डिसेंबर २०१६:
वेळ: पहाटे साडे चार.
स्थळ: तिरुअनंतपुरम मध्यवर्ती बस स्थानक (अर्थात 'तंपानुर'), चौकशी खिडकी.
संभाषणासाठी कमीत कमी शब्द आणि जास्त हावभाव हे धोरण आम्ही ठरवलं होतं, त्यानुसार:
Bonakkad bus?
त्यावर बोटानी इशारा आणि 'Platform number 9'.
विशेष म्हणजे platform number 9 ला चक्क बस उभी होती.
पाटीवर ठळक अक्षर मल्याळी असलं तरी बारीक अक्षरात इंग्रजीत पण नाव लिहिलं होतं: Bonakkad.
चला, एकदाची योग्य बस गाठली! आत जाऊन पाठपिशव्या ठेवून जागा पकडल्या. बस ५ वाजता सुटणार असल्याने निवांत चहा घेता आला. पुण्यातल्या थंडीच्या मानानी तिथे दमट हवेमुळे उकडत होतं.
रीतसर ५ वाजता बस हलली आणि १०-१५ मिनिटात थंडी वाजायला लागली. तेव्हा लक्षात आलं की कुठल्याच खिडकीला काचा नाहीयेत! दुकानाच्या शटर सारखं खिडकीला शटर होतं, पण ते पूर्ण बंद होईना. बस पुढे जाईल तशी थंडी वाढायलाच लागली. तासा दीड तासानी बस कुठे तरी (चहासाठी) थांबली तेव्हा जरा बरं वाटलं. बोनाक्कड यायला अजून किती वेळ होता कोण जाणे.
२ तासात बोनाक्कड येतं असं वाचल्याचं आठवत होतं खरं. पण खाली उतरून बघितलं तर आजूबाजूला डोंगरांचं काहीच चिन्हं दिसत नव्हतं. पण उतरल्यामुळे इतकं कळलं की गावाचं नाव वितुरा आहे. खूप वेळ थांबून एकदाचे चालक-वाहक आले. तिथून निघाल्यावर ५ मिनिटात एका फाट्यावर उजवीकडे वळलो आणि जवळ जवळ लगेच घाट सुरु झाला की! एव्हाना बरंच उजाडलं असल्यामुळे आता डोंगर आणि झाडी दिसायला लागले. लवकरच घनदाट जंगल सुरु झालं. आता जरा ट्रेक ला जातोय असा वाटायला लागलं!
अगस्त्यकुडम!
७-८ वर्षांपूर्वी कुणा केरळी माणसानी पोस्ट केलेले फोटो पहिले होते तेव्हापासून निश्चय होता की एकदा जायलाच पाहिजे. समुद्रसपाटीपासून १८६६ मीटर उंचावरचं हे शिखर. तिथे अगस्त्य ऋषींचा पुतळा आहे आणि ते तामिळ लोकांचे भक्तिस्थान आहे. अगस्त्य ऋषींनी तामिळ भाषेचं व्याकरण तयार केलं म्हणे. असेल बुवा. आमच्यासाठी तर कोणताही देखणा डोंगर म्हणजे भक्तिस्थान आहे!
नेट वरून माहिती कळली होती की केरळ वन खात्याची परवानगी घ्यायला लागते. एका मल्याळी सहकाऱ्याच्या मदतीनी वन खात्याला फोन केला आणि demand draft (रु.४३००/-, ३ जणांसाठी) पाठवून ते सोपस्कार पार पाडले. आणी आता बसमध्ये बसून बोनाक्कडची वाट बघत होतो. बोनाक्कड पासून शिखरमाथा तब्बल २८ किमी आहे. पहिल्या दिवशी बोनाक्कड ते अतिरुमला (Athirumala)अशी २१ किमी चाल होती. दुसऱ्या दिवशी शिखरमाथा गाठून यायचं आणि मुक्काम पुन्हा अतिरुमला. तिसऱ्या दिवशी पुन्हा २१ किमी उतरून बोनाक्कड असा बेत होता.
एव्हाना असं कळलं की बोनाक्कड वरचं, खालचं, मधलं असे २-३ थांबे आहेत! त्यातला आमचा थांबा कोणता? सुदैवानी तेव्हढ्यात मास्तरांनी इशारा केला की अगस्त्यकुडम वाले इथे उतरा! हे बहुतेक मधलं बोनाक्कड होतं.
उतरताना त्यानी उजवीकडे हात दाखवला होता, त्याप्रमाणे आम्ही चालू लागलो. ३ मिनिटात एक धबधबा! त्यावरील पूल ओलांडून पलीकडे लवकरच ७-८ घरांची एक वस्ती होती. आम्हाला पाहून एका आजीबाईनी (मल्याळी भाषेत) चौकशी केली. आम्ही अगस्त्यकुडम म्हणताच त्यांनी जी २-३ वाक्यं बोलली त्यातलं एक अक्षरही कळलं नाही, पण त्यांचा एकंदरीत आविर्भाव असा होता की 'तुम्ही जाऊ शकत नाही'! तेव्हा आम्ही वन खात्याच्या परवानगीचा प्रिंट आउट खिशातून बाहेर काढला. एव्हाना आणखी एक इसम आला होता त्याला तो दाखवला. त्याला इंग्रजी वाचता येत होतं की नाही कोण जाणे. पण तो म्हणाला की तरी सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही आधी चेकपोस्ट ला जाऊन या कागदावर शिक्का मारून आणला पाहिजे. चेकपोस्ट कुठे आहे? तर म्हणे आलो त्याचं वाटेने १५ किमी मागे! आलो त्याचं बसनी आम्ही परत चेकपोस्टला जावं असा त्याचा सल्ला (खरं तर आग्रह किंवा हट्ट) होता. समजा गेलो, तर पुन्हा काय १५ किमी चालत यायचं की काय? कारण पुढची बस साडे तीन तासानंतर होती. बरं हे सगळं संभाषण तो मल्याळीमध्ये आणि आम्ही हिंदी/इंग्रजी मध्ये असं सुरु होतं.
शेवटी नाईलाजास्तव आम्ही माघारी फिरलेल्या त्याचं बस मध्ये बसून चेकपोस्टला गेलो. तिथे सगळा उलगडा झाला. तिथे हिंदी बोलू शकणारा एक माणूस होता. त्याच्याकडून कळलं की अधिकृत गाईड साठी तिथे पैसे भरावे लागतात.
आणि अधिकृत गाईड शिवाय जायला परवानगी नाही. एक गाईड चे रोजचे ५००, म्हणजे ३ दिवसांचे १५००. पण किमान २ गाईड आवश्यक असतात म्हणून आम्ही ३००० भरावे असा त्याचं म्हणणं होतं. नोटा टंचाई मुळे आधीच आमच्याकडे रोख कमी होती. त्यात तिथे कुठेही पेटीएम किंवा क्रेडीट कार्ड चालत नाही. फोनच चालत नाहीत तर हे सगळं कसं चालेल? तेवढ्यात आणखी २ इसम आले. त्यातील एक आमच्याच बस मध्ये होता असं आठवलं. दुसरा गाईड होता. तेव्हा कळलं की ७ तामिळ भाविकांचा गट अगस्त्यकुडमलाच जाऊ इच्छित होता! उरलेले ६ जण बोनाक्कडलाच थांबले होते. आम्हीच वेड्यासारखे तिघेही इथे आलो. या चेकपोस्ट मध्ये ४३०० ची पावती दाखवायची. शिवाय प्रत्येकाचा ID proof दाखवायची आणि त्याची छायाप्रत द्यायची. तामिळ गटाचा नेता हे सर्व घेऊन आला होता,
ते पण सर्व ७ जणांचा! आमच्यात फक्त अजित कडे pancard आणि त्याची छायाप्रत होती. बाकी आमच्या दोघांकडे driving license होतं पण त्याची छायाप्रत नव्हती. तेव्हा त्या साहेबांनी सुचवलं की original इथे ठेवून जा; परत जाताना घेऊन जा.
Checkpost (Thodayar Section Office - Kanithadam)
गाईड बद्दल असा तोडगा निघाला की ७ तामिळ व आम्ही तिघं मिळून एकूण ४ गाईड घ्यायचे आणि त्याचे पैसे share करायचे. एकदाचे आम्ही आता "जाऊ शकतो" असं झालं...पण नाही, अजून बाकी आहे. तिथल्या जेवणाचे काय? आमचा समज होता की वर जेवण, नाश्ता मिळतो. तर मिळतो हे बरोबर आहे, पण त्यासाठी तांदूळ, डाळ वगैरे लागेल की नाही? ते काय आकाशातून पडणार आहे का? तेव्हा ते आपणच घेऊन जायचं असतं असं कळलं. आता ते कुठे मिळेल? तेव्हा तो गाईड आमच्या मदतीला आला. त्याचं नाव तंबू. त्याच्या बाईक वरून तो आमच्यासाठी (आणि तामिळ गटासाठीही) सर्व शिधा घेऊन आला. आता हे पण वजन आपल्याच पाठीवर येऊन बसणार अशी कल्पना केलेली नव्हती. प्रत्येकी २ किलो वजन वाढलं! सगळं झालं. पण आता पुन्हा बोनाक्कडला कसं पोचायचं? १५ किमी! तेव्हा असा सल्ला मिळालं की थोडं थांबलात तर जाणाऱ्या गावकऱ्यापैकी कुणी lift देतील. तेव्हा वाट बघत थांबलो. त्या चेकपोस्ट मध्ये सुदैवानी स्वच्छतागृह होतं आणि भरपूर पाणी होतं, तेव्हा निदान तो कार्यक्रम सुखानी उरकता आला! कालांतरानी खरंच lift मिळून आम्ही बोनाक्कड ला पोचलो! आणि १०:३० वाजता एकदाचा आमचा ट्रेक सुरु झाला.
७ तामिळ भाविक + ३ मराठी उनाड इसम + ४ मल्याळी गाईड! सुरुवातीला २-३ किमी कच्चा गाडी रस्ता पार केल्यावर आलं तथाकथित "picket station". तिथे पुन्हा सर्वांच्या नावांची नोंद झाली आणि मग खरा जंगल रस्ता सुरु झाल. याच्या पुढे गाडी जाऊ शकत नाही. आजचं मुक्कामाचं ठिकाण (अतिरुमला) हे इथून पुढे २१ किमीवर आहे अशी शुभवार्ता कळली. इथेच ११:३० झाले होते तेव्हा अंधार पडायच्या आत पोचू की नाही अशी शंका वाटायला लागली. पण गाईड काहीही घाई गडबड न करता निवांत चालत होते, तेव्हा आम्हीही तीच गती आनंदानी स्वीकारली.
सुरुवातीला किंचित चढण (सुमारे १००-१५० मीटर) पार करून लवकरच साधारण सपाट रस्ता लागला. पण थोड्याच वेळात असं लक्षात आलं की दर थोड्या वेळानी थोडा उतार, मग एक ओहोळ पार करायचा मग पुन्हा चढ असा रस्ता आहे. एकंदरीत समुद्रसपाटीपासून उंची वाढत नव्हती पण सतत चढ आणि उतार. पाठीवरचं ओझं आता नको वाटायला लागलं! प्रत्येक ओहोळ बऱ्यापैकी वाहत होते; काही ठिकाणी तर चांगलाच जोरदार धबधबा! महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात इतकं पाणी कुठे बघितल्याचं स्मरत नाही. हळूहळू रस्त्यालगत जंगल खूपच दाट झालं. आता बोलू नका अशी गाईडनी दटावणी दिली. आपल्या बोलण्यानी हत्ती अस्वस्थ होतात म्हणे...म्हणजे अस्वस्थ झाले तर आपल्यावर हल्ला करतात की काय? असतील बुवा म्हणून आम्ही तोंडं बंद केली.
सर्वात पुढे जो गाईड होता तो खरं तर वयस्कर होता, पण तोच सर्वात वेगानी आणि अथक जात होता. बाकी तिघे अधून मधून विडीकाडीसाठी थांबत होते. पहिल्या गाईडचे नामकरण आम्ही मामा असे करून टाकले. सगळ्यात तरुण होता तो तंबू. बाकी दोघांची नावं मात्र शेवटपर्यंत कळली नाहीत.
एव्हाना १ वाजत आला होता आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते. पण आमच्याकडे खायला तर काहीच नव्हतं. दुपारचे जेवण अतिरुमला मुक्कामीच अशा भाबड्या समजामुळे आम्ही बरोबर काहीच घेतलं नव्हतं. तेवढ्यात मामानी हात आडवा करून अजितला थांबवलं. नव्हे, जवळ जवळ मागे ढकललं! पुढे रस्त्यात हत्ती होता! आता हे महाराज जाईपर्यंत आपण नुसतीच वाट बघायची की काय? तर नाही, तंबूकडे फटाके नामक उपाय होता. चक्क फटाका उडवला, आणि हत्ती महाराज पण आवाजाला घाबरून निघून गेले!
पोटातल्या कावळ्यांना दामटून गप करून आम्ही जातच राहिलो. पुढेपुढे ओहोळ चांगलेच मोठे होत होते. आणी झाडं तर इतकी सुरेख! थांबून थांबून एक एक झाड बघत बसावं वाटत होतं. इथली झाडं पण महाराष्ट्रापेक्षा पुष्कळ वेगळी आहेत. आणि खरंच सुंदर आहेत! प्रत्येक ओहोळ ओलांडताना दगडांवर पाय देऊन जात होतो. पण एक खूप रुंद ओहोळ आला तेव्हा शेवटी बूट आणि पाय ओले झालेच! एव्हाना २ वाजले असल्याने त्या ओहोळाकाठीच lunch break घ्यायचा असा गाईडनी आदेश दिला. आमच्याकडे lunch होतंच कुठे? पण तामिळ भाविक पूर्ण तयारीनी आले होते आणि चांगले प्रेमळ होते. त्यांनी चक्क चपात्या आणल्या होत्या. अगदी आपल्यासारख्याच, फक्त मोहन मात्र थोडे जास्तच होतं. आणि त्याबरोबर tomato चटणी! अहाहा! तामिळ कृपेने छानच जेवण झालं. आमच्याकडे कधीमधी खायला म्हणून थोडे लाडू आणि साटोऱ्या होत्या त्यापण आम्ही सगळ्यांनी वाटून घेतल्या.
इथपर्यंत आम्ही काहीच उंची गाठली नव्हती. बोनाक्कडची समुद्रसपाटीपासून उंची ५५० मीटर आहे, तर इथे ५००! म्हणजे चढ उतार करून आम्ही एकूण ५० मीटर खालीच उतरलो होतो. अतिरुमलाची उंची ११०० मीटर आहे, तेव्हा इथून पुढे भरपूर चढ असणार अशी खुणगाठ बांधून निघालो. आणि झालंही तसंच. मध्ये एका ठिकाणी आम्ही झाडीतून बाहेर पडलो आणी मग गवताळ भागातून वाट होती. पुढे काही अंतरावर वाट पुन्हा झाडीत घुसते आहे असं दिसत होतं. मधेच या भागात झाडी कशी नव्हती कोण जाणे.
आता सतत चढ असल्याने चालण्याचा वेग कमी झाला. त्यातही मामा सगळ्यात पुढेच व त्यांच्याबरोबर आम्ही तिघे. ता.भा. मागे पडले. मध्ये मध्ये मामा वैतागून काही पुटपुटत असे. मागचे लोक फार हळू चालताहेत म्हणून तो बहुतेक उखडलेला असावा. आता या टप्प्यावर असंख्य पक्षी! खूपच वेगवेगळे आवाज येत होते. इथे काही खूपच रंगीत पक्षी दिसले. उदाहरणार्थ काही चमकणारे निळे! काही लाल भडक! अगदी छोटे - म्हणजे चिमण्यांएवढे. दुर्दैवानी माझी आणि कॅमेराची मैत्री नसल्याने प्रकाशचित्र नाही!
अतिरुमला
आता वाट पुन्हा झाडीत शिरली. सुदैवानी इथे डास नव्हते. नाही तर मागे भीमाशंकरच्या जंगलात प्रचंड डास चावले होते. खरं तर इथे दाट झाडी आणि भरपूर पाणी / चिखल असल्याने डास असतील असं वाटलं होतं. पुष्कळ चढ चढून झाल्यावर थोडा सपाट - पण दाट जंगलातून रस्ता होता. इथे मामानी आम्हाला थांबवलं. आणि मामा घुसला झाडीत. त्यानी खाली पडलेल्या (त्यातल्या त्यात) वाळक्या फांद्या गोळा करायला सांगितल्या. तेव्हा लक्षात आलं की अतिरुमलाला स्वयंपाकासाठी हीच लाकडं वापरायची आहेत. बघता बघता पुष्कळ लाकडं गोळा झाली. एव्हाना मागून
ताभा आणि गाईड लोकांचा आवाज यायला लागला. तोपर्यंत मामानी काही लाकडं आम्हाला उचलायला सांगितली, काही स्वतः घेतली आणि उरलेली तुम्ही घेऊन या असं मागच्या गाईडना ओरडून सांगितलं - आणि मामा पुन्हा एक-दोन एक-दोन...आम्ही आधीच दमलो होतो त्यात आता अजून लाकडांचं ओझं. अजून किती अंतर होतं कोण जाणे. पण ज्याअर्थी मामानी लाकडं इथे गोळा केली त्याअर्थी आता जवळ असेल - निदान आता चढ तरी नसेल असं वाटलं. ते खरंच निघालं. १० मिनिटात समोर पत्र्याच्या झोपड्या दिसू लागल्या. त्यात कुणाचा बोलण्याचा आवाज येत होता. म्हणजे तिथे आधीच कुणी तरी आहे तर...लवकरच एका खन्दकावरील छोटा पूल ओलांडून आम्ही अतिरुमला मुक्कामी प्रवेश केला.
Forest, on way to Athirumala / Agasthyakudam
इथे झाडी तोडून थोडा परिसर मोकळा केला आहे आणि त्यात पत्र्याच्या झोपड्या. झाडीतून मोकळ्यात आल्यावर अगस्त्यकुडमचे अगदी जवळून दर्शन झाले. आई शपथ! बघून तर असं वाटतं की तिथे जाणे अशक्यच! वेल्ह्यातून तोरणा जितका उंच दिसतो, साधारण तेवढी उंची. पण पूर्ण दगडी भिंतच जणू! त्रिकोणाकृती भिंत. त्याच्या उजव्या बाजूला आणखी काही शिखरे. तर डाव्या बाजूला २ प्रचंड डोंगर. दोघांच्या मध्ये खिंडीसारखा भाग होता, तिथे घसरगुंडीसारखा उतार दिसत होता. आणि त्या उतारावर पण भरपूर झाडी होती. जणू झाडांचा धबधबा!
अतिरुमला म्हणजे एक पठार आहे - पूर्ण जंगलमय. त्याच्या पूर्वेला प्रचंड अगस्त्यकुडम. आग्नेयेला त्याच्यापेक्षा थोडी लहान शिखरे. उत्तरेला २ डोंगरांमध्ये झाडांचा धबधबा. पश्चिमेला आणि दक्षिणेला उतार. पैकी पश्चिम बाजू चढून आम्ही आलो होतो. पाठपिशव्या खाली ठेवून किती तरी वेळ अगस्त्यकुडम आणि परिसर बघत बसलो. खरोखर इथेच पैसे वसूल झाले!
दरम्यान मामानी १ झोपडी उघडून दिली. भिंती आणि छप्पर दोन्ही पत्र्याचेच. आत या टोकापासून त्या टोकापर्यंत भिंतीलगत बांबूचे platform केले होते. हाच पलंग आणि सोफा पण हाच. मामानी त्यावर अंथरायला चटया आणून दिल्या. कीटक आणि सरपटणारे प्राणी भरपूर असल्याने जमिनीवर बसणे किंवा झोपणे वर्ज्य. म्हणून हे platform. आम्ही चटईला पाठ टेकून आडवे झालो - तेव्हा पाठीला किती सुख झाले ते सांगता येणार नाही!
आम्ही आराम करत असलो तरी मामा मात्र लगेच कामाला लागले होते. आणलेली लाकडं कुऱ्हाडीनी फोडणे सुरु. मागचे लोक येताच मामानी चूल पेटवून कॉफी ठेवली पण. थोड्याच वेळात बिन दुधाची कॉफी. पण त्यावेळी ती इतकी छान लागली की मामाचे शतशः आभार मानले. त्यापाठोपाठ मामानी लगेच स्वयंपाक सुरु केला. आम्ही अजून अगस्त्यकुडमकडे बघत बघत कॉफी पीत निवांत गप्पा मारत होतो.
चढताना इतका घाम निघाला होता की अतिरुमलाला पोचताच आंघोळ करायची असं सगळ्यांनीच ठरवलं होतं. तिथे पाणी भरपूर आहे. भरपूर म्हणजे २४ तास पाण्याची टाकी भरून वाहात असते. कारण कुठल्याश्या ओढ्यातून पाईपनी पाणी आणून सोडलं आहे. अर्धा तास आराम झाल्यावर आम्ही खूप गार पडलो - कारण अतिरुमलाला चांगलीच थंडी होती. शिवाय पाणी तर इतकं गार, की आंघोळीचा विचार सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकला.
या अतिरुमलाला केरळ वन विभागाचे २ कर्मचारी कायम मुक्कामाला असतात. तिथून खाली शहरातील कार्यालयाशी संपर्कासाठी तिथे वायरलेस संच होता. एका झाडालाच उंच काठीवर अन्टेना लावून ठेवला होता. थोड्या वेळानी पूर्ण अंधार झाला. तिथे सोलर सिस्टीम होती, त्यावर मोकळ्या जागेत एक कॉमन दिवा आणि प्रत्येक झोपडीत एक दिवा सुरु झाला. वायरलेस ऑपरेटरनी रेडीओ लावला होता. त्यावर चक्क हिंदी गाणी लागली. फौजी भाईयो के लिये जयमाला! २-३ गाणी होईपर्यंत मामानी सगळ्यांना जेवायला बोलावलं. म्हणजे भात आणि मिश्र भाज्यांचा रस्सा. सांबार नसल्याने थोडा हिरमोड झाला. सांबार नाही कारण डाळ आणलेलीच नव्हती. रस्सा चवदार होता खरा पण सांबार हुकल्याची भावना गेली नाही. असो. आयतं जेवण मिळालं हे काय कमी आहे?
जेवणानंतर थोडा वेळ शतपावली करत होतो. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोनला signal मिळतो आहे का हे बघत होतो. अखेर एका कोपऱ्यात गेल्यावर थोड्या वेळानी signal (१-२ काड्या) मिळतो असा शोध लागला. घरी फोन करायचा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. शेवटी नुसता SMS पाठवला. तेवढ्यात वायरलेस ऑपरेटर येऊन सांगून गेला: 5 minutes light off! तेव्हा घाईघाईने झोपडीत जाऊन sleeping bag मध्ये घुसून बसलो. घड्याळात जेमतेम सव्वाआठ वाजले होते.
इतक्या लवकर झोपल्याने आणि अनोळखी ठिकाण असल्याने झोप तुटक तुटक लागली. सकाळी जाग आली तीच हत्तीच्या ओरडण्याने! अजून अंधारच होता. बाहेर जावे कि नाही? समोर हत्ती उभा असला म्हणजे? आवाज थोडा लांबून येतोय असं वाटत होतं खरं, पण तरी रिस्क नको म्हणून चुपचाप पडून राहिलो. हळूहळू अंधुक उजेड यायला लागला आणि पक्ष्यांचे आवाज पण सुरु झाले. दरम्यान अजित आणि ऋषिकेश पण उठले. मग सगळे बाहेर गेलो. हत्ती नव्हता! अगस्त्यकुडम कडे बघितलं तर...भरभक्कम बाबाच्या अंगा खांद्यावर लहानग्यांनी खेळावं तसे अगस्त्यकुडमवर ढग बागडत होते. आणि त्याच्या उजवीकडच्या दोन शिखारान्मधून तर जणू ढगांचा धबधबा कोसळत होता. आई शपथ! पैसे कालच वसूल झाले असल्याने आज आता काय म्हणावं तेच सुचेना! १० मिनिटे नुसते बघत राहिलो! इतक्यात मामानी "कॉफी" म्हणून आवाज दिला. शिवाय तंबू येऊन सांगून गेला की आज आपल्याला लवकर निघायचं आहे. नाही तर अगस्त्यकुडमला जाऊन पुन्हा अंधार पडायच्या आधी इथे कसे परत येणार? मग लगोलग सगळ्यांनी सकाळच्या अत्यावश्यक गोष्टी आटोपल्या. पाणी कालच्यापेक्षा गार असल्याने अंघोळ नाहीच! दरम्यान मामानी नाश्त्यासाठी उपमा केला होता. उपमा आणि पुन्हा कॉफी. खाऊन पिऊन प्रत्येकानी आपापली ताटली आणि मग धुऊन ठेवायचा.
जळवा
७ ठरलं होतं तरी प्रत्यक्षात ८ वाजता आम्ही निघालो. आज पाठीवर ओझं खूपच कमी होतं. प्रत्येकी एक बाटली पाणी आणि जेवणासाठी पुन्हा तोच उपमा. त्याची चव enhance करण्यासाठी आम्ही आमच्याजवळ थोडं फरसाण होतं तेही घेतलं. आज मामा आमच्याबरोबर नव्हते. तंबू आणि इतर २ गाईड. त्या दोघांनी कमरेला कोयता लटकावला होता. काल ज्या वाटेने आलो तिकडेच पुन्हा ५ मिनिटे मागे गेलो तेव्हा उजवीकडे एक (दगड रुपी) देव दिसला. तिथे तंबूनी उदबत्ती लावून रीतसर पूजा केली. जंगली प्राण्यांपासून देवानी आपले रक्षण करावे हा हेतू असावा. मग उजवीकडे वळून चढाचा रस्ता सुरु! कालच्यासारखीच मध्ये मध्ये ओढे असलेली वाट. पण आज सतत चढ होता. तरी पाठीवर ओझं नसल्याने एकदम छान वाटत होतं. १०-१५ मिनिटात काही ताभांना पायाला जळवा चिकटलेल्या दिसल्या. कालच्या पेक्षा इथलं जंगल जास्त दाट आहे, म्हणून जमीन जास्त ओलसर - म्हणून जास्त जळवा. सर्व ताभा साध्या चपला घालून आले होते. काही तर निव्वळ रबरी स्लीपर घालून आले होते. आम्ही ताभांची कीव करत होतो तेवढ्यात लक्षात आले की आमच्या बुटातही जळवा घुसल्या आहेत! आता दर ५ मिनिटांनी थांबून चिकटलेल्या जळवा काढायच्या आणि मग पुढे, असा आमचा प्रवास सुरु झाला.
या वाटेत जागो जागी हत्तीचे शेण पडलेले दिसत होते. सगळ्यात पुढे आणि शेवटी एक एक कोयताधारी गाईड आणि मध्ये आमच्याबरोबर तंबू. वाट मध्ये मध्ये पार दिसेनाशी होत होती, पण झाडीतून घसून थोडं पुढे गेलं की पुन्हा वाट दिसायची.
अतिरुमला पासून अगस्त्यकुडम पूर्वेला असलं तरी सरळ पूर्वेला जाणे शक्यच नाही. ७०० मीटर उभ्या भिंतीवर कुणी चढू शकेल का? तेव्हा आम्ही साधारण ईशान्य दिशेला जात होतो. तासाभरात आम्ही साधारण सूप बाउल सारख्या दिसणाऱ्या एका ठिकाणी आलो. काळ्या खडकाचा प्रचंड सूप बाउल! त्याच्या दक्षिण बाजूला अगस्त्यकुडम. त्यावरून येणारे असंख्य ओढे या बाउल मध्ये एकत्र येत होते. बाउलची पश्चिम बाजू थोडी कापली गेली होती आणि तिथून तेच पाणी खाली पडत होते. या संपूर्ण प्रवासातील सर्वात सुंदर ठिकाण हेच. इथे तासंतास बसून राहायला मला आवडलं असतं. अगस्त्यकुडमला पुन्हा गेलो तर मी खरंच तिथेच बसून राहीन!
तिथे गेल्यावर आधी सगळेच आहा उहू करत होते आणि भरपूर बडबड करत होते, फोटो काढत होते. पाण्यात खडा टाकल्यामुळे उठणाऱ्या लाटा विरून पुन्हा पाणी शांत व्हावे तसे थोड्या वेळानी सगळे आपोआप शांत झाले. तेव्हा तर ती जागा अजूनच सुंदर वाटली! बराच वेळ शांततेत सुखानी गेला. "वादी मे गुंजती हुई खामोशीया सुने" हे गुलजारचे शब्द अक्षरशः अनुभवले.
"शिखरावर पोचायला अजून किमान २ तास लागतील" असं तंबू म्हणाला तेव्हा समाधी मोडली. सावकाश उठून सगळे चालू लागले. आता आम्ही दगडी बाउलची कड चढायला लागलो. थोड्याच वेळात वर पोचून मग तीच कड धरून आडवे चालायला लागलो. इथे मात्र जळवा नव्हत्या. लवकरच बाउलच्या पुढचे पठार सुरु झाले. आता उंच झाडांचे दाट जंगल जाऊन छोट्या झुडुपांचे जरा विरळ जंगल सुरु झाले. एका ठिकाणी तंबूनी माहिती पुरवली की "या झाडीत वाघ राहतो". वाघोबांनी आम्हाला काही दर्शन दिलं नाही. आता हे सुदैव की दुर्दैव हे तुम्हीच ठरवा. मी अजूनही जिवंत आणि धडधाकट अवस्थेत आहे हे मला तरी सुदैव वाटते! थोड्याच वेळात सपाट पठार संपून आम्ही आता थेट अगस्त्यकुडमच्या शिखराला भिडलो. खडी चढण. १०-१५ मिनिटातच दमछाक झाली. एका ओढ्याकाठी थांबलो तेव्हाच तंबूकडून कळले की यानंतर पुन्हा पाण्याचा स्त्रोत नाही. तेव्हा सगळ्यांनी बाटल्या भरून घेतल्या.
आता इथून पूर्वेला दरी होती. ती बाजू म्हणजे तामिळनाडू. तिकडून वर येणारी वाट इथेच आमच्या वाटेला मिळत होती.
गेल्या ५-६ वर्षांपासून मात्र तामिळनाडूकडून येणारी वाट बंद आहे. म्हणजे तिकडून वर यायला परवानगी नाही. का ते मात्र तंबूला सांगता नाही आलं. किंवा आम्हाला कळले नाही असं म्हणा.
दोर
खडी चढण सुरूच होती. चढण इतकी तीव्र होती की शिखरमाथा काही केल्या दिसतंच नव्हता. जसं पुढे जाऊ तसं वाट अजून अरुंद होत होती. त्यातच तामिळनाडूच्या बाजूने हळू हळू ढग वर येऊ लागले. वेग मंदावला आणि रांग खूपच लांबली. अजित व ऋषिकेश वेगानी पुढे जात होते. पण "दोर दिसला की थांबा" अशी तंबूनी ताकीद दिली होती. खरंच थोड्या वेळानी एक मोठा खडक समोर उभा राहिला. तो चढून जाणं सोपं करण्यासाठी तिथे २-३ दोर कायमचे बांधून ठेवले आहेत. अर्थात उन्हा-पावसानी ते खराब होणार म्हणून अधून मधून ते बदलत असणार. तंबूला बहुतेक थोडी चिंता वाटत होती. आम्ही सगळे जण दोराला धरून सुरक्षित जाऊ शकू ना? अशी. पण ऋषिकेश तर दोराला न धरताच पटपट वर गेला सुद्धा. मी मात्र रीतसर दोर धरून गेलो. जाताना काहीच अवघड नाही वाटलं. पण आपण इथून उतरणार कसे अशी किंचित धाकधूक वाटत होती.
Ropes for safer rock climbing
आता शिखर जवळ आलं असा आमचा समज झाला, पण अजून निदान २० मिनिटे लागतील अशी शुभवार्ता तंबूनी दिली. लगेचच अजून एक दोर-खडक टप्पा होता. त्यानंतर वाट पुन्हा झुडुपांच्या जंगलात घुसली. जंगल पार केल्यावर मग तिसरा आणि शेवटचा दोर-खडक टप्पा. एव्हाना ढगांची गर्दी इतकी झाली की खालचं काहीच दिसेना. दोर धरून वर गेलो आणि लवकरच आम्ही शिखरावर पोचलो! अगस्त्यकुडम! निव्वळ खडक! आणि अगस्त्य ऋषींचा पुतळा. तिथे रीतसर पूजा झाली. साधारण आपण आरती करतो तसं काही तरी त्यांनी म्हणलं. आम्ही मात्र फक्त टाळ्या वाजवल्या. नंतर प्रसाद म्हणून गुळ खोबरं. नंतर बराच वेळ दगडावर निवांत पसरलो.
Agasthi
इथून पश्चिमेला अतिरुमला सहजच दिसलं असतं, पण ढगांमुळे काहीच दिसेना. बरंच वेळ बसलो होतो पण ढग काही
हलले नाहीत. शेवटी आम्हीच हलायची वेळ झाली. शिखर गाठलं होतं खरं. पण शिखरावरून चारी बाजूचं सौंदर्य डोळे
भरून बघितल्याशिवाय ट्रेक सफळ संपूर्ण होत नाही. त्यामुळे परत निघताना एक हुरहूर लागून राहिली होती. चुपचाप
आम्ही हळू हळू परतीची वाट धरली. पण आम्हा तिघांच्या मनात जे होतं त्याला शेवटी अजितनी वाचा फोडली:
आपण पुढच्या वर्षी इथे पुन्हा यायचं का?
Notes:
1. Agasthyakudam is also known as Agasthyamalai.
2. Women (of any age) and boys younger than 12 were once not allowed to go up Agasthyakudam. Since a court ruling in 2020, women are now allowed to go up.
3. Kerala forest department allows 100 devotees to go up every day, only during a certain period each year: from 14th Jan to Holi. During this period, the charges per person are much less than what we paid.
4. Kerala forest department allows smaller private parties to go up during rest of the year, but the charges per person are higher. We paid that, since we wanted to go there in December.
5. In Kerala, it rains from May through Dec. Be prepared for rain, unless you are planning a visit in April (not sure if it is feasible though).
फार सुंदर लिहिलं आहे.
फार सुंदर लिहिलं आहे. चित्रदर्शी.
मी ते सतत अगस्त्यकुंडम् वाचलं.
आणखी फोटो मात्र नक्की पाहिजे होते.
पुलेशु.
काय सुंदर जागा आणि वर्णन!
काय सुंदर जागा आणि वर्णन! जावंसं वाटायला लागलं तिकडे. तुम्ही खाली लिहिलेल्या दुसऱ्या मुद्द्यातलं पहिलं वाक्य वाचून विरस झाला पण दुसरं वाक्य वाचून परत उत्साह आला
धन्यवाद ऋतुराज आणि वावे !
धन्यवाद ऋतुराज आणि वावे !
सुंदर लिहिलंय ! सूप बाउल ..
सुंदर लिहिलंय ! सूप बाउल .. हाहा ! खूप आवडलं. आणखी २-३ फोटो असते तर अजून मजा आली असती. उतरलात कसे शेवटी त्या दोराच्या साहाय्याने का?
फार सुंदर जागा आणि सचित्र
फार सुंदर जागा आणि सचित्र वर्णन
हल्ली माबोवर सचित्र भटकंती सुंदर लेख येत आहेत.
छान वाटतंय.
बरी आहे जागा पण अटी नियम भाडे
बरी आहे जागा पण अटी नियम भाडे फार आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
उतरतानाही दोर धरूनच आलो.
मस्त वर्णन.. सूप बाऊलचा आणि
मस्त वर्णन.. सूप बाऊलचा आणि अजून फोटो हवे होते..
वर्णन फार मस्त आहे.
वर्णन फार मस्त आहे.
मस्त वर्णन केलय. लेखनशैलीमुळे
मस्त वर्णन केलय. लेखनशैलीमुळे आणखी मजा आली.
आणखी फोटो हवे होते - निदान त्या सूप बाउलचा तरी !
छान चित्रदर्शी वर्णन.
छान चित्रदर्शी वर्णन. परतीच्या प्रवासाबद्दल पण लिहा.