मानस - वारी श्रीमहाराजांसोबत ( भाग -१)
जय श्रीराम!
आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की श्रीमहाराजांचे आजोबा लिंगोपंत दर एकादशीला पंढरपूरची वारी करायचे. महाराजांचे वडील रावजीबाबासुद्धा वारीला जात असत. तोच परिपाठ महाराजांनी सुरू ठेवला होता.
आज आपण महाराजांच्या सोबत मानस- वारी करणार आहोत.
महाराजांच्या आयुष्यातले अखेरचे वर्ष. पंढरपूरच्या बडव्यांचे वाद महाराजांनी सोडवले होते. तेव्हापासून त्यांच्यापैकी एक जण कधीपासून महाराजांना पंढरपुरास चलण्यास आग्रह करत होते. त्याप्रमाणे महाराज जून १९१३ मधे निघाले.
हाच धागा पकडून आता पुढे...
****
मानस - वारी ( भाग १)
स्थळ- गोंदवले थोरले राम मंदिर आवार
दिनांक - आषाढ शु.षष्ठी , १९१३
तसे पाहता आम्ही श्रीमहाराजांचे जिथे वास्तव्य होते त्या वाड्याच्या आजूबाजूच्या वाड्यातील मुली.. ७-८ वर्षाच्या.
महाराजांची कन्या शांता आमच्याच बरोबरीची होती. आम्ही रोज तिच्याबरोबर खेळायला महाराजांच्या वाड्याच्या मागच्या भागात जमत असू. रोज आमचा काचा काचा, टिपरी/ठीकरी, सागर गोट्या , लपंडाव असे खेळ रंगे. शांता पुढे ४ वर्षाची होऊन अल्पशा आजाराने गेली.
तरीही काही दिवसांनंतर आमचे खेळ सुरू झाले. आमचा सतत तिथे किलबिलाट असायचा.महाराज ही आमच्यात येऊन कधी कधी सागरगोट्या खेळायचे. कधी कधी मुलांमधे जाऊन विटीदांडू, सुर पारंब्या खेळायचे. विटीदांडू तर इतका सुरेख खेळायचे.
तर एकदा ज्येष्ठ शु.शष्ठीचा दिवस असेल. पंढरपूरचे बडव्यापैकी एक जण थोरले राम मंदिरात महाराजांना भेटायला आले होते.. बरीच मोठी चर्चा चालली. ते महाराजांना आग्रह करत होते," .. ते काही नाही यावर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा तुमच्या हस्तेच करायची.
महाराजांनी परोपरीने सांगून पाहिले की, "अहो, उलट आमच्या इथेच विठ्ठल रखुमाई प्रकट झाल्याने आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही इथेच करतो हा उत्सव. शिवाय पंढरपूर मार्गावर गोंदवले असल्याने ठिकठिकाणच्या दिंड्या इथे येतात. वारकऱ्यांना भोजन द्यायचे असते. अन् मी असेही दर एकादशीला वारी करतोच विठोबाची. हे महापुजेच लचांड कशाला! पण बडवे ऐकेनात. तसे त्यांनी सर्वांच्या सहीचे पत्र देखील बरोबर आणले होते. अखेर महाराजांनी रुकार दिला अन् स्वत:शीच पुटपुटले,"चला रामाची इच्छा हीच दिसते आहे. विठ्ठला ही शेवटची सेवा बरे का!!"
आणि निकट बसलेल्या सर्वांनाच गलबलून आले. महाराज अलीकडे असे सूचक बोलायला लागले होते.
महाराजांनी नंतर सर्वांना आपल्या पंक्तीला भोजनास बसवले. प्रसाद , पान सूपारी झाल्यावर ते निघाले म्हणून त्यांना निरोप देऊन महाराज राम मंदिराच्या दारात येऊन उभे राहिले आणि अचानक काही आठवल्यासारख त्यांना झालं, म्हणून महाराजांनी ब्रम्हानंद बुवांना हाक मारली. ' बुवा?"
आणि प्रवेशद्वार शाकाऱण्यासाठी त्यावर चढलेल्या बुवांनी कानावर हाक पडतक्षणीच ... क्षणाचाही विलंब न लावता महाराजांच्या पुढ्यात उडी घेतली.' जी महाराज" !
"अरे अरे, बुवा.. सांभाळून हो! इतकी घाई नव्हती". अस म्हणत महाराजांनी त्यांना जवळ घेतलं.
मग त्यांना हाताला धरून बसवत महाराज त्यांना म्हणाले,"बुवा, आजच्या बरोबर महिन्याला आषाढ शु.षष्ठी ला आपण पंढरपुरास प्रस्थान करणार आहोत बरं. विठुरायाचे बोलवणे आले आहे! कोण कोण आपल्याबरोबर येणार आहेत, बरोबर सामान काय घ्यायचं, गाड्या किती लागतील याच्या याद्या करायला लागा! "
बुवा त्यांच्यासमोर खाली मान घालून उभे होते. त्यांनी मानेनेच होकार दिला. अन् म्हणाले, "जी महाराज, लगेच करायला घेतो!"
"एकदा बुवांवर काम टाकले ना की काम पूर्ण होणार याची शाश्वती!" अस मनाशी पुटपुटत महाराज, "श्रीराम श्रीराम" म्हणत स्वस्थपणे कोचावर बसले. मी दारातून डोकावत होते. तर मला म्हणतात कसे," ए चिमणे, विठ्ठलाच्या वारीला यायचं ना पुढच्या महिन्यात. बाबांना सांग तुझ्या!" महाराजांनी सर्वांना येण्याच्या निमंत्रणाची पत्रे धाडली.
म्हणता म्हणता आषाढ शु.षष्ठी चा दिवस उजाडला. आणि जरा कुठे पावसाला उघडीप मिळाली आहे. थोरले राम मंदिराच्या आवारात अगदी गडबड उडून गेली आहे. आदल्या रात्रीपासून विसाव्याला आलेल्या बैलगाड्या, दमण्या जुंपणे आता सुरु झाले आहे. काही गाडीवान बैलांना जवळच्या ओढ्यावरून पाणी पाजून आणत आहेत.
ब्रम्हानंदबुवांची तर अगदी पहाटेपासून लगबग सुरु आहे. आणि का नाही होणार? आज महाराज स्वतः जातीने पंढरपूर वारीसाठी निघणार आहेत. बरोबर नाही म्हणता म्हणता २-३०० लोक येतील असा कयास आहे. मग त्यांच्यासाठी ५-६ दिवसासाठी कोरडा शिधा, अन्न, डाळी साळी , ज्वारी/ बाजरीचे पीठ, चुलीसाठी सुकी लाकडे, काटक्या , पत्रावळ्या दोन महिन्यापासून बुवांनी पावसाळा सुरु होणार म्हणून आधीच विश्वनाथकडून लाकडे फोडून सुरक्षित जागी ठेवून दिली आहेत.
घरातल्या बायका गेल्या काही दिवसापासून पहाटेपासून उठून जात्यावर धान्य दळत आहेत. पिशव्या गाठोडी भरली जातात. रस्त्यात पाणी आणण्यासाठी म्हणून हंडा कळशा, तांबे पेले घेतले आहेत.
अश्या रीतीने, गाड्या, छकडे, दमण्या जंपल्या गेल्या. मुहूर्ताचा नारळ फोडला महाराजांनी रामाची काकडआरती केली..आणि रामरायाचे दर्शन तीर्थप्राशन करून "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात महाराज निघाले. दिंड्या पताकांनी गोंदवले नगरी सजली होती.जिकडे पाहावे तिकडे भगव्या रंगाची उधळण. बायाबापड्या डोक्यावर पितळी तुळशी वृंदावन घेऊन निघाल्या.
महाराजांबरोबर चालत उत्साही मंडळी निघाली. बाजूनेच शिधा, भांडीकुंडी घेतलेल्या बैलगाड्या,चालत असायच्या. आम्ही मुली.. थोडेफार चाललो की थकून बैलगाडीत बसायचो. कधी कधी तिथेच डुलकी लागायची.
वारीचा पहिला टप्पा मोठा होता..
१६ मैलावर असलेले म्हसवड गाव! महाराजांसोबत महाराजांची अन्नपूर्णा - श्री ब्रम्हानंद बुवा श्री भाऊसाहेब केतकर, तात्यासाहेब केतकर, पंडित महाभागवत कुर्तकोटी, रामानंद महाराज,प्रल्हाद महाराज,बापूसाहेब साठ्ये, अप्पासाहेब भडगावकर, गणपतराव दामले, बळवंतराव घाणेकर, चपळगावकर, अण्णासाहेब मनोहर, बाबासाहेब दांडेकर, वामनराव आपटे, दामोदरबुवा कुरवलीकर, वैद्य कासेगावकर, भीमराव मोडक ,... ई मंडळी झाडून हजर आहेत तर तर स्त्रीयांपैकी मुक्ताबाई, गंगू ताई आठवले, काशीबाई, पटाईत मावशी, गोदूताई, अख्खी महिला पलटण भोजनाच्या सेवेसाठी तत्पर आहे.
स्वतः श्रीमहाराज आज पांढरे शुभ्र धोतर, वरती बाराबंदी आणि डोक्यावर फेटा, गौरवर्ण प्रसन्न चेहरा, गळ्यात तुळशी माळा, कपाळावर उभे गंध, डोळ्यांच्या बाजूला चंदनाच्या मुद्रिका , लावलेले महाराज अगदी साजिरे दिसत आहेत.
वातावरणात उल्हास भरून राहिला आहे. गोंदवले इथून निघतांना, बेसन भाताचा प्रसाद सर्व भगवदभक्तांना दिला जातो.
सुमारे अर्धा किमीवरच स्थानिक गावकरी वारकऱ्यांना शुद्ध जलाचे आणि जिलेबीचे वाटप करत आहेत.
जागोजागी महाराजांचे भव्य स्वागत होते आहे. महाराजांवर फुलांची उधळण होत आहे. सुवासिनी महाराजांना भक्तिभावाने कुंकुम तिलक लावून औक्षण करत आहेत. कोणी पायावर पाणी टाकून पदप्रक्षालन करत आहेत.
महाराजांतर्फे ही गावकऱ्यांना चुरमुरे, खडीसाखरचां प्रसाद दिला जातोय.
दिंडीत सतत "ज्ञानोबा तुकाराम "चां गजर सुरू आहे.
रस्त्याने चालत असताना आजूबाजूच्या गावातील बऱ्याचशा दिंड्या सोबत येऊ लागल्या आहेत आणि हळू हळू रस्त्यावर वैष्णवांच्या ध्वजा, तुळशीमाळा घातलेले वारकरी दिसू लागले आहेत.साधारण तीन किमी अंतरावर गोंदवले खुर्द येथे ग्रामस्थ सर्वांना गोड दुधाचा प्रसाद देत आहेत.
आता रस्त्यावर पुरुष आणि स्त्री वारकऱ्यांनी फुगड्या खेळण्यास सुरुवात केली आहे. वारकरी फुगडीची एक वेगळीच नजाकत असते. एकीकडे विठुरायाचे नामघोष सुरू आहे.
मजल दरमजल करीत वारी 'वाण्याची झाडी ' येथे येते.आरती करून वारकऱ्यांना आमटी भाताचा भोजनप्रसाद होतो.
मजल दरमजल करीत दिंडी म्हसवड मुक्कामी येऊन पोहचते. महाराज जरा विश्रांती घ्यावी म्हणून एका दगडावर बसलेत. ब्रम्हानंद बुवांनी एक बैलगाडी आधीच पुढे नेऊन, चुली मांडून स्वयंपाकाला सुरुवात केली आहे.
बाकी मंडळी, नित्यपाठची स्तोत्रे, विष्णूसहस्त्रनाम, राम रक्षा, राम हृदय, भीमरूपी म्हणत आहेत. पुन्हा एकदा रामाची आरती होते आणि सगळे भोजन प्रसाद घेतात. रात्री महाराजांचे बहारदार कीर्तन होते. साधारण दहाच्या सुमारास, थकलीभागली मंडळी आडवी झाली. काही लोक त्यांच्या पायाला, पोटऱ्यांना, गुडघ्याला औषधी तेल लावून देत आहेत. महाराज प्रत्येकाची विचारपूस करत फिरत आहेत. कोणाचे काही दुखलेखुपले तर औषध सुचवत आहेत.
रात्रीची विश्रांती घेऊन ताजीतवानी झालेली मंडळी सकाळी प्रार्तविधी आटोपून लगेच पिलीव गावासाठी मार्गस्थ होतात.
दुसऱ्या दिवशी पहाटेच रामाची काकड आरती करून , गुळाचा चहा घेऊन मंडळी म्हसवड सोडतात. रस्त्यात ग्रामस्थ उपम्याची न्याहरी सर्व वारकऱ्यांना देतात. आज जरा हवेत गारवा आहे. महाराजांना दम्याचा अंमळ त्रास होत आहे. ब्रम्हानंद बुवा त्यांची सर्वतोपरी काळजी घेत आहेत. त्यांना सुंठेची कढी, दालचिनी गूळ घालून केलेला चहा देत आहेत. आम्ही मुलीही थोडेफार चालून बैलगाडीत येऊन बसतो. तेवढ्याशा श्रमानेही आम्हाला झोप लागते.तेवढ्यात महाराजांना ही चालण्याचा त्रास होतोय म्हणून ते गाडीत येऊन जरा लवंडतात. पण लगेच १०-१५ मिनिटात उठुन बसतात. त्यांना उसंत कसली! आणि जाग आल्यावर आम्हाला जाणवते की कोणीतरी आमचे डोके त्यांच्या उबदार मांडीत घेतले आहे आणि हळूवारपणें आमच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत. डोळे उघडुन पाहतो तर महाराजच ते! नकळत आमचे डोळे भरून येतात. बापापेक्षाही जीव लावणारे ते महाराजच.
आम्हाला जाग आलेली पाहून, महाराज आमचे डोके हळुवारपणे खाली ठेवतात. आणि लगेच वारीमध्ये सामील होतात. मंडळींच्या उत्साहाला उधाण आले आहे. पदे म्हणत म्हणत, गात मंडळी निघाली आहेत. दुसरा टप्पा पिलिव गावाचा. साधारण दुपारी बारा वाजता दिंडी सुळे वस्ती येथे येते. इथे पाण्याची व्यवस्था पाहून ब्रम्हानंद बुवा आणि महिला पलटण स्वयंपाकाला लागतात.
दुपारच्या भोजन प्रसादाला ज्वारी/ बाजरीची भाकरी, आमटी असा बेत आहे. पत्रावळ्या मांडल्या जातात, आणि "जय जय श्रीराम, जय जय श्रीराम" च्या जयघोषात प्रसाद वाढायला सुरुवात होते. वारकरी मंडळी तृप्त तृप्त होत आहेत. थोडी विश्रांती घेऊन दिंडी माऊली माऊलीच्या जयघोषात पीलिव गावी मुक्कामासाठी मार्गस्थ होते. महाराजांचे इथेही जंगी स्वागत होते. सुवासिनींनी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या आहेत, महाराजांना ओवाळत आहेत. गावाबाहेरच्या शिवारात मुक्काम होतो. आरती करून प्रसाद होतो. ग्रामस्थ पिठले भाकरीचा प्रसाद आणून देतात. पाण्याचा टँकर एक बरोबर असतोच.
रात्री विश्रांती घेऊन दुसरे दिवशी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेऊन सुमारे ८ वाजेच्या सुमारास भाळवणीसाठी महाराज प्रस्थान करतात. जसजसे पंढरपूर जवळ येतेय तसतसे मंडळींच्या उत्साहाला उधाण येते आहे.
इथे राहणारे एक महाराजांचे शिष्य आदराने महाराजांना घरी बोलवतात अन् त्यांचा सत्कार करतात. महाराज ही त्यांची भक्ती बघून प्रसन्नचित्त होतात. आता साळमुख ते तांदुळवाडी रोडवर रिंगण सोहळा होणार आहे. यासाठी महाराजांच्या बत्ताशाला सजवून आणले गेलेय. महाराजांची दिंडी मधे ठेवून आधी ध्वजधारी आणि पताका धारी वारकरी ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात भोवती गोल प्रदक्षिणा करतात. त्यानंतर डोक्यावर तुळशी घेतलेल्या स्त्रिया, विणाधारी बुवा माऊली माऊली म्हणत प्रदक्षिणा घालतात. सर्वात शेवटी बत्ताशाने रिंगण पूर्ण केले. हे रिंगण पाहण्यासाठी गर्दीचा महापूर लोटलेला असतो. फार हृद्य .. डोळ्यात साठवून ठेवावा असा सोहळा असतो तो.
नंतर महाराजांचे प्रवचन होऊन साडे बारा वाजता भोजन प्रसाद होऊन वारकरी भाळवणीच्या उरलेल्या टप्प्यासाठी मार्गस्थ झाले.
भालवणीतच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि नंतर शाकंभरी देवीचे दर्शन घेऊन मजल दरमजल करत दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी येते.
आज आषाढ दशमी . सकाळी भाळवणी ते इसबावी हा शेवटचा अन् तुलनेने मोठा टप्पा सुरू होणार आहे. मंडळी आता विठुरायाच्या दर्शनाला अधीर झाली आहेत. इसबावी पंढरपुरपासून अलीकडे ५ किमी वर. इथेच अप्पासाहेब भडगावकरांनी महाराजांच्या सांगण्यावरून त्यांच्या वाड्यात राम मंदिर बांधले आहे. महाराजांचा दर वेळी मुक्काम तिथेच असायचा.
दशमीला सकाळी लवकर उठून मंडळी इस्बावी साठी मार्गस्थ होतात. विठुरायाच्या दर्शनाला आतुरलेले डोळे, झपझप पडणारी पाऊले, मुखात माऊलीचा जयघोष, कंठ दाटून आलेला.. अशी सगळ्यांचीच अवस्था आहे.
भाळवणी ते वाखरीला जाताना रस्त्यात नावडे वस्ती, उपरी येथे आवर्जून दुपारच्या भजन आणि भोजन प्रसादासाठी दिंडी थांबते. तेथील रहिवासी श्री महाराजांच्या न्याहारीसाठी खास मक्याच्या भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि दही असा बेत करतात. नंतर दुपारची आरती आणि प्रसाद करून दिंडी पुढे वाखरीसाठी प्रस्थान करते.
वाखरी येथे तुकोबा आणि ज्ञानोबाची पालखी एकत्र येतात. तिथेही माऊलींच्या अश्र्वाचे रिंगण होते.
महाराज आता इस्बावि मुक्कामी पोहचले आहेत. अप्पासाहेब भडगावकर दोन मुक्काम आधीच लवकर निघून पुढची इसबावी येथील महाराजांच्या मुक्कामाची व्यवस्था लावावी म्हणून गेलेले होते. आज स्वतः अप्पासाहेब रस्त्यावर महाराजांच्या स्वागतासाठी येऊन थांबलेले आहेत.
आणि दुरून भगवे झेंडे, महाराजांची दिंडी येताना दिसताक्षणी सर्वांच्या आनंदाला उधाण आलेले आहे. महाराजांवर पुष्पवर्षाव होतो. महाराज आणि मंडळी व आप्पासाहेबांची गळाभेट होते. सुवासिनी महाराजांना ओवाळतात. आप्पासाहेब महाराजांना आदराने मंदिरात घेऊन जातात. थोडीफार उद्याच्या आषाढी एकादशीच्या मुख्य दिवसाची चर्चा होते. राम मंदिरात महाराज रामाची आरती करतात अन् रामाला नैवेद्य दाखवून सर्वांचा भोजन प्रसाद होतो.
उद्या पहाटे लवकर म्हणजे २ वाजता उठून चंद्रभागेत स्नान करून मंदिरात पोहचायचे आहे ही मनाशी खूणगाठ बांधून मंडळी झोपी जातात.
जय श्रीराम!
क्रमशः
मानस-वारी उर्वरीत पुढच्या भागात!
छान
छान
छान.
छान.
>>>>>आणि जाग आल्यावर आम्हाला
>>>>>आणि जाग आल्यावर आम्हाला जाणवते की कोणीतरी आमचे डोके त्यांच्या उबदार मांडीत घेतले आहे आणि हळूवारपणें आमच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत. डोळे उघडुन पाहतो तर महाराजच ते! नकळत आमचे डोळे भरून येतात.
खूपच सुंदर.
सुंदर!
सुंदर!
किल्ली, साद, सामो, सरल....
किल्ली, साद, सामो, सरल.... सर्वांचे मन:पुर्वक धन्यवाद! __/\__
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
मी_आर्या, मेल पाठवलाय. चेक कराल.
छान डिटेलिंग करत लिहितेस
छान डिटेलिंग करत लिहितेस