मानस - वारी श्रीमहाराजांसोबत (भाग २)

Submitted by मी_आर्या on 17 July, 2024 - 04:34

जय श्रीराम!
मानस - वारी श्रीमहाराजांसोबत (भाग २)
आषाढी एकादशीच्या भल्या पहाटेच २ वाजता श्रीमहाराज चंद्रभागेवर स्नान करून आईसाहेबांसहित विठ्ठल मंदिरात दाखल झालेले आहेत. श्रीमहाराज महाद्वारावर संत नामदेवांच्या पायरीवर डोके टेकतात.
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती ।।
नंतर महाराज बाजूलाच असलेल्या चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराज मंदिरात प्रवेशतात. बरोबर श्रींचे कौन्सिल ही आहे. विठू माऊलीचे मंदिर आज आषाढी निमित्त तुलसीदलांनी विशेष सजवण्यात आले आहे. बडव्यांनी सगळ्या पूजेची आधीच मांडामांड करून ठेवली आहे. जरीचा फेटा आणि गर्द भगव्या रंगाची कफनी वर जरीचे उपरणे परिधान केलेले श्रीमहाराज आता सपत्नीक विठुरायाच्या महापूजेला उभे राहिले आहेत. जणू काही विठूमाऊली प्रत्यक्ष समोर उभी आहे या भावनेने महाराज विठूरायाची पूजा करतात. महाराजांना विठुरायाकडे पाहून प्रेमाचे भरते आले आहे. विठुरायाही डोळ्यातून अखंड प्रेमाची बरसात करत आहेत. सुरवातीला सप्तनद्यांच्या जलाने वेदांच्या मंत्रोच्चारात अभिषेक झाला.मग अत्यंत भक्तियुक्त अंत:करणाने वेदांच्या मंत्रोच्चारात नाना सुगंधी तेलाने विठ्ठलाचे मर्दन करण्यात येते. संपूर्ण गाभारा त्यामुळे सुगंधित झालेला आहे. यानंतर अत्यंत औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या सुगंधी उटण्याचे लेपन विठ्ठलाला करण्यात आले. या सुगंधी तेल आणि उटण्यामुळे पहाटेच्या या मंगलमय व वातावरणाला सुगंधाचा स्पर्श झाला आहे. त्यानंतर श्रीमहाराजांनी विठू माउलीला सप्तनद्यांच्या ऊन ऊन पाण्याने स्नान घातले आहे. यानंतर चांदीच्या दिव्य शंखातून देवाला दुग्धस्नान घालण्यात आले. दुधामुळे आता विठूरायाची मूर्ती निळीसावळी दिसू लागली आहे. यानंतर देवाला गंध पुष्प अर्पण करून देवाला दधि स्नान घालण्यात आले.
पहाटेच्या प्रहरी
हरी करतो न्याहारी
खातो हा लोण्याचा गोळा
हरी तुझा रंग दिसे सावळा

असे म्हणत विठुरायाला मुखाशी लोण्याचा गोळा लावण्यात येतो. आणि लोण्याची आरती करण्यात आली . त्यानंतर पंचामृतातील उर्वरित पदार्थ साजूक तुपाने स्नान, मधुपर्क म्हणजे मधाने स्नान घालण्यात आले. नंतर उसापासून तयार झालेली दिव्य शर्करा परमात्म्याच्या देहाला चोळण्यात येत आहे. हेच शर्करा स्नान. नंतर वैदिक मंत्राने पुरुष सूक्त, श्रीसूक्ताने या परब्रम्हाला अमृताभिषेक महाराजांनी केला आहे.
मूळचे हे सावळे रूप मनोहर आता वेगळीच झळाळी प्राप्त होऊन तेजाने तळपू लागले आहे. अनेक संतांना भुरळ घालणारे हे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे. श्रीमहाराज अत्यंत भक्तिभावाने विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवतात. पूजा सुरु होते. महाराज देवाला नवीन वस्त्र अर्पण करतात. नंतर रुक्मिणी मातेची महापूजा होते. उभयता रुक्मिणी मातेला साडी चोळी, खणानारळाने ओटी भरतात.
आता विठुरायाला पोषाख चढवण्यात येतो आहे. देवाला मरून रंगाची मखमली अंगी आणि पोपटी मखमली धोतर अशा पोशाखात नटलेल्या देवाच्या मस्तकी सोन्याचा हिरेजडित मुकुट, शिरपेच ,मोत्याचा तुरा, कानात मत्स्यजोड घालण्यात आले आहेत.
आणि गळ्यात काय काय घातले आहे बरं, विठूमाऊलीने? कंठी कौस्तुभ मणी, मग मोत्याची कंठी,सोन्याची तुळशीची माळ,मोठी बोरमाळ,
कंबरेला मारवाडी सोन्याचा करदोडा, पायात रत्नजडीत तोडे जोड आणि सोन्याचे पैंजण... आणि सर्वात महत्वाचे कपाळी चंदनाचे केशरमिश्रीत गंध लावण्यात आलेले आहे. अशा अनमोल अलंकारांनी विठुरायाचे साजरे रूप अतिशय खुलून दिसत आहे.
सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी चां प्रत्यय सर्वांनाच येत आहे.
रुक्मिणी मातेला भरजरी अंजिरी रंगाची नऊवारी साडी , त्यावर रूळ, पैंजण, चिंचपेटी, मोहरांची माळ, कंबरपट्टा, मोत्यांचे मंगळसूत्र, मोत्यांचा कंठ, सरी, बाजीराव गरसोळीचा त्याशिवाय, ठुशी, तन्मणी, तारामंडळ, मण्या मोत्यांच्या पाटल्या, सोन्या मोत्याची तारवड, मोत्यांची नथ, बाळ्या , सोन्याचे बाजूबंद असे 22 प्रकारचे हिरेजडित दागिने परिधान करण्यात आलेले आहेत. या सर्वांवर कळस म्हणजे कपाळी ठसठशीत लालजर्द कुंकू लावून माता अत्यंत देखणी दिसत आहे.
आता पहाटेचे साडेचार झाले आहेत. आणि ब्रम्हानंद बुवा काकड आरतीचे ताट तयार करून घेऊन येतात. श्रीमहाराज अत्यंत भक्तिभावाने विठ्ठलाची आरती करतात. आईसाहेब त्यांच्या हाताला हात लावतात.आईसाहेब आपल्या मन:चक्षूनी विठुरायाचे गोजिरे रूप न्याहाळत आहेत.
आरती होते आणि लोणी खडीसाखर प्रसाद दिला जातो. अश्या रीतीने हा नेत्रदीपक सोहळा पार पडतो. .

विठुरायाची नगरी आज आषाढी एकादशी निमित्ताने विशेष सजली आहे. जागोजागी पताका, स्वागत कक्ष आहेत.
आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥ जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपुर ॥ याचा प्रत्यय हे सर्व पाहून येतोय.
संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या आहेत. टाळ, मृदूंग, भजन कीर्तनाने अवघी विठूनगरी दुमदुमली आहे. विठूच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात विठुरायाच्या दर्शनाची आस स्पष्ट दिसत आहे. मंदिर संस्थानातर्फे रांगेतील भाविकांना साबुदाणा खिचडी आणि राजगिरा लाडूच्या प्रसादाचे वाटप होत आहे.
आता महाराज आपल्या मंडळींसहित नगर प्रदक्षिणेस निघाले आहेत. जागोजागी लोक त्यांना ओळखून त्यांच्या पायावर डोके ठेवत आहेत. महाराज प्रत्येकाची जातीने चौकशी करत आहेत. नगरप्रदक्षिणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वारासमोर अभंग आणि आरती होते. नंतर महाराजांची दिंडी चंद्रभागेच्या वाळवंटात येते. तिथे चंद्रभागेचे आरती करण्यात आली. त्यानंतर चंद्रभागेजवळ असणारे पुंडलिक मंदिरात श्रीमहाराज पुंडलिकाची आरती करतात. मग प्रदक्षिणा मार्गावर संत नामदेव महाराज मंदिर लागते. तिथे उभे राहून महाराज आणि बरोबरची मंडळी नामदेवांचा अभंग गातात. यानंतर येते ते ज्ञानेश्वर माउली मंदिर. इथे ज्ञानोबांचा अभंग गातात. या नंतर तुकोबांचे मंदिर लागते. त्यांच्या पालखीसमोर महाराज तुकोबांचा अभंग गातात. अशा रीतीने श्रीमहाराज आणि मंडळी नगरप्रदक्षिणा आटोपून श्रींच्या आज्ञेवरून अप्पासाहेब भडगावकरांनी बांधलेल्या राममंदिरात येतात. एव्हाना दुपारचे अडीच वाजले आहेत.
तिथे सर्वांसाठी एकादशीच्या फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रम्हानंद बुवांनी आपल्याबरोबर पोतेभर रताळे आणलेच होते. ती चुलीमध्ये भाजली जातात. पत्रावळ्या मांडल्या जातात. आणि फराळ होऊन मंडळी जप करत बसतात. काही थकली भागली वयस्क मंडळी इथे विसावा घेतात. थोडा विसावा घेऊन महाराज संध्याकाळी पुन्हा विठ्ठल मंदिराकडे निघतात. दर्शनाची अजूनही रांग आहेच. विठ्ठल मंदिरामध्ये संध्याकाळची आरती होते. दूध फलाहार असे घेऊन श्रीमहाराज कीर्तनाला उभे राहतात.
आज श्रींच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज चढले आहे. आवाजात मार्दव आहे. लोक जीवाचे कान करून महाराजांना ऐकत आहेत.
विठूमाऊलीच्या चेहर्यावरही विशेष प्रसन्नता दिसते आहे. उत्तरोत्तर कीर्तन रंगत जाते. 'जय जय राम कृष्ण हरी'चा गजर टिपेला पोहोचतो आहे.
ब्रम्हानंदबुवा सारखं विठोबाच्या उजव्या कोपऱ्यात बघत साश्रू नयनांनी हात जोडत आहेत. भूमीला वारंवार वंदन करत आहेत. हे भाऊसाहेबांच्या लक्षात येते. ते म्हणतात, "बुवा? काय झाले?"
अहो , काय सांगू भाऊसाहेब! बघा.. आज कीर्तनाला किती रंग चढला आहे. प्रत्यक्ष हे सावळे परब्रम्ह विटेवरून खाली उतरून महाराजांना आलिंगन देत आहे. त्यांच्यासोबत वारकरी फुगडी खेळत आहे. आणि महाराज? डोळे मिटलेल्या अवस्थेत... त्यांच्या तोंडून फक्त 'माउली माउली'... असा घोष सुरु आहे. महाराजांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या आहेत. आनंदाचा पूर त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे.
अहो, श्रींच्या कीर्तनाला आज प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले आहेत. ते पहा त्या कोपऱ्यात! ब्रह्मदेव आनंदाने डोलत आहेत.
एवढेच नव्हे,, तर प्रत्यक्ष तुकोबा, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, चोखोबा, निवृत्ती महाराज, सोपान देव, ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा, नरहरी महाराज, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई,... समस्त संतांची मांदियाळी इथे हजर दिसते आहे.
अहो अहो... एवढेच काय! ते बघा... दिंडी दरवाजात प्रत्यक्ष महादेवाची स्वारी आलेली दिसत आहेत. आणि त्यांच्या स्वागताला हे सावळे परब्रम्ह धावत निघाले आहे, आणि महाराज त्यांना.. "अरे मुकुंदा, अरे घननीळा.. अरे ईठूराया .. कुठे निघालास? कुंची सुटली ना! सांभाळून.. उपरणे पायात येईल.. डोक्यावरचा मुकुट पडतोय.. " असे म्हणत आहेत. एक सृष्टीचा पालनकर्ता, एक संहारक अशी ही भूवैकुंठावरील जगावेगळी हरी-हर भेट आज समस्त जन अनुभवत आहेत.
इकडे महादेवाला ही आनंदाचे भरते आले आहे. ते म्हणतात, "अहो विठुराया.. हा तुमचा सोहळा पाहून आम्हाला राहवले गेले नाही हो तिकडे कैलासावर. अद्वैती तो नसे समाधान.. अशी आमची अवस्था झाली. म्हणून धावत इकडे आलो".
विठुराया म्हणत आहेत,''अहो महादेवा.. कळवायचे तरी. आम्ही जातीने आपल्याला रथ पाठवला असता. द्वापारयुगात आम्ही लहान असताना तुम्ही आम्हाला भेटण्यास अधीर झाला होतात म्हणून साधूच्या वेशात गोकुळात भेटायला आला होतात. आणि आम्ही तुमच्या मिशा ओढल्या होत्या. आठवते आम्हाला! दोघेही खळाळुन हसतात. कडकडून मिठी मारतात. हा हृद्य सोहळा आज उपस्थित जन अनुभवत आहेत. इकडे " जय जय राम कृष्ण हरी" चां गजर टिपेला पोहचतो आहे. लोक बेभान होऊन नाचत आहेत. प्रत्येकाच्या बरोबर श्रीहरी फुगडी खेळतांना दिसत आहे. बाहेर वैष्णवांचा मेळा भरला आहे. "अवघी दुमदुमली पंढरी..." आकाशातून समस्त देवी देवता पुष्पवर्षाव करत आहेत. आपणही या आनंदाच्या सागरात डुंबत राहूया आणि इथेच थांबूया!
समाप्त!
जय श्रीराम!

इति मानस- वारी संपुर्णम!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीले आहेस.
>>>>>>द्वापारयुगात आम्ही लहान असताना तुम्ही आम्हाला भेटण्यास अधीर झाला होतात म्हणून साधूच्या वेशात गोकुळात भेटायला आला होतात.
हा संदर्भ नाही लागला.

आताची गर्दी बघता मानसवारीच शक्य आहे Happy

लेखातली विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांची जंत्री श्रेष्ठ ! पुन्हा पुन्हा वाचली.

… गोकुळात भेटायला आला होतात. हा संदर्भ नाही लागला….

शिवाच्या गोसावीरुपात नंदग्रामी जाण्याचा आणि शांडिल्य ऋषींनी रडक्या बालकृष्णाची दृष्ट काढण्याचा प्रसंग आहे बहुतेक.
लेखिका सांगतीलच.