पुस्तक परीक्षण: विंडमिल्स ऑफ गॉड्स (रहस्यमय , थरारक् आणि अनपेक्षित धक्के देणारी कादंबरी)

Submitted by निमिष_सोनार on 27 May, 2024 - 23:45

"विंडमिल्स ऑफ गॉड्स" (देवतांच्या पवनचक्क्या) ही एक गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय राजकीय कथा आहे ज्यामध्ये अनेक पात्रे आहेत. यात सिडनी शेल्डनच्या इतर कादंबरीप्रमाणेच सस्पेन्स, थरार, ट्विस्ट आणि टर्न आहेत. मूळ इंग्रजीतील कादंबरी वाचून 1 जून 2021 रोजी मी या पुस्तकाचे परीक्षण इंग्रजीतून लिहिले होते. त्याचा मराठीत अनुवाद आता चोखंदळ वाचकांसाठी प्रस्तुत करत आहे. ही कादंबरी सिडनी शेल्डन यांनी 1987 साली लिहिली. या पुस्तकावर नंतर अमेरिकेत टीव्ही सिरियल बनली. भारतात "मिशन भारत" नावाचे प्रदीप पंड्या या लेखकाचे हिन्दी पुस्तक आहे ज्याचा अनुवाद डायमंड पब्लिकेशनद्वारे सुषमा लेले यांनी मराठीत केला आहे. त्यात त्यांनी देशाची नावे बदलून (अमेरिका ऐवजी भारत आणि रोमानिया ऐवजी पाकिस्तान) तसेच इतर काही संदर्भ बदलून भारताशी संबंधित कथा लिहिली आहे, ती कथा याच कादंबरीची संपूर्ण नक्कल आहे आणि विशेष म्हणजे कुठेही सिडनी शेल्डन नावाचा साधा उल्लेख किंवा आभार सुद्धा नाही. हे चूक आहे! त्यांना वाटले की लोकांना कळणार नाही. पण त्यांना हे माहिती नाही की सिडनी शेल्डन या लेखकाचे चाहते जगभर पसरलेले आहेत. जगभरातील विविध फिल्म इंडस्ट्रीज् मध्ये (आपल्या बॉलीवूडसहित) 70, 80 आणि 90 च्या दशकातील अनेक चित्रपट सिडनी शेल्डनच्या कोणत्या ना कोणत्या कादंबरीच्या कथेवर किंवा काही प्रसंगावर आधारित आहेत. त्या लेखकाची लिहण्याची पद्धत तसेच व्यक्ती, पात्रे आणि प्रसंग निर्माण करण्याची हातोटी अद्भुत आहे. या लेखकला सामान्य माणसाची नस अगदी पक्की ठाऊक आहे!

"विंडमिल्स ऑफ गॉड्स" या कादंबरीत वरवर असे दिसते की, मेरी ऍशले ही या कथेची नायिका आहे. परंतु कथेचा वास्तविक नायक हा राजकारण आणि षड्यंत्र हे आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष "पॉल एलिसन" यांना लोखंडी पडदा (आयर्न करटेन) युरोपीय देशांशी सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत आणि पहिले पाऊल म्हणून ते इतिहासाच्या प्राध्यापक "मेरी ऍशले" ची रोमानियामध्ये अमेरिकन राजदूत म्हणून निवड करतात कारण तिचे ज्ञान आणि मासिकांमधील तिच्या काही लेखांनी त्यांना प्रभावित केलेले असते. तिचे लेख हे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीशी जुळत जुळतात. तिचा पती एडवर्ड आणि दोन मुले यांच्यापासून दूर जावे लागू नये म्हणून ती ही ऑफर नाकारते. तथापि, नंतर तिच्या पतीचा अचानक एका गूढ कार अपघातात मृत्यू होतो. नंतर काही कारणास्तव, ती ही ऑफर स्वीकारते.

मेरीसोबत, माईक स्लेड रोमानियाला तिचा डेप्युटी म्हणून जातो. पण त्याच्या चिडखोर वागण्यामुळे तिला तो आवडत नाही. रोमानियामध्ये एके दिवशी तीची भेट एका रहस्यमय घटनेत फ्रेंच डॉक्टर डेसफोर्जेस याच्याशी होते जो तिला आवडू लागतो आणि तिला वाटते की तो तिचा नवरा एडवर्डची जागा घेऊ शकेल.

राजदूतपदाचा कोणताही पूर्वीचा अनुभव नसतानाही, ती रोमानियातील आव्हानात्मक परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळते ज्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या उद्देशाला तिची पूर्ण मदत होते. मात्र या कार्यकाळात तिच्याकडून काही चुकाही होतात.

या कथेत, अमेरिका आणि रोमानिया यांच्यातील मैत्रीच्या योजनेशी सहमत नसलेले अनेक पात्र आहेत, जसे की मरीन ग्रोझा, असा एक नेता जो जगापासून लपलेला आहे आणि सध्याचे रोमानियाचे अध्यक्ष आयोनेस्कू!

नंतर एका माजी अमेरिकन CIA एजंट हॅरी लँट्झची, एंजलचा सहाय्यक हत्या करतो आणि एंजल स्वत: एका वृत्तनिवेदकाची हत्या करतो. एंजल हे अरजेंटिना देशाच्या एका व्यावसायिक किलरचे (मारेकरी) टोपणनाव आहे. तसेच एका गुप्त ठिकाणी, एका गटाचा प्रमुख जो स्वत:ला कंट्रोलर म्हणवतो, आणखी "एका व्यक्तीला" मारण्यासाठी एंजलला नियुक्त करतो. दरम्यान, माईक स्लेड (मेरिचा डेप्युटी) याची डॉक्टर डेसफोर्जेसशी एका विचित्र परिस्थितीत भेट होते आणि त्यानंतर जे घडते ते तुम्हाला प्रचंड आश्चर्यचकित करून सोडेल. म्हणूनच सिडनी शेल्डन या लेखकाला Master of the unexpected म्हणतात!

मेरी ऍशलेने रोमानियामध्ये अमेरिकन राजदूत म्हणून पदभार स्वीकारेपर्यंत जवळजवळ ६० टक्के पुस्तक पूर्ण होते. त्यानंतर अनपेक्षित घटना वेगाने घडू लागतात आणि तुम्ही पटापट अधाशीपणे पाने उलतात जातात. हा कंट्रोलर कोण आहे? एंजल कोण आहे? डेसफोर्जेस आणि माईक स्लेड नेमके काय करतात? आणि कोण कोणाला आणि का मारतो याचे रहस्य शेवटी उघड होते! वाचकांवर शेवटपर्यंत घट्ट पकड कायम करणारी ही एक राजकीय थ्रिलर कथा आहे. आवर्जून वाचा!

(टीप: शीतयुद्धादरम्यान, "लोखंडी पडदा" म्हणजे आयर्न करटेन हे एक राजकीय रूपक होते जे 1945 मध्ये द्वितीय विश्वयुद्धाच्या समाप्तीपासून 1991 पर्यंत शीतयुद्धाच्या समाप्तीपर्यंत युरोपला दोन स्वतंत्र क्षेत्रांमध्ये विभाजित करणाऱ्या राजकीय सीमांचे वर्णन करण्यासाठी वापरले जात होते)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार पूर्वी वाचली होती. आठवण करून दिल्याबद्दल आभार. सिडनी शेल्डनच्या कादंबऱ्यातला थरार जनरली आवडतो.
शीतयुद्धावर आधारित कादंबऱ्या मधे इरिलेवंट वाटू लागल्या होत्या कारण संदर्भ अचाट बदलले होते. परत जग बदलतंय. परत वाचायला आवडेल.

सिडनी शेल्डन हा माझा सर्वात आवडता लेखक आहे. त्यांची सर्वच पुस्तके खूप छान आहेत. "Tell me your dreams" हे माझे सर्वात आवडते. त्यांच्यानंतर "Tilly Bagshawe" हिने त्यांच्या नावाने काही कादंबऱ्या लिहिल्या. त्यासुद्धा खूप छान आहेत.

कोणे एकेकाळी सिडनी शेल्डन पुस्तक वाचण्याचा सपाटा लावला होता... किंवा तस captivating लिहिणार अजून कोणी सापडलं नव्हतं... त्याची आठवण झाली.

त्यांची सगळी कथानक अतिश्रीमंत, सत्ताधारी, ताकदवान माणसांच्या भोवती फिरत असतात...

कोणे एकेकाळी सिडनी शेल्डन पुस्तक वाचण्याचा सपाटा लावला होता >+१.
Windmills of God पण वाचली होती..पण आता आठवत नाही काही.
Bloodline ची (मराठी अनुवादित) एके काळी (टीन एज मध्ये!) पारायणं केलेली..माझं प्रचंड आवडतं पुस्तक. पण हल्लीच काही वर्षांपूर्वी अनेक वर्षांनी परत वाचायला घेतलं (मूळ इंग्लिश)..पण पुस्तकाने/कथेने तशी पकड घेतलीच नाही आता..त्यामुळे आता या वयात आपल्याला सि. शे. तितका भावत नाहीये असा मी निष्कर्श काढला.