स्वारगेट ते मुंबई, मग ते दादर, पार्ले, ठाणे, वा बोरोली असो, शिवनेरीचा प्रवास. कित्येकदा केलाय. पण काही गंमत घडली नाही तरच नवल! तसं नवल घडलं या वेळच्या स्वारगेट ते गोरेगाव प्रवासात. बस वेळेवर निघाली. रस्त्यात फार अडकली नाही. थांबायची तिथेच थांबली. आणि अपेक्षित वेळेत इष्ट स्थळी गोरेगाव(इष्ट)ला पोहोचली. नवलंच झालं म्हणायचं!
एकदा नवल घडतं, पण नेहमी नेहमी नाही ना?
या वेळचं काम लवकर आटपलं. अकरा वाजले होते, सकाळचे. आता परतीचा प्रवास. त्याचं दीड वाजताचं बुकिंग झालं होतं. ते तसंही मी नेहमी करतोच. आज तर रविवार होता. परतीची रिस्क कोण घेणार? अहो एकदा दादरला रात्री ८ ते ११:३० मी शिवनेरीसाठी लायनीत थांबलो आहे. पण मी म्हणतोय ती ही गम्मत नाही. महामंडळाची गम्मत ही आगळीच गोष्ट आहे.
तर आता दोन-अडीच तास साईबाबा मंदिरापाशी टळटळीत उन्हात तळतळत उभं राहायचं या विचारानं अंगावर काटा आला. ते सुद्धा म्हणजे बस वेळेवर आली तर! झाला उशीर, तर मग साईबाबांच्या मनात असेल तसं! तर काटा फुललेल्या अंगानं मी साईबाबांची शिकवण आठवली - श्रद्धा अन् सबुरी. काय? पण महामंडळाच्या कारभारावर श्रद्धा ठेवून सबुरी दाखवायची म्हणजे भलतंच काम होतं.
परतीच्या प्रवासात बरोबर एक सवंगडी होता. तोही पुण्याचाच. मग आम्हा दोघांत चर्चा व परिसंवाद घडून विचारविनिमय झाला. बराच खल झाला, पण निर्णय नाही. मग एका स्थानिक मित्राला दूरभाष लावला. त्यानं सल्ला दिला. मेट्रो पकडा अन् बोरिवली गाठा. तिथंच जेवा अन् नॅन्सी कॉलनीच्या थांब्यावर शिवनेरीत चढा! काय? खरं तर कोणाचा सल्ला स्वीकारणं आमच्या पुणेरी बाण्याला न साजेसं होतं. पण म्हणतात ना, पडत्या फळाची आज्ञा..
उत्तम! तसे केले. मेट्रोच्या थंडाव्यात (अन् थोडक्या पैशांत) बोरिवली गांठली. स्टेशनाबाहेर रिक्षा केली. नॅन्सी कॉलनी एस्टी स्टॅन्ड सांगीतलं. "बशी सुटतात ना तिथून?" व्हो म्हणाला तो. नाही, म्हणजे खुंटा हलवून बळकट केलेला बरा.
तिथे पोहोचलो, तरी बारा वाजायचेच होते. तिथे तरी काय होतं? बोंबलायला एक अर्धी उघडी शेड आणि साताठ बाकडी. सगळी भरलेली! बाकी सगळा रखरखाट. धार मारायची होती. त्याचीही धड सोय दिसत नव्हती. बरं पोटात कावळे कोकलायला लागले होते. म्हणून गूगल मास्तरांना विचारलं. त्यांनी चालत साताठ मिंटावर एक उडुप्याचं हॉटेल दाखवलं. मोहोरा तिकडे वळवला. जाऊन बसलो. पहिल्यांदा व्हाट्टे रिलिफ करून आलो!
ऑर्डर वगैरे दिली. आणि मग निवांत गप्पा मारत बसलो. त्याचं काय आहे, की प्रश्न तत्त्वाचा नसेल, तर आम्ही पुणेकर पोटभर गप्पा मारू शकतो, काय? हां! गप्पा आणि खाण्यात एवढं गुंगलो की सव्वा कधी वाजला लक्षातच आलं नाही! आता एस्टी स्टॅन्डाकडे धावत सुटलो. भरल्या पोटी, मध्यमवयीन ढेरपोटे इसम किती पळू शकणार? पण माझ्या घड्याळाप्रमाणे बरोबर १:३० वाजता स्टॅन्डात घुसलो. एकही शिवनेरी दिसायला तयार नाही. आता म्हणजे कोचरेकर मास्तरांसारखी बोबडी वळायची परिस्थिती आली होती. दोन दिवस आगोदर रिझर्वेशन करून, जवळजवळ दोन तास आगोदर पोहोचूनही बस चुकली की काय?!
तसेच लगबगीनं कंट्रोलर केबिनकडे धावलो. कंट्रोलर सायब गाडी धाडून जरा उसंत घेत असावेत.
"साहेब, दीडची स्वारगेट शिवनेरी गेली काय?"
साहेबांनी एक (लिटरभर) पिंक टाकली. शेजारचा पाण्याचा गडवा उचलला. मस्त खळखळून चूळ भरली.
"हो"
"पण हा आत्ता दिड वाजतोय. वेळेआधी गाडी सोडली कशी तुम्ही?"
त्यांच्या नजरेत उपेक्षा होती.
"अहो हे पहा आमचं रिझर्वेशन आहे." माझ्या साथीदारानं खिशातून रिझर्वेशनचा कागद काढला मात्र, आणि कंट्रोलर सायबांचा नूरच बदलला.
"रिझर्वेशन आहे काय! दिडाच्या गाडीचा?" मी मुंडी डोलावली.
त्यांनी लगेच खिशातला मोबाईल हाती घेतला.
"थांबवतो गाडी मी. ती शुक्रवाडीला आसल."
जरा हायसं वाटलं. शुक्रवाडी?
मग त्यांच्या मोबाईलला वाचा फुटली. ड्रायव्हरचा फोन असावा.
"दोन पॅसेंजर आलेत हिथं रिजर्वेशनचे. पाठवतो त्यांना. थांबवून ठेवा." नाही, कंट्रोलरचा असावा.
"हां, तुम्ही सुक्रवाडीला जा. तिथं भेटेल बस तुम्हाला", हे ते आम्हाला उद्देशून म्हणाले.
"कुठे जायचं?"
"सुक्करवाडी: डिझेलचा पाइंट है थितं, म्हणून तिकडनं चालतेय शिवनेरी"
"मग तिकिटावर कशाला नॅन्सी कॉलनी लिहिता?"
"आता काय ते हिथनं थितं जाताव त्ये.."
अक्षरक्षः धावत जात आम्ही समोरून चाललेली रिक्षा थांबवली. "सुक्करवाडी".
त्याला कुठे जायचं कळलं हे बरं कारण तो म्हणाला, "शुक्रुवाडी, बस पकडना है क्या?"
आमची तंतरली होती. बस थांबेल याची काय खात्री? "हां चलो, चलो"
पोचलो पाच मिनिटांत सुकुरवाडी थांब्याला. समोर शिवनेरी दिसली तेंव्हा जीवात जीव आला. बंदे त्याच्या हातात ठेऊन, सुट्टे सोडून, तसेच धावलो.
"दीडची शिवनेरी का?"
"हुं", ड्रायव्हर होकारला.
आम्ही चढायला लागलो.
"तुमचाच फोन आलावता का?"
"हो."
"रिज्वेशने?"
"आहे. मी २५, हा अठरा."
"दीडच्या गाडीचं?"
"हो"
"मास्तर हैत त्यांना विचारा." त्यानं आतल्या बाजूला निर्देश केला.
आत कंडक्टर तिकीटं देत होता.
"विचारायचं काय? जाऊन बसायचं!" माझा साथीदार आत घुसता घुसता म्हणाला. माझंही मत काहीसं तसंच होतं. पण एकदा आदेश मिळाला की मग आम्ही त्यानुसार वर्तन करणारी माणसं!
तो अठरावर थांबला. मी पंचवीसच्या दिशेने पुढे सरकलो. पंचवीस नंबरच्या सीटवरच विराजमान - सीटपेक्षाही मोठ्या - व्यक्तीला कंडक्टरसाहेब तिकीट देत होते. मी त्यांना सांगितलं, "माझाय पंचवीस नंबर. रिझर्व्हेशन आहे". त्यांनी आश्चर्यानं मान वर केली. "ही दीडची स्वारगेट गाडी आहे."
मी लगेच माझ्या दूरभाषमधे असलेलं तिकिट(पीडीएफ) समोर केलं. एक तर ते तिकिट एका दृष्टिक्षेपात धड दिसत नाही. बोटं घाला, ते खेचा, त्याला दोन बोटं फाकवून मोठं करा. मग इकडे ओढून, तिकडे ढकलून ते दोन कॉलम वाचता येतात. कंडक्टर कश्याला इतके कष्ट घेतोय? त्यानं बघितल्यासारखं केलं अन् म्हणाला "ते मेमोत नाव आहे का बघा."
"मेमो?"
"ते ड्रायव्हर जवळ असेल." त्यानं मान अशी करून दाखवली.
मग मी साथीदाराला बस म्हणालो, अन् पुन्हा त्या दोन रांगांतून आडवं अंग करून ड्रायव्हरच्या दिशेने सरकलो. जागा मिळाली नव्हती. त्यामुळे बॅग पाठीला तशीच होती. मग शीटांवर बसलेल्या पाशिंजरांना त्रास न होईल या हिशेबाने अंगविक्षेप करत करत पुढे पोचलो. ड्रायव्हरच्या हातात एक प्रिंटाऊट होता. तो त्यानं फडफडवला.
"आमचं रिझर्व्हेशन आहे."
त्यानं परत एक उपेक्षापूर्ण कटाक्ष टाकला.
"यात फक्त गोरेगावहून चार पॅसिंजरेत." मलाही दिसत होतं.
"पण माझ्याकडे रिझर्व्हेशन आहे", मी मोबाईल काढला.
माझ्या साथीदारानंही तिकिटाचा प्रिंटाऊट फडकवला.
"यात नाय ना"
"असं कसं? मी ऑनलाईन केलंय. ह्यानंपण केलंय..."
"ह्यात नाह्ये. कंट्रोलरलाच्यारा."
मी साथीदाराला म्हटलं, "तू बस. मी कंट्रोलरला भेटून येतो."
गेलो.
"साहेब,आमचं रिझर्वेशन आहे पण मेमोवर नाहीये."
"अस्कसं?"
"तेच. आजपर्यंत असं कधी झालं नाही."
त्यांनी हात पुढे केला.
मी मोबाईल दाखवला. त्यांनी ओढाताण करून प्रयत्नानं तिकिट पाहिलं. सगळं बरोबर दिसत असावं. त्यामुळे जरा बॅकफूटवर गेले असावेत.
तेवढ्यात त्यांना दिसलं की गाडी पकडण्याची जागा गुंडावली आहे.
"हे काय? कुठनं बसणारात?"
"इथेच."
"मग तिकिटावर कायै?"
"साईबाबा मंदीर"
त्यानं मान उचलून एक भेदी नजर टाकली. मला या गोष्टीची अटकळ होतीच. पण मी म्हटलं होतं, काय फरक पडतो? पण पडतो, असं दिसतंय. बोंबला...
"आता या फरकाचं काय करणार"
"द्या तिकिट"
"मिळतं काय असं मधलंच तिकिट?!"
"मग काय करायचं?"
"जा बघा गाडीत विचारा. मास्तरांनी बसवलं तर बघा."
च्यायला, म्हणजे इथं आलो ही चूकच म्हणायची की. कप्पाळ...
मी आता जरा गडबडलो. मनात विचार आला, वेळप्रसंगी रिक्शानं परत जाऊ गुंडवलीला का साईबाबा मंदिराला. पण वेळेत पोहोचेल का रिक्शा?
तेवढ्यात शेजारी ही गम्मत पहात असलेला आणखी एक गणवेषधारी ड्रायव्हर होता. तो म्हणाला "तिकिटाचं भाडं तर सेम आहे. मैत्री पार्क नंतर कमी होतं."
तर कंट्रोलर म्हणाला, "नाय वाशी नंतर."
आता या मुद्द्यावरून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची जुंपते काय की, असं वाटून गेलं. तेवढ्यात कंट्रोलर सायबांनी गुगली टाकली. "हां, आणि गाडी जर थांबवून चेकींग केली गाडी तर ड्रायव्हरनं काय करायचं?"
"तुम्हीच सांगा. अहो, तोच प्रवासी, दोन स्टॉप आधी बसला, अन् भाडे बदलत नसेल तर चेकिंग करणाऱ्याला काय प्रॉब्लेम असणार?" मी माझं अतिशिक्षित लॉजिक पाजळलं.
"काय तुम्ही लोकं, प्राब्लेम करून ठेवता.."
"मग आता करू काय? त्यांना माझं रिझर्वेशन दिसत नाही. तुम्हाला माझ्या इथे बसण्यावर प्रॉब्लेम आहे. पण मी दीडच्या गाडीचं रिझर्वेशन करून पैसे भरले आहेत!"
"असं व्होत नाय कधी."
"मी तेच म्हणतोय. आजवर वीस पंचवीस वेळा तरी ऑनलाइन बुकिंग करून प्रवास केलाय मी."
"बसमधं मास्तरांशी बोला. बघा काय म्हणतात."
"अहो त्यांनीच तर तुमच्याकडे पाठवलंय..."
आता कंट्रोलर साहेबांनी मामल्यातून लक्ष काढून घेतलं होतं.
तो दुसरा ड्रायव्हर मला म्हणाला, "तुम्ही घ्या बसून, पुढे बघू."
मला काय ते पटलं नाही. पण विचार केला चला बघू कंडक्टर काय म्हणतोय ते.
आत शिरलो. तर ड्रायव्हरनं प्रश्न टाकला. "काय, सुटलं का?"
"नाही हो."
"लवकर करून घ्यानं! इथे लेट होतोय."
"तुम्ही सांगा मी काय करू..."
तेवढ्यात कंडक्टर आला. तो म्हणाला "बसा तुमच्या जागेवर, मी बघतो."
आत्तापर्यंत 'मी बघतो' हे वाक्य उच्चारणारा, म्हणजेच जबाबदारी घेणारा हा पहिला महाभाग होता!
साथीदार ऐकत होताच. त्यानंही मान हलवली. आता मी जागेवर गेलो तर मगाशीच बघितलं ते माझं कर्म तिथं होतं. तिथे ते फुगीर व्यक्तीमत्त्व बसलं होतं. आता याच्याशी रुजवात होती.
मी म्हटलं, "माझा पंचवीस नंबर आहे."
"मग मिळालाय का तुम्हाला?"
"अहो, हे रिझर्वेशन पहा. दीडच्या गाडीचं, पंचवीस नंबर सीट."
"हो पण मी तिकीट घेतलंय."
"हो नं पण त्यावर सीट नंबर नाहीये."
मला चतुर उत्तर सुचलं, याचं मलाच कौतुक वाटलं. पण त्याचा बाणा वकिली होता.
"तुमचं रिझर्वेशन कन्फर्म झालं नाहीये अजून."
मग मी राखीव शस्त्र काढलं.
"ओ मास्तर, कुठं बसू?"
ते ड्रायव्हर बरोबर तो मेमो बघण्यात मग्न होते.
त्यांनी तिकडूनच आवाज दिला - "पंचवीस वर बसा."
आता त्या फुग्याला पर्याय राहिला नाही. खरं तर तो अडून बसू शकला असता. पण त्याला अचानक पान्हा फुटला आणि त्याचं मिल्क ऑफ ह्युमन काइंडनेस वाहू लागलं... किरकिर करत का होईना आपलं चंबूगबाळं आवरू लागला. बसताना खिडकी बघून बसला असेल! "आधीच रिझर्वेशन आहे सांगितलं असतं तर काय झालं असतं", वगैरे बडबड त्याची कंडक्टरच्या रोखानं सुरू झाली.
आणि तिकडे कंडक्टर पेटला. त्यानं तो मेमो फडफडवायला सुरूवात केली. "ही लिष्टाय रिजवेशंची. म्हायत असतं तर पैल्यानं उटावला अस्ता तुम्हाला."
त्या पॅसेंजरचेही बरोबर होतं. तो बसला तेंव्हा विचारून, खिडकी बघून बस्तान ठोकलं होतं. आता एकही खिडकीची सीट मोकळी नव्हती. बरं, हा ऐवज दीड सीटाचा होता. त्यामुळे इतर कुणाच्या शेजारी जाऊन बसणं म्हणजे शिव्या खाण्यासारखंच होतं. आता प्राप्त परिस्थितीला तोंड देणं त्याला अन् मला भाग होतं. त्यानं जागा मोकळी करून दिली. मी पंचवीसवर बसलो, आणि त्यानं सव्वीसवर बैठक मारली. निम्माशिम्मा माझ्यावर सांडला, उरलासुरला मधल्या वाटेच्या मोकळ्या जागेत ओघळला. मीही माझी तुंदील तनू शक्यतो आवरत सिटात कोंबून बसलो. आता तक्रारीला वावच नव्हता, ना त्याला ना मला.
तेवढ्यात तिकडे कंडक्टरचा आवाज आला, "हायला, हे पंधरा तारखंचा मेमोय, आजचा नाय हा! कुणी काढला कळत नाय... तुला कुणी दिला?", हे त्यानं ड्रायव्हरला विचारलं...
कप्पाळ! आख्ख्या बशीत हसू फुटलं.
मग माझ्या शेजाऱ्याला वाचा फुटली, "ओ, आता इथं बसू का इथनंही उठवताय?"
"आता बसा तिथंच. मी नवा मेमो घेऊ येतो.", असं म्हणत तो कंट्रोलरच्या नावानं शिमगा करत बसमधून उतरला.
मग त्या दुसऱ्या ड्रायव्हरनं सांगितलं, की "नॅन्सी कॉलनीच्या स्टॉपवर जाउन तो मेमो आणावा लागेल." कहर...
तंवर माझ्या सहप्रवाशानं त्यांच्या फ्रस्ट्रेशनला वाचा फोडली. हे म्हामंडळाचे कर्मचारी कसे उर्मट आहेत, त्या डोमेस्टिक टर्मिनलची कंडक्टर बाई कशी चढेल वागते, आणि त्यानं केलेल्या तक्रारीनंतर कशी ती सरळ आली आहे, वगैरे. आता मला या सगळ्याचा संदर्भ कळेना. तेवढ्यात एक वेफर्स विकणारा बसमध्ये आला. यानं पाच तासांच्या हिशेबात पाकिटांची बेगमी केली. आणि पुढचा काही काळ पाकिटाचा चुरुमचुर्रुम आणि त्याच्या तोंडातून कर्रमकुर्रम आवाज येत राहीले.
पाच-सात मिनिटांनी कंडक्टरनं येऊन नाव वगैरे विचारून खातरजमा करून घेतली. आणि मगच योग्य लिष्टसह बशीने प्रस्थान ठेवले...
एसटीचा अन् माझा जुना स्नेह! लालपिवळी असो वा शिवनेरी, एकदा बशीनं सूर पकडला की मला त्या सुरात सूर मिसळून गायची, म्हंजे घोरायची हो, सवय जडली आहे. बरं, झोपेचं आम्हाला पिढीजात वरदान आहे. अहो, एस्टी बसचे आतले खांब असतात ना, त्यांच्या आधारानं जुन्या खंबाटकी घाटातही मी उभ्याने झोपायचो. तीही कौशल्याची बाब असते! म्हणजे गाडी घाटात वळणांवर गार-गार गिरक्या घेत असायची अन् माझ्या घोर-ताना तशीच फिरत दाखवायच्या! तो गियर बदलताना अडकला की कसा गर्र्रहर्र्गुडूकखडाड असा आवाज येतो? हां, त्या आवाजानं माझं घोरणं समेवर येतं! त्यात आज भरल्यापोटी ही सगळी वणवण करावी लागल्यानं मानसिक थकवा आला होता. गाडी चालू होती, एसी चालू होता, बुडाखाली सीट होतं (अंगावर वजन होतं!). त्यामुळे आज गाडी वेष्टर्न एक्सप्रेसला लागण्यापूर्वीच माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती!
मधेमधे शुद्ध येत होती, पण जाग येत नव्हती! जाग आली ती पहिल्या टोल नाक्यापूर्वीच्या स्पीड ब्रेकरच्या खडखडाटानं. घड्याळात पाहिलं तर तीन तास उलटून गेले होते - दीडच्या टायमिंगच्या हिशेबानं! असो, घाटापर्यंत तर आलो आहोत... हे ही नसे थोडके. बस डौलात वळण घेऊन फूड मॉलला थांबली. माझा शेजारी लगबगीनं उतरला. बाकी घाई असलेल्यांना उतरू देऊन मग मी शांतीत उतरलो. उतरता क्षणी अत्यंत घाण वास नाकी शिरला. कैक दिवसांचं सडकं-कुजकं अन्न तिथे पडलं असावं. शेजारच्या चहावाल्यानं एक भरभक्कम धूप लावला होता. पण तो उग्र वास काही लपत नव्हता. तिथे चहा पिणं कठीण होतं. माझ्या सवंगड्याला शेजारच्या मॉलवर चांगलं चहाचं दुकान दिसलं. मोहोरा तिकडे वळवला. महागडा चहा पिऊन परत आलो तर माझा तो दीड-शेजारी, त्याची बॅग खांद्याला लावून, एका हातात फोल्डिंगची छत्री अन् दुसऱ्या हातात एका प्लॅस्टिकच्या पिशवीत उरलेली वेफर्सची पाकिटं भरून उभा होता. मी दिसताच त्यानं सुमडीत सांगितलं, बस पंचर आहे! होय, समोरचं टायर मुरगाळून चाक पार जमिनीला टेकलं होतं. त्याच्या शेजारी ड्रायव्हर वैतागलेल्या मुद्रेनं उभा होता. त्यानं कानाला मोबाईल लावला होता. कुणा वरिष्ठांशी हुज्जत घालत होता. "नायेना, सगळ्या थांबलेल्या बसमध्ये विचारलं. कुणाकडे एक्ष्ट्रा स्पेर नैये." तिथे गेला बाजार चार शिवनेऱ्या, एक खटारा लालपिवळी आणि एक कर्नाटक यष्टी अशा खंडीभर गाड्या उभ्या होत्या. आमच्या बशीतला एक हिंजवडी-वाला करवादला, "या सगळ्या घटनांसाठी एस्टीची एस.ओ.पी. का नाहीये?" आता खरं तर मधु मलुष्टे प्रसंग घडणं शक्य होतं. पण आसपास कुणी सुबक ठेंगणी नसल्यानं बहुतेक हिंजवडीवाला 'हिरमुसला' असावा! माझा दीड-शेजारी त्या ड्रायव्हरच्या मागे लागला होता, दुसऱ्या शिवनेरीत बसवून दे म्हणून. तो ड्रायव्हर वैतागला होता हो! रविवारी संध्याकाळी साधारणतः पाच वाजता खालापूर फूड मॉलवर ढीगभर शिवनेऱ्या होत्या, आणखी येत होत्या. पण एकात जागा खाली असेल तर शपथ. इकडे चाक बदलायचं, का पंक्चर काढायचं याचा तिढा. तिकडे पाशिंजरांची लगीनघाई. त्यानं दोन चार पाशिंजर ॲडजस्ट केले, पण आख्खी भरलेली शिवनेरी रिचवायची तर वेळ लागणारच.
मी परिस्थितीचा अंदाज घेतला. इथनं तासभर तरी काही सुटका होईल अशी चिन्हं दिसत नव्हती. शेजारी 'मेगा-हायवे मार्गे सातारा- कोरेगाव' साधी एस्टी उभी होती. हाच तो खटारा! माझ्या साथीदाराला विचारलं, काय चलायचं का या बसनं? शेजारची कर्नाटक बस तशी रिकामी दिसत होती. ते साले पण असे वागतात ना, की नव्या कोऱ्या बशी मुंबई अन् म्हाराष्ट्रात पाठवतात. त्या बशी शेजारी एमएच फोर्टीन पासिंगची आमची म्हामंडळाची बस म्हणजे एखाद्या मिस चमको मॉड मुलीशेजारी जुनेर नेसलेल्या अन् जिमनीवर फतकल मारून बसलेल्या धुरपदाकाकी सारखी दिसत होती. सोबत्याच्या नजरेत भरली ना ती, चमको! पण तिथे तिकिट काढून बसावं लागेल या माहिती नंतर त्याच्यातला पुणेरी जागा झाला! अन् वाट पाहीन पण जाईन ते एस्टीनंच या मर्हाटी बाण्याला जागला! तो तयार झाला, तसं सामान काढलं शिवनेरीतून आणि त्या बसच्या कंडक्टर ची वाट पहात उभं राहिलो.
आता आभाळ काळवंडलं होतं. जोरदार पावसाचा रंग होता. डोंगरमाथा ढगांत गुरफटला होता. वेगात वारे वहात होते. तेवढ्यात आतून एक ड्रायव्हर-कंडक्टरची खाकी ड्रेस परिधान केलेली दुक्कल बाहेर आली. त्यांचा रोख सातारा एस्टीकडे आहे हे लक्षात येताच मी कंडक्टरभाऊंना पकडलं.
"मास्तर, जागा आहे का गाडीत?"
त्यांचा चेहेरा प्रश्नार्थक होता.
"आमची शिवनेरी पंक्चर झाली आहे."
आता सातारा गाडीचा कंडक्टर म्हटल्यावर एक मध्यमवयीन, अंमळ जाडजूड, थोडं टक्कल, डोळ्याला चष्मा, तोंडात सुवासिक पान वा तंबाखूचा बार भरलेला, गळ्यात रुमाल किंवा खांद्यावर टॉवेल असं चित्र उभं राहतं डोळ्यासमोर, नाही? आणि पूर्वी एका खांद्यावरून लटकणारी पैशांची चामड्याची बॅग आणि दुसऱ्या खांद्यावर त्या तिकिटांच्या पत्र्याच्या पेटीचा बंद असायचा. आणि हो, उजव्या हातात ते तिकिटं भोसकायचं यंत्र. त्याचा तो कर्रमकर्रम आवाज करत, किंवा वरच्या स्टीलच्या बारवर ठोकत "पुढं रायलंय का कोणी तिकिट घ्यायचं? कोणं नवीन चढलंय का गेल्या स्टॉपला..." असा ठणाणा..
पण आमचा कंडक्टर? मध्यम उंची, शिडशिडीत अंगयष्टी, इस्त्री केलेला ड्रेस, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, गोरटेला, टोकदार दाढी, पिळलेल्या मिशा, आणि नजरेत चमक! हसऱ्या, उत्साही चेहेऱ्यामुळे एकदम हिरो दिसत होता.
"स्वारगेट का?"
"होय"
"मग चला की! तेवढी आमची गाडी भरेल! पण रिपोर्ट आहे का?"
आता तुमच्यासारख्या कुणा नवशिक्याला हा प्रश्न कळलाच नसता, जसा माझ्या सोबत्याला कळला नव्हता. पण माझ्यासारख्या अणभविक यष्टी प्रवाश्याला हे एस्टीबस बंद पडणं अनं दुसऱ्या गाडीनं मग प्रवास करावा लागणं, हे काही नवीन नव्हतं. एकदा काय झालं... नको, आत्ता नको! हेच चऱ्हाट एवढं लांबलंय की कुणी इथपर्यंत वाचत येईल याचाच भरवसा नाही! तर सांगत काय होतो - हां, रिपोर्ट..
"चला की, ड्रायव्हर तिकडे मागे आहे".
"तू जागा पकड" असा सल्ला-वजा-आदेश मी माझ्या सवंगड्याला दिला, अन् हिरो कंडक्टरच्या मागे धावलो. आता इतक्या शिवनेऱ्या अन् शिवशाह्या अन् साध्या बशी तिथे पोचल्या होत्या की ही नवी पोहोचलेली शिवनेरी मागेच आडवी लावावी लागली होती. शिरस्त्याप्रमाणे आमचा शि. ड्रा. "हाय का स्पेयर? नाय? मग हाय का जागा?" या चवकशीसाठी तिकडं गेला होता.
मग या हिरो कंडक्टरनं शिवनेरीच्या ड्रायव्हरशी सलामालकीच्या वार्ता केल्या. रिपोर्ट आहे का विचारलं? त्या ड्रायव्हरनं वैतागून सांगितलं "कंडक्टर नसतो नं आमच्या गाडीला". हिरो कंडक्टरला ही माहिती नवीन होती(!) "मग आता?" या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वीच त्या ड्रायव्हरला आमच्या शिवनेरीतल्या प्रवाश्यांनी घेरला अन् पुन्हा पिडायला सुरू केलं. हिरो कंडक्टरनं मिनीटभर वाट पाहिली, आणि मला विचारलं "तिकिट बघू तुमचं?" मी खिशातून मोबाईल काढला. "ऑनलाईन का? भले..." म्हणून हिरो तोंडभर हसला. मी ही हसून आमच्या ढपलेल्या शिवनेरीकडे बोट दाखवून म्हणालो "मग? मोठं खटलं आहे आमचं!" दोघेही परिस्थितीचा विचार करत हसत होतो. "खंयसून आलाक तुमी?" असा सवाल हिरोनं विचारला! "अहो, पुण्याचे आम्ही!" असा सानुनासिक, प्राज्ञ आणि अभिमानी जवाब देऊन आम्ही कृतकृत्य जाहलो!
मग हिरोनं डायवरला खेचला, खिशातून पेन काढलं, अन् हातावरच त्याचा नंबर लिहून घेतला. मला म्हणाला, "चला. आहे का कोणी आणखी?" एक जोडपं, दोन चार इतर मंडळी, दोन कन्यका, एक आत्या, एकदोन मावश्या आमच्या मागे गाडीत चढल्या. (आत्या ही बऱ्या घरी दिलेली असते, पण मावशी गावाकडली असलेली चालते!) आणि आमच्या नवीन, पण लय जुन्या, गाडीच्या डायवरसायबांनी गाडी रिव्हर्सात घातली.
घाटाला सुरुवात होताच भरून आलेलं आभाळ गळू लागलं. साधारणतः साडेपाच वाजले असतील संध्याकाळचे. परतीचा प्रवास सुरू करून चारेक तास झाले होते. अजून बराच पल्ला गाठायचा होता. पण हवेत गारवा होता. समोर हिरवागार डोंगर होता. लांबवर ढगांची फौज सह्यकड्याशी झुंजताना दिसत होती. उघड्या (आणि खडखडत्या) खिडक्यांमधून हवा येत होती. शिंपणाऱ्या पावसाचे तुषार मनलुभावन होते! या खुल्या वातावरणात पंचेंद्रिय आनंदाच्या शिडकाव्यात न्हाऊन निघत होती. अवघ्या मराठी मनाला (म्हणायला काय जातं) बोरघाटातल्या या मौसमातल्या सृष्टीसौंदर्यची भलतीच आस असते. इतर आठ महिने रखरखीत असणारा आसमंत आता मृदुकोमल हिरवाईनं कोंदाटला असतो. अशा वातावरणात गप्पा रंगल्या नाहीत तर नवलंच! पण...
घाटाच्या पहिल्याच चढावर गाडीनं नागाची चाल दाखवायला सुरुवात केली होती. म्हंजे इतर संथपंथी ट्रकांना ओव्हरटेक करण्याचं कौशल्य दाखवताना डायवरसायेब घालतात तीच फक्त नागमोडी चाल नव्हे! ती तर होतीच, पण आमची गाडी खालच्या गियरमध्ये वेग कमी झाला की वाईच नागाचा फणा डोलावा तशी झिगझॅग चालत होती! तुम्ही कधी चाक औट असलेली सायकल चालवली आहे का? तश्शी! गाडीचं वय बोलत होतं हो! पाचेक मिंटं पाऊस झाल्यावर गाडीच्या टपावर साठलेल्या पाण्यानं आता छत आणि बॉडी यांच्या जोडामधल्या 'गंजून खल्लास' झालेल्या भागातून संततधार आत सोडायला सुरुवात केली होती! माझा सहप्रवाशी खिडकीजवळ बसला होता. त्याला या अभिषेकाची अपेक्षा नव्हती.पण जन्मजात पुणेरी खिलाडूपणानं त्यानं हे "आज नशिबात कोणाच्या नावानं ही अंघोळ लिहीली आहे काय माहीत" अशा किरकोळीत काढलं! पण आमच्या शिवनेरीतून इथे प्रस्थान ठेवलेल्या एका कन्यकेनं डायरेक्ट छत्रीच उघडली! मग मागचे-पुढचे प्रवाशी आणि तिचा लडीवाळ संवाद काही काळ घडला. या कालव्यानं आपला हिरो कंडक्टर त्याची सीट सोडून मागे आला. त्यानं कन्यकेची समजूत काढून तिला आपल्या शेजारी पुढच्या शीट वर नेलं! ती खूष दिसली - कंडक्टरवर खूष होती का पुढच्या सीटावर खूष होती कोण जाणे!
यवढं होई तो शिंग्रोबाचं वळण आलं होतं. बाकी आवाज कितीही आणि कसेही असले तरी गाडीच्या इंजिनाचा आवाज एकदम सुरेल होता. यष्टीचा डायवरही मस्त तंद्रीत गाडी काढत होता. कधी रेंगणाऱ्या ट्रकच्या मागून, एखाद्या शिवनेरीला डावी घालून, कधी ट्रॅव्हलच्या गाडीला पास करत आमची यष्टी एकदम तावात घाट चढत होती. गाडीतले पब्लिकही आता बसणारे गचके, गळणारं पाणी, होणारे आवाज याच्याशी एकतान होऊन प्रवासाची मजा चाखत होते!
आमच्या दोन शिटा पुढं एक तरूण जोडपं बसलं होतं. दुपट्या-टोपड्यात गुंडाळलेलं काही महिन्याचं बाळ त्यांच्या मांडीवर होतं. त्या शहाण्या बाळानं एकही आवाज केला नव्हता अजून! त्याचा बाप त्याला पहिला-वहिला मान्सून दाखवत होता. हातात उभं धरून त्याला खिडकीतून गहिरा हिरवा शालू ल्यालेल्या निसर्गाची ओळख करवत होता! तेही बाळ टकटका नजरेनं तो नजारा, ती एस्टी, तो जनसमुदाय, तो पाऊस, ते (बारकेच) खळाळते धबधबे, सगळं काही मान वळवून वळवून निरखत होतं. अमृतांजन पॉइंट जवळ होणारी नेहमीची वाहनांची गर्दी होती. शेजारच्या एका ओम्नी व्हॅनमधल्या टपोरी तरुणाला हे देखणं बाळ दृष्टीस पडलं! त्या टग्याच्याही चेहेऱ्यावर हसू पसरलं. त्या गोंडस बाळाला त्यानं हात काय केला, हाक मारली, वाकुल्या दाखवल्या. त्याच्या जोडीदारणीनंही वाकूवाकू बाळ पाहिलं. आणि या श्रोतृवृंदावर प्रसन्न होऊन ते बाळ आपलं बोळकं पसरून गोड हसलं! त्या नजाऱ्याला जणु चार चांद लग गये!
'घाट संपला' ही पाटी मागे गेली, अन् नळ बंद करावा तसा पाऊस बंद झाला. पुढचा रस्ता कोरडाठाक! मजल-दरमजल करत गाडी चांदणी चौकात आली. (हो, आता संपत आलं हं..) लवकरच पुन्हा भेटण्याचा वादा करून वनाझला माझा सोबती उतरला.
मगाधरनं आमच्याच शिवनेरीतून इकडे शिफ्ट झालेल्या जोडप्यातली वैनी दादांना ढोसत होती. आता पुणं आलंय तर विचारा की.. म्हणून. मग दादा एकदाचे उठले आणि दगडूशेटला जायचं तर कुठं उतरायचं हे कंडक्टर डायवर यांना विचारू आले. त्यांनी काय उत्तर दिलं हे मला कळलं नाही. पण हिकडे यिवून वैनीन्ला दिलेल्या उत्तरानं वैनींचं समाधान झालं नाही हे मात्र कळलं. एस एन डी टी ला उतरण्यासाठी म्हणून आता आत्याबाई उठल्या होत्या. त्यांनी ही चर्चा ऐकली. का कुणास ठाऊक, त्यांनी सल्ला दिला डेक्कनला किंवा गरवारे कॉलेजला उतरा आणि रिक्षा करा! ही बस गरवारे वरनंही जात नाही आणि डेक्कनही नाही. तर या सल्ल्याचा त्यांना काय उपयोग? असो. आत्याबाई उतरल्या दादा-वैनी पुढे आले. मग मी चर्चेत उतरलो.
"दादा, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जायचंय का तुम्हाला?"
"होय, आणि रात्री परत"
"मगापासून मी ऐकत होतो. ही बस नळस्टॉपला वळून म्हात्रे पुलामार्गे स्वारगेटला जाते. त्यामुळे त्या ताई म्हणाल्या ते अगदी चूक नसलं तरी तुम्हाला ते करता येणार नाही."
तेवढ्यात बस वळलीच म्हात्रे पुलाकडे.
मग त्यांना मी बयजवार स्वारगेटवरून दगडूशेठला कसं जायचं ते समजावलं. रिक्षा कुठे घ्या ते दाखवलं. परतीच्या प्रवासाची रिझर्व्हेशन झालं तर कुठे होईल ते सांगितलं आणि अशा रितीने एका भाविक जोडप्याला देवदर्शनाचा मार्ग दाखवल्याचं पुण्य पदरी पाडून आमची ही यात्रा स्वारगेटी संपन्न जाहली.
पण आमचा पुणेरी बाणा काही सुटला नाही. उतरताना महामंडळाचा तरूण प्रतिनिधी, आपला हिरो कंडक्टर हसून माझ्याकडे बघत होता. त्याला सल्ला द्यायला विसरलो नाही, "मास्तर, प्रवास छान झाला हं! तेवढं महामंडळाला आता ही बस मोडीत काढायला सांगा! हा पावसाळा संपलेला काही पाहणार नाही बहुधा." त्याच्या उजळलेल्या चेहेऱ्यावर संमतीदाखल हास्य उमटले होते!
छान लिहिलंय. ते चित्र फार
छान लिहिलंय. ते चित्र फार मस्त आहे!
मस्त लिहिलयं!
मस्त लिहिलयं!
काय लिहिलंय!!!
काय लिहिलंय!!!
मी एसटीचे आरक्षण कधीच करत नाही.
खूप छान, खुसखुशीत. आवडले.
खूप छान, खुसखुशीत. आवडले.
एकदम मस्त... बर्याच दिवसांनी
एकदम मस्त... बर्याच दिवसांनी असा छान विनोदी लेख वाचला...!!
(आत्या ही बऱ्या घरी दिलेली असते, पण मावशी गावाकडली असलेली चालते!) या वाक्याला भरपूर हसलो.
मस्तच लिहिले आहे
मस्तच लिहिले आहे
सुकुरवाडी आणि नॅन्सी कॉलनी येथून पुण्यापर्यंत प्रवास केला आहे त्यामुळे बऱ्याच घटना वाचताना अनुभवल्या.
मस्त लिहिलंय.सगळं एकदम
मस्त लिहिलंय.सगळं एकदम डोळ्यासमोर आलं.
याच्यावर एखादी शॉर्ट फिल्म बनवून हिरो कंडक्टर च्या भूमिकेत ललित प्रभाकर ला घ्यावं की काय
एकदमच मस्त लिहिलं आहे. पुलं
एकदमच मस्त लिहिलं आहे. पुलं ची " म्हैस "आठवली वाचताना.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
चित्रातली ST एकदम गोड
एकदम खुसखुशित !
एकदम खुसखुशित !
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
रिझर्वेशन करून एसटीने प्रवास करण्याचा आणि आपल्या राखीव सीटवर आधीच दुसरं कुणीतरी बसलेलं असण्याचाही बराच अनुभव आहे. कंडक्टर चांगले असतात जनरली. ड्रायव्हरशी बोलण्याची कधी फारशी वेळ येत नाही.
कर्नाटकच्या लोकल गाड्याही चांगल्या असतात बरं.
मस्त बुवा
मस्त बुवा
झक्कास लिहीलंय. मजा आली
झक्कास लिहीलंय. मजा आली वाचायला.
याच्यावर एखादी शॉर्ट फिल्म बनवून हिरो कंडक्टर च्या भूमिकेत ललित प्रभाकर ला घ्यावं की काय >>> चालेल
मस्त खुसखुशीत...
मस्त खुसखुशीत...
लाल डब्याची परीची आठवण झाली.
लाल
डब्याचीपरीची आठवण झाली. कॉलेजच्या वेळेस खूप प्रवास केलेला. मग मुंबईला काम असताना शिवनेरीचा प्रवास सुरू झाला. पण इकडे कल्याण कडून येणारी माळशेजमार्गे असणारी लाला परीच असायची. पावसाळ्यात अगदी मजा असायची अशा प्रवासात.चित्र आवडलं. कुणी काढलं? एआइ?
चित्र आवडलं. कुणी काढलं? एआइ?
चित्र आवडलं. कुणी काढलं? एआइ
चित्र आवडलं. कुणी काढलं? एआइ >> हो
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
@Abuva आपली हरकत नसेल तर, ते
@Abuva आपली हरकत नसेल तर, ते चित्र कोणत्या website वापरून तयार केले व काय प्रॉम्प्ट दिला होता हे ऐकायला आवडेल. AI ने चित्र खूप छान तयार केले आहे.
मस्त लिहिलंय. पंचेस छान
मस्त लिहिलंय. पंचेस छान जमलेत यात नवल नाही. पावसाचं, बसमधल्या झोपेचं आणि त्या बाळाच्या वर्णनाच्या वेळच्या तुमच्या भाषाशैलीचा हेवा वाटला.
आता लक्षात आलं. मी हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकेच वेळा एस टी ने प्रवास केला आहे.
माबो वाचक,
माबो वाचक,
Gemini
1: Need a good picture of a State transport bus inching up the Bor Ghat in Monsoon season.
2: Ok! Can you use this to give me a oil painting of this?
3: Can you just remove the lightning from these oil-paintings?
एसटी झोळी रिकामी.https://www
एसटीची झोळी रिकामी.
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...
धन्यवाद Abuva.
धन्यवाद Abuva.
आत्या ही बऱ्या घरी दिलेली
आत्या ही बऱ्या घरी दिलेली असते, पण मावशी गावाकडली असलेली चालते! >>>> मस्तच
हिरो कंडक्टर आवडला .
मस्त लिहिलयं!
मस्त लिहिलयं!
१) एक्स्प्रेस वेने घाटाची मजा
१) एक्स्प्रेस वेने घाटाची मजा घालवली आहे. तशी जुन्या बोरघाटाने येत असे थोडीशी. पण धबधबे रेल्वेने पळवले.
२) एसटी बसची मागची चाकं फोक्सवागन टेम्पोची एकेरी लावली आहेत चित्रात.( AI may give /generate inaccurate images म्हटलं आहेच मान्य. पण ही दुरुस्ती करून देतात का? पुढच्या रिक्वेस्टने?)
३) चित्र टुमदार (idyllic) काढले आहे. ते बघताना आणि लेख वाचताना लहानपणी पाऊस पडताना खिडकीत पाय सोडून उगाच टंगळमंगळ करतोय असं वाटतं राहिलं. दहापैकी दहा गुण देऊन टाकलेत.
चित्रदर्शी प्रवास, सुंदर भाषा
चित्रदर्शी प्रवास, सुंदर भाषा !