डेथ बाय मिलियन कट्स

Submitted by Abuva on 27 May, 2024 - 01:07
Gemini generated picture of traffic chaos at an intersection

दुपारी दोनची वेळ. डोक्यावर ऊन आणि पोटात भूक मी म्हणत होती. नेहमीचा रस्ता, नेहमीचा सिग्नल. नेहमीची गर्दी, नेहमीचीच तगमग. वाहनांच्या गर्दीतूनही मला सिग्नल दिसला! उजवीकडे वळायचं होतं, हा सिग्नल सरळ जाणाऱ्यांपेक्षा आधी बंद होतो. बघतानाच तो लुकलुकला. म्हणजे उजवीकडे वळणं पाचसात सेकंदात बंद होणार. मी शहाण्या नागरिकासारखा माझ्या दुचाकीचा वेग कमी केला. रस्त्याचा न रंगवलेला मध्य पकडून त्याच्या डाव्या साईडला गाडी घेतली. आता न रंगवलेल्या एका झेब्रा क्रॉसिंगच्या जरा आधी उभं रहायचं. हा विचार वेड्यासारखाच होता.
यडझव्या... इतक्या आगोदर थांबतंय कुणी? चालू आहे ना सिग्नल? मग? त्यात डावीकडे यायचं कशाला? हा आपल्या बापाचा रस्ता आहे ना? का टॅक्स भरत नाही? हे सगळे प्रश्नोद्गार मला माझ्या मागून येणाऱ्या, आणि आता वेग वाढवत मला डावीकडून ओव्हरटेक करून एक कचकचीत वळण घेऊन उजव्या बाजूला वळणाऱ्या रिक्षावाल्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसले.
तंवर मी उजवा इंडिकेटर लावून पाय टेकवून उभा राहिलो होतो. पण कदाचित हा रिक्षावाला मला डावीकडून ओव्हरटेक करताना मागच्या बसवाल्याला नडला असावा. कारण बसच्या ब्रेकचा क्रॅंक्रॅ असा आवाज झाला. तो जेमतेम एक का सव्वा लेनचा रस्ता आहे, मग हे होणारंच. रिक्षावाला तर निघून गेला होता. पण त्या पीएमटी वाल्यानं तो राग माझ्यावर काढला. उगाच रेझ करत मला ढोस देत जवळून निघून गेला.
आता उजवा वळण्याचा सिग्नल पूर्ण बंद झाला होता. समोरची वाहनं आधीच निम्म्या रस्त्यात, म्हणजे चौकात येऊन फुरफुरत होती. त्यांनी ॲक्सलरेटर पिळण्यापूर्वीच आणखी एक रिक्षावाला माझ्या उजवीकडून सुसाटत गेला. मगाच्या रिक्षावाल्याच्या तोंडात मारेल असा लाजवाब उजवा टर्न त्यानं घातला! समोरचे फुरफुरे वीर काय ऐकतात काय? त्यांनां थोडीच कळ निघतेय? त्यांच्यातल्या दुचाकी वाल्यांनी दुचाकीचं तोंड आणखी उजवीकडे वळवून तो रिक्षावाला घुसल्यामुळे झालेला दोन सेकंदाचा उशीर कमी होऊन एकच सेकंदाचा कसा होईल याचा प्रयत्न केला. पण हे म्हणजे आमच्या फळीतील लोकांच्या घाईचा अपमान होता! त्या लाजवाब रिक्षाच्या मागून दोन खुफिया दुचाकीस्वार वेगात निघाले होते. एक मला उजवीकडून ओव्हरटेक करून सरळ गेला! धन्य! आता तो म्हणजे या समोरून येणाऱ्या फौजेच्या तोंडीच सापडला असता. पण त्या फौजेला लढण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. ते त्या मोसावाल्याच्या वेगापुढे नमून जरा थबकले. या क्षणाच्या उसंतीचा पुरेपुर फायदा उठवून त्यानं आपलं घोडं पुढे दामटलं. पण तेवढ्यात लाजवाब रिक्षाच्या आडून उजवं वळण पदरात पाडून घेऊ पहाणारी आणखी एक तोंड बांधलेली दुचाकीवाली मात्र या समोरून येणाऱ्या लोंढ्याच्या अलगद तोंडी सापडली! ती रिक्षा सुळकन वळल्यावर बाईंच संरक्षणच गेलं! मग समोरून येणारा सगळ्यात डावीकडचा हेल्मेटधारी आणि बाई यांच्या दुचाक्या समोरासमोर येऊन ठाकल्या. हेल्मेटधाऱ्यानं हेल्मेटच्या संरक्षणातून उच्चारलेले शब्द बाईंच्या झाकल्या कानांनी ऐकले! ते बहुधा त्यांच्या वर्मी लागले असावेत. मग एक पाच सेकंदांचा शाब्दिक समरप्रसंग तिथे घडला. बाईंनी आणि हेल्मेटवाल्यानं एकमेकांच्या मातांसंदर्भात काही टिपण्णी केली असावी असा माझा समज झाला. पण मला जरा कमीच ऐकू येतं. हेल्मेटवाल्याला मात्र ऐकू गेलं असावं, कारण त्यानं आता शिरस्त्राणची काच वरती करत प्रतिहल्ल्याचा पवित्रा घेतला. अर्थात त्या समोरच्या फौजेतल्या हेल्मेटधाऱ्यामागच्या दुचाकी-तिचाकी स्वारांना या खाजगी चौकशीत काहीच स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शिंगं वाज वाजवून (आठवा: हॉर्न देणे या क्रियेला याला प्राज्ञ मराठीत शिंग वाजवणे असे म्हणतात) या खोळंब्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दोघांनीही काढता पाय घेतला.
आता समोरच्या वाहतुकीला हिरवा मिळूनही आख्खे दहा सेकंद झाल्यानं समोरची फौज म्हणजे धरण फुटल्यासारखी सैरावैरा चाल करून येत होती. मग माझ्यामागे अजून कुणी उभं नाही याचा फायदा घेऊन एका चतुर रिक्षावाल्यानं चक्क मला डावं टाकून वाट काढली! मग तोच राजमार्ग समजून बरेच दुचाकीस्वार तीच वाट चोखंदळू लागले! एक नवा मार्ग मिळाला असं समजून किंवा हा सिग्नल चुकू नये म्हणून आता वाहनं समोरच्या दुभाजकाच्या उजवीकडून चाल करून यायला लागली! शरपंजरी पडलेल्या कोणा एका धीरोदात्त वीराच्या आविर्भावात मी हा प्रवाह झेलत होतो. ई, हे येडं असं माझ्या रस्त्यात का उभं आहे असा प्रश्न एका गॉगलधारी, ई-वाहनचालक ललनेला पडला असावा. म्हणजे असं मला आपलं वाटलं!

पण आता माझ्यामागेही कुमक जमू लागली होती. सगळ्यात आधी माझ्या उजवीकडे एक झोमॅटोवाला येऊन उभा राहिला. आपण समोरून येणाऱ्या वाहतुकीची गोची करतोय ही गोष्ट त्याला कळतच नव्हती. यांचं बरं असतं. यांना कायमचीच घाई असल्यानं त्यांनी ट्रॅफिकचे नियम वगैरे पाळावेत असं ना त्यांना वाटतं, ना इतर वाहनचालकांना वाटतं, आणि त्यांची अतीव आतुरतेने वाट पाहत असलेल्या क्षुधाग्रस्त ग्राहकांना तर अजिबातच वाटत नाही! (झोमॅटोच्या मालकांना तर काय - मला पेमेंट मिळालंय, आता तू, तुझी गाडी, तुझा जीव, घाल काशी!) पण आता माझ्या डावीकडेही एक लालपिवळी यष्टी येऊन थांबली. म्हणजे नाविलाजानं त्यानं थांबवली असावी. कारण तो थांबला तेच पुढे जाऊन, अर्धा चौक अडवून! आता समोरून येणारी गर्दी जरा रोडावली, तर तेवढ्यात झोमॅटोवाला मावळी चपळाईनं बुंगाट सुटला. 'सिग्नल तुम्हा पामरांना' असा बाणाच असतो यांचा. त्याची जागा भरायला आता एक आख्खी रिक्षाच येऊन उभी राहिली. म्हणजे आता समोरून येणाऱ्या बसला अंग चोरूनच(!) जावं लागणार होतं. पण त्याची कुचंबणा झाली होती. का विचारा? कारण आता उजव्या बाजूनं येणाऱ्या वाहनांना 'अब आपुनकी बारी है' हे लक्षात आलं असल्यानं त्यांची चोरटी सरपटी चढाई सुरू झाली होती. इंच इंच गिळंकृत करत ते बशीच्या वाटेत आले होते! पण पीएमटीवाले डायवर काय मेल्या आईचं दूध प्यालेले आहेत असं वाटलं काय? त्या महाभागानं एखाद्या नागाला आपला दहा नंबरी फणा लाजेनं मिटून घेऊशी वाटेल अशा कौशल्यानं नागमोडी वाट काढून ते धूड पुढे घुसवलं! पण त्यांच्या कौशल्याला सुद्धा मर्यादा आहेत हो! कारण आता माझ्यामागून एक विक्रम-वेताळाची जोडी त्या माझ्या उजवीकडच्या रिक्षापलीकडून रस्ता काढत आली. त्या नव्या मोटरसायकली नसतात का, ज्याच्या मागच्या सीटावरची व्यक्ती पुढच्या सिटावरच्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी चाटून खाऊ शकेल अशी उंचावर बसली असते? हां तर एक कबुतरांची जोडी त्या विचित्र वाहनावर विराजमान होऊन आता या रणभूमीवर प्रकट झाली! त्यातली मागच्या उच्चस्थानी बसलेली वेताळस्वरूपी कबुतरी ही कुठल्याशा अनिर्वचनीय आनंदाचा आस्वाद घेत दुचाकीचालक कबुतराच्या खांद्यावर मान टाकून झोपली होती. आता दुचाकी चालक बोलून चालून 'विक्रम'च होता. त्याला कुठली नीतिनियमांची पत्रास? त्यामुळे आख्ख्या बसची ठासून झाल्यावर, अंगविक्षेप करत रस्ता काढत काढत आता हे युगुल माझ्यासमोर आडवं येऊन उभं राहिलं. आडवं! म्हटलंच आहे की स्मरातुराणां न भयं न लज्जा!

आता बस अशी अडली असताना इकडचा सिग्नल सुटला. म्हणजे आता वाहनं माझ्या समोरून उजवी-डावीकडे जाणार.. त्यात एक गम्मत आहे बरं का. माझ्या डावीकडून येऊन माझ्या उजवीकडे वळणाऱ्या (मी आलो त्याच्या उलट्या दिशेने जाणाऱ्या) वाहनांसाठी फक्त सहा सेकंदांचा हिरवा सिग्नल आहे! आणि ह्याची चाड उजवीकडून येणारी वाहनं कधीच बाळगत नाहीत. सहा सेकंद कोणाच्याच खिजगणतीत नसतात हो... सहा सेकंदांचा सिग्नल ही निव्वळ चेष्टा आहे! असो. आता या कुंठलेल्या वाहनांच्या हॉर्नचा कल्लोळ सुरु झाला. जशी जशी बस पुढे सरकली तसा चौकात वाहनांचा एकच गोंधळ उडाला. बस अडकली आहे हे बघून तिच्या मागे सिग्नल बंद झाला तरी घुसणारे कमी नव्हते. मगाशी म्हटले ते सहा सेकंद वाले जिवाच्या आकांतानं त्या सहा सेकंदात वळण्यासाठी चौकात आले. त्यांच्यापलिकडे वाट काढत डावीकडून उजवीकडे जाणारे सरसावले. बसनं आमचा रस्ता अडवला या विचारानं सात्विक संतापनं उजवीकडून डावीकडे वाट काढणारे त्या गर्दीत घुसले. हे कमी काय म्हणून माझ्याच सारखे उजवीकडे वळणारे दुचाकीस्वार पिढीजात रक्तात भिनलेल्या गनिमी काव्याचा हा प्रसंग पाहून वापर करत त्या गर्दीत सामील झाले. तेवढ्यात तो माझ्या डावीकडे अर्धा चौक व्यापून उभा राहिलेला एस्टीवाला, त्याला चेव चढला. तो पुढे सरकला. का? का? का?
पंचवीस-एक वाहनांची झोंबी तिथे चौकात सुरू झाली! चारही दिशांनी, सिग्नल असो वा नसो, वाट मिळो वा न मिळो, तरुण असोत की बुढ्ढे, स्त्री वा पुरूष, सिंगल सीट किंवा डबल सीट, ट्रिपल सीटही, दुचाकी-तिचाकी-चारचाकी, कशाची तमा न बाळगता त्या भाऊगर्दीत सामील झाले. सगळ्यांनाच लवकर जायचं होतं, चारसहा सेकंद वाचवायचे होते! जणू तिथे काही डबोलं ठेवलंय यांच्यासाठी आणि मिनीटभर उशीरानं पोचले तर ते गायबच होणार आहे! मी आपला ढिम्मच न हलता उभा, माझा उजवीकडे वळण्याचा सिग्नल कधी पडतोय ते बघत!

यथावकाश तो मिळाला. पण मला त्या वाहतुक मुरब्ब्यामध्ये घुसण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी तसाच मख्ख (का मठ्ठ) उभा हे पाहून माझ्या मागून येणाऱ्या कुणी आवाज दिला, 'चलो भाई, क्यूं रास्ता रोकके खडे हो' घ्या, एवढंच राहिलं होतं! मग केवळ देवदयेनं आणि अंगिभूत कौशल्यानं सर्वांनी त्या गोंधळातून आपापली वाट शोधली आणि चौक हळूहळू मोकळा झाला. मीही माझा सिग्नल जायच्या आत उजवीकडे वळलो, वाटेला लागलो.

उणापुरा दोन मिनिटांचा हा खेळ. कदाचित प्रत्येक चौकात घडणारा. तुम्ही आम्ही रोज बघणारे, खेळणारे.

लाल रंगाचा दिवा दिसल्यावर हा टाळायचा कसा हा विचार माणसांना का पडतो? सिग्नल हे आपल्या भल्या करता असतात हे का कळत नाही? सिग्नल तोडला की मी कोणी ग्रेट असं का वाटतं? इतरांची खोटी झाली तरी चालेल, पण मी मात्र पुढे गेलो पाहिजे हा कुठल्या तत्त्वांत बसणारा विचार? आणि हा विजिगिषू बाणा फक्त सिग्नललाच का उफाळून येतो?

तुम्ही ते उत्तररात्री विनापरवाना महागड्या गाडीच्या जीवघेण्या अपघातात कुणी आणि किती नियमांची पायमल्ली केली याचा हिशोब करताय. करा. पण कितीही झाली तरी ती घटना लाखात, नव्हे कोटीत एक होती. त्या गर्हणीय वर्तनाच्या मुळाशी ह्या घडीघडी येणाऱ्या अनुभवातून जाणवणारी, नियम हे कस्पटासमान लेखण्याची वृत्ती आहे. याकडे भले आपण आज दुर्लक्ष करू. पण समाजाची वीण या प्रत्येक प्रसंगी एका धाग्यानं का होईना उसवतेय, विसविशीत होते आहे, जर्जर होते आहे. डेथ बाय अ मिलियन कट्स...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी समर्पक लिखाण.हा खेळ रोज बघायला मिळतो.झोमॅटो स्वीगी उबर इट वाले तर जीवावर उदार होऊनच लढत असतात परवा फुटपाथवरून भरधाव चुकीच्या दिशेने येऊन पाव किलोमीटर वाचवणाऱ्या स्वीगी वाल्याला थांबवून आम्ही 4 शब्द ऐकवले.त्याने मख्खपणे कानातले प्लग काढले, तोंडातला तोबरा सांभाळून ठेवला आणि आमची वाक्यं संपल्यावर सुसाट तसाच चुकीच्या बाजूने निघून गेला.फुटपाथवर फिरणारे ज्येना, प्रेग्नन्ट बायका, लहान मुलं यांची तर लायकीच आहे जीव धोक्यात घालून समोरची वाहनं चुकवत चालण्याची.गाड्या चालवत नाहीत, पायी चालतात म्हणजे काय?असा अन्याय करतं का कोणी?

उण्यापुऱ्या दोन मिनिटात बरेच निरीक्षण केलेत की !! तरी यात BRT मार्गातून येणाऱ्या वाहनांमुळे होणारा गोंधळ नाहीये . स्वारगेट पासून कात्रज कडे जाणारा प्रत्येक चौक असाच झालाय . भयंकर गर्दी आणि वेडीवाकडी येणारी वाहने .....

अहो हे सगळे रस्त्यावरच का होते हे माहित आहे का?
रस्ते हे इकडून तिकडे जाण्यासाठी बांधले आहेत, नुसते उभे राहून गंमत बघण्यासाठी नाही. आता भारताची लोकसंख्या कमालीच्या बाहेर वाढली आहे, अश्या परिस्थितीत नियमांचे पालन करण्यात रस्ता अडकवून ठेवणे हे योग्य नाही. आजकाल बाहेरचे जग म्हणजे जंगल झाले आहे, तिथे कुठले नियम? ज्याने त्याने आपापला मार्ग शोधून लवकरात लवकर इकडून तिकडे जावे व रस्ता इतरांसाठी मोकळा ठेवावा.

नाहीतर हे येडपट अमेरिकन! स्वतः तर जातच नाहीत, पण दोन दोन तीन तीन तास स्वतः वाहतुकीत अडकून बसतात नि इतरांना पण अडवून बसतात.
भारतातल्या लोकांना हे परवडण्यासारखे नाही. कामे असतात त्यांना. पोलीसांनाहि हे माहित आहे, म्हणून ते उगाच कुणाला थांबवत नाहीत, साधा कायदा तोडल्याबद्दल.
अश्या रीतीने उच्च भारतीय संस्कृतीत म्हंटल्या प्रमाणे सर्वेSपि सुखिनः: संतु!

जबरदस्त निरीक्षण आहे.
सिग्नल तोडून पॉ पॉ करत जाणारा अतिशय घाईत असणारा व्यक्ती बर्याच वेळा पुढच्या चौकात टपरीवर गुटखा चघळणे किंवा सिगारेट फुकणे साठी आरामात 5 ते 10 मिनिटे देतानाही आढळतो.
कायद्याचा धाक नाही. पोलिसांची इज्जत कमी झालीय.

रिक्षा, दुचाकी, टेम्पो ट्रॅव्हलर, कंपन्यांच्या मोठ्या बस, PMT ह्या सगळ्यांपासून दररोज वाचत चारचाकी चालवावी लागते त्याचा स्ट्रेस किती असेल हे कुठेच काऊंट होत नाही.

चारचाकी ची ही केस.आणि दुचाकी च्या मागून भरधाव इलेक्टरीक कमी आवाज वाली pmpml येत असते.तर्क शेजारून वारा देऊन गेल्यावरच कळतं बस गेली असं.इलेक्टरीक वाहनांना आवाज द्यायला हवा.झुमकन अंगावर येतात.