ही घटना सन 1974 ची . . .
हंगेरीतील वास्तुरचनाशास्त्राचे प्राध्यापक एरनो रुबिक आपल्या विद्यार्थ्यांना त्रिमिती आकृतीबंध समजावून सांगायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यासाठी निव्वळ तोंडी शिकवण्याबरोबर एखादे पूरक शैक्षणिक साधन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजायला सोपी जाईल. मग विचारांती त्यांनी विशिष्ट प्लास्टिकच्या घटकांचा वापर करून 3 X 3 X 3 रचनेत एक क्यूब तयार केला. त्यामध्ये त्याच्या सहा पृष्ठभागांवर सहा वेगळ्या प्रकारचे रंग दिसणार अशी ती रचना होती. तशी रचना केल्यानंतर मग त्यांनी क्यूबचे विविध भाग हलवून ही रंगसंगती बिघडवून टाकली. आता पुन्हा एकदा मूळची रंगसंगती आणण्यासाठी बराच विचार करुन झगडावे लागतय हे त्यांच्या लक्षात आले.
अशा प्रकारे या क्यूबमुळे एका रंगतदार बौद्धिक खेळाचा जन्म झाला. बिघडवून टाकलेली रंगसंगती जेव्हा अथक प्रयत्नांती पुनर्स्थापित केली जाई तेव्हा बघणाऱ्याला एकदम जादू झाल्यासारखे वाटे. म्हणूनच त्या क्यूबला त्यांनी जादूचा क्यूब असे नाव दिले. त्यानंतर काही वर्षांनी रुबिक यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या क्यूबला देण्यात आले.
. . .
पुढे 50 वर्षानंतर म्हणजेच आज हा क्यूब जागतिक पातळीवर अगदी झळाळून उठलाय. सध्याच्या डिजिटल युगातही निव्वळ हाताने फिरवाफिरवी करायचा हा बैठा बौद्धिक खेळ खूप लोकप्रिय असून त्याचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवून आहे. तो एकट्याला खेळता येतो हे देखील त्याचे एक वैशिष्ट्य. सध्या रुबिक क्यूब हे मुद्रानाम कॅनडाच्या स्पिन मास्टर कॉर्पोरेशनची मालकी असून त्यांनी आतापर्यंत 500 दशलक्षहून अधिक अधिकृत क्यूबजची विक्री केलेली असून त्यातून सुमारे 75 दशलक्ष डॉलर्सची कमाई केलेली आहे. याच्या जोडीला अनधिकृतरित्या देखील क्यूबजची विक्री जोरात असून दोन्ही प्रकारच्या विक्रीतून आजपावतो कोट्यवधी क्यूबज विकले गेलेत.
1974 ते 2024 या अर्धशतकातील या क्यूबची टप्प्याटप्प्याने प्रगती आणि वाटचाल कशी झाली ते आता पाहू.
1970 च्या दशकात प्रा. रुबिक बुडापेस्ट येथील अकॅडमी ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्टस या संस्थेत प्राध्यापक होते. हा क्युब तयार करण्यामागे त्यांचे दोन हेतू होते :
१. या क्यूबमधून मुळात एक रचनात्मक प्रश्न मांडलेला आहे. क्यूबचे विविध भाग विविध पद्धतीने हलवून सुद्धा संपूर्ण क्यूबचा सांगाडा जसाच्या तसाच राहतो.
२. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तूरचनेतील त्रिमितीय संकल्पना नीट समजते.
प्राध्यापक महोदयांनी रंगीत क्यूब प्रथम तयार केला. नंतर त्याची रंगरचना मुद्दाम बिघडवली आणि मग विशिष्ट प्रकारे क्यूबचे भाग फिरवून ती पुनर्स्थापित केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण एका अभिनव बौद्धिक कोड्याला जन्म दिलेला आहे. या महत्त्वपूर्ण शोधाचे पेटंट मिळवण्यास ते उत्सुक होतेच आणि लवकरच म्हणजे 1975 मध्ये त्यांना हंगेरीत ते मिळाले. पुढे 1977 मध्ये प्रायोगिक स्वरूपातील क्यूबज तयार करून ते बुडापेस्टमधील खेळण्यांच्या दुकानात विक्रीस ठेवले गेले. पुढील एक दोन वर्षात त्याची खेळण्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये युरोपात जाहिरात करण्यात आली. त्याची संभाव्य जागतिक लोकप्रियता लक्षात घेऊन अखेर 1980 मध्ये त्याला रुबिक क्यूब असे सार्थ मुद्रानाम दिले गेले.
रंगसंगती
सुरुवातीच्या क्यूबच्या सहा पृष्ठभागांवर प्रत्येकी नऊ स्टिकर्स लावले होते आणि ते सहा ठळक रंगांत होते -
पांढरा, लाल, निळा, नारिंगी, हिरवा आणि पिवळा.
पुढे क्यूबच्या मूलभूत रचनेत सुधारणा करून प्लास्टिक पॅनेल वापरण्यात आली. त्यामुळे रंग अगदी पक्के राहतात. 1988 पासून ही रंगसंगती अशी प्रमाणित करण्यात आली :
* पांढऱ्याच्या विरुद्ध बाजूस पिवळा,
* निळ्याच्या विरुद्ध बाजूस हिरवा, तर
* नारंगीच्या विरुद्ध बाजूस लाल.
यांत्रिक रचना
क्युबच्या विविध बाजू सहजगत्या फिरवता याव्यात यासाठी त्यामध्ये विशेष यांत्रिक रचना केलेली आहे. त्याला core mechanism असे म्हणतात. मूलभूत क्यूब हा 3 X 3 X 3 या रचनेचा असतो आणि त्यात एकूण 27 लघुक्युब्ज असतात. त्यापैकी 26 दृश्य असतात. त्याचबरोबर ठोकळ्याच्या गाभ्यात एक अदृश्य क्युब असतो ज्यामुळे संपूर्ण रचना एकसंध राहते. क्युबच्या प्रत्येक बाजूची लांबी 5.6 सेंटीमीटर असते. अंतर्गत रचनेमध्ये पूर्वी स्क्रूज वापरले जायचे. आता त्यांची जागा रिव्हेट्सनी घेतलेली आहे.
गणिती सूत्र
क्यूबच्या विविध बाजू आपण चाळा म्हणून मनात येईल त्याप्रमाणे अनेकदा फिरवत बसतो आणि त्यातून निर्माण होऊ शकणारे दृश्यरंग पर्याय (configurations) अक्षरशः प्रचंड आहेत. नेमके सांगायचे झाल्यास, अखंड (intact) क्यूब प्रत्यक्ष माणसाने सोडवताना होऊ शकणारी त्यांची संख्या अशी अगडबंब आहे :
43,252,003,274,489,856,000 !
( मात्र क्युबचे सर्व घटक सुटे करून या प्रकारचे गणित केल्यास ती संख्या वरील संख्येच्या बारापट आहे. याहून अधिक गणिती क्लिष्टतेत जायचे आपल्याला कारण नाही).
या क्यूब-कोड्याच्या मुळाशी असे क्लिष्ट गणिती सूत्र असल्याने ते सोडवण्यासाठी हा क्यूब गणितज्ञांच्या आवडीचा विषय झाला यात नवल ते काय? या कोड्याची उकल करण्यासाठी गणितातील ग्रुप थिअरीचा आधार घेतला जातो आणि त्यानुसार विविध अभ्यासकांनी उकल करण्याच्या काही गणिती रीती शोधल्यात. प्रत्यक्ष गणिताचा अभ्यास नसला तरीही काही जणांना छानपैकी तर्कसंगत डोके चालवता येते. अशा लोकांनीही त्यांच्या अनुभवातून या संबंधीच्या ज्ञानात भर घातलेली आहे. जगातील काही देशांमध्ये या क्यूबचे प्रशिक्षण वर्गही घेतले जातात. अलीकडे आंतरजालावरही या प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
1980 to 1983च्या दरम्यान क्यूबची अक्षरशः जागतिक लाट आलेली होती. अनेक देशांमध्ये त्याच्या लोकप्रियतेतून तो वेगाने सोडवणारे लोक तयार होऊ लागले आणि त्यातूनच या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा उगम झाला. अशी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा बुडापेस्टमध्ये 1982 मध्ये झाली. तेव्हाच्या विजेत्याने क्यूबची उकल 22.95 सेकंदात पूर्ण केली होती. जेव्हा मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होऊ लागल्या तेव्हा त्यासाठी क्यूबच्या बाजू वेगाने फिरवण्याची सोय असणे आवश्यक ठरले. सुरुवातीस त्यासाठी वंगण म्हणून व्हॅसलिनचा वापर करत होते. सध्याच्या आधुनिक वेगवान क्यूबमध्ये त्याऐवजी अंतर्गत लोहचुंबक आणि अन्य काही घटक बसवलेले असतात.
स्पर्धेसाठी ठेवलेल्या क्यूबमधील रंगांची रचना विविध पद्धतीने बिघडवून ठेवलेली असते. त्याची पूर्ण उकल करण्यासाठी खेळाडूला कमीत कमी किती वेळा क्यूबच्या बाजू फिरवाव्या लागतील याचाही शास्त्रशुद्ध अभ्यास झालेला आहे. कमीत कमी वेळा काही बाजू फिरवून कोड्याची उकल करणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. तो कमीत कमी आकडा (“देवांक”) किती असेल यावर अनेक वर्षे अभ्यास झाला आणि सन 2010 मध्ये असा निष्कर्ष निघाला की हा आकडा कधीही 20 पेक्षा जास्त असणार नाही.
क्यूबचा पुरेसा अभ्यास केल्यानंतर अनेक जण त्याची उकल करू शकतात परंतु स्पर्धांमध्ये अर्थातच वेगवान उकल करण्याला महत्त्व आहे. अशा स्पर्धात्मक वातावरणातून जगभरात अनेक वेगवान क्यूबपटू तयार झालेत. त्यातील जागतिक पहिल्या शंभर स्थानांवर असलेले खेळाडू ही उकल एका दमात (single-solve) पाच सेकंदापेक्षा कमी वेळात करतात. या शतकी यादीत अद्याप कोणाही भारतीयाने स्थान मिळवलेले नाही. अर्थात भारतीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये काही जणांना ही कामगिरी जमलेली आहे. सन 2023 चा जागतिक विजेता मॅक्स पार्क हा कोरियाई-अमेरिकी खेळाडू असून त्याने 3.13 सेकंदाचा उकल-विक्रम केलेला आहे. एक उल्लेखनीय बाब म्हणजे मॅक्स पार्क स्वमग्नताबाधित (autistic) आहे.
गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास झाल्यानंतर या क्यूबच्याही त्याद्वारे काही चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. गेल्याच महिन्यात क्यूबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मित्सुबिशी इलेक्ट्रिकच्या TOKUFASTbot या यंत्रमानवी तंत्राने क्यूबची उकल करण्याचा नवा जागतिक विक्रम केलाय. या विक्रमाची वेळ आहे 0.305 सेकंद !! याला ‘निमिषार्ध’ म्हणता येईल.
या खेळाचा विकास आणि प्रसार करण्यासाठी जागतिक क्यूब संघटनेची (WCA) स्थापना झालेली आहे. मूलभूत स्पर्धा 3 X 3 X 3 रचनेच्या क्यूबची असायची. परंतु आता संघटनेने त्यात 17 विविध प्रकारांची भर घातलेली आहे. त्यामध्ये अन्य रचनेचे विविध क्यूब तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ, 2 X 2 पासून 7 X 7 पर्यंत. तसेच क्यूबचा मूलभूत आकार बदलून pyramid & dodecahedron या प्रकारांच्या प्रकारांतले क्यूब देखील बनवलेले आहेत. तसेच खेळाडूंचे डोळे रुमालाने झाकून उकल करण्याच्या आव्हानात्मक स्पर्धा पण घेतल्या जातात.
मेंदूविकारातील पूरक उपचार
क्युबच्या खेळामध्ये मेंदू, डोळे आणि हात यांचा सुरेख समन्वय साधावा लागतो. थोड्याफार प्रशिक्षणातून यात जेव्हा एखाद्याची प्रगती होऊ लागते तेव्हा तो स्वतः देखील पर्यायी गणिती रीती शिकत जातो. याच तत्वाचा उपयोग करुन हा क्युब काही मेंदूविकारांसाठी पूरक उपचार ठरतो. स्वमग्नतेसारख्या विकारांमध्ये मुलांचे मूलभूत संवाद कौशल्य अविकसित असते. अशी मुले सातत्याने काही विचित्र हातवारेही करत असतात आणि त्यांचा समूहातील वावर एकंदरीत विचित्र असतो. अशा मुलांची वरील बिघडलेली कौशल्ये काही प्रमाणात सुधारण्यासाठी क्युबसारख्या निरनिराळ्या बौद्धिक खेळांचा उपयोग होतो. वर उल्लेखलेल्या जागतिक विजेत्या मॅक्सच्या आईने त्याला हा क्युब मुद्दामहून शिकवून त्याचा बुद्धीविकास करायला मदत केलेली आहे. अशा मुलांनी विशेषतः स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने त्यांचा समूहवावर आणि संवादकौशल्य सुधारते असा अनुभव आहे.
भारतातील प्रशिक्षण आणि विकास
सन 1980 पासून भारतात लोकांना क्यूब माहिती होऊ लागला होता. तेव्हा भाभा अणुसंशोधन आणि टाटा मूलभूत संशोधन केंद्रातील काही वैज्ञानिकांनी यात लक्ष घातले आणि क्यूबची उकल करण्याच्या काही गणिती रीती निबंध लिहून प्रसिद्ध केल्या होत्या. सुरुवातीस या खेळाकडे आकर्षित झालेले काही जण मूळचे बुद्धिबळपटू होते.
कालांतराने आयआयटीजमध्ये इच्छुक विद्यार्थ्यांना या खेळाचे मार्गदर्शनही होऊ लागले. मुंबई आयआयटीचा रुबिक क्यूब समूह चांगल्यापैकी सक्रिय असून त्याच्या सदस्यांनी काही अनोख्या स्पर्धा आयोजित करून त्यांत राष्ट्रीय विक्रम केलेत.
बैठ्या बौद्धिक खेळांचा विचार करता भारतात बुद्धिबळाचा विकास उत्तम झालेला असून आपल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मानसन्मान पटकावलेले आहेत. त्या तुलनेत क्यूब मात्र अजूनही विशिष्ट समूहांमध्येच फिरतो आहे. अजूनही बरेच जण त्याच्या माहितीअभावी त्याला एक मुलांचे खेळणे समजतात अशी खंत काही क्यूबपटूंनी व्यक्त केलेली आहे.
व्यक्तिगत अनुभव आणि रंजन
मी प्रथम हा क्यूब 1981-82 च्या दरम्यान पाहिला. तेव्हा आमचे काही मित्र आयआयटीत होते आणि सुट्टीमध्ये ते घरी आले की आम्हाला भेटत. ते नुकतेच क्यूब शिकत होते. त्यांच्यातील काही जणांना फक्त एका बाजूची रंगउकल जमत असे तर सर्व बाजू जमणारा त्यातला एखादाच होता. तेव्हा सहज गंमत म्हणून क्यूब बघितला तेव्हा हे आपल्या आवाक्यातले नाही असे लक्षात आले. कालांतराने तो खेळ ज्यांना सहज जमत होता त्यांच्याबद्दल कौतुक वाटले.
त्यानंतर एकदम सन 2005 मध्ये क्यूबच्या संपर्कात आलो. तेव्हा आयुष्यातील बराच काळ एकलवास्तव्यात जाणार होता. त्या काळात एकटेपणा घालवण्यासाठी साहित्यवाचन, शब्दकोडे आणि मनसोक्त संगीत ऐकण्याचा आधार घेतलेला होताच. त्याच्या जोडीला एक क्यूब खरेदी केला. गाणी ऐकता ऐकता हातांना चाळा म्हणून तो खेळत बसण्यात सुद्धा मजा असते. तेवढा वेळ डोळ्यांची इ-स्क्रीनपासून सुटका होते हा पण एक फायदा. बऱ्याच प्रयत्नांती मला आजपर्यंत त्याची फक्त एक बाजू उकल करायला जमलेली आहे. गेल्या दहा वर्षात क्यूबशी पुन्हा एकदा संपर्क तुटलाय. मात्र त्याच्याबद्दलचे एक सुप्त आकर्षण मनात जरूर आहे.
आपल्या वाचकांपैकी बरेच जण क्यूबचे शौकीन असणार. त्यांचे अनुभव वाचण्यास उत्सुक आहे.
जगभरातील भिन्न भाषा आणि संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम खेळांमुळे शक्य होते. या संदर्भात खेळांच्या विश्वातल्या बौद्धिक बैठ्या खेळांचा देखील काही वाटा आहे. शब्दखेळांच्या बाबतीत भाषेचा प्रश्न मूलभूत असतो. मात्र बुद्धिबळ असो अथवा रुबिक क्यूब, यांच्या बाबतीत तो प्रश्न उद्भवत नाही. वरवर जादूई वाटणारा हा क्यूबचा खेळ मुळात काही गणिती तत्त्वांवर आधारलेला आहे. प्रत्यक्ष खेळाव्यतिरिक्त या क्युबचा वापर विविध प्रदर्शने, चित्रपट आणि कलाकुसरीच्या गोष्टींमध्येसुद्धा केलेला आहे. हा अनोखा कष्टप्रद शोध लावणाऱ्या प्राध्यापक रुबिक यांना वंदन करून लेखसमाप्ती करतो.
***************************************************************************************************************
चित्रसौजन्य : विकी.
नेहमी प्रमाणे छान माहितीपूर्ण
नेहमी प्रमाणे छान माहितीपूर्ण लेख !
छान, रंजक लेख!
छान, रंजक लेख!
लेकासाठी रुबिक क्यूब आणला होता पण आता ते माझे आवडते कोडे आहे.
मला क्यूब दोन लेव्हल पर्यंत सहज सोडवता येतो. तिसऱ्या लेव्हलचे अल्गोरिदम पाठ झाले कि संपूर्ण जमेल.
रुबिक क्यूब विषयी अगदी सर्व
रुबिक क्यूब विषयी अगदी सर्व बाजूंनी व सर्वसमावेशक अशी माहिती असलेला सुंदर लेख हा क्यूब ज्या काळात जग प्रसिद्ध झाला होता तो लहानपणीचा काळ आठवला. तेंव्हाच्या आठवणीही जाग्या झाल्या.
त्याच काळात एक साधे द्विमितीय कोडे सुद्धा असायचे, ज्यात उभे आडवे सरकवता येणारे प्लास्टिकचे आठ चौरस असायचे एक ते आठ अंक लिहिलेले, व एका चौरसाचा (नववा) भाग रिकामा. आपल्यापैकी अनेकांना हे आठवत असेल. ते कोडे तुलनेने सोपे होते. रुबिक क्यूब हे त्याचेच त्रिमितीय रूप कुणीतरी बनवले असेल असे तेंव्हा वाटले होते.
पुढे त्याचे जागतिक विक्रम केलेले सुद्धा ऐकायला मिळत असे. कुणीतरी दोन सेकंदात सोडवले वगैरे. त्या अफवा असतील असे वाटायचे (दोन सेकंद तो क्यूब हातात धरायलाच लागतात, अशी एक मल्लिनाथी सुद्धा आठवते). पण हा लेख वाचत गेल्यावर खरेच असे वर्ल्ड रेकॉर्ड असल्याची माहिती वाचून आश्चर्य व मौजही वाटली. कमीत कमी २० वेळा तरी फिरवावे लागते. असे असेल तर जेंव्हा एखादी व्यक्ती ५ सेकंदात सोडवते, याचा अर्थ त्या खेळाडू कडून सेकंदाला चार वेळा बाजू फिरवल्या जात असतील! म्हणजे खरंच कमाल आहे. आणि ३.१३ सेकंदाचे मागच्या वर्षीचे रेकॉर्ड ते सुद्धा ऑटिस्टिक मुलाचे वाचून केवळ थक्क व्हायला झाले.
लहानपणी हा क्यूब सोडवण्याबाबत जितकी उत्सुकता होती तितकीच किंबहुना जास्तच उत्सुकता हा क्यूब बनवला कसा असेल? चहुबाजूंनी फिरतो म्हणजे मध्ये चुंबक असेल का? वगैरे प्रश्न मनात यायचे ते सुद्धा आठवले (त्या नादात क्यूब निखळूनही पाहिला होता). त्या पार्श्वभूमीवर, चुंबक आणि वंगणाचा उपयोग केलेले क्यूब होते हे वाचून प्रचंड मौज वाटली.
जाता जाता रुबिक क्यूब संदर्भात अजून एक नोंद. मागच्या वर्षीच टायटन नावाच्या पाणबुडीतून टायटॅनिक जहाज पहायला गेलेले प्रवासी महासागराच्या तळाशी पाणबुडीचा स्फ़ोट झाल्याने मृत्यमुखी पडले. बातम्यांतील वृत्तानुसार त्यापैकी एकजण रुबिक क्यूब घेऊन गेला होता व जगातील सर्वात खोल जागेत हा क्यूब सोडवल्याचा जागतिक विक्रम करण्याचा त्याचा मानस होता. हे केवळ या अनुषंगाने आठवले म्हणून नोंद.
असो. खरंच खूपच माहितीपूर्ण व सर्वसमावेशक लेख कुमार सर. खूप खूप धन्यवाद.
नेहमी प्रमाणे छान माहितीपूर्ण
नेहमी प्रमाणे छान माहितीपूर्ण लेख !>>>>+११
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
अतुल यांनी दिलेली माहिती खूपच रंजक असून आवडली.
छान लेख!
छान लेख!
नेहमीप्रमाणे माहितीप्रद आणि
नेहमीप्रमाणे माहितीप्रद आणि रंजक लेख.
गेल्याच महिन्यात क्यूबच्या
गेल्याच महिन्यात क्यूबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मित्सुबिशी इलेक्ट्रिकच्या TOKUFASTbot या यंत्रमानवी तंत्राने क्यूबची उकल करण्याचा नवा जागतिक विक्रम केलाय. या विक्रमाची वेळ आहे 0.305 सेकंद !! याला ‘निमिषार्ध’ म्हणता येईल. >> ह्याबद्दल अजून एक म्हणजे. सुरूवातीला जेंव्हा हो रोबो बनवला गेला नि त्याने कोडे सोडवले तेंव्हा त्याच्या अतिशय फास्ट मूव्हमेंट्स्मूळे रुबिक मोडत होते . हा रोबो चा दोष आहे असे वाटल्याने त्याचे स्लो मोशन रेकॉर्डींग करून चेक केल्यावर लक्षात आले कि क्युबे मेकॅनिकली हँडल करू शकत नव्हता. मग स्पेशल क्यूब बनवण्यात आले.
रंजक लेख. क्यूब आतमधे कसे जोडलेला असतो ह्याचे नेहमीच कुतूहल वाटत राहिले आहे.
छान लेख.
छान लेख.
रुबिक क्यूब आजवर पूर्ण करता आलेला नाही, नेहेमी अर्ध्यावर सोडलाय
रोचक माहिती आणि लेख डॉक्टर.
रोचक माहिती आणि लेख डॉक्टर. मला पण आवडतो रुबिक चाळा , एक किंवा दोन बाजू होतात नंतर गडगडतं प्रकरण. माझ्या धाकट्या बहिणीचा नवरा रुबिक क्युब काही मिनीटात सोडवायचा. अशा जिनीयस लोकांचा मला कायम आदर वाटतो.
क्यूबचे स्वानुभव
क्यूबचे स्वानुभव लिहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद !
..
* तेंव्हा त्याच्या अतिशय फास्ट मूव्हमेंट्स्मूळे रुबिक मोडत होते
>>> हे भलतेच रोचक आहे. छान !
नेहमीप्रमाणे माहितीप्रद आणि
नेहमीप्रमाणे माहितीप्रद आणि रंजक लेख.
नेहमीप्रमाणे माहितीप्रद आणि
.
खूप छान लेख. मुद्रानाम हा
खूप छान लेख. मुद्रानाम हा नवीन शब्द कळला. ट्रेडमार्कसाठी प्रतिशब्द माहीत नव्हता.
रंजक....
रंजक....
हा एक खेळ एवढंच माहीत होतं....
नेहेमी प्रमाणे डॉक्टर
नेहेमी प्रमाणे डॉक्टर साहेबांचा माहितीपूर्ण, रोचक आणि ज्ञानरंजक (Infotainment) लेख. आणि विषय देखील एकदम "हटके" निवडला आहे.
ह्या रुबिक घन ची ख्याती ऐकून एका परदेशी वारी मध्ये हा खास शोधून पुतण्यासाठी आणला होता. रंग संगती विस्कटल्यावर त्याने पुन्हा पूर्वीसारखा करून द्या अशी मागणी केली तेव्हा बरीच खटपट केल्यानंतर 'यह अपने बस की बात नहीं' असे लक्षात आले.
तेव्हा त्या घनाच्या बाजू सरळ रंगाने रंगवाव्यात असा हिंसक विचार मनात आल्याचे स्मरते आहे.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
मुद्रानाम हा नवीन शब्द >>
brand = मुद्रानाम
trade mark = व्यापारचिन्ह
( माझ्या वाचनानुसार)
*सरळ रंगाने रंगवाव्यात असा
*सरळ रंगाने रंगवाव्यात असा हिंसक विचार
>>> भारीच !
मी एक बाजू जमली यातच समाधान मानले. त्यापुढे रीतसर शिकावे लागेल हे लक्षात आले.
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
रुबिक क्यूब जेव्हा प्रथम पाहिलेला तेव्हा इंटरनेट विस्फोट झालेला नव्हता. हे सोडवता येते ह्यावर विश्वास नव्हता.
मुलाच्या शाळेत ह्याचे लोण पसरले.
मग मुलासाठी बड्डे गिफ्ट हेच. तो मात्र युट्युब व्हिडिओ बघून शिकला. मिनिट भरात सोडवतो. यथावकाश घरात 2 बाय 2, 3 बाय 3, 4 बाय 4, पिरॅमिड, दंडगोल आकाराचा, डमरू आकाराचा, एक गोल्डन आणि असिमेट्रिक शेप असलेला असे वेगवेगळे ( क्यूब नसलेले देखील ) क्यूब आले. मला काय आजतागायत सुटले नाहीये हे कोडे.
त्रिमितीय विचार करण्यास प्रवृत्त करणारे चांगलं खेळणं आहे असे म्हणेन.
जाता जाता आठवलेली गंमत.
एकाने युट्यूब वर कसाही विस्कळीत असलेला क्यूब सोडवण्याचे अल्गोरिदम समजावून सोडवत असा विडिओ टाकलेला. आम्ही बर्याच वेळा विडिओ पाहिला, लिहून घेतले अल्गोरिदम पण आमचे काही सुटेना. नंतर पाहिले त्याने कॉमेंट बंद ठेवलेल्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेले हा prank विडिओ आहे
अच्छा ब्रँड आहे होय!
अच्छा ब्रँड आहे होय!
ट्रेनमध्ये एका माणसाने एकदा
ट्रेनमध्ये एका माणसाने एकदा हातातल्या रुबिक क्युबकडे पाहीले व डोळे मिटले आणि टकाटक, २ मिनिटात कोडे सोडवले.
रंजक लेख.
रंजक लेख.
मी पण क्यूब पहिल्यांदा १९८० +/- १ मध्ये पाहिला. मित्राकडे होता. त्याच्याशी खूपच खेळुन झाले तेव्हा. परीक्षा जवळ आली तेव्हा त्याच्या आईने मग क्यूब कुलुपात घातला आणि त्याचा नाद सुटला.
अरे वा ! आपण सर्वांनी
अरे वा ! आपण सर्वांनी लिहिलेले कौटुंबिक आणि परिचितांचे अनुभव रंजक आहेत.
क्युबच्या गमतीजमती पण छान !
त्याचा नाद लागतो हे मात्र खरे आहे.
छान, रंजक लेख!
छान, रंजक लेख!
विषय देखील एकदम "हटके" +१२३
माझा भाचा यात खूप चांगला आहे.
माझा भाचा यात खूप चांगला आहे. तो नेहमी रुबिक क्यूब्स सोडवत राहतो. तो स्पर्धांमध्येही भाग घेतो. यावर त्याने 2 व्हिडिओ बनवले आहेत.
मी हे अजिबात सोडवू शकत नाही.
https://www.youtube.com/watch?v=sz4HWXH9X3o
https://www.youtube.com/watch?v=y6HDkoSZXw4
क्युब सोडवायची सगळ्यात सोपी
क्युब सोडवायची सगळ्यात सोपी पद्धत इथे आहे. https://ruwix.com/the-rubiks-cube/how-to-solve-the-rubiks-cube-beginners...
एक आठवडाभर सराव केला तर हे कोणालाही सोडवता येईल. अगदी कोणालाही. अजुन एक आठवडा सराव केला की हे अल्गोरिथम डोक्यात फिट्ट बसतात.
या पद्धतीत फक्त ४ वेगवेगळे अल्गोरिदम लक्षात ठेवायचे आहेत. पायरी ३, ४, ५ आणि ६ साठी. पहिल्या दोन आणि शेवटच्या पायर्या इतक्या सोप्या आहेत की त्यासाठी काही लक्षात ठेवावे लागणार नाही. आणि हे अल्गोरिदम मसल मेमरी होतात दोन - तीन आठवड्यात. मग विचार सुद्धा करावा लागत नाही.
हे अगदी सोपे आहे. मेकॅनिकल आहे. हुशारी, बुद्धिमत्ता वगैरे कशाचीही गरज नाही सोडवायला (या पद्धतीने).
स्पीड क्युबिंग साठी मात्र पुढे अधिकाधिक सराव, शेकडो अल्गोरिदम वगैरे लक्षात ठेवावे लागतात. पण ते पुढच्या प्रगतीसाठी आणि ऑप्शनल.
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
एकेक चित्रफिती पाहतो आता. . .
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=PT5WAsZOKgM
Santa Claus Rubik's Cube
भारी केलाय
क्यूबबद्दल एक वेगळा दृष्टिकोन
क्यूबबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडणारे स्फुट :
https://indianexpress.com/article/opinion/editorials/rubiks-cube-a-metap...
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो.
फक्त अंतिम उत्तर येणे हेच याचे एकमेव ध्येय नसावे . . .
क्यूबबद्दल एक वेगळा दृष्टिकोन
दु प्र