स्मरणिकेचा अंतिम ड्राफ्ट हातात पडला आणि अनेक भावना, आठवणी उचंबळून आल्या. सुरेख रुपडं, सर्वसमावेशकता, उत्तम साहित्य ह्या सगळ्याचा एक सुंदर कोलाज बघतोय ही भावना प्राबल्याने मनात आली.
साधारण दीड वर्षांपूर्वी, २०२२ च्या डिसेंबर मध्ये टीमने कामाला सुरुवात केली. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे, सर्व वयोगटातील सभासद होते. एक दोघांचा अपवाद सोडला तर BMM साठी काम करण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. आपापल्या क्षेत्रातील अनुभवाच गाठोडं बाजूला ठेवून अगदी लहान मुलाच्या उत्साहाने सगळयांनी शिकायची तयारी दाखवली.
सुरुवात झाली ती आधीच्या दोन संमेलनाच्या स्मरणिका अभ्यासण्यापासून – त्यामधील मजकूर, सजावट, मुखपृष्ठ, BMM विषयक माहिती, आणि गतवर्षीच्या स्मरणिका टीमकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्यापासून.
त्यानंतर अक्षरधाराच्या संपादिका स्नेहा अवसरीकर, प्रख्यात मुखपृष्ठकार रविमुकुल, अमलताश चे सुश्रुत कुलकर्णी ह्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधारण अंक कसा असावा, त्याची बांधणी, आखणी, सजावट, रंगसंगती कशी असावी मजकूर निवडताना कोणती काळजी घ्यावी ह्याचा अंदाज आला.
पहिल्या दोन मिटिंग मध्ये काही बाबींवर एकमत झाले
स्मरणिका विशिष्ट विषयाला वाहिलेली असावी,
लहानांपासून ते ज्येष्ठां पर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा त्यात सहभागही असावा,
शक्यतो साहित्य अमेरिकस्थित मराठी भाषिक लोकांच असावे.
साठच्या दशकात मराठी माणूस अमेरिकेत आला. हळू हळू स्थिरावला. इकडच्या संस्कृतीत समरस होताना तो आपली संस्कृती जतन करून पुढील पिढीला ती संस्कारमूल्ये देत गेला. त्याला केंद्रस्थानी ठेवून आम्ही स्मरणिकेचा विषय ठरविला, “मराठी माणसाला अमेरिकेचा रंग, अमेरिकेला मराठी माणसाचा रंग“
मग मुख्य विषयावर आधारित काही उपविषय ठरविले जसे मराठी माणूस इकडे कसा मिसळत गेला, त्याने कर्मभूमीला दिलेलं योगदान, जतन केलेल्या परंपरा, साठीच्या दशकात आलेल्यांनी अनुभवलेली नवलाई. जेणे करून इथे स्थिरावताना आलेले अनुभव इतरांना सांगण्याची संधी मिळेल. अमेरिकेत झेंडा रोवलेल्या प्रतिथयश मराठी माणसांचे कौतुक करता येईल.
पूर्वीच्या स्मरणिकेवरून युवा-बाल विभागासाठी मराठीत साहित्य मिळणे, तसेच ते विषयाला धरून असणे, ठराविक मुदतीत मिळणे अशी काही आव्हाने समोर दिसत होती.
खरा प्रश्न होता तो इकडे जन्मलेल्या आणि इकडेच वाढलेल्या बऱ्याचशा मुलांचा मराठीशी असणारा संपर्क मर्यादित असतो किंवा हळू हळू तुटक होत जातो तेव्हा त्यांना कसे सामावून घ्यावे. त्यामुळे छोटया मुलांसाठी चित्र किंवा कॉमिक स्ट्रिप्स काढणे, कविता किंवा त्यांचे विचार मराठीत मांडून ते त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून ऑडिओ बुक मध्ये समाविष्ट करणे असे कल्पक उपाय आम्ही शोधले. युवा पिढीलाआवडणारे मिम्स, रॅप सॉंग्स, फ्युजन डिशेस, त्यांना मराठी-इंग्लिश (मिंग्लिश ) मध्ये पाठवायला सांगितले.
जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावे यासाठी अमेरिकेतील सर्व राज्यातील मराठी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. त्यासाठी मग वैविध्यपूर्ण पत्रके, व्हिडीओ रील्स बनविली.
“हर हर महादेव” म्हणत मंडळी जमेल तस आपापल्या परिचित मंडळांद्वारे जास्तीत जास्त लोंकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू लागली. परंतु महिना दीड महिना झाला तरी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नव्हता. ३० ऑक्टोबर साहित्य स्विकारायची अंतिम तारीख होती पण २३ ऑक्टोबरपर्यंत सगळं काही सामसुम. तोंडचे पाणी पळायची वेळ आली होती. काय करावं ह्या विवंचनेत असतानाच पुढच्या काहीच दिवसात आधीची कसर भरुन निघावी इतका साहित्याचा वर्षाव झाला आणि मग साहित्य खूप पण जागा मर्यादित असे उलट चित्र झाले.
मध्यंतरी स्मरणिकेचे अनेक हितचिंतक मदतीला आले. त्यांच्या मदतीने अनेक प्रथितयश लोकांच्या मुलाखती मिळवल्या. एकेका मुलाखतीच्या मागे मध्यस्थ गाठणे, मुलाखतीची वेळ मिळवणे, मुलाखत घेऊन तिचे शब्दांकन करणे आणि तयार मुलाखत त्या त्या व्यक्तीकडून तपासून घेणे ही एव्हढी सगळी कामे होती. विविध चाचण्या लावून सर्वोतकृष्ट विषयवार आधारित साहित्य निवडले. त्यानंतर पुढचे दोन महिने सगळे संपादकीय संस्कार करणे, त्याला अनुरूप चित्रे काढणे, प्रकाशकाकडे सोपविणे, ड्राफ्टस तपासणे ह्या व अशा अनेक कामात गेले. अर्थात हीच गोष्ट मुखपृष्ठा बाबतही घडली.
मधल्या काही काळात इतरही महत्वाची कामे पार पाडली .
त्यातील सगळ्यात जिकरीचे काम म्हणजे चाळीसहून जास्त आलेल्या चित्रांमधून मुखपृष्ठा साठी एक चित्र निवडणे, अनेक फेऱ्यांअखेर Dr, राजेंद्र चव्हाण, सुश्रुत कुलकर्णी यांसारख्या तज्ञ् मंडळींच्या सहाय्याने एका चित्राची निवड झाली.
जोडीला BMM कडूनही माहिती मिळविणे, मान्यवरांची पत्रे गोळा करणे चालूच होते.
शिवाय अडीचशेच्या वर असलेल्या सर्व स्वयंसेवकांचे ग्रुपवार फोटो काढण्याच्या अत्यंत क्लिष्ट कामासाठी श्री. महात्मे मदतीला धावून आले.
आत्ताच दिसणारं स्मरणिकेचं रूप यायला कित्येक महिन्यांची मेहनत, नियोजन, अनेक हितचिंतकांची मदत, लेखकांचा सहभाग, तज्ञांचं मार्गदर्शन, आणि अर्थातच संपूर्ण टीमचे कष्ट हे सर्व कारणीभूत आहे.
_______________________________________________________________________________________
मूळ लेख : https://bmm2024.org/smaranika/