धंदा

Submitted by बिपिनसांगळे on 8 June, 2024 - 12:39

धंदा

त्या रस्त्यावर दारूचं एक दुकान होतं. संध्याकाळी तिथे मोप गर्दी असायची. त्यामुळे आजूबाजूची दुकानं थोडी लवकरच बंद व्हायची.
एक पलीकडची पानटपरी सोडली तर.
बरं, त्या रस्त्याला रात्री आठनंतर इतर लोक फारसे नसायचेच. समोर एक मोठी कंपनी होती.तिची कम्पाउंड वॉल होती. लांबलचक पसरलेली. त्यामुळे वर्दळ नाही अन शांतता.
त्यामुळे रात्री तिथे बेवड्यांची फौज जमायची. बेवडा तर मारायचा; पण बारमध्ये परवडत नाही. मग बाहेरच. शहरात असे बरेच अड्डे. त्यातलाच हा एक. त्या कंपनीच्या भिंतीची कंपनी त्यांना बरी पडायची.
ठरलेले मेंबर तर असायचेच.पण कधी नवीनही असायचे. जमणाऱ्यांची भांडणं - मारामाऱ्या ठरलेल्या. कशाहीवरुन. अगदी काडेपेटीतली एक काडी दिली नाही म्हणूनसुद्धा.
एकदा असेच चार-पाच जण भांडतभांडत पानटपरीपाशी पोचले. त्यांचं नाटक बराच वेळ चालू होतं.
तेव्हा पानवाला म्हणाला , ‘दादांनो , इथं भांडू नका.धंदा आहे माझा.’
नशीब ! ते काही न बोलता गेले.
-----
रात्रीची वेळ. पानवाला टपरी बंद करून घरी निघालेला. तो त्याचा रस्ता सोडून डाव्या हाताला वळला. तिथेही ती कंपाउंड वॉल होतीच.
रस्त्यावरचा प्रकाश अंधुक होता. वर्दळ नव्हतीच. एका माणसाला चार - पाच जणांनी घेरलेलं होतं. काय चाललंय ते बघायला पानवाला थांबला. तसं त्यातल्या एकाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत नापसंती स्पष्ट दिसत होती. तसा दुचाकीची गती वाढवत पानवाला तिथून निघाला.
ती पोरं त्या माणसाला लुटत होती.
-----
त्यानंतर काही दिवसांनी .
त्याच्या पानटपरीवर काही पोरं आली. त्यांचा अवतार भारी होता. पानवाल्याने त्यांना काही ओळखलं नाही. त्यांनी सिगारेट घेतली. एकाने गुटखा.
त्यातला एकजण म्हणाला,’ त्या दिवशी रात्री- तुम्ही थांबायला नव्हतं पाहिजे. बघायला नव्हतं पाहिजे… आमचा पण धंदा आहे !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults