही वेड .
तिथे त्याला ती भेटली होती .
तो तिच्याकडे ओढला गेला. त्यावेळेस तिची सुरुवात होती. त्यामुळे ती हवेत. हा तर नवाच. हा आपला सतत तिच्या अवतीभवती .एके दिवशी त्याने त्याचं ,मन तिच्याजवळ मोकळं केलं. ती काही बोलली नाही ; पण तिने तिचे हसरे डोळे आश्चर्याने उडवले . त्या नजरेत अन हास्यात घायाळ करण्याचं सामर्थ्य होतं .
ती त्याच्याशी प्रेमाने बोलू लागली खरी.
एके दिवशी ती म्हणाली ,’अरे, कधी एखादं गिफ्ट द्यायचं असतं रे जीएफला !’
‘ ओह सॉरी ! माझ्या लक्षातच आलं नाही गं. काय देऊ तुला ? ‘असं म्हणत त्या सरळ पोराने पाकिटातून दोन हजाराची एक नोट काढली आणि तिला दिली .
‘हे माझं गिफ्ट ! पण जपून ठेव, खर्च करू नकोस ... जपून ठेवशील ?’
ते गिफ्ट अन त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिने डोक्यालाच हात लावला . पण तिने ती नोट घेतली,
पुढे तिच्या अभिनयाची चर्चा होऊ लागली, तसं तिने याला अलगद बाजूला केलं आणि याने थिएटरला .
आठवणींचा सिनेमा पाहत त्याने डोळे मिटले.
झोपेने त्याला आईच्या मायेने कुशीत घेतलं .तेव्हा बाहेर सरी मंदावून अंगाई म्हणत होत्या.
-------
त्यानंतर काही दिवस मध्ये गेले . त्याला तिची आठवण रोजच असायची . पण अलीकडे प्रकर्षाने . त्याने बालगंधर्वला चक्कर टाकायची ठरवली . तिथे नाटकवाल्या मंडळींची चक्कर असतेच . पंढरीच ती त्यांची .
भेटली तर भेटली...बाकी ती त्याच्या मेसेजला रिप्लायसुद्धा करत नसे...
त्या दिवशी पाऊस उघडला होता . जंगली महाराज रस्ता फुललेला होता .संध्याकाळ भरात आलेली .
तो बालगंधर्वच्या कट्ट्यावर पोचला . योगायोगाने त्यादिवशी ती तिथे आलेली होती .
ती भेटली याला .तिने ओळखही दाखवली याला. पण तिच्या नजरेत ‘ती ‘ओळख नव्हती.
' कॉफी घेऊ या ? ‘ याने विचारलं .
‘येस्स !चालेल ,’ ती म्हणाली .
ते दोघे मागे कॅफेटेरियामध्ये गेले.
ती बोलत होती - नवीन नाटक ,भूमिका , तयारी ,धावपळ अन कौतुक . तिने, तू कसा आहेस ? एवढंही विचारलं नाही .
तिला थांबवण्यासाठी त्याने मध्येच विचारलं , ' मी दिलेली ती दोन हजाराची नोट ठेवली आहेस का गं तू ? .. जपून ? '
'येडायंस का तू ? तिचा काय उपयोग ? नोटबंदीमध्ये ती नोट बँकेत भरली मी ! ' तिने आताही तिचे डोळे उडवले होते ; पण त्यामध्ये ती आधीची कातिल अदा नव्हती .
तिची बडबड संपल्यावर ती निघाली . तोही निघाला .
निर्जीव नोटेला मन कुठलं ? नाही तर नोटबंदी केल्यावर त्या नोटेला किती वाईट वाटलं असतं .
जायबंदी मनाने तो पाय ओढत चालू लागला .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अर्र! Happy मला वाटलं ती नोट इतक्या जोरात विसरली असेल की नोटबंदीत परत करायची राहून गेली असेल. आणि मग तिला नोट जपण्यावाचून पर्यायच राहिला नसेल Proud

छान लिहिले आहे.

दोन हजाराची नोट कोणी गिफ्ट देत असेल तर कसे टिकणार नाते.. कोणी दहा हजार देणारा भेटला की तुटणारच Happy

छान

ज्या येड्याला गिफ्ट म्हणून २ हजार नोट द्यायचं सुचतंय (ते पण तिने सांगितल्यावर) आणि नातं टिकवून ही नाही ठेवता येत, त्याच्यासाठी अशी प्रॅक्टिकल जीएफ योग्यच आहे Happy

@बन्या, तुम्हीच टाका की मग एखादी दर्जेदार कथा!

एकाच वेळी माबोवर २००० च्या नोटेवर दोन कथा.. गजब योगायोग हैं.

कथा एकदम साधी सिंपल..
नायकाने व्हायला हवे प्रॅक्टिकल !!
(सॉरी ववि इफेक्ट)