इंग्रजांच्या नवख्या प्रदेशात राजांनी पाय टेकले. मातृभूमीपासून हजारो कोस दूर आलयाची जाणीव राजांना अस्वस्थ करत होती पण नवे अनुभव आणि नविन लोकांस जाणून घेण्यासही राजे उत्सुक होते. ४ दिवसांच्या विश्रांतीनंतर राजांना, राजे चार्लस यांच्या दरबारात येण्याचे आमंत्रण आले. आपल्या लव्याजम्यासहित राजे निघाले - इंग्लंडच्या राजे चार्ल्स यांना भेटण्यास!
राजे चार्ल्स च्या दरबारात महाराजांचे यथोचित, प्रेमाने स्वागत झाले. मानाच्या देणग्यांची, भेटवस्तूंची देवाण-घेवाण झाली. व्यापारविषयक बोलणी झाली. राजे चार्ल्स यांनी राजांची योग्य ती दखल घेत, त्यांची व्यवस्था नीट झालीय ना याची जातीने विचारपूस केली. राजे इथे त्यांच्या तब्येतीकरीता, त्यांच्या रोगावर काही नविन इलाज असल्यास तो करून घेण्यास, इथल्या डॉक्टरकडून उपचार करून घेण्यास आले आहेत हे जाणून राजे चार्ल्सनी त्यांचा योग्य बंदोबस्त केला. राजांच्यवर योग्य ते औषधोपचार करण्याची राजे चार्ल्सनी आदेश दिले. जिम नेविन्सन याला राजांची निगा राखण्याचे, त्यांना हवं-नको ते बघण्याची सोय लावून दिली.
डॉ. स्मिथ यांनी इंग्लंडमधील प्रख्यात आणि राजे चार्ल्स यांचे डॉ. यांच्या देखरेखीखाली राजांना इग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. या परक्या, थंडीच्या प्रदेशात उत्तम बडखास्त , तब्येतीवर उपचार करण्याकरीता चांगले डॉक्टर ,योग्य निदान, औषधोपचार याने राजांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होऊ लागली.
त्यांचा मुक्काम हॉस्पिटलमधून त्यांना दिलेल्या निवासस्थानी हलला. थंडीचे दिवस असले तरी राजांच्या निवासस्थानी छान उबदार सोय करून देण्यात आली होती. गरम कपडे घालून राजे बाहेर रपेट करू लागले. राजे चार्ल्सच्या दरबारात अधून मधून हजेरी लावून त्यांचे कामकाज समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.
या काळात राजांच्या चौकस आणि लोकं जोड्ण्याच्या स्वभावामुळे भाषेचा अडसर ने येता , दुभाषी शेणवीमार्फत राजांच्या दरबारातील अनेक लोकांशी ओळखी/चर्चा झाल्या. एकंदरीत या सर्व चर्चांतून इंग्रज आणि बाकी ही आजू-बाजूच्या देशातील हे लोक आपल्याच देशात नाही जगात पण अनेक देशांवर व्यापार आणि राज्य करायला पोहोचले आहेत, हे राजांनी जाणलं. त्यांची ही जग पादाक्रांत करण्याची महत्वाकांक्षा जाणून - हे नक्कीच आपल्या देशावर केवळ व्यापार करून थांबणार नाहीत हया राजांच्या तर्काला पुष्टी मिळाली.
हेच ते राजे चार्ल्स..ज्यांना स्वतःच्या लग्नात - पोर्तुगीज राजकन्ये बरोबर झालेल्या त्यांच्या विवाहात- राजकन्येच्या वडीलांकडून मुंबई बेटं हुंड्यात मिळाली होती. मुंबई बेटे - आपला प्रदेश...तो असा आयजीच्या जीवावर बायजी उदार - प्रकारे पोर्तुगीज उठतात आणि टोपीकरांना बहाल करतात - हेच आपले अपयश आहे आणि या परक्यांचे यश! हे खरे धूर्त लोक.
एकीकडे महाराज या परक्या मंडळींना समजून घेत होते, त्यांचे डावपेच जाणून घेत होते, त्यातून आपल्याला काय करता येईल-काय शिकता येईल याचे धागे तपासत होते, त्यावेळी धूर्त - राजे चार्ल्स पण गप्प बसले नव्हते. लग्नात हुंडा म्हणून मिळवलेल्या मुंबईच्या सात बेटांनंतर राजे चार्ल्स यांची महत्वाकांक्षा वारू उधळल्यासारखी उधळली होती. मुंबई बेटं ही एक पहिली महत्वाची पायरी आहे, या पायरीवरून पुढे बरंच वर चढून जायचंय अशी महत्वाकांक्षा त्यांच्या मनात जोम धरू लागली होती.
त्यांच्या ईस्ट इंडिया प्रतिनिधी मार्फत राजांची त्यांनी कसून माहिती काढली होती. राजांच्या सर्व कारनाम्यांचीची माहिती काढून हे पाणी वेगळंच आहे - हे त्यांनी जोखलं होतं. या अश्या दूरदर्शी-चाणाक्ष इसमास परत जाऊ द्यावं का? या अश्या लोकांचा आपल्याला व्यापारास आणि पुढे-मागे राज्यविस्तार करायचा झाल्यास अश्या चाणाक्ष लोकांकडून मोठा विरोध होऊ शकतो - हे जाणून - अश्या स्वतःहून आपल्या गुहेत चालून आलेल्या सिंहाला आपण मोकळे सोडावे का - अश्या तर्हेचे विचार राजे चार्ल्सच्या मनात घोळू लागले. काही महिने तरी या सिंहाला बंदोबस्तात ठेऊन काही डावपेच आपल्याला खेळता येतायंत का? मराठ्यांच्या या राजाला प्यादे बनवून मराठ्यांकडून आपल्याला त्यांचा प्रदेश, किल्ले, दारूगोळा, माणसं मिळवता येतील का - अशी चाचपणी राजे चार्ल्सनी करायला सुरूवात केली.
अर्थातच याची कुणकुण राजे चार्ल्स यांच्या सरदारांना आणि जिम नेविन्सनला लागली. राजांना सुखरून नेऊन, औषधोपचार करवून, सुखरूप परत आणण्याची जबाबदारी घेतलेल्या जिमची परिस्थिती मात्र विचित्र झाली. राजांना दिलेला शब्द मोडणं त्याला शक्यच नव्हतं. दरबारातल्या सरदारांकडून त्याने राजे चार्ल्स नक्की काय करतील याची माहिती काढायला सुरुवात केली. राजे चार्ल्स यांच्या मनात सध्या शिवाजी राजांना अलिशान सोयीत ठेवायचं, त्यांना परतीच्या जहाजाची, नावाड्यांची, मार्गदर्शकांची सोय होऊ न देण्याचे आदेश राजे चार्ल्स यांनी सोडल्याचं जिमच्या कानी आले. राजे त्यांचे आरमार, त्यांचे मोठे गलबत घेऊन आले असले तरी एवढ्या मोठ्या परतीच्या प्रवासाला टोपीकर मदतनीस, वाटाडे असल्याखेरीज जाणे मराठ्यांना शक्य नव्हते - हे जिम जाणून होता. हताश झालेला जिमने काहीश्या अपराधी भावनेनेच राजांना ह्या घडामोडींची बातमी दिली. पूर्व दिशेला जाणार्या सर्व जहांजांची कसून तपासणी करण्याचे आदेश राजे चार्ल्स यांनी दिले आहेत अशी बातमी देखील जिमने राजांच्या कानी घातली.
हे ऐकून राजे भलतेच अस्वस्थ झाले...ही तर आग्र्याची पुनरा व्रुत्ती झाली....जवळपास तसेच आपण नजरकैदेत पडल्याचे राजांना वाटू लागले. पण डगमगून जाणारे ते महाराज नव्हेतच! आई जगदंबेने तेव्हा सुटका केली, आणि तीच आताही मार्ग दाखवेल याची त्यांना खात्री होती.
म्हटलं तर राजे कुठेही फिरायला मोकळे होते. पण परतीच्या गलबतांची, मदतनीसांची आणि वाटाड्यांची सोय मात्र काही होताना दिसत नव्हती. राजे दरबारात जात होते, राजे चार्ल्स यांचं कामकाज बघत होते. इंग्रजांचे राजकारण, डावपेच, परभूमी पादाक्रांत करण्याची मनिषा, चतुराई सारं राजे न्हाहाळत होते.
इंग्लडमधील वास्तव्यात राजांच्या वेगवेगळ्या लोकांशी भेटी-गाठी, ओळखी, बोलणी होत होती. 'केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार' हे राजे स्वतः अनुभवत होते. याच भेटीगाठींमधून राजांची ओळख झाली ती दरबारातील एका आगळ्या-वेगळ्या इसमाची! पालिचो - त्याचं नाव! सर्व इंग्रजांमध्ये वेगळाच दिसणारा हा इसम कोण या उत्सुकतेतून राजांनी त्याच्याशी - संवाद साधला. पलिचो कडून त्याची जीवनकथा राजांनी ऐकली.
सुमारे ४-५ वर्षांपूर्वी इंग्रजांनी त्याला आणि आणि अजून ७-८ जणांना अमेरिका व कॅनडा या प्रदेशांतून बळजबरीने इंग्लंडला आणले होते. काहींना गुलाम म्हणून तर काहींना स्वतःच्या मतलबाकरीता इंग्रजी शिकून आपले दुभाषे म्हणून वापर करण्याकरिता - अश्या कारणांनी! त्यातले काही पळून जाऊन स्पॅनिश वगैरे जहाजांनी त्यांच्या मायभूमीत परतले होते. पलिचो मात्र इंग्लंडमध्ये राहिला. ७-८ वर्षांपूर्वी आलेल्या रोगाच्या साथीमध्ये जवळचे सर्व कुटुंबिय गमावल्यानंतर या परक्या देशात राहून वेगळे-नवे अनुभव घ्यायला त्याची ना नव्हती. एव्हाना तो अस्खलित इंग्रजी बोलायला शिकलेला.
याकाळात राजे आणि पलिचो यांच्यात शेणवी च्या माध्यमातून अनेक चर्चा होत राहिल्या. राजे त्याला अनेक प्रश्न विचारत - "तुमचा मूळ वंश काय? अमेरिका या देशी कुठली भाषा बोलली जाते?" एक ना अनेक, राजांना प्र्श्न पडत. पलिचो च्या उत्तरां मधून राजांना कळलं - तो आणि त्याचे लोक अमेरिका देशीचे मूळ रहिवासी. त्यांचं जीवनमान, त्यांच्या टोळ्या, टोळ्यांमधील युद्धं - सारं राजे ऐकत असत.
पलिचोकडून एका वेगळेच, नविनच जग राजांच्या समोर उलगडत होते. यात सुमारे १६२० सालापासून निरनिराळ्या देशातून लोकं कशी पश्चिम दिशेला लांबवरच्या भूप्रदेशावर पावले उमटवत आहेत, या प्रदेशात वास्तव्य कारण्याची त्यांची इच्छा, मूळ राहिवाशीयांचा त्यांच्य या अतिक्रमणाला विरोध - त्यातून घडणारी युद्ध - सारे काही पालिचो कडून राजे ऐकत होते. पलिचो कडून राजांना त्या दूरदेशीच्या रहिवाश्यांच्या अनेक कथा ऐकायला मिळाल्या. निधड्या छातीने, काटकतेने परकीयांचे आक्रमण थोपवून लावण्याच्या त्या कथा ऐकताना, त्या कधी न पाहिलेल्या अमेरिका प्रदेशातील मूळ रहिवाश्यांमध्ये राजांना दिसत होते ते आपले मावळे. तेच युद्धाचे डावपेच, आपल्या भूमीला जपण्यासाठी शत्रूशी केलेली तिच हातापाई. पूर्णपणे वेगळा मुलुख - पण तीचजिगर, तेच स्वातंत्र्याचं स्वप्न! राजे विलक्षण आकर्षणाने त्याच्या गोष्टी ऐकत. त्यावर टिप्पणी करत. सर्वकाही पूर्णपणे वेगळं असूनही राजे या नवख्या माणसाशी वेगळ्याच धाग्याने जोडले गेले.
राजांना यातून एकंदरीत इंग्रज आणि इतर फिरंगे यांची जबरदस्त अभिलाषा , जग पादांक्रात कारण्याची त्यांची महत्वाकांक्षा लक्षात येत होती. आपल्या देशावर परकीयांनी – मुघलांनी आक्रमण करून आपली काय अवस्था केली आहे, हे अगदी जवळून बघितलं असल्याने हे गोरे-फिरंगी हा आपल्या देशाला असलेला नवा धोका आहे हे परत एकदा अधोरेखित झालं. आज मुघलांच्या अमलाखाली असलेला आपला देश उद्या या नव्या परक्या लोकांच्या ताब्यात जायला वेळ लागणार नाही हे राजांच्या लक्षात येत होतं.
या दरम्यान, आता ४-५ वर्षांनी मायभूमीला परत जाण्यास आपण उत्सुक आहोत हे पलिचोने राजांना बोलून दाखवले. राजांकडून त्याला त्यांना केलेल्या नजरबंदीची कल्पना होती...आणि पलिचोने राजांना सुचवली, एक अभिनव - राजे चार्ल्सच्या डोळ्यात धूळ फेकणारी - त्यांच्या पलायनाची योजना. पूर्वेकडे जाणार्या गलबतांकडे राजे चार्ल्स लक्ष ठेऊन आहेत तर राजांनी त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याकरीता उलट दिशेला प्रयाण करावे. पलिचोबरोबर त्याच्या मूळ देशी जाण्याचा प्रस्ताव त्याने राजांसमोर ठेवला. राजांच्या मनात तरळून गेली, आग्र्याहून सुटका! औरंगजेबाच्या डोळ्यात धूळ फेकण्याकरीता थेट दक्षिणेचा रस्ता न धरता उलट्या दिशेला मथुरेला जाऊन अलाहाबाद, गोवळकोंडा मार्गे राजगडावर परत येण्याकरीता केलेली घोडदौड!
इतिहासाची पुनरावृत्ती होत होती. इतक्या लांबच्या नवख्या प्रदेशात जाण्याची जोखीम पत्करावी का? परत मायदेशी परतण्याची काय सोय होणार, कधी होणार याची शाश्वती नाही. स्वराज्याचे, युवराजांचे काय होणार, रायगडावर काय चालू आहे, दक्षिण प्रांतातल्या मोहिमेचं काय ? तसे येणार्या जाणार्या इंग्रज व्यापार्यांकडून खलिते येत होते...खबरबात काही प्रमाणावर कळत होती...पण इतक्या दूर देशी गेल्यावर ते होणे नव्हे.
पण हातावर हात ठेऊन बसणार्यातले राजे थोडीच होते!! राजांच्या जिद्दीने, चळवळ्या स्वभावाने उचल खाल्ली. आणि राजांनी निर्णय घेतला - पलिचो बरोबर त्याच्या देशी जायचं. तिथे अनेक देशीचे खलाशी येत असतात, ज्यातले कित्येक पूर्व दिशेला जहाजे घालतात. पलिचोच्या सांगण्यानुसार त्यांच्यातल्या एखाद्या जहाजावर सोय होऊ शकेल अश्या भरवश्यावर राजे निघाले...पलिचोबरोबर - एका अजून नव्या जगात - अमेरिका!!!
मस्त रंगतेय ही सिरीज.इतिहास,
मस्त रंगतेय ही सिरीज.इतिहास, तेही शिवाजी महाराजांचा धागा धरून असं फॅन फिक्शन(ही संज्ञा या प्रकारच्या लिखाणाला बरोबर वापरली आहे का मी?) लिहिणं सोपं काम नव्हे.अभ्यास, व्यासंग दिसतो.
मस्त रंगतेय ही सिरीज.>>>>
मस्त रंगतेय ही सिरीज.>>>> खरयं !