मैत्र
घड्याळात नऊ वाजले आणि मी बंगल्याच्या बाहेर पडलो. दारातच बसलेला टोमी माझ्या पायात घुटमळला, पण आज नेहमीप्रमाणे त्याला कुरवाळावे असे मला वाटत नव्हते. दारात गाडी उभी होती. ड्रायव्हरला मी कालच कुठे जायचे ते सांगून ठेवले होते, त्यामुळे त्याने मला बघताच गाडी सुरु केली. कधी एकदा विलासच्या घरी जातोय असे झाले होते.
विलास हा माझा जवळचा आणि एकुलता एक मित्र. होय, एकुलता एकच ! वयाची पन्नाशी ओलांडली तरी मला मित्र नव्हतेच. व्यवसायाच्या निमित्ताने चार लोक संपर्कात आले आणि त्यांच्याशी माझी मैत्री झाली पण ती एका स्वार्थापोटी. मी माणूसघाणा आहे. विलास सुद्धा माझ्या आयुष्यात आला तो सुद्धा अगदी अलीकडे. पण थोड्याच दिवसात त्याच्याशी माझे सूर जमले आणि त्या सुराला मी नाव दिले मैत्री!!
विलासचे घर माझ्या बंगल्यापासून बरेच दूर. म्हणून मी ड्रायव्हरला गाडीचा वेग वाढवण्यासाठी सांगितले. आज त्याच्या घरी लवकरात लवकर पोचल्याशिवाय मला बरे वाटले नसते. मी अस्वस्थ होऊन घड्याळाकडे पाहिले.रस्त्यावरून वाहनांची येजा चालू होती आणि विलासचे घर येईतोपर्यंत त्यांच्याकडे अस्वस्थपणे पाहत बसण्याशिवाय माझ्याकडे इलाज नव्हता.
त्या दिवशी रविवार होता. रविवार हा माझा एकट्याचा दिवस असतो. तो मग मी कसाही घालवतो. दिवस भर स्वत:ला वाटेल ते करायचे आणि संध्याकाळी बायको बरोबर गप्पा मारत बसायचे. कधी एक दोन पेग मारायचे आणि रात्री निवांत झोपायचे हा माझा गेल्या कित्येक वर्षाचा दिनक्रम. त्या दिवशी मी एका पुस्तकाच्या दुकानात पुस्तक विकत घेण्यासाठी नाईलाजाने गेलो होतो. का कुणास ठाऊक गाडी घेऊन जावे असे वाटत नव्हते. रविवार असल्याने ड्रायव्हर सुद्धा आला नव्हता. म्हणून मी कॅब केली आणि पुस्तकाचे दुकान गाठले. पुस्तक विकत घेतले आणि घरी जायला निघालो. घरी परत जाताना मला कॅब मिळत नव्हती. मनात आले, आज बसने घरी गेलो तर ? नाहीतर उमेदवारीच्या काळात कितीदा बसने गेलो आहे. आज जाऊ बसने, तेवढीच जरा ‘मजा. बस स्टोप समोरच होता आणि मी बसची वाट बघत उभा राहिलो.
“ एक्स्क्यूज मी.” मी आवाजाच्या दिशेने मान वळवून बघितले.
“ तुमच्या हातातील ते पुस्तक अरुणा ढेरेंच आहे का ? मैत्रेय.?” माझ्या कपाळावर आठी. काय नडल होतं या माणसाला चोंबडेपणा करायला?
“ हो” मी त्रोटक उत्तर दिले. पण माझ्या रुक्ष आवाजाचा त्याला काही फरक पडत नव्हता. त्याने पुन्हा चिवटपणाने विचारले
“ तुम्ही त्यांच प्रेमातून प्रेमाकडे वाचले आहे ?
“ नाही. “ मी तुसडेपणाने बोललो. हा माणूस माझ्या डोक्यात गेला होता.
“ माझ्याकडे आहे ते पुस्तक. संग्रही ठेवण्यासारखे आहे. मी देईन तुम्हाला वाचायला.” त्याने ठामपणे सांगितले.
इतक्यात माझी बस आली आणि मी बस मध्ये बसलो. फालतू टाईमपास करत होता तो. माझा पत्ताच माहित नाही याला तर पुस्तक कसे देणार ? मी स्वत:शीच हसलो. मूर्ख कुठला !
डिंग डोंग .. संध्याकाळी सात वाजले होते. मी नुकताच factory तून परत आलो होतो. मीनलने दार उघडलं आणि ओरडून मला सांगितलं
“ तुझे क्लायंट आले आहेत” मला आश्चर्य वाटले. आत्ताच तर factory तून परत आलो आणि आत्ता घरी कोण आलं.? माझ्या कोणत्या क्लायंटला घर माहित असायचे कारणही नव्हते. माझ्या मनेजर शिवाय माझ्या घराचा पत्ता मी कुणाला दिला नव्हता. मी खोलीतून त्रासिक मुद्रा करून बाहेर आलो.
दारात तोच उभा होता. कालचा बस स्टोप वरचा तो चोंबडा माणूस. हातात कोणतेतरी पुस्तक होते.
“ नमस्कार ! मी आत येऊ शकतो का ?”
“ या ना. आपण .. “
“ मी विलास रणदिवे. काल आपण बसस्टोप वर भेटलो होतो. एका पुस्तकाबद्दल आपण बोललो. तुम्ही प्रेमातून प्रेमाकडे वाचले नाही म्हणाला होतात ..” तो मला आठवण करून देत होता. पण मला त्याची गरज नव्हती. कालचा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यापुढे होताच. पण मला आश्चर्य याचे वाटत होते “ याला माझे घर कसे माहिती?” कदाचित माझ्या मनातील त्याने ओळखले असावे.
“ देशपांडे साहेब, तुमचे घर मला नवीन नाही” या माणसाने मला धक्का दिला. हा काय मीनलचा कॉलेज मधील मित्र बित्र तर नाही. आमचे बोलणे ऐकून मीनल सुद्धा बाहेर आली. तिच्याही चेहर्यावर प्रश्न चिन्ह होते.
“ देशपांडे साहेब, मी आता तुम्हाला फार कोड्यात टाकत नाही. तुमचा बंगला एका निसर्ग रम्य ठिकाणी आहे आणि आम्ही दोघे तिघे रोज सकाळी चालत तिथे इथून काही अंतरावर असणाऱ्या नदीपर्यंत जातो. योगा करतोम थोडावेळ बसतो आणि परत येतो. त्यावेळी हा बंगला मी रोज पाहतो. त्याचे त्रिलोक नाव मला खूप आवडते मी माझ्या मित्रांना विचारले होते “ हा बंगला कुणाचा आहे ?” आणि मित्रांनी सांगितले “ शशांक देशपांडे” तुम्हाला मी अनेकदा पाहिले आहे. आम्ही फिरून घरी जेव्हा जात असतो तेव्हा आठ वाजता तुम्हीं गाडीतून बाहेर पडत असता. मी रोज तुम्हाला बघत असतो. तो म्हणत होता ते काही खोट नव्हत. गेल्या कित्येक वर्षात हे टाईम टेबल मी तंतोतंत पाळल होतं.
“ ओह माय गोड” मी आश्चर्याने म्हणालो. त्रिलोक बंगला तसा नजरेत भरण्यासारखा होता.
“ पण तुमचा बंगला कुठे आहे ?” मी सहज बोलून गेलो
“ आमचा बंगला वगैरे नाही. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या माणसाला बंगला परवडणार नाही. खूप पूर्वी जागा वडिलांनी घेऊन ठेवली होती. त्यावर तीन खोल्या बांधल्या आहेत. इथून पाच सात किलोमीटर आहे”
“ इतक्या लांबून तुम्ही फिरायला येता इकडे ?
“ अहो, लांब कसलं. गाडी वरून येतो. मित्राकडे गाडी लावतो. आणि इथे मॉर्निंग वोक करून जातो घरी. हा परिसरच जादूमय आहे.” आमचे बोलणे ऐकत मीनल सुद्धा बाहेर आली.
“ मीनल, हे विलास रणदिवे. कालच यांची ओळख झाली. माझ्या हातातील एका पुस्तकाने.”
“ काल साहेब म्हणाले त्यांनि प्रेमातून प्रेमाकडे वाचले नाही. मी ते विकत घेतले होते आणि नंतर कुणीतरी मला प्रेसेंट सुद्धा दिले होते. दोन कोपिज होत्या. मी विचार केला एक द्यावी तुम्हाला. तेव्हढेच पुण्य गाठीशी.” तो प्रामणिकपणे म्हणाला आणि तेव्हा मात्र आम्ही दोघेही हसलो. तो संभ्रमात पडला.
“ अहो, काल मला माझ्या बायकोने कामाला लावले म्हणून मी त्या पुस्तकाच्या दुकानात नाईलाज म्हणून पुस्तक विकत घ्यायला आलो होतो. ती काल बिझी होती आणि मी मोकळा होतो. तिला ते लगेच वाचायची इच्छा होती. तिला वाचनाची खूप आवड आहे. मला मात्र बिलकुल नाही.
“ मग वहिनी, हे पुस्तक मी तुम्हाला .. “ त्याने मीनल कडे बघितले.
“ पण हे पुस्त्तक तिने कदाचित ..
“ कोणते आहे ते .. “ मला तोडत मीनल ने विचारले
“ प्रेमातून प्रेमाकडे.
“अय्या, मी वाचले नाही ते . शोधत होते कितीतरी दिवस. त्या नेहमीच्या दुकानात मिळत नव्हते. बरे झाल तुम्ही आणलं ते “ मीनल उत्साहाने म्हणाली. आणि तिने ते पुस्तक हातात घेतले.
त्याच्याशी बोलताना मला जाणवत होते, पहिल्याच भेटीत मी त्याच्याशी काहीसा मोकळा झालो होतो. मी हसत गप्पा मारत होतो. एरवी मशीनचा आवाज आणि रुक्ष गप्पा यातच मी अडकलेलो असायचो. मीनलने त्याला चहा दिला. तिने परत या म्हणून सांगितले आणि तो निरोप घेऊन जाऊ लागला. तो जातना मी म्हणालो
“विलासजी”
“ विलास म्हणा .
“ ओके विलास तुम्ही आलात चांगले वाटले. पण एक पुस्तक देण्यासाठी तुम्ही इतका त्रास का सहन केलात?
“शशांक सर
“शशांक म्हणा “ मी नकळत बोलून गेलो
“ एक तर ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो त्याला त्रास म्हणता येत नाही. मी दोन गोष्टींच्या वर मनापासून प्रेम करतो पुस्तक आणि माणूस. पुस्तक माणसाने लिहिले असते आणि माणूस विधात्याने इतकच फरक. पण या दोन्ही गोष्टी मला आनंद देतात म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतो” विलास निघून गेला. मी मीनलला म्हणालो “ बरं झालं, तुला आवडतं पुस्तक मिळाल. वाचायचं आहे ना अजुनी?”
“ मी वाचलं आहे हे पुस्तक”
“ पण तू तर .. “
“ मी खोटचं सांगतील. किती आत्मीयतेन आला होता तो. ओळख काढून, केवळ माणसावरच्या आणि पुस्त्कावरच्या प्रेमाखातर. त्याचा मूड कशाला घालवायचा.” मीनल नेहमी असा काहीतरी विचार करते ते मला माहित होत. विलासशी त्यादिवशी माझ्या गप्पा चांगल्या झाल्या, पण त्या दिवसानंतर मी त्याला बरेच दिवस विसरून गेलो. आपण बरे आणि आपले काम बरे आणि शिवाय माणसाची असणारी अलर्जी त्यामुळे मी स्वत: संपर्क करायचा प्रश्नच नव्हता. पण अचानक कधीतरी तो factory मधे आला. “सहज आलो. चहा प्यायला”. म्हणून आला. गप्पा मारून निघून गेला. नंतर कधी त्याचा फोन तर कधी सकाळी फिरायला जाताना सहज म्हणून तो घरी यायचा. एकदा मीनलने, विलास आणि रेवतीला घरी सुद्धा बोलावले होते. पण रेवतीला बरे नाही म्हणून विलास एकटाच आला होता. आम्हीही त्यांच्याकडे गेलो होतो. रेवती काहीशी अबोल होती. पण मी तरी काय होतो ? आणि तसेही आम्ही दोनदा तर गेलो होतो पण त्यावेळी काहीसे अवघडलेपण वाटायचे. विलास जितका बोलका होता तितकी ती अबोल होती. मीनल एकदा म्हणाली सुद्धा “ रेंवती किती शिष्ट आहे “ बायकी टोट कडे दुर्लक्ष करायची मला गेल्या कित्येक वर्षात सवय झाली होती. पण स्वत:च्या नकळत माझी आणि विलासची मैत्री होत चालली होती. त्याच्या स्वभावात मोकळेपणा आणि प्रामाणीकपणा होता. आणि तोच मला भावला होता.
इतका वेळ वेगाने जाणारी गाडी अचानक थांबली. मी ड्रायव्हरला विचारले,
“ काय रे काय झालं ?”
“ सोरी सर, गाडी पंक्चर झाली आहे”
“ तुला आधी सगळं चेक करता येत नाही का ?” तो खजील झाला. गाडीत बसून माझे पाय अवघडले होते. मी खाली उतरलो. नेमकी एका पुलावर गाडी बंद पडली होती. ड्रायव्हरने साईडला गाडी घेतली. आणि जवळच असलेल्या एका कट्टयावर मी बसलो. आजूबाजूला सहज माझी नजर गेली. पुलाखालून नदी वाहत होती. हवेमध्ये गारवा होता. ते ठिकाण मला ओळखीचं वाटत होत. मी फारस कधी बिनकामाचं बाहेर पडत नाही, तरीसुद्धा हे ठिकाण आपल्या ओळखीचं आहे असं मला जाणवत होत.
मला आठवलं एकदा मी आणि विलास इथे एकदा आलो होतो. आणि याच समोरच्या कट्ट्यावर बसलो होतो. या पुलाखालच्या नदीला पाहत तो म्हणाला होता,
“ शशांक, माणसाचं आयुष्य ना या नदी सारखं असायला पाहिजे”
“ असायला पाहिजे का ? तुझं आहेच की” मी त्याला हसून म्हणालो.
“ या नदीचा प्रवाह बघ किती शांत आहे आणि तरीही त्यात सातत्य आहे. या प्रवाहात ती हळुवारपणे कुठेतरी सागराला मिळत असेल, पण स्वत:च अस्तित्व टिकवून आहे. तिच्या पाण्याचा गोडवा कधी कमी होतं नाही. अनेक लोकांची तहान भागवत तो अशीच शांत आणि प्रवाही असते” विलास कुठेतरी पाहत म्हणाला.
“ विलास, अति वाचनाने तू असा तत्वज्ञांनी झालायस. मला माझ्या कामात प्रवाह आणि नदी या गोष्टींचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. माझ काम हाच माझा प्रवाह”
“ हो. हा प्रवाह सुद्धा चांगलाच आहे रे. पण शशांक तुझ्या स्वभावातील एक गोष्ट मात्र खटकते. तू नेहमी याच विश्वात असतोस. तू, तुझी factory आणि तुझी बायको. आपली दोघांची मैत्री किती छान जमली आहे. तसे अजुनी मित्र तुझ्या आयुष्यात असायला काय हरकत होती. मित्र आयुष्यात रंग भरतात.”
“ हा ज्याचा त्याचा स्वभाव आहे विलास. तुझ्याशीच माझे सूर कसे जुळले हे मला कोडं आहे. तसा मी एरवि माणुसघाणा आहे. इतके लोक आयुष्यात हवेतच कशाला?तुचं इतके मित्र कसे जमवलेस आणि कशाला जमवलेस कुणास ठाऊक?” माझ्या बोलण्यावर विलास मोठ्यांदा हसला.
“ मी जमवले नाहीत. चांगले मित्र होत गेले . माणसांच्या सुख दु:खांशी समरस होण, त्यांच्यावर प्रेम करणे मला आवडतं. माणसाला माणसाच्या सहवासाची प्रेमाची गरज असते. कारण man is social animal
“ तू प्रेम करशील त्यांच्यावर. पण ते करतील याची खात्री आहे ?”
“ मला त्याची गरज नाही. प्रेम फक्त करायचं असतं. ज्या प्रेमातं अपेक्षा आहे त्याला प्रेम म्हणता येतं नाही.” विलास म्हणाला. मला फारसं पटतं नव्हतं . आणि मला पटतं नव्हतं हे त्याला कळत होत. तो मिस्कील हसत म्हणाला
“ शशांक, तुझा बिझनेस या प्रेमात आणू नकोस. आणि तरीही, तुला एक सांगतो तू प्रेम करत राहा, लोकं तुझ्यावर करीत राहतील. प्रेम हि कल्पना न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमासारखी आहे. जितक्या वेगाने तुम्ही एखादी गोष्ट फेकता तितक्या वेगाने ती परत तुमच्याकडे येते. प्रेमाचं तसेच आहे, तू जितका करशील तितकं तुला मिळत राहील “
“ सर, गाडी तयार आहे”
“ सर ... मी माझ्या विचारातून बाहेर आलो.
“ बघितलस ना व्यवस्थित ?
“ हो सर, चला आता” मी गाडीत बसलो. सहज म्हणून माझी नजर मोबाईल कडे गेली. मी फोन बघितला आणि धक्का बसला. मीनलचे दहा मिस कोल्ल्स. मनेजरचे दोन तीन. काही प्रोब्लेम तर नाही ना ? मी तिला फोन केला.
“ मीनल.. “
“ अरे तू फोन का उचलत नाहीस ?
“ फोन सायलेंट वर होता. माझं लक्ष गेलं नाही”
“ एरवि तू सारखा फोनवर असतोस, बर ते जाऊ दे, तुझ्या मनेजर चा फोन आला होता. महत्वाचे काम आहे म्हणत होता. संध्याकाळी सात वाजता घरी येऊ का म्हणत होता. तुला त्याने फोन केला होता. तू उचलला नाहीस म्हणून मला फोन केला.
“ बिलकुल येऊ नकोस म्हणाव.” मी स्पष्ट सांगितले
“ शशांक.. महत्वाचे काम आहे म्हणत होता. आज काय झाले आहे तुला ?बरा आहेस ना ?”
“ कितीही महत्वाचे असू दे. पण सुट्टीच्या दिवशी काम नाही. आपलं काम आणि आपलं घर दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी आहेत हे त्याला सांग”
“ तुला सांगू का शशांक, आपलं काम आणि आपलं घर दोन्ही गोष्टी आपपल्या ठिकाणी आहेत. त्याची सरमिसळ होऊ देता कामा नये.” मी स्कॉच चा पेग भरला, आणि आपला स्प्राईटचा ग्लास माझ्या ग्लासला भिडवत तो चिअर्स म्हणाला. विलास कधी ड्रिंक्स घेत नाही.
“ इतक्या वर्षात तू कधी शिवला सुद्धा नाही दारूला. हे मात्र मला पटतं नाही बघ. इतकं सुंदर पेय. एकदा पिऊन बघ, म्हणजे नशा काय चीज असते ते कळेल” “ दोस्त, ज्याला जीवनाची नशा चढली आहे, त्याला या दारूच्या नशेच काय ?”
“ विलास, इतकी वर्षे मी हेच सांगते आहे त्याला. पण ऐकायचं नाव घेत नाही.” मीनल किचन मधून बाहेर येत म्हणाली. विलास मीनल कडे बघून स्मित केले.
“ वहिनी त्याला मी बरोबर वळणावर आणतो. पण तुम्हाला काही मदत हवी आहे का ? तुम्ही एकट्याच काम करताय मघापासून” बोलता बोलता तो उठला. किचन मध्ये गेला. आणि कांदा कापायला सुद्धा घेतला.
“ राहू दे हो विलास. एकट्याने गोष्टी करायची सवय आहे मला. तुम्ही आज मदत कराल उद्या काय ?” मीनल माझ्याकडे बघत म्हणाली. मी काहीचं बोललो नाही, पण तिला चिडवण्यासाठी मी मुद्दामच म्हणालो,
“ बाकी विलास रेवती मात्र भाग्यवान आहे, तुझ्यासारखा नवरा मिळाला” विलास काहीसा गंभीर झाल्यासारखा वाटला. कांदा कापून तो माझ्याजवळ आला. आज बरेच दिवस माझ्या मनात एक विषय होता तो मला बोलायचे होते.
“ विलास, गेल्या कित्येक दिवसांत मला एक गोष्ट बोलायची होती. मी आज बोलतो. फक्त गैरसमज नको. रेवतीच्यात आणि तुझ्यात काही टेन्शन आहे ? विलास हसला.
“ नाही रे. का तुला असं वाटतयं ? ”
“ मी घरी येतो तेव्हा ती अबोल असते. किंवा इथे आम्ही बोलावतो तेव्हा ती येत नाही. का आमच्या विषयी काही तिला ..
“ असं काहीच नाही. तुमच्या विषयी तिच्या मनात काही का असावं ?”
“ नाही मी सहज म्हणालो. पण तुझ्या सारख्या मनमोकळ्या आणि भरभरून प्रेम करणाऱ्या माणसाच्या सहवासात सुद्धा ती खुलतं कशी नाही.”
“ स्वभाव.! मी प्रेम करतो. ते व्यक्त करू शकतो. ती करू शकत नाही इतकचं काय ते. मनातील प्रत्येक भावना व्यक्त करता येतेच असे नाही. काही लोक बघ. राग नुसता मनात धुमसत असतो. पण बोलून दाखवत नाहीत. प्रेमाचं सुद्धा अस असू शकतं . तिचं माझ्यावर आणि मुलांच्यावर प्रेम आहे. पण ते मनातल्या मनात. बाहेर पडत नाही. कधीतरी पडेल ते.” विलास म्हणाला खरा पण तरीही त्याच्या बोलण्यात विषाद होता असे मला वाटले. विलासची बायको सुस्वरूप होती, मुले चांगली शिकलेली होती. आता मिळवायला सुद्धा लागली होती. आणि विलास तर काय राजा माणूस होता. आणि बायको प्रेम व्यक्त करू शकत नव्हती. का ? असेल ती माझ्यासारखीच माणूस घाणी.! मी मनाचं समाधान करून घेतलं. विलास, मी आणि मीनल भरपूर गप्पा झाल्या. घड्याळात रात्रीचे साडेबारा वाजले होते. मग मात्र तो म्हणाला “ चल मित्रा. बराच वेळ झाला. मी निघतो आता”
“ आज इथे झोप. घरी फोन करून सांगू आपण”
“ नको रे. रेवती वाट बघत असेल. मुले काळजी करत असतील. मी निघतो आता. खरं म्हणजे इतका उशीर झाल्यावर सुद्धा रेवतीचा, मुलांचा फोन आला नव्हता. मला काहीसे खटकत होते. मनातल्या विचारांच्याकडे मी दुर्लक्ष केले.
“ सावकाश जा”
“ मी स्प्राईट घेतले आहे. “ विलास हसून म्हणाला आणि बाहेर पडला. तो निघून गेला आणि त्याचे एक वाक्य आठवलं प्रेम हे न्यूटनच्या गती विषयक तिसर्या नियमांसारख असत. मग रेवती ? रेवती या नियमाला अपवाद होती का ?
मी फार विचार न करता झोपायला गेलो. मद्याचा अंमल होताच थोडासा. उद्या रविवार उशिरा उठले तरी चालेल म्हणून निवांत झोपलो होतो.
“ शशांक ...
“ शशांक उठ लवकर. विलासच्या घरून फोन आहे तुला “ मी डोळे चोळत उठलो. रात्रीचा दीड वाजला होता. आत्ता या वेळी फोन. आत्ताच तर विलास घरी गेला होता. मग कदाचित पोचला नसेल आणि गाडी चालवतोय म्हणून फोन उचलत नसेल. मी फोन हातात घेतला आणि अक्षरश: सुन्न झालो होतो. हातातला फोन आपसूकपणे गळून पडला होता.
घड्याळात आठ वाजले आणि मी गाडी वेगाने स्मशान घाटावर नेली. घाटावर तुरळक गर्दी . कुठे अग्नी देऊन झाला होता. आणि कुठे कुणी यायची वाट बघत होते. तिथेच उभ्या असलेल्या माणसाला मी विचारले “ विलास रणदिवे....
“ निघालेत घरून. पोचतील थोड्या वेळात” माझ्या ओळखीचे कुणीच नव्हते. मी बाजूला कोपर्यात जाऊन बसलो. गर्दी म्हणावी तितकी नव्हती. एकदा विलास म्हणाला होता “ आयुष्यात तुम्ही काय मिळवले ते तुमच्या प्रेयात्रेला किती माणसे जमतात, तुमच्या माघारी काय बोलतात यावर अवलंबून असते. लोक पुंजक्या पुंजक्याने उभे होते आणि आपापसात बोलत होते.
“ विलासचे हे अचानक काय झाले ?”
“ heart attack ” कुणीतरी म्हणाले. किती मूर्ख माणूस होता हा. जर हा विलासचा मित्र असेल तर तो कशाने गेला इतकं तरी याला माहित पाहिजे. काल रात्री विलासच्या मुलाचा फोन आला होता, तो गाडीने घरी जात असताना एका ट्रकने त्याच्या गाडीला धडक दिली आणि गाडीचा तर चक्काचूर झालाच पण विलास जागच्या जागी ठार झाला.
“ पण कशाने आला attack ?”
“ दारू आणि काय ?” विलासचे वाक्य मला आठवले ज्याला जीवनाची नशा चढली आहे त्याला दारूची नशा काय करायची ?
“विलास दारू पीत नव्हता” कुणी म्हणाले
“ तू काय बघायला गेला होतास काय ?
“ बर ते जाऊ दे रे. आपण बरेच दिवस झाले, बसलो नाही.
“ केव्हा बसू या? माझ्याकडे स्टफ आहे “
“घरीच बसू. विल्या सारखे केव्हा काय होईल कुणास ठाऊक ?” सर्वजण हसले. एकमेकांना टाळ्या दिल्या. मी सुन्न झालो होतो. मित्रांच्या वर मनापासून प्रेम करणारा, त्यांना मदत करायची असेल तर कधी घड्याळाकडे न बघणारा विलास, त्याच्या प्रेतयात्रेला लोक दारूच्या गप्पा मारत होते. गोसिपिंग करत होते.
“ तू सारखे घड्याळ का बघतोयस ?”
“ आज कोणत्याही परिस्थिती लवकर गेले पाहिजे ऑफिसला. साहेब बोंबलेल नाहीतर”
“ जाऊ दे रे. एखाद्या वेळेस चालतयं”
“ सांगू का , आज रात्री ट्रेकिंग ला जाणार आहे. त्यामुळे ऑफिसमधून लवकर बाहेर पडायला पाहिजे. त्यामुळे सकाळी तरी वेळेवर पोचायला पाहिजे”
इतक्यात पायांची सळसळ झाली. लोक पुढे सरसावले. विलासची बॉडी आली होती. ज्याच्या चेहऱ्यावर तेज असायचे नेहमी. तो चेहरा अपघातामुळे विद्र्प झाला होता. प्रेत सरणावर ठेवलं. भटजीनि मंत्र उचारण चालू केलं. लोक क्षणभर शांत बसले. आणि पुन्हा त्याच गप्पा, कुजबुज सुरु झाली. प्रेताला अग्नी दिला गेला. आणि विलासच्या मुलाला लोक घाईघाईने भेटले आणि घरी जाऊ लागले. इतक्यात एक वृद्ध व्यक्ती तिथे पोचली. कुणीतरी त्यांना ओळखले “ हे तांबे सर ना ? किती बदल झालाय. आपल्याला शिकवायला होते”
“ तूच आता म्हातारा झालास. ते काय तसेच राहतील होय ?
“ ऐक न त्याच्या बरोबर एक सेल्फी काढू या का ? आज ग्रुप वर टाकू”
कुणीतरी पुढ गेलं. “सर, तुम्ही शिकवायला होतात आम्हला ?आम्ही विलासच्या वर्गात होतो.”
“ हो हो असेल. आता लक्षात राहत नाही. विलास यायचा सारखा घरी. त्यामुळे तो तेवढा लक्षात राहिला.”
“ सर, बर्याच दिवसांनी भेटलात तुम्ही. एक फोटो काढू या का ?
“ इथं ? आत्ता ?
“ थोड पुढ चला. बाकीच्या विद्यार्थ्यांना बरे वाटेल. “ सर नाईलाजाने गेटच्या पुढे गेले.मित्रांनी हसत हसत सेल्फी काढला. मी विषण्ण मानाने हसलो. आणि विलासच्या रडवेल्या मुलांना भेटून बाहेर पडलो.
“ सर, विलास साहेबांच घर आलं”
“ अं ? हो हो.
आज विलासचा बारावा दिवस हे मला पटत नव्हते. बारा दिवसापूर्वी हाच विलास माझा जवळचा मित्र होता. पण आता तो या जगात नाही, हे पटवून घ्यायला सुद्धा जड जात होते. पण दुर्देवाने हि वस्तुस्थिती होती. मी विलासच्या त्या छोटे खानी बंगलयाच्या आवारात प्रवेश केला. मला ओळखणारी त्याची मुलगी समोर आली आणि काका बसा म्हणून तिने मला एका कोपऱ्यात बसायला जागा दिली. भटजींचे आतल्या हॉलमध्ये मंत्रोच्चरण सुरु होते. विलासचे नातेवाईक बाहेरच्या अंगणात दबलेल्या आवाजात एकमेकांशी गप्पा मारत होते. मधूनच हास्याची कारंजी फुटत होती आणि दुसरा त्याच्या हास्याला आवरत होता. लहान मुले खेळत होती. नाकाला पदर लावून रडवेल्या चेहर्याने स्त्री वर्ग आतल्या हॉल मध्ये चालला होता. कुणी वृद्ध स्त्री गेट मधून आत आली आणि तिला बघताच कुणी तिला सामोरे गेले. बहुतेक विलासची मेहुणी असावी
“ किती चांगला होता गं विलास. वाईट झालं. पण देवाच्या इच्छेपुढे काही नाही आता रेवतीला सांभाळून घ्या सगळे तुम्ही” तिने गहिवरल्या आवजात सांगितले. दोन सेकंद हुंदक्याचे अस्फुट आवाज. पुन्हा शांतता.
“ हिला ओळखलस का ? हि माझी धाकटी सून.” नमस्काराची देवाण घेवाण झाली.
“ चांगली आहे. माझी काळजी घेते. विलास आला होता लग्नाला. छान झालं लग्न. हजार पान होतं बघ. रेवती मात्र आली नाही.”
“ काकू, थोरली सून कुठे असती ? इथेच ना ?
“ छे ग. मुलगा सून दोघेही जर्मनीत असतात. आता धाकट्याचं पण चाललय. तो जाईल दुबईला. मग मी जर्मन आणि दुबई करत इकडे तिकडे राहीन”
“ माझ्या लेकाचं सुद्धा चाललंय अमेरीकेच. होईल ते.
“ विलासची मुलं काय करतात गं?” वृद्ध स्त्रीने विचारलं
“ हे बघ मी जे सांगतोय ते खर सांगतोय. बाबांनीच मला सांगतील होत” वृद्ध स्त्री आत निघून गेली आणि मी आवाजाच्या दिशेन बघितलं. विलासची दोन मुले आपापसात दबलेल्या बोलत होती. पण तरीही त्यांचे बोलणे मला ऐकू येत होते.
“ पण तुला हे सांगितलं होत याला पुरावा काय ?”
“ तू आईला विचार”
“ आई तुझ्याच बाजूने बोलेल. तू लाडका आहेस तिचा. बाबांनी काय मृत्युपत्र तयार केले होते ? लेखी काही आहे ?
“ ते असे अपघातात जातील हे त्यांना स्वप्न पडलं होत काय ? बोलताना ताळतंत्र ठेव ना जरा”
“ मग तू म्हणतोयस म्हणून हे तुझं घर. तुला या घराची किंमत किती माहिती आहे का ?“ खूप पूर्वी आजोबांनी हा प्लॉट घेतला होता. आत्ताच्या भावाने या प्लोटची किंमत जवळजवळ सत्तर लाखाच्या घरात आहे. आणि या भले तीन खोल्या असतील, पण सगळे मिळून हे कमीत कमी एक कोटी रुपये किंमत होईल. हे तू एकटा खाणार ? आणि आम्ही काय बाबांची मुले नाहीत?”
“ बाबा राहत कुठे होते ? माझ्याजवळ ना ?
“ बाबा अजुनी सर्विस करत होते. धडधाकट होते. ते तुझ्याजवळ राहत नव्हते, तू त्याच्याजवळ राहत होतास.”
“ हे बघ माझी परिस्थिती चांगली नाही म्हणून बाबांनी मला हे घर द्यायचं ठरवल होतं. तुला काय झालं ? स्वत:चा flat आहे ना तुझा ?
“ ते माझ कर्तुत्व आहे. म्हणून हे सोडू मी.?
“ ठीक आहे, तुलाही काहीतरी मिळायला पाहिजे. बाबांचं पासबुक, डीपोझीट बघितले. एकूण तीन लाख सेव्हिंग आहे. तू दोन लाख घे. मी एक घेतो. घर बाबांनी सांगितल्याप्रमाणे माझं आणि फक्त एक लाख कॅश”
“ वा रे. वा. जे आहे त्यात समान वाटणी. व्यवहार चोख पाहिजे. फार तर आई तुझ्याकडे राहील म्हणून बँकेतले पैसे तिच्या नावावर ठेऊ म्हणजे तिलाही बरे आणि त्याचे व्याज तू घे”
“ का ? आईची वाटणी सुद्धा कर कि “
“ तिला काय मुंबईला घेऊन जायचं आहे ? ती इथेच राहील”
मी अस्वस्थ होत होतो. विलास, ज्याला माणसाचे व्यसन होते, ज्यांच्यावर तो मनापासून प्रेम करत होता त्याची मुले त्याच्या बाराव्या दिवशी त्याच्या बंगल्याच्या वाटणीसाठी भांडत होते. आपली आई कुठे राहणार म्हणून वाद घालीत होते.
विलासची मुलगी शांतपणे एक कोपऱ्यात उभी होती. बाप आणि मुलगी यांचे नातेच वेगळे. निदान तेवढी तरी विलासच्या दृष्टीने समधानाची गोष्ट. थोड्यावेळात ती आपल्या भावांच्या जवळ गेली.
“ तुमचं जे काही चाललयं ना ते मी ऐकते आहे मघापासून. यावर आज चर्चा करायचं नडलयं ?”
“ तू यातं पडू नकोस. हा आमच्या भावांचा प्रश्न आहे “
“ हो”? ती उपहासाने म्हणाली, “ मग ऐक मी काय सांगते ते. जे मी नंतर बोलणार होते ते आताच बोलते. हि वडिलार्जित इस्टेट आहे. आणि कायद्यानुसार यावर माझा हक्क आहे. समान हक्क. आणि तो मी सोडणार नाही” मुलगी सुद्धा?. त्या तिघांचे बोलणे मला ऐकवत नव्हते. पुढचे बोलणे ऐकायला मी थांबलोच नाही. कधी एकदा त्या घरातून बाहेर पडतो असे झाले होते. मी वहिनींना भेटून घरी जायचे ठरवले. अंगणातून आत हॉल मध्ये गेलो.
भटजींचे विधी संपत आले होते. बाहेरच्या हॉल मध्ये नातेवाईक दाटीवाटीने बसले होते. आतील खोलीत बसलेली रेवती हॉल मधून मला दिसतं होती. तशीच निर्विकार. नवरा गेल्याचं दु:ख चेहर्यावर नाही. विलासच्या वाटणीला हे नेमकं काय आलं होतं ? हि त्याची नियती होती का ?
“ जेवण झाले कि सिनेमाला जाऊ या . आता चालते जायला. आज बारावा दिवस आहे” कुणी मुले आपापसात कुजबुजत होती.
“ पण जेवण लवकर होणार नाही. आपण संध्यकाळी जाऊ पाहिजे तर”
“ ठीक आहे. एक काम कर ना. हळूच मावशीला पण विचार” कुणी रेवतीच्या कानाजवळ कुजबुजले आणि ती म्हणाली
“ आज नको. वाईट दिसतं” म्हणजे वाईट दिसेल म्हणून हि बाई जातं नव्हती.? विलास गेला म्हणून हिच्या आयुष्यात काहीच पोकळी नाही. विलास म्हणाला होता तिला प्रेम व्यक्त करता येत नाही हे खरं होत का ? का हीच प्रेमच नव्हत त्याच्यावर ?
कुणी मला म्हणालं “ जेऊन जावा”
“ नको. मला सोसत नाही अलीकडे. प्रसाद म्हणून लाडू द्या फक्त “ मला तिथून बाहेर पडायचं होतं. मी रेवतीला कसाबसा भेटलो. आणि तिथून बाहेर पडलो. विलासच्या मुलांचे अजुनी तेच चालू होते. मघापेक्षा आवाज थोडे अधिकच वाढले होते. दबक्या आवाजात हसणारी माणसे आता मोकळे हसत होती. मुलांचा आरडा ओरडा वाढला होता.
मी गेटच्या बाहेर आलो. गाडीत बसलो आणि खिडकीतून पुन्हा एकदा विलासच्या बंगल्याकडे बघितलं कदाचित त्या बंगल्यात माझं ते येण शेवटच होत. विलासच्या आठवणीने घशात आवंढा आला होता. माझी नजर सहज बंगल्याच्या नावाकडे गेली. बंग्ल्याचं नाव होतं “ मैत्र”
छान मांडणी केली आहे कथेची.
छान मांडणी केली आहे कथेची.
खरच, मयतीच्या वेळी बऱ्याच जणांना हास्य विनोद करताना पाहिलंय, तिडीक जाते डोक्यात अशा लोकांना पाहिलं की.
आणि आता मोबाईल आलाय हातात तर स्थळ- काळ काही भान नसतं.
छान.
छान.