फादर्स डे

Submitted by प्रतिक रमेश चां... on 18 June, 2024 - 02:32

‘फादर्स डे’ आहे म्हणे आज. नेटकऱ्यांना वडिलांचा पुळका येण्याचा खास दिवस! एरवी वडिलांच्या सावलीला देखील उभे न राहणारे वडिलांना खेटून उभे असतानाचे फोटो टाकतायत. हे एक बरंय, आजकाल कुठला ‘special day’ आहे हे सकाळ झाल्या बरोबर कळतं. नेटकऱ्यांनी फोटो टाकलेत, स्टेटस ठेवलंय. काहींचा उत्साह अगदी काल रात्री पासूनच दांडगा आहे. ‘फादर्स’ पण आजकाल ‘social’ वर आल्यामुळे त्यांनाही कळतंय की आज आपला कौतुकाचा दिवस आहे!! असो.
पण खरंच काय हो एवढे ‘Frank’ असतो का आपण आपल्या जन्मदात्याशी? खरंच का त्यांना मिठी मारतो आपण? ‘My Dad My Hero’ असं जाऊन सांगून आलाय का कोणी त्यांना? तुम्ही माझे ‘#आधारस्तंभ’ आहात असं म्हणालाय का त्यांना कोणी? वस्तुस्तिथी पाहता उत्तर आहे ‘नाही’. कारण सरळ आहे, भिती आणि लाज. लाजच जास्त वाटते खरं पाहता. कारण आपण वयात आलोय आता, वडिलांना मिठी वगैरे शोभत नाही. भिती म्हणाल तर ती अगदी लहानपणा पासूनच मनावर बिंबवली गेलीये. ‘आवाज नाही काढायचा . . . नाही तर बाबा मारतील’, ‘संध्याकाळी पप्पा येऊ देत . . . त्यांनाही कळू देत किती मार्क्स पडलेत तुला’. बाप म्हणजे राग, संताप, शिस्त आणि आई म्हणजे मायेचा झुळझुळीत झरा हे समीकरणच जुळवलंय आपण. बापाच्याही अंतकरणात झरा असतो आणि तोही आई इतकाच झुळझुळीत वाहतो हे जणू विसरलोच.
‘तू कितनी अच्छी है . . . ओ माँ’, ‘स्वामी तिन्ही जगाचा . . .’ किती गाणे आणि कविता आहेत आईवर खरं आणि अशा किती कविता-चारोळ्या आहेत बापावर? असतील तरीही ते माहित नसेल तर आपलं दुर्दैव. चारोळ्या ऐवजी नुसत्या आरोळ्या का उठत असतील बापा च्या नावावर? याच कारण म्हणजे पुरुष प्रधान असलेल्या आपल्या संस्कृती मध्ये सर्वात दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे खुद्द बापच!!! ‘Express’ होयची कोंडी. पहिल्यांदा बाप बनल्या नंतर आनंदाने नाचूही शकत नाही आणि लेकीच्या लग्नात टाहो ही फोडू शकत नाही.
मुळात एका दिवसासाठी स्टेटस वगैरे ठेऊन व चार शब्द लिहून जन्मदात्याचे उपकार आपण फेडू शकत नाही, किंबहुना ते फेडण्यासाठी नसतातच मुळी. म्हणतात ना, बाप हा छताच्या पत्र्या सारखा असतो. पावसात वाजतो खरा, पण आश्रय त्याच्याच खाली मिळतो. कर्तव्याच्या ओझ्या खाली झुकून व गंजून चाललेल्या या पत्र्याला आपण आपल्या कर्तृत्वाच्या ‘oil paint’ ने ताजे-तवाने ठेऊ शकतो एवढंच.
आई-वडिलांची तुलना करू नये, होऊच नये खरं तर. परंतु, एखाद्या बापची चिंता, राग, संताप, शिस्त व किंचितसा आनंद आणि माया अशी बाहेर राहून समजणे अशक्य. त्यासाठी बापच व्हायला हवे!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users