संमेलनाचे चार ठसे...

Submitted by छन्दिफन्दि on 3 July, 2024 - 20:51

“ती मला एकट्याला तिकडे अंधारात सोडून त्या नवऱ्याला सोडून जाणाऱ्या बायकोला पाहायला निघून गेली. आणि मी इकडे मुलांच्या चड्ड्यांच्या नाड्या सोडतोय आणि बांधतोय…” ( इति पुलं, असामी असामी).

BMM २०२४ च्या चार दिवसांच्या संमेलनातील माझा ( किंवा आमच्या टीम मधल्या दोघा तिघांचा तरी) वेळ असाच काहीसा गेला..
तिकडे एकाहून एक सरस कार्यक्रम चाललेत, आमच्याच बूथवरून मंडळी आम्हालाच कुठला हॉल कुठे विचारून पुढे जातायत, आमच्या बुथवर फोटो काढतायत… आणि आम्ही .. स्मरणिकांचे खोके उचाकटतोय, गठ्ठे लावतोय.. आणि रिकामी खोकी रिसायकल करतोय.. इतका धसका बसला ना याचा की झोपेत, झोपेतून दचकून जागं झालं की, स्मरणिकांचे गठ्ठेच दिसायला लागलेत..
तर असो! पण तरीही निग्रहाने चार की तीन - २ + अर्धा+ अर्धा - दिवसांच्या ह्या सोहळ्यात ६० पैकी तब्बल ४ कार्यक्रम बघण्याचे भाग्य मला लाभले.
तर त्या कार्यक्रमांचा उमटलेला ठसा ..

प्रथम क्रमांक , अर्थात ‘ प्रिय भाई, एक कविता हवी आहे’.
नितांत सुंदर, हृदयाला स्पर्शून गेलेला कार्यक्रम.
रवींद्रनाथ टागोरांची त्यांच्या हस्ताक्षरातील कविता हवी असते तिचा शोध घेताना ते पुल - सूनिताबाईंकडे मदत मागतात. आणि तिथून त्या कवितेचा शोध घेतानाचा प्रवास म्हणजे “प्रिय भाई…”.
एका कवितेच्या शोधात इतरही अनेक सुंदर कविता मिळत जातात मग त्यावर सुनिताबाईंचे मनोगत, विवेचन, काही कवितांचे काव्य गायन..
पहिल्या काही मिनिटातच ते स्क्रिप्ट, तो आवाज, पुलंना घातलेली साद, पडद्यावर झळकणारं - खिडकीतून दिसणाऱ्या झाड, पक्षाचं - सुरेख जलरंगातील चित्र मनावर असं काही गरुड करतं की त्यात हरवून जातो.. खिडकीत बसून शिंपिणीचं घरट बघणारे पुलं, त्यांच्याबरोबर काव्यसंवाद करणाऱ्या सूनिताबाई डोळ्यासमोर तरळत राहतात.
उत्तम लिखाण, उत्कृष्ट दिग्दर्शन, सुरेख अभिवाचन, सुरेल गायन यांचा मिलाफ असलेला, परत परत बघावासा वाटलेला हा एक विलक्षण कार्यक्रम आहे.

***
दुसरा कार्यक्रम, अजय - अतुल, पहिलं नटरंग गाणं संपत असतानाच, या द्वयीने ६३०० लोकांनी भरलेलं अख्ख थिएटर खिशात घातलं. कुठलाही निवेदक नाही, वायफळ बडबड नाही- निव्वळ संगीत, गाणी, आणि बेभान होऊन थिरकणारे प्रेक्षक..
हळू हळू सगळ्या सिटा रिकाम्या पडायला लागल्या आणि आधी खुर्चीत ठेका धरणारी मंडळी जागा मिळेल तिकडे गोल करून डान्स करायला लागले की हो..
ह्या कार्यक्रमाला तरुण मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती, यात बरेच इथेच जन्मलेले, वाढलेले होते हे विशेष.
अजय अतुल आज ह्या स्थानावर का आहेत ह्याच उत्तर म्हणजे या कार्यक्रमाची झलक!

तिसरा अर्थात भाडीपा - जगात भारी - पण नक्की कोण ? ते नाही कळलं. सारंग साठे अपेक्षेप्रमाणे चांगला झाला, पॉलाने ५ -१० मिनिटे येऊन बोअर केलं आणि उगाच वेळ खाल्ला.
सगळ्यात आश्चर्य / सरप्राइज होत ते कौत्सुभ सोमण ह्यांची स्टँड अप कॉमेडी - एकदम Clean (निखळ ) विनोद , मनमुराद हसवलं.

चौथा कार्यक्रम - राहुल दे - प्रियांका ब - छान झाला. दिवसभराचा थकवा/ मरगळ त्यांच्या सुरांनी पळवून लावली.

आता थोडंसं खटकणारं अगदी २-५%.

संमेलनाची सुरुवात झाली गुरुवारी संध्याकाळी - सा रे ग म ह्या कार्यक्रमाने. निलेश परब, अमर ओक यांसारखे दिग्गाज साथीला, आशिष कुलकर्णी, आनंदी जोशी, मधुरा कुंभार यांसारखे उगवते तरुण गायक, मृण्मयी दे. निवेदन करायला.
सुरुवातच केली ती “पेहेला नशा” गाण्याने… मग पुढे ही त्याच छापाची, बाजाची गाणी सुरू झाली.. मृण्मयीने बहुदा साखर जास्त खाल्ली असावी कारण ती तिच्या निवेदनातून ठिबकत होती.. मग हळू हळू स्टेजवरची मंडळी झिंगायला लागल्यासारखी वाटायला लागली… प्रेक्षकांना पण आता नाचायचं आव्हान करायला लागले की…
अर्ध्या पाऊण तासात एकंदर रंग बघून काढता पाय घेतला.. कारण दुसरी हजारो काम वाट बघतच होती.

दुसऱ्या दिवशी कळलं एका (अ) रसिकाने कजरारे गाण्याचा अनर्थ करून पायताण हातात घेतली.. आणि नको ते गालबोट लागले.
त्याचे वागणे २०० % चुकीचे होते.
मात्र मराठीच्या संमेलनाची सुरुवातच “ पेहेला नशा “ सारख्या गाण्याने केल्यावर माझ्यासारख्या बऱ्याच मराठीच्या प्रेमाखातर ह्या कार्यक्रमाशी सलग्न झालेल्या अनेक माणसांच्या मनात , “ कुठे नेवून ठेवलंय माझ्या मराठीला…?? “ हा टाहो झाला असेल हे निश्चित!!

अर्थात गुरुवारच्या ह्या एका (काही हजारातून एक म्हणजे .००१ टक्क्यांपेक्षा ही कमी) माणसाने केलेल्या चुकीमुळे राहुल दे, सारंग सा. आणि महेश का. ह्या तिघांनीही बाकी प्रेक्षकांना सुनावले/ समजावले/ taunting केले जणू त्यांच्यासमोर बसलेले सगळेच हिंदीचे शत्रूच आहेत..

आता गोष्ट अशी आहे की आपल्याला वरणभात आवडतो आणि फ्राईड राईस पण आवडतो. पण चायनीज खायला गेलेल्याला वरणभात वाढला तर एरव्ही ओरपून खाणारा आता वरणभात बघुन खवळेल की वदनी कवळ म्हणायला लागेल.. पण ते आपल्या सामान्य बुध्दीला झेपले म्हणून मोठ्यांच्या मोठ्या बुध्दीला ह्या छोट्या गोष्टी काय म्हणून सहाव्यात??

तर मंडळी मी घेतलेला एक बोध,
“आता नाचा” किंवा “ विठ्ठल विठ्ठल म्हणा..” , “मोठ्याने म्हणा” असे ओरडुन प्रेक्षाकांकडून काढून घेता येते असे नव्हे पण तुमच्या गाण्यातून पंढरी उभी केलीत तर प्रेक्षक नकळत हात जोडतो आणि मुखात विठ्ठलाचा जप सुरू होतो..

आता मी माझे चार - पाच (शे) शब्द संपवते आणि आपली रजा घेते.. !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान स्मरणरंजन.

मोठ्यांच्या मोठ्या बुध्दीला ह्या छोट्या गोष्टी काय म्हणून सहाव्या सहन कराव्या?? >> असे म्हणायचे आहे का?

मृण्मयी दे. निवेदन करायला. >> म्हणजे देसाई की देशपांडे की देगवेकर की अजून काही?

राहुल दे, सारंग सा. आणि महेश का >>
नको तिथे अपभ्रंश करणे का माझा पेट पीव्ह आहे, असे त्या "पेट पीव्ह"च्या धाग्यावर टाकले पाहिजे. Wink

छान. तुमच्याकडची संमेलनं फार मोठ्या आकाराची असतात. त्यातल्या कार्यक्रमांची नुसती यादी वाचूनच भारी वाटतं. पण त्यामागे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत. ६० पैकी केवळ ४ जरी बघायला मिळाले तरी ते न बघित्लेले ५६ हे तुमच्या सारख्यांच्यामुळे यशस्वी होऊ शकले असणार. त्याबद्दल अभिनंदन.

“आता नाचा” किंवा “ विठ्ठल विठ्ठल म्हणा..” , “मोठ्याने म्हणा” असे ओरडुन प्रेक्षाकांकडून काढून घेता येते असे नव्हे >> +१. ते आता पेट पीव्ह लेव्हलला जायला लागलं आहे.

पॉला ने ५ -१० मिनिटे येऊन बोअर केलं आणि उगाच वेळ खाल्ला.>> पॉला भयंकर डोक्यात जाते. तिथे पण शॉर्ट घालुन केस मोकळे अवतारात आलेली का? सारंग पण पीळ मारतो. ओवर एक्स्पोज्ड कपल.

पुलंच ऑबसेशन व लाडिक भाई वगैरे फार बोअर होते.

थोड्या शुद्धलेखनाच्या चुका आहेत त्या सुधारुन घ्या.

हे सर्व जाउदे, जेवण कसे होते. पुर्‍या गार ढोण व जा ड अनैव्ह न लाटलेल्या होत्या का? कमी तळलेल्या तश्याच दिल्या का?
श्रीखं ड आधीच संपले का? पुपो तर दिसल्याच नाहीत. अशी आतली बातमी सांगा.

महेश काळे इथे पण?!

उ. बोल. , हपा, अनु, आणि अमा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

इकडे मला वाटतं छुपी स्पर्धा असते मंडळांमध्ये तुमच्या पेक्षा आम्ही अजुन मोठा/ चांगला कार्यक्रम करू... गणेश मंडळांसारखी... त्यामुळे सगळाच अवाढव्य होत जातं..
मग तिकीट महाग होत जातात..etc..

अतुल लाईव्ह ऐकायची जादू सॉलिड असेलच. >>> हो .. मस्त झाला पण लवकर संपला असं वाटलं..

बरेच कष्ट पूर्व तयारी आणि बरंच बजेट असतं या सोहळ्याचं.>>> हो साधारण दीड पावणेदोन वर्ष आधीपासून प्लॅनिंग सुरू झाल्याचं बघितलं.

तसच पाश्चात्य देशांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने स्वयंसेवेंवर/ स्वयं सेवकांवरच सगळा डोलारा उभा असतो.
त्यात काही फक्त फोटो पुरते.. चालायचंच..

जेवण ठीक होते. पुपो, श्रीखंड नव्हते..तुम्ही दुसऱ्या कुठल्यातरी कार्यक्रमाचं ऐकलं असेल.
इकडे चार पाच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था लावायची तेही भारतीय पद्धतीच्या ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.

महेश काळे, राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे हे आधीच्या अधिवेशनातही होते. सुनील गावस्करही अटलांटाच्या अधिवेशनात होता. राज ठाकरेला का बोलावलं ते समजलं नाही. पुढच्या अधिवेशनात जरा नवीन चेहरे दिसू देत ही अपेक्षा. निदान प्रशांत दामले या वेळी नव्हते.

आणि सुबोध भावे Bw ..

मला वाटतं उपलब्धता आणि अर्थकारण ह्यात जे बसेल त्याप्रमाणे ते करत असावेत.

सौरभ नेत्रवळकर पण आलेला.. अर्थात तोही स्थानिक..

राज ठाकरे अराजकीय अस होत ते.. मत पटोत न पटोत .. त्याच बोलणं ऐकायला इंटरेस्टिंग असतं..
पण ह्या वेळी त्याची मुलखात घ्यायचा घाट घातला.. रीतीला धरून प्रश्र्नकरतेच धबा धबा बोलत होते.. त्यावर त्याची जुजबी उत्तरं... सुरुवातीचा अर्धा तास वगैरे ऐकला आणि नंतर फारच कंटाळवाणा वाटला म्हणून बाहेर पडले. त्याला विषय देऊन मोकळं सोडायला पाहिजे होत तर चांगला झालं असतं ... हा माझा कयास..

काय!!!
हिंदी गाणं म्हटलं म्हणून प्रेक्षकाने शब्दशः जोडा मारला???? बापरे!
आणि त्या कृतीचं नाही तरी त्या मानसिकतेचे rationalization करून समर्थनच! परत त्यावरून कोणी बोललं तर आम्ही नाही त्यातले करून लटका राग. आणि लगोलग मम वरणभात चायनीज तुलना.. म्हणजे आम्ही त्याच रांगेतले, फक्त प्यासिव्ह अग्रेसिव्ह.

नक्की काय घडले? कजरारे ऐकून त्या माणसाने स्टेजवर जोडा फेकला का?
त्याला मग लगेच सभागृहाबाहेर हाकलले का? आणि बाकीच्या दिवशी प्रवेशबंदी केली का?

काय!!!
हिंदी गाणं म्हटलं म्हणून प्रेक्षकाने शब्दशः जोडा मारला???? >>> नाही

त्याला मग लगेच सभागृहाबाहेर हाकलले का? आणि बाकीच्या दिवशी प्रवेशबंदी केली का?>>>> पुढचे तेव्हढे डिटेल्स मला माहित नाहीत. पण निश्चितच बाहेर काढलं असेल.. तिकडे cc chi सिक्युरिटी होती.

नाही? म्हणजे जोडा मारला नाही?
हेट क्राईम म्हणून पोलिसात दिला असावा. मराठी कलाकारावर भर कार्यक्रमात जोडा मारण्यावर याहून कमी कलम लावू नये.

संध्याकाळी श्री. श्रीधर फडक्यांचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला! आणि एक संध्याकाळ सुरेल झाली.
त्यांच्या संगितविषयी बोलण्याचा मला काही अधिकार आणि पात्रता दोन्ही नाही.
पण एक खूप महत्वाची गोष्ट स्पर्शून गेली ती म्हणजे त्यांचा साधेपणा, नम्रपणा, डाऊन टू अर्थ परसनालिटी, आणि सचोटी - वयाच्या ७४ व्या वर्षी, सकाळी सिनसिनाटीहून निघून इकडे संध्याकाळी दोन अडीच तासांचा कार्यक्रम केला तेही सलग ( विना विश्रांती). मुख्य म्हणजे ते स्वतः ही सर्व गाणी गायले ( हे विशेष नमूद करावेसे वाटले कारण आजकाल बरेचसे मोठे गायक २-३ गाणी स्वतः गातात व बाकीची ज्युनिअर आर्टिस्टना गायला देतात, किंवा १-२ कडवीच म्हणतात).

नुकत्याच झालेल्या BMM संमेलनात बऱ्याच तरुण(?) कलावंतांचे वर्तन बघून तर ह्या कित्येक अप्रतिम गाणी संगीतबद्ध केलेल्या या प्रतिभावंताविषयीच कौतुक आणि आदर अंमळ जास्तच वाढला.

PXL_20240922_015851981.jpg