भावना

Submitted by प्रतिक रमेश चां... on 6 May, 2024 - 08:40

आज च मेव्हण्याच लग्न झालं. म्हणजे झालं एकदाचं!!! भावाच्या लग्नाची तयारी करायची म्हणून बायको लेकरा सहित महिनाभर आधीच बोरिया बिस्तर घेऊन माहेरी आलेली. या महिन्या भराच्या कालावधीत पोरगं 'बाबा' म्हणायचं विसरलं, व्हिडीओ कॉल वर पण बोलेनास झालं. वाटलं, आता पोरगं बापाला विसरण्या आधी आपण तिथं पोचलेलं बरं. . .आलो. बायकोनं दरवाजा उघडला, तोच पोरानं माझ्या पायाशी लोळण घेतली होती, खाताना-खेळतांना खरकटं झालेलं तोंड, सर्दी म्हणून शेवाळ झालेलं नाक, कंटाळा म्हणून न घातलेली चड्डी . . .मी तसाच त्याला उचलला. तब्बल २२ दिवसांनी 'बाबा' म्हणाला. रात्री माझ्या च मांडी वर झोपला. निर्मात्याने १३ महिन्याच्या मनात काय भावरस पेरला असेल त्याच त्याला ठाऊक.

मेव्हण्याच लग्न म्हणजे भाऊजी हक्काचा बिन पगारी फुल्ल (fool असे पकडावे) अधिकारी फोटोग्राफर!!! सप्तपदीच्या नंतर वर ने वधू च्या गळ्यात मंगळसूत्र घातले. लोलक खाली येत नाही तोवर वधू च्या डोळ्यातील अश्रू खाली आले आणि बाकी पब्लिक च्या नजरेस पडण्या आधी सहाजिकच माझ्या कॅमेऱ्याने ते टिपले.

लेकीला वाटी लावण्याचा प्रसंग मुळातच गंभीर. मला माझ्या बाजूला मुसमुसल्याचा आवाज आला. माझ्या आई ने डोळ्याला पदर लावला होता. "आई आता तुला कशाला रडू येतंय, तुझं लग्न होऊन जमाना उलटला की." "नाही रे, कितीही झालं तरी लेक सासरी चालली नं." त्या नंतर चे २-३ क्लिक नीट येईनात. लेन्स साफ केली. नो इम्प्रोव्हमेन्ट. . .कोणीतरी म्हणालं "काय जावई डोळ्यातलं पाणी तरी पुसा!!!"
माणूस हा कधी भावनाशून्य नसतोच मुळी. कारण भावनाशून्य ही सुद्धा एक भावनाच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users