शाळेतून पळत-पळतच घर गाठलं. वाटेतच लागणाऱ्या 'सलमा जनरल स्टोअर्स' मधून आणलेल्या २ रुपयांच्या खास अशा मांजा ची पूडी एकदा तपासली आणि तसाच हाथ-पाय धुवायला गेलो. ५ मिनिट माझ्या माकडउड्या पहिल्या नंतर 'निदान बाबा येण्या अगोदर तरी घरी ये मेल्या' असं म्हणत ४ घास आई ने खाऊ घातले ते थेट पळालो गुड्डू च्या घरी. पोहचलो तर तिथे व्हरांड्यात खुद्द गुड्डू, विवेकया, पप्पू, मंग्या आणि अमल्या अशी पतंगी मातब्बर सरदार हजर! सरदारच ते, कारण हे लोक पतंगबाजी मध्ये मुरलेले आणि मी आपला 'Trainee'. 'चल रे घे लवकर फाड तुझ्या नावाचा पेपर अन ये इकडे पट्कन' कमांडर पप्पू दादा कडून ऑर्डर येताच मी भराभर रद्दी पेपर फाडून त्याच्या बाजूला येऊन बसलो. Training तशी पक्की चालली, अगदी पेपर कटिंग पासून पतंग बनवणे ते उडवण्या पर्यंत. फायटर जेट्स चालवण्याची तयारी जणू.
मम्मे खळ झाली का गं? हो म्हणत माळी काकूंनी गरमा-गरम खळीच पातेलं आमच्या मध्ये आणून ठेवलं तोच गुड्ड्या मूठभर खळीचा तोबरा भरून पसार. हि खळ खायची कि पतंगावर लावायची हेच कळेना. उडणारा त्रिकोणी पतंग हा मुळात चौकोनी असतो ते त्या दिवशी नव्याने कळलं. आईच्या हातून पाठीवर पडणाऱ्या खराट्या मधली काडी वाकते, नव्हे नव्हे तर तिनेच पतंगाला आधार देता येतो हे हि कळलं. पप्प्या ने खळीनें पतंगाला धनुष्य-बाण चिटकवला. ‘हा. . आता याला मंगळसूत्र घालू’. ‘मंगळसूत्र?? पण पप्पू दादा, मंगळसूत्र तर बाईला असतंय की रं’. ‘यांच्यानंतर काय बी विचारलं तर पाहिलं तुझाच पतंग करतो बघ’. मी परत कशाला आणि तोंड उघतोये. मग ४ बोटं हिकडं न ४ बोटं तिकडं असं माप दाखवून पप्पूदा ने मंगळसूत्र बांधलं एकदाच. शेपटी!!! 'पतंगाचा मेन सगळं शेपटीतच असतंय बघ सगळं प्रतिक्या. . नीट लक्ष दे' असं म्हणत अमल्या-द शेपटी एक्स्पर्ट ने कागदाच्या पट्ट्या ला पट्टी जोडत लांब शेपटी तयार केली. खळी ने चिटकवली तो आमचा पतंग तयार!!
पतंगाच्या टेक ऑफ साठी प्रशस्थ मैदान आणि स्वछ आकाश मोकळं होत-म्हणजे होत एके-काळी. झालं, प्रत्येकाने आप-आपले पतंग काम जेट्स उडवण्याची दिशा ठरवली. 'रील' अशी खास नव्हतीच मुळी. मिळेल ती काटकी मोडली, त्याला मांजा गुंडाळला की झाली 'रील' तयार. तीच रील घेऊन माझा पतंग गगन-पार!! ‘अहो. . अहो उठा नं, सणा-सुदिच्या दिवशी सुद्धा असं ९ वाजेपर्यंत झोपून राहिलात तर कसं बरं मी आवरू घरं’. स्वप्न!!! स्वप्नवतच आयुष्य ते. एखाद्या जेट पायलट ला अभिमान वाटावा अशा थाटात मी माझ्या पतंगापेक्षाही हवेत होतो.
आपण सर्वांनी हे संक्रांत जगलीये... जगलीये सुद्धा आणि साठवलीये सुद्धा.
संक्रांत
Submitted by प्रतिक रमेश चां... on 14 May, 2024 - 08:38
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users