रॉय !!!

Submitted by किल्लेदार on 5 July, 2024 - 19:52

घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी.

तिकिटाच्या रांगेत माझ्या मागे उभा असलेला एक मोरक्कन आणि त्याच्यामागच्या दोन जॅपनीज तरुणी यांचीही गत माझ्यापेक्षा फार काही वेगळी नाही हे त्यांचेही थकले भागले चेहरे स्पष्टच सांगत होते. पण चेहरे बोलके असून काडीचाही उपयोग नव्हता. मराठी, मोरक्कन किंवा जॅपनीज मूक भावना सुद्धा तिकिट खिडकीपलीकडे बसलेल्या स्पॅनिश युवतीच्या आकलनापलीकडल्या होत्या. कदाचित अशा “दीन-चर्या” बघणे हाही तिच्या दिनचर्येचाच भाग असावा. माझ्यापुढच्या दोन-एक प्रवाशांची तिकिटे यथावकाश निघेपर्यंत एक बस डोळ्यादेखत निघून गेली. परिस्थिति ओळखून मोरोक्कन पुढे आला. सफाईदार स्पॅनिश बोलून त्याने झटपट आम्हा चौघांचीही तिकीटे तर मिळवलीच आणि वर भाव खाऊन दोन नविन जॅपनीज मैत्रिणी सुद्धा खिशात घातल्या. भाषा हे विनिमयाचे किती प्रभावी साधन आहे याचा प्रत्यय पुढच्या काही दिवसांत मला सतत येणार होता.

सकाळचे साडे दहा वाजले होते. पुढची बस सुटायला आता थोडा अवकाश होता. आटोपशीर विमानतळापलीकडच्या अवाढव्य लागो अर्जेंटिनो वरून येणारा गार आल्हाददायक वारा, शिणलेल्या शरीराला तजेला मिळवून देत होता. रंगीबेरंगी बस थोडी जुन्या ढंगाची पण आरामशीर होती त्यामुळे आधीच जड झालेल्या डोळ्यांवर जरा झापड आली.

20240519_164641-COLLAGE

विमानतळाबाहेर हमरस्त्याला लागताना बसने गर्रकन काटकोनात वळून “उठ आता” म्हणत मानेला जोराचा हिसका दिला. पुढच्या अडीच-तीन तासांत निळाशार लागो अर्जेंटिनो, लागो विद्मा आणि त्यापलीकडे लांबच लांब पसरत गेलेल्या अँडीज पर्वतरांगांनी साधी डुलकी सुद्धा लागू दिली नाही.

20240618_202831-COLLAGE

बहुतांश लोकांना अर्जेंटिना म्हटलं की सर्वप्रथम फुटबॉल मधले ऑल टाईम ग्रेट मॅरेडोना किंवा मेस्सी आठवतील (माझा एक मित्र टेनिस ग्लॅम गर्ल ग्रॅब्रिएला सॅबॅतिनीच्या आठवणीत हरवून जातो), कुणाच्या डोळ्यांसमोर तिथे उगम पावलेला "टँगो डान्स" येईल. एखाद्या दर्दी खवय्याची भूक तिथले सुप्रसिद्ध अर्जेंटेनियन स्टेक्स आणि वाईन आठवून चाळवेल. क्युबन क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रोच्या खांद्याला खांदा लावून लढणारा चे गुवेरा अर्जेंटिनाचाच. ओठात सिगार धरलेला, तारांकित बॅरेट हॅट मधला उमदा "चे" आजही बऱ्याच तरुणांच्या टी-शर्ट्स वर दिसेल.

मला मात्र आठवतो तो (कदाचित) ऐंशी-नव्वदच्या दशकातला एक जुना नॅशनल जिऑग्राफिकचा अंक आणि त्यातला बघताक्षणीच भुरळ पाडणारा "माउंट फिट्झ रॉय". जगातल्या या सर्वात लांब पर्वतरांगांमधला फिट्झ रॉय म्हणजे अँडीजचा लखलखता मुकुटमणीच.

PXL_20240331_163345007

एल चॅल्टेनला पोहचेस्तोवर सूर्य पश्चिमेकडे कलला होता. हॉटेलचे आगाऊ आरक्षण न करण्याच्या आगाऊपणाची शिक्षा दोन चार ठिकाणी धक्के खाऊन मिळाल्यावर एकदाची अंग टाकण्याची सोय झाली. गलित गात्रांच्या कुरकुरीला न जुमानता गरम पाण्याने सचैल स्नान केले आणि गाव भटकायला बाहेर पडलो. डोंगरांच्या कुशीतले हे चिमुकले गाव म्हणजे अर्जेंटिनाची गिर्यारोहण पंढरी. अपेक्षेप्रमाणेच हे गाव एकदम “तरूण” होते कारण इतक्या आडबाजूच्या या लहानश्या गावात गिर्यारोहणासाठी म्हणून यायला कमाल वय हा मुद्दा तसा गौण असला तरी धडधाकट शरीर ही किमान अट होती. हॉटेल्स, बॅग-पॅकर्स हॉस्टेलस्, कॅफेज, बेकरीज, रेस्टॉरंट्स् आणि दैनंदिनी लागणाऱ्या सामानाच्या दुकानांची रेलचेल होती. कुणी थकून भागून, दिवसभराची रपेट संपवून परतत होते, कुणी पाठीवरच्या जड सॅक सांभाळत संध्याकाळची एल कलाफातेला जाणारी शेवटची बस पकडायला लगबगीने निघाले होते, काही उद्याच्या भ्रमंतीसाठी आवश्यक असलेली खरेदी करण्यात गुंतले होते तर बरेच जण कॅफेज किंवा बार मध्ये गप्पात रंगले होते. एका रेस्टॉरंटमध्ये अर्जेंटिनियन बियर, मॅलबेक वाईन आणि स्टेकचा आस्वाद घेऊन पोटाची आणि डोक्याची कुरकुर एकदाची थांबवली. दिवस मावळतीकडे झुकला.

20240625_215809-COLLAGE

स्थानिक पातागोनियन जमातींच्या Tehuelche भाषेत chalten चा शब्दशः अर्थ म्हणजे "स्मोकींग माउंटन". आपल्या गावचे नाव सार्थ करत एकीकडे फिट्झ रॉय शांतपणे ढगात डोकं खुपसून बसला होता आणि दुसऱ्या बाजूला Las Vueltas नदी सकाळच्याच उत्साहाने खळाळत होती.

20240625_220619-COLLAGE

माझ्यातली मात्र उरलीसुरली राखीव उर्जासुद्धा आता आटली होती. गादीवर पाठ टेकताच काही क्षणांतच गाढ झोप लागली.

ब्राम्हमुहूर्तावर उठून सकाळची आम्ह्निकं उरकली आणि “लगुना दे लॉस त्रेस” च्या मोहिमेवर निघालो. सोसाट्याचा बोचरा वारा, अंधारून आलेले आभाळ आणि पावसाचे हलके तुषार उडवत फिट्झ रॉयने "वॉर्म वेलकम" केले.

20240623_000646-COLLAGE

रिओ इलेक्ट्रिको नदीवरच्या एका छोट्या पुलावरून सुरू होणारी ही पाऊलवाट गावापासून थोडी दूर आणि (या मोसमात तरी) फार राबता नसलेली होती. पानगळीचा ऋतू नुकताच सुरू झाला होता. इतरत्र कुठेही न आढळणारे बीच लेंगा, बीच निर्रे सारखे उंच वृक्ष तसेच बरबेरिज, ग्वानाको बुश आणि इतर नाना जातींच्या, चटक रंगाच्या खुरट्या झाडा-झुडूपांनी लॉस ग्लेशिअर्स नॅशनल पार्कचे अरण्य गजबजून गेले होते. पांढऱ्या खडीच्या पाऊलवाटेवर वाळक्या काटक्यांनी ठिकठिकाणी सुंदर नक्षी चितारली होती. रिओ ब्लांको नदीच्या बाजूबाजूने मिराडोर ग्लेशियरला नेणारी ही वाट बरोबर आहे याची हमी भरणारे दिशादर्शक अधून मधून दिसत होते. मधूनच उंच लेंगा वृक्षांच्या दाट राईमागून सकाळच्या उन्हात उजळून निघालेले निमुळते पॉइन्सनॉट शिखर डोकावले. फिट्झ रॉय मात्र अजूनही ढगातच होता.

20240630_111539-COLLAGE

PXL_20240401_113910673-01

20240520_201759-COLLAGE

एक गिरकी घेऊन रिओ ब्लँको बाजूच्या डोंगरामागे गडप झाली. आतापर्यंत सहज ओळखू येणारी पाऊलवाट नक्षिदार होत होत शेवटी तिला सामील झाली. दिशादर्शक दिसेनासे झाले. पाण्याचा जोर बघता नदी ओलांडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे इथे तरी भाषेची अडचण नव्हती. ना स्पॅनिश मधले फलक वाचायला होते ना कुणी स्पॅनिश वाटाड्या. आजवर केलेल्या भटकंतीत नद्या - नाले, डोंगर, पायवाटा यांची भाषा थोडीफार कळू लागलीय. त्यावर भरवसा ठेऊन गच्च रानातल्या झाडा - झुडूपांशी धक्काबुक्की करत ओढ्याच्या उजव्या बाजूचा डोंगर चढू लागलो. बराच वेळ नसलेली वाट तुडवल्यावर उंचावरचा हवा असलेला व्हॅन्टेज पॉइंट मिळाला. निसर्गपुत्र थोरोही अशाच कुठल्याश्या अनुभवानंतर म्हणाला असेल… “I took a walk through the woods and came out taller than the trees”.

20240623_205458-COLLAGE

निळ्या स्फटिकांची मिराडोर ग्लेशियर आणि तिच्या पायथ्याचे छोटेसे तळे इथून स्पष्ट दिसू लागले. डोंगराच्या या निमुळत्या धारेखाली एकीकडे मुसंडी मारून आलो ते गर्द रान होतं तर दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या दगड धोंड्यांचा चाळीस-पंचेचाळीस अंशांचा तीव्र उतार. तोही इतका भुसभुशीत की उतरंडीवरून किती धोंडे निखळून माझ्या सोबतीने उतरतील याचा नेम नव्हता. खाली दरीतल्या प्रचंड शिळा त्याची साक्ष देत होत्या. शेवटी मन घट्ट केलं आणि पाय त्याहीपेक्षा घट्ट रोवत कुठेही न धडपडता सुखरूप उतरलो.

20240622_235350-COLLAGE

मिराडोर ग्लेशियरच्या थंडगार तळ्यात जरा वेळापूर्वी दरदरून सुटलेला घाम धुतला. निळे स्फटिक वितळून वाहणारा तो चवदार अर्क घोटभर पिऊन तृप्त झालो आणि थोडा वेळ शांतपणे या सुंदर हिमनदीचे दृश्य डोळ्यांत आणि कॅमेरात साठवत बसलो.

20240630_112600-COLLAGE

जास्त रेंगाळण्याची मात्र इथे मुभा नव्हती. अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. परत एकदा त्या भल्या-थोरल्या शिळांच्या दाटीवाटीमधून माग काढत एका पाऊलवाटेला लागलो.

घड्याळ साडेअकरा दाखवत होते. तुरळक ठिकाणी चिखल-पाण्याचे किरकोळ अडथळे सोडल्यास निसर्गाने पुढच्या वाटचालीत फारसा हस्तक्षेप केला नाही. दुरून आता लोकांचा क्षीण कोलाहल ऐकू येऊ लागला. रांगेने कुठेतरी निघालेल्या मुंग्या अचानक कसल्याशा अडथळ्याने परत फिराव्यात तद्वत एका छोट्या पुलापासून लोकं परत फिरताना दिसत होती. जवळ जातो तो हिरव्या गणवेशातल्या एका फॉरेस्ट गार्डने अडवले. फिट्झ रॉयच्या पायथ्याला असलेल्या लगुना दे लॉस त्रेस तळ्याकडे जाणारी शेवटची पाऊण एक किलोमीटरची, सरळसोट चढणीची वाट अपघात होऊ नये म्हणून या मोसमात बंद केली होती. अर्थात ही आडकाठी मुख्य रुळलेल्या वाटेवरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना लागू होती. पण या विरुद्ध आडबाजूने कुणी येईल याची त्या बिचाऱ्याने कल्पनाच केली नसावी.

20240623_211017-COLLAGE

लगुना दे लॉस त्रेसचे दर्शन तर आता शक्य नव्हते. एका पाणथळीशेजारच्या टेकाडावर बसून आदल्या संध्याकाळी एका बेकरीमधून बांधून घेतलेले भूकलाडू काढले. आपल्याकडच्या करंजी सारखा “एम्पनाडास” इथला लोकप्रिय पदार्थ. आतले सारण फक्त आपल्याला हवे तसे सामिष किंवा निरामिष. दोन एम्पनाडास रिचवून एका सपाट पाषाणावर जरा कलंडलो. या वाटेवर पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ असली तरी “शोल्डर सीझन” असल्यामुळे सध्या फिट्झ रॉयच्या शोल्डर्स वर जास्त भार नव्हता. त्यातही स्थानिक अर्जेंटेनियन पर्यटकांच्या तुलनेत परदेशी पर्यटक नगण्य होते. आदल्या दिवशी बसमध्ये भेटलेल्या जॅपनीज पोरी तेवढ्यात गोड हसून हाय हॅलो करून गेल्या. त्यामुळे असेल किंवा पोटात गेलेल्या एम्पनाडासमुळे असेल, थोडी तरतरी आली आणि पाय परत एल चॅल्टेनच्या दिशेला असलेल्या लगुना काप्री कडे चालू लागले. मागे वळून बघतो तो फिट्झ रॉय अजूनही डोक्यातून धूर काढत बसला होता.

20240704_083537-COLLAGE

लगुना काप्रिला पोहचेस्तोवर थकलेल्या पायांनी माझ्यापुढे हात टेकले. त्यांनी पूर्णपणे असहकार पुकारण्या अगोदर मीच तळ्याकाठच्या गुबगुबीत हिरव्या गादीवर आडवा झालो. पाठीवरच्या सॅकची उशी केली. तळ्यापलिकडे फिट्झ रॉय आता ढगातून मस्तक बाहेर काढून येणाऱ्या-जाणाऱ्या अभ्यागतांकडे बघत होता. फार कुणी महत्वाचं नाही असं लक्षात आल्यावर परत ढगांमागे गडप झाला. समोर पसरलेला तो सुंदर जलाशय, मधूनच झुळुकेसरशी त्यावर उमटणाऱ्या रेघोट्या, त्यामागे मेघ-मंथन करणारा धिप्पाड फिट्झ रॉय आणि त्याच्या अंगाखांद्यावरून ओघळणाऱ्या हिमनद्या बघत इथंच तासन् तास पडून रहावं असं वाटू लागलं. दिवसभर राबून हतबल झालेल्या हाता-पायांचा अर्थातच या कल्पनेला बिनशर्त पाठींबा होता.

20240630_000211-COLLAGE

PXL_20240401_175452481

उन्हं कलली आणि डोंगरावरची बहुतेक पावलं आता गावाकडे परतू लागली. मीही स्वतःच स्वतःला थोडा धाक, थोडी सायंकाळच्या मेजवानीची लालूच दाखवली आणि अंधार पडायच्या आत गावात पोहोचेन अशा बेतानं डोंगर उतरू लागलो. गावाची वेस अजूनही दीड दोन तास लांब होती. क्षितिजावर लागो विद्मा आरामात ऐसपैस पसरला होता. डावीकडच्या दरीतून Las Vueltas नदी सतत सोबत करत होती. स्थिर न राहता, न थकता, सतत प्रवाही असणं हाच तिचा स्थायीभाव होता.

20240704_104641-COLLAGE

दिवसभरात उणेपुरे वीस बावीस किमी. पायपीट झाली होती. पहाटे पोटात गेलेले घोटभर प्रोटीन शेक आणि दुपारचे दोन एम्पनाडास एवढ्या तोकड्या भांडवलावर आज बरेच काही कमावले होते. पण आता मात्र सडकून भूक लागली होती.

वाटेवरच्या झाडांच्या बेचक्यातून गावातली रंगीबेरंगी घरटी दिसू लागली. थोड्याच वेळात गावाची वेस लागली. रस्त्याकडेच्या एका छोट्या रेस्टोबार मधून जॅझचे हलकेसे स्वर कानावर येत होते. थकलेले पाय नकळतच तिकडे वळले. बार काऊंटर वर बसताच कोरड पडलेल्या घशातून मला ज्ञात असलेले परवलीचे एकमेव स्पॅनिश वाक्य बाहेर पडले… “उना सर्वेजा पोर फवोर !!!”

53835534880_6c779f2779_o~2

PXL_20240401_195907758~3

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख आणि फोटो. जुन्या आठवणी आठवल्या. El chalten ला गेलो होतो पण बायको सोबत असल्याने फिट्झ रॉय पूर्ण ट्रेक करणे जमले नाही. पण एका लेकपर्यंत गेलो होतो (नाव विसरलो, बहुदा Laguna Torre). El Calafate ला Perito Moreno Glacier बघितले असेलच तुम्ही. Ushuaia ला गेला होतात का?
पुढील भाग येऊद्या.

सुरेख वर्णन.
आणि तुमच्या धाडसाला सलाम.
इतक्या दूर, परक्या, अनोळखी प्रदेशात अशी भटकंती करणे सोपे नाही.
या पुढेही पूर्ण काळजी घेऊनच ट्रेक करत चला...

चिन्गी, Abuva, Sharadg, rmd, अनिंद्य, प्राजक्ता कागदे, वावे, ऑर्किड - धन्यवाद
उपाशी बोका - लगुना तोरे, पेरितो मोरेनो , उश्वाया पाहून झाले पण मन भरले नाही. कमीतकमी महिनाभर हवा मनसोक्त हिंडायला.
छल्ला - खरंय. धाकधूक असतेच.

व्वा मस्त अनुभव
We Have been to
Torres del Paine National Park, in Chile’s Patagonia region...
Argentina..may be next time

ब्युटिफुल फोटोज!
प्लीज , फोटोंना क्रमांक देऊन त्यानुसार जरा माहिती लिहीलीत तर अधिक आवडेल.
Happy
किती रंगी बेरंगी, नयनरम्य प्रदेश आहे!

जाई, साजिरा, ऋतुराज, मी बिल्वा, झकासराव, kb, मनिम्याऊ, अतरंगी - धन्यवाद .
वर्षू - चिले भाग राहून गेला. तसं बरंच राहून गेलं म्हणा Sad.
छल्ला - पुढल्या भागात नक्की फोटोखाली माहिती टाकेन. आताच्या भागात आता काही डकवता येणार नाही.

बघतच रहावेत असे फोटो - आणि क्रिस्पी लिखाण.

फोटोंना क्रमांक देऊन त्यानुसार जरा माहिती लिहीलीत तर अधिक आवडेल. >>> +१

काय सुंदर, रसाळ वर्णन आहे!
तितकेच अप्रतिम फोटो.
मजा आली!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

Pages