दाभोलीतील साकव #भाग 1

Submitted by joshnilu on 15 July, 2024 - 06:01

दाभोलीतील साकव #भाग 1

आज मिळालेला दुर्मिळ साकव फोटो बघून अनेक आठवणी आठवल्या, साकव म्हणजे बांदवलकरवाडी आणि हळदणकरवाडी यांना जोडणारा ओढ्यावरील पूल, हा नसेल तर वेंगुर्ला ,कुडाळ शहरात जायला बस नाही, डेअरी वर दूध देता येणार नाही, मुलांना शाळेत जात येणार नाही आणि गौतमेश्वर नारायण पूजाही करता येणार नाही, एवढेच कशाला रेशन दुकानावर जाता येणार नाही,पोस्ट ऑफिस सुविधा नाही आणि खानोली,वेतोरा आणि खालची दाभोली या गावांशी संपर्क नाहीच.त्यामुळे पावसाळ्यात साकव बांधणे आणि सरकार भरोसे न राहता आपली आपली येण्याजाण्याची सोय करणे हेच गावातल्या लोकांच्या हातात.आणि त्यासाठी मग सर्वांचे श्रमदान आणि झाडांचे दान करून हा साकव पावसाळ्याच्या आधी बांधायचा.स्वयंपूर्ण असलेले कोकण आणि रडत न राहता आपले उपाय आपणच शोधायची सवय ही आधीपासूनच.
साकव आणि त्याची सुरुवात व्हायची साधारण मे चा शेवटी आणि जून महिन्यात पहिल्या आठवड्यात मुलांच्या शाळा सुरू व्हायच्या आसपास, एखाद्या शनिवारी किंवा सोमवारी देवळातील भजनात एखादा दिवस ठरवला जायचं आणि सगळेच या कामात मदत करायला हजर राहायचे. मग सगळी व्यवस्था, केल म्हणजे Y आकाराचा झाडाचा मजबूत बुंधा आणायचा, फोफळी आणायचे, बांबू म्हणजे माणगे, किनलीचे दोर, सुंभ, राजू आणायचे, पारय आणून एक टीम खड्डा खणायला घ्यायचे तर एक टीम फोफळ आणायला बागात जायचे.बाळूभटजी म्हणजे माझे बाबा यात अनेकदा फोफळ म्हणजे सुपारीची झाडे देण्यात पुढाकार घ्यायचे.मग बागात जाऊन कर आलेल्या फोफळ तोडायला परवानगी देणे (कर म्हणजे वरच्या बाजूने चढायला अवघड आणि कमकुवत झालेले सुपारीचे झाड). ज्योतिष बघायला गर्दी असली तर मग विवेक,मी किंवा नाथा असे बागेत जायचो पण तेव्हा
तोडलेली चांगली फोफळ असेल तर मग बाबांचा राग व्हायचं पण तो तेवढाच वेळ, ती 2-5 मिनिटे ऐकायची तयारी ठेवायची.
बागेतील एखादे किनळ किंवा चीप्याचे मेंढे (Y आकाराचे केलं असणारे खोड सिलेक्ट व्हायचे),अनेकदा येता जाता बघूनही ठेवलेले असायचे.फक्त जाऊन त्या व्यक्तीला सांगणे आणि तोंडून आणणे एवढेच काय ते काम. या सत्कार्यात कोणी नाही म्हणायचेही नाही. (या Y आकारच्या खोडात जायला यायला प्लॅटफॉर्म तयार करणे सोपे होते) तर हे असे Y आकाराचे खोड शोधून आणायचे. मग त्यात वाडीतील सगळेच पुढाकार घेऊन दोन बाजूला दोन हे केलं जमिनीत बसवून त्याला दगडाने ठेचून, पाणी घालून ठेवायचे.सगळ्यात जिकिरीचे काम चढायला सोपे असा साकवाचा स्टार्ट आणि एंड ठेवणे आणि दोन्ही बाजूची उंची समान ठेवणे कारण त्यामुळेच समतल साकव तयार होईल आणि वृध्द, मुलांना ,महिलांना त्रास होणार नाही. या सर्वात आदल्या पाच वर्षात किती जास्त पाणी आलेले कुठपर्यंत आलेले, पुराचे पाणी आणि साकवाचा चढ उतार करायची बाजू एकदम सेफ हवी, त्यावर मग चहा घेत चर्चा , अनेकदा बाबा मला दोन तीन वेळा चहा आणायला घरी पिटाळायचे,त्यात मुख्य म्हणजे कुंणग्यात क्रिकेट मॅच चालू असायची मग कोणीतरी जाऊन ती मॅच आज बंद करा आणि इकडे मदतीला या म्हणून सांगणार, ह्या काय आमच्यासाठी बांधतो काय, आज काय खेळाक नको, चला मदत करुक या सगळ्यात संध्याकाळचे पाच वाजलेले असायचे. (क्रमशः)
- निलेश जोशी

Group content visibility: 
Use group defaults

काय छान वर्णन आहे. अगदी कोकणांत घेउन गेलात. साकव हा शब्दही विसरायला झाला होता. पूर्वी फक्त कथांत ऐकलेला.
फोटो टाका ना.

साकव पार करताना जीव मुठीत धरणे म्हणजे काय ह्याचा प्रत्यय आला आहे. मी त्याच भागातील असल्याने मजा आली वाचताना Happy

मस्त लिहिलं आहे.
काय योगायोग आहे ... मी ही दोनच दिवसापूर्वी एका दिवाळी अंकासाठी ह्याच विषयावर लिहिलं आहे. अंक प्रकाशित झाली की मगच इथे दाखवीन.

खूप छान लिहीलंय. काही काही शब्द मात्र माहिती नाहीत जसे की चीप्याचे मेंढे, किनली, किनळ, पारय वगैरे. जमलं तर शब्दार्थ सांगा नक्की. पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे.

वा काय छान लिहिताय. अगदी चित्रदर्शी.
सोबत जमलं तर फोटो टाकाल? म्हणजे आम्हा शहरी लोकांना जास्त नीट कळेल ; )
किती कष्टाचं, जिकिरीचं अन पुण्याचं काम हे ___/\___
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

पारय म्हणजे पहार, किनली/किनळ हे एक प्रकारचे झाड आहे, ज्याचे दोर एकदम घट्ट असतात आणि तुटत नाहीत. चिपि हे देखील एक झाड आहे, लाकूड टणक असते.

छान लिहिलंय.
<किनलीचे दोर, सुंभ, राजू > हे वाचून माझे आजोबा आणि काका राजू (दोरखंड) वळायचे आणि बाजारात नेऊन विकायचे ; ते राजू हाच शब्द वापरीत ते आठवलं.
रज्जू - वरून आला असावा.

दोर, सुंभ, राजू यात काही फरक आहे का?

सुंभ जळला तरी पीळ जात नाही, बाकीच्यांचा पीळ सुटतो Wink

राजू हा सुंभासारखा खरखरीत नसतो, त्यामुळे जिथे हाताळायची आव्श्यकता असेल (उदा. विहिरितुन घागरी / कळशीने पाणी काढताना) तिथे त्याचा वापर होतो. हे माझ्या अल्प ज्ञानानुसार लिहिले आहे. Happy

Sakav.jpg

साकव छायाचित्र खास तुमच्यासाठी , सर्वानी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद , पुढील २ भाग आजच पोस्ट करतो

छान सुरुवात.

कोकणात अशी बरीच कामे पूर्ण गाव मिळून, श्रमदानाने करतात हे अगदीच पोचले (माहेर, सासर कोकणात असल्याने माहिती आहे).

भ्रमर छान माहिती. भरत छान आठवण.