झिका आणि चंदिपुरा विषाणूंचे संसर्गजन्य आजार

Submitted by कुमार१ on 12 July, 2024 - 03:20

गेल्या महिनाभरातील भारतातील संसर्गजन्य आजारांच्या प्रादुर्भावावर नजर टाकता झिका विषाणूचा उद्रेक ही उल्लेखनीय घटना. त्या अनुषंगाने या काहीशा अपरिचित विषाणूची ही धावती ओळख आणि सद्यस्थितीवर टाकलेली एक नजर.

*हा RNA प्रकारचा विषाणू आहे; म्हणजेच डेंग्यू आणि करोनाच्या जातीचाच.

जागतिक इतिहास :
1. सन 1947 मध्ये युगांडामधील झिका जंगलामध्ये rhesus नावाच्या माकडांमध्ये या विषाणूचा शोध लागला.
2. 1948 मध्ये एडिस जातीच्या डासांमध्ये तो सापडला

3. तर 1952 मध्ये त्याचा पहिला मानवी रुग्ण आढळून आला.
4. आतापर्यंत जगातील 87 देशांमध्ये याचे रुग्ण आढळलेले असून त्यामध्ये आफ्रिका, आशिया व अमेरिका खंडांचा समावेश आहे.

5. 2017 नंतर या आजाराचे प्रमाण खूप कमी झालेले होते आणि 2021 मध्ये जागतिक पातळीवर त्याची नोंद नव्हती. परंतु यावर्षी मात्र पुन्हा एकदा त्याचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय

विषाणूची वंशावळ
एकूण दोन प्रकारचे वंश आतापर्यंत सापडले आहेत :
1. आशियाई वंशाच्या विषाणूमुळे आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतो आणि गर्भवती बाधित झाल्यास तिच्या बालकाला जन्मजात विकृती होण्याचे प्रमाण अधिक राहते.
2. आफ्रिकी वंशाच्या विषाणूमुळे होणारा आजार अधिक तीव्र (virulent) असतो आणि गर्भवतीच्या बाबतीत गर्भपात होतो किंवा नवजात मृत बालक जन्मते.

रोगप्रसार
तीन प्रकारे होऊ शकतो :
1. एडिस जातीचा डास चावल्यामुळे
2. गर्भवतीकडून तिच्या गर्भास
3. लैंगिक : यामध्ये पुरुषाकडून स्त्रीला, स्त्रीकडून पुरुषाला आणि पुरुषाकडून पुरुषाला अशा तिन्ही प्रकारच्या संबंधातून रोगप्रसार होतो. एखाद्याला हा आजार झाल्यानंतर 44 दिवसांपर्यंत त्याच्या लैंगिक जोडीदारात रोगप्रसाराचा धोका सर्वाधिक असतो.

Aedes zika.jpgआजाराचे स्वरूप
विषाणूबाधा झाल्यानंतर 3 ते 14 दिवसांपर्यंत प्रत्यक्ष आजार होऊ शकतो. काहींच्या बाबतीत ही बाधा होण्यापूर्वी झिकाबाधित प्रदेशात प्रवास केलेला असू शकतो.

लक्षणे : ताप, विशिष्ट प्रकारचे पुरळ - विशेषतः चेहरा, धड, तळहात किंवा तळपायांवर दिसू शकतात. कधी कधी अंगाला खाज सुटते. या व्यतिरिक्त हात व पायाचे सांधे दुखणे, डोकेदुखी आणि डोळे आल्याची लक्षणे दिसू शकतात.
हा विषाणू शरीरातील त्वचा, पुरुष जननेंद्रिय, डोळ्यातील रेटीना आणि मेंदू पेशींवर विशेष हल्ला चढवतो.

Screenshot (47).png

सर्वसाधारणपणे डास चावल्यानंतर जे विषाणूजन्य आजार होतात त्या सर्वांची प्रमुख लक्षणे समान असतात. त्यामुळे रोगनिदान करताना डॉक्टरांना डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया (आणि त्याचबरोबर कोविड) यांची शक्यताही मनात धरावी लागते.
मूलतः हा आजार सौम्य स्वरूपाचा असतो आणि 80% बाधितांच्या बाबतीत रोग समजून सुद्धा येत नाही (self limiting).

झिका व डेंग्यूचे साटेलोटे :
या दोन्ही प्रकारच्या विषाणूमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबोडीजमध्ये काहीसे साम्य आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पूर्वी डेंग्यू होऊन गेलेला असल्यास त्यानंतर झिका संसर्गापासून बऱ्यापैकी संरक्षण मिळते (क्रॉस प्रोटेक्शन). मात्र, एखाद्याला आधी झिका आजार झाल्यास त्यानंतर होणारा डेंग्यू मात्र गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. असं हे विचित्र नातं आहे !

गर्भवतींचा आजार

साधारणपणे गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत जर हा आजार झाला तर त्याचे गर्भावर दुष्परिणाम होतात. त्यामध्ये गर्भाच्या मेंदूवर होणारे परिणाम गंभीर असतात.
समजा, गर्भपात झाला नाही आणि दिवस पूर्ण भरून बालक जन्मले तर बाधित बालकांमध्ये खालील प्रकारच्या विकृती दिसू शकतात :
*अत्यंत लहान आकाराचे डोके
*डोळ्यांवर विपरीत परिणाम - त्यामध्ये महत्त्वाच्या प्रकाशसंवेदक पेशींचा नाश होतो.

रोगनिदान
आजाराच्या Acute अवस्थेत निदान करण्यासाठी रुग्णाच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला जातो. रक्तातील सिरम या द्रवघटकावर RT-PCR ही परिचित चाचणी केली जाते.
मात्र आजार होऊन एक आठवडा उलटून गेला असल्यास रक्तामध्ये IgM या प्रकारच्या अँटीबोडीज निर्माण झाल्या आहेत का, याचा शोध घेतला जातो.

उपचार
विशिष्ट विषाणूविरोधी उपलब्ध नाहीत. सामान्य विषाणूजन्य आजारांच्या बाबतीत जी काळजी घेतली जाते तीच इथेही घेतात. त्यामध्ये गरजेनुसार तापविरोधी व खाजविरोधी औषधे आणि भरपूर पाणी पीत राहणे या पथ्याचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील सद्यस्थिती
आजच्या उपलब्ध बातमीनुसार पुण्यातील बाधितांची संख्या एकूण १८ वर पोहोचली असून, त्यातील १० गर्भवती आहेत (https://www.loksatta.com/pune/the-risk-of-zika-increased-in-pune-penetra...).
3 जुलैपर्यंतच्या बातमीनुसार कोल्हापूर आणि संगमनेर येथेही प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. संपूर्ण महाराष्ट्राबाबतची आजची बातमी शोधून सापडली नाही.

सारांश
या विषाणूचा आजार मुळात सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. मात्र, आपल्या घरात एखादी गर्भवती असल्यास तिची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे - विशेषतः डासांपासून आणि ताप आलेल्या रुग्णापासून संरक्षण. तिला कुठल्याही प्रकारचा तापसदृश्य आजार झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. तसेच अशा स्त्रियांनी झिकाबाधित प्रदेशात प्रवास करणे टाळावे.
..........................................................................................................................................
चंदिपुरा विषाणू

सध्या अजून एका विषाणूचा भारतात उद्रेक झालाय आणि त्याचा आजार गंभीर आहे. त्या विषाणूचे नाव चंदिपुरा विषाणू असे आहे. त्याचाही थोडक्यात परिचय करून देतो.

या विषाणूचे पूर्ण शास्त्रीय नाव Chandipura vesiculovirus असे असून तो आरएनए प्रकारचा विषाणू आहे. हा विषाणू Rhabdoviridae या प्रजातीचा सदस्य आहे (या प्रजातीमध्ये रेबीज या प्राणघातक विषाणूचाही समावेश होतो). चंदिपुरा विषाणूचा शोध 1965 मध्ये जुन्नर जवळील चंदीपुरा या गावात लागला.
या विषाणूचा प्रसार सॅन्डफ्लाय माशीच्या चावण्यातून होतो. या प्रकारच्या माशा वालुकामय प्रदेशात तसेच चिखलात आढळतात.
sandfly.jpgआजाराचे स्वरूप : हे अत्यंत गंभीर आहे. मुळात हा विषाणू मेंदूपेशींवर हल्ला करून त्यांचा दाह घडवतो. त्यातून संबंधित रुग्णास मोठा ताप, डोकेदुखी आणि फिट्स येऊ शकतात. आजार गंभीर झाल्यास रुग्ण बेशुद्ध होतो आणि लवकरच त्याचा मृत्यू होऊ शकतो.
अजून तरी या आजारासाठी विशिष्ट प्रभावी उपचार नाही

उद्रेकाचा इतिहास
या आजाराचे प्रमाण 14 वर्षाखालील मुलांमध्ये सर्वाधिक आहे.
2003 : आंध्र प्रदेशमध्ये 329 मुलांना आजार झाला आणि त्यापैकी 189 मृत्यू. 2009 : 52 जणांना आजार आणि 15 मृत्यू
2010 : 50 बाधित आणि 16 मृत्यू

2014 ते 2016 दरम्यान गुजरातमध्ये आजाराच्या काही तुरळक घटना घडल्या.

जुलै 2024 : गुजरात मधील सबरकांत जिल्ह्यात उद्रेक. 29 जणांना आजार झाला असून आतापर्यंत 14 संशयित मृत्यूची नोंद झाल्याचे बातम्यांवरून समजते. त्यापैकी पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू याच संसर्गामुळे झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालात म्हटले आहे.
https://www.deccanherald.com/india/gujarat/niv-confirms-first-death-due-...
गुजरातच्या आरोग्य प्रशासनाने योग्य ती पावले उचललेली असून आसपासच्या 26 निवासी वस्त्यांमध्ये 44,000 जणांची प्रतिबंधात्मक पाहणी केलेली आहे :
https://www.indiatoday.in/india/story/gujarat-reports-first-death-due-to...
**********************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मात्र, एखाद्याला आधी झिका आजार झाल्यास त्यानंतर होणारा डेंग्यू मात्र गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. असं हे विचित्र नातं आहे ! >>> ADE antibody dependant enhancement effect मुळे हे होते. झिकाविरुद्ध निर्माण झालेल्या अँटीबाॅडीज डेंग्यू विषाणूला शरीरात पसरायला मदतच करतात असे संशोधनात आढळून आलंय !!
एकेका विषाणूची विचित्रच तर्‍हा...

नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण व सर्वसामान्यांना शास्त्रीय माहिती साध्या सोप्या पद्धतीने पुरवणारा लेख .
मनापासून धन्यवाद, डाॅ.साहेब.

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल धन्यवाद शशांक !

* ADE effect >>
माझ्या आठवणीनुसार या मुद्द्यावर कोविड लेखमालाच्या दरम्यान थोडी चर्चा झाली होती.

लेख महत्वाचा आहे. नेहमीप्रमाणेच फोरमचा ऑप्टिमम उपयोग केलात डॉ.

सामो, धन्यवाद !
..
पुण्यातील सध्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने खालील पावले उचलली आहेत :
1. सुमारे दहा हजार घरांची पाहणी केली. त्यातून ३११ ठिकाणी डासांची मोठी उत्पत्ती होत असल्याचे दिसले. 29 जणांना या संदर्भात नोटीसा पाठवल्यात. त्याचबरोबर अशा अस्वच्छतेबद्दल सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

2. सर्व खाजगी रुग्णालयांना सूचना दिलेल्या आहेत, की त्यांच्याकडे येणाऱ्या व संबंधित लक्षणे असणाऱ्या प्रत्येक गर्भवतीची विषाणूसाठीची चाचणी एनआयव्हीतर्फे करून घेतली जावी.

3. तसेच संबंधित गर्भवतींची सोनोग्राफी काळजीपूर्वक करण्यात यावी आणि गरजेनुसार nuchal translucency ही चाचणी सुद्धा केली जावी.

अभ्यासपूर्ण व सर्वसामान्यांना शास्त्रीय माहिती साध्या सोप्या पद्धतीने पुरवणारा लेख +123
एकाच वेळी डेंग्यू आणि झिका इन्फेक्शन होऊ शकतात का?

नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण व सर्वसामान्यांना शास्त्रीय माहिती साध्या सोप्या पद्धतीने पुरवणारा लेख .

मनापासून धन्यवाद, डाॅ.साहेब.

सर्वांना धन्यवाद !
. . .
एकाच वेळी डेंग्यू आणि झिका इन्फेक्शन होऊ शकतात का? >>>
चांगला प्रश्न आहे.

होय, या दोन्ही विषाणूंचा संसर्ग एका वेळी होऊ शकतो. तुलनेने असे रुग्ण कमी आढळतात. इथे एक मुद्दा रोचक आहे. असा सहसंसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये तो दोन प्रकारे होऊ शकतो :
1. एडीस डासाला मुळात दोन्ही विषाणूंचा संसर्ग झालेला असतो आणि त्यामुळे तो माणसाला चावल्यावर दोन्ही विषाणू संक्रमित करतो.
किंवा,
2. त्या माणसाला डास चावल्यामुळे डेंग्यू होतो आणि याच दरम्यान त्याचा एखाद्या झिकाबाधित व्यक्तीशी लैंगिक संबंध आलेला असल्यास त्यातूनही झिका आजार होऊ शकतो.

तुम्ही इथे झिका झाल्यानंतरचा डेंग्यू अतिशय धोकादायक लिहिलं आहे.एखाद्याला सिव्हीअर डेंग्यू 2022 मध्ये होऊन गेल्यास (प्लेटलेट 12000) परत झिका होऊ शकतो का?झाला तर खूप धोकादायक ठरतो का?(माझ्यासाठी विचारत नाहीये)

एखाद्याला डेंग्यू होऊन गेल्यानंतर त्यातून निर्माण झालेल्या अँटीबॉडीज (आणि अन्य संरक्षण यंत्रणा) साधारणपणे एक वर्षभर संरक्षक राहतात. त्या कालावधीत जर झिकाचा नवा संसर्ग झाला तर त्या विषाणूची शरीरातील वाढ बऱ्यापैकी रोखली जाते व आजार सौम्य राहील ( कदाचित बाह्य लक्षणे फारशी समजणार नाहीत).

अर्थात, असे संरक्षण शंभर टक्के कधीच नसते. जुन्या संसर्गातून निर्माण झालेल्या अँटीबॉडीजची पातळी किती होती, वगैरे मुद्देही विचारात घ्यावे लागतील.

यंदाच्या पॅरिस-ऑलिंपिक स्पर्धा जवळ येत आहेत. यंदा जानेवारी ते एप्रिल दरम्यान तिथे डेंग्यूचे नवे रुग्ण १६७९ आढळले. हे सर्व स्थलांतर केलेले लोक होते. गतवर्षीशी तुलना करता ही संख्या 13 पटींनी जास्त आहे. यामुळे प्रत्यक्ष ऑलिंपिक दरम्यान एडीस डासांच्या मार्फत पसरणाऱ्या पाच संसर्गजन्य रोगांचा उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. स्पर्धांच्या दरम्यान तेथील तापमान 28 डिग्री सेल्सिअस असेल आणि त्या हवामानात खालील पाच विषाणूंचे आजार वाढू शकतात :

डेंग्यू, झिका, चिकूनगुनिया, वेस्ट नाइल व Usutu

या पार्श्वभूमीवर पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये या विषयाचा अभ्यास चालू असून तेथील वैज्ञानिक परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.

https://www.eurosurveillance.org/content/10.2807/1560-7917.ES.2024.29.20...

धन्यवाद !
..
Zikaविषाणू खेरीज सध्या चंदिपुरा विषाणूचाही भारतात उद्रेक झालाय आणि त्याचा आजार गंभीर / प्राणघातक आहे.
प्रस्तुत लेख संपादित करून त्यात या विषाणूचीही भर घातलेली आहे.

झिका ऐकला होता, चंदिपुरा हा नवीन समजला. लई डेंजर दिसतो.

ते सबरकांत जिल्हा नसून साबरकांठा असावे, प्लीज चेकवा.

झिकाचा आजार वास्तविक सौम्य ते मध्यम असतो. परंतु झिकामुळे मेंदूज्वर (meningoencephalitis) झाल्याची भारतातील पहिली घटना पुण्यातील हडपसर येथे घडली आहे.

61 वर्षीय व्यक्तीला असा आजार झाला असल्याचे नोबल हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सांगितले आहे. सदर रुग्णाचे जंतूनिदान NIV मधून करण्यात आलेले आहे. डॉक्टरांच्या उपचारांमुळे सदर म्हणून बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आलेला असून त्याची प्रकृती सुधारत आहे

पुण्यातील सद्यस्थिती : एकूण रुग्ण 27; त्यापैकी 11 गर्भवती.

(बातमी : छापील मटा 19 जुलै)

सध्या महाराष्ट्रातील वाढते साथरोग पाहता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी काल तातडीची बैठक घेऊन सर्वांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विविध साथरोगांची सध्याची रुग्णसंख्या अशी :
. डेंग्यू : ५७८० (सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर जिल्हा), चार मृत्यू
. चिकूनगुनिया : १२८९
. हिवताप : ६३५७
. झिका ५८ (पुणे ४९); त्यातील २० गर्भवती.

गेल्या काही दिवसांत पुण्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि झिका या सर्वच आजारांचे प्रमाण लक्षणीय वाढलेले आहे. डेंग्यू व चिकुनगुनिया हे दोन्ही आजार एडिस डासामार्फत पसरवले जातात. त्या दोन्हींच्या लक्षणांमध्ये साधर्म्य आहे.

डेंग्यू जेव्हा गंभीर होतो तेव्हा त्यात रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खूप कमी होते. परंतु यावर्षी चिकुनगुनियाच्या बाबतीतही प्लेटलेट्समधील घट दिसून आली आहे; तसेच अशा काही रुग्णांना चेतासंस्थेशी संबंधित आजारही झालेला आहे. अशा रुग्णांना बाहेरून प्लेटलेट्स द्याव्या लागतात.

सध्या बहुतेक सर्व रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सचा खूप तुटवडा जाणवतो आहे. रक्तदात्यांनी आपण होऊन पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन रक्तपेढ्यांनी केलेले आहे.

डेंग्यूच्या गंभीर रुग्णांमध्ये डोळ्यांच्या विविध समस्या दिसून आल्या आहेत. त्यामध्ये डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे आणि रेटीनाला सूज येणे यांचा समावेश आहे.

सध्या दर दिवसाला या प्रकारचे दोन ते तीन रुग्ण आढळून आल्याचे पुण्यातील राष्ट्रीय नेत्रविकार संस्थेतर्फे (NIO) सांगण्यात आले आहे.