पवारसाहेबी बखर

Submitted by संप्रति१ on 13 June, 2024 - 00:40

.
ये समयी दिवस कष्टाचे आले. पातशाही उन्मत्त जाली. पैका बहु मेळविला. ते कारणे पातशाहा चौखूर उधळिले. खराबी बहुत केली. कारभाराचे धोरण योग्य नाही. बेरोजगारी मातली. पिकांस मोल नाही. सर्वांस पोटांस लावणे हा तो राजधर्म. पातशहा राजधर्म पाळित नाहीत. माणसामाणसांत भेद करतात.

तेसमयी म-हाट देशी काका पुतण्यांत जोरदार बिघाड जाला. दादासाहेब मीच कारभार करितो असे हटास धरून बैसले. रूसोन पातशाहीत निघोन गेले. लेकरू समजून वाढविले. प्रतिपाळ केला. ऐसे दादा निघोन गेले. उघड दावा मांडिला. घरची उणीदुणी बाहेर काढिली. गनिम बोलला नाही ते दादा बोलिले. हे बरे जाले नाही.

.
दादा गेले. दादा गेले. सगळे सुतक पाडून बैसले.
साहेबी विचारिले की काय जाले? इथे कोणी मेले आहे की काय?
मावळे बोलिले की सगळे सरदार दादांबरोबर गेले. गनिमाचे फौजेस दाबजोर कुमक दिल्लीवरोन येते. समय मोठा कठिण आला. गनिमाचा बीमोड होत नाही.
साहेबी गरजले की ऐसा कैसा बीमोड होत नाही? चला बघोन घेऊ. काढा घोडी बाहेर..! म-हाट देश झुकत नाही. मनसूबा तडीस नेऊ. गनिम घरात घुसला. तर हातपाय गाळोन काय होते? उठा. लढा. मारिता मारिता जे होईल ते बघू, अशी हिंमत साहेबी दिधली. बहु खुबीने बोलणी केली. आवघ्यांचे येकमत केले.

पातशहा खलिते बहु धाडितात, डोला मारितात, आमचे समागमे येता काय?
साहेबी झिडकारिले, तुम्ही कपट करोन फौजा मोडिता. घरे फोडिता. जोरावर होवोन मस्ती करीता, हे नीट नाही.‌ आम्ही येत नसतो. काय करता ते करा.!!

सांप्रतकाली गनिमांस बोलणेचा पाचपोच नाही. जीभ सैल सोडतात. तयांनी साहेबांचे वय काढिले. आराम करणेचा सला दिला. भटकणारी आत्मा बोलिले.

साहेबी गरजले की तुम्हा समस्तांस धुणी धुवावयास लावतो, तेव्हाच थांबतो.! माझे वय काढिता.? आरे तुम्ही माझे आजून बघितलेच काय? ऐसा वीरश्रीचा आवाज टाखिला.

३.
दिल्लीचा पातशहा मुजोर. त्यांस दयामाया नाही. माझे ते माझे आणि तुझे तेही माझे, ऐसे त्यांचे चलन.!
बारामतीत लेकीविरूद्ध सुनबाईंस जुझात उतरविले. घरात कलह पेरला. कसेही करोन बारामती हस्तगत करावी. येक बारामती घेतिली तर साहेबास कायमचे वैराग्य येते, ऐसा इरादा. गनिमाचा जोर मोठा. तयापुढे कोण्ही टिकाव धरत नाही. मनास येईल त्यास कोठडीत घालतात. मनास येईल त्यास सोडून देतात. म्हणोन येकेक करोन सगले पातशाही आसऱ्याला पळतात.

साहेबी बोलिले, दिवस आमचे वार्धक्याचे आले समजोन घरात येवोन पुंडाई करता. थांबा, हिसका दावतो.

इंदापूरास भरणे मामासाहेब यांनी कटकट काढिली. तों साहेबी उपदेशिले की मामा ऐसे वागणे बरे नव्हे. तुजला सरळ करावयास जराही वेळ लागणार नाही.!

साहेबी शांत बुधीने खेळिले. झाडून सगळे नवे जुने मुत्सद्दी येक केले. सर्वांस खलिते गेले. रात्रंदिवस असामी पाठवोन चौक्या पहारे सारा बंदोबस्त चोख राखावा. समस्तांस आपणाकडे करोनि घेतले. ऐसा येकमेळा जाला. ऐसा गोपाळकाला जाला. गनीमाचे गोटात लाग लाविला. फळी मोडून काढिली. सेवटी गनिमाचे फौजेचा बारामतीत मोड जाला. फौज गुजराथेच्या रोखे पळोन गेली.

.
नगर दक्षिणचे काय करावे? रोकडा सवाल.
कोणी कबुल होईना.
साहेबी लंकियांस बलावणे धाडिले,' भेटीस येणे'
त्याचवरून लंके शिलेदार साहेबांस भेटिले. येकांती बोलिले. लौकीक बोलणे जे बोलावयाचे तेही बोलिले.

खबर लागताच विखे पाटील यांचे गोटात खलबल माजली.
मुंबयीच्या शेठ साहूकारांकडोन मध्यस्थीचा खलिता धाडिला. लंकियांस नगरला धाडू नये. दुसरा कुणी शिलेदार द्यावा.
साहेबी गालांतले गालांत हासले. सेठ लोकांनी व्यापार उदीम करावा, राजकारणात लुडबुड करो नये, हे साहेबी धोरण. तयांनी लंकियांसच फौजबंद केले. बख्तरबंद शिरस्त्राण घालोन जुझात लोटले. बोलिले तुम्ही नगर दक्षिणेस जावे. समागमें थोरात यांची कुमक घ्यावी. नगरचा बुरूज पाडोन कार्यभाग साधावा. आमचा तीस सालाचा हिशेब चुकता करावा.
लंकियांनी नगरच्या भुईकोटास शह दिला. दोन मास किल्ल्यास वेढा घालून बैसले. विखे पाटील यांचा जोर मोठा. परंतु लंकियांनी शर्थ केली. अखेरीस किल्ल्यास सुरूंग लाविला. तुतारीचे निशाण फडकाविले. गुलाल उधळित डौलाने बारामतीस डेरेदाखल जाले.

५.
बीड परगणा ही सरदार मुंढे यांची वतनाची जागा.
बाप्पा बोलिले, मला आज्ञा जालियास मी बीड परगण्यात उभा ठाकतो. जयंत्राव कारभारी बोलिले की बाप्पा तुमच्यासिवाय दुसरा आहेच कोण ? बीड आणाल तर तुम्हीच आणाल. ऐसा हौसला बुलंद केला.
साहेबी रूजूवात केली, तुजजवळ कुमक नाही. सारे सरदार दादासाहेब यांचेबरोबर गेले. जागा कठिण. सुस्ती करू नये. येश आपेश नशीबाचा वाटा. तलखीने जुझावे..!
यावर बाप्पा बोलिले की जे उरले तयांना घेऊन साहेबकामी गाडून घेतो. फते करितो. हटत नाही.
त्या प्रांती जरांगे-पाटीलबावा म्हणोन येक मातबर असामी गतसाली उदयास आले. ते उठोन बैसले. मजल दरमजल करीत मराठवाडा पायाखाली घालून आले. ''याला पाडा, त्याला पाडा, जोरात पाडा, हळू पाडा'' ऐसे परवलीचे सांगावे दारोदारी धाडिले. बीडात पाटीलबावांचे जाणे येणे अंमळ जास्तच वाढले. तेकारणे सरदार मुंढे यांचे फौजेत बेदिली माजली. पाटीलबावा बीडातून का हलत नाहीत? तयांनी इतरत्र जावोनही पाडापाडीची साद घालावी, ऐसे मुंढे यांचे लोकांचे म्हणणें..! परंतु पाटीलबावा आईकत नाहीत. तयांची बाप्पांस कुमक जाली, ऐसे जनमानूस बोलते. बुलंद झुंज जाली. कोण्ही मागे हटेना. किती पाय मोडले. किती दात उडाले. गणती नाही. मध्यानरातीपर्यंत खणाखणी जाली. झुंज अवघ्या मुलखात गाजली. अखेरीस बाप्पांनी बीडावर अंमल बसवला.
''बाप्पा..! कामच जाले ना..!'', ऐसे जनमानूस बोलीभाषेत म्हणति.

.
प्रांत सोलापूर. किल्ले माढा. पवारसाहेबी बेलाग कोट.

साहेबी सुरूवातीस महादेवराव जानकरियांस उतरवतो म्हणून हाकारे घातले. गनिमांस हूल दिली. त्यास फशी पडून गनिम बिचकला. महादेवरावांस परभणीत धाडिले. बघा, आम्ही तर सन्मानाने बोलावित होतो, महादेवरावच आले नाहीत, ऐसे बोलावयास साहेब मोकळे ते मोकळेच.!

वास्तविक माढा सोलापूर हे म्होईते पाटील यांचे जहागिरीचे स्थळ.! पातशहाने ते काढोन नाईक निंबाळकर यांस दिले. हे म्होईते पाटील यांनी कसे सहन करावे? येकडाव सहन केले दुसऱ्यांदा कसे करावे? म्होईते म्हणजे काई बारके मानुष नव्हेत..! ते दहा सोंडेचा हत्ती.‌ रेचत नाईत..! बंडाचे निशाण फडकाविले.

साहेबी शांतपणे जाळे टाकून वाटच बघत बैसले होते. ऐन वख्ताला झपका मारिला. शेवटच्या दिसी म्होईते पाटील यांस माढ्याच्या रणात उतरवले. नाव ऐकोनच गनिमाचे लष्कर धास्त घेवोन अवसान खस्त जाले.

तेसमयी श्रीमान उत्तमराव जानकरियांनी कैफियत मांडली. स्वारी पुणें मुक्कामी मोदीबागेत येवोन दाखल जाली. म्होईते आज आमची रसद रोख घेणार आणि त्यांचे रसदेचा उधार वायदा करणार, असे कसे? उदईक त्यांची रसद आम्हांस मिळेल याचा काय भरवसा? पवारसाहेबी तुम्ही मध्यस्थी करावी. शब्द द्यावा. आमचे योगक्षेम पहावें.

साहेबी आश्वासिले. तुमचे क्षेम आमच्याकडे लागले. तुम्हांस रिकामे ठेवणार नाही. मालसिरस मुलुख जहागिरी उत्तमराव जानकरियांस देल्ही. पोषाख पानसुपारी देवोन मार्गस्थ केले.
अकलूजच्या भुईकोटानजीक तरवारीस तरवार लागली. बंदुका भाले जंबुरे यांची जोरदार धुमचक्री जाली. भांड्यांचा कडाका जाहला. येकच टिपरघाई उडाली. लढाई मोठी हातघाईची जाली. सेवटी गनिमाने पांढरे निशाण धरिले आणि फलटणचे रोखे श्रीशंभू महादेवाच्या डोंगराकडे रान कातरिले.

७.
साहेबी दोन दोन महिने घोडियांवरून उतरले नाहीत, ऐशी मेहनत‌ केली. लढाया शर्तीच्या केल्या. दूरवर व-हाडप्रांती अंमल बसविला. बहु पराक्रम करून भिवंडी मुलुख सोडविला. वणीदिंडोरीत गलोलीतनं देमार कांदे भिरकावले. कांद्याचा रट्टा गनिमास वर्मी लागला. त्यातून गलिम उठला नाही.

घोडनदी शिरूर प्रांती सरदार कोल्हे यांनी विडा उचलला.
तेथे खुद दादानी आपला घोडा टाखिला.
तेसमयी साहेबी येकेकास एकांती घेतले. मनसुबे दिल्हे. दादांचे फौजेत फितूर पेरला. कोण्ही कोणाचे ऐकेना, ऐसी गत जहाली. दादासाहेबी फौज खाऊन खाऊन सुस्त. कुणी जागचे हलेना. स्वस्थ बसून मौज बघत राहिले.

तयांनी पवारसाहेबांस खलिता धाडिला की आम्ही तुम्हांस वेगळे मानत नाही‌. तुम्ही आम्हांस वडिलांचे जागी. आशिर्वाद असो द्यावा. ऐसे आतून येकबळ जाले. आणि घोडनदीत कोल्हें बळ बांधोन राहिले. आपले ते आपलेच ठेविले. निशाण राखले. तुतारी वाजवोन आभाळ तडकाविले. मजल दरमजल करीत बारामतीस डेरेदाखल जाले.

.
ऐसे साहेबी खुद रणात घालून घेतले. सांप्रतकाळी ये देशी असा कोण्ही जुझला नाही. ये उमरीत असे जुझताना कोण्ही देखिले नाही.
सगळा तालेवार सरंजाम काढिला. उतरावयाचे तेथेच जावोन उतरले. लढाईची हिंमत धरली. भालदार चोपदार यांनी चोहिकडे हाकारे घातले. तमाम शिलेदार पथके यांनी तुतारीचे निशाण फरारा सोडिले. जनसमिंदर मागें राखला. पातशाहीत धुंद उठविली.

जे जे राखावयाचे ते राखले. जे जे मारावयाचे ते मारिले. नको त्या जागी मारोन सुजविले. पातशहास असली नकली उलगडून दाविले. फते जाली. पराक्रम चौदिशा जाला. अवघियांनी वाहवा केली‌. लक्ष लक्ष दिवे लावले. ऐन बरसातीत सण दिवाळीचा केला.! बहु आनंद उच्छाव केला. बहु आनंद मंगल केला..! ऐसे वर्तमान जाले..!

(टीप : हे कृपया हळू घ्यावे. मनोरंजनापुरतेच घ्यावे, ही विनंती. )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे बखर.
अर्धी वाचली. धमाल आहे.
जाला ऐवजी जाहला हवंय का?

लै खास!

सुजल्यावर कळतंय, सायबांनी मारलंय Wink

मस्त!

मी जाम प्रेमात आहे या बखरीच्या~~~

शोल्लीड जमली आहे....आधीच इतिहासाचे आकर्षण, त्यात 'सांप्रत'कालच्या गोष्टी अगदीच खुमासदार झालेल्या. असाच आर्यावर्तीच्या वंगप्रांती(बंगाल), चेराप्रांती(केरळ) व अवध(उ.प्र.), मैथिली प्रांती(बिहार)च्या सुरस बखरी वाचावयास आवडतील. (माझे डोके अन विचार आधीच सर्वदेशी चौखूर उधळले आहे!)

मस्त आहे बखर. बारामती परगण्यात घात जाला घात जाला. गनिम करून दादा ने वहिनीस दिल्लीस धाडलेच. हा शुद्ध हल्कटपणा आहे माने Proud

मागे लोकसत्तेमध्ये तंबी दुराई यांचा याच धाटणीचा एक लेख वाचलेला, तो थोडा न्यूट्रल व्युपॉईंट ने होता....पण हा ही मस्त जमलाय...अगदी वर्तमानपत्रात छापण्या योग्य.