उत्तर.

Submitted by केशवकूल on 10 June, 2024 - 12:53

उत्तर.
द्वान ईव्हने समारंभपूर्वक सोन्याचे अंतिम कनेक्शन सोल्डर केले. डझनभर टेलिव्हिजन कॅमेऱ्यांच्या साक्षीने संपूर्ण विश्वात तो कार्यक्रम प्रसारित होत होता. त्याची दृश्ये दाखवली जात होती. द्वान ईव्हने समाधानाने मान डोलवली.
नंतर ती स्विचच्या बाजूला जाऊन उभी राहिली. विश्वातील मानवी संस्कृती असलेल्या सर्व ग्रहांच्या सर्व मॉन्स्टर कंप्युटिंग मशीनना एकाच वेळी कनेक्ट करेल असा तो स्विच होता. छप्पन अब्ज ग्रहांच्या -- सुपर सर्किटना एका सुपरकॅल्क्युलेटरमध्ये जोडेल, एक सायबरनेटिक्स मशीन जे सर्व आकाशगंगांचे सर्व ज्ञान एकत्र करेल अशी त्याची क्षमता होती.
द्वार रेनने कार्यक्रम पहाणाऱ्या अब्जावधी मानवांना प्रयोगाची थोडक्यात माहिती दिली. मग काही क्षणाच्या शांततेनंतर तो म्हणाला, "आता, द्वान ईव, आता तुझी पाळी."
द्वान ईव्हने स्विच क्लोज केला, छप्पन अब्ज ग्रहांवरून उर्ज्वेची एक लाट आली. मैल-लांब पॅनेलवर दिवे चमकले आणि शांत झाले.
द्वान ईव मागे सरकली आणि एक दीर्घ श्वास घेउन म्हणाली, “नाही द्वान रेन, पहिला प्रश्न विचारण्याचा मान तुझा आहे."
"धन्यवाद," द्वान रेन म्हणाला. "माझा प्रश्न असा आहे कि ज्याचे उत्तर आजपर्यंत कोणतेही सायबरनेटिक्स मशीन देऊ शकलेले नाही."
तो यंत्राकडे वळला आणि त्याने प्रश्न केला, "देव आहे का?"
एकाही रिलेवर क्लिक न करता, किंचितही संकोच न बाळगता अमानुषी आवाजाने उत्तर दिले,
"हो, इतके दिवस नव्हता पण आता देव आहे."
द्वार ईवच्या चेहऱ्यावर अचानक भीती पसरली. तिने स्विच उघडण्यासाठी उडी मारली.
निळ्या आकाशातून विजेचा एक लोळ तिच्यावर येऊन आदळला आणि स्वीच वितळून बंद झाला तो कायमचाच!
(फ्रेड्रिक ब्राऊन ह्यांच्या “Answer” नावाच्या कथेचा स्वैर मनःपूतम् अनुवाद)
फ्रेड्रिक ब्राऊन ह्यांनी ही कथा १९५४ साली लिहिली. त्यानंतर म्हणजे १९५६ साली असिमोव ह्यांनी “The Last Question” ही कथा लिहिली. दोन्ही कथा सुपर सुपर संगणकाच्या थीम वर आधारित आहेत. फ्रेड्रिक ब्राऊनची कथा केवळ २६० शब्दात संपते तर असिमोवची कथा जवळजवळ सात पाने व्यापते. ही कथा मानवाच्या अब्जावधी वर्षाच्या कालावधीत घडते.
असिमोवने लिहिलेली कथा थोडक्यात अशी आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शक्तिशाली संगणक बनवण्यात येतो. देवा विषयी तेव्हा पर्यंत झालेले संशोधन, निरनिराळे तात्विक विचार, मतमतांतरे इत्यादी माहिती संगणकाला पुरवली जाते. आणि प्रश्न विचारला जातो, “देव अस्तित्वात आहे का?”
संगणक थोडा वेळ विचार करून उत्तर देतो, “पुरवलेली माहिती पुरेशी नसल्यामुळे उत्तर देता येत नाही.”
युगानुयुगे लोटतात, नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन महासंगणक बनवण्यात येतात. आणि प्रश्न विचारला जातो, “देव अस्तित्वात आहे का?”
संगणक थोडा वेळ विचार करून उत्तर देतो, “पुरवलेली माहिती पुरेशी नसल्यामुळे उत्तर देता येत नाही.”
संगणकाला जेव्हा ह्या प्रश्नाचे उत्तर मिळते तेव्हा थोSSSडा उशीर झालेला असतो. विश्वातील जीवसृष्टी नष्ट झालेली असते, तारे विझत चाललेले असतात. विश्वाचा अंतिम क्षण जवळ येत आहे. ज्यांनी त्या महासंगणकाची निर्मिती केली आणि तो प्रश्न विचारला होता ते आता काळाच्या पडद्याआड गेले होते.
महासंगणक हिरमुसला. म्हणाला, “लेट देअर बी लाईट.”
(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Interesting. Happy
संगणकांची जीवसृष्टी आधी आली, त्यांनी देवाची/ महासंगणकाची निर्मिती केली, ती होईपर्यंत त्यांचीच मूळ जीवसृष्टी नष्ट झाली आणि नंतर महासंगणकाने मानवांची निर्मिती केली. याकारणाने तोच जगन्नियता/ देव ठरला. Biblical शेवट आवडला. त्यामुळे कथा उलगडली. समजून घेण्यात काही चुकले असेल तर सांगा. कारण Let there be light नंतर And there was light नाही आलेलं. जे मूळ बायबलमधे आहे.

Let there be light नंतर And there was light नाही आलेलं. जे मूळ बायबलमधे आहे.>> मला वाटतं कि ते अध्याहृत आहे. म्हणून ते लिहिले नाही. असिमोवच्या मूळ कथेत And there was light आहे. असिमोवची मूळ कथा बरीच निराळी आहे. त्यात देव आहे का? असा प्रश्न विचारलेला नाही. ती माझी कल्पना आहे. त्यात निरनिराळे प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न highly technical आहेत. शेवटचा प्रश्न आहे , "entropyच्या प्रवाहाची दिशा बदलता येईल काय?"
माझ्या दृष्टीने ते सर्व प्रश्न "देव आहे का?" ह्या प्रश्नाची निरनिराळी रूपे आहेत.
“Answer” आणि “The Last Question” ह्या दोनी कथा आंतरजालावर उपलब्ध आहेत.
आता मला जे समजले ते
--मानवाने जरी सर्व विश्व पादाक्रांत केले तरी "देव अस्तित्वात आहे का?" हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे.
--देव ही संकल्पना मानवनिर्मित आहे.
अर्थात हा विषय १००० शब्दात झटकून टाकण्याजोगा खचितच नाहीये.
अस्मिता, मामी आपले आभार!

समजलं केकु, थॅंक्स.
Answer” आणि “The Last Question” ह्या दोनी कथा आंतरजालावर उपलब्ध आहेत.
>>>> जमल्यास वाचेन.

The Last Question मला आठवत ते नक्की असेल तर अ‍ॅसीमोव्ह ची हि सर्वात आवडती साय फाय कथा आहे. आवडती कथा बहुधा त्याच्या डीटेक्टिव्ह सिरीज मधली आहे.

तुमचा स्वैर अनुवादाचा प्रयोग पण आवडला केकू.

अ‍ॅसीमोव्ह ची हि सर्वात आवडती साय फाय कथा आहे>>> बरोबर आहे.
कथा बहुधा त्याच्या डीटेक्टिव्ह सिरीज मधली आहे.>>> मला कल्पना नाही. कारण ही कथा अनेक कथा संग्रहात आहे.
पण मला स्वतःला ब्राऊनची कथा आवडते.
So short and so sweet. विशेषतः ती पंचलाईन.
ब्राऊनच्या कथेचे मी शब्दशः भाषांतर केले आहे. तर असिमोवची कथा माझ्या मनाप्रमाणे लिहिली आहे.

आभार.
पण क्रेडिट गोज टू दोज टू ग्रेट्स.