भाग 1
फायनल इयरची परीक्षा संपली. सुट्ट्या सुरू झाल्या. रिझल्ट यायला अवकाश होता. पुढे करिअर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन याबद्दल निर्णय व्हायचा होता. सर्व ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी सहा मित्रांनी सहलीची योजना आखली आणि बघता बघता सहलीचा दिवस उजाडला. सहा मित्र म्हणजे दोन तरुणी, स्वरा आणि मीना, आणि चार तरुण, अमर, पवन, करण, आणि अजय, हे सर्व जण उत्साहात जंगलात जाण्यासाठी तयार झाले होते. पाठीवर बॅग, आणि मनात अद्भुत साहसी गोष्टींची स्वप्नं घेऊन ते सहा मित्र उत्साहाने करणच्या वडिलांनी त्याला भेट दिलेली "महिंद्रा मारेझो" ही सिक्स सिटर गोल्डन कलर कार घेऊन करणच्या बोरिवलीच्या घरी जमले होते आणि तिथून "पंच पालक" या जंगलात जाण्यासाठी निघाले. त्या जंगलाचे फॉरेस्ट ऑफिसर पवनच्या वडिलांचे मित्र होते. त्यांना एकदा भेटून मग ते सर्वजण फिरायला निघणार होते. देश विदेशातून सुद्धा अनेक पर्यटक तिथे येत असत.
त्यांनी सोबत टेंट, स्लीपिंग बॅग आणि स्लीपिंग पॅड, हेडलॅम्प, टॉर्च, बॅटरीवर चालणारे छोटे टेबल फॅन, फोल्डिंग चाकूचा सेट, जास्तीचे कपडे, ग्रिप असलेले चांगले बूट, टोपी, सनग्लासेस, टॉवेल, टूथब्रश, टूथपेस्ट, इतर वैयक्तिक वस्त्र, फर्स्ट एड किट (औषधे, बँडएज, अँटीसेप्टिक क्रीम), पाणी, अनेक दिवस टिकू शकतील असे खाण्याचे पदार्थ जसे ड्राय फ्रूट वगैरे, तसेच कटलरी, आपत्कालीन शिट्टी, सिग्नलिंग डिव्हाइस, छापील नकाशा, बॅकपॅक, दोर, कॅमेरा, कचऱ्याच्या पिशव्या आणि पाऊस आलाच तर रेनकोट, छत्र्या आणि इतर अनेक वस्तू असे सर्व आवश्यक साहित्य सोबत घेतले होते. या सर्व सामानामुळे त्यांच्या बॅग्स जड जरूर झाल्या होत्या परंतु त्याला काही इलाज नव्हता.
मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर हा पंच पालक नावाचा पाच पर्वतांचा एक समूह होता. त्या पाचही पर्वतांच्या मध्यभागी उंच पर्वत होता तो शिवलिंगाच्या आकारासारखा दिसत होता. प्रत्येक पर्वतात अनेक गुहा होत्या. त्या सर्व गुहा एकमेकांना जोडलेल्या होत्या, जमिनीवरून आणि जमिनीखालून सुद्धा! मध्यभागी असलेल्या त्या शिवलिंगासारख्या आकाराच्या पर्वताच्या टोकावर एक मंदिर होते तिथे जाण्यासाठी कच्ची पायवाट होती.
भगवान शिव यांना पंच महाभूतांचे (पाच महान तत्वांचे) स्वामी मानले जाते. पंच महाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आणि आकाश (अंतरिक्ष). हे तत्वे सृष्टीच्या निर्मिती, स्थिती, आणि लयाशी संबंधित आहेत आणि भगवान शिव यांना या सर्व तत्वांचे अधिपति, नियंत्रक आणि रक्षक मानले जाते. शिव तत्त्वज्ञानात, हे पंच महाभूत संपूर्ण ब्रह्मांडाचे मूळ घटक मानले जातात. त्या मंदिराचे नाव पंचपालक शिव मंदिर. तसेच या सर्व पर्वतांना वेढलेले एक जंगल होते. म्हणून या सर्व भागाला म्हणजे पर्वतरांगा आणि जंगलाचा भाग मिळून पंचपालक जंगल असे नाव होते. या सर्व पर्वतांच्या आजूबाजूला आणि संपूर्ण जंगलामधून एक नदी वाहत होती. या सर्व जंगलात आणि पर्वतराजींमध्ये कुठेतरी एक अमूल्य खजिना दडलेला आहे अशी एक दंतकथा फार पूर्वीपासून या जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावांमध्ये सांगितली जाते. आज पर्वतांपैकी अवकाश पर्वता मधल्या गुहेत जाण्याची मनाई होती. कोणी म्हणे तिथेच खजिना दडलेला आहे म्हणून कोणाला जाऊ देत नाही. मात्र खरे कारण असे होते की पूर्वी अनेक वेळा त्या गुहेत चोरून काहीजण गेल्यानंतर ते परत आले नव्हते. त्यांची बॉडी सुद्धा सापडली नव्हती. बाकी इतर चार तत्वांच्या गुहांमध्ये जायला परवानगी होती. प्रत्येक गुहेमध्ये काही रस्ते आणि ठिकाणं अशी होती की तिथून पुढे जायला पर्यटकांना परवानगी नव्हती.
जंगलामध्ये पायी फिरणे, म्हणजेच जंगलातील मार्गांवर चालणे, याला सामान्यतः "जंगल ट्रेकिंग" किंवा "फॉरेस्ट ट्रेकिंग" असे म्हणतात. या प्रकारच्या ट्रेकिंगमध्ये जंगलातील निसर्गरम्य आणि विविध मार्गांचा समावेश होतो. यामध्ये वनस्पती, प्राणी, आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो. जंगल ट्रेकिंग करताना पायवाटांचा वापर केला जातो आणि काही वेळा हे मार्ग असमान, खडबडीत आणि अडचणीचे असू शकतात. जंगल ट्रेकिंगच्या प्रकारांमध्ये, वाइल्डलाइफ ट्रेकिंग म्हणजे जंगलातील विविध वन्यजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी केले जाणारे ट्रेकिंग, नेचर हाइकिंग म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी सहज आणि सोप्या मार्गांवर चालणे, रिव्हर ट्रेकिंग म्हणजे जंगलातील नदीच्या काठाने किंवा प्रवाहाच्या मार्गाने चालणे, ज्यामध्ये नदी ओलांडणे आणि पाण्यातून चालणे याचा समावेश असू शकतो. या सहा जणांचा उद्देश वरील सर्व प्रकारची ट्रेकिंग करणे हा होता. अजयचे मनात मात्र काहीतरी वेगळे होते. त्याला ऐतिहासिक पौराणिक गोष्टींमध्ये खूप रस होता. या सर्व प्रवासामध्ये त्या जंगलाच्या ऐतिहासिक पाऊल खुणा जाणून घेण्याचा अजयचा निर्धार होता. तसेच त्या खजिनेच्या दंतकथेबद्दलही त्याला उत्सुकता होती.
"खरंच तिथे खजिना असेल का?", असे अजयने म्हणतात मागच्या सीटवर बसलेली स्वरा त्याच्या डोक्यावर टपली मारून त्याला चिडवू लागली, "ए बाबा, तिथे आमच्या सोबत जरा निसर्ग एन्जॉय कर नाहीतर उघडून बसशील इतिहासाची पुस्तके!"
त्या सगळ्यांमध्ये स्वरा ही सगळ्यात बोल्ड आणि स्वतंत्र विचारांची मुलगी होती. तिचे दोन वेळा ब्रेकअप झाले होते.
गाडी चालवणारा करण म्हणाला, "हो. तंबूमध्ये जर हा पुस्तक वाचत बसलेला दिसला तर याला आपण तिथेच तंबूमध्ये सोडून निघून जाऊ बरं का!"
"अरे मी असा तसा तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या मागे मागे येईल. अरे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जातोच आहे तर तिथला खजिना शोधू!", खादी कपडे घातलेला अजय कोरगांवकर म्हणाला.
"अरे बाबा! तो खजिना शोधण्याचा आजपर्यंत पुष्कळ लोकांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही असे रस्तोगी काका सांगतात. फॉरेस्ट ऑफिसर. पप्पांचे मित्र!", पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला पवन पाटील सांगू लागला.
ड्रायव्हर सीटवर करण, त्याच्या बाजूला अजय. सर्वात मागच्या सीटवर अमर पवन आणि मधल्या सीटवर स्वरा आणि मीना बसले होते.
"अरे, पण अजय म्हणतो आहे तर आपण एकदा चान्स घ्यायला काय हरकत आहे?" मीना मोरे म्हणाली.
"वाटलंच मला! की मीना अजून कशी बोलली नाही ते. अजय काहीतरी म्हणेल आणि मीनाचा त्याला सपोर्ट नसणार असे कधी झाले आहे का बरं?", पिवळा टी शर्ट आणि शॉर्ट्स घातलेल्या स्वराला अमर आपटे याने टाळी दिली.
"नीट बघ स्वरा, मिनाकडे! लाजली असेल ती!",निळा कुर्ता घातलेला करण सक्सेना म्हणाला.
"लाजली म्हणजे! अरे चांगले गाल लाल झाले तिचे!", स्वरा त्रिवेदी म्हणाली.
"ती लाजली आणि तू? लाजणे, नटणे, मुरडणे हे तुझ्या डिक्शनरीतच नाही आहे वाटतं!", करण स्वराला चिडवू लागला.
"हट रे! तू कोण मला सांगणारा पोरीसारखे वाग म्हणून!" स्वरा.
आरशात बघून करण म्हणाला, "बघा! एका पोरीचे चिडलेले नाक! वेडवलेला चेहरा, थरथरणारे ओठ! असे वाटते ना की गाडी थांबवावी आणि तिच्या ओठांना...."
"स्वप्नातही तसा काही विचार करू नको करण! मला तू अजून ओळखले नाही! एक उलट्या हाताची..." स्वरा.
"अगं मी तुला चांगलं ओळखतो म्हणून तर मी म्हणणार होतो की तुझ्या ओठांना चिकटपट्टी लावावी म्हणजे प्रवास शांततेने होईल! तुला काय वाटत होतं मी तुझ्या ओठांना काय करणार ते?", करण चिडवत म्हणाला.
"ए, गप बसा दोघेजण! सर्वांनी आता आपापल्या तोंडाला चिकटपट्टी लावा. आता आपण मस्तपैकी शांततेत गाणे ऐकू!", अजय म्हणाला आणि त्याने गाणे लावले: "आय एम इन लव्ह!" गायक गायिका मधुर आवाजात गाणे म्हणत होते पण प्रत्यक्षात पडद्यावर हे गाणे आक्रमक सुनील शेट्टी वर चित्रित झालेले होते. भेदक नाच करत तो आपल्या प्रेमाचा इजहार आपल्या हीरोइनकडे करत होता.
आता अजयने आपल्या बॅगेतून इतिहासाची कादंबरी वाचायला घेतली. इकडे खिडकीच्या काचेला डोके टेकून डोळे बंद करून आपले लांब लचक केस मोकळे सोडलेली गुलाबी साडीतली मीना, "आय एम इन लव्ह!" हे गाणे ओठांनी गुणगुणत कुठल्यातरी दिवास्वप्नात दंग झाली होती.
रस्तोगी अंकलकडे पोहोचल्यावर त्यांचे चांगले स्वागत झाले. रात्री त्यांच्या बंगल्याच्या अंगणात मस्तपैकी सतरंजी टाकून त्यांनी सर्वांनी एकत्र जेवण केले. अजयच्या म्हणण्यानुसार जरी खजिना शोधायचा तरीही तो इतर पर्यटक असताना शोधता येणार नव्हता. संध्याकाळी पाच वाजेनंतर जेव्हा पर्यटकांना बंदी असते तेव्हा तो शोधायला हवा. पण प्रवासातच त्यांनी ठरवले की खजिना शोधण्याची आयडिया रस्तोगी अंकल त्यांना सांगू नये. अन्यथा ते नक्कीच परवानगी देणार नाहीत आणि ते त्यांच्या पेरेंट्सना सांगून गोष्टी आणखी बिघडतील. अर्थात ते सहा जण रोज रात्री अंकलच्या बंगल्यात मुक्कामाला येणार नव्हते कारण बंगला मूळ पर्यटन ठिकाणाहून खूप दूर होता. फक्त आज आणि जमल्यास परत जाताना ते भेट देणार होते. पर्यटक जिथे तंबू टाकून मुक्काम करतात त्या भागात ते थांबणार होते. सर्व सुख सुविधा असलेले तंबू किंवा झोपड्या सुद्धा तिथे भाड्याने मिळत होते किंवा मग तुम्ही लॉजवर थांबू शकता.
रात्री जेवण करतांना अंकल कडून बरीच माहिती मिळाली. त्यांनी जंगलातील विविध धोके समजावून सांगितले. त्यांना मूलबाळ नव्हते. मात्र नवीन पिढीशी रस्तोगी दाम्पत्य चांगले जुळवून घेत.
जेवण झाल्यावर गप्पा मारता मारता अंकल म्हणाले,"ही आणि मी, स्वतः ला खूप व्यस्त ठेवतो कारण अन्यथा आम्हाला मूळ नसल्याचे शल्य बोचत राहते!"
"ते कसे काय?", करणने डोळ्यांनी मना केले तरीही स्वराने विचारले.
"ही गरोदर असताना एकदा अनपेक्षितरित्या तरसाने आमच्या घरात शिरून हल्ला केला. भितीने ही इकडे तिकडे पळायला लागली आणि फरशीवरील पाण्यावर पाय घसरून पडली. मिस कॅरिएज झाले. नंतर शरीरात असे काही कॉम्पलिकेशन तयार झाले की तो पुन्हा आई होऊ शकणार नाही असे डॉक्टर म्हणाले!"
एकूण सर्वच जण अस्वस्थ झाले. ते बघून ताण हलका करण्यासाठी रस्तोगी अंकल म्हणाले, "अरे पोरांनो. बाकी कसं काय? तुमचे शिक्षण? करीयर? मैत्री? आणि केव्हापासून बघतोय ही, काय नाव बरं तिचं?"
"सुट्ट्या संपल्यावर आम्ही ठरवणार आहोत हाईयर एज्युकेशन की नोकरी की बिझिनेस! आणि हिचे नाव आहे स्वरा!", तिच्या डोक्यावर टपली मारत करण म्हणाला.
"हां! स्वरा. ही आणि करण यांचं काहीतरी डोळ्यांनी एकमेकांना हातवारे किंवा डोळ्यांनी इशारे देणं सुरू असतं, काय भानगड आहे?", चिडवण्याच्या सुरात रस्तोगी अंकल म्हणाले.
हे एकदाच अजयकडे बघून मीना लाजली. आणि सर्वजण हसले.
"त्याचं काय आहे ना अंकल? ह्या करणची ती बस नेहमी चुकते. यांनी हात दाखवला की ती थांबतच नाही! यांनी एक दोनदा पळत जाऊन तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण हा तोंडावर आपटला!", स्वरांकडे इशारा करत अमर म्हणाला.
सर्वजण खळाळून हसले. स्वराने दोन बुक्के अमरच्या पाठीत हाणले.
पवन पुढे म्हणाला, "हीचे दोन ब्रेकअप झालेत आधी!"
हे ऐकून रस्तोगी आण्टी म्हणाल्या, "अरे पण सर्वांनी एक लक्षात ठेवा. प्रेम हे काही गमतीत घेण्याची गोष्ट नाही. प्रेम एकदाच होते. तुमच्या आजच्या पिढीच्या विचारानुसार जोडीदार बदलत राहणे हा नुसता एक जीवघेणा खेळ आहे, जो तुम्हाला कोणत्याच मुक्कामावर घेऊन जाणार नाही. परफेक्ट जोडीदाराच्या शोधात हे लक्षात राहत नाही की आपण स्वतः तरी कुठे परफेक्ट असतो? परफेक्ट मॅच असे कधीही नसते. असते ते फक्त एकमेकांना समजून घेऊन ऍडजस्ट करणे. एकमेकांना सुख दुःखात साथ देणे!"
ऐकून सर्वच जण अंतर्मुख झाले.
रस्तोगी अंकल म्हणाले, "ज्या काळात राजांसाठी बहुपत्नीत्व सामान्य बाब होती त्या काळात प्रभू श्रीरामांनी एक पत्नी व्रताचा अंगिकार केला! विसरलात? हां! आणि मैत्री जरूर असावी. निखळ असावी. कृष्ण द्रौपदी सारखी असावी. भानुमती कर्ण सारखी असावी. कृष्ण सुदामा सारखी असावी. दुर्योधन कर्ण सारखी असावी. अर्थात मित्र चुकत असेल तर त्याला वाईट मार्गावरून चालण्यास रोखणारी असावी! एकमेकांना वाईट गोष्टींमध्ये साथ देणारी मात्र नसावी!"
"पण कृष्णाबद्दल काय? त्यांनी तर अनेक बायका केल्या. त्यांची तर एक प्रेयसी सुद्धा होती?", कारण ने अडचणीत आणणारा प्रश्न केला.
"कृष्णाने करंगळीवर पर्वत सुद्धा उचलला होता. तुम्ही उचलू शकणार काय?", रस्तोगी अंकल म्हणाले.
"नाही! आम्ही सर्वजण मिळून सुद्धा नाही!" एकमुखाने सर्वजण म्हणाले.
"अरे मित्रांनो, भगवान विष्णू यांनी मानवी जन्म घेऊन त्या त्या काळानुसार वागण्याचा आदर्श घालून दिला तरीही त्यांच्या आयुष्यातील घटना या शेवटी त्यांच्या विविध आधीच्या जन्मातील आणि सध्याच्या जन्मातील कर्मांच्या फळानुसार घडल्या. आपण त्यातील चांगल्या त्या गोष्टी घ्यायच्या!"
"तुमच्या बोलण्याने खरंच आमच्या विचारांना एक नवीन दिशा मिळाली!", स्वरा म्हणाली.
अजय म्हणाला, "मी यांना ऐतिहासिक पौराणिक गोष्टी सांगायचो तेव्हा हे सर्वजण मला हसतात, चिडवतात. पण आता त्यांच्या लक्षात आली असेल की जो इतिहास वाचत नाही त्याला इतिहास घडवता येत नाही. इतिहासापासून शिकले नाही तर आपल्या सोबत तो इतिहास पुन्हा पुन्हा घडत राहतो. आणि सर्व पौराणिक कथांमध्ये आपले जीवनाचे सार लपलेले आहे. जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आपल्याला आपल्या पुराणांमध्ये कोणत्या ना कोणत्या कथेत मिळते!"
आता मात्र सर्व जणांनी अजय साठी टाळ्या वाजवल्या.
"चला झोपा आता! तुम्हाला सकाळी लवकर उठून निघायचे आहे ना. तुमच्या पुढील सुट्ट्या आणि जंगल सफारी एन्जॉय करा गुड नाईट!"रस्तोगी दाम्पत्य म्हणाले.
दिवसभराच्या प्रवासाच्या थकव्याने लवकरच सर्वजण गाढ झोपून गेले.
सकाळी सगळे मित्र जंगलाच्या प्रवेशद्वारावर भेटले. तेथे त्यांची भेट त्यांच्या मार्गदर्शक शिवराज यांच्याशी झाली. शिवराज एक अनुभवी आणि ज्ञानसमृद्ध मार्गदर्शक होते. त्यांनी सर्वांना जंगलातील नियम आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना समजावून सांगितल्या. गाडी एके ठिकाणी पार्क केली.
सर्वांनी हायकिंगची सुरुवात उत्साहाने केली. जंगलातील पायवाटांवरून चालताना त्यांना विविध प्रकारच्या झाडा-फुलांचे दर्शन झाले. अजय आणि मीना जंगलातील फुलांचे फोटो काढण्यात गुंग होत्या, तर करण आणि स्वरा पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात मग्न होते.
अमर आणि पवन विविध प्राणी न्याहाळत होते.
थोडे अंतर चालल्यानंतर शिवराज यांनी सर्वांना विश्रांतीसाठी थांबण्याचे सांगितले. त्यांनी त्या परिसरातील विशेष वनस्पतींची माहिती दिली. अजय आणि मीना त्यांच्या बोलण्यात विशेष रस घेत होते. मीना नेहमीच वनस्पतींच्या अनोख्या गुणधर्मांबद्दल जिज्ञासू असायची.
हायकिंगच्या मध्यावर मित्रांना एक मोठी आनंददायक भेट मिळाली. त्यांना एका जलाशयाच्या काठावर हरिणांचा एक कळप दिसला. हरिणांच्या या कळपाला पाहून सगळेच रोमांचित झाले. अजयने त्याचे कॅमेरा बाहेर काढले आणि हरिणांचे फोटो काढले.
आता प्रवास थोडा कठीण झाला. खडकाळ भागातून चालताना सर्वांनी एकमेकांना मदत केली. एकदा अजयचा पाय घसरला, पण मीनाने त्याचा हात घट्ट धरून ठेवला आणि अजय सावरल्यावर लाजून लगेच तिने हात सोडला. सर्वं मित्रांमध्ये मीना अबोल होती. पण दुपारी नदीच्या काठावर असलेल्या एका झाडाखाली सर्व जण थोडी विश्रांती घेत असताना, व्हॉट्स ॲप ग्रुप वर आलेले जोक्स एकमेकांना सांगून त्यांनी मीना ला हसविण्याचा आणि बोलतं करण्याचा प्रयत्न केला. ती पण हळू हळू खुलली. मोकळं बोलायला लागली.
दिवसाच्या प्रवासाच्या शेवटी, शिवराज त्यांना एका जंगलातील झोपडीवर घेऊन गेले. येथे सर्वांनी थोडी विश्रांती घेतली आणि त्यांच्या ताज्या अनुभवांबद्दल चर्चा केली. दिवसभरात त्यांना लंडनमधली क्लारा फ्लिंट भेटली. ती सुद्धा आठ दिवसांसाठी येथे जंगल सफारी वर आलेली होती. तीसुद्धा एकटी! त्यांच्यात आणि क्लारामध्ये लवकरच मैत्री झाली. विशेष म्हणजे क्लारा ही एक शिव भक्त होती. तिने सांगितले की, दर सोमवारी ती लंडन मधल्या वेंबली येथे असणाऱ्या शिव मंदिरात न चुकता शिवलिंगावर जल अर्पण करते आणि तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा ती शिव पुराणातील छोट्या छोट्या कथा सांगणारे व्हिडिओ पोस्ट करत असते. विशेष करून अजय सोबत तिची चांगली मैत्री जमली, कारण दोघांची आवड जवळपास सारखी होती.
संध्याकाळी हायकिंगचा प्रवास संपला. सर्व जण आनंदी पण चालून चालून थकलेले होते. पर्यटकांसाठी बनलेल्या विविध सोयींनी युक्त अशा एका भव्य झोपडीतच त्यांनी पुढील सर्व दिवस मुक्काम करायचे ठरवले. त्यांची गाडी जास्त दूर नव्हती. पण झोपडीपर्यंत गाडी आणता येणार नव्हती. तसा रस्ता नव्हता.
रात्री झोपडीत त्यांनी जेवण बनवले. साहित्य झोपडीत आधीच होते. उरलेले त्यांनी शिवराज कडून मागवले. आणि जेवण संपल्यानंतर त्यांचा एक प्लॅन बनवला. खजिना आता शोधायचाच यावर सर्वांचे एकमत झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिवसभर गुफा बघण्यात घालवायचा. पाच वाजेनंतर सर्वांची नजर चुकवून गुहेमध्ये लपून राहायचे असे ठरले. एकदा हिंमत करून हे साहस करायचेच असे सर्वांनी ठरवले.
"मित्रांनी खजिना सापडला तर आपली आयुष्य भराची पैशांची गरज मिटेल!", अमर.
"पण, आपण संकटात सापडलो तर?", मीना.
"आणि जास्त पैशांचा मोह बारा नाही.", पवन.
"हो! नशिबात नसलेले जर मिळवायला गेले तर आपले नुकसान होते!" अमर.
"अरे पण आपण हे फक्त पैशांसाठी करत नाही आहोत. पैसा दुय्यम आहे. एक पौराणिक सत्य जे सर्वजण दंतकथा म्हणून दुर्लक्ष करतात ते खरे आहे हे ठरवण्याची ही एक संधी आहे. विचार करा ही संधी आपल्याला पुन्हा मिळणार आहे का?", अजय.
अजय चे म्हणणे सर्वांना पटले.
"अरे रस्तोगी अंकल यांनी प्राण्यांना मारण्यासाठी सोबत एक आपल्याला बंदूक दिली आहे ना! डोन्ट वरी!", करण.
"पण बंदूक एकच आहे!", स्वरा.
"मग आपण सर्वजण सोबत राहू. मग तर झालं!", अजय.
"पण सोबत पोरींना घेऊन जाणे धोकेदायक आहे. त्यांना इथेच झोपडीत राहू द्या. लागलं तर क्लाराला तुम्ही दोघी आपल्या सोबत झोपडीत घ्या! सकाळी आम्ही परत येतोच!", करण.
"खरं तर तुम्ही दोघीजणी तुम्ही अंकलकडे जास्त सुरक्षित राहाल पण परंतु त्यामुळे त्यांना कळेल की आम्ही खजिना शोधायला रात्री पाच वाजेनंतर गुहेत जातो आहे त्यामुळे ते शक्य नाही!" अजय.
"आम्ही दोघी जणी राहू. क्लाराला घेऊ सोबत!", मीना आणि स्वरा
"अरे, पण तिला विचारा तर खरं आधी!", अमर.
सर्वजण लाराच्या टेंट कडे गेले. ती टेन्ट समोर आकाशाकडे बघत पहुडली होती. तिचा टेंट झोपडी जवळच पाच मिनिटांच्या अंतरावर होता. तिला सर्वांनी त्यांची योजना समजावून सांगितली झाली.
"अरे, आधी इथली दंतकथा काय आहे ते तरी नीट ऐका! आज ती दंतकथा मी शिवराज कडून नीटपणे ऐकली. शिवराज इथल्या गावात राहणाऱ्या नागरिकांपैकी एक! इथल्या गावातील नागरिक पुढारलेले नसले तरी त्यांची निसर्गाशी जवळीक आहे.", अजय म्हणाला.
"अच्छा म्हणजे आज दुपारी तासभर हा अजय आपल्या टीम मधून गायब होता त्याचे रहस्य समजले!", करण म्हणाला.
"हो! मी दुपारी शिवराजच्या घरी गेलो होतो. त्याने मला खजिन्याची कथा सांगितली!"
क्लाराच्या टेंट समोरच्या मोकळ्या अंगणात जमिनीवर सर्वजण खाली बसले आणि अजय ती कथा सांगू लागला. हे दंतकथा कुठेही लिहिलेली नव्हती. इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध नव्हती. विकिपीडियावर सुद्धा नव्हती. पण आसपासच्या गावांमध्ये मात्र ही दंतकथा आवडीने आणि चवीने सांगितली आणि ऐकली जायची.
अजय सांगू लागला, "सृष्टी निर्मितीनंतरच्या सुरुवातीच्या काळात एकदा देव असुर संग्राम सुरू होता. त्यात इंद्र देवाची मदत करण्यासाठी भाग घेतांना तेव्हा भगवान शंकर यांनी त्यांची पंच महाभूत नियंत्रक शक्ती द्रवरूपी काचेत तात्पुरती डमरू मध्ये ठेवली. त्याला डमरू सारखा म्हणजे वाळूच्या घड्याळ सारखा आकार प्राप्त झाला कारण काळ भगवान शंकरांच्या अधीन असतो. समुद्रमंथनाच्या वेळेस अमृत मिळवणे शक्य झाले नाही त्याचा राग मनात ठेवून राहू आणि केतू हे असुरांचे गुरू शुक्राचार्यांकडे गेले. त्यांच्याकडून संजीवनी विद्येच्या आधारे पुन्हा दोघे एकत्र झाले. दोघांचां मिळून एक मोठा सर्प तयार झाला. बहुतेक सर्व देव युद्धात व्यस्त असताना हा राहूकेतू एकत्रित झालेला सर्प सगळ्यांच्या नजरा चुकवून वेगाने भगवान शंकरांच्या डमरू ठेवलेल्या जागी निघाला. शिवाच्या अनेक गणांचा घोळका तिथे आसपास बसलेला होता. त्यांची नजर चुकवून हळूच तो सर्प डमरूकडे खालून वर वेटोळे घालून चढू लागला. त्याने डमरू तोडून त्यातील वाळूच्या घड्याळाच्या आकाराचा पंचमहाभूत नियंत्रक बाहेर काढला. वरच्या बाजूला दोन म्हणजे पृथ्वी आणि अग्नी, खालच्या बाजूला दोन म्हणजे जल आणि वायू व मध्यभागी उरलेल्या जागेत दोन्ही बाजू व्यापून अवकाश तत्व असे पाच स्तर त्यात होते. अवकाश तत्व काळाला नियंत्रित करते. आपल्या वेटोळ्यात त्या नियंत्रकाला घेऊन सर्प हवेत उडून पाताळातील अज्ञात जागी जाण्यासाठी निघाला. एवढ्यात शिवाच्या गणांचे तिकडे लक्ष गेले. ते सर्पाचा पाठलाग करू लागले!"
"व्हॉट हॅपन आफ्टर?", क्लारा उत्सुकतेने पुढे सरसावून विचारू लागली.
"भगवान शंकर त्रिशूळ घेऊन एका राक्षसासोबत लढत होते. त्यांना आपल्या गणांकडून त्याबद्दल कळले. ते राक्षसांसोबत लढाईत व्यस्त असल्याने त्यांनी भगवान विष्णूंना कसेही करून राहू केतू यांना पंचमहाभूत नियंत्रक घेऊन जाण्यापासून रोखण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र त्या दिशेने भिरकावले. सापाचे पुन्हा दोन तुकडे झाले म्हणजे राहू आणि केतू वेगळे झाले. पण त्या सुदर्शन चक्रामुळे त्या पंचपहाभूत नियंत्रकाचे पाच वेगवेगळे गोल तुकडे झाले आणि ते पृथ्वीवर पडले. नंतर त्यांचे हे पाच पर्वत झाले!"
"अरे फारच अदभुत कथा आहे ही!" अमर म्हणाला.
अजय पुढे म्हणाला, "पण काही लोक म्हणतात की ते तुकडे पर्वत बनले नसून या पाचही पर्वतांच्या आत, गुहांमध्ये कुठेतरी गुप्तपणे दडलेले आहेत! आणि त्या तुकड्यांना लपविण्यासाठी हे पर्वत आपोआप तयार झालेत किंवा उगवले!"
"मग याचा खजिन्याशी काय संबंध?", स्वराने विचारले.
"ते पाच तुकडे पाच अमूल्य हिऱ्यांच्या रुपात परावर्तित झाले! तोच खजिना! सोने चांदीचां खजिना नव्हे!"
"आणि मग पँचमॅहाबुत कंट्रोलरचे काय झाले?", क्लारा तोडक्या मराठीत म्हणाली.
"भगवान शंकरांनी असुरांसोबत युद्ध जिंकल्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि विश्वकर्मा यांच्या मदतीने नवीन पंचमहाभूत नियंत्रक बनवून आपल्या तिसऱ्या डोळ्यात बसवले!" अजय.
"म्हणजे आता आपल्याला पाचही गुहेमध्ये लपलेले पाच काचेचे तुकडे शोधावे लागणार!", पवन म्हणाला.
"काचेचे तुकडे नाही, हिरे आहेत ते! अस्सल हिरे! आणि या सर्व दंतकथा आहेत. याबद्दल कोणत्याच पुराणात काहीच लिहिलेले नाही. यात काही भाग खरा असेल, काही भाग लोकांनी जोडला असेल. पण आपण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?"
"हो! तेही खरच आहे!"
"तर मग ठरले तर मग. आपण उद्या पाच वाजेनंतर शोध मोहीम सुरू करूया! प्रत्येक तत्वाच्या गुहेत त्या त्या तत्त्वाचा हिरा सापडेल अशी आपण अशा करूया"
"पण अवकाश गुहेमध्ये तर जायला बंदी आहे!"
"आपण इतर गुहांमधून मार्ग शोधून त्यात नक्की आपण प्रवेश करू! कारण सर्व गुहा एकमेकांशी जोडलेल्या आहेत."
क्लारा म्हणाली, "वुई लेडीज विल अल्सो कम विथ यू! व्हॉट से, स्वारा एंड मीनॅ! दिस इज ऑल सो एक्साईटिंग. वी कांट रेजिस्ट बट टू कम विथ ऑल ऑफ यु"
दोघीजणी सुद्धा क्लाराच्या म्हणण्याला दुजोरा देऊ लागल्या. म्हणजे आता तिन्ही लेडीजसुद्धा मोहिमेत येण्यासाठी आग्रह करू लागल्या. शेवटी सर्वांना ते मान्य करावे लागले.
"थांबा!", तंबूच्या मागच्या बाजूने आवाज आला. सर्वांनी माना वळवून तिकडे बघितले. तो शिवराज होता. त्याच्या हातात एक कंदील होता. केव्हापासून तो सगळ्यांचे बोलणे लपून ऐकत होता.
* * *
भाग 2
"तुम्ही असे करू शकत नाही. संध्याकाळी पाच वाजेनंतर आतमध्ये खूप धोका आहे! ज्यांनी ज्यांनी पाच वाजेनंतर तिथे जाण्याचा प्रयत्न केला ते आत गेले खरे, पण ते कधीही परत आले नाहीत."
"आम्ही नक्की जाणार. हे होईल ते होईल. एकदा आत जाऊन बघायचे आहे!"
त्या अद्भुत कथेने सर्वजण इतके प्रभावीत आणि प्रेरित झाले होते की आता आत जाण्यासाठी खूपच उत्सुक झालेले होते.
"तुम्ही ऐकणारच नसाल तर...!", शिवराज म्हणाला.
"तर काय?", अमर.
"तर मी पण तुमच्या सोबत येतो!", हसत हसत शिवराज त्यांना म्हणाला.
सर्वजण हसायला लागले. पण करण आणि स्वरा यांनी शंकेने एकमेकांकडे पाहिले.
शिवराज म्हणाला, "कारण, मलाही लहानपणापासून या गोष्टी ऐकून उत्सुकता आहे. म्हटलं चला, तुम्हा लोकांसोबत मलाही शोध घेता येईल! मात्र तुमच्या प्लॅनमध्ये थोडा बदल करावा लागेल."
"तो कोणता?"
"आपण सर्वजण एकत्र नाही तर दोन दोन जण मिळून एकच वेळेस गुहेमध्ये शोध मोहीम हाती घ्यायची! अवकाश गुहेत तर प्रवेश वर्जित आहे. त्यामुळे चार गुहा, आठजण! आणि हो, पाच वाजेनंतर प्रत्येक गुहेच्या आत जिथे जिथे प्रतिबंधित क्षेत्र आहे, तिथूनच आपल्याला शोध मोहीम हाती घ्यायची आहे!"
ते दहाही जण उद्याच्या साहसासाठी सज्ज झाले. क्लाराने आपले सामान बॅगमध्ये भरले आणि ते सर्वजण, करण आणि मित्र राहत असलेल्या झोपडीकडे चंद्रप्रकाशात चालायला लागले. परंतु त्यांच्या मनात शंका दाटून आली की शिवराज ज्याची फक्त अजय सोबत आज जुजबी ओळख आहे त्याला आपल्या सोबत घेण्यात धोका तर नाही ना? पण त्याला घेण्याचा एक फायदा होता की तो तेथील स्थानिक होता, त्यामुळे त्याची चांगली मदत होणार होती. आणि त्याला नाही म्हटले असते तर करण आणि मित्रांचा प्लॅन शिवराजला माहिती झाल्याने तो इतरांना सांगण्याचा आणि प्लॅनमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकला असता. त्यापेक्षा त्याला सोबत घेतलेले बरे, पुढचे पुढे बघता येईल असा विचार करण व त्याच्या मित्रांनी हळू बोलत बोलत केला जेव्हा शिवराज त्यांच्या मागून बऱ्याच अंतरावर कंदील घेऊन चालत होता.
पवनला रस्तोगी काकांचा फोन आला. आम्ही सर्वजण ठीक आहोत, असे त्याने सांगितले.
झोपडीत रात्री अजय हळूच सर्वांना उठवत झोपडीच्या बाहेर घेऊन आला. शिवराज बाजूला गाढ झोपलेला होता.
त्याने सर्वांना सावध केले, "हे बघा! हा शिवराज जरी माझ्या ओळखीचा असला तरी मला वाटते आपण सर्वांनी एकत्रच शोध मोहीम हाती घ्यावी. वेगवेगळे नको. वेगवेगळे जाण्यात धोका आहे!"
"मला तर आता वाटायला लागले आहे की हा खजिन्याचा प्लॅन कॅन्सल करा. कशाला उगाच नसत्या फंदात पडायचे?", मीनाने आपली शंका सांगितली.
"प्लॅन कॅन्सल नको, पण तुकड्यांनी जाण्यापेक्षा एकत्र जाणे हे मात्र योग्य राहील! आपण तसे सकाळी शिवराजला सांगू!", अजय म्हणाला.
"आपण म्हणजे तू सांग! तुझे ऐकेल तो!", करण म्हणाला.
"ठीक आहे!", अजय म्हणाला.
सकाळ उजाडली. सर्वांनी काळजीपूर्वक तयारी केली. आपापल्या बॅगमध्ये आवश्यक ते सर्व साहित्य त्यांनी घेतले. अजयने बाजूला नेऊन शिवराजला, सर्वांनी एकत्र जाणे कसे योग्य होईल ते समजावून सांगितले. वेळ लागेल तर चालेल पण सर्वजण एकत्र राहतील हे केव्हाही चांगले! आधी त्याने ऐकले नाही पण शेवटी तो तयार झाला. अजयने त्याला हेही बजावले की तो गावकऱ्यांना ह्या मोहिमेबद्दल काहीही सांगणार नाही. सगळे मिळून असेही ठरले की काहीही झाले तरी रात्री 9 वाजेच्या आत परत झोपडीकडे परत जायचे. करण आपली पार्क केलेली गाडी व्यवस्थित आहे की नाही ते बघून आला. शिवराज सकाळी एक तास त्याच्या गावात जाऊन आला. अनोखे साहस करण्यासाठी ते आता सज्ज झाले. खजिना नाही सापडला तरी गुहेतील प्रतिबंधित क्षेत्रात नेमके काय आहे ते तरी आज कळेल असे म्हणून सर्व सज्ज झाले.
त्यांना सर्वांना शिवराज कडून कळले की, प्रत्येक गुहेचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे ज्या त्या तत्त्वाच्या गुहेमध्ये आत मधल्या दगडी भिंतीवर थोड्या थोड्या अंतरांवर त्या त्या तत्त्वाचे चिन्ह कोरलेले होते. ते कोणी मानवांनी कोरलेले नसून आधीपासून जेव्हा या गुहा तयार झाल्या तेव्हापासून ते आपोआप तयार झालेले होते.
शिवराज हा धोतर, बंडी अशा गावकऱ्यांच्या वेशात होता, क्लाराने आकाशी कलरचा बटनांचा शर्ट आणि गडद निळी जीन्स तर इतरांनी आपापल्या आवडीचे पोशाख केले होते जसे मीनाने साडी घातली होती फक्त आज कलर वेगळा म्हणजे सोनेरी होता, करणचा नारिंगी कुर्ता आणि स्वराने पिवळा टीशर्ट आणि मिनी स्कर्ट, पवनने डार्क जांभळा शर्ट आणि क्रीम कलर पँट, अमरने हाफ बाहीचा बारीक चेक्सचा डार्क पिवळा शर्ट आणि प्लेन व्हाईट पँट, तर अजयने नेहमीप्रमाणे खादी कपडे घातले होते.
सर्वांनी गणपती बापपाचे नामस्मरण करून आपल्या साहसाला सुरुवात केली. सकाळी सर्वांनी चारही गुहा पर्यटक बघतात तशा बघून घेतल्या. कुठे कुठे प्रतिबंधित क्षेत्र आहे ते पाहून घेतले. माहिती देण्यासाठी शिवराज सोबत होताच. चार वाजले तसे सर्वजण पुन्हा अग्नि गुहेत शिरले आणि पाच वाजेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्राजवळ पोहोचले. तिथपर्यंत मोबाईलची थोडी थोडी रेंज येत होती. चालून चालून ते सर्वजण थकले होते. संपूर्ण गुहेत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, कारण सर्व गुहा इतक्या लांब लांब आणि खोल होत्या की ते शक्य सुद्धा नव्हते. पावणे पाच वाजले. अलार्म वाजला. सुरक्षा रक्षक सर्वांना बाहेर काढू लागले, मात्र हे आठही जण दोन दोनच्या जोडीने वेगवेगळ्या खडकांच्या मागे लपले. कडेकपारीत दडून बसले. इतर सर्व पर्यटक हळू हळू निघून गेले. गुहेतील सर्व कृत्रिम लाइट्स बंद करण्यात आले. अनेक शिटया मारून गार्डस निघून गेले. गुहेचे मुख्य लोखंडी गेट बंद केले गेले. आता अग्नि गुहेत फक्त ते आठ जण होते. आपापल्या लपलेल्या ठिकाणाहून ते सर्व बाहेर आले. अजयने हेडलॅम्प घातला आणि चालू केला. त्या प्रकाशात ते सर्वजण प्रतिबंधित क्षेत्र लिहिलेल्या ठिकाणाकडे चालू लागले. तिथे मोठा दगड होता. सर्वानी जोर लावला पण तो दगड सरकत नव्हता. दगडाच्या वरच्या बाजूने खूप उंचीवर मात्र एक छोटीशी फट किंवा जागा होती जिथून एक वेळेस एक माणूस आत शिरू शकत होता.
आजूबाजूचे मोठे दगड उचलून त्यांनी ते एकमेकांवर ठेवले आणि त्या दगडांचा पायऱ्यांसारखा उपयोग करून एक एक जण वरच्या बाजूला चढायला लागले. आधी क्लारा, मग मीना, स्वरा आणि त्यांच्या पाठोपाठ शिवराज आणि इतर सर्वजण चढले. हळूच त्या फटीतून क्लाराने आत मध्ये आपली बॅग फेकली आणि मग स्वतः उडी मारली. धप्प असा आवाज आला. पलीकडचा भाग इकडच्या भागापेक्षा बराचसा खोल वाटत होता. हळूहळू सर्व जणांनी आतमध्ये उडी टाकली. बॅग सहित आतमध्ये शिरणे शक्य नसल्याने आधी बॅग टाकण्यात आल्या. अजयने हेडलॅम्प आणि तसेच इतर दोघा तिघांनी हातात टॉर्च ठेवल्याने बरे झाले अन्यथा आत आतमध्ये ठार अंधार होता. शिवराजकडे स्वत:चा कंदील होता. तो साधा कंदील नसून खाण कामगार वापरतात तो डेव्ही लॅम्प होता. त्यात एक विशेष जाळी असते जी ज्योतीला वेढते. जेव्हा ऑक्सीजन पातळी कमी होते, तेव्हा लॅम्पची ज्योत मंदावते किंवा विझते. जर ज्योत मंदावली किंवा विझली तर, त्वरित गुफेतील बाहेर पडावे, कारण ऑक्सीजन पातळी कमी असल्याचे किंवा इतर काही काही धोकादायक वायू तिथे उपस्थित असल्याचे त्यावरून समजते.
सर्व जण अंदाज घेत घेत, एकमेकांना धीर देत पुढे चालू लागले. पायाखाली अस्थिर जमीन होती, काही ठिकाणी वाट ओलसर होती, त्यामुळे रस्ता निसरडा होता. अजयचा पाय घसरला पण तो पडता पडता वाचला कारण त्याचा हात मीनाने पकडला. त्याने थॅंक्स म्हटले आणि मीना लाजली. तिने त्याचा हात सोडला. ते सर्वजण पुढे जाऊ लागले तशी आर्द्रता वाढत गेली.
"एक मिनिट, एक मिनिट, काहीतरी आवाज आला!" असे म्हणून शिवराजने मागे वळून पहिले तर ज्या फटीतून ते सर्व आत आले ती बंद झाली होती. सर्वजण घाबरले. पण शिवराजने हिम्मत दिली, "हरकत नाही! हा मार्ग बंद झाला तरी दूसरा मार्ग कुठेतरी असेल तिथून बाहेर निघू!"
सर्वांना धीर आला. एक सांप सरसरत सर्वांच्या बाजूने गुहेच्या भिंतीवरून निघून गेला, त्याकडे अजय बघत वाळू लागला तर हेड लॅम्प च्या प्रकाशात सर्वांना तो साप एका भिंतीला टेकून बसलेल्या एका हाडांच्या सापळ्यावरून जातांना दिसला. तो साप कवटीतून बाहेर निघतांना कवटीच्या दातांची हालचाल झाली आणि ती कवटी कडकट्ट कडकट्ट अशी दात वाजवत हसत असल्याचा भास झाला. मीना किंकाळली आणि अजयला घट्ट बिलगली. करण दचकला आणि स्वर त्याला चिडवून हसू लागली. इतर जण घाबरून थोडे बाजूला झाले. साप वरच्या बाजूला कुठेतरी निघून गेला. क्लारा त्या सापाकडे एकटक बघत होती.
ते पुढे चालू लागले. गुहेच्या वर कुणीतरी डायनॉसोर सारखा भव्य प्राणी चालत असल्यासारखा आवाज आला यांनो गुहेला हादरे बसू लागले!
"अरे कसला आवाज हा? आणि कसले हादरे बसताहेत गुहेला! वर भूकंप झाला की काय?" करण.
"आणि आपण असे कुठपर्यंत चालायचे? मोबाईलचा पण सिग्नल आता गेला!", अमर.
"बापरे. कधी नाही एवढी भीती मला आज वाटते आहे. आपण परत जायचे का?" स्वरा.
"परतीचा दरवाजा बंद झाला आहे. आता फक्त पुढे चालत राहावे हेच बरे!" पवन.
"घाबरू नका सर्वजण! चालत रहा!" शिवराज.
"तेच म्हणतो मी!", मीनाला बाहू पाशातून दूर करत अजय म्हणाला.
"हो. आपण चालत राहायला हवे. मार्ग सापडेल!", मीना.
"कम ऑन! लेट्स गो. फॉलो मी!" क्लारा.
गुहेचे हादरे आता बंद झाले.
सर्वांच्या बोलण्याचा आणि आवाजाचा प्रतिध्वनि ऐकू येत होता. काही वेळाने सर्वजण शांत चालत असतांना अचानक हास्याचा प्रतिध्वनि ऐकू आला. त्यांच्यापैकी कुणी तर हसले नव्हते! मग आवाज कोठून आला? सर्वजण मनातून घाबरले पण कुणी तसे काही दाखवले नाही! गुहेतील अंधार गडद इतका होता की फक्त टॉर्च आणि लॅम्प पुरेसे नव्हते.
चालतांना मध्येच कोळयाचे जाळे तोंडाला चिटकत होते, ते बाजूला करावे लागत होते.
एक वटवाघूळ उडत अजयच्या तोंडावर झेपावले, त्याला हाताने फटकरून हाकलण्याच्या नादात त्याच्या डोक्यावरचा हेडलॅम्प निसटून दूर जाऊन खाली पडला. वटवाघूळ निघून गेले आणि कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसले. सर्वात मागे पवन चालत होता, तो म्हणाला, "मी आणतो तुझा लॅम्प परत. तेवढ्यासाठी मागे येऊ नको!"
आता अंधार आणखी गडद झाला. इतर टॉर्चच्या प्रकाशात ते चालू लागले.
आणखी किती पुढे चालायचे हा एक मोठा प्रश्नच होता. ते चालतच राहिले.
हेडलॅम्प उचलायला पवन मागच्या बाजूला एका कोपऱ्यात गेला आणि तो घेण्यासाठी खाली वाकला तर त्याला गुहेच्या भिंतीला लाकडाच्या दरवाज्यासारखे काहीतरी जाणवले. त्याने सहज ढकलून पहिले तर त्याचा हात उघडलेल्या दरवाज्याच्या आतमध्ये ओढला गेला आणि तो अनंत पोकळीत गेल्यासारखा हवेत तरंगून वेगाने एका दिशेने हातातल्या हेडलॅम्प सहित ओढला जाऊ लागला. बऱ्याच वेळाने त्याला जाणवले की, तो एका अंधाऱ्या मैदानात उभा आहे, त्याच्या डोक्याला हेडलॅम्प लावलेला आहे आणि आजूबाजूला दगडी भिंतींमध्ये अनंत लाकडी दरवाजे आहेत.
"हे मी कुठे आलो?" पवन घाबरला, "मी माझ्या मित्रांकडे कसा परत जाऊ?"
"वेळ वाया न घालवता कोणत्यातरी एक दरवाजात जाऊन बघतो!", असे म्हणून त्याने उजवीकडे एका दरवाज्यात प्रवेश केला.
तिथे त्याला हेडलॅम्पच्या उजेडात एक दृश्य दिसले.
समोर सुदर्शन चक्रामुळे तुकडे झालेले राहू केतू संतापलेले दिसत होते. त्यांनी एकत्र बसून भगवान शिवाची आराधना सुरु केली. बरीच वर्षे निघून गेली. भगवान शिव प्रसन्न झाले. राहू केतूनी त्यांना वरदान मागितले, "या पंचपालक परिसरात आमचे राज्य राहू द्या. जरी आम्हाला पंच महाभूत नियंत्रक मिळाले नाही तरी हे पाच तुकडे आमचे! तसेच आम्हाला अमृत नाही मिळाले तरीही समुद्र मंथनातून मिळलेला सर्व खजिना पाहिजे. आम्ही या पाच पर्वताखाली यांचे एक स्वतंत्र नागलोक स्थापन करू ज्याचे नाव असेल "राहू केतू नागलोक" आणि तो खजिना तिथे ठेऊ! जर कुणी ते पाच तत्वाचे गोळे आणि हा खजिना आमच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जीवंत सोडणार नाही!"
भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावण्यापूर्वी म्हणाले, "ठीक आहे,. पण जोपर्यंत हे पांच तत्वचे गोळे सुरक्षित आहेत तोपर्यंतच हा खजिना तुमचं राहील. एकदा का या पाच तत्वा पैकी एक जरी गोळा कुणी हस्तगत केला, की तुमचा खजिना पण सुरक्षित राहणार नाही! तेव्हा पंचतत्व गोळे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहील. पण तुम्ही सर्व नाग कुणाला विनाकारण त्रास देणार नाही याचे मला वचन द्या"
राहू केतू दोघांनी तसे वचन दिले.
आपल्या निवासस्थानी श्रीविष्णू भगवान शंकरांना म्हणाले, "आपण फारच भोळे आहात, शिवजी! भक्तांना लगेच वरदान देऊन टाकता"
भगवान शंकर म्हणाले, "भक्तांच्या प्रार्थनेला मला हाक द्यावीच लागते आणि भक्त असले वरदान माझ्याकडून मागून घेतात. मी ते देतोही पण त्यात मी अशी मेख ठेवतो की भक्त उन्मत्त झाला आणि त्याने वरदान वाईट कामासाठी वापरले तर त्याचा विनाश निश्चित असतो!"
श्री विष्णू म्हणाले, "मी समजलो! आपली महिमा अगाध आहे, शिवजी!"
राहू केतू कडे आकाशातून खजिन्याचा वर्षाव झाला. त्यांनी आपल्या अंकित असलेल्या सापांच्या सर्व प्रकारांना आणि नागराजांना बोलावून घेतले. मग दोघांनी "राहू केतू नागलोक" पाच पर्वतांच्या खाली स्थापन केला. तिथे कालांतराने भव्य नागलोकचे निर्माण झाले. सगळीकडे नागकन्या, नाग कुमार दिसू लागले.
भगवान शिव पार्वतीला सांगत होते, "कर्कोटक नावाचा एक नाग होता, जो शक्तिशाली आणि बुद्धिमान होता. एके दिवशी, राजा परीक्षितला नाग लोकातल्या एका नागाने (तक्षक) दंश करून मारले होते. राजा परीक्षितचा पुत्र, जनमेजय, या घटनेने दुःखी आणि क्रोधित झाला आणि त्याने नाग यज्ञ आयोजित केला. या यज्ञात नागांचा संहार केला जात होता. कर्कोटकाला यज्ञातून वाचवण्यासाठी इंद्राने त्याला सांगितले की तो इतर कोणाही नागांच्या यज्ञात जाऊ नये. कर्कोटकाने इंद्राच्या सल्ल्याचा स्वीकार केला आणि जंगलात निघून गेला. कर्कोटक नागाने तपश्चर्या केली आणि माझ्या उपासनेत लीन झाला. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मी त्याला वरदान दिले की त्याच्या स्पर्शाने कोणत्याही वस्तूवर विषाचा प्रभाव होईल. या शक्तीने कर्कोटक आणखी शक्तिशाली झाला. त्याने आपल्या रक्तपासून अति विषारी अशी कर्कोटकी नागिन तयार केली. तिला राहू केतू यांनी त्यांच्या नागलोकाची राणी जाहीर केले! पुढे पुढे याला कर्कोटकी नागलोक असे नाव पडले. कर्कोटकी राहू केतू यांच्या अंकित होती!"
पार्वती देवी म्हणाल्या, "पण ते पाच तत्वांचे गोळे कुठे आहेत, नाथ?"
महादेव म्हणाले, "ते पाच गोळे त्या पाचही पर्वतांच्या मध्ये असलेल्या सहाव्या पर्वताच्या खाली असलेल्या गुहेत, एका तळ्यात मध्यभागी तरंगत असणाऱ्या पाच माश्यांच्या पोटात आहेत! ते तळे कर्कोटकी हिने विषारी केले आहे! पण जो कुणी त्या मध्यभागच्या सहाव्या पर्वताच्या टोकावर असलेल्या माझ्या मंदिराच्या घंटेतील जिभेच्या टोकावरील फुगीर भागात लपलेल्या नीलमणीचा स्पर्श त्या पाण्याला करेल, तेव्हा ते विषारी तळे निर्मल, विषरहित आणि स्वच्छ होईल आणि मग त्यातून कुणीही ते पंच तत्व गोल हस्तगत करू शकेल! त्यानंतर कर्कोटकी नागलोकाचा विनाश निश्चित आहे. त्यांनी पृथ्वीवरील मानवांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे! ही नीलमण्याची गोष्ट राहू केतू, कर्कोटकी किंवा त्यांच्या नागलोकतील कुणाला माहिती नाही!"
"पण मग नाथ, त्या मण्याबद्दल इतर कुणाला कसे आणि कधी माहिती होईल?"
"तू चिंता करू नकोस, पार्वती! वेळ आली की सर्व योग जुळून येतील!"
आता समोर अंधार होता. फक्त हेडलॅम्पचा प्रकाश होता. पवनने ओळखले की, हे सगळे लाकडी दरवाजे म्हणजे काळ नियंत्रण करणाऱ्या अवकाश गुहेचे भाग आहेत आणि अवकाश गुहेचे वेगवेगळ्या काळात जाणारे दरवाजे हे इतर चार गुहांच्या प्रतिबंधित क्षेत्रात उघडतात. म्हणजे मला आता लवकर माझ्या मित्रांकडे गेले पाहिजे आणि हे सर्व सांगितले पाहिजे!
अंदाजे एका दरवाजातून तो आत शिरला. मात्र तिथे त्याला वेगळे दृश्य दिसले.
कर्कोटकी समोर एक नागकन्या बसली होती. तिला कर्कोटकी सूचना देत होती, "चांगले झाले तू हेरगिरी करून सूचना आणलीस की ते पाच जण खजिना शोधायला आलेत. आता तू स्त्री रूपात त्यांच्या मध्ये सामील हो आणि त्यांना तुझ्या मागे आपल्या नाग लोकांत घेऊन ये! इथे आपण सर्वांना खतम करून टाकू!"
कर्कोटकी बाजूला झाली तेव्हा पवनला त्या नागकन्येचा चेहरा स्पष्ट दिसला. ती दुसरी तिसरी कोणी नसून क्लारा होती!
म्हणजे क्लारा सर्वांची दिशाभूल करायला आली होती तर! लवकर मित्रांकडे जाऊन त्यांना अलर्ट करणे भाग आहे. सगळे रहस्य तर कळले पण मित्रांकडे जायचे कसे?
आता पुन्हा सर्व मित्र ज्या गुहेत प्रवास करत आहेत त्या जागेवर त्याच काळात पुन्हा जायचे तर कोणता दरवाजा निवडायचा हे त्याला कळत नव्हते. सर्व दरवाजे थोड्या थोड्या वेळाने आपोआप आपली जागा बदलत होते. दरवाजांच्या वर्तुळामागे, आणखी काही दरवाजे, त्यामागे आणखी काही दरवाजे अशी अनंत वर्तुळे होती. प्रत्येक दरवाजा वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणारा होता.
पवनने हनुमानाचे मनोभावे स्मरण केले. तो हनुमानाचा भक्त होता. हनुमान भगवान शंकरांचाच एक अवतार!
शेवटी एका उजव्या बाजूला असलेल्या दरवाज्यात तो शिरला. ती पृथ्वी तत्त्वाच्या पर्वतामधली गुहाच होती. ठिकठिकाणी गुहेच्या भिंतीवर पृथ्वी तत्वाचे चिन्ह काढलेले होते. हेड लॅम्प च्या प्रकाशात तो पुढे पुढे जात राहिला. बरं झालं तर चालत राहिल्यावर त्याला भूक लागली. पाठीवर असलेल्या बॅगमध्ये असलेले थोडे ड्रायफ्रूट त्याने खाल्ले. सोबत बाटलीतील ऑरेंज ज्यूस प्यायला. त्यामुळे थोडी तरतरी आली. तो पुढे जात राहिला. सगळीकडे काळोख. बाहेरचे जग वेगवेगळे आणि ह्या गुहेमध्ये हा काळोख वेगळा. हा काळच वेगळा.
एके ठिकाणी त्याला एक ओबडधोबड अर्धा उघडलेला दगडी दरवाजा दिसला. त्या दरवाज्याच्या आत एक खोली होती. तिथे अंधारात कोणती तरी मानवी आकृती काहीतरी हातात घेऊन बघत होती. उत्सुकतेने पवनने त्या खोलीत प्रवेश केला आणि पुढे पुढे जाऊ लागला आणि त्या पाठमोऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर ठेवला. त्या व्यक्तीच्या हातात टॉर्च होता. तो खाली पडला. त्या व्यक्तीने मागे वळून पहिले आणि पवनच्या हेड लॅम्पचा प्रकाश त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडला. तो अजय होता, ती खोली म्हणजे शस्त्रागार होती आणि अजय खूप घाबरलेला होता.
पवनने विचारले,"तू इथे कसा काय आलास?"
अजयने तोच प्रश्न त्यालाही केला, "अरे तू इथे काय करतोयस?"
"अरे तुझा हेड लॅम्प उचलायला मी वाकलो तेव्हा कुठल्यातरी वेगळ्या काळात वेगळ्या ठिकाणी येऊन पोहोचलो. मला या सर्व खजिन्याचे रहस्य माहीत झाले आहे. आणि बाकी सर्वजण कुठे आहेत?"
"अरे गडबड झाली आहे. घात झाला. सांगतो तुला सगळं. तू दिसला नाहीस त्यामुळे आम्ही तुला शोधत तिथेच थांबलो. आम्हाला काळजी वाटायला लागली. सर्वजण तुला हाक मारायला लागलो. क्लारा मात्र शांत होती. आणि तुला माहित आहे का, ती क्लारा एक नागकन्या आहे असे शिवराज म्हणाला. कारण त्याला तशी लक्षणे काल रात्री आपण टेन्ट मध्ये बोलत बसलो होतो तेव्हा दिसली. त्याने नागाचे रूपांतर क्लारामध्ये होताना रात्री पाहिले होते. म्हणूनच तो आपल्यात सामील झाला. आपली मदत करण्यासाठी. त्याने गुहेत क्लाराचे वागणे अधिकाधिक संशयास्पद वाटल्याने आणि ती आमची काहीतरी दिशाभूल करते असे असा संशय बळावल्याने आज आमच्या समोर क्लाराचे सत्य जाहीर केले तेव्हा तिचे डोळे लाल झाले, ती अर्धी साप आणि अर्धी मनुष्य बनली आणि तिने त्याच्यावर हल्ला केला. स्वरा आणि मीना शिवराजला वाचवायला म्हणून क्लाराला मागे खेचू लागल्या तेव्हा तिने दोघींना जोरात ढकलले. मी एक बाजूला पडलेला दगड उचलून क्लाराकडे फेकणार तेवढ्यात माझा पाय घसरून मी एका लाकडी दरवाजातून वेगळ्याच ठिकाणी आलो. तिच ही जागा. हे शस्त्र घर सापडले म्हणून मी दोन-चार शस्त्र उचलले. पण बघतो तर काय मला परत देण्याचा रस्ता सापडेना. तेवढ्यात तू आलास!"
"अरे हे ठिकाणच वेगळे नाही तर हा काळ सुद्धा वेगळा आहे!", असे म्हणून पवनने अजयला आपल्या सोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्याने बघितलेले सर्व दृश्य सांगितले, सर्व रहस्य सांगितले.
"बापरे किती आश्चर्यकारक आणि अद्भुत आहे हे सगळे! पण आता मला कळले की नीलमणी कुठे आहे... हा हा हा", अजय जोरात हसायला लागला आणि त्याचे रूपांतर क्लारामध्ये झाले.
"मी अजय नाही. मी क्लारा आहे. नागकन्या. कुणाचेही रूप घेऊ शकते! मी तुला जी कहाणी सांगितली त्यात अजय नाही तर मी दरवाज्यातून पडते. तू गायब झालास तेव्हा मला खात्री झाली होती की तू कोणत्यातरी काळ दरवाज्यातून कुठेतरी पडला असशील. मला तुला शोधायला मला यायचेच होते पण तेवढ्यात शिवराजने मी नागकन्या असल्याचे सर्वांना सांगितले आणि मी दरवाज्यातून पडले. वेगवेगळ्या काळ दरवाज्यातून तुझा पाठलाग करत करत मी इथपर्यंत आले! कर्कोटकीला शंका होतीच की नागलोक नष्ट करण्यासाठी भगवान शंकर यांनी काहीतरी उपाय केलेला आहे. आम्हा कुणा नागाला मात्र तो कधीही कळू शकणार नव्हता. कारण काही ठराविक दरवाज्यामध्ये आम्ही नाग लोकांपैकी कुणीही जाऊ शकत नाही हे मला माहीत होते. गेलेच तर नाग भस्म होतात. पण तू मात्र जाऊ शकशील हा अंदाज मला आला होता. तो खरा ठरला आणि तुला तो उपाय कळला. तुझ्याकडून मला कळला. आता तो नीलमणी मी मिळवणार आणि नष्ट करून टाकणार! आणि आता तुझा खेळ मी इथेच खलास करते!"
असे म्हणून क्लारा पवनकडे साप रुपात वेगाने झेपावली, पण पवनने डोळे मिटून हनुमान वडवानल स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. पवनने वर्तमानकाळाचे द्वार कोणते ते कळावे अशी प्रार्थना हनुमानाला केली आणि डोळे उघडून तो क्लाराला हुलकावणी देत गोलाकार फिरून बघू लागला. त्या सर्व गोल गोल फिरणाऱ्या अनंत वर्तुळातील दरवाजांमध्ये तिसऱ्या वर्तुळातील एका दरवाजावर पवनला हनुमानाची सावली आणि त्या सावलीच्या आजूबाजूला प्रखर प्रकाश दिसला.
"तेच द्वार त्या वर्तमानकाळाचे असावे ज्यातून मी आलो. हनुमानाने मला मार्ग दाखवला. तसे पहिले तर प्रत्येक द्वार हे कुणासाठी तरी वर्तमानकालच आहे. किती अद्भुत आहे हे काळाचे जग आणि भगवान शंकर स्वत: या सगळ्या क्लिष्ट काळरेषा हँडल करतात! बापरे!", असा विचार करून तो वेगाने त्या दरवाज्याकडे पळायला लागला.
कमरेपासून वर स्त्री आणि उरलेला भाग नागाची शेपटी अशा रुपात क्लारा हवेत त्याचा पाठलाग करू लागली. पवन तिला सारखी हुलकावणी देत होता. पहिले वर्तुळ पार करून दुसऱ्या वर्तुळात, तो पोहोचला. त्याचा पाठलाग करता करता ती नागकन्या चुकून दुसऱ्या स्तरातील वर्तुळामधल्या एका दरवाज्यात अनिच्छेने वेगामुळे फेकली गेली.
पवनने तिसऱ्या वर्तुळातील हनुमानाची सावली असलेला दरवाजा पकडला आणि त्यात उडी मारली. तो पुन्हा त्याच जागेवर आणि त्याच काळात पोहोचला जिथे तो अजयचा हेड लॅम्प उचलायला खाली वाकला होता. तो त्याने उचलला आणि अजयला हळूच मागे बोलावले. अजय त्याच्याकडे मागे गेला. अजयला चूप राहण्याची खूण करत भराभर त्याने अजयला हळूच सर्व अनुभव आणि कहाणी सांगितली. अजयचा सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता.
नंतर पुढे पवन म्हणाला, "आता आपण पुढची घटना घडण्याची वाट बघू. जोपर्यंत शिवराज आणि क्लारा यांच्यात लढाई होत नाही तोपर्यंत आपण शांत राहू आणि मग एकदा का क्लारा दरवाजातून पडली की सर्वांना आपण ही कहाणी सांगू आणि तिथून कसेही करून बाहेर पडू. मग लगेच आपण मंदिरातील घंटेतून नीलमणी घेऊ आणि तळ्यातून ते पंचतत्व गोल हस्तगत करू. पण ती क्लारा त्या दरवाजांचे रहस्य जाणते. ती कसेही करून काळ प्रवास करत करत आपल्या आधी मंदिरात पोचायला नको म्हणजे झालं!"
* * *
भाग 3
अजय हे सर्व ऐकून सुन्न झाला होता. एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, "म्हणजे, आपली स्पर्धा फक्त क्लाराशी नाही तर काळाशी सुद्धा आहे! त्यामुळे आपण आता जास्त वेळ दडवून चालणार नाही! पण क्लाराने सांगितलेले नक्की खरे होते का? की आपली दिशाभूल करायला तिने हे सगळे सांगितले? खरच तिच्यात आणि शिवराजमध्ये लढाई होईल?"
पवन म्हणला, "माझे मन मला मनापासून सांगते आहे की, जर मला हनुमानाने पुन्हा इकडे येण्याचा मार्ग दाखवला आहे, तर तिने सांगितलेले खरेच असेल. कदाचित तुझे रूप तिने घेतले असल्याने तिला जास्त खोटे बोलता आले नसावे. बरेचदा आपण ज्याचे रूप घेतो तसेच बनून जातो! तूच मला एकदा रावणाची कथा सांगितली होती, आठवते?"
"होय, तुझे म्हणणे बरोबर आहे. रावणाने सीतेला आपलेसे बनवण्यासाठी सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी रामाचे रूप घेतले पण त्याच्या मनातील पापी विचार नाहीसे झाले. तो वाईट विचार करूच शकत नव्हता!", अजयने सांगितले.
"पण इंद्राने अहिल्येला मिळवण्यासाठी गौतम ऋषींचे रूप घेतले तेव्हा मात्र असे झाले नाही!"
"ते कोण कोणाचे रूप घेतो, त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव आणि प्रवृत्तीवर सुद्धा अवलंबून असते!"
"खरे आहे! चल तर मग! आता आपण आपल्या टीमकडे जाऊ!", पवन म्हणला आणि ते टीमकडे गेले.
"काय रे! इतका वेळ हेड लॅम्प शोधायला? हेड लॅम्प शोधत होते का गप्पा मारत होते?", करण.
"दोन्ही!", अजय आणि पवन एकदम म्हणाले आणि टाळी देत हसायला लागले.
अजय आणि पवन दोघेही सोबत चालत होते.
शिवराज बऱ्याच वेळेपासून अस्वस्थ होता. त्याला अजय ला काहीतरी सांगायचे होते, पण अजून हिम्मत होत नव्हती असे वाटते होते.
अंधाऱ्या गुहेत चालत असताना शक्य तितक्या जोड्या एकमेकांच्या हातात हात धरून चालत होते. गुहेतले वातावरण आता चांगलेच थंड आणि ओलसर होते. प्रत्येक पावलासोबत त्यांच्या बुटांचा आवाज गुहेच्या भिंतींवर आपटत होता, जो त्यांच्या मनात भीती निर्माण करत होता.
अचानक, करणच्या पायाखालून जमीन सरकली आणि तो किंचाळत खाली कोसळला. त्याच्या आवाजाने सगळे घाबरून गेले आणि एकमेकांना घट्ट धरून उभे राहिले. अमरने टॉर्चचा प्रकाशझोत त्याच्या दिशेने फेकला. खाली मोठा काळा खड्डा दिसत होता, पण एका खडकाला धरून ठेवल्याने करण त्या खड्ड्यात पडता पडता वाचला होता. शिवराजने पटकन त्याला हात देऊन वर ओढले. करण सावरला. करण पडला होता तेव्हा स्वराचा चेहरा मात्र भीतीने पंधरा पडला होता. तिला करण बद्दल आत्मीयता वाटू लागली होती. करण खड्ड्यात पडण्यापासून वाचताच ती त्याला जाऊन बिलगली. करण तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. तिला प्रेमाने कुरवाळू लागला. तिच्या केसांतून हात फिरवू लागला, तिच्या कमरेवर त्याने एक हात ठेवला आणि तिला आणखी जवळ ओढले. तेवढ्यात अमरने मोठ्याने खकारून दोघांना जाणीव करून दिली की गुहेत ते दोघेच नाहीत, इतर जण सुद्धा आहेत. तेव्हा स्वरा बाजूला झाली आणि चक्क लाजली. या घटनेदरम्यान क्लारा मात्र सर्वात मागे उभी होती.
"अरे वा! एक पोरगी लाजली रे बाबा!", करण तिला चिडवू लागला.
"एक पोरगी प्रेमात पडली!", अमर म्हणाला.
"चल! काहीतरीच काय?", असे म्हणून तिने लाजून चेहऱ्यावर दोन्ही हात झाकले.
"मित्रांनो, बास झाली प्रेमकहाणी! सध्या थ्रिलर स्टोरी सुरु आहे, लव्ह स्टोरी नाही! आटपा तुमचे लवकर!", पवन म्हणाला.
तेव्हा अचानक गुहेत एक गडगडाट ऐकू आला आणि गुहेची भिंत हलू लागली. त्यांच्या आजूबाजूला छोटे छोटे खडक खाली पडू लागले. हे पाहून सर्वांचीच धडधड वाढली. ते जागेवरच थबकले आणि एकमेकांना सांभाळत पुढे जायचा मार्ग शोधू लागले. आता पुढचा रास्ता बंद झाला होता पण खालच्या बाजूला तीन वेगवेगळ्या दिशांना तीन मोठे भुयार दिसत होते.
कोणत्या भुयारतून पुढे जायचे असे ठरत असतांना क्लारा म्हणाली, "वुई मस्ट गो विथ दी मिडल वन! मधल्या भुयारतून जाऊ!"
शिवराज म्हणाला, "नाही! उजव्या भुयारात जाणे योग्य राहील!"
क्लारा, "नो! माधल्या!"
शिवराज चिडला, "नाही! राइट साइड ओन्ली! यू व्हिलन!"
क्लारा, "व्हॉट? हाऊ डू यू देअर टू से धीस?" काशी हीमत जाली तुजी?"
शिवराज, "मला माहीत आहे तू नागकन्या आहेस. आणि आम्हा सर्वांना तू दिशाभूल करून नाग लोकात घेऊन चालली आहेस! मी हे होऊ देणार नाही! तू आम्हा सर्वांना पण नागलोकात घेऊन जाणार आणि आम्हाला न मारता आमचे रूपांतर पण नागात करणार! अशा रीतीने तुम्ही तुमची सेना वाढवणार आहात, आणि पुन्हा देवांवर आक्रमण करणार आहात! "
अमर हसायला लागला, "व्हॉट? नागकन्या? ब्रिटिश लोकांमध्ये पण नागकन्या असते?"
सर्वजण हसायला लागले. पवन आणि अजयला आता समजले की तो प्रसंग आला आहे.
शिवराज म्हणाला, "परदेशी पर्यटक तरुणी सोबत भारतीय मुले एक आकर्षण म्हणून लगेच मैत्री करतात हे माहीत असल्याने तिने विदेशी तरुणीचे रूप घेतले!"
आपले रहस्य माहीत पडले हे कळताच क्लारा चिडली. तिच्या पायांवर आणि चेहऱ्यावर नागाच्या त्वचेवर असतात तसे खवले उमटू लागले. सर्वजण आ वासून हे दृश्य बघत होते.
क्लारा फुत्कारत म्हणली, "मी तुम्हाला कुणालाच सोडणार नाही. शिवराजला तर मी सर्वात आधी मारेल. पण शिवराज, तुला माझे रहस्य कसे माहीत?"
शिवराज हसत म्हणाला, "मला ओळखले नाहीस? मी पण नाग लोकतील एक नागकुमार! मला कर्कोटकीची योजना आधीपासून माहीत होती. सध्या जे काही नाग लोकात चालले होते ते मला आवडत नव्हते. म्हणून मी काही दिवसांपूर्वी नागलोकाचा त्याग केला आणि पृथ्वीवर आलो. तुझ्यावर पाळत ठेवली."
क्लाराचा आक्रमक पवित्रा बघतच पवन मध्ये पडणार तेवढ्यात क्लाराने शिवराजवर हल्ला केला. स्वरा आणि मीना शिवराजला वाचवायला म्हणून क्लाराला मागे खेचू लागल्या तेव्हा तिने दोघींना जोरात ढकलले. त्या खाली जाऊन पडल्या. मग क्लारा अर्धी साप आणि अर्धी मानव बनली आणि आपल्या शेपटीने तिने शिवराजला गुंडाळण्याचा प्रयत्न केला. अजयने एक बाजूला पडलेला दगड उचलून क्लाराकडे फेकणार तेवढ्यात क्लारा चां पाय घसरला आणि ती अंधारातील जवळच्या एका लाकडी दरवाजाकडे घसरत गेली आणि तो दरवाजा उघडून ती गायब झाली.
सगळे इतके आश्चर्यचकीत झाले की समोरचे घडले त्याचे अजून त्यांना आकलन होत नव्हते. त्यातच पवन म्हणाला, "पुढे काय घडले ते मला माहिती आहे!"
त्यामुळे त्यांच्या गोंधळात आणखी भर पडली.
मग पवनने सगळ्यांना आतापर्यंत घडलेला सर्व प्रसंग सांगितला.
शिवराज म्हणाला, "अच्छा म्हणजे असे आहे तर! मग तो नीलमणी आपण लगेच मिळवायला हवा. मग तळ्यातील विष नष्ट करून पाच मासे हस्तगत करायला हवे. त्याद्वारे हे नागलोक नष्ट करायला हवे!"
"तुला आम्ही चुकीचं समजलो, तुझ्यावर संशय घेतला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत!", स्वरा आणि मीना म्हणाले.
"हरकत नाही. प्रसंगानुसार तुमचा संशय बरोबरही होता. सगळेजण वेगवेगळे गुहेत शिरलो असतो तर क्लाराने दगा फटका केला असता आणि इतर गुहेतील काहीजण वाचले असते, असा विचार करून मी वेगवेगळे जायचे म्हणत होतो! या तीन भुयारी मार्गांपैकी मधला मार्ग ज्यावर क्लारा अडून बसली होती तोच नागलोकाचा मार्ग होता! हे मला माहिती होते, म्हणून मी विरोध केला तेव्हा ती चिडली! ती कसेही करून तुमच्या सोबत मोहिमेवर आलीच असती पण त्या रात्री तुम्ही सर्वजण आयतेच तिच्याकडे गेलात त्यामुळे तिचे काम आणखी सोपे झाले. "
"मग आता इथून बाहेर कसे पडायचे?", मीनाने विचारले.
"हा उजव्या बाजूचा भुयारी मार्ग आहे तिथून! काळजी करू नका. मी अर्धा नाग आणि अर्धा मनुष्य अशा रुपात परावर्तित होईल आणि तुम्ही सर्व माझ्या अंगावर बसा. मी सरपटत या भुयारी मार्गातून वेगाने तुम्हाला बाहेर घेऊन जाईन! हा मार्ग भुयाऱ्यातून सहाव्या पर्वताकडे जातो. तिथून पर्वताच्या आत मधल्या भुयारातून वरच्या मंदिरात जाईन, पूर्ण साप रूपामध्ये तो घंटेतला नीलमणी हस्तगत करेल आणि पुन्हा खाली येईल. तोपर्यंत तुम्ही सर्वजण खाली तळ्याजवळ थांबा", शिवराज म्हणाला.
अंधाऱ्या गुहेतून पुढे जाताना अमर, पवन, स्वरा, मीना, करण, अजय शिवराजच्या पाठीवर बसले होते. त्याच्या अंगावर मजबूत, खडबडीत खवले चमकत होते.
गुहेतील वातावरण थंड आणि ओलसर होते, पाण्याच्या टपकण्याच्या आवाजाने वातावरण अधिक गूढ झाले होते. नागाच्या भुयारतून सरपटण्याच्या आणि चालण्याच्या प्रत्येक हालचालीने भुयारात एक प्रतिध्वनी निर्माण होत होता. सर्वजण एकमेकांच्या जवळ बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती, पण त्यांच्या डोळ्यांत एक चमक होती, तसेच अनपेक्षित आणि अद्भुत प्रवासाचा उत्साह!
"इमॅजीका मधले रोलर कोस्टर राईड, या आपल्या राईडच्या पुढे काहीच नाहीत. इथे येऊन खजिना मिळो न मिळो पण या राईडमुळे पैसे वसूल झाले बघा!"
"अरे शिवराज भाऊ जरा, उलटे पुलटे होऊन दाखव ना?"
"अरे वेड्यानो, मी उलटा पुल्टा होईल पण तुम्ही सीट बेल्ट लावलेले आहेत का? घरंगळत जाऊन उगाच कुठेतरी गुहेत जाऊन एखाद्या दरवाजावर पडाल आणि जाल महाभारत काळातील युद्धात! तिथे गेल्यावर लागेल एखाद दुसरा बाण आणि व्हाल जखमी"
"हा, ते पण बरोबर आहे म्हणा!"
"माझ्या खवल्यांना पक्के धरून ठेवा. मी आता वेग वाढवतो आहे!"
"ए! आपण हे सगळं संपलं ना की इथे परत येऊ आणि रामायण काळात जाऊ!"
"जाऊ जाऊ नक्की जाऊ. मी तर भविष्यकाळात जाईन. जेव्हा सगळीकडे रोबोटचे राज्य असेल!"
"मी तर अलेक्झांडरच्या काळात जाणार!"
आत पुढे गुहेतील भुयार अरुंद आणि गुंतागुंतीचे होते. नागाने त्याच्या सर्पाकृती शरीराच्या साहाय्याने सहजपणे त्या मार्गांमधून मार्ग काढला. आता कुणीच एकमेकांशी संवाद साधला नाही, फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि नागाच्या पुढे जाण्याच्या आवाजानेच वातावरण भरले होते.
थोड्यावेळाने, ते एका मोठ्या पोकळीत आले.
आता त्यांच्यासमोर एक विशाल तळं दिसू लागलं, ज्याचा पाण्याचा पृष्ठभाग शांत आणि आरशासारखा होता. पाण्याच्या पृष्ठभागावर टॉर्चचा प्रकाश पडताच एक दिव्य तेज निर्माण झालं. नागाने तळ्याच्या काठावर थांबून सर्वांना खाली उतरवलं. ते सगळे विस्मयचकित झाले होते, तळ्याचं पाणी नितळ आणि निळसर रंगाचं होतं, जणू काही स्वप्नातील दृश्य!
त्या अर्ध नागाने त्या दिव्य तळ्याच्या काठावर उभं राहून एक मंत्र जपायला सुरुवात केली. त्या मंत्राच्या प्रभावाने तळ्याच्या पाण्यात एक हलचल निर्माण झाली आणि त्याच्या हातात एक प्राचीन भाला प्रकट झाला, ज्याच्या टोकाला तेज होतं.
सर्वजण त्या प्रसंगाने थक्क झाले होते, त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि विश्वासाचा भाव होता.
शिवराज म्हणाला, " हा भाला घ्या. एखादे संकट आल्यास ह्या भाल्याच्या मदतीने त्याचा सामना करा! तुम्ही सर्वजण इथेच थांबा! आता मी वर जाऊन तो नीलमणी घेऊन येतो!"
असे म्हणून शिवराज भुयारतून वर निघाला सुद्धा!
सर्वजण तळ्याकाठी बसले.
बराच वेळ झाला.
अमर म्हणाला, "हा शिवराज गेला नीलमणी आणायला! पण तो खरच आपल्याकडून आहे ना? की तोही क्लारा कडून आहे? दोघांनी मिळून नाटक करून आपल्याकडून नीलमणी कुठे आहे हे जाणून घेतले आणि ते दोघी आता नीलमणी घेऊन पसार तर होणार नाहीत ना? नाही म्हणजे, धूम टू पिक्चर मध्ये नाही का ऐश्वर्या राय नेमकी कोणाकडून आहे तेच लवकर समजत नव्हतं. ऋतिक कडून की अभिषेक बच्चन कडून! म्हणून म्हटलं!"
"ए अरे गप बस ना भाऊ! इथे प्रसंग काय आणि तुला चित्रपट कसला सुचतो रे?", त्याच्या पाठीतील एक गुद्दा हाणत करण म्हणाला.
स्वरा पण हसत हसत म्हणाली, "आपल्यासमोर जे घडतंय ते काय बाहुबली पिक्चर पेक्षा कमी आहे का? त्याचा अनुभव घ्यायचा सोडून तुला तो कसला चोर लोकांचा पिक्चर आठवतो! धूम टू?"
इकडे शिवराज पूर्ण सर्प रूपात मंदिराच्या घंटी वर चढला. त्यातून घंटेच्या जिभेवर म्हणजे आपण घंटी हाताने ज्याद्वारे वाजवततो त्यावर चढला. रात्र होती त्यामुळे मंदिरात कोणी नव्हते. त्या जिभेला घट्ट विळखा घालून तोंडाने जिभेच्या पुढचा फुगीर भाग त्याने तोडला, त्यातला नीलमणी तोंडात धरून ठेवला आणि पुन्हा त्याच वेगाने भुयारातून खाली तळ्याकडे येऊ लागला.
शिवराज आला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
"हे घे अजय! तुझ्या हातून टाक तो मणी तळ्यात!" शिवराज म्हणाला.
* * *
भाग 4
गुहेतील दिव्य तळ्याकडे सर्वजण आश्चर्याने पाहत होते. अजयच्या हातात नीलमणी चमकत होता, जणू काही त्यात अमर्याद शक्ती होती. अजयने तळ्यात नीलमणी टाकण्याचा निर्धार केला आणि तो तळ्याकडे जाऊ लागला तेव्हा अचानक तळ्यातून खूप मोठी पाण्याची लाट उडून अजयच्या अंगावर आदळली आणि तो फेकला गेला, पण नीलमणी त्याच्या मुठीत घट्ट धरलेला होता. ते पाणी त्याने तोंडात आणि नाकात जाऊ दिले नाही. त्याने श्वास रोखून धरला. कारण ते पाणी विषारी होते.
आणि अचानक, तळ्याच्या काठावर एक स्त्री आली. तिचं शरीर कमरेपासून वर मानवाचं होतं, पण खाली एक लांब सर्पाकृती शेपटी होती. ती अत्यंत सुंदर, आणि भव्य पण धोकादायक दिसत होती. होय! ती कर्कोटकी होती. नागलोकचा अंत जवळ आल्याचे तिला क्लाराने सांगितले होते. क्लारा विविध काळ-दरवाज्यांतून नागलोकांत जाऊन पोहोचली होती. नाग लोकात क्लारा थांबली होती, आणि तिने सगळे सैन्य तयार ठेवले होते, गरज पडलीच तर ती येणार होती. कर्कोटकी स्वत: लढायला आली कारण तिला शिवराजवर राग होता. तिच्या डोळ्यांत प्रखर तेज होतं. ती अजयकडे रोखून पाहत ठाम आवाजात म्हणाली, "तू हा मणी तळ्यात टाकू शकत नाहीस आणि कुठे आहे तो गद्दार शिवराज? त्याचा मी आधी खातमा करते!"
शिवराज समोर आला, "माझे काय करायचे ते कर! पण मला तुझ्या अत्याचारी नागलोकाचा अंत करायचा आहे!"
"अरे वा? इतका काळ आमच्यात राहिलास, लहानाचा मोठा झालास आणि त्याचे पांग हे फेडलेस? तुला एक संधी देते. पुन्हा माझ्या बाजूने ये. मी तुला नाग लोकाचे सेनापतीपद देते!"
"मला कसल्याच पदाची अपेक्षा नाही. मला हे सर्व नवीन सहा मानव-मित्र मिळालेत हेच खूप झाले!"
"हे मानव-मित्र तुझ्या काय उपयोगाचे? मी एक फुंकर मारली की ते उडून हवेत अनेक कोस दूर जाऊन पडतील!"
"त्यांना हात तर लावून बघ. तुझी गाठ माझ्याशी आहे!"
कर्कोटकी खदाखदा हसायला लागली.
"बघा तरी! मला कोण आव्हान देत आहे? माझ्याच नागलोकातील एक साधा नागकुमार!"
तेवढ्यात संधी साधून पवनने भाला उचलला आणि तो कर्कोटकीकडे फेकला. तिने शेपटीने वेटोळे घालून तो भाला पकडला आणि फेकून दिला. तो अजयच्या बाजूला पडला.
अजय थोडा गोंधळला. त्याच्या एका हातात मणी होता पण त्याने धैर्य एकवटून दुसऱ्या हाताने भाला उचलला आणि तळ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. शिवराजकडचे तिचे लक्ष विचलित झाले आणि अजयला थांबवण्यासाठी आपली सर्पाकृती शेपटी कर्कोटकीने अजयच्या दिशेने झेपावली. तिच्या चपळ हालचालींमुळे अजयला सावधगिरीने पुढे जावं लागलं. त्यांच्यात एक तीव्र संघर्ष सुरू झाला.
तेव्हा नाग-कुमार शिवराज, पुढे आला.
त्याने कर्कोटकीला आव्हान दिलं, "कर्कोटकी, हा मणी तळ्यात अजय टाकणारच. तू त्याला थांबवू शकत नाहीस."
अजयने भाला शिवराजकडे फेकला. त्याने झेलला.
शिवराज आणि कर्कोटकी यांच्यात एक जोरदार युद्ध सुरू झालं. त्यांच्या चपळ हालचालींनी आणि शक्तीने तळ्याच्या काठी एक भयानक दृश्य निर्माण केलं.
शिवराज आणि कर्कोटकीमध्ये प्रचंड शक्ती आणि कौशल्याचं प्रदर्शन सुरू झालं. त्यांच्या सर्पाकृती शरीरांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी पुरेपूर वापर केला. शिवराजने आपल्या शक्तीने कर्कोटकीला पाठीच्या दिशेने जोरदार धक्का दिला, ज्यामुळे ती थोडीशी डगमगली. शिवराजच्या हातातील भाल्याचे टोक चमकायला लागले.
कर्कोटकी शिवराज सोबत लढण्यात व्यस्त होती, तोपर्यंत सर्वांनी अजयच्या आजूबाजूला संरक्षणाचं वर्तुळ तयार केलं, ज्यामुळे अजयला तळ्याकडे जायला संधी मिळाली. शेवटी अजयने वेगाने तळ्याच्या दिशेने तो मणी फेकला तो बरोबर मध्यभागी जाऊन पडला. गढूळ रंगाचे तळे एकदम स्वच्छ झाले. तेवढ्यात मध्यभागतील पाणी वर उसळले आणि त्या पाण्यातून पांच मासे वर उसळी मारून आले आणि त्या पाण्यातच तरंगत राहिले. ते उसळी मारणारे पाणीसुद्धा तिथेच कारंजासारखे उसळत राहिले.
जास्त वेळ लागला म्हणून क्लारा निवडक सैनिक घेऊन तळ्याकडे निघाली.
राहू केतू हे दोघे दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या एका अज्ञात ठिकाणी भरलेल्या शिबिरात गेलेले होते. त्यामुळे इथल्या घडामोडी त्यांच्यापर्यंत नाग लोकांतील कुणी पोहोचवू शकले नाही.
इकडे कर्कोटकी सावरली आणि तिने आणखी त्वेषाने शिवराजवर हल्ला केला. शिवराजने तो चुकवला. कर्कोटकीच्या कपाळाच्या मध्यभागी मारण्याचा चान्स शिवराजला मिळत नव्हता. तिथे मारले की कर्कोटकीला मृत्यू येणार असा तिला भगवान शिवाचा शाप होता. हे त्याने नाग लोकांत चोरून ऐकले होते. पण याची कर्कोटकीला कल्पना नव्हती. तिने शिवराजला आपल्या शेपटीत गोल गुंडाळून करकचून दाबले. तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला. त्याच्या हातातून भाला खाली पडला. पण इतर कुणालाही "तो भाला कर्कोटकीच्या कपाळात मार" असे खुणेनेसुद्धा शिवराजला सांगणे जमत नव्हते.
आपण दोर गुंडाळून भोवरा जमिनीवर सोडून देतो तसे कर्कोटकीने शिवराजला शेपटीने भिरकावले त्यामुळे शिवराज हवेत गोल गोल गोल फिरत फिरत गुहेच्या एका भिंतीवर आपटून जोरात गरगरत खाली पडला.
कर्कोटकी त्वेषाने हसत दोन्ही हातांनी विजय दर्शवणारी छाती ठोकत होती आणि मोठी आरोळी देत होती.
घरंगळत शिवराज मीनाच्या पुढ्यात पायाशी येऊन पडला, त्याने तिला खुणेने भाला उचलून कर्कोटकीच्या कपाळाच्या मध्यभागी मारण्याची खूण केली.
मीनाने हवेत एक उंच उडी घेतली, भाल्यावर झेपावली आणि तो उचलून तिने नेम धरून पुनः उंच उडी मारली आणि बरोबर कर्कोटकीच्या कपाळाच्या दिशेने फेकला. तिला तो बरोबर लागला आणि कर्कोटकीचा अजस्त्र देह धडकन तळ्याच्या बाजूला कोसळला. जमीन अशी थरथरली की जणू काही भूकंप झाला. कर्कोटकी मेल्यामुळे क्लारा आणि इतर सैन्य पण मातीच्या ठिसुळ ढेकळासारखे फुटून नष्ट झाले. सर्वत्र ओली माती माती पसरली. मीनाने भाल्यासाहित जमिनीवर अलगद उडी मारली.
"अरे मीना! तू साडीतली सुपर हीरोईन, देसी वंडर वूमन आहेस की काय?", अजय अति आनंदाने म्हणाला.
मीना ऐटीत म्हणाली, "पुढच्या वर्षीच्या ऑलिंपिकमध्ये मी भालेफेक स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे! माझे खूप आधीपासून भालाफेकचे प्रशिक्षण सुरु आहे! काय समजलात मला तुम्ही लोक?"
"वा! ही मीना तर छुपी रुस्तूम निघाली!", स्वरा.
जमिनीवर रक्ताळलेल्या स्थितीत उठून बसलेल्या शिवराजला पण हसू आवरत नव्हते. तो हसत म्हणाला, "कमाल केलीत मीनाताई तुम्ही!"
"ए अजय! लवकर ते तरंगणारे मासे काढ तिथून आणि काढ ते पंचतत्व गोल त्यांच्यातून! मग तो खजिना", अमर.
"जरा दमानं घे! थोडा आराम कर! मेली ना आता ती, कर्बोदकी! थोडा आराम करूया, मग बाकीचे काम करू!", करण.
"कर्बोदकी नाही, कर्कोटकी!", अजय.
"अरे, नावात काय आहे! असे महान डेव्हिड हॅमिल्टन म्हणाला ते उगाच नाही!", पवन.
"अरे लिटरेचरच्या भुकेल्या साहित्यिक माणसांनो, मला जाम भूक लागली आहे. पोटात कावळे भुंकत आहेत! आधी पोटाचे बघा मग डोक्यात थोरा मोठ्यांचे विचार भरा!", स्वरा.
"इथे गुहेमध्ये फूड डिलिव्हरी होते का? म्हणजे होम डिलिव्हरी सारखे, केव्ह डिलिव्हरी!", करण.
"त्यासाठो मोबाइल तर चालू असायला पाहिजे ना!" अमर.
सर्वजण विजयाच्या आनंदात तिथेच लोळले कारण खूप थकवा आला होता. रात्रीचे किती वाजले याची सुद्धा कुणाला अजून माहिती नव्हती. तळ्याच्या मध्यभागी उसळलेल्या कारंज्याच्या वर ते पाच मासे अजूनही त्या पाण्यात गोल गोल उसळत तरंगत होते. गुहेतील काळोखात दूर असलेल्या एका कोनाड्यात एक विचित्र आकाराचा प्राणी बसला होता. आपले चमकणारे हिरवे डोळे रोखून तो त्या सर्वांकडे एकटक बघत होता.
(काही पौराणिक संदर्भ वापरुन मी लिहिलेली ही काल्पनिक कथा आहे. माझ्या सर्व प्रिय वाचकांच्या प्रतिक्रियांची मी वाट बघत आहे)
(समाप्त)
गोष्ट आवडली. सुरूवात चांगली
गोष्ट आवडली. सुरूवात चांगली झाली पण गुहेत फार कंन्फुझन झाले. शेवटी नक्की त्यांनी काय केले त्या पाच माशांचे ते कळले नाही.
आता ते माशांच्या पोटातून ते
आता ते माशांच्या पोटातून ते पंच तत्व गोल काढतील आणि नष्ट झालेल्या नाग लोकातून समुद्र मंथनातील खजिना मिळवतील.
कथा अजून पूर्ण वाचून झाली
कथा अजून पूर्ण वाचून झाली नाही. जेवढी वाचली त्यावरचा अभिप्राय-
कथाबीज चांगले आहे. पण गरज नसलेली वर्णने जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे कथा खूप लांबलेली आहे. कोणी काय कपडे घातलेत आणि गाडीत कोण कुठे बसलेय तसेच मीनाचे सतत लाजणे या पाल्हाळात काटछाट केली तर कथा आटोपशीर होईल.
थॅन्क्स धनवंती. पुढच्या
थॅन्क्स धनवंती. पुढच्या वेळेस कथा लिहिताना मी हे नक्की लक्षात ठेवीन. आपण पूर्ण कथा वाचून आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवावी ही विनंती.
चांगली आहे कथा
चांगली आहे कथा
पात्र परिचय थोडा वेगळ्या शब्दात मांडला तर ते पल्हाळ वाटणार नाही.
स्थळ काळाचे दरवाजे वाचताना केकू ची कथा आहे की काय वाटल...
तर नाग लोक वैगरे वर्णन जानी दुश्मन ची आठवण करून देणार होत
एकंदरीत मजा आली वाचताना
पुढचा भाग येऊ द्या
धन्यवाद मन्या!
धन्यवाद मन्या!
शेवटचा सस्पेन्स ठेवून एकदम
शेवटचा सस्पेन्स ठेवून एकदम Hollywood movie पाहतोय असे वाटले.
छान झालंय सर्व कथानक.
थँक्यू अज्ञानी!
थँक्यू अज्ञानी!
आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी
आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी बहुमूल्य आहेत. फक्त आपणा सर्वांना विनंती आहे की, प्रतिलिपि या ॲपवर सुध्दा आपणापैकी कुणाचे अकाऊंट असेल, तर तिथे सुद्धा माझ्या कथेला 5 स्टार पैकी रेटिंग देऊन तिथेही आपल्या याच प्रतिक्रिया नोंदवाव्यात. धन्यवाद.
https://pratilipi.page.link/sK8u4NYS81wRfao59