ड्रीमलँड-५ (अंतिम )

Submitted by SharmilaR on 3 May, 2024 - 02:35

ड्रीमलँड-५

भाग:-1
https://www.maayboli.com/node/85090
भाग:-2
https://www.maayboli.com/node/85090
भाग:-3
https://www.maayboli.com/node/85092
भाग:-4
https://www.maayboli.com/node/85093

“आता तेथून ‘सेवर्थलँड’ जाऊन आपल्याला बरोब्बर एकवीस महीने झाले..” समीर म्हणाला. तिघेही परतीच्या विमानात बसले होते.
आता त्या सगळ्यांनाच भारतातल्या नातेवाईकांची.. मित्र मैत्रिणींची.. शेजार पाजाऱ्यांची आठवण यायला लागली होती.. गेल्या काही दिवसांपासून.. इथली सगळी गंमत केव्हा एकदा, मित्रांना प्रत्यक्ष भेटून सांगतो, असं रौनक ला झालं होतं. आणी केव्हा एकदा भारतात ऑफिस मध्ये सगळ्यांना भेटून ‘सेवर्थलँड’ ची सगळी माहिती देतो.. प्रेझेंटेशन दाखवतो.. असं समीरला वाटत होतं......इतके दिवस तो त्यावर काम करत होता. आता त्याचा रीपोर्ट तयारच होता..

आपण बघितलेल्या.. अनुभवलेल्या गोष्टींपैकी काय काय आपल्या देशात आपल्याला इंप्लीमेन्ट करता येईल ह्याचाच विचार ते तिघंही करत होते. ‘जर पृथ्वीवरच्या एका देशात, इतकं सगळं ‘एनवायरनमेंट फ्रेंडली’ आयुष्य असू शकतं, तर मग आपल्याकडे का नाही हे होणार..?’ हाच विचार त्यांच्या डोक्यात चालू होता.

“इथे कायमचं रहायला आलो न आपण.. तरी मी टू व्हीलर नाही मागणार.. तिशी पर्यंत तरी नक्कीच नाही.. मित्रांना पण सायकल चालवण्याबद्दल सांगत रहाणार..” रौनक म्हणाला.

“पाण्याचा वापरा बद्दल तर नक्कीच काही बघायला हवं घरात..” सारिका म्हणाली.

“आता आलोच आहोत तर इथली काही राहिलेली कामही होतील.. एकवीस महिन्यातली साठलेली कामं आहेत....” समीर म्हणत होता.
“एकवीस..?” रौनक प्लेन च्या खिडकीतून बाहेर बघत होता...

“हो ना.. बरोब्बर एकवीस..”

“ट्वेन्टी वन डेज..!” हा आवाज अनिश चा का..?

‘पण हा अनिश इथे विमानात आपल्या बरोबर काय करतोय..? तो पण येतोय भारत बघायला..? केव्हा ठरलं हे..? आणी हे सगळे आवाज इतके लांब वरून आल्यासारखे का वाटताहेत..? सगळे आपल्या जवळपास बसलेले असून इतक्या लांब का वाटताहेत ते..? मला कसं काहीच फील होत नाहीय..? कुठे आहेत हे सगळे..?

समीर.. रौनक.. अरे, इथेच माझ्या शेजारी बसलायत ना..? मग जरा मोठ्याने बोला नं..? माझे ईयरप्लग कुठे आहेत..? आणी तरी अनिश चं बोलणं कळतय मला... तो इंग्लिशच बोलतोय का आज.. आणी हे नाका तोंडाला काय आहे माझ्या..? माझा हात असा बांधल्या सारखा का वाटतोय..? हे काय टोचतय..? रौनक.. रौनक..?

अरे.., जरा इकडे बघा... मला सांगा.. मी पण सांगणार सगळ्यांना सेवर्थलँड ची गंमत.... मला... अरे, रौनक.. समीर.. त्यांना माझा आवाज का ऐकू जात नाहीय..? माझे डोळे पण इतके जड झालेत नं.. उघडतच नाहीय.. समीर.. रौनक..” सारिका आवाज द्यायचा प्रयत्न करत होती..

“बाबा.. बाबा.. इकडे बघ.. आईचे ओठ हलताहेत.. अरे, बघ बघ..” रौनक आनंदाने ओरडला.

“यस! सी.. शी इज ट्राईंग टु मुव हर लेग्ज ऑल्सो.. आफ्टर ट्वेन्टी वन डेज.. त्या शुद्धीवर येताहेत.. आज बरोब्बर एकवीस.. दिवस झालेत त्यांना कोमात जाऊन.. ” डॉक्टर म्हणाले.

बेड भोवती उभे असलेले समीर, रौनक, डॉक्टर आणी नर्स .. सगळेच हा चमत्कार बघत होते.. आज इतक्या दिवसानंतर सारिका मध्ये जीवंत पणाची खूण सापडत होती..

सरिकाला स्कूटर वर झालेल्या अपघात एवढा भीषण होता.. झालेल्या ठोकरीने, ती हवेतच उंच फेकल्या जाऊन खाली जमिनीवर आपटली होती. डोक्याच्या भारा वरच पडली होती ती... हेल्मेट मुळे दिसण्यासारखी दुखापत झाली नव्हती, पण तेव्हाच तिची शुद्ध हरपली होती. शरीरावर काही ठिकाणी मुका मार लागला होता.. एक पाय खूप सुजला होता..

ज्या मोटरसायकल ची तिला धडक बसली होती, त्यावर तीन मुलं होती. जेमतेम अठरा एकोणावीस वर्षांची... त्या कुणीच हेल्मेट घातलेलं नव्हतं अगदी चालवणाऱ्या मुलानेही नाही.. सिग्नल तोडून भरधाव वेगाने निघाली होती ती मुलं.. तारुण्याच्या मस्तीत.. सर्वात मागे बसलेला तर जागच्या जागीच गेला. चालवणारा हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केल्यानंतर, दोन दिवसांनी गेला. मध्ये बसलेल्या मुलाला दुखापत तर खूप झाली होती.. पण तो वाचला होता.. अजून काही महीने तरी तो बेड वरच असणार होता..

त्या सगळ्यांनाच रस्त्यावरच्या लोकांनी ताबडतोब हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलं होतं.. वेळेवर डॉक्टरी उपचार सुरू झाले.. सरिकालचं एक्सरे.. सिटिस्कॅन.. सगळं केलं.. पण सारिका जी कोमात गेली.., ती.. इतके दिवस तिच्यात काहीच फरक पडलेला दिसत नव्हता. फक्त श्वास चालू होते, म्हणून जीवंत आहे म्हणायचं.. ती केव्हा शुद्धित येईल, हे डॉक्टर सांगू शकत नव्हते..

आणी आज.. आज इतक्या दिवसानंतर तिच्यात काही हालचाल दिसली होती..

“बाबा, आई नक्की बरी होणार आता..” रौनक ला आनंदाने बोलणं सुचत नव्हतं.
“हो, बेटा. आता येईल ती लवकर शुद्धीवर..” समीर म्हणाला.

“येस.. मला वाटतं आता शुद्धीवर येण्याकडे त्यांची वाटचाल सुरू झालीय.. आज आपण परत एकदा सिटिस्कॅन करू.. बाकी त्यांच्यात काहीच व्हिजिबल दुखापत नाहीय.. त्या शुद्धीवर आल्या की एक दोन दिवसात सगळ्या तपासण्या करून घरी नेता येईल त्यांना.. ” डॉक्टर म्हणाले..

सारिका ला आता सगळ्यांचे आवाज हळू हळू पण स्पष्ट पणे ऐकू येत होते... तिचं ‘सेवर्थलँड’ चं प्लेन परत इथे लँड व्हायला लागलं होतं.. शुद्धीवर येता येता तिला ‘सेवर्थलँड’ चा अर्थ पण कळला होता, ‘सेवर्थ’ म्हणजे, ‘सेव्ह अर्थ’. पृथ्वीचा बचाव. पर्यावरण जपणारी माणसं त्या देशात रहातात. पृथ्वीचा बचाव करणारा देश..

सारिकाची तिच्या ड्रीमलँड मधून बाहेर येण्याची प्रोसेस चालू झाली होती....

(समाप्त)
**********

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पाचही भाग एकत्रच वाचले आज. तसा गोष्टीच्या नावावरून आणि पहिल्या भागावरून अंदाज आला होता की जे चालू आहे ते बहुतेक स्वप्न असावं सारिकाचं. खूप छान संकल्पना आणि उगाच लांबड ना लावता वेळेवर केलेला शेवट यामुळे आवडली कथा.

खूप खूप सुंदर!!! कथा- कल्पना असली तरी त्यामागची तुमची तळमळ, तुमचे सखोल विचार जाणवत होते! आणि शेवटच्या भागामध्ये दिलेला ट्विस्ट! त्यामुळे केवळ कथा म्हणूनही उत्कृष्टच!

चांगली कल्पना

त्या 3 नालायक टुकार पोरांचा फार राग आला

धन्यवाद झकासराव.
त्या 3 नालायक टुकार पोरांचा फार राग आला>>>हल्ली जळपास सगळे लोकं असेच गाड्या हाणतात. माझी तर रोजच चिडचिड होते ह्या विषयावरून. वाईट
Traffic बद्दल मी कितीही वेळ बोलू शकते आणि बोलत असते.

Traffic बद्दल मी कितीही वेळ बोलू शकते आणि बोलत असते.>>> ह्याचा अर्थ आहे कि तुम्ही आमच्या महान पुण्यनगरीचे नागरिक असणार.

ह्याचा अर्थ आहे कि तुम्ही आमच्या महान पुण्यनगरीचे नागरिक असणार.>> पुण्याचा ट्रॅफिक भयानक आहेच. पण आम्ही नाशिककर काही कमी नाही.